वेदनेनं झपाटलेली माणसं आणि त्यांच्या बुलंद आशावादाची पुस्तकं!
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
नीतीन वैद्य
  • लेखात उल्लेख असलेली पुस्तकं आणि लेखक
  • Sun , 22 January 2017
  • ग्रंथनामा Granthnama वाचणारा लिहितो माधुरी शानभाग Madhuri Shanbhag वंदना अत्रे Vandana Atre विकास स्वरूप Vikas Swarup क्यू अॅण्ड ए Q & A सोनाली नवांगूळ Sonali Nawangul शिवानी गुप्ता Shivani Gupta नो लुकिंग बॅक No Looking Back मनोज भाटवडेकर Manoj Bhatawdekar वॉकिंग वुईथ ख्रिस Walking with Chris गायत्री पगडी Gayatri Pagdi

बॉब हौशी फोटोग्राफर. व्हिएतनाम युद्ध सुरू झाल्यावर बॉबची तिथं सरकारी फोटोग्राफर म्हणून नियुक्ती झाली. रोज युद्ध संपल्यावर झालेल्या विध्वंसाचे फोटो काढून सरकारला पाठवायचे. एक दिवस असाच काम संपवून परत येताना एका व्हिएतनामी सैनिकाची गाठ पडते. तयारीतला सैनिक बॉबला लगेच आडवा पाडून त्याच्या कपाळावर बंदूक टेकवून चाप ओढणार इतक्यात बॉबकडून प्रतिक्षिप्त क्रियेनं हातातल्या कॅमेऱ्याची कळ दाबली जाते. अनपेक्षित फ्लॅशनं गडबडलेल्या सैनिकाचा नेम चुकतो, गोळी थेट कपाळमोक्ष होण्याऐवजी कानाला चाटून जाते. तिथल्या जुजबी उपचारानंतर बॉबची अमेरिकेतल्या मोठ्या इस्पितळात रवानगी होते... जिवाचा धोका टळतो, पण जागेपणी डोकं सतत दुखतं... सततच्या यातनांसाठी मॉर्फिनसह वेदनाशामकांचा मारा... पुढे दीड वर्षांत सहा मोठ्या आणि दहा-बारा छोट्या ऑपरेशन्सनंतर डॉक्टर सांगतात- ‘गोळीनं नाक आणि कानादरम्यानची एक नस तुटल्यानं यातना होत आहेत. यावर आता उपाय नाही. या डोकेदुखीसह आता बॉबला जगावं लागेल...’ सततची वेदनाशामकं आणि चालू उपचारातली आशा यांनी जगवलेला त्याचा जीव आता मात्र कंठाशी येतो... सततच्या मरणान्त यातनांसह जगायचं कसं? त्यासाठी मानसोपचार घ्यावेत अशा सल्ल्यावर त्याची बोळवणी होते... पुढे मानसोपचार केंद्रातली भारतीय डॉक्टर त्याला योग आणि ध्यानधारणेचा सल्ला देते. त्यानंतरही त्याची सहा वर्षं कुठल्याही कामाशिवाय वेदनेचा सामना करण्यात जातात, पण नंतर ध्यान, प्राणायाम आणि विपश्यना यातून त्यासह जगण्याची वाट दिसते...

माधुरी शानभाग यांच्या ‘आयुष्याच्या लढाईवर बोलू काही’ या कथासंग्रहातली (नवचैतन्य प्रकाशन, फेब्रुवारी २०१६ ) त्याच नावाची ही कथा. बाईंनी तिला सत्यकथा म्हटलंय. या घटनाक्रमाच्या मागेपुढेही कथेत बरंच काही आहे. विशेषतः बॉबचं पुढचं आयुष्य कसं सुफळ संपूर्ण झालं वगैरे… पण डोकेदुखीच्या सततच्या असह्य यातनांतून - विशेषतः ती बरी होण्याची वैद्यकीय शक्यता नसताना त्याने कसा मार्ग काढला असेल, या कल्पनेशी मन अडखळत राहिलं. कारण याच्या आगेमागेही वेदनेनं झपाटलेली झाडं पाहत, वाचत होतो.

