‘हायकू’ हा काव्यप्रकार मराठी मातीत रुजवण्याचं श्रेय शिरीष पै यांचंच!
ग्रंथनामा - झलक
उषा मेहता
  • कवयित्री शिरीष पै यांच्या ‘हायकू हायकू हायकू’ या संग्रहाचं मुखपृष्ठ
  • Sat , 17 November 2018
  • ग्रंथनामा झलक शिरीष पै Shirish Pai हायकू हायकू हायकू Haiku Haiku Haiku

कवयित्री शिरीष पै यांच्या समग्र हायकू प्रथमच एकत्रितरीत्या ‘हायकू हायकू हायकू’ या संग्रहात एकत्रित करण्यात आल्या आहेत. पॉप्युलर प्रकाशनाच्या वतीनं १५ नोव्हेंबर रोजी मुंबईत समारंभपूर्वक प्रकाशित झालेल्या या संग्रहाचं संपादन ज्येष्ठ कवयित्री उषा मेहता यांनी केलं आहे. त्यांनी संग्रहाला लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

१.

मराठी मातीत ‘हायकू’ हा काव्यप्रकार रुजवण्याचं श्रेय शिरीष पै यांच्याकडे जातं.

शिरीष पै यांचे १९७९ ते २०१५ या कालावधीत एकूण दहा हायकू-संग्रह प्रसिद्ध झाले व अकरावा प्रसिद्ध होण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं; त्यामुळे काही हायकू अप्रकाशित राहिले. त्यांनी लिहिलेले प्रकाशित-अप्रकाशित असे सर्व हायकू आता एकत्रितपणे प्रसिद्ध होत आहेत. या हायकूंखेरीज इतरत्र प्रसिद्ध झालेले वा त्यांच्याच वह्यांमध्ये राहिलेले असे हायकू कदाचित असतीलही, परंतु त्यांचे पुत्र अ‍ॅडव्होकेट राजेंद्र पैंनी उपलब्ध करून दिलेले सर्व हायकू या संग्रहामध्ये संग्रहित झाले आहेत. त्यांच्या पहिल्या ‘ध्रुवा’ या हायकूसंग्रहाचा अपवाद सोडला तर शिरीषताईंनी बाकी सर्व संग्रहांच्या नावांमध्ये कटाक्षाने ‘हायकू’ हा शब्द आणलेलाच आहे. उदा. ‘माझे हायकू’, ‘फक्त हायकू’, ‘हेही हायकू’, ‘मनातले हायकू’ इत्यादी. म्हणूनच याही संग्रहाचं नामाभिधान ‘हायकू’ ‘हायकू ‘हायकू’.

या हायकूंची मांडणी तीन भागांमध्ये केलेली आहे. शिरीषताईंच्या सुरुवातीच्या संग्रहांमध्ये त्यांचे हे अनेक विषयांवरचे हायकू एकत्रितपणे सामोरे आले. पहिल्या विभागात ते त्याच अनुक्रमाने आलेले आहेत. २००४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘मनातले हायकू’ या संग्रहात आणि त्यानंतरच्या सर्व संग्रहांत त्यांनी स्वतःच हायकूंची मांडणी जाणीवपूर्वक विषयवार केलेली आहे. थोडी सरमिसळही झाली आहे, पण नीट पाहूनच ‘मनातले हायकू’ व त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या संग्रहांतील हायकूंची मांडणी विषयवार करून दुसरा भाग सिद्ध केलेला आहे. तिसरा भाग हा त्यांच्या आजवर प्रकाशित न झालेल्या हायकूंचा, ज्यात त्यांच्या वहीतून मिळाल्याप्रमाणे वेगवेगळ्या विषयांवरचे हायकू एकत्रितच आलेले आहेत.

