२०१९मध्ये वाचलीच पाहिजेत अशी काही महत्त्वाची पुस्तकं!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
टीम अक्षरनामा
  • २०१९मध्ये वाचलीच पाहिजेत अशा काही महत्त्वाच्या पुस्तकांची मुखपृष्ठ
  • Fri , 15 March 2019
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस Shifaras

२०१९मध्येही वाचायलाच हवीत अशा काही निवडक पुस्तकांची ही ओळख. अमूक पुस्तक या यादीत का नाही, यांसारखे प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. त्यावर एवढंच म्हणता येईल की, अर्थात ही यादी अपुरी आहे...

.............................................................................................................................................

१) निरीश्वरवादी असणे ही एक वास्तववादी आकांक्षा आहे. आणि त्यात धैर्य आहे; संतुलित, नैतिक असे बौद्धिक समाधान आहे. - रिचर्ड डॉकिन्स

इंग्रजीतील प्रसिद्ध आणि बेस्टसेलर लेखक रिचर्ड डॉकिन्स यांचं ‘द गॉड डिल्यूजन’ हे प्रचंड लोकप्रिय झालेलं आणि जगभरातल्या अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेलं पुस्तक. या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रा. मुग्धा कर्णिक यांनी केला असून मधुश्री पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाला रिचर्ड डॉकिन्स यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/2999

मला खात्रीच आहे की असे अनेक लोक असतील की, जे ज्या कोणत्या धर्मात वाढवले गेले ते त्या धर्माबाबत अगदीच वैतागलेले असतात, त्यांचा त्या धर्मावर विश्वास नसतो  किंवा निदान त्या धर्मात धर्माच्या नावाखाली चाललेल्या अनाचाराबद्दल त्यांना चिंता वाटत असते. किंवा आपल्या पालकांचा धर्म सोडता आला असता तर किती बरं झालं असतं असं वाटणारेही अनेक लोक असतील- पण त्यांना धर्मत्याग अस काही पर्याय असतो याचीच जाण नसते. तुम्ही अशा लोकांपैकी असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. याची जाणीवजागृती होण्यासाठीच हे मी लिहिले आहे. निरीश्वरवादी असणे ही एक वास्तववादी आकांक्षा आहे- आणि त्यात धैर्य आहे, संतुलित, नैतिक असे बौद्धिक समाधान आहे. 

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

https://www.booksnama.com/book/4769/The-God-Delusion

.............................................................................................................................................

२) म. गांधींनी ज्या जगाचं स्वप्न बघितलं; त्या दिशेनं समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करणं एवढंच आपल्या हातात असतं! - दिलीप कुलकर्णी

मोहनदास करमचंद गांधी. दीडशे वर्षांपूर्वी जन्मलेला एक सामान्य माणूस आपल्या अफाट कर्तृत्वाने महात्मा बनला. आश्चर्य असे की, जाऊन सात दशके लोटली, तरी गांधी संपलेले नाहीत! त्यांचे विचार अद्यापि जिवंत आहेत. नुसतेच ‘जिवंत आहेत’ असे नाही; तर जगभर प्रसार पावताहेत. त्यांचा सर्वत्र अभ्यास होत आहे, अनेकांना ते अद्यापि प्रेरणा देत आहेत. ह्याचे कारण एकच : त्या विचारांचा मूलगामीपणा आणि व्यापकता. ह्यातूनच ते बनलेत वैश्विक आणि सार्वकालिक. मग आज ज्या समस्या भारताला, जगाला भेडसावत आहेत; त्यांवर ह्या विचारांतून कोणता आणि कसा मार्ग दिसतो? ह्या दृष्टीने गांधी-विचारांकडे पाहण्याचा, त्यांच्या भविष्यकालीन उपयोगितेवर सारे लक्ष केंद्रित करून ‘गांधी उद्यासाठी’ हे पुस्तक पर्यावरणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णी यांनी गांधींच्या १५०व्या जयंतीवर्षानिमित्त संपादित केलं आहे. राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला कुलकर्णी यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3004

ब्रिटनापासूनचं राजकीय स्वातंत्र्य; किंवा, सांसदीय स्वराज्य ह्यांच्या पलीकडे जाऊन गांधींना असा मानवसमाज हवा होता-घडवायचा होता : अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंठाह ह्यांचं पालन करणारा. आंतरिक विकासावर भर देणारा. नीतीनं वागणारा. पर्यावरणाची जपणूक करणारा. श्रमाधारित जीवन जगणारा. स्त्रियांना आणि सर्व समाजघटकांना विकासाची समान संधी असणारा. भयमुक्त. ‘सांसदीय स्वराज्य’ ह्या तात्कालिक ध्येयासाठी तर त्यांनी कार्य केलंच; पण, आपल्या कल्पनेतल्या ‘खऱ्याखुऱ्या स्वराज्या’-साठीही खूप काही केलं. स्वत:ही केलं, नि अनेकांना ते करण्याची दृष्टी, प्रेरणा दिली.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

https://www.booksnama.com/book/4773/Gandhi-Udyasathi

.............................................................................................................................................

