बोधकथा आदिवासींच्या, ज्ञान मात्र सर्वांसाठीचे
ग्रंथनामा - झलक
प्रदीप प्रभू व शिराज बलसारा
  • ‘जंगलाच्या सान्निध्यात उमललेले ज्ञान : आदिवासी बोधकथा - एक पुनर्कथन’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 07 December 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक आदिवासी बोधकथा - एक पुनर्कथन Adivasi Bodhkatha - Ek Punarkathan प्रदीप प्रभू Pradeep Prabhu शिराझ बलसारा Shiraz Balsara

भीमसेन आणि इतर अनेक आदिवासींकडून कष्टकरी संघटनेच्या मदतीने प्रदीप प्रभू व शिराज बलसारा यांनी अतिशय परिश्रमपूर्वक ‘आदिवासी बोधकथा’ गोळा करून मूळ इंग्रजी पुस्तक सिद्ध केले. त्याचं सुहास परांजपे व स्वातीजा मनोरमा यांनी केवळ मराठी अनुवाद न करता पुनर्कथन केलं. हे पुस्तक नुकतंच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला प्रदीप प्रभू व शिराझ बलसारा यांनी लिहिलेली प्रस्तावना.

.............................................................................................................................................

पिढी दर पिढी

असे म्हणतात की, डोहाच्या संथ पाण्याच्या खोलीचा थांग लागत नाही. वारल्यांच्या जीवन व्यवहाराबद्दलही असेच म्हणता येईल. विशेषत: एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपले ज्ञान सोपवण्याच्या त्यांच्या व्यवहाराबद्दल. वर वर साध्या वाटणाऱ्या या व्यवहारामागे खोल अर्थ दडलेला आढळतो. वारल्यांचे पारंपरिक ज्ञान अनेक रूपात पुढच्या पिढीकडे सोपवले जाते. लग्न लावणारी ढवळेरीण किंवा तिला मदत करणाऱ्या सवाष्णी जे विवाहाचे मंत्र म्हणतात, ते त्याचेच एक रूप असते. जागरणाच्या वेळी, मृत्यूच्या वेळी, पूर्वज विधींसाठी, इथल्या माणसांच्या पलीकडच्या जगाशी असलेल्या नात्याचा शोध घेण्यासाठी डाक्या भगत जे म्हणतो, तेही त्याचेच दुसरे रूप असते. वारली समाजाचा इतिहास जपून ठेवणारा थळावला जेव्हा ऐकणाऱ्यांना त्यांच्या समाजाचा व परिसराचा रसभरित इतिहास सांगतो, तेव्हा ते पुढच्या पिढीला ज्ञान पोहोचवण्याचेच तिसरे रूप असते. लहान मुलांना वडीलधाऱ्या स्त्री-पुरुषांनी सांगितलेल्या तोंडी कहाण्या हे त्याचे चौथे रूप आहे. या कहाण्या जीवनाकडे, तत्त्वज्ञानाकडे, संस्कृतीकडे पाहण्याचा खास वारली दृष्टिकोन त्या मुलांना सोपवतात, या समृद्ध परंपरांचे आक्रमक आदिवासेतरांपासून रक्षण करतात आणि त्या वारली मुलांमधील ‘विद्यार्थ्या’ला चेतवतात. या कहाण्यांमध्ये सांगणारा आणि ज्यांना सांगितले जाते त्यांच्यात एक खास एतद्देशीय द्वंद्वात्मक व संवादात्मक देवाणघेवाण असते. यातील अनेक कथांचा आशय उपदेशात्मक, आदेशात्मक असतोच; परंतु यापलीकडे जाऊन, कसे वागावे याबद्दल या कथा एक खास प्रकारचा विचारदेखील देत असतात. उदाहरणार्थ, खरे बोलावे. खरे का बोलावे यासाठी देवाचा कोप होईल, नरकात जावे लागेल असा दैवी आधार किंवा संदर्भ आदिवासींच्यात नसतो. असते, ते एक खोलवर रुजलेले मानवी मूल्य - इतरांचा गैरफायदा घेऊ नये, जे या कथा रुजवतात.