शिरीषताई स्वतः तर हायकू लिहीत होत्याच. त्याचबरोबर महत्त्वाच्या जपानी हायकूकारांच्या इंग्रजीत अनुवादित झालेल्या हायकूंचे मराठी अनुवादही करीत होत्या. सुरुवातीच्या त्यांच्या या संग्रहामध्ये त्यांनी त्यांच्या अनुवादित हायकूंचाही समावेश केला. नंतरच्या संग्रहांमध्ये मात्र त्यांनी फक्त त्यांचे स्वतंत्र हायकूच घेतले आहेत. आणि ‘हायकू, हायकू, हायकू’ या संग्रहात अर्थातच फक्त शिरीषताईंनी लिहिलेल्या स्वतंत्र हायकूंचाच समावेश आहे.

शिरीषताईंनी स्वतःच्या काही हायकूसंग्रहांना प्रस्तावना लिहिल्या. काही संग्रहांमध्ये प्रस्तावनेखेरीज हायकूसंबंधातले आणखीही काही लेख लिहिले. त्यांतील काही लेखांची शीर्षकं अशी, ‘हायकू : पूर्व स्वरूप आणि आविष्कार’, ‘हायकू आणि मी’, ‘हायकूमधील आध्यात्मिकता’ असे लेख व प्रस्तावना यांचा या लेखनातील संपादित भाग या संग्रहातही घेतला आहे. जिज्ञासूंना तोही नक्कीच वाचनीय वाटेल. हायकू रचनेचे किमान तंत्रही एका लेखात त्यांनी विशद केलेले आहे.

.............................................................................................................................................

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

२.

शिरीषताईंचे वडील प्रख्यात साहित्यिक, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. शिरीषताई म्हणतात, “आचार्य अत्र्यांची मी कन्या झाले, ती भविष्यकाळात वाङ्मयसेवा करण्यासाठी जणू! ज्या घरात मी जन्मले, मोठी झाले त्या घरात दुसरे कुणीही साहित्याकडे जीवनाचे एक ध्येय म्हणून वळलेच असते. त्या घराचे वाङमयीन संस्कारच असे झपाटून टाकणारे होते की, लेखक होण्यापलीकडे दुसरा काही मार्ग किंवा पर्यायच नव्हता. नियतीने जणू ओढत, खेचत फरपटत मला लेखनाच्याच दिशेला नेले.” या कथनातील शेवटच्या वाक्यातील सूचकता (आणि सत्रताही) शिरीषताईंनी आयुष्यभर केलेल्या ‘लेखन-संसारा’ला व्यापून आहे.

शिरीषताईंनी सुरुवातीला साधं, सोपं, सर्वांना सहज समजेल, भिडेल असं लिहित्यासाठी आपल्या वडिलांनाच ‘लेखनगुरू’ मानलं होतं, तरी गुरूंच्या पावलांवर पाऊल ठेवून जाताना कालांतरानं स्वतःचा लेखनमार्ग स्वतःलाच शोधावा लागतो याची त्यांना जाणीव होती. त्यामुळेच शिरीषताईंचं त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षापासून सुरू झालेलं कथालेखन हे त्यांच्या स्वतःच्या अनुभवांतून निर्माण झालं होतं आणि अर्थातच त्यावर अत्र्यांच्या लेखनाचा आशयाच्या दृष्टीनं प्रभाव जाणवला नव्हता. ‘चैत्रपालवी’ या कथासंग्रहाच्या प्रस्तावनेत स्वतः अत्र्यांनी लिहिलं होतं, ‘मला आश्चर्य वाटलं, माझ्यासारख्या विनोदी लेखकाची मुलगी असूनही माझ्या मुलीला ट्रॅजिडीचं आकर्षण वाटतं!’ अत्र्यांची नाटकंही ‘उद्याचा संसार’सारखे काही अपवाद सोडले तर प्राधान्याने विनोदी होती. या नाटककाराच्या कन्येनंही चार नाटकं लिहिली पण ती अत्र्यांच्या नाटकांहून पूर्णतः वेगळ्या स्वरूपाची होती. विषय वेगळ्या प्रकारचे होतेच, आणि संवादांमध्ये काव्यात्मता होती.

