शैलेंद्र हा कवी आणि शंकरदास ही व्यक्ती आपल्याला भेटतात; कधी स्वप्नवेडे भाव घेऊन, तर कधी सोप्या पण अर्थपूर्ण शब्दांतून
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
जयंत राळेरासकर
  • ‘सुहाना सफर और...’चं मुखपृष्ठ आणि गीतकार शैलेंद्र
  • Fri , 25 January 2019
  • ग्रंथनामा शिफारस सुहाना सफर और Suhana Safar Aur विजय पाडळकर Vijay Padalkar

तसे पाहिले तर एखाद्या कवीवर लिहिणे ही सोपी गोष्ट नाही. कवीचे काव्य, प्रतिभा, त्याचे व्यक्तिगत आयुष्य हे सगळे कवेत घेऊन त्याला उलगडणे, त्याचा अन्वय लावणे आणि ते एकत्र बांधणे हे अवघड काम. शैलेन्द्र या कवीचा जीवनप्रवास आपल्यासाठी सादर करताना विजय पाडळकर यांनी हा समतोल साधला आहे. त्याचमुळे शंकरदास ही व्यक्ती आणि शैलेंद्र हा कवी आपल्याला भेटतात, कधी स्वप्नवेडे भाव घेऊन तर कधी अगदी सोप्या पण अर्थपूर्ण शब्दातून. विजय पाडळकर यांच्या या पुस्तकाचे शीर्षक आहे ‘सुहाना सफर और’. हे शीर्षक अनुभवताना आपण ‘और’ या शब्दानंतरच्या संभाव्य अर्थाचा शोध घेत राहतो आणि २७० पानांची ही सफर बघता बघता ‘सुहानी’ होऊन जाते!

शैलेन्द्र हा सामान्य माणसाचा गीतकार आहे, हे सूत्र त्याच्या कवीपणातील महत्त्वाचे सूत्र आहे. बरबाद असूनही खुशीचे गाणे म्हणणारा शैलेन्द्र. त्याचे शब्द पाठ होऊन जातात. त्याच्या शब्दातील अर्थासाठी आटापिटा करावा लागत नाही. पाडळकर हे आवर्जून अधोरेखित करतात. हिंदी भाषेचे शैलेन्द्रचे प्रेम म्हणजे उर्दूचा दु:स्वास नाही, तर त्याला सामान्याची लोकभाषा वापरायची होती, हे महत्त्वाचे.

पाडळकर शैलेन्द्रच्या आयुष्याबद्दलसुद्धा लिहितात. त्याचे संघर्ष, डाव्या विचारसरणीची बांधीलकी, सोसलेले दारिद्र्य आणि इतकेच नाही तर, एक पाऊल मागे घेऊन तडजोडसुद्धा त्याने केली आहे. ‘बरसात’च्या वेळी राजकपूरकडे पुन्हा (पूर्वी याच राजकपूरला त्याने नकार दिलेला असतो.) जाणारा शैलेन्द्र हा ‘तकदीर का मारा’ असतो, पण लाचार नसतो. आणि ‘गाईड’च्या वेळी एक लाख मागणारा शैलेन्द्र उद्दाम नसतो, तर परिस्थिती-शरण असतो.

विजय पाडळकर असे नाजूक कंगोरे उलगडतात. त्यासाठी चित्रपट व गाणी यांचा उहापोहसुद्धा ते करतात. गाण्यांच्या चालींच्या प्रेमात पडून एखादे गाणे आपण मनात, ओठात वर्षानुवर्षे घोळवत राहतो. मात्र त्या शब्दांच्या अर्थापाशी आपण क्वचित पोहचतो. शैलेन्द्रच्या गाण्यांबाबत असे फारसे करावे लागत नाही. कारण त्याचे शब्द लोकभाषेतून आलेले असतात.

‘मधुमती’, ‘दो बिघा जमीन’ अशा काही चित्रपटांची चर्चा पाडळकर विशेषत्वाने करतात. त्याचवेळी ते बिमल रॉय-शैलेन्द्र संबंधावरसुद्धा भाष्य करतात. ‘मधुमती’मधील ‘जुलमी संग आंख लडी’ या गाण्याच्या चित्रीकरणाचा आपण ‘तसा’ विचार केलाच नव्हता हे जाणवते. ‘मधुमती’बद्दलचे प्रकरण पुस्तकातील एक उत्तम प्रकरण आहे. ‘काटो से खींच के ये आंचल’ (गाईड) या गाण्याची उकलसुद्धा खूप सुंदर केली आहे.

गीतकार आणि दिग्दर्शक यांचे ट्युनिंग असणे ही एक दुर्मीळ घटना आहे. बिमल रॉय, राजकपूर, विजयानंद किंवा हृषिकेश मुखर्जी यांच्या संबंधांबद्दलही पुस्तकात आहे. शंकर-जयकिशन तर राजकपूरमुळे होते, पण सलील चौधरीसुद्धा अनेकदा शैलेंद्रसोबत होते. ‘जागते रहो’ हा राजकपूरचा चित्रपट होता, तरीही संगीत सलील चोधरी यांच्याकडे दिले गेले. शैलेंद्रला लयीची जाण उत्तम होती. सलीलदांच्या ‘जागते रहो’च्या गाण्यांना एक आध्यात्मिक स्पर्श आहे, असे पाडळकर म्हणतात आणि ते शैलेंद्रच्या शब्दातूनसुद्धा जाणवते. अगदी मोतीलालवर चित्रित झालेले ‘जिंदगी ख्वाब है’सारखे गाणेदेखील वेगळे वाचले तर लक्षात येते. हे असे अनेक क्षण पाडळकरांच्या लिखाणातून सहज येतात.