माणसामाणसांमधील साहचर्य

या कथांमधून सांगणारा आणि ऐकणारा यांच्यातील संवादातून काल्पनिक गोष्टींकडून आयुष्यातल्या व्यवहाराकडे एक प्रवास घडतो. आदेश निव्वळ स्वीकारण्याऐवजी आदेश तर्कावर आधारून स्वीकारला जातो. निव्वळ कथा समजून घेण्याऐवजी त्यातले सार समजून घेतले जाते, निव्वळ ऐकणे हे काहीतरी आत्मसात करणे बनते. या कथांमधील अर्थ व ज्ञान यांच्या विविध पातळ्या आहेत. आणि त्या सांगणारा व ऐकणारा यांच्यातील द्वंद्वात्मक संवादातून उलगडत जातात. वर वर दिसणाऱ्या पदरांखाली दडलेले इतर पदर उलगडत जातात. पहिल्या कथेचेच उदाहरण घ्या. गोष्ट आहे एका ‘कहंकारका’ची (शब्द घडवणारा, गोष्ट सांगणारा) आणि एका ‘अहंकारका’ची (ऐकणारा, साद देणारा, सांगणाऱ्याची भूमिका सार्थ करणारा). या कथेचे पहिल्या पातळीवरचे सार साधे आहे -- प्रत्येक सांगणाऱ्याचे एखादा ऐकणाराच सार्थक करू शकतो. दुसर्‍या पातळीवर असेही म्हणता येईल की, ऐकण्याच्या साध्या क्रियेतून ऐकणारा सांगणाऱ्याचे अस्तित्व सिद्ध करतो, तसेच त्याच्याशी अन्योन्य संबंध बांधतो; हे कथेचे सार आहे. तिसऱ्या पातळीवर असे म्हणता येईल की, मानवी समाजातील संबंध हे एकमेकांना पूरक असतात, एकमेकांच्या विरोधी नसतात; हे या कथेचे सार आहे. शेवटी असेही म्हणता येईल की, आदिवासी समाजाचा दार्शनिक पाया माणसा-माणसांमधील साहचर्यावर आधारलेला आहे - मी, मी आहे, तो तुझ्यामुळे आणि तू, तू आहेस, तो माझ्यामुळे - असे ही कथा सांगते व हेच तिचे सार आहे.

याचे चित्रित रूप हे पालघाटा व धरतारी (धरती आई) अशांसारख्या मातृदेवतेच्या त्यांच्या पारंपरिक चित्रकारीशी जोडलेले आहे. मातीने सारवलेल्या कुडाच्या भिंतींवर लाल माती व शेण यांचा लेप देऊन त्या गुळगुळीत केल्या जातात व सवाष्णी लग्नाच्या विधीचा भाग म्हणून मातृदेवतेला उद्देशून गाणी म्हणता म्हणता ही चित्रे काढतात. आदिवासेतर लोक याला बहुधा पालघाटाचे चित्र काढणे म्हणतील, परंतु आदिवासी स्त्रिया याला लग्नाची गाणी म्हणता म्हणता ‘चौक लिहिणे’ असे म्हणतात. याला बोधकथाही म्हणता येते, कारण हे कथन द्वंद्वात्मक-संवादात्मक असते व ऐकणार्‍याला सहभागाचे आमंत्रण देणारे असते. कथन करणारा ऐकणाऱ्याला अशा अवस्थेत सोडतो की, त्याला त्या कथनामागील अर्थ शोधण्याची इच्छा व्हावी. कथन बरेच काही लपवते व स्थलांतरित करते आणि ऐकणाऱ्याला त्या कथनामागील अंतर्विरोधात शिरायची व सांगणाऱ्याशी संवाद करण्याची प्रेरणा देते. सांगणारा व ऐकणारे यांच्यातील हा संवाद ज्ञानसाधकाला सांगणार्‍याशी संवाद करण्यास व लपलेले अर्थाचे विविध पदर उलगडण्यास उद्युक्त करतो.