३) भारत-पाक फाळणीचा कथात्म एक्सरे-रिपोर्ट! - नरेंद्र मोहन

भारत-पाक फाळणीच्या शोकांतिकेची वेदना अनेक पिढ्यांच्या हृदयामध्ये सलत राहिली. लेखकांच्या पिढ्या त्यावर लिहित्या झाल्या. अनुभवलेली दु:खे, पाहिलेल्या वेदना, करुण कहाण्या शब्दांमधून व्यक्त होत राहिल्या. हिंदू, उर्दू, पंजाबी, सिंधी, बंगाली, डोगरी अशा विविध भाषांमधल्या कथा ‘फाळणी’ या नावाने नरेंद्र मोहन यांनी हिंदीमध्ये काही वर्षांपूर्वी संपादित केल्या होत्या. त्या दोन्ही खंडांचा मराठी अनुवाद वसंत केशव पाटील यांनी केला आहे. पुण्याच्या सायन पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या या द्विखंडी पुस्तकाला नरेंद्र मोहन यांनी सविस्तर प्रस्तावना लिहून आपली संपादनामागची भूमिका सविस्तर विशद केली आहे. तिचा हा संपादित अंश...

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3021

१९४७ मध्ये जी फाळणी झाली, त्याची अनेक कारणे असू शकतात आणि आहेतही. परंतु फाळणीच्या वेळी व त्यानंतरही, आजवर जे म्हणून आपले परंपरागत संलग्न व सामायिक संस्कार होते, पारस्परिक आस्था, आपुलकी होती; त्याला उतरती कळा लागली आणि त्यातून जे भयंकर चित्र समोर आले, ते कोण नाकारू शकेल? वस्तुत: फाळणी हा वरकरणी नि भौतिकदृष्ट्या एक अपघात नव्हता. ही एक मानवी शोकांतिका होती. ज्यामुळे लाखो लोकांवर भावनिक, मानसिक, वैचारिक व आत्मिक स्तरांवर आघात झाले होते. हा धक्का फक्त राजकारण किंवा एखाद्या विशिष्ट वर्गापुरता मर्यादित नव्हता, तर तो कोट्यवधी लोकांची संस्कृती आणि त्यांच्या वर्तन-व्यवहारांदीशीही संलग्न होता. हिंदुस्थानच्या राष्ट्रीय मन:पटलावर फाळणी आजदेखील एक ठसठसणारा संदर्भ म्हणून ताजी आहे. 

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

https://www.booksnama.com/book/4788/Falani-Khand-1-Va-2

.............................................................................................................................................

४) काव प्लॅन - कुरुक्षेत्र कराची - रवि आमले

दै. सकाळच्या मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक रवि आमले यांचं ‘रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा’ हे पुस्तक नुकतंच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. भारतीय गुप्तचर संस्था- RAWचा संक्षिप्त इतिहास या पुस्तकात मांडला आहे. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित भाग.

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/2921

मीर यांच्या म्हणण्यानुसार, रॉने १९९४ साली लंडनमध्ये एमक्यूएमशी संपर्क साधला. त्यानंतर मग एमक्यूएमचे प्रतिनिधी आणि रॉचे गुप्तचर यांच्या युरोपातील विविध शहरांत बैठका होऊ लागल्या. त्याची खबर कोणाला लागू नये यासाठी खास काळजी घेण्यात येत असे. मीर सांगतात –

‘‘ज्या ठिकाणी भेटायचे ठरले असेल, तेथे आम्ही कधीही थेट जात नसू. उदाहरणार्थ आम्ही रोमला जायचो, ते फ्रँकफर्टमार्गे. त्या बैठकीची तारीख आणि स्थळ नेहमीच भारतीय व्यक्ती ठरवीत असे. फक्त दोन दिवस आधी आम्हांला ती कळविण्यात यायची. मग त्यांनी व्यवस्था केल्यानुसार आम्ही एखाद्या पंचतारांकित हॉटेलात भेटायचो.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

https://www.booksnama.com/book/4716/RAW---Bharatiya-Guptcharsansthechi-Gudhgatha

.............................................................................................................................................