“मै पैसे के लिये नहीं लिखता... कोई ऐसी बात नहीं के जो मुझसे आपकी फिल्मके लिये गाने लिखनेकी कि प्रेरणा दे....” असे राजकपूरला सांगणारा शैलेन्द्र, ‘गाईड’च्या वेळी देवआनंदकडे एका चित्रपटासाठी एक लाख मागणारा शैलेन्द्र आणि ‘तिसरी कसम’ पूर्ण करताना खंक झालेला शैलेंद्र, ही सगळी कवीची मस्ती! शैलेन्द्रच्या आयुष्यात हा कलंदरपणा प्रवाही होता. ‘तिसरी कसम’ हे त्याने पाहिलेले स्वप्न होते. त्यात त्याची अखेर झाली. मात्र त्याला जे हवे होते, ते सर्व मिळाले. बघितलेली स्वप्ने आणि वास्तवातील परिस्थिती हा विरोधाभास हे शैलेन्द्रचे प्राक्तन होते. ‘तिसरी कसम’च्या मेकिंगची सगळी कथा पुस्तकात खूप विस्ताराने येते आणि ती खूप चटका लावणारी आहे.

एकाच गीतकाराची गाथा मांडताना त्याचे स्वत:चे जीवनसूत्रदेखील खूप महत्त्वाचे ठरते. एका प्रकरणात दोन गाण्यांविषयी पाडळकर लिहितात. ‘तेरा मेरा प्यार अमर, फिर क्यू मुझको लगता है डर’ (असली-नकली) या गाण्यात असलेली भावना फार खुबीने व्यक्त झाली आहे. या ओळीतील गंमत जशीच्या तशी ‘प्यार हुवा इकरार हुवा, प्यार से फिर क्यू डरता है दिल?’ (श्री ४२०) मध्ये व्यक्त झाली आहे. हे साम्यस्थळ आणि तरलता शैलेन्द्रच्या शब्दातील आहे. त्या अनामिक भीतीचा आपण शोध घेत राहतो. ‘जागते रहो’मधील ‘जागो मोहन प्यारे...’ हे गाणे आधीच्या प्रसंगातून निर्माण होते हा विचार पाडळकर व्यक्त करतात. त्यावेळी ते एखाद्या साक्षात्कार झाल्यासारखे भासते. शैलेन्द्रच्या शब्दातील सोपेपण, त्याची वैश्विकता आणि त्याची चित्रपटीय जाण हे सगळे पुस्तकात येतेच. आणि त्याचमुळे तो फक्त एक जीवन-प्रवास राहत नाही, तर एक आस्वाद्य सफर होते.

‘तिसरी कसम’ हा चित्रपट शैलेन्द्रच्या आयुष्यातील उत्तरार्ध आणि शेवटाची सुरुवात आहे. पुस्तकात तो पूर्ण तपशीलाने येतो. अगदी फणीश्वरनाथ रेणू यांना लिहिलेल्या पहिल्या पत्रापासून. ‘तिसरी कसम’ निर्मितीच्या ओघात अनेक प्रसंग घडतात. ते सगळेच क्लेशदायक आहेत. मात्र त्यातून मनस्वी आणि हट्टी शैलेन्द्र आपल्याला भेटतो. ‘फटे कलेजा तो गावो गीत...’ ही भावना घेऊन शैलेंद्र तिसरी कसम पूर्ण करतो. मात्र तो पूर्ण झाला, मुंबईत प्रदर्शित झाला, त्यावेळी शैलेन्द्र या जगात नव्हता. हा कसलीही तडजोड न करता काढलेला केवळ एक चित्रपट नव्हता, तर ते शैलेन्द्रचे स्वप्न होते. पुस्तकातील हा अखेरचा भाग खूपच हृदयस्पर्शी आहे.

शैलेंद्रने स्वत:च्या आयुष्यावर केलेले भाष्य किंवा त्याची मते पुस्तकात अनेक ठिकाणी आहेत. शिवाय इतर साहित्यिक-कवींनी शैलेन्द्रबद्दल काढलेले उद्गार आणि गाण्यांची समीक्षा हे सगळे तुकड्या-तुकड्याने पुस्तकात येत राहते. त्याच्या मार्क्सवादी दिवसापासून ते ‘तिसरी कसम’नंतरच्या व्यसनासक्त अवस्थेपर्यंत सगळेच खूप रोमांचक आहे.

आणखी एक. कुणा अजीज अश्रफ नावाच्या लेखकाने शैलेन्द्रला निराशावादी आणि आत्महत्येस प्रवृत्त कवी म्हटले आहे. त्याने दिलेली हास्यास्पद उदाहरणे देत पाडळकर त्याचा परामर्श घेतात. तेदेखील विस्ताराने देत पाडळकर त्याची चर्चा करतात. लेखक अश्रफचा प्रतिवाद करणे खूप गरजेचे होते, परंतु त्याचे महत्त्व तितकेच. कवीच्या – गीतकाराच्या आयुष्यावर यापूर्वीदेखील पुस्तके निघाली आहेत. शैलेन्द्रसारख्या जनकवीवर असे परिपूर्ण पुस्तक असणे ही एक गरज होती. स्वत:च्या आयुष्यातील चढ-उतार सोसत शैलेन्द्र जगला. त्याचे वाचकांसाठी असे स्मारक होणे आवश्यक होते.

.............................................................................................................................................

"सुहाना सफर और..." - या पुस्तकाच्या खरेदीसाठी क्लिक करा.

https://www.booksnama.com/book/4718/Suhana-safar-Aur

.............................................................................................................................................

लेखक जयंत राळेरासकर ध्वनिमुद्रिका संग्राहक आणि चित्रपट अभ्यासक आहेत.

jayantraleraskar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......