प्रत्येक हिंदूने गांभीर्याने हे पुस्तक वाचले तर मुसलमानांबद्दलचे त्याचे पूर्वग्रह संपून जातील!
ग्रंथनामा - झलक
डॉ. सूर्यनारायण रणसुभे
  • ‘दखलपात्र शब्दांचा उरूस’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 01 February 2019
  • ग्रंथनामा झलक दखलपात्र शब्दांचा उरूस Dakhalpatra Shabdancha Urus फ. म. शहाजिंदे F. M. Shahajinde

प्रा. फ. म. शहाजिंदे यांचे ‘दखलपात्र शब्दांचा उरूस’ हे पुस्तक नुकतेच भूमी प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला समीक्षक डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

प्रा. फ. म. शहाजिंदे यांच्या या ग्रंथात एकूण १७ लेख आहेत. मुस्लिम मराठी साहित्य व नवोदितांच्या काव्यसंग्रहांची त्यांनी केलेली समीक्षा हे दोन विषय या ग्रंथाच्या केंद्रस्थानी आहेत. मुस्लिम मराठी साहित्यावर एकूण तीन लेख आहेत. एक परीक्षण जावेद पाशा कुरेशी यांच्या एका काव्यसंग्रहावर आहे. त्यातही मुस्लिम मनाचा शोध घेण्याचाच प्रयत्न आहे. म्हणजे मुसलमानांच्या जीवन व साहित्यावर एकूण आठ लेख आहेत. २०० पृष्ठांच्या या ग्रंथातील ८५ पृष्ठे उपरोक्त विषयाशी संबंधित आहेत. या लेखनाच्या निमित्ताने शहाजिंदे यांनी महाराष्ट्रातील व पर्यायाने देशातील मुसलमानांच्या मनाचा, त्यांच्यातील जातिव्यवस्थेचा,  वर्णभेदाचा,  श्रद्धा-अंधश्रद्धांचा शोध घेतला आहे.

प्रत्येक हिंदूने गांभीर्याने हे लेख वाचले तर मुसलमानांबद्दलचे त्याचे पूर्वग्रह संपून जातील, एवढी ताकद या लेखात आहे. मुसलमान व इस्लाम यात असलेला सूक्ष्म फरक त्यांनी उलगडून दाखवलेला आहे. आपण मुस्लिम प्रश्नाचे अभ्यासक आहोत, आपल्याला या देशातील मुस्लिम प्रश्न पूर्णपणे समजलेला आहे, या तोऱ्यात वावरणाऱ्या शेषेराव मोरे यांचे लेखन किती एकांगी व वास्तवतेपासून किती दूर आहे, हे शहाजिंदे त्यांच्याच पुस्तकातील उतारे देऊन त्यातील विसंगती स्पष्ट करून दाखवतात. दुर्दैवाने शेषेराव मोरेंच्या मुस्लिमाविषयीच्या लेखनास वास्तववादी समजणारा एक मोठा वर्ग हिंदू मध्यमवर्गात आहे. त्यांनी शहाजिंदेचे हे लेख अवश्य वाचावेत. 

सर्व मुसलमान संघटित असतात, हा देखील मोठा गैरसमज आहे. ‘कुरआन’मध्ये समतेचा आग्रह जरी असला तरी प्रत्यक्षात भारतीय मुसलमानात हिंदूंच्यासारखी कट्टर जातीयता आहे, वर्णव्यवस्था आहे. वर्णव्यवस्था तर सर्व धर्मांत आहे. केवळ मुसलमान आहे म्हणून कोणत्याही मुसलमान मुलीशी लग्न करता येत नाही, जात पाहिली जाते. तेथेही श्रेणीबद्धता आहे. त्याशिवाय हुंडापद्धती आहे. अनेक कर्मकांडे आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की, हिंदू व मुसलमान यांची श्रद्धास्थाने वेगळी आहेत, पण जीवनपद्धती मात्र एकच आहे.