इथे सांगितलेल्या बऱ्याच बोधकथा निसर्ग व मानव यांच्या नात्याचा शोध घेतात. निसर्ग आणि मानव यांच्या जवळिकीतून ज्या घटना व देवघेव घडते, त्या जगण्याच्या व त्यांचा अर्थ लावण्याच्या अनेक पद्धती आदिवासींनी पिढी दर पिढी विकसित केल्या आहेत. आदिवासी हे जंगलाचे सोबती आहेत. अजूनही ८० टक्के आदिवासी हे वनक्षेत्रात राहतात. त्यांचा जीवनाधार - अन्न, आरोग्य, आसरा - जंगलाशी घट्ट जोडलेला आहे आणि त्यांचे भौतिक व सांस्कृतिक अस्तित्वही. ‘हिरवा’ हे त्यांचे प्रमुख दैवत आहे व प्रत्येक कुटुंबाचे कुलदैवतही आणि वारली घरात हातसडीच्या भाताच्या एका टोपलीत त्याची स्थापना केलेली असते. ‘हिरवा’ हे उत्पादकतेचे व मुबलक अन्नाचे दैवत समजले जाते. ‘वाघाया’ हे गावाचे रक्षण करणारे दैवत समजले जाते व त्याला आदिवासींच्या दैवतांमध्ये विशेष स्थान आहे. झाडे, प्राणी आणि पक्षी ही अनेक कुळांची कुलदैवते आहेत व ते ते झाड, प्राणी व पक्षी ते जिवापलीकडे जपतात व अशा रीतीने जैवविविधताही जपतात.

विश्‍वाच्या उत्पत्तिसंबंधीच्या आदिवासींच्या दृष्टिकोनातही मानवी आयुष्यात निसर्गाला महत्तम स्थान दिलेले आहे. आणि हे महत्त्व केवळ माणसांच्या उत्कर्षापुरते नसून, मुळात माणसांच्या अस्तित्वासाठीच महत्त्वाचे मानलेले आहे. आणि हा धागा आपल्याला अनेक कथांमध्ये सापडतो. सूर्य, चंद्र यांसारख्या गोष्टींबद्दल असलेल्या अतींद्रिय शक्तीबद्दल ज्या भयमिश्रित आदरातून पूजा केली जाते, तशा प्रकारचे हे नाते नाही. संस्कृती हीच मुळात निसर्ग आणि मानवाच्या साहचर्यातून उत्पन्न होते याचे ते द्योतक आहे. इतर काही परंपरांमध्ये असतो तसा आदिवासींच्या विश्वात निसर्ग आणि माणूस यांच्यात अटळ संघर्ष नाही. उलट जगण्याचा आधार निर्माण करणारे ते नाते आहे. साध्य-साधन संबंधांबद्दलचे पारंपरिक आदिवासी तर्कशास्त्र हे आधुनिक मानवाच्या वसाहतवादी मानसिकतेपेक्षा बिलकुल वेगळे आहे.

एखाद्या आदिवासीचे इतर जीवांशी किंवा निर्जीव वस्तूंशी जे नाते असते, त्यात जे प्राथमिक तर्कशास्त्र अंतर्भूत असते; त्यात वैयक्तिक फायद्यासाठी लबाडी करणे किंवा दुसऱ्याच्या दुर्बलतेचा किंवा परिस्थितीचा फायदा घेणे हे निषिद्ध असते. या तर्काचे कृतीत रूपांतर होते, ते निसर्गाबरोबरच्या आक्रमण नाकारणाऱ्या तहाच्या स्वरूपात. या तहामधले तत्त्व असे असते की, इतर जीवांप्रमाणे मानवजात हीदेखील या विश्वाची नागरिक आहे, परंतु तिला सृष्टीवर कोणतीही खास मालकी किंवा प्रभुत्व दिलेले नाही. हे नाते ‘जगा आणि जगू द्या’ किंवा ‘निसर्ग दुर्बल घटक असल्याने त्याला विशेषाधिकार’ देण्याच्या पलीकडे जाणारे नाते आहे. ते मानवी सह-आनंदाचे नाते आहे.

मौखिकता आणि सह-आनंद

कहंकारक आणि अहंकारक यांच्या कथेचे उदाहरणच घ्या. कहंकारक म्हणजे शब्द घडवणारा आणि अहंकारक म्हणजे शब्द ओळखणारा. वरवर पाहता ती दोन कथाप्रेमींच्या प्रवासाची कथा आहे. पण त्यात लपलेला एक वेगळा धागा आहे. ही कथा सह-आनंदाच्या व्यवहारातून मौखिकतेचे तर्कशास्त्र व्यक्त करते. (सह-आनंद म्हणजे एकत्रपणे घेतलेला आनंदाचा अनुभव व त्यातून निर्माण होणारे आनंदीपण.)