हिराचंद नेमचंद वाचनालयात ग्रंथदिनाच्या निमित्तानं बोलायचं होतं… दोन दिवसांपूर्वीच लोकसत्तेच्या पुरवणीतल्या वंदना अत्रेंच्या लेखानं लक्ष वेधलं होतं. बाई नाशिकच्या. मुक्त पत्रकार. चौथ्या पातळीचा कॅन्सर. केमोथेरपीच्या यातनेनं भरलेल्या सायकल्स सुरू. मरणकल्पनेच्या भयाचा अंधार साकळून आलेला. तशात मेहता प्रकाशनाचं पत्र येतं. ‘स्लमडॉग मिलीयोनेर’ हा तेव्हा गाजत असलेला सिनेमा ज्यावर आधारला त्या मूळ विकास स्वरूप यांच्या ‘क्यू अॅण्ड ए’ या कादंबरीचा मराठीत तातडीनं अनुवाद कराल का, अशी विचारणा त्यात केलेली असते. प्राप्त परिस्थितीत जगण्याची ऊर्जाच कुणी आपल्याला ऑफर केलीय असं बाईंना वाटतं. पण मुळात अनुवाद करेतो आयुष्य आहे की, नाही याचाही संभ्रम. पाय वेदनेनं बधिर झालेले. ते विसरण्यासाठी म्हणून रात्री केव्हातरी त्यांनी पुस्तक मधूनच चाळायला घेतलं. त्यातील कठीण प्रसंगी राम जवळचा लकी कॉईन उडवतो, कौल घेण्यासाठी. नकळत बाईही मनातल्या मनात कौल घेतात…छापा, जगेन...काटा... काही वेळानं त्यांच्या लक्षात येतं… इतका वेळ बधिर झालेल्या पायांवर आपण उभ्या आहोत, मनातल्या कॉईनचा छापा पडलाय… मराठी अनुवाद आणि केमोच्या उर्वरित सायकल बरोबरच पार पडल्या… राम महंमद थॉमसच्या झगड्यानं बाईंना जणू बळ दिलं... बाई कॅन्सरमधून बाहेर आल्या…

पुस्तकांच्या सहवासाबद्दल बोलताना मी हा किस्सा सांगितला. श्रोत्यांत कवयित्री स्नेहा शिनखेडे होत्या. अत्रेबाई त्यांच्या मैत्रीण. पुढे महिनाभरात त्या सोलापूरला नव्या पुस्तकाच्या कामानिमित्तानं आल्या, तेव्हा स्नेहाताईंनी मला बोलावलं. त्यांची ती प्रसन्न भेट अजून आठवते. नंतर तीन-चार महिन्यांनी ‘आशय’चा दिवाळी अंक त्यांना पाठवला, पण पोच, उत्तर आलं नाही. काही दिवसांनी स्नेहाताईंकडे चौकशी केली तर कळलं कॅन्सरबाबा उलटून पुन्हा शरीरात परतलेत...केमोची यातनामयी साखळी पुन्हा सुरू आहे. पुढे काही विचारायचा धीर झाला नाही. चार वर्षं उलटली न् अनुभव (२०१४) च्या दिवाळी अंकातून त्या पुन्हा भेटल्या. नंतरचा कॅन्सरबरोबरचा झगडा, आजार, त्यावरील उपचार, त्याचे संभाव्य परिणाम सगळं समजून घेत- मुख्य म्हणजे स्वीकार करत आयुष्यात पुन्हा परतणं. बाईंनी सगळा अनुभव शब्दांकित केला होता. मनातला लकी कॉईन केव्हातरी गोदावरीत फेकून दिला असावा. तिची आता गरज उरलेली नव्हती.