एकोणीसशे त्रेपन्नपासून शिरीषताईंची पत्रकारिता सुरू झाली. ‘नवयुग’ साप्ताहिकाच्या संपादन खात्यात काम करताना त्या ‘नवयुग’चा वाङ्मयीन विभाग सांभाळत होत्या. या बाबतीत त्यांना दत्तू बांदेकरांचं मार्गर्शन मिळालं. इथं त्यांनी चित्रपट परीक्षणं, पुस्तक परीक्षणं, मुलाखती, व्यक्तिचित्रं असं अनेक प्रकारचं लेखन केलं. याच काळात दोन कादंबऱ्यांचंही लेखन झालं. त्यातील एका कादंबरीला ऐतिहासिक पार्श्वभूमी होती. त्यांच्या कथांना तर दिवाळी अंकांत मागणी असे. त्यामुळे कथालेखन तर खूपच झालं. ‘नवयुग’कडे येणाऱ्या लेखनामुळे त्यांना मराठी वाङ्मयातील नवीन प्रवाहांची कल्पना येत होती. इतरांच्या कविता छपाईपूर्वी तपासताना आणि दुरुस्त करताना त्यांची कवितेबद्दलची समजही वाढत गेली. पण या साऱ्यांत त्यांची स्वतःची कविता लुप्त झाल्यासारखीच झाली होती. पुढे दैनिकांनी साप्ताहिक पुरवण्या सुरू केल्या, त्यामुळे साप्ताहिकांचे खप खूप कमी झाले आणि ‘नवयुग’ बंद करावं लागलं.

पण १९५६ मध्ये अत्रे यांनी ‘संयुक्त महाराष्ट्रा’च्या चळवळीच्या प्रचारासाठी दैनिक ‘मराठा’ सुरू केले व त्यात शिरीषताई ललित लेख लिहू लागल्या. अत्र्यांनी रविवारच्या पुरवणीची जबाबदारी विजय तेंडुलकर आणि शिरीषताईंवर सोपवली होती. अर्थातच तेंडुलकरांचाही शिरीषताईंच्या वाङ्मयीन दृष्टिकोनावर परिणाम होत होता. शिरीषताईंनी या काळात ‘मराठा’चे वाङ्मयीन अग्रलेखही लिहिले आहेत. एकूण या काळात त्यांचा हात वेगवेगळ्या प्रकारे सतत लिहिता राहिला. ‘मराठा’साठी आणि त्याआधी ‘नवयुग’साठी लिहिलेल्या लेखांमधूनच त्यांचे काही उत्तम ललितलेख-संग्रह तयार झाले. त्यांच्या अशा वर्तमानपत्रांसाठी लिहिलेल्या लेखांमधूनही त्यांच्या संवेदनशीलतेचे, निसर्गप्रेमाचे दर्शन होत होतं.

मात्र लुप्त झाल्यासारखी वाटलेली शिरीषताईंची कविता त्यांच्या मुलांच्या बालपणातल्या क्रीडा पाहताना पुन्हा जागी झाली. त्या सुमारास त्यांनी मराठी विषय घेऊन एम. ए.चा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांच्या काव्यजाणिवेच्या दृष्टीने फार महत्त्वाचा ठरला. अभ्यासासाठी बा. सी. मर्ढेकर आणि विंदा करंदीकर यांची कविता होती. शिकवायला होते, ज्या कवीची कविता शिकवायची त्या कवीच्या काव्यप्रकृतीशी पूर्ण समरस होणारे कवी वसंत बापट. अत्र्यांमुळे नवकाव्याबद्दल शिरीषताईंच्या मनात आधी असलेली अढी नाहीशी झाली आणि बापटांच्या अध्यापनातून शिरीषताईंना मर्ढेकर समजू शकले. करंदीकरांच्या ‘मृदगंध’मुळे काव्यानुभव मुक्तपणे कसा व्यक्त व्हायला हवा याचं शिरीषताईंना भान आलं. म्हणूनच शिरीषताई ‘बापट आणि करंदीकरांचं माझ्या कवितेवरचं ऋण फार मोठं आहे’, अशी कबुली देतात. एवढेच नाही तर त्या असंही म्हणतात की, “मला बापटांनी मर्ढेकरांची आणि करंदीकरांची कविता शिकवली नसती तर... मी कवितेच्या क्षेत्रात जी थोडीफार वाटचाल केली ती कदाचित केलीही नसती.”

