आटपाट देशातल्या अचाट, पण अफाट नसलेल्या गोष्टी!
ग्रंथनामा - झलक
संग्राम गायकवाड
  • ‘आटपाट देशातल्या गोष्टी’ या कादंबरीचं मुखपृष्ठ
  • Fri , 07 December 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक आटपाट देशातल्या गोष्टी Aatpaat deshatlya goshti संग्राम गायकवाड Sangram Gaikwad

संग्राम गायकवाड यांची ‘आटपाट देशातल्या गोष्टी’ ही कादंबरी नुकतीच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालीय. या कादंबरीतला हा संपादित अंश…

.............................................................................................................................................

स्थळ आणि काळ

खूप खूप वर्षांपासूनच्या गोष्टी आहेत. एक आटपाट देश होता. आटपाट देशातून प्राचीन काळी सोन्याचा धूर निघत होता असे सगळे जण म्हणत. पृथ्वीवरील सगळ्यांत जुनी, जिवंत संस्कृती या देशात नांदत होती. हल्ली अमेरिकेस ‘मेल्टिंग पॉट’ म्हटलं जातं. पण आटपाट देश हा पृथ्वीवरचा बराच जुना मेल्टिंग पॉट होता. वितळवण्याची प्रक्रिया न्यारी होती. जो तो ज्याच्या त्याच्या संस्कृतीसकट सामावला जाई. आटपाट समाजाचं वैशिष्ट्य असलेल्या जातिव्यवस्थेचा या कामी उपयोग होत असे. जातिव्यवस्था आणि जाती हा विषय आटपाटात संवेदनशील होता. विचारवंतांमध्येसुद्धा या विषयावर मारामाऱ्या होत्या. काही जणांचं असं म्हणणं होतं, की मुळात आटपाटात माणसं ही जातिरूप समूहांमध्येच अस्तित्वात होती. या सगळ्या शेकडो जातींना वर्णांत गोवून, त्यांची उतरंड करण्याचे काम नंतरच्या काही धूर्त मंडळींनी केलं. पण या म्हणण्यालासुद्धा काही जणांचा विरोध होता. जे काही वर्ण बनवले होते, ते ड, क, ब आणि अ असे होते. ‘ड’ वर्ण सगळ्यांत वरचा. ही पौरोहित्य करणारी मंडळी. ज्ञान आणि धर्म यांवर मोनोपॉली असणारी. या धूर्तांनीच उतरंड तयार केली, असे बऱ्याच जणांचं म्हणणं असे. ‘क’ वर्ण हा त्या खालोखालचा. क्षात्रकर्म करणाऱ्यांचा. म्हणजे राजेरजवाडे, लढाया, मिशीला तूप लावणं, इत्यादी; किंवा संरक्षण, युद्ध, प्रशासन, राज्यकारभार इत्यादी. ‘ब’ वर्ण हा त्याखालोखालचा. म्हणजे शेती आणि व्यापारउदीम करणारी मंडळी. ‘अ’ हा वर्ण त्याखालोखालचा. म्हणजे श्रमांद्वारे वरच्या वर्णांची, म्हणजे ‘डबक’ यांची सेवा करणाऱ्यांचा.

आटपाटाविषयी नेमकी आणि संपूर्ण कल्पना देता येणं तसं अवघड आहे. ज्याच्या त्याच्या मनातल्या आटपाटाप्रमाणेच शेवटी आटपाटाचं चित्र तयार होणार. आटपाटातल्या लोकांच्या मनांतसुद्धा आटपाटाबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्याच कल्पना असत. खूप प्राचीन काळापासून वेगवेगळे समूह आटपाटात येत असल्याने अशा समूहागणिक आटपाटाविषयी वेगळ्या कल्पना असत. काही असे एकदैवतवादी धार्मिक समूह होते, ज्यांच्या धर्माचा उगम आटपाटाबाहेर झाला होता आणि ते मोठ्या संख्येने शेकडो किंवा हजारो वर्षांपूर्वीपासून आटपाटात दाखल होत राहिले होते. या समूहांच्या आटपाटाबद्दलच्या जाणिवांवर त्यांच्या धार्मिक जाणिवांचा पगडा असे. प्रत्येकाला खिडकीतून वेगवेगळं आकाश दिसावं, त्याप्रमाणे मग या अशा सगळ्यांनासुद्धा वेगवेगळं आटपाट प्रतीत होत असे.