५) आजोबांना (म. गांधींना) न्याय मिळवण्यासाठी शांतीपूर्ण मार्ग शोधावे लागले! - अरुण गांधी

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/2957

महात्मा गांधी यांचे नातू (मणिलाल यांचे चिरंजीव) अरुण गांधी यांना वयाच्या सहाव्या वर्षी काही दिवस आणि वयाच्या बारा-तेराव्या वर्षी अठरा महिने आजोबांचा सहवास मिळाला. त्या काळात त्यांच्यावर आजोबांचा जो प्रभाव पडला, त्यावर आधारित त्यांनी २००३मध्ये ‘लिगसी ऑफ लव्ह’ हे इंग्रजी पुस्तक लिहिले. त्याचा मराठी अनुवाद ‘वारसा प्रेमाचा’ या नावाने सोनाली नवांगुळ यांनी केला आहे. हा अनुवाद साधना प्रकाशनातर्फे नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

कोणताही दोष नाही, सफाईदार व ब्रिटिश धाटणीच्या इंग्रजी भाषेत संवाद साधता येतोय, शिवाय वर्तनही सौजन्याचं आहे, असं असताना तो गव्हाळ वर्णाचा माणूस वर्णद्वेषाची शिकार ठरला. परिस्थिती माणसाला घडवते असं म्हणतात! १८९० मधील दक्षिण आफ्रिकेतील या परिस्थितीनं, तिथल्या वातावरणानं मोहनदास करमचंद गांधी या माणसाला ऐतिहासिक परिणामांसह राजकीय व आत्मिक-आध्यात्मिक नेता म्हणून आकार दिला. घडवलं.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

 

.............................................................................................................................................

६) गुलामी त्रासदायक होती, तशीच ती न्यूनत्वाची व कमीपणाचीही खूण होती! - बुकर टी. वॉशिंग्टन

बुकर टी. वॉशिंग्टन ‘Up From Slavery’ या इंग्रजीमध्ये गाजलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद शरद प्रभूदेसाई यांनी केला असून नुकताच तो डायमंड पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित झालाय. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/2956

सकाळची वेळ होती आणि आई गुडघे टेकून प्रार्थना करीत होती की, ‘लिंकन व त्याचे सैन्य यशस्वी होऊ दे. मला आणि माझ्या मुलांना स्वातंत्र्य मिळू दे.’ तिची प्रार्थना ऐकून मी जागा झालो आणि त्याचवेळी आपण ‘गुलाम’ आहोत याची जाणीव मला झाली, हे मला स्पष्टपणे आठवतंय. पुस्तके व वर्तमानपत्रे वाचता न येणाऱ्या निरक्षर, अडाणी अशा गुलामांना देशात चाललेल्या चळवळीविषयी, महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रश्नांविषयी कशी माहिती मिळत होती, हे मला कधीच कळले नाही. गॅरिसन व लव्हजॉय यांनी मुक्तिसंग्रामाची चळवळ सुरू केल्यापासून दक्षिणेतील गुलाम त्याविषयी माहिती करून घेत. यादवी युद्धाच्या तयारीच्या वेळी व युद्ध सुरू असताना मी लहान होतो; पण रात्री उशिरापर्यंत आई व वाडीतील इतर गुलामांच्यात याविषयी चालू असलेली कुजबुज मला चांगलीच आठवतेय. त्यांना या परिस्थितीची जाण होती आणि ते वाइन पिता पिता, गप्पा मारताना एकमेकांना त्या चळवळीविषयी सांगत असत.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

https://www.booksnama.com/book/4714/Dasyatun-Mukti

.............................................................................................................................................

७) चित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी - रणधीर शिंदे

दि. पु. चित्रे यांच्या समग्र कविता ‘एकूण कविता’ या नावाने पॉप्युलर प्रकाशनातर्फे एकत्रित स्वरूपात प्रकाशित केली आहे. या पुस्तकाला समीक्षक प्रा. रणधीर शिंदे यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/2935

चित्रे यांची कविता भारतीय कवितेचा मानबिंदू आहे. काव्यसंकल्पनेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडवून आणण्यात चित्रे यांच्या कवितेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अस्तित्वानुभवाची नवी नीती भारतीय कवितेला प्राप्त करून दिली. काव्यरूपात संवेदना आविष्काराला सर्वश्रेष्ठ व प्राणभूत असे स्थान दिले. इंद्रियनिष्ठ जाणिवांचा अधिक खुला व मोकळा आविष्कार केला. एकाच वेळी परंपरा आणि आधुनिकतेचे नवे भान दिले.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

 

.............................................................................................................................................