पत्रकारितेमधला काळ त्यांना पुरेपूर कार्यमग्न ठेवणारा होता आणि सुरुवातीला काही बाबतीत विफलता निर्माण करणारा होता. मुलांच्या जन्मानंतर त्यांची निराशा नाहीशी झाली आणि त्यांनी एकामागून एक अशा वात्सल्यभावाच्या कविता लिहिल्या, मालवणच्या साहित्यसंमेलनात सादर केलेली ‘बाळ जन्मले तेव्हा मी फिरून जन्मले’ ही कविता तर खूपच गाजली. मधुकर केचे यांना तर ती इतकी आवडली की आपला ‘पुनवेचा थेंब’ हा संग्रह त्यांनी या कवितेलाच अर्पण केला! शिरीषताईंचं कवितालेखन पुन्हा सुरू झालं!

विंदांच्या ‘मृदगंध’ने शिरीषताईंना नवी दिशा दिली आणि शिरीषताईंनी आपल्या ‘एका पावसाळ्यात’ या मालिका कविता लिहिल्या. शिरीषताई आता सातत्याने कविता लिहीत होत्या. त्यांचा ‘कस्तुरी’ हा पहिला कवितासंग्रह १९५८ मध्ये प्रसिद्ध झाला. मग (मधुकर केचेंच्या प्रभावामुळे) ‘एकतारी’मध्ये त्यांची अभंगरचना आली. याशिवाय ‘वियाग’, ‘चंद्र मावळताना’, ‘ऋतुचित्र’ हे कवितासंग्रह आले. या काळातल्या त्यांच्या कवितांमध्ये त्यांच्या मनातल्या निसर्गप्रेमाने चिंब झालेले प्रेमानुभव उत्कटपणे व्यक्त झालेले दिसतात. बाह्य जगातल्या कटू अनुभवांची कुठलीही छाया या कवितांवर दिसत नाही. ‘एका पावसाळ्यात’मधली ‘आपले पाय’ ही एक कविता इथे देण्याचा मोह होतो.

आपले पाय चालत असतात एका अज्ञात संकटाची वाट

लाटेमागून फुटत जाते आंधळी होऊन एक एक लाट

पुन्हा पुन्हा उजळून मिसळतो प्रकाश काळोखात

विझून विझून परत जळतात आपलेच हे मातीचे हात

ठाऊक असते सारे काही... सारे काही दिसत असते

वाहत्यासाठी जन्मलेली एक जखम इमानाने वाहत असते

अशीही एक लढाई असते जिचा शेवट असतो पराभव

वाया जाण्यासाठीच घ्यायचे असतात असे काही अनुभव

३.

मराठी वाचकांना हायकू या तीन ओळींच्या जपानी काव्यप्रकाराचा परिचय व्हावा या हेतूने शिरीषताईंनी ‘सत्यकथे’च्या डिसेंबर १९८०च्या अंकात, ‘हायकू : एक वृत्ती एक साधना’ हा लेख प्रसिद्ध केला. या लेखासाठी त्यांनी केनेथ यासूदा यांच्या ‘द जॅपनीज हायकू’ या पुस्तकातील लेखांचा आधार घेतला होता. जपानी कवी पाचशे वर्षांपेक्षा अधिक काळापासून हायकू रचित आलेले आहेत व आपल्या अनुभूतींचा उच्चार करत्यासाठी हे माध्यम अत्यंत अनुकूल असल्याचे त्यांच्या अनुभवाला आलं आहे. याच लेखात हायकू वृत्ती, हायकूचा आशय आणि रचना यातील एकात्मता, हायकूचा रूपबंध, हायकूची भाषा अशा अनेक मुद्यांचा परामर्श घेतला होता. या लेखाबरोबरच त्यांनी इंग्रजी अनुवादावरून मराठीत केलेले अनुवादही दिले होते. ‘हायकू’बद्दल आस्था असलेल्या आणखी काही लेखकांनी व कवींनी या लेखांतील काही मुद्यांवर मतमतांतरे व्यक्त केली असली तरी या लेखामुळे बऱ्याच वाचकांचं लक्ष ‘हायकू’कडे वेधलं गेलं. जपानी भाषेतील हायकूंच्या त्यांनी केलेल्या मराठी रूपांतराबद्दल विशेष ऊहापोह झाला.