सोनालीनं (नवांगूळ) लिहिलेले दोन लेख यंदा दिवाळीत वाचनात आले. नवव्या वर्षी झालेल्या अपघातानंतर स्पायनल कॉर्ड इंज्युअरीमुळे तिचं आयुष्य व्हिलचेअरपुरतं मर्यादित झालं. अशांसाठीच असलेल्या नसीमा हुरजूक यांच्या संस्थेत (त्याही अशाच व्हिलचेअरवरून संस्थेचा संसार हाकतात. ‘चाकाची खुर्ची’मधून त्यांनी त्यांचा अनुभव मांडला आहे.) तिची बरीच वर्षं गेली. लिहिणं, अफाट वाचणं यातून अर्थपूर्ण आयुष्याची तहान लागलेली. संस्थेतलं पोटाची चिंता मिटवणारं तरी साचेबद्ध जगणं… तिनं स्वतंत्र व्हायचं ठरवलं. किती अफाट धाडस होतं हे! तिचे फ्रेंड फिलॉसॉफर गाईड उदय कुलकर्णी यांच्या बळावर तिनं हे धाडस केलं. त्यांच्यावर लिहिलेला  लेख (इत्यादि, दिवाळी २०१६) ‘शब्दात न मावणारं नातं’ म्हणजे मागे कृतज्ञतेनं वळून पाहणंच आहे. दुसरा लेख तिच्या वेदनादायी आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या तुकड्यावरचा आहे. कमरेखालच्या भागाची संवेदना हरवल्यानंतर देहधर्मावरचं नियंत्रण हातून निसटतं, हा यातला सर्वांत यातना देणारा भाग. स्वतंत्र राहणं आणि कार्यक्रमांसाठी सतत बाहेर जावं लागणं, यातून या महत्त्वाच्या गरजेचं काय होत असेल याची तुम्हीआम्ही कल्पनाही करू शकणार नाही. डॉक्टरांच्या अनेकवार सल्ल्यांनंतर सोनालीनं यातली अडचण काहीशी दूर करणारा फॉलिस कॅथेटर बसवायचा निर्णय केला. हा निर्णय घेतल्यापासून कॅथेटरला शरीरानं निमूट स्विकारेपर्यंतचा दोन वर्षांचा अडचणींचे असंख्य खाचखळगे आणि असीम वेदनांनी भरलेला प्रवास तिनं ‘अक्षर’ (दिवाळी २०१६)मध्ये लिहिलाय. तो सलग वाचणंही सोपं नाही!

शिवानी गुप्ता हॅपी गो लकी स्वभावाची. सामाजिक प्रतिष्ठेतलं सुस्थित फुलपाखरी तारुण्य. तेविसाव्या वर्षी जीवघेण्या अपघातात तिची स्पायनल कॉर्ड दुखावते. आपलं यापुढचं आयुष्य व्हिलचेअरवर जाणार आहे, हे तिनं स्विकारेपर्यंत वांझोट्या आशेत तिची दोन वर्षं गेलेली असतात. वडील आपल्यानंतर हिचं कसं होईल या चिंतेपोटी दिल्लीतल्या आर्मी हॉस्पिटलमधल्या पुनर्वसन केंद्रात नेतात. सुरुवातीला वस्तुस्थितीचा हा सामना तिला निराश करतो. पदोपदी वेदनेबरोबर स्वाभिमानाच्या चिंध्या, दया, कीव पाहून स्वतःला लोकांच्या नजरेपासून वाचवत राहण्याचा टप्पाही येऊन जातो. पण घरी सगळ्या धडधाकट ‘आपल्यां’बरोबर ‘वेगळं’ होऊन प्रेमाच्या कैदेत  राहण्यापेक्षा या बाहेरच्या पण आपल्यासारखाच देहधर्माचा प्रॉब्लेम असलेल्यांबरोबर राहिलो तर आयुष्याच्या कदाचित अधिक जवळ असू, अशा विचारानं ती पुनर्वसनात काम करायचं ठरवते. जुजबी प्रशिक्षणानंतर हॉस्पिटलच्या क्वार्टरमध्ये एकटीनं रहायचं. बरोबरचे सोबती हिंमतीवर जगभर हिंडत असताना आपण शरीरधर्माच्या मूलभूत प्रश्नात अडकून पडलो आहोत, याची वेदना घेऊन नवी धडपड. त्याकाळातला तिनं नोंदवलेला रात्रक्रम- जेवण ७ वाजता/ शेवटचा द्रवपदार्थ ७.३० वाजता/ शेवटची लघवी ८.३०/ बिछान्यावर आडवं होणं ९ वाजता /कुस बदलणं नाही.