मौखिकता - बोली परंपरेची संस्कृती - ही दस्तऐवजांवर किंवा लिखित शब्दावर आधारलेल्या संस्कृतीपेक्षा मूलभूतरीत्या वेगळी आहे. मौखिकतेमध्ये बोलणारा हा ऐकणार्‍याशी जैवपणे जोडलेला असतो, कारण साद देणारा नसेल, तर बोलेल कोण? लिखित दस्तऐवज स्वतंत्रपणे अस्तित्वात असतो. त्याच्या अस्तित्वाला दुसऱ्या कुणाचे समर्थन लागत नाही. बोलणारा आणि ऐकणारा यांच्या नात्यात मात्र एकमेकांचा स्वीकार आवश्यक असतो. सांगणारा या कथेचा निर्माता असल्याबद्दल ऐकणारा ऐकण्यातून ग्वाही देतो. आपल्या अस्तित्वासाठी आणि विकासासाठी माणसे एकमेकांवर अवलंबून असतात असे मौखिकता सांगते. त्यामुळे असे समाज एकमेकांच्या अस्तित्वाची ग्वाही देतात आणि सह-आनंदात ती व्यक्त करतात. याउलट, इतर समाजांमध्ये समाजरचनेचा धागा हा व्यक्ती आणि तिचे खाजगीपण हा असतो.

मौखिकतेचे तर्कशास्त्र आणखी पुढे नेले, तर आणखी खोलवरचे अर्थबोध होतात. मी मी आहे, कारण तू तू आहेस, असे हे तर्कशास्त्र सांगते. परस्परविरोधी समाजांऐवजी परस्परसमर्थक समाज निर्माण करण्यास हे तर्कशास्त्र मदतकारक ठरते. स्पर्धा आणि स्वतंत्रता यांऐवजी सह-आनंदातून सहकार्य व साहचर्य हे केंद्रभागी आणते. सांगणाऱ्याला प्रतिक्रिया देता देता तो/ती सहकार्याची एक चौकट निर्माण करते, जिथे स्वीकारासाठी अवकाश तयार होतो. व्यक्ती-व्यक्तींमधील संबंधांना त्यामुळे अर्थ प्राप्त होतो व बळकटी येते. यातून सामाजिक देवाण-घेवाणीचे प्रतिरूप परस्पर आस्थेचे बनत जाते व समाज व्यवस्थेला बळ प्राप्त होते, सामंजस्य निर्माण होते व परस्पर-संघर्ष टाळला जातो.

सह-आनंदाचे प्रतिरूप हा आदिवासींमधील लोकशाही सहमतीचा गाभा आहे. म्हणजे आबाल-वृद्धांसकट सर्वांमध्ये सहमतीचा शोध घेण्याचे लोकशाही हे साधन बनते. तक्रार निवारणाच्या प्रक्रियेलाही तेच तर्कशास्त्र लागू होते. तेही बिनसंघर्षाच्या मार्गाने होते आणि वडीलधाऱ्यांसमोर सामान्यत: चूक कबूल केली जाते आणि तसे न करणे हा अपवाद असतो. वडीलधारे तक्रारीचे लवकरात लवकर निवारण करण्याचा प्रयत्न करतात, कारण वेळ गेला तर बेबनाव वाढेल हे त्यांना माहीत असते. त्यामुळे तक्रारीचे निवारण करताना लक्ष्य चूक झालेल्याला शिक्षा करणे असे नसून, समाजामध्ये निर्माण झालेला बेबनाव नाहीसा करणे हे असते. तक्रार निवारणानंतरची प्रक्रिया कदाचित कृत्रिम वाटेल; पण त्यात सह-आनंदाचा पुनरुच्चार असतो. तिथे सर्वजण मिळून दारू पितात. परंतु प्रत्येकाच्या भांड्यात प्रत्येकजण दारू ओततो आणि शेवटी प्रत्येकाच्या भांड्यात सर्व समाजाची दारू असते. शेवटी सह-आनंदाने सामाजिक मेळ वाढतो, आणि सामाजिक मेळाने सह-आनंद वाढतो. मौखिकतेचे हेच तर्कशास्त्र सशक्त बनते. स्वत:च्या अस्तित्वाच्या उच्चारात दुसऱ्याच्या अस्तित्वाचा उच्चार पाहिला जातो. जगभरच्या आदिवासी आणि इतर एतद्देशीय जमातींच्या जगण्याचे व विचाराचे हेच तर्कशास्त्र आहे.