हायकू हा जरी बराचसा उत्स्फूर्त आविष्कार असला तरीही जपानी हायकूंच्या रचनेचे विशिष्ट तंत्र आहे. त्यांचे रूपबंध निश्‍चित झालेले आहेत. त्यात शब्दमर्यादाही आहे व अशा तंत्रशुद्ध हायकूलाच शुद्ध हायकू मानलं जातं. पण जपानी वा इंग्रजी भाषेपेक्षा मराठी भाषेची मोडणी खूपच वेगळी, काहीशी पसरट असल्यामुळे जपानी हायकूची सर्व वैशिष्ट्यं मराठी हायकूत उतरणं अशक्य आहे याचीही जाणीव झाली. जपानीमधील हायकूंच्या इतिहासातही अनेक प्रयोग होत होतच शुद्ध हायकूचा रूपाशय आकाराला आला होता. तसे प्रयोग मराठी हायकूरचनेतही होत राहणारच हेही लक्षात आलं.

शिरीषताईंच्या ‘सत्यकथे’तील लेखाच्या थोडासा आधी; म्हणजे नोव्हेंबर १९७८ मध्ये अंजली कीर्तने आणि रमेश पानसे यांनी संपादन केलेल्या ‘ऋचा’ या नियतकालिकाचा ‘हायकू विशेषांक’ प्रसिद्ध झाला होता. या अंकाबद्दल थोडं सविस्तर सांगणं आवश्यक आहे या अंकाच्या निर्मितीमागे प्रेरणा आणि मार्गदर्शनही शिरीषताईंचं होतं. अंजलीने तिच्या संपादकीयात या अंकाचं स्वरूप परिचयात्मक आहे हे स्पष्ट केलं होतं. जपानमधील हायकूंच्या परंपरेचा, त्यामागील झेन तत्त्वज्ञानाचा परिचय मराठी वाचकांना व्हावा हा हेतू होता. त्यात सुरुवातीला ‘हायकू : प्रकृती आणि परंपरा’ हा अभ्यासपूर्ण आणि ‘हायकू’ या काव्यप्रकाराचं मर्म जाणवून देणारा लेख शिरीषताईंनी लिहिला होता. हायकूची रचना, त्यातून जाणवणारं ऋतुभान, निसर्गाचं रमणीय तसंच रौद्र रूप हे सर्व साक्षीभावाने पाहताना मनात जागृत होणारी स्पंदनं, झेन तत्त्वज्ञानाचा जपानी हायकूकारांवरचा प्रभाव व त्यातून होत गेलेला ‘हायकू’ या प्रकाराचा विकास अशा हायकूविषयक अनेक गोष्टी शिरीषताई सांगत जातात. काही महत्त्वाच्या जपानी हायकूकारांचा परिचयही त्या करून देतात आणि हेही सांगतात की ‘हायकू’ जपानच्या सीमा ओलांडून अनेक पाश्चात्य देशांतही पोचला आहे.