पण पुढे पुनर्वसनाचं रितसर शिक्षण घेऊन शिवानीने अॅक्सेस अॅबिलीटी ही स्वतंत्र व्यावसायिक संस्था काढली (एनजीओ नव्हे. उपकार, कीव नको असेल तर देणग्या नकोत म्हणून) वेगवेगळ्या संस्थांसाठी बांधकामाच्या नियोजनात अपंगांसाठीच्या सोयींसाठी कन्सल्टन्सी करत पथदर्शक काम केलं. यासंबंधातले कायदे आणि अनुभवान्ती गरजेच्या न् शक्य असलेल्या सोईसुविधा याविषयी मार्गदर्शक पुस्तिका लिहिल्या. या काळात वाऱ्याची सुखद झुळूक यावी तसा विकास आयुष्यात आला. त्याच्या साथीनं व्हीलचेअरसह युरोप पाहिला. १० वर्षांच्या प्रेमानंतर विकासने हट्टानं रितसर विधीवत लग्न केलं. आयुष्यात काही स्थैर्य येतेय तोवर दोनच महिन्यांनी पुन्हा जीवघेणा अपघात. विकासचा मृत्यू आणि शिवानीचा पुन्हा आठ महिने मृत्यूशी झगडा.

नियंत्रण हा आपला आयुष्य स्थिर असतानाचा आभास असतो, या जाणिवेनं पुन्हा एकटेपणाच्या समेवर प्रेमाच्या आठवणींसह गेली दहा वर्षं शिवानी काम करते आहे. ‘नो लुकिंग बॅक’ हा तिचा जीवघेणा तरी प्रेरक अनुभव. (‘ना वळणे माघारी’, मराठी अनुवाद - मानसी दांडेकर, विश्वकर्मा पब्लिकेशन्स, द्वितीयावृत्ती ऑगस्ट २०१५)

‘पोखरलेले झाड’ हा उमेश शिंदेंचा (कोटी-बाबर पब्लिकेशन्स, सोलापूर,  सप्टेंबर २०१६) अवघ्या पंचविशीपर्यंतचा शब्दशः पोखरणारा प्रवास. विपरित परिस्थितीचं आव्हान शिक्षणाच्या बळावर पेलायचं ठरवून शहरात येईतो दुःसह व्याधीनं शरीरात ठाणं मांडल्याने एकेरी असलेला झगडा आतून आणि बाहेरून दुहेरी होतो. पिढ्यानपिढ्या वाटण्याच्या काचातून तुकडे होत अस्तित्वसंघर्ष करत राहावा इतपत राहिलेली शेती. जगण्यासाठी शेतीशिवाय काही करता येतं, हे गावीच नसलेले वडील त्यातल्या अपयशामुळे चिडखोर, व्यसनाधीन झाले. सतत शिवीगाळ करत आईला भांडू मारू लागले. बांधावरून, कॅनॉलच्या पाण्याच्या पाळीवरून, शेजारच्या शेतातून जाणाऱ्या वहिवाटीच्या रस्त्यावरून शेजाऱ्यांशी रोज नवी जीवघेणी भांडणं.

घरी खाणारी तोंडं कमी व्हावीत म्हणून दूर मोफत वसतिगृहात ठेवलेल्या बहिणी. लहानपणीच आई न् आजीनं लागोपाठ मारलं म्हणून डोक्यात राख घालून स्वतःला छताला टांगून संपवणारा मोठा भाऊ. या साऱ्यानं पिचलेली, सतत कष्टणारी याच्या भविष्याकडं आस लावून बसलेली आई...

या साऱ्याचं जबाबदारीचं दडपण आणणारं, काहीसा अपराधभाव जागवणारं भान त्याला येतं न् नेमक्या त्याचवेळी ‘अॅक्लोजिंग स्पॉन्डिलायटिस’चा शरीरात प्रवेश होतो. घरी काही मागावं तर शेजाऱ्यांच्या फोनवरच तिथला नवा बखेडा समोर येतो. त्यामुळे बाहेरगावी दुकाना-हॉटेलांतून मिळेल ती कामं करत शिक्षण सुरू ठेवलं जातं. तशात पाठीच्या मणक्यांवर थेट हल्ला न् मग आतली हाडं न् सांधे. हालचाल अत्यंत वेदनादायी, थोडं चाललं तरी पाय भरून येतात. हुडहुडी भरते, सतत मंद डोकेदुखी. पाठदुखीच्या सतत वेदनेला तर काळवेळ आणि अंत दोन्ही नाही. औषधांव्यतिरिक्त वेदनाशामकं अन्य परिणामांमुळे घेता येत नाहीत. अशाही परिस्थितीत पदव्युत्तर शिक्षणाची दुस्तर वाट चालून संपली. सेटचा गड चढून उमेश आता काहीसं शांत टेकता येईल, अशा स्थैर्याच्या पठाराच्या शोधात आहे. अर्थिक स्थैर्यासाठीची वणवण थांबली तर रोजच्या वेदनेचं मरणमुख पाहणं थोडं सुसह्य होईल कदाचित या आशेनं.