आदिवासी कथांचा ऱ्हा

आदिवासी जमातींना मुख्य नागरी समाजप्रवाहाचा भाग बनवण्याच्या शासनाच्या अट्टाहासापायी ह्या एवढ्या अर्थपूर्ण आणि जीवनाचे सार सांगणाऱ्या कथांचा झपाट्याने ऱ्हास होत आहे, हा अत्यंत दुर्दैवाचा भाग आहे. ह्या जमातींना मुख्य प्रवाहाचा भाग बनवण्याच्या उद्देशाने वसतिगृह असलेल्या आश्रमशाळा सुरू केल्या गेल्या आहेत. ह्या आश्रमशाळांचा आराखडा हा बराचसा एतद्देशीय अमेरिकनांसाठी बांधलेल्या वसतिगृह असलेल्या शाळांवर बेतलेला आहे. ह्या आश्रमशाळांतील शिक्षणातून त्यांचे ‘मागासले’पण जाऊन ते ‘आधुनिकता’ आत्मसात करतील, अशी अपेक्षा आहे. ‘लिहिता येऊ न शकणे’ म्हणजेच ‘मागासले’पण किंवा ‘अशिक्षित’पण असे मानल्याने आदिवासी असंस्कृत ठरतात आणि एका भ्रामक आधुनिकतेमुळे आदिवासी संस्कृतीतील समृद्धी व निसर्गाच्या सान्निध्यात सह-आनंदाच्या आधारावर उमलणार्‍या आदिवासींच्या परंपरा व विचार यांना सुरुंग लावला जातो. एतद्देशीय ज्ञानाच्या आधारे निसर्गाशी माणसांनी जोडलेल्या विविध पदरी नात्याला भरून न निघणारे खिंडार पडत आहे. ‘विकासा’च्या साच्याचे सार जरी मुक्तीकडे नेणारी प्रगती आहे असे मानले गेले असले, तरी लिखित शब्दाचे प्रभुत्व आदिवासी विश्वावर लादणे म्हणजे ‘आदिम मौखिकता व मानववादी पर्यावरण ज्ञान’ यांच्यावरचा घालाच ठरतो व त्यातून कालांतराने निसर्गाबरोबरच्या परस्पर सहकार्याचा संपूर्ण ऱ्हास होतो. ‘बळी तो कान पिळी’ ह्या तत्त्वाला आदिवासी विचारात जागा नाही.

आदिवासी संस्कृतीवरील आक्रमण

सत्ताधारी सांस्कृतिक अभिजनांच्या तथाकथित आधुनिकतेच्या ह्या घातक मार्‍यामुळे मौखिक परंपरा ह्या मोडकळीस आल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून आदिवासी जमातींची सामाजिकता व संस्कृती कोलमडल्या आहेत व त्यांचे स्वरूप बदलून विद्रूप झाल्या आहेत. वाईट गोष्ट ही की, सामूहिक सह-आनंदाच्या भोवती बांधल्या गेलेल्या त्यांच्या प्रगत समतावादी सामाजिक व्यूहांचा नाश करून, तथाकथित आधुनिकता एतद्देशीय लोकांना इतिहासाच्या कचरापेटीत नेऊन टाकत आहे. सर्व जीवांसोबत जगण्यातून निर्माण झालेल्या सह-आनंदातून सर्व जीवांना मध्यवर्ती स्थान आहे, अशा प्रकारच्या प्रगत संकल्पनांना आदिवासी संस्कृतीमध्ये कळीचे स्थान आहे. आता या प्रगत संकल्पनांचाच नाश होत आहे आणि त्यांची जागा परस्परविरोधावर आधारलेली स्पर्धामूल्ये घेत आहेत.

शिक्षण आणि विकास यातून आदिवासींना मुख्य प्रवाहात आणताना, ते मुख़्य प्रवाहात अगदी तळाला राहतात आणि या मुख्य प्रवाहात येण्याच्या परिणामीच आदिवासी पारंपरिक समाजांचा विध्वंस होतो, हा मोठा उपरोधच आहे. अधिकृत सरकारी दृष्टिकोनानुसार भारतामध्ये विविध संस्कृती एकत्र येऊन त्यांची देवाणघेवाण होण्याची सातत्याने प्रक्रिया चालू आहे. पण भारतातील आदिवासींना तो दृष्टिकोन एतद्देशीय समूह मानायला तयार नाही. गंमत अशी की, ते आधुनिकतेची वाटचाल करणाऱ्या राष्ट्रापासून तुटलेले असल्यामुळे ते मागासलेले आहेत, असे मात्र मानले जाते; पण एतद्देशीय मानले जात नाहीत! राष्ट्राचे प्राथमिक उद्दिष्ट हे आदिवासींना मुख्य प्रवाहाचा भाग बनवण्याचे मानल्यामुळे, त्याचे अनिवार्य परिणाम म्हणून आदिवासी संस्कृतीची समृद्धी नष्ट झाली आहे आणि आदिवासी संस्कृतीचा बौद्धिक वारसा क्षुल्लक व नगण्य ठरवला गेला आहे.

