‘द ब्लड टेलिग्राम’ : १९७१च्या युद्धाचा आंतरराष्ट्रीय साज
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
शशिकांत पित्रे
  • ‘द ब्लड टेलिग्राम’ची इंग्रजी व मराठी मुखपृष्ठं
  • Tue , 21 February 2017
  • ग्रंथनामा Booksnama द ब्लड टेलिग्राम The Blood Telegram गॅरी बास Gary Bass रिचर्ड निक्सन Richard Nixon हेन्री किसिंजर Henry Kissinger आर्चर ब्लड Archer Blood

१९७१ मधील बांगलादेश संघर्षावर भारतात अनेक पुस्तके लिहिली गेली, परंतु ती प्रामुख्याने भारत- पाक युद्धावर आधारित आहेत. किंबहुना ते युद्ध केवळ दोन देशांपर्यंत सीमित राहिले नाही, तर त्याला अनेक आंतरराष्ट्रीय परिमाणे लाभली. जगाला मानवतावादाचे धडे शिकवणाऱ्या अमेरिकेने तिच्या लघुदृष्टी आणि आंधळ्या पाकिस्तानप्रेमामुळे त्या देशाच्या पूर्व भागातील बंगाली भाषिकांच्या होणाऱ्या नरसंहाराकडे गर्हणीय दुर्लक्ष केले. भारत व रशिया यांच्यात मित्रत्वाचा करार झाला असल्याची पुरेपूर जाणीव असूनही भारताला घाबरवण्यासाठी आपले अण्वस्त्रसज्ज आरमार बंगालच्या उपसागराच्या दिशेने हलवून आणि चीनला भारतीय उत्तर सीमेवर सैन्य तैनात करण्याची चिथावणी देऊन निक्सन-किसिंजर या दुकलीने तिसऱ्या महायुद्धाला जवळजवळ साद घातली. हे सर्व करताना त्यांनी अमेरिकेच्या संसदेला आणि विपक्षाला पूर्णत: अंधारात ठेवले. या रोमांचकारी घटनाक्रमाचा अत्यंत प्रभावी परामर्श ‘द ब्लड टेलिग्राम’ या पुस्तकात गॅरी बास या सिद्धहस्त लेखकाने घेतला आहे. पुस्तकात निक्सन आणि किसिंजर यांच्या भारतविरोधी कुटिल राजनीतीचे अक्षरशः इतके धिंडवडे काढले आहेत की, हा लेखक भारतीय आहे की काय अशी शंका येऊ लागते.

पाकिस्तानातील हुकूमशहा जनरल याह्याखान यांनी १९७० मध्ये घेतलेल्या सार्वत्रिक निवडणुकांत पूर्व भागातील शेख मुजीबुर रेहमान यांच्या अवामी लीग पक्षाला पाकिस्तान सिनेटमध्ये स्पष्ट बहुमत लाभले. आता मुजिबुर पूर्व पाकिस्तानला स्वायत्तता मिळावी आणि बंगाली भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा दिला जावा या दोन मागण्यांची पूर्तता साधणार याची याह्यांना जाणीव झाली. त्यांनी तात्काळ मार्शल कायदा लागू केला आणि पूर्व पाकिस्तानात बळजबरी व अत्याचाराचे भीषण सत्र चालू केले. २५ मार्च १९७० रोजी शेख मुजिबुर यांनी स्वतंत्र बांगलादेशाची घोषणा केली. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने अमानुष नरसंहाराचे अभियान हाती घेतले. त्याचा अतिरेक झाल्याचे पाहून डाक्क्यामधील अमेरिकी उपदूतावासातील महावाणीज्य दूत आर्चर ब्लड यांनी पूर्व पाकिस्तानात बंगाली जनतेचे निर्मम शिरकाण बंद करण्याचे पाकिस्तान सरकारला तातडीने आदेश दिले जावेत अशी कळकळीची विनंती करणारी एक तार ६ एप्रिल १९७१ रोजी किसिंजरना पाठवली. त्यावरून ‘ब्लड टेलिग्राम’ हे अर्थपूर्ण नाव या पुस्तकाला दिले गेले आहे.