उमेशच्या व्याधीचा मोठा भाऊ शोभेल अशा ह्युमॅटीक अर्थ्रायटिसचा जीवघेणा तरी अनपेक्षित सुखान्त अनुभव डॉ. मनोज भाटवडेकर यांनी ‘एका पुनर्जन्माची कथा’ (राजेन्द्र प्रकाशन, तृतीयावृत्ती जून २०१५ )मधून मांडला आहे. भाटवडेकर दाम्पत्य उच्चविद्याविभूषित डॉक्टर. सर्वार्थीनं संपन्न आयुष्याच्या पस्तिशीच्या स्वप्नवत वळणावर मनोजना ह्युमॅटीक अर्थ्रायटिसची बाधा होते. सांध्यांच्या आजारांतला हा सर्वांत दुर्धर आजार. अभ्यासलेल्या वैद्यकीय पुस्तकातली भयकारी चित्रं डोळ्यांसमोर तरळली. भप्प सुजलेले गुडघे, हातापायांची वाकडी झालेली बोटं, खुरडत चालणारे असहाय्य रुग्ण… एकाच जागी खिळवून ठेवणारा हा आजार. हालचाल करावी तर मरणान्त यातना, न करावी तर हाडं जुळायला लागतात. पुढे हालचाल अशक्यच होत जाते. आठवडाभरातच डॉक्टरांचं आयुष्य होत्याचं नव्हतं झालं. दोन्ही गुडघे, दोन्ही हातांचे कोपरे, उजवं मनगट, दोन्ही खांदे आणि मान... स्नायू असणारा शरीराचा एकही भाग धड राहिला नाही. तज्ज्ञ डॉक्टरांनी आजार ‘नॉन क्युरेबल’ आहे असं सांगत नेहमीच्या गोळ्या दिल्या. या आजारात तुमची प्रतिकारशक्तीच विरोधात काम करते. त्यामुळे लढणं अधिक अवघड, सहनशक्तीचा कस पाहणारं. यशवंत देवांकडे मनोज गाणं शिकतात, ते ओशोंचे साधक शिष्य. त्यांच्यामुळे अशा बिकट अवस्थेत एका ध्यानधारणा शिबीराचा योग येतो न् आयुष्यात सकारात्मक बदलांना सुरुवात होते. पुढे सक्रीय ध्यानधारणा आणि नेहमीच्याच औषधात काही प्रयोगशील बदल यातून दोन वर्षांनी डॉ. भाटवडेकर ह्युमॅटीक अर्थ्रायटिस या दुर्धर व्याधीतून पुर्णतः बरे झाले. तदनंतर दहा वर्षांचा काळ व्याधीमुक्त गेल्यावर त्यांनी हा सारा अनुभव शब्दबद्ध केला. सक्रिय ध्यानधारणेचा अनुभव डॉक्टर सविस्तर तपशीलानं मांडतात. नंतर आजारातला सकारात्मक बदलही नोंदवतात, काय झालं असावं यावर अनाग्रही अनुमान मांडतात. आपल्या मर्यादेत काही प्रयोगही करतात, पण कुठेही कसलाही दावा करत नाहीत. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांनी हे पुस्तक पूर्वग्रहाविना वाचावं असं वाटतं.