हजारो वर्षांच्या सरमिसळीमुळे मूळचे आटपाटातले लोक आणि बाहेरचे लोक असं काही वेगळं करणंच अवघड होतं. सरमिसळ, अनेकदैवतवाद, सहिष्णुता, वेगवेगळ्या समूहांचं वेगवेगळ्या प्रकारचं सगळंच सांभाळत पुढे जात राहणं, वेगवेगळ्या समूहांच्या जगण्याबद्दलच्या शहाणपणाला अहिंसक पद्धतीने आदर देणं, अशा काही गोष्टींमुळे सगळ्यांचंच आटपाटीयीकरण होत असे. आटपाटातली अंगची म्हणून जी धर्मभावना होती, ती उदार, विशाल, बहुकेंद्री आणि म्हणूनच बिनधर्मी होती. अनेकदैवतवाद हा तिचा पाया होता. नंतरच्या काळात जेव्हा एकदैवतवादी धार्मिक भावना असलेले समूह आटपाटात आले, तेव्हा आटपाटातल्या धर्मविषयक मूळ विणकामाची हिसकाहिसकी झाली होती. आटपाटातल्या मूळच्या आणि बहुसंख्यांच्या धर्मभावनांवरही याचा परिणाम झाला होता. स्वत:चं परंपरागत अनेकदैवतवादी संरक्षणतत्त्व विसरून त्यांनी एकदैवतवादी प्रकारातल्या संरक्षणाच्या आणि आक्रमणाच्या पद्धती वापरायचे अयशस्वी प्रयत्न सुरू केले होते. समावेश हेच संरक्षण आणि म्हणून संरक्षण हेच आक्रमण, हे मूळचं अतिशय प्रभावी तत्त्व विसरून जाऊन, आक्रमण हेच संरक्षण हे नवं एकदैवतवाद्यांचं तत्त्व वापरायचा अयशस्वी प्रयत्न ते करू बघत होते.

‘नेशन स्टेट’ ही गोष्ट ब्रिटिशांच्या राजवटीच्या काळात आटपाटात उगवत राहिली. सबंध आटपाटात जरी एक प्रकारची सांस्कृतिक सलगता असली, तरी आटपाटाच्या बाहेरच्या सरहद्दी तसंच आटपाटाच्या आत असणार्‍यात शेकडो राजकीय प्रांतांच्या सरहद्दी या सतत बदलणाऱ्या असत. आटपाट देश स्वतंत्र झाला, तेव्हासुद्धा तेथे शेकडो लहान मोठी संस्थानं अस्तित्वात होती. या संस्थानांमध्ये वेगवेगळ्या जातींचे, धर्मांचे आणि भाषांचे लोक राहत. त्यामुळे धर्म, जाती किंवा भाषा यांचा वापर राजकीय आणि प्रशासकीय गणितांमध्ये शक्यतो होत नसे. पण आटपाट स्वतंत्र झाल्यानंतर भाषेच्या तत्त्वावर वेगवेगळे प्रदेश निर्माण झाले. तसेच जातींचा आणि धर्माचा वापर मतपेढ्या बांधण्यासाठी सुरू झाला. नेशनसाठी लागणारी नवी एकमयतेची शिवण आणि या सगळ्या जुन्या शिवणी यांच्यात घर्षण सुरू झाले. जुन्याला साठवत साठवतच नवं घ्यायचं आणि त्यालाही साठवायचं, ही जी आटपाटाची अशी खास आदिवाट होती, त्या वाटेची जणू कसोटीच आलेली होती.