हिंदूंच्या पैकी अनेक जणांना याची कल्पना नाही की, मुसलमानांत सुफी पंथाचा प्रचार व प्रसार फार वेगाने झालेला आहे. सुफी पंथाबद्दलही अनेक गैरसमजुती हिंदुत्ववाद्यांनी पसरवलेल्या आहेत. सुफीपंथाचा जन्मच मुळी कट्टर मुल्ला-मौलवींच्या शिकवणीविरुद्ध झालेला आहे. उदारमतदवादी दृष्टी व सर्व धर्मांच्याकडे आदराने पाहण्याची वृत्ती हे सुफीपंथाचे वैशिष्टय आहे. तत्त्वज्ञानाच्या पातळीवर ते भारताच्या खूप जवळचे आहेत. आणि या देशातील ९० टक्के मुसलमान सुफीपंथीय आहेत. बाबरी मस्जिद विध्वंस प्रकरण व २००२च्या गुजरात दंगलीनंतर मुस्लिम मनावर जो खोलवर आघात झाला, त्याची कल्पना हिंदुत्ववाद्यांना नाही. या दोन घटनांमुळे मुल्ला-मौलवींचे फावले. या दोन घटना घडवून हिंदुत्ववाद्यांनी भारतातील प्रबोधनास व सहिष्णू वृत्तीलाच संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या दोन घटनानंतरच हिंदुत्ववादी व मुस्लिम सनातनी वृत्तींना डोके वर काढण्याची संधी मिळालेली आहे.

मुस्लिम मराठी साहित्यातदेखील ही सनातनी वृत्ती कशी डोके वर काढत आहे याचा संकेत शहाजिंदे यांनी एका लेखातून दिलेला आहे. मुस्लिम मराठी साहित्याच्या परीक्षणाच्या निमित्ताने शहाजिंदे मराठी साहित्यातील मुस्लिम मनाचे जे वास्तव पटवून देतात, ते खूपच महत्त्वाचे आहे. या लेखामागे एका संवेदनशील भारतीय मनाची तळमळ दिसून येते. या देशातील नागरिक इतरांकडे धर्म, जात व सांपत्तिक स्थितीच्या पलीकडे जाऊन केवळ माणूस म्हणून पाहावे एवढीच त्यांची तळमळ आहे.

उपरोक्त विषयावरील विवेचनाशिवाय या ग्रंथात शहाजिंदे यांनी लिहिलेल्या एकूण १२ पुस्तकांची परीक्षणेही आहेत. त्यापैकी एक कादंबरी (भारत सासणे-दोन मित्र), एक आत्मचरित्र (मोडेन पण वाकणार नाही - अॅड. प्रदीप शहा) आणि पाच काव्यसंग्रह व एक नाटक (नवे पर्व), एक ललितसंग्रह आहे. या परीक्षणांचे जाणवण्यासारखे वैशिष्ट्ये म्हणजे भारत सासणे, श्रीकांत देशमुख, फकरूद्दीन बेन्नूर, जावेद पाशा, ए. के. शेख आणि डॉ. जे. एम. वाघमारे यांचा अपवाद सोडला तर इतर सर्व लेखक नवोदित आहेत. नवीन पिढीतील लेखकांना शहाजिंदे सतत लिहिते करीत आलेले आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी भूमी प्रकाशन या नावाने प्रकाशनसंस्था सुरू केली. या प्रकाशनातर्फे नवीन पिढीतील लेखक-कवींना त्यांनी प्रकाशात आणले आहे. एक संवेदनशील कवी, उत्तम समीक्षकही असू शकतो याचा पुरावा म्हणून शहजिंदे यांच्या या परीक्षणांकडे पाहिले जाऊ शकते. जातधर्माच्या पलीकडे जाऊन निखळ माणुसकीच्या भूमिकेतून जी मंडळी जगतात व त्यापैकी जे लेखन करतात त्यांच्याबद्दल शहाजिंदे यांच्या मनात विलक्षण अशी आत्मीयता व आदर दिसून येतो.

