या कहाण्या लैंगिक समानतेवर आधारलेला, हिंसामुक्त समाज घडवण्याची प्रेरणा देतील!
ग्रंथनामा - आगामी
हरीश सदानी
  • ‘जुळो साखळी संवादाची, तुटो बेडी पुरुषपणाची’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 22 October 2018
  • ग्रंथनामा आगामी जुळो साखळी संवादाची तुटो बेडी पुरुषपणाची मावा MAVA

‘मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अॅब्युज’ (मावा) ही संस्था गेली २५ वर्षं महिलांवरील हिंसा आणि लिंगभाव (जेंडर) याविषयी युवक व पुरुषांसोबत जनजागृतीचं काम करत आहे. गेल्या २५ वर्षांत या संस्थेतून अनेक कार्यकर्ते व सक्षम, संवेदनशील विद्यार्थी घडले आहेत. त्यातील २५ जणांच्या मुलाखतींवर आधारलेलं ‘जुळो साखळी संवादाची, तुटो बेडी पुरुषपणाची’ हे पुस्तक उद्या मुंबईतील रुइया महाविद्यालयात समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. या पुस्तकाला ‘मावा’चे सह-संस्थापक हरीश सदानी यांनी लिहिलेलं मनोगत...

......................................................................................................................................................

परिवर्तनासाठी माणसाच्या मूलभूत दृष्टिकोनातच बदल घडवून आणायला हवा, हे बोलणं जितकं सोपं आहे, तितकंच ते कृतीत उतरवणं कठीण आहे! विशेषत: समाजानं तयार केलेल्या, जोपासलेल्या आणि पिढ्यानपिढ्या निरंतर चालत आलेल्या धारणा आणि वागणुकीच्या पद्धतींतच हा बदल घडवून आणायचा असतो, तेव्हा तर ते आव्हान पेलणं अतिशय कठीण बनून जातं. लैंगिक असमानतेच्या बाबतीतला दृष्टिकोन बदलणं असंच एक कठीण आव्हान आहे. कारण हे करताना कुटुंब आणि समाजाच्या चौकटींनी ठरवून दिलेल्या स्त्री-पुरुषांतील परस्पर नात्याकडे नव्या नजरेनं पाहावं लागतं, काय चूक आहे आणि काय बरोबर आहे यांसंबंधी लहानपणापासून मनावर बिंबवलेल्या लिंगसापेक्ष कल्पनांचा पुन्हा नव्यानं विचार करावा लागतो.

हेच आव्हान घेऊन ‘मेन अगेन्स्ट व्हायोलन्स अँड अब्यूज’ (मावा) ही संघटना गेली २५ वर्षं काम करत आहे. स्त्रियांवरील अत्याचाराचा, लैंगिक असमानतेचा प्रश्न सोडवण्यासाठी पुरुष आणि तरुण मुलांमध्ये जाणीवजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न करणारी ही भारतातील पहिलीच सामाजिक संघटना आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून गेली १२ वर्षं ‘मावा’ महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागांत राहणाऱ्या विशीतील तरुण मुलांसोबत काम करत आहे. स्त्रियांवरील अत्याचाराचं प्रमाण कमी व्हावं यासाठी मुळात मुलग्यांच्या, तरुणांच्या दृष्टिकोनात, वागणुकीमध्ये त्यांच्या वृत्ती-प्रवृत्तींमध्ये मूलगामी बदल घडवून आणण्याची गरज लक्षात घेऊनच या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. लिंगसमभावाविषयी या युवकांना अधिक संवेदनशील बनवणं, या बदलाच्या प्रक्रियेत त्यांना सामावून घेणं व त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन त्यांना पुरवणं या मार्गांनी हे काम सुरू आहे.

या उपक्रमामध्ये पारंपरिक पुरुषी मानसिकतेला आव्हान देणाऱ्या, या प्रश्नाचा खोलात जाऊन विचार करण्यास भाग पाडणाऱ्या काही आगळ्यावेगळ्या प्रशिक्षण पद्धती वापरत आम्ही हजारो युवकांना लिंगाधारित हिंसेच्या मुळाशी असलेल्या कारणांविषयी विचारप्रवृत्त केलं आहे. स्वत:च्या वागणुकीत बदल घडवून आणणं हीच या समस्येवर उपाय शोधण्याची पहिली पायरी आहे, हे त्यांच्या लक्षात आणून देण्यास मदत केली आहे. निवासी शिबिरं, खेळ, पथनाट्यं, फिरते चित्रपट महोत्सव, भित्तीपत्रं, सांस्कृतिक प्रकाशनं, हेल्पलाइन व सोशल मीडिया अशा वेगवेगळ्या माध्यमांचा वापर त्यासाठी प्रभावीपणे करण्यात आला आहे.

......................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - 

https://tinyurl.com/y86lc3fq

......................................................................................................................................................