इतरत्र ज्या पद्धतीच्या धर्मव्यवस्था आढळतात, तशी धर्मव्यवस्था आटपाट समाजात नव्हती. इतरत्र धर्माचा, धर्मव्यवस्थेचा उपयोग सगळ्याच जुन्या वेगवेगळ्या समाजांना आणि संस्कृतींना विरघळवण्यासाठीचं द्रावण म्हणून होत असे. पण आटपाट समाजात मात्र असं नव्हतं. त्यामुळे आटपाट देश एकाच वेळी अनेक काळात असे. याचाच आणखी एक परिणाम म्हणजे आटपाट देशात अनागोंदी विविधता होती. नवे शिकलेले बरेच जण असं म्हणत, की आटपाट देशातल्या लोकांना इतिहासाचं इंद्रिय नव्हतं. इंग्रजांनी आटपाट देशावर सात पिढ्या राज्य केलं. परिणामी खटाटोपी युरोपीयांनी सुरू केलेल्या आधुनिकीकरणाच्या भानगडीत आटपाट देश बळेच ओढला गेला. असं बाहेरच्यांनी येऊन राज्य करणं आटपाट देशास नवं नव्हतं. बाहेरच्याला येऊ द्यायचं, राज्य करू द्यायचं, पण सूक्ष्म पातळीवर आपण आपलंच चालू ठेवायचं आणि सरतेशेवटी बाहेरच्यालासुद्धा आपल्याजोगा करून घ्यायचं अशी आटपाट देशाची संरक्षणाची पद्धत होती. पण इंग्रजांच्या बाबतीत मात्र ही संरक्षणपद्धत फारशी कामी आली नव्हती. नेहमीप्रमाणे सूक्ष्म पातळीवर आटपाट मंडळींनी आपलंच चालू ठेवलं होतं; पण इंग्रज मात्र आता पृथ्वीवर स्वर्ग आटपाटातच आहे, असं म्हणून आटपाटातल्यासारखा होऊन आटपाटातच राहिला नव्हता. तो बापडा आपला कार्यभाग उरकून झाल्यावर आपल्या देशी निघून गेला होता. हा प्रकार आटपाटियांना नवा होता. त्यामुळे त्यांची नेहमीची संरक्षणपद्धती तोकडी पडली. जुनं सोडावं की नवं धरावं असा पेच त्यांना पडला. पण असा पेच पडूनसुद्धा बरीच वर्षे उलटून गेली होती. आटपाटवासियांची काळाची समज एकरेषीय नसून चक्राकार असल्याने, त्यांच्या दृष्टीने सगळ्याच गोष्टींना साधारणपणे सारखीच वर्षं उलटून गेलेली असत.

त्यामुळे आटपाट देशातल्या गोष्टी नेमक्या कधी घडल्या हे सांगणं सोपं नसतं. गोष्टी सांगण्याची तिथली परंपरा मात्र प्राचीन आहे. कित्येक गोष्टी आणि गाणी तर काना-मात्रा-वेलांटीचाही फरक न होता हजारो वर्षांपासून अगदी जशीच्या तशी सांगितली जातात. गोष्टी सांगण्याच्या तऱ्हासुद्धा निरनिराळ्या. इंग्रजी राज्याचा परिणाम म्हणजे आटपाटवासियांना पूर्वीसारख्या निखालस गोष्टी सांगता येईनाशा झाल्या. त्यांच्या गोष्टी इंग्रज मंडळींच्या अन्नासारख्या बेचव होत चालल्या होत्या. अशा बेचव काळातल्याच या गोष्टी आहेत.

आटपाटीय ढोबळमानाने सांगायचे झाल्यास या गोष्टी तेव्हाच्या आहेत जेव्हा निवृत्ती, मल्हार आणि माधव हे जिवलग मित्र आटपाट देशातल्या अश्मक प्रदेशात असणाऱ्या धेनुकाकट शहरात राहत होते. आटपाट देशातल्या या गोष्टी एकत्र जुळवल्या तर त्यातून आटपाट देशाची गोष्ट तयार होईल.