या अंकात बा. भ. बोरकरांचा ‘जपानची सांस्कृतिक चित्रलिपी’ हा लेख आहे. शांता शेळके यांची हायकूसंदर्भात पद्मिनी बिनीवाले यांनी घेतलेली एक मुलाखत आहे. इथं मला शांताबाईंनी आळंदीला झालेल्या साहित्यसंमेलनात हायकूंबाबत व्यक्त केलेला धोकाही आठवतो. त्या म्हणाल्या होत्या, “लेखकांचा- विशेषतः कवींचा एक वर्ग कृतक नावीन्यासाठी हपापलेला असतो. ‘सुनीत’ हा रचनाबंध आला तेव्हा रसहीन व कृत्रिम सुनीतांचा सुळसुळाट झाला. मुक्तछंद आला तेव्हा केवळ मुक्त छंद किंवा मुक्त रचना म्हणजेच नावीन्य असं अनेक कवी समजू लागले आणि छंद, जाती, वृत्त यांचा विटाळ मानू लागले. सुरेश भट उत्तम गझल लिहितात हे पाहिल्यावर ‘गझलके सिवा बात नहीं’ अशी हवा पसरली. शिरीष पै, सुरेश मथुरे या कवींनी हायकूचे रचनातंत्र, आशय नीट समजून घेऊन हायकू लिहिले. पण बऱ्याच सामान्य कवींनी ‘हायकू’ हे सध्या चलनी नाणे आहे म्हणून हायकू लिहिण्याचा सपाटा लावला आहे. अशा हायकूंपासून व हायकूकारांपासून सावध राहिले पाहिजे.”

‘ऋचा’च्या अंकात शिरीषताई, सदानंद रेगे, पु. शि. रेगे यांचे उत्कृष्ट हायकू आहेत. इंग्रजीतून आलेल्या हायकूंचे उत्तम अनुवाद आहेत व अन्य काही कवींच्या हायकूसदृश कवितांची दखल घेतली आहे.

पुढे ‘लोकप्रभा’ साप्ताहिकाच्या हायकू विशेषांकातूनही हायकू घरोघरी पोहोचला. शिरीषताईंचे हायकू व त्यावर श्याम जोशींनी काढलेल्या रंगचित्यांची प्रदर्शनं झाली. शिरीषताई आपल्या लेखांमधून, पत्रोत्तरांमधून हायकूबद्दलच्या शंकांचं निरसन करीत असत. तरुण कवी-कवयित्री हायकू लिहू लागले. त्यांचे संग्रह प्रकाशित झाले. अशा आठ-दहा संग्रहांना शिरीषताईंनीच चिकित्सक प्रस्तावना लिहिल्या व नव्या हायकूकारांना त्या प्रोत्साहन देत राहिल्या.

शिरीषताईंचं हायकू या मूळ जपानी काव्यप्रकाराकडे लक्ष वेधलं ते विजय तेंडुलकरांनी. १९६३ मध्ये त्यांनी शिरीषताईंच्या हातात इंग्रजीतून अनुवादित झालेले जपानी हायकूंचे सुबक, छोटेखानी हायकू संग्रह ठेवले आणि म्हणाले, “आधी नाही... नंतर नाही... फक्त आत्ताचा क्षण... या क्षणाची कविता म्हणजे हायकू.” तेंडुलकरांचे हे शब्द शिरीषताईंच्या स्मरणात कोरले गेले. त्यांनी ते अनुवाद आस्थेने वाचले. हायकू म्हणजे फक्त तीन ओळींची, काहीतरी हृद्य अनुभव व्यक्त करणारी कविता एवढं तर लक्षात आलंच होतं. तसा प्रयत्न करून पाहूया असंही त्यांच्या मनात आलं. पण हायकू रचना मराठी काव्यपरंपरेपेक्षा फारच वेगळी आहे, हे त्यांच्या त्याच वेळी लक्षात आलं. पण त्याचबरोबर, ही माझ्या स्वतःच्या काव्यवृत्तींशी समांतर अशी एक कविता, असा एक अननुभूत काव्याविष्कार सापडला अशीही महत्त्वपूर्ण जाणीव त्यांना झाली. म्हणूनच ‘हायकू’संबंधातल्या अनेकानेक ग्रंथांचं त्या वाचन करत राहिल्या. या प्रकाराच्या सखोल अभ्यासासाठी त्यांनी प्रयत्न केले. ज्या झेन तत्त्वज्ञानामधून ‘हायकूं’चा उगम झाला ते तत्त्वज्ञान, त्यातून निर्माण झालेल्या परंपरा, अनेक जपानी हायकूकारांची पार्श्वभूमी, त्यांच्या रचना, जपानमधील निसर्ग अशा आवश्यक गोष्टी समरसतेने समजून घेतल्या. अनेक हायकूंचे अनुवादही त्या करीत होत्या. खरं म्हणजे ही शिरीषताईंना प्रिय झालेल्या हायकूच्या लेखनासाठी त्यांनी केलेली मनाची मशागतच म्हणावी लागेल. त्यांच्या ‘चारच ओळी’ किंवा ‘शततारका’ या संग्रहातील कवितांमधून त्यांच्या हायकूंची चाहूल स्पष्ट कळून येते. उदाहरणादाखल खालील ओळी पाहाव्यात.