कष्टकरी संघटनेचे आदिवासींमधले कार्य व तिच्यासमोरील आव्हाने

कष्टकरी संघटना ही ठाणे जिल्ह्यातील वारली भागात अनेक दशके काम करणारी संघटना आहे. कष्टकरी संघटनेच्या आदिवासी सभासदांनी तिच्या चाळीस वर्षांच्या अस्तित्वात सावकारी बंद पाडली आहे, हडपलेले पैसे परत घेतले आहेत, हस्तांतरित जमिनी परत मिळवल्या आहेत व जमिनीचे हस्तांतर जवळपास पूर्णपणे बंद पाडले आहे. संघटनेने चाळीस वर्षे आदिवासींच्या जंगलावरील अधिकारासाठी लढा दिला आहे. परिणामी प्रदीप प्रभू यांना केंद्र सरकारच्या ‘फॉरेस्ट राइट्स अॅक्ट’चा मसुदा तयार करण्याच्या प्रक्रियेत सामील करून घेतले गेले. या कायद्यानुसार देशभरातील २.९ कोटी आदिवासी कुटुंबांना जमिनीचे अधिकार प्राप्त झाले. संघटनेवर प्रचंड दडपशाही झाली. परंतु त्यातून वर येऊन, सातत्याने लढा देऊन संघटनेने तिच्या आदिवासी सभासदांना त्यांचा आवाज, त्यांची अस्मिता आणि त्यांची कार्यप्रवणता परत मिळवून दिली, हेच कदाचित संघटनेचे सर्वांत मोठे यश म्हणता येईल. आदिवासींना स्वत:वर, त्यांच्या परिसरावर आणि त्यांच्या विकासावर स्वत:चा ताबा मिळेल अशा प्रकारचा कायदा करण्याबाबत चर्चा घडवण्यात, त्याचा मसुदा बनवण्यात व तो यशस्वीपणे अमलात आणण्यासाठीदेखील संघटना सतत प्रयत्नशील राहिली आहे.

संघटनेसमोर आज अनेक आव्हाने उभी आहेत: आदिवासी समूह स्वयंशासनाचे माध्यम कसे बनतील ते पाहणे; गावातील जंगल त्यांचे सामूहिक जंगल म्हणून जतन करून कसे विकसित करता येईल ते पाहणे; मुलांच्या शिक्षणामध्ये आदिवासी मूल्ये व रीती यांचा समावेश करत, त्या शिक्षणाची प्रत उंचावण्याचे आव्हान स्वीकारून त्यासाठी काम करणारे आयांचे गट बनवणे; आणि ज्या गावांमध्ये संघटना काम करते, तिथे विकास जागरूकता निर्माण करून विकासाचे काम हाती घेतील असे गट निर्माण करणे.