‘दोला’मधला (वॉकिंग वुईथ ख्रिस, मराठी अनुवाद ऋचा कांबळे, साकेत प्रकाशन, २०१४ ) गायत्री पगडी यांचा संघर्ष वेगळ्या अर्थानं दुहेरी, सलग वाचणं अशक्य व्हावं इतका जीवघेणा. तेविसाव्या वर्षी पंचविशीतल्या प्रवीणशी लग्न. हसरे, नाचरे दिवस. मग एक गर्भपात, त्यात काही गुंतागुंत. यापुढे गर्भधारणा अवघड असं डॉक्टर सांगतात आणि सारं विस्कटतं. गायत्रीला ते पेलवत नाही. ती बायपोलार डिसऑर्डरची शिकार होते. अतीतीव्र नैराश्य. नजरेसमोर सतत हिरवट काळा अंधार. मधूनच तितकाच तीव्र आनंदही. एकूणच उन्मादावस्था, त्यात भ्रम आणि भास. आत्मघाताची तीव्र ओढ. अशी अवघड, कसोटीची पाच वर्षं गायत्रीसाठी, त्यापेक्षा प्रवीणसाठी. मग बत्तीसाव्या वाढदिवशीच त्याचा अपघात. मानेखालच्या शरीराची संवेदना नष्ट होते. स्वतःचे मानसोपचार आणि प्रवीणला त्याच्यातल्या बरा होण्याच्या आशेसह, देहधर्मासह सांभाळणं. दोघांच्या उपचारांसह घराची नव्यानं अर्थिक जबाबदारी. होरपळ. यावेळी किटकनाशकाचा ओव्हरडोस. पुन्हा डोळ्यासमोर काळ्या हिरवट अंधाराचा पडदा. आगतिकतेची हतबलतेची परिसीमा.

वेगवेगळ्या औषधोपचारांव्यतिरिक्त काय काय केलं या काळात? दैवाशी सौदा. शक्य तो सर्व त्याग करीन, शक्य त्या सर्व तीर्थयात्रा करीन. भविष्याच्या सर्व शास्त्रांचं जणू व्यसन. वास्तुशास्त्र /फेंगशूई /रेकी /ऑरा क्लिन्सिंग /वैदिक-चिनी ज्योतिष /टॅरो-फेस रिडींग /अंकशास्त्र /स्वप्नांचा अर्थ लावणं, ताईत, गंडेदोरे, प्लॅंचेट, अंतिन्द्रिय शक्ती, काळी जादू, तांत्रिक, मांत्रिक, धर्मगुरू, भुतं आणि सैतानही. पालीचं शेपूट, उंटाचे केस, कुत्र्याची हाडं, मांजरीची नाळ, मासिक पाळीतला स्त्राव इ. वापरून करायचे अघोरी उपाय. एकच प्रश्न, आयुष्य सामान्य कसं होईल?

हॉलिवूडमधला नट ख्रिस्तोफर रीव्ह. अपघाती स्पायनल कॉर्ड इंज्युअरी नंतर त्याने या आजारावरच्या संशोधनासाठी, रुग्णांसाठी मोठं काम केलं. त्याच्याशी सततचा काल्पनिक संवाद आणि याहू मेसेंजरची चॅट विंडो यातून गायत्री ‘या विश्वात आपण एकटे नाही’ या विश्वासाकडे परत आली. ध्यान आणि योगातून तिनं स्वतःवरचं नियंत्रण अफाट कष्टानं परत मिळवलं. स्टेमसेल थेरपीनं प्रवीणही अखेर पायावर उभा राहिला. १६ वर्षांचा प्रदीर्घ काळ चाललेलं दुःस्वप्न संपलं. हा पॉज का विराम? कारण प्रवीणच्या फुप्फुसात मागच्या पावलांनी पुन्हा अन्य दुर्धर आजारानं शिरकाव, पण गायत्रीने आता झोक्याचे दोर स्वतः घट्ट पकडलेले...

‘प्रकाशाच्या सावल्या’ हा दुसऱ्या गायत्रीचा (रामप्रसाद) अनुभव. (मराठी अनुवाद सुनेत्रा आगाशे, मनोविकास, डिसेंबर २०१४) तीच अनुवांशिकतेतून आलेली बायपोलार डिसऑर्डर.

पाश्चात्य जीवनशैलीचे आकर्षण असणारे वडील आणि काहीशी सनातनी आई यांच्याकडून असलेल्या परस्परविरोधी अपेक्षांचा काच. त्यातून कॉलेजच्या परीक्षेत प्रथमच अपयश. त्याचे असह्य दडपण हे निमित्त. हीच परिस्थिती दडवून पुढे लग्न झाल्यानं दडपणाचा काच कायम. पहिल्या अपत्यजन्मानंतर स्फोट. पुढेही बारा-पंधरा वर्षं वेदनेचा नरकवास.