  तत्कालिन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन        

बांगलादेश स्वातंत्र्ययुद्धाच्या ज्या चार प्रमुख अंगांवर अथक संशोधन आणि अगणित मुलाखतींच्या पश्चात लेखकाने या पुस्तकात स्वारस्यपूर्ण प्रकाश टाकला आहे, ती म्हणजे : एक, पाकिस्तान लष्कराने बंगला नागरिकांचा, विशेषकरून हिंदूंचा, केलेला अघोरी नरमेध; दोन, अमेरिका आणि चीन यांच्यामधील कित्येक वर्षे गोठलेल्या राजनैतिक संबंधाची कोंडी फोडण्यासाठी याह्यांनी केलेली पडद्यामागची अतिगुप्त यशस्वी मध्यस्थी आणि त्यांचे ऋण फेडण्यासाठी म्हणून की, काय राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी याह्याच्या दुष्कर्मांचा केलेला अमर्याद पाठपुरावा; तीन, निक्सन-किसिंजर या दोघांनी वेगवेगळ्या कपटी डावपेचांकरवी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आणलेले दडपण आणि चार, त्याला भीक न घालता बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यात इंदिराजींनी दाखवलेली दुर्दम्य जिद्द आणि त्या दरम्यान प्रत्येक आणीबाणीच्या क्षणी सोव्हिएत रशियाने भारताला दिलेला खंबीर पाठिंबा. भारत पाकिस्तानातील युद्धाचा मात्र या पुस्तकात केवळ धावता आणि त्रोटक आढावा घेण्यात आला आहे.

२५ मार्च १९७१च्या रात्री आर्चर ब्लड यांच्या घरी एक मेजवानी होती. त्याच रात्री सैनिकांनी बंगला नागरिकांचे हत्याकांड चालू केले. हा वेचक वंशविच्छेद असल्याबद्दल प्रखर शब्दातील अहवाल ब्लड यांनी रवाना केला. दुर्दैवाने पाकिस्तानातील अमेरिकी राजदूत जोसेफ फोर्लंड हे कट्टर याह्या समर्थक होते, परंतु भारतातील राजदूत केनेथ कीटिंग यांनी ब्लड यांच्या अहवालाला दुजोरा दिला. किसिंजर यांनी निक्सनना सद्यस्थिती कधीच सांगितली नाही. ‘डाक्क्यातील तो कौन्सेलर मनाने कणखर नाही’ अशी किसिंजरनी मखलाशी केली. त्यानंतर याह्यांच्या दडपशाहीला कोणताच धरबंध उरला नाही. अमेरिकेने पुरवलेल्या सी १३० व  एफ ८६ विमानांचा आणि एम २४ रणगाड्यांचा निःशस्त्र बंगला जनतेवर हल्ले चढवण्यासाठी सर्रास उपयोग होत असल्याच्या ब्लड यांच्या अहवालाकडे आणि पाकिस्तानचा शस्त्रपुरवठा बंद  करण्यासाठी कीटिंग यांनी केलेल्या आर्जवांकडे किसिंजर यांनी पूर्ण दुर्लक्ष केले. पश्चिम पाकिस्तानी सैनिकांच्या पाशवी वर्तुणकीबद्दल आपली भूमिका काहीही असली तरी आपण त्याला पाठिंबा दिला नाही, तर भारताला फायदा होईल असे किसिंजर यांचे ठाम मत होते. ‘डाक्क्यातील हा माथेफिरू बंड करून उठला आहे’ असे किसिंजरनी निक्सनना पटवले. त्यांनी याह्यांवर दबाव न टाकण्याचा निर्णय एप्रिलअखेर घेतल्यानंतर ब्लड यांची महावाणीज्यपदावरून अपमानास्पदरीत्या हकालपट्टी झाली.