कष्टकरी संघटनेने केल्या बोधकथा एकत्र

या अशा पार्श्वभूमीवर कष्टकरी संघटनेने ठरवले की, एका संपूर्ण लोकसमूहाचे ज्ञान ज्यात व्यक्त होते, अशा या बोधकथांचे संकलन करायचे. संघटनेला आशा आहे की, त्या चित्रित व लिखित स्वरूपात सादर केल्याने, हा ठेवा पुन्हा आदिवासींना उपलब्ध होईल आणि आपले पारंपरिक ज्ञान जगाला पोहोचवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना बळकटी यईल. वारल्यांच्या ज्ञानाचे दस्तऐवजीकरण व्हावे, त्याद्वारे त्यांचा स्वयंशासित समूह म्हणून विकास व प्रगतीचा पुनरुच्चार व्हावा, हा या संकलनामागील विचार आहे. वारल्यांमधील या ज्ञानाचा शोध घेण्याचे, त्याचे दस्तऐवजीकरण करण्याचे व ते जगाला व खुद्द वारल्यांना उपलब्ध व्हावे यासाठीचे प्रयत्न सुरू झाले; ते जामशेत कामडीपाड्याच्या संघटनेच्या खंद्या पुरस्कर्त्या भीमसेन कोंड्या कोटीच्या कार्यापासून. भीमसेनकडे ही कला आली, ती त्याच्या आईकडून. ती फार चांगले चौक लिहीत असे व तीच कला भीमसेनच्या बोटातही उतरली. तिला माहीत असलेले सारे चौक त्याने आत्मसात केले. शिवाय गावोगाव फिरून त्याने कथा गोळा केल्या. प्राचीन कथांच्या पुनरुज्जीवनाचा आणि त्या ‘ग्रथित’ करण्याच्या कामाचा त्याने पाया घातला. आदिवासींच्या बहुआयामी ज्ञानाचा आम्हा बर्‍याच जणांना परिचय झाला तो भीमसेनमुळेच. त्याच्यानंतर त्याच्याच गावच्या दामू मह्या नारल्या आणि रूपजी वनश्या खेंवरा यांनी त्याचे अनुकरण केले. परंतु कालांतराने एकंदरीतच आदिवासी चित्रकलेचे स्वरूप हळूहळू जास्त बाजारू बनत चालले. अनेक तरुणांनी आता ही चित्रे पुनर्चित्रित करायचा प्रयत्न हाती घेतला आहे; पण दुर्दैवाने त्यांचे प्रयत्न जे आहे, त्याचे हुबेहूब चित्रण करण्यापुरतेच मर्यादित राहतात व त्यांतील बोध व बहुपदरी ज्ञानाकडे दुर्लक्ष करतात.

मराठी संकलनातल्या पंधरा कथा

वारली कथांमध्ये दडलेल्या अर्थांचा आवाका फार मोठा आहे हे स्पष्ट झालेच आहे. ‘जंगलाच्या सान्निध्यात उमललेले ज्ञान’मधील या आदिवासी बोधकथा अथवा गोष्टी कष्टकरी संघटनेच्या प्रदीप प्रभू आणि शिराज बलसारा यांनी गोळा केलेल्या कथांमधून घेतलेल्या आहेत. प्रदीप व शिराज संघटनेचे कार्यकर्ते आहेत. या पहिल्या मराठी संकलनात पंधरा बोधकथा प्रकाशित होत आहेत. यांतील दहा कथा अगोदर इंग्रजीत ‘विस्डम फ्रॉम दि विल्डरनेस’ या नावाने प्रकाशित झालेल्या आहेत. अनुवादक सुहास परांजपे व स्वातीजा मनोरमा हे आदिवासींबद्दल आस्था असलेले जुने कार्यकर्ते आहेत. त्यांनी ह्या कथांचे मराठीत पुनर्कथन केले आहे.

स्थूलमानाने या संकलनातील कथांचे पाच प्रकार पडतात. पहिल्या प्रकारच्या कथांमध्ये विविध व वेगवेगळ्या प्रकारचे तत्त्वज्ञान किंवा कल्पनाप्रणाली गुंफलेल्या आहेत. संकलनातील ‘कहंकारक व अहंकारक’ ही पहिली कथा याच प्रकारात मोडते. तिच्यातील अर्थांचे निरनिराळे पदर आपण पाहिलेच आहेत. ‘देवपणाचे कवच’ ही या प्रकारात मोडणारी दुसरी कथा आहे. यात माणूसपण, देवपण, आई-वडिलांबद्दलची कर्तव्ये इत्यादी अनेक बाबींचा विचार मांडलेला आहे. ‘विलक्षण प्रेम’ ही कथादेखील याच प्रकारची कथा मानता येते. यात माणसा-माणसांमधला आणि माणूस आणि निसर्ग यांच्यातला सह-आनंद निरनिराळ्या प्रकारची नृत्ये, वाद्ये व संगीत यांतून व्यक्त होताना दिसतो. ‘कणसेरी’ ही कथा कणसेरी ही आद्यदेवता पहिली चेटकीण कशी ठरते ते सांगते.