‘भयगंड (anxiety disorder), आत्मघातकी खिन्नता (sucidal depression), अपत्यजन्मानंतर येणारी उदासी (postpartum depression), तीव्र भीतीचा झटका (panic disorder) आयुष्यातल्या त्या दहा वर्षांत ही सगळी दुखणी म्हणजे मीच होते. आई-वडील निष्काळजी नव्हते, पण अज्ञानी होते’, असं गायत्री नोंदवते. याआधी पहिल्यांदा त्रास झाल्यानंतर हे नैराश्य होतं, या निष्कर्षाला येऊन उपचार सुरू झाले, तेव्हा अनामिक दडपणातली सात वर्षं उलटली होती. ती जमेला धरली तर दुखण्यात उमेदीची सतरा वर्षं गेलेली. लोक काय म्हणतील या भीतीतच खूप भारतीय माणसं जगली आणि मेलीही. अशी माणसं पूर्वी एकतर मेंटल हॉस्पिटलमध्ये कैद्यांसारखी राहत किंवा रस्त्यावर बेवारशी हिंडत वा आगतिकतेनं घरोघरी अघोरी उपचार होत. मला लक्षात आलं आपल्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये कोंडलय. पोट गच्च धरून अंगाची जुडी करून अर्भकासारखी कोसळले. डोळ्यांतून लाज, दुःख, संताप आणि अपराधभावनेच्या धारा. भोवती आणि मनात काळाकुट्ट अंधार. हे प्रथम आणि पुढे काही वर्षं वारंवार झालं...होत राहिलं...

पुढे औषधोपचारांबरोबरच प्राणायाम, ध्यानधारणा, व्यायाम, रोजनिशी लिहिणं, कॉग्नेटीव्ह बिहेवियरल थेरपी, बागकाम न् लोकांत मिसळणं अशा अनेक पातळ्यांवर अथक प्रयत्नानं गायत्री यातून बाहेर आली. अर्थात बरं होणं म्हणजे मुक्कामाला पोचणं नव्हे तर प्रवासातला एक टप्पा गाठणं याचं भान आता आहे. औषधांचे साईड इफेक्टस आहेत, असणार आहेत. आजारही पुन्हा उद्भवू, बळावू शकतो, पण आता याचा समंजस स्विकार आहे. त्यानं पॅनिक होणं संपलं.

पुढे शिक्षण आणि मानसिक आजारांवर काम यात गायत्री पूर्ण गुंतली. जणू वाया गेलेला मधला काळ भरून काढायचा होता. मानसिक आजारांवरील जनजागृतीसाठी ‘माईंड ब्यूटीफूल’ हे सल्लागार केंद्र आणि ‘मायआशा’ (www.myaasha.org) या संस्थेतून डॉ. विली केस्लर यांच्याबरोबर तिनं केलेलं, करत असलेलं काम नावाजलं गेलंय. जगात ४५ कोटी लोक मनोविकारग्रस्त आहेत. जगात एकूण आत्महत्यांपैकी ९० टक्के मानसिक आजारांमधून होतात… नैराश्य (Depression) हा घाबरवणारा आजार नाही. त्याच्या काळ्याकुट्ट अंधारातच आपल्यातल्या अंतर्ज्योतीचा शोध लागतो, या समेवर अनुभवान्ती येऊन चित्र बदलावं यासाठी गायत्री काम करते आहे…

हे सारे अनुभव वाचताना असाध्य व्याधींशी झगडत, जीव नकोसा करणारी सततची वेदना असताना नुसतं शरीर जगवणं हेच जिथं आव्हानात्मक होतं, विपरीत परिस्थितीतही आयुष्य अर्थपूर्ण करू पाहणारी मानसिक ऊर्जा कुठून येत असेल याचं मला कुतूहल होतं, आहे. वेदनेचं सृजनाशी असलेलं नातं हा तसा कुतूहलाचा, तरी जुनाच विषय. अनेक जगप्रसिद्ध लेखक-कलावंत हे वैद्यकीय परिभाषेत मानसिक रुग्ण होते. काय होत असेल नेमकं? हे शोधायचा छोटासा प्रयत्न सुबोध जावडेकरांच्या अलीकडच्या कथेत आहे. (बहुदा ‘नियतीशी करार’, दीपावली २०१४) उत्तम कारागीर म्हणून नावाजल्या, हिणवल्या गेलेल्या एका चित्रकाराला ब्रेन ट्यूमरची बाधा होते. वेळी-अवेळी अतीतीव्र डोकेदुखीचे हल्ले. स्मरतेय ते इतकंच की, या काळात त्याच्या चित्रकलेला अभिजात बहर येतो, एरवी फारसं कुतूहल न दाखवणारे जाणकारही या बदलाने चकित होतात. दोन्हीचा परस्परसंबंध जाणवतो, तसं चित्रकाराला लक्षात येतं वैद्यकीय उपचार ट्युमरच्या वेदनेबरोबर हे नवे प्रातिभ देणंही घेऊन जाईल. तो मरणाचा धोका पत्करून ऑपरेशन नाकारतो. हे सारं इतकं थेट, ढोबळ असणार नाही, कदाचित पण निदान काही नातं असेल का?