भारतात पळून आलेल्या आश्रितांच्या संख्येचे विविध अंदाज एक ते दोन कोटींच्या घरात होते. सरकारी सूत्रांनुसार सप्टेंबर अखेरीस सुमारे ऐंशी लाख विस्थापितांना भारताने आश्रय दिला होता आणि दररोज आणखीन पन्नास हजार येत होते. तो आकडा पूर्व पाकिस्तानच्या लोकसंख्येच्या दहा टक्के होता तर त्रिपुरात दहा लाख निर्वासित आले होते आणि तो आकडा त्रिपुराच्या लोकसंख्येच्या दोन तृतीयांश होता. त्यातील ९० टक्के निर्वासित हिंदू होते. हिंदूंना बाहेर काढण्याच्या या पाकिस्तानी कारस्थानाचे कटुसत्य भारत सरकारने स्वतःच्या लोकांपासून लपवले, परंतु सिडने शेलबर्ग आणि गालब्रेथ या वार्ताहरांनी ही वस्तुस्थिती ‘न्यू यॉर्क टाईम्स’मधून ठळक मथळ्यात छापली. याबद्दल सीआयएनेसुद्धा निर्वाळा दिला होता. भारताने घाईघाईने छावण्या उभारल्या होत्या, परंतु त्यांची अवस्था दयनीय होती. निक्सन-किसिंजर यांच्याकडून भारताच्या यातनांप्रती असा जाणूनबुजून कानाडोळा होत असताना अमेरिकेच्या विरोधी डेमोक्रटिक पक्षाचे नेते एडवर्ड केनेडी यांनी स्वतः जातीने भारतातील आश्रितांच्या छावण्यांना भेट दिली आणि तेथील परिस्थिती पाहून ते कमालीचे विव्हल झाले. एका ठिकाणी त्यांनी “तुम्हाला सर्वांत कशाची जरुरी आहे” असे विचारता त्यांना उत्तर मिळाले “स्मशान”. अमेरिकेत परतल्यावर त्यांनी निक्सन यांच्यावर विस्थापितांच्या बाजूने प्रखर टीकास्त्र सोडले. पाकिस्तानी लष्कराने त्यांच्या देशाच्या पूर्व भागात केलेल्या विशेषकरून हिंदूंच्या निर्घृण हत्याकांडाचे आणि भारतातील विश्रापितांच्या छावण्यांतील दैन्यावस्थेचे विश्वसनीय विदारक वर्णन बास यांनी आपल्या पुस्तकात केले आहे.

भारतात पळून आलेल्या आश्रितांच्या संख्येचे विविध अंदाज एक ते दोन कोटींच्या घरात होते.

व्हिएतनाम युद्धाची सांगता करण्यासाठी माओ त्से तुंग यांच्याशी निक्सन यांची भेट घडवून आणणे, हे अमेरिकेला अत्यंत आवश्यक होते. अमेरिका आणि चीनमध्ये दिलजमाई घडवून आणण्यासाठी किसिंजरनी याह्याखानांची मदत मागितली होती. याह्यांनी या संधीचे सोने केले. २१ एप्रिल १९७१ रोजी चाऊ एन लायनी याह्यामार्फत पाठवलेल्या संदेशाकरवी चीन आणि अमेरिकेमधील कित्येक वर्षाची कोंडी फुटली आणि किसिंजर यांना चीनला गुप्त भेट देण्याचे आमंत्रण मिळाले. किसिंजरनी ७ जुलैला इंदिरा गांधी आणि इतर विचारवंतांशी चर्चा करण्याच्या निमित्ताने भारताला भेट देण्याचा देखावा केला. परिस्थिती हाताबाहेर गेल्याबद्दल इंदिरा गांधींनी त्यांना सांगितले आणि पाकिस्तानची मदत ताबडतोब थांबवण्याची त्यांना विनंती केली. किसिंजरनी त्यांना हमी दिली की, कोणत्याही बाह्य शक्तीने भारतावर दबाव आणण्यासाठी अमेरिका कदापि अनुमती देणार नाही. “चीनने भारताविरुद्ध शस्त्रास्त्रांचा खणखणाट केला तर अमेरिका भारताच्या बाजूने उभी राहील” अशी किसिंजर यांनी गांधींना ग्वाही दिली. या संदर्भाने स्वाभाविकच भारतीय बाजू सुखावली, परंतु किसिंजर सरासर खोटे बोलत होते.