पानही हलत नाही

संध्याकाळी आज वाऱ्यानं

हिंदकळत नाही मन

तुडुंब भरून प्रेमानं

....

रोज उठतायत तरंग

करू काय?

भरतीवर समुद्राला

उपाय काय?

मध्यंतरीच्या बारा-तेरा वर्षांत त्यांच्या आयुष्यात खूपच घडामोडी झाल्या होत्या. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आचार्य अत्र्यांना अटक झाली तेव्हा ‘मराठा’ या वृत्तपत्राचं संपादकपद त्यांना स्वीकारावं लागलं होतं. वेगवेगळी आव्हानं स्वीकारावी लागली. वडिलांच्या, म्हणजेच आचार्य अत्र्यांच्या निधनानंतरही त्यांना ती जबाबदारी घ्यावी लागली. अनेक अडचणींना तोंड देता देता ‘मराठा’ही बंद करावं लागलं. हा आयुष्यातला फार मोठा पराभव सोसवेना त्यांना. वैयक्तिक जीवनातही तशी स्वस्थता नव्हती. एकूण; त्यांचे दिवस अत्यंत खिन्न मनःस्थितीत चालले होते. त्या काळाबद्दल त्यांनी लिहिलं आहे, “अचानक जीवन थबकले होते. पुढे काय, हे कळत नव्हते, त्या काळात एकटी, अगदी एकटी पडले होते. बराच वेळ एकटीच बसून असायची मी. मन शून्य झाले होते, पूर्ण रिकामे. घरात बसल्या बसल्या खिडकीतून बाहेरचा निसर्ग दिसायचा. झाडाच्या फांद्या, आकाशाचा निळा तुकडा, उन्हाचे कवडसे, पक्ष्यांचे आवाज ऐकू यायचे. विशेषतः कावळ्यांचे.” त्यांच्या रिक्त जगात भोवतालच्या निसर्गाची प्रतिबिंबे पडायची. तरळत राहायची आणि अशाच मनःस्थितीत त्यांना त्यांचा हायकू सुचला,

केव्हापासून करतोय कावकाव

खिडकीवरला कावळा

इतका भरून येतो त्याचाही गळा?

मग पुढे त्यांना हायकू सुचत गेले. काळ कठीण होता पण हायकू अखेर त्यांना भेटला होता! ज्या हायकूचा त्यांनी शेवटपर्रंत अनुनय केला तो त्यांचा जीवनसाथीच झाला. अखेरपर्यंत त्या हायकू लिहीत राहिल्या.