आळंदसारख्या एका सीमा प्रदेशातील न्यायासाठी वकिली करणाऱ्या अॅड. प्रदीप शहांच्या आत्मचरित्राची दखल ते यामुळेच घेतात. अगदी त्याचप्रमाणे ए. के. शेख यांची कविता त्यांना भावते. ते त्यात आलेल्या समतेच्या बंधुभावाचा व माणुसकी या विरुद्ध होत असलेल्या घटनांच्या विरोधातील तीव्र अशा प्रतिक्रियांमुळे. त्याचमुळे त्यांना जे. एम. वाघमारे यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आकर्षण वाटते. ए. के. शेख यांच्या गजलाचे परीक्षण असो की, डॉ. जे. एम. वाघमारे यांच्या व्यक्तित्व-कर्तृत्वाचे विवेचन असो, शहाजिंदे त्यांच्याकडे उच्च अशा मानवीय मूल्यांच्या दृष्टिकोनातूनच पाहतात. या मूल्यांसाठी जी मंडळी जगतात व त्यासाठी ते जी किंमत मोजतात त्यामुळेच शहाजिंदे यांना वाटते की, या अशा व्यक्तिमत्त्वावर लिहावे. येणाऱ्या पिढीस त्यांचा परिचय करून द्यावा. 

ए. के. शेख, अॅड. प्रदीप शहा, जे. एम. वाघमारे व श्रीकांत देशमुख यांच्याबद्दल शहाजिंदे यांनी फार तटस्थपणे लिहिलेले आहे. त्यांच्या जीवनातील ज्या प्रसंगाना त्यांनी उजेडात आणले आहे, त्यातून जीवनाबद्दलची श्रद्धा वाढते. अजूनही आपल्या भोवती किमान काही मंडळी अशी आहेत की, ज्यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर वाटते की, अजून सर्वच काही सडलेले, नासलेले नाही. अजून बरेच काही असे आहे की, ज्यामुळे वाटते की या जीवनावर, या जगण्यावर प्रेम करावे.

ग्रंथाच्या एका लेखातून शहाजिंदे यांनी भारतीयत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचा हा शोध एका अभ्यासकाचा नसून एका संवेदनशील भारतीय मनाचा शोध आहे. या लेखात सूत्रबद्ध पद्धतीने या विषयाची मांडणी केलेली आहे. या मांडणीचा विचार जर करावयाचा असेल तर सहजपणे २५०-३०० पाने लिहावी लागतील. सुरुवातीला शहाजिंदे हे स्पष्टपणे नोंदवतात की, या देशाची संस्कृती, या देशाचे भावविश्व, येथील तत्त्वज्ञान व जीवनसृष्टी ही कृषी संस्कृती व वैदिक संस्कृती यांच्या संघर्षातून निर्माण झालेली आहे. कृषी संस्कृती व वैदिक संस्कृती यांची जी तुलना केली गेलेली आहे, ती अप्रतिम व मूलगामी स्वरूपाची आहे. या लेखाची भाषा इतकी तरल झालेली आहे की, ती काव्यात्मक पातळीवर जाते.

भारतीयत्वाचा हा शोध ते स्वानुभवावरून आपल्या जगण्यातून व निरीक्षणातून करतात आणि त्यामुळेच हे संपूर्ण विवेचन खूप वास्तववादी झालेले आहे. भारतीयत्वाचे विवेचन करताना ते कोठे-कोठे हळवे होतात, तर काही ठिकाणी अत्यंत कठोर व मार्मिक. संघाचे व पर्यायाने हिंदुत्वाचे खरे स्वरूप उघड करताना ते कठोर होतात. अत्यंत निर्भीडपणे ते संघाचे खरे स्वरूप उघडे करून दाखवतात तेवढ्याच निर्भीडपणे ते मुसलमानातील प्रतिक्रियावादी ताकदीचा पर्दाफाश करतात. या दोन धर्मांतील आर्थिकदृष्टया जो संपन्न वर्ग आहे, तो धर्माच्या नावावर पदे मिळवण्यासाठी कसे प्रयत्न करीत आहेत, यात ते स्पष्ट करतात. भारतातील हिंदू व मुस्लिम अभिजन हेच मुळी भारतीयत्वाच्या विरोधात खेळी करत आहेत, हे ते उघड करून दाखवतात.