नंतर ते पाकिस्तानला गेले. तिथे पोचल्यावर आजारी पडल्याची त्यांनी बतावणी केली आणि याह्यांच्या नठीयागली येथील विश्रामस्थानात त्यांची रवानगी झाली. दुसऱ्या दिवशी पेकिंगला त्यांनी गुप्त प्रयाण केले आणि चाऊ यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्या दरम्यान भारताचा विषय निघाल्यावर चाऊ यांचा भारतद्वेष प्रकट झाला. उपखंडातील विद्यमान संकटाचे खापर चाऊनी भारताच्या माथ्यावर फोडताच किसिंजर खूष झाले आणि चीनने भारताविरुद्ध कारवाई करावी असे त्यांनी सुचवले. चाऊनी स्पष्ट केले की आम्ही भारताचा विरोध करू, परंतु लष्करी कारवाई करणार नाही. १५ जुलैला निक्सन यांच्या आगामी चीन भेटीबद्दल अमेरिकेच्या राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर घोषणा करण्यात आल्यावर सर्वच आश्चर्यचकित झाले. निक्सन यांनी स्वतः याह्यांना धन्यवाद दिले. किसिंजर यांची भारतभेट हे केवळ खोटे प्रदर्शन होते हे कळून चुकल्यावर भारताला आपल्या क्षुल्लक महत्त्वाची प्रचीती झाली आणि याह्यांच्या उपकाराचे ओझे अमेरिकेवर पडले असल्याने ती त्यांच्याविरुद्ध जाणार नाही याची कटू जाणीव झाली. किसिंजर यांच्या परमगुप्त चीन भेटीचा खडानखडा वृतान्त बास यांनी दिला आहे. निक्सन यांच्या चीन भेटीचे हे रहस्यनाटक याच दरम्यान घडल्यामुळे त्याचा या पुस्तकातील समावेश औचित्यपूर्ण आहे.                                                                     

२४ ऑक्टोबरला इंदिरा गांधी ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी वगैरे युरोपीय देशांच्या दौऱ्यावर गेल्या. त्यानंतर त्या निक्सन यांची भेट घेण्यासाठी अमेरिकेस पोचल्या. निक्सननी भेटीच्या नियोजित वेळी पोचल्यावर प्रथम  त्यांना चाळीस मिनिटे ताटकळत ठेवले.  इंदिरा गांधी आणि निक्सन यांच्यातील गुफ्तगूचे वर्णन ‘दोन बहिऱ्यांचे संभाषण’ अशा समर्पक शब्दांत बास यांनी केले आहे. “मानवतावादी भूमिकेतून अमेरिकन सरकार भारताची मदत चालू ठेवेल, याह्यांना संयम पाळण्याचा सल्ला देईल व राजकीय तोडगा शोधण्याचा प्रयत्न करेल, मात्र पाकिस्तानचे तुकडे होणं कुणाच्याही हिताचे नाही” असे निक्सननी भाष्य केलेच, पण त्याहीपुढे जाऊन “भारताने संघर्ष सुरू केला तर इतर महाशक्ती काय पावले उचलतील याचा नेमका अंदाज बांधता येणार नाही” अशी तंबीही भरली. या भेटीनंतर युद्धाला प्रतिबंध घालण्याचा शेवटचा पर्याय बंद झाला. नोव्हेंबरमध्ये परिस्थिती चिघळू लागली. २० नोव्हेंबरला भारतीय सेनेने पूर्व सीमेवर बायरा येथे प्राथमिक हल्ला चढवला. तीन सेबर जेट पाडली. पाकिस्तान्यांनी केलेल्या एम २४ शफी रणगाड्यांच्या हल्यात १३-१४ रणगाडे नष्ट झाले. ३ डिसेंबरला पाकिस्तानने भारताच्या पश्चिम सीमेवरील विमानतळावर तुफान हल्ला चढवला. इंदिरा गांधींनी ४ डिसेंबरला नभोवाणीवर युद्धाची घोषणा केली. निक्सन रागाने लालबुंद झाले. पूर्वेत भारतीय सैन्याची सरशी होणार हे स्पष्ट होते. अमेरिकेची चीनपुढे नाचक्की होईल ही भीती निक्सन-किसिंजर या दोघांना सतावत होती. ६ डिसेंबरला भारताने बांगलादेश या नवोदित राष्ट्राला मान्यता दिली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने पायबंद घालण्याआधी डाक्क्याला पोचणे आवश्यक होते. संयुक्त राष्ट्रसंघात ‘हे सरासर आक्रमण थांबवण्याचा’ प्रस्ताव अमेरिकेने मांडला, तो ११ विरुद्ध २ मतांनी मान्य झाला, परंतु रशियाने व्हेटोचा वापर केला. त्यानंतर अमेरिकेने तो आमसभेत मांडला. युद्धबंदीच्या बाजूने १०४ देशांनी मतदान केले. भारत एकाकी पडला, परंतु इंदिरा गांधींनी युद्ध थांबवले नाही.