या सगळ्या अनुभवांकडे पाहताना एक छोटा व्यक्तिगत संदर्भही होता. ९९ च्या सप्टेंबरात (लग्न होऊन फक्त दोन महिने झाले होते. त्यामुळे याचा माझ्यापेक्षा जास्त त्रास नेत्राला झाला.) अचानक कानातून शिट्टीसारखा आवाज येऊ लागला. ऐकूही कमी येऊ लागलं. अस्वस्थ, बेचैन झालो. कानात दडे बसलेत, होईल कमी अशी मनाची समजूत घालत घरी आलो. वामकुक्षीनंतर जागा झालो न् पहिली जाणीव झाली आवाज अजून आहे. त्यानंतर चार-पाच वर्षं वेगवेगळ्या पॅथींचे वेगवेगळे डॉक्टर. सोलापूर आणि पुणे सततचे हेलपाटे. दरम्यान आवाज तर होताच आपल्या ठिकाणी सतत, कधी शिट्टी तर कधी वादळी वारं, कधी समुद्राची मोठी गाज तर कधी हजारो रातकिड्यांची किरकिर. ऐकू येण्याची क्षमता ७० टक्के कमी झालेली.

हे आता बरं होणार नाही हे एव्हाना अनुभवातून, वाचण्यातून कळलं होतं. त्यामुळे फार धक्का नव्हता तरी आवाजाचं काय करायचं याचा ताण होता, आजही आहेच. यालाही आता तेरा वर्षं झाली. दरम्यान यावरचे काही लेख वाचले होते. ह. वि. सरदेसाईंच्या एका लेखात अशा आवाजामुळे वेड लागू शकतं, काहींनी आत्महत्याही केल्या असं वाचलं होतं, पण मी आणि माझा आवाज ‘आहोत’. ऐकू येणं आणखी उणावलं तरी अजून (दरम्यान मशिन वापरण्याची अयशस्वी फेजही येऊन गेली), प्रयत्नाने संवाद होऊ शकतोय (ऎकण्यातला आनंद संपल्याने गाणं, सिनेमा, नाटक आयुष्यातून वजा झालं, रोजच्या व्यवहारातही काहीसं परावलंबित्व आलं.) हेही ठीकच. जगण्याची ऊर्जा कशाचीही सवय करून घेते. पण पुस्तकं भेटली अगदी कडकडून. त्यांच्या सहवासात याही परिस्थितीत सुरुवातीची बेचैनी असह्य होती, जगण्याची असोशी कायम राहिली. आता वाटतं त्या, तीही आता सखीच, शिट्टीचं व्हावं पार्श्वसंगीत आणि तीसह जगण्याचं न ऐकता येणारं तरी सुरेल गाणं!

लेखक पुस्तकप्रेमी आहेत.

vaidyaneeteen@gmail.com

Post Comment

Bhagyashree Bhagwat

Fri , 10 February 2017

नितीन वैद्य यांचं लेखन कायमच ओघवतं आणि विषयाचा जिवंत प्रत्यय देणारं असतं. विशेष म्हणजे, ते पुस्तकांसंदर्भात असूनही कधीही 'पुस्तकी' नसतं. अतिशय साधं, मुद्द्यावर नेमकं बोट ठेवणारं आणि साद घालणारं लेखन. 'अक्षरनामा'वर त्यांचं अधिकाधिक लेखन सातत्याने वाचायला आवडेल.