मुस्लिम मराठी साहित्य असो, काव्यपरीक्षण असो, व्यक्तिमत्त्वावरचे लेखन असो, भारतीयत्वाचा शोध असो, शहाजिंदे यांचा निकष एकच आहे. ते साहित्य, ती व्यक्ती, तो वाङ्मयप्रवाह माणसाला केंद्रस्थानी ठेवतो की धर्म-जातीला? त्याची भाषा आणि त्याचे जगणे व त्याच्या वाङ्मयाचीही भाषा फसवी आहे की सात्त्विक आहे? रणनीती म्हणून आलेली आहे की आतून आलेली आहे? त्या व्यक्तीच्या जगण्याचा भाग म्हणून आलेली आहे की नाही? हे ते कठोरपणे तपासतात. 

अलीकडे या देशातील हिंदू मुसलमानांच्या विचारात व जीवनातील एकमेकांकडे पाहण्याच्या वृत्तीत जो बदल झालेला आहे, त्यामुळे ते खूप अस्वस्थ होतात. त्यांचे हे लेखन वाचून जर प्रत्येकाच्या मनात अस्वस्थता निर्माण होऊ शकली व या अस्वस्थतेतून बाहेर पडण्यासाठी जर आपण जात-धर्माच्या पलीकडे जाऊन निखळ माणूस म्हणून जगण्याचा व मुसलमानांबद्दल आजपर्यंत बाळगलेल्या गैरसमजातून बाहेर पडण्याचा प्रयत्न जर केला, तर त्यांच्या या लेखनाचे सार्थक झाले, असे म्हणावे लागेल.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 01 February 2019

सूर्यनारायण रणसुभे, शहाजिंद्यांच्या 'धर्माच्या नावावर पदे मिळवणारा उच्चभ्रू वर्ग' वगैरे वाचल्यावर हे महाशय डावे विचारवंत असावेसे दिसतात. असू द्या. काही हरकत नाही. वैचारिकरीत्या डावे असणं म्हणजे गुन्हा नव्हे. निदान हिंदू तरी तसं मानीत नाहीत. पण मुस्लिम काय म्हणतात? त्यांच्या दृष्टीने डावे म्हणजे निरीश्वरवादी झाले ना? अल्लाला न मानणे हा घोर अपराध आहे. शहाजिंदे यांचं लेखन हिंदू उदार मनाने वाचतीलही. पण मुस्लिम तितक्याच खुलेपणाने वाचणार आहेत का, असा प्रश्न आहे. असो. आता एक गंमत सांगतो. बाबरी नावाची कोणतीही मशीद नव्हती. जी वास्तू होती ते जुनं राममंदिर होतं. कारण की अनिस्लामी प्रार्थनास्थळावर (म्हणजे हिंदूंच्या देवळाच्या जागेवर) मशीद उभारणे हा इस्लामचा घोर अपमान आहे. हिंदूंची वास्तू हिंदूंनी पाडली तर मुसलमानांचा प्रश्न येतोच कुठे? मग राममंदिरासाठी हिंदू विरुद्ध मुस्लिम असा झगडा व्हायचं कारणंच नाही. शिया तर उघडपणे राममंदिरास पाठींबा देतात. तर मग सूफी हे सुन्नींना समजावून का सांगत नाहीत? सूफी जर स्वत:स एव्हढे भारतीय मानतात, तर इतकीशी साधी गोष्ट त्यांना समजंत नाही का? की या तथाकथित सूफींना सौदी अरेबियाचा हरामाचा पैसा गिळायची चटक लागली आहे? कोण कोणास जाब विचारणार, ओळखा पाहू ! एकंदरीत समस्या हिंदू विरुद्ध मुस्लिम नसून मुस्लिमांतर्गत प्रबोधनाची आहे. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......