निक्सन-किसिंजर आणि आर्चर ब्लड

पुस्तकाचे लेखक बास यांनी निक्सन-किसिंजरना पडलेल्या चिंतेच्या विषयाबाबतीत एक गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या माहितीनुसार गांधींच्या मंत्रिमंडळातील गुपिते फोडणाऱ्या सीआयएच्या पंचमस्तंभी हस्तकाने किसिंजरना सादर केलेल्या अहवालानुसार बांगलादेशची मुक्तता होईपर्यंत, काश्मीरचा पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भाग काबीज करेपर्यंत आणि पाकिस्तानचा शस्त्रसाठा व हवाईदल नष्ट होईपर्यंत लढत राहण्याचा इंदिरा गांधींचा निर्धार होता. वास्तविक या अहवालात कोणतेही तथ्य नसूनही निक्सननी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ते गडबडले. त्यापश्चात किसिंजर यांनी निक्सनसमोर तीन प्रस्ताव ठेवले : पहिला, अमेरिकेच्या सिनेटने पाकिस्तानला कोणतीही शस्त्रास्त्रे पाठवण्यावर बंधन घातले असल्याने इराण आणि जोर्डन या दोन देशांकडे असलेली विमाने पाकिस्तानकडे रवाना करण्याची त्या दोन देशांना गुप्तपणे सूचना द्यायची; दुसरा, चीनला भारताच्या पूर्व सीमेवर सैन्य तैनात करण्यास सांगून १९६२सम परिस्थिती निर्माण करायची आणि तिसरा, अमेरिकेचे सातवे आरमार बंगाल उपसागराच्या दिशेने हलवून भारताला धाक घालायचा. निक्सन यांनी सर्व पर्याय अमलात आणण्यास संमती दिली आणि त्यांची पूर्तताही झाली, परंतु इंदिरा गांधी डगमगल्या नाहीत. १२ डिसेंबरला किसिंजर यांनी सोव्हिएत संघाला निरोप पाठवला की “ आज मध्यान्हीपर्यंत भारताला वेसण घालावी”. त्यांच्याकडून ताबडतोब उत्तर आले की, पश्चिम पाकिस्तानविरुद्ध कोणतीही लष्करी कारवाई करण्याचा भारताचा इरादा नाही. निक्सन यांचा बार फारच फुसका निघाला होता. १२ डिसेंबरला अमेरिकेने पुन्हा सुरक्षा परिषदेत तातडीने युद्धबंदी करण्यासाठी आणि भारतीय सैन्याने बंगलादेशामधून आपले सैन्य माघारी घेण्यासाठी प्रस्ताव मांडला. सोव्हिएत संघाने तिसऱ्या आणि अखेरच्या वेळी व्हेटो वापरून भारताला पाठीशी घातले. ‘अमेरिकेच्या नागरिकांची सुटका करण्याच्या’ हास्यास्पद आणि दुबळ्या सबबीवर अमेरिकेच्या सातव्या आरमाराच्या ‘एन्टरप्राईज’ या अण्वस्त्रवाहू जहाजाने १५ डिसेंबरला बंगालच्या उपसागरात प्रवेश केला.