कविवृत्तीच्या शिरीषताईंचं पहिल्यापासून निसर्गावर नितांत प्रेम होतं. झाडे, पाने, फुले, पाणी, पाऊस, वेगवेगळे ऋतू, आकाश, सूर्य, चंद्र तशी सगळीच पाखरं, मुके प्राणी त्यांच्याशी पहिल्यापासूनच बोलत होते. आता त्यांच्या हायकूमधून अनेक मानवी जीवनानुभव व्यक्त होत होते. ‘प्रेम’ हा विषय तर त्यांच्या मनाचा हळवा भाग व्यापून होता. अशा कितीतरी विषयांवरचे हायकू त्यांच्या लेखनातून सहजपणे उतरत गेले. हायकू सुचत नसलेल्या काळात त्यांची विलक्षण तगमग होत असे. ती तगमगही त्यांच्या हायकूतून प्रतिबिंबित होत असे. हायकूंचा त्यांनी असा ध्यास घेतला होता, जसा मीरेने गिरिधर गोपालचा. त्या कावळ्याशी तर त्यांची घट्ट मैत्री जमली.

कुणाची कशाशी

कुणाची कशाशी

माझी मैत्री कावळ्याशी

या कावळ्यावर त्यांनी शंभरएक तरी हायकू केले असतील.

शिरीषताईंच्या हायकूंचे अंतरंग पुढच्या काही वर्षांत खूपच बदलत गेले. पूर्वी त्या निसर्गाशी संबंधित नसलेल्या क्षणचित्रांना, हायकूंना विशुद्ध हायकू न म्हणता हायकूसदृश रचना म्हणत असत. पण ते त्यांचे मत अनुभवांनी बदललं आहे. आता त्यांच्या मते, ‘तीन ओळीत लिहिलेली दुसऱ्या व तिसऱ्या किंवा पहिल्या व तिसऱ्या ओळीत यमक साधणारी, मूळ उद्गाराला अकस्मात कलाटणी देणारी, छंदमुक्त पण तालबद्ध, कोणताही विषय स्वीकारणारी कविता म्हणजे ‘हायकू’. शिरीषताईंचं निसर्गप्रेम, त्यांना वाटणारी प्राणीमात्रांबद्दलची कणव, त्यांची स्वतःची अध्यात्माबद्दलची ओढ, जे. कृष्णमूर्ती, ओशो, श्री अरविंद, श्रीमाताजी अशा प्रज्ञावंतांचा विचारांची गाढ परिचय अशा सर्व गोष्टी त्यांच्या हायकूनिर्मितीसाठी पोषकच होत्या.

काय चमत्कार झाला

हायकू लिहिल्यावर

प्राण शांत झाला

आणखी एका मनोगतात त्यांनी म्हटलं आहे, “भोवतालच्या आणि स्वतःच्या जीवनातील ज्रा जाणिवा, उणिवा, जी दुःखे मला जाणवतात त्यातून माझ्या हल्लीच्या हायकूंची निर्मिती होत असते... ‘हायकू एक भाव आहे, तो माझा स्वभाव आहे.”

‘हे का हायकू?’ या संग्रहाच्या प्रस्तावनेत त्यांनी म्हटलं होतं, “हा माझा बहुधा शेवटचा हायकूसंग्रह ठरावा. आता माझी हायकूनिर्मिती थांबली आहे. वयाला पंच्याऐंशी वर्षे पूर्ण होताना आणखी नवीन काय सुचणार?” हे उद्गार व्याकूळ करणारे आहेत. शिरीषताई असत्या तर या प्रतिभाशाली कवयित्रीचा ‘हायकू, हायकू, हायकू’नंतरचा नव्या अनुभवांना साक्षात करणारा संग्रह नक्कीच प्रकाशित झाला असता. आणि त्या नसल्या तरी या हायकूंची प्रतीती नित्य नवीनतेने येत राहणार आहे आणि त्यांचा तो फुलपाखरावरचा हायकू...

नको रे धरूस चिमटीत

फुलपाखराचं नाजूक अंग

दुखतोय... पंखांवरला रंग

तो आणि आणखी कितीतरी हायकू हायकूरसिकांच्या मनात भिरभरत राहतील.

मराठी भाषेत जपानी हायकू प्रकार रुजवणाऱ्या, बहराला आणणाऱ्या कवयित्री शिरीष पैंचं मराठी साहित्यजगत सदैव ऋणी राहील.

.............................................................................................................................................

‘हायकू हायकू हायकू’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4644/Haiku-Haiku-Haiku

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................