निवृत्ती

निवृत्ती हा एक कुठेच फिट न बसणारा प्राणी होता. सुबक आणि सुंदर आमराईत एखादंच झाड वाकडं उगवावं तसा तो होता. वडील फिरतीच्या नोकरीत असल्याने निवृत्तीचं बालपण वेगवेगळ्या ठिकाणी गेलं होतं. काही तालुक्याची ठिकाणं, तर काही छोट्या शहराची. आणि उन्हाळ्याची सुट्टी कायम आजोळच्या खेडेगावात. त्यामुळे त्याचं वळण निम्मं गावातलं, तर निम्मं शहरातलं असं होतं. निवृत्तीचे वडील भानाजी हे त्यांच्या पिढीतले शिकून बाहेर पडलेले पहिलेच गृहस्थ. नोकरी मिळाल्यानंतर भानाजींचं पहिलंच पोस्टिंग दूरवर समुद्रकिनाऱ्यावरच्या एका खेड्यात झालं होतं. नोकरीवर रुजू होण्यासाठी गाव सोडताना अख्ख्या कुटुंबीयांनी हलकल्लोळ माजवला होता. कुठं इतक्या लांब परगावी चाललाय आपला भाना, त्यापेक्षा आपल्या गावातच काय वाईट,  असं बरेच जण म्हणायला लागले होते. ते ऐकून भानाजींच्या मनानेही उचल खाल्ली होती. पण त्यांच्या वडलांनी समजावल्यावर ते तयार झाले होते. नंतर मात्र हळूहळू ते निर्ढावत गेले. पण मन मात्र कायम गावाकडे. सतत कुणी ना कुणी धाकटी भावंडं किंवा पुतणे, पुतण्या त्यांच्या घरी शिकायला असत. भानाजींचं जरी तसं विभक्त कुटुंब असलं तरी त्यात एकत्र कुटुंबाच्या सगळ्याच बऱ्या-वाईट खुणा होत्या. निवृत्ती अशा प्रकारे धड शहरी नाही, धड ग्रामीण नाही, धड एकत्र कुटुंबातला नाही, धड विभक्त कुटुंबातला नाही, धड वरच्या जातीतला नाही धड खालच्या जातीतला नाही, असा ‘वसेचिना’ प्रकारातला गृहस्थ होता.

निवृत्तीचा थोरला भाऊ प्राध्यापक होता. बहिणीचंही पदवीपर्यंतचं शिक्षण होऊन रीतसर लग्न, संसार सगळं सुरळीत झालेलं होतं. दुसरा मधला भाऊ बँकेत होता. शहरापासून जवळच्याच गावी असलेली शेतीही तो बघत असे. शिवाय, म्हातारे आईवडीलही राहायला त्याच्याकडेच असत. निवृत्ती हा सगळ्यांत धाकटा असल्याने त्याच्या बाबतीत त्याच्या वडिलांच्या जास्तीच्या अपेक्षा होत्या. निवृत्तीने डॉक्टर व्हावं, अशी त्यांची फार इच्छा होती. त्याप्रमाणे तो डॉक्टर झालाही, पण नंतर त्याच्या डोक्यात प्रशासकीय सेवेत जाण्याचा किडा शिरला. त्याच्या आवडत्या ग्रूपमधल्या सगळ्याच मित्रमंडळींच्या डोक्यांत तो किडा शिरला होता. मागासलेल्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातल्या, एका कोपऱ्यातल्या जिल्ह्यात असणाऱ्या या पोरांना प्रशासकीय सेवेचं मोठंच आकर्षण वाटलं होतं. शिवाय, निवृत्तीचा जीवही डॉक्टर होण्यात रमत नव्हता. एक न्यूरॉलॉजी सोडला, तर बाकी कुठला विषय त्याला आवडलाही नव्हता. न्युरॉलॉजीचा अभ्यास तसा डेंजरस आहे असं त्याला वाटे. मेंदूच्या साहाय्यानेच मेंदूचा अभ्यास करणं हे अपुरेपणाचं आणि अभ्यास करणाऱ्याच्या मानसिक आरोग्यास धोकादायक असणार, असं त्याला वाटे. पण तरी त्याचा रस कमी झाला नव्हता. प्रशासकीय सेवेची परीक्षा देताना मानसशास्त्र हा विषय घेऊन त्याने दुधाची तहान ताकावर भागवली होती.

दुसऱ्याच प्रयत्नात परीक्षा पास होऊन निवृत्ती प्रशासकीय सेवेत गेला खरा, पण त्याचा जीव तिथेही रमेनासा झाला. हल्लीतर निवृत्तीला फार प्रकर्षाने जाणवायला लागलं होतं, की त्याचा कुणालाच फायदा होत नाहीय. आटपाट समाजात फायदा करून देणं आणि फायदा करून घेणं हेच खरं जाळं आहे, असा त्याचा पक्का समज व्हायला लागला होता. या जाळ्यावरच तुम्ही नाचत राहता. त्या जाळ्यातूनच तुमच्या असण्याला अर्थ येतो. नाहीतर तुम्ही असून नसल्यासारखे, सिनेमात मेल्यानंतर आत्मे दाखवतात तसे. कुणीही तुमच्या आरपार जाऊ शकतं आणि कुणाला कळतही नाही तुम्ही आहात ते. वडील, बायको, ड्रायव्हर, बॉस, शिपाई सगळेच तुमच्यावर नाराज असणार, तुमच्या या बिनफायदेशीर अस्तित्वामुळे. शिपाई तर धाडस पावून असंही म्हणणार, की ‘तुमच्यामुळं माझा चहापण जर सुटत नसेल तर मी कशाला तुम्ही बेल वाजवल्यावर येऊ?’