वास्तविक परिस्थिती अत्यंत गंभीर होती आणि त्या क्षेत्रात वावरणाऱ्या भारतीय नौसेनेच्या एकाद्या युद्धनौकेबरोबर जर अपघाती भेट घडली असती तर त्याचे परिणती  अण्वस्त्रसंघर्षाचा आरंभ होण्यात झाली असती. परंतु एकतर अमेरिकेची ही चाल केवळ धमकीवजा आहे, व्हिएतनामच्या दलदलीत फसलेली अमेरिका दुसरी आघाडी उघडण्यास धजावणार नाही आणि सोविएत संघाचे आरमारही हालचाल करू शकते, हे सर्व लक्षात घेऊन इंदिरा गांधी अविचल राहिल्या. दुसऱ्या दिवशीच म्हणजे १६ डिसेंबरला पाकिस्तानने शरणागती पत्करली आणि हे युद्ध संपुष्टात आले. त्यानंतर भारताने एकतर्फी युद्धबंदी जाहीर केल्यावर अमेरिकेला हायसे वाटले.

लेखकाने या सर्वच आंतरराष्ट्रीय घटनांचा समर्थपणे परामर्श घेतला आहे आणि हेच या पुस्तकाचे परमवैशिष्ट्य आहे. लेखकाच्या अभ्यासवृत्तीचे, विश्लेषणशक्तीचे आणि ओघवत्या लेखनशैलीचे कौतुक करावे तितके थोडेच होईल.

दिलीप चावरे हे सिद्धहस्त लेखक आणि भाषांतरकार आहेत. त्यांनी या अस्खलित इंग्रजीत लिहिलेल्या पुस्तकाचे किंचितही आशय न गमावता चित्तवेधक आणि रोमहर्षक भाषांतर केले आहे. उत्तम पुस्तकाचा एकमेव गुणांक म्हणजे एकदा वाचायला घेतल्यावर ते संपल्याशिवाय खाली न ठेवण्याची वाचकात निर्माण होणारी प्रेरणा आणि ऊर्जा. या पुस्तकाने ही गुणवत्ता संपादन केली आहे असे ठामपणे सांगता येईल आणि वाचकांना हा अनुभव हमखास येईल यात शंका नाही. एकाच गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. इंग्रजी पुस्तके मराठीत आणताना शब्दनशब्द भाषांतर करण्याचा मोह टाळणे आवश्यक आहे. थोडेसे स्वैर भाषांतर झाले तरी हरकत नसावी. नाहीतर काहीसा रसभंग होण्याची शक्यता निर्माण होते. ‘व्यवस्थित दाढी राखणारा शेन’, ‘पूर्वी सन्माननीय असणारे माझे सहकारी फारच बदलले आहेत’, ‘त्या जिन्याच्या तळाकडून मृतदेहांना येणारी गोडसर दुर्गंधी’ ही याची काही उदाहरणे.

द ब्लड टेलिग्राम – गॅरी बास, अनुवादक – दिलीप चावरे,

डायमंड पब्लिकेशन्स, पुणे,

पाने – ४८२, मूल्य – रुपये.

....................................................................................

ऑनलाईन खरेदीसाठी लिंक - http://www.booksnama.com/client/book_detailed_view/275

....................................................................................

shashipitre@gmail.com