८) ‘नवा भारतीय’ अधिक मुक्त असावा; त्याची बौद्धिक, सांस्कृतिक आणि भौतिक उंचीही थोडी अधिक असावी! - बॅ. नाथ पै

बॅ. नाथ पै यांच्या निवडक भाषणांच्या संग्रहाची म्हणजे ‘लोकशाहीची आराधना’ या पुस्तकाची नवी आवृत्ती नुकतीच साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आहे. या पुस्तकातील हे एक भाषण…

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/2988

आजच्या हिंदुस्थानात वाङ्मयाला आवाहन करणारं, आव्हान देणारं काही नाही आणि कार्ल्याला, अजिंठ्याच्या, वेरूळच्या लेण्याला शोभणारी वाङ्मयीन लेणी निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत; पण त्यांचे पडसाद मराठी वाङ्मयात निघाले नाहीत, उठले नाहीत ही माझी वेदना आहे. हे माझं दुःख आहे. ही माझी व्यथा आपल्याला मी सांगू इच्छितो. बारा लक्ष भारतीय फाळणीच्या वेळी मारले गेले आणि त्याहून जास्त भारतीयांच्या जीवनाचा सर्वनाश झाला. विटंबना झाली. याचं दुःख असलेली कविता मी वाचलेली नाही. याची वेदना असलेली, याची चीड असलेली कविता, याचा त्वेष असलेला ग्रंथ, लघुकथा, कादंबरी पाहायला मिळाली नाही.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

https://www.booksnama.com/book/4719/Lokshahichi-Aradhana

.............................................................................................................................................

९) मोदी, भाजप आणि संघाने स्वातंत्र्योत्तर भारताच्या प्रवासाला कसे धोकादायक वळण दिले, हेच या पुस्तकाचे प्रयोजन आहे! - भालचंद्र मुणगेकर

अर्थतज्ज्ञ, नियोजन आयोगाचे माजी सदस्य, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे ‘वेध वर्तमानाचा’ हे पुस्तक नुकतेच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित झाले आहे. साधारणपणे गेल्या पाच वर्षांत वेळोवेळी लिहिलेल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक प्रश्नांवरील हे लेख विद्यमान मोदी सरकारची ध्येयधोरणे समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे. या पुस्तकाला डॉ. मुणगेकर यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3064

मंत्रीमंडळ म्हणजे संसदीय लोकशाहीतील ‘कार्यकारी’ मंडळ. मोदींच्या कारकिर्दीत सर्व सत्ता पंतप्रधान या नात्याने त्यांच्याच हातात केंद्रित झाल्यामुळे मंत्रिमंडळाला फारसा अर्थ नाही.

न्यायसंस्थेत तर अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. गेल्या काही वर्षांमध्ये न्यायसंस्था विधिमंडळाच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करते, असा वाद होता. त्याला ‘न्यायालयीन हस्तक्षेप’ (Judicial Activism) असे म्हटले गेले. परंतु मोदी राजवटीत उलटे झाले. न्यायालयीन क्षेत्रात सरकार (म्हणजे मंत्रिमंडळ) हस्तक्षेप करते, असा जाहीर आरोप करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वांत चार जेष्ठ न्यायमूर्तीनी स्वातंत्र्यानंतर प्रथमच पत्रकार परिषद घेतली. ही गोष्ट धक्कादायक होती.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

https://www.booksnama.com/book/4790/Vedh-Vartamanacha

.............................................................................................................................................

१०) गरीब लोक काय खातात? -  हेरंब कुलकर्णी

शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी महाराष्ट्रातल्या २४ जिल्ह्यांतल्या १२५ गरीब, दुर्गम गावांना भेट देऊन सर्वसामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनाविषयी जाणून घेतले. त्या अनुभव\निरीक्षणांच्या आधारे त्यांनी ‘दारिद्रयाची शोधयात्रा’ हा पुस्तकरूपी अहवाल तयार केला आहे. नुकत्याच पुण्याच्या समकालीन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील हे एक प्रकरण.

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/2990

बहुतेक गावांत रेशन मिळते; परंतु नियमानुसार माणशी नेमके किती धान्य मिळायला हवे व प्रत्यक्षात किती मिळते याबाबत लोकांना माहिती नसल्याचे आढळले. वास्तविक एका व्यक्तीमागे पाच किलो धान्य मिळायला हवे; पण नंदुरबार जिल्ह्यातील चिंनिपाणी येथे लोकांची रेशनकार्डे बघितली, तेव्हा आठ युनिट असलेल्या कुटुंबाला केवळ पाच किलो गहू आणि १० किलो तांदूळ मिळालेले होते. परभणी जिल्ह्यात जिंतुर तालुक्यातील एका गावातही असे व्यस्त प्रमाण दिसले. याचा अर्थ सर्वदूर मंजूर धान्याचा पूर्ण कोटा मिळत नाही.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

https://www.booksnama.com/book/4720/Daridryachi-Shodhyatra

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................