निवृत्ती जेव्हा प्रशासकीय सेवेच्या परीक्षेची तयारी करत होता तेव्हा त्यांचा मस्त ग्रूप जमलेला होता. या ग्रूपमधल्या जवळपास सगळ्यांशी त्याचा नंतरही संपर्क राहिला होता. पण या ग्रूपमधल्या मल्हार आणि अमला यांच्याशी त्याची खास मैत्री होती. मल्हार अजूनही त्याचा पूर्वीसारखाच खास मित्र होता आणि अमलाशी तर नंतर त्याचं लग्नच झालं. अमला मानसशास्त्रातली पदवीधर होती आणि पदव्युत्तर परीक्षेचा अभ्यास करत स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. मानसशास्त्र हा समान आणि आवडीचा विषय असल्याने अमलाची आणि निवृत्तीची मैत्री झाली. काही अपयशी प्रयत्नांनंतर अमलाने परीक्षांचा नाद सोडून सायकॉलाजीमध्ये करियर करण्याचा मार्ग स्वीकारला. निवृत्तीबरोबरची मैत्री मात्र कायम राहिली. पुढे मग दोघांचं लग्नही झालं. लग्नानंतर अमला क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत राहिली. एखाद्या ठिकाणी अमलाच्या प्रॅक्टिसचा जम बसतो न बसतो, तोवर निवृत्तीची बदली होत असे. 

सध्या तो आयकरखात्याच्या धाडविभागात महत्त्वाच्या पदावर काम करत होता. धेनुकाकट आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या केसेस त्याच्याकडे होत्या. वर्षभरात त्याने त्याच्या या कामात चांगलाच जम बसवला होता आणि अधिकाऱ्यांची चांगली टीम बांधली होती. निवृत्ती त्याच्या मित्रमंडळींमध्ये एक प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखला जात होता. काळच असा होता की, कुणाविषयी तो किंवा ती प्रामाणिक आहे असं कधी म्हटलं जात नसे. नेहमी त्याचं किंवा तिचं रेप्युटेशन चांगलं आहे असं म्हटलं जाई. तर निवृत्तीचं रेप्युटेशन खूप चांगलं होतं. साधारणपणे प्रामाणिकपणाचा संबंध पैसे घेणं किंवा न घेणं याच्याशी असे. निवृत्तीच्या मते असं वर्गीकरण फारच ढोबळ होतं. हा मुद्दा गंभीरपणे घेऊन त्यावरून स्वत:च्या आयुष्यात त्याने बराच त्रास सहन केला होता. इथल्या व्यवस्थेत प्रामाणिक असणं म्हणजे काय हे समजावून घेण्याचा त्याचा प्रवास चालूच होता. शेवटचं काही सापडलंय, असं काही त्याला अजून वाटलेलं नव्हतं.

.............................................................................................................................................

या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4698/Aatpaat-deshatlya-goshti#

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 07 December 2018

काय तिच्यायला बथ्थडपणा ठासून भरलाय इवल्याशा संपादित अंशात. म्हणे पुरोहितांचं ज्ञान आणि धर्म यांवर मोनोपॉली होती. च्यायला मग इंग्रजांनी भारतातून इंग्लंडमध्ये नेलेली मद्रास सिस्टीम ऑफ एज्युकेशन ( https://en.wikipedia.org/wiki/Madras_System_of_Education ) मध्ये असला काही प्रकार औषधालाही सापडंत नाही, तो कसाकाय? अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये लोकशिक्षण नावालाही नव्हतं. ही संकल्पना ( = कन्सेप्ट) व प्रारूप ( = मॉडेल) भारतातनं इंग्लंडात गेलं. आणि म्हणे ब्राह्मणांची शिक्षणावर मोनोपोली होती. कसला बेवडा ढोसून लिहिलीये कादंबरी? ते नेहमीचं अल्कोहोल ( CH3-CH2-OH) मुळीच दिसंत नाही. तो मेकॉलेछाप शिक्षणाचा बेवडा आहे. त्यापासून सावधान! बाकी, मला लेखकाशी काही देणंघेणं नाही. -गामा पैलवान