या कथांच्या दुसऱ्या प्रकाराला पर्यावरणाच्या संदर्भाभोवतीच्या कथा म्हणता येईल. या कथनांचा एक वेगळाच प्रांत आहे. शिकार करून व रानमेवा गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या जमाती जसजशा शेती करू लागल्या, तसतशा त्या संक्रमणातून निसर्ग व माणूस, विशेषत: माणूस व प्राणी यांच्यातील नातेसंबंधांमध्ये जे बदल होत गेले, त्यांचे या गोष्टी वेध घेतात. या गोष्टी वारल्यांमध्ये कशा निर्माण झाल्या असतील? वेगवेगळ्या उत्पादनपद्धती आत्मसात होताना माणूस आणि निसर्ग यांच्यातील संबंधांबद्दलची वेगळी समजही तयार व्हावी लागते. या गोष्टी या संबंधांचे पुनरावलोकन करतात व नव्या आकलनाचा पाया घालतात आणि त्यातून आर्थिक उत्पादनाशी जोडलेल्या पर्यावरणीय संबंधांचे भान निर्माण करतात. ‘घारीमा’, उंदराचा वाटा’ आणि ‘सुबत्तेची अंगठी’ या कथा या प्रकारात मोडतात. संकलनातील तिसऱ्या प्रकारच्या कथा एक ऐतिहासिक पट मांडून अदिवासेतर समाजांच्या वसाहतवादाबद्दलची वारली जमातीची समज थोडक्यात आणि बांधीवपणे पुढे आणतात व वारली समाजाच्या दृष्टिकोनाबद्दल विचार करण्यास भाग पाडतात. ‘रानउंदराचे पराक्रम’ आणि ‘पारशी यम’ या कथा या प्रकारात मोडतात.

चौथ्या प्रकारच्या कथा पुरुषप्रधान संस्कृतीतील स्त्रियांचे स्थान, तसेच तिला स्त्रियांनी दिलेली टक्कर व्यक्त करतात. वसाहतवादी ब्रिटिश व्यवस्थापनाने वारली पुरुषांना जमिनीचा मालकी हक्क देऊन वारली समाजातील पुरुषसत्तेला बळकटी आणली. जमीन हे वारल्यांचे मुख्य नैसर्गिक व उपजीविकेचे साधन. त्या साधनापासून स्त्रियांना वंचित केले. स्त्रिया दुर्बल बनल्या खऱ्या; पण त्यांनी बलवानांच्या सामर्थ्याला तोंड देण्यासाठी दुर्बलांची साधने वापरली. स्त्रियांच्या पुरुषसत्तेच्या विरोधातील संघर्षामध्ये लैंगिकतेसारखी पुरुषसत्तेचीच साधने पुरुष सत्तेवर कशी उलटवली, याचे या कथा वर्णन करतात. ‘छत्तीस नखरे’, ‘न्हावी आणि मांजर’ आणि ‘चुम्बळ’ या कथा या प्रकारात मोडतात. कथांचा पाचवा प्रकार हा मुख्यत: लहान मुलांसाठी रचलेल्या प्राण्यांच्या बालकथांचा आहे. दुर्बलांनी बलवानांवर युक्तीने विजय मिळवल्याच्या या कथा आहेत. त्यात कधी कधी मोठ्यांसाठीही हाच धडा देणाऱ्या कथांचाही समावेश असतो. ‘तितु व कोल्हा’ आणि ‘कोल्ह्याचा दृष्टिभ्रम’ आणि ‘करावे तसे भरावे’ या तिन्ही कथा या प्रकारात मोडतात.

‘जंगलाच्या सान्निध्यात उमललेले ज्ञान’ हे मराठीमधील पंधरा कथांचे अनुवादित संकलन प्रकाशित होत आहे, ही संघटनेच्या दृष्टीने फार आनंदाची गोष्ट आहे. त्या निमित्ताने आदिवासी कथांच्या या मोलाच्या ठेव्याशी सर्वांचा परिचय होईल, परंतु प्रत्यक्षात हा ठेवा खूप मोठा आहे. तो शक्य तितका मराठी भाषेत प्रकाशित व्हावा व आदिवासींच्या पूर्वपिढ्यांचे ज्ञान पुढील पिढीच्या हाती सोपवण्यासाठी त्या कथा आदिवासी समूहांसाठी कालांतराने त्यांच्या बोली भाषेत सहज उपलब्ध व्हाव्यात व त्यांतील निवडक कथा प्राथमिक शाळेच्या अभ्यासक्रमाचा भाग बनाव्यात, यासाठीही संघटना कृतिशील राहील.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4633/Adivasi-Bodhkatha---Ek-Punarkathan

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......