लैंगिक समानतेविषयी युवामनांमध्ये जाणीवजागृती घडवून आणणाऱ्या व त्यासाठी त्यांना मार्गदर्शन देणाऱ्या या उपक्रमाची सुरुवात ऑगस्ट २००६ मध्ये पुण्याच्या ग्रामीण भागातील ३३ मुलांच्या साथीनं झाली. त्यानंतरच्या दहा वर्षांमध्ये हा कार्यक्रम मुंबई, सातारा, कोल्हापूर, बुलडाणा, भंडारा, नागपूर, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांमध्येही विस्तारला. या प्रक्रियेतून ७०० तरुण मुलं तयार झाली. आपल्याला मिळालेला संदेश या मुलांनी ३०,००० समवयीन मुलांपर्यंत पोहोचवला. विविध सामाजिक प्रकल्प, सोशल मीडिया यांच्या माध्यमातून संवादाची ही साखळी आणखीही अनेक मुलांपर्यंत पोहोचली. वयाच्या विशी-तिशीत असलेले हे युवा संवादक आजही विद्यापीठं, महाविद्यालयं, महिला आणि युवा संघटनांच्या साथीनं देशपातळीवर या विचाराचा प्रसार करत आहेत, लैंगिक छळाच्या विरोधात व लैंगिक समानतेच्या बाजूनं जनजागृती घडवून आणत आहेत.

हार्वर्ड युनिव्हर्सिटी साउथ एशिया इन्स्टिट्यूट, टाटा ट्रस्ट आणि डिरेक्ट अॅक्शन फॉर विमेन नाऊ (DAWN) वर्ल्डवाइड, यूएस या संस्थांच्या मदतीनं ‘मावा’नं २००६ पासून चाललेल्या या युवा प्रकल्पाचं दस्तावेजीकरण करण्यात आलं. वरिष्ठ संशोधक रूपश्री सिन्हा यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाची संपूर्ण प्रक्रिया, तिचे परिणाम आणि कार्यक्रमातून समोर आलेली निरीक्षणं या साऱ्याच्या अत्यंत कष्टपूर्वक नोंदी केल्या. रूपश्री यांनी घेतलेल्या २५ निवडक तरुणांच्या मुलाखती पत्रकार चैताली भोगले यांनी मराठीमध्ये भाषांतरित केल्या. या २५ युवकांच्या आयुष्यात घडून आलेल्या स्थित्यंतराच्या कहाण्या DAWN वर्ल्डवाइड यांच्या मोलाच्या पाठिंब्यामुळे आता पुस्तकस्वरूपात प्रकाशित होत आहेत. त्यातून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील हजारो युवक आणि मुलग्यांना प्रेरणा मिळणार आहे, ही गोष्ट मला भारावून टाकणारी आहे.

युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘मावा’नं आखलेला हा प्रकल्प प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थींमध्ये एकास–एक पद्धतीनं होणाऱ्या संवादापुरता मर्यादित नव्हता तर त्यात समवयीन मुलांच्या गटांना एकत्रित प्रशिक्षणही दिलं गेलं. या पुस्तकातील २५ कहाण्यांपैकी काही कहाण्या या मेंटीजच्या आहेत. मेंटीज म्हणजे लैंगिक समानेतच्या दृष्टिकोनाचं प्रशिक्षण घेतलेली आणि याविषयी आपल्याच वयोगटातल्या मुलांशी संवाद साधणारी मुलं अर्थात पीअर कम्युनिकेटर्स. ही मुलं प्रामुख्यानं एखाद्या मावा मेंटरच्या मार्गदर्शनाखाली काम करतात व स्वत:सुद्धा जडणघडणीच्या प्रक्रियेतून जात असतात. अशा काही मेंटर्सच्या मुलाखतींचाही या संग्रहात समावेश आहे. मेंटर्स म्हणजे असे युवक ज्यांनी ‘मावा’च्या अनेक उपक्रमांच्या माध्यमातून (प्रशिक्षण शिबिरं, कार्यशाळा, इंटर्नशिप, स्वयंसेवक म्हणून कामाचा अनुभव, फील्ड प्लेसमेंट) लैंगिक समानतेच्या दृष्टिकोनाबाबत प्रदीर्घ काळासाठी सखोल प्रशिक्षण घेतलं आहे व लिंगसमभावाच्या मुद्द्याविषयी सजगता बाळगणारी संवेदनशील व्यक्ती म्हणून ज्यांचे विचार विकसित झाले आहेत.

या युवकांनी आपले कुटुंबीय, समवयीन व्यक्ती आणि इतरही स्त्री-पुरुषांशी प्रभावीपणे संवाद साधत लैंगिक असमानतेच्या प्रश्नाविषयी त्यांच्या विचारांमध्ये बदल घडवून आणण्याची, बदलाच्या या प्रक्रियेत त्यांना सामावून घेण्याची आपली क्षमता सिद्ध केलेली आहे. या युवकांपैकी कुणी प्रशिक्षक आहे, कुणी हे काम पुढे नेण्यासाठी संपर्काचं जाळं उभारणारं आहे, कुणी मोहिमा राबवणारं आहे, तर कुणी प्रसिद्धीमाध्यमातून आपल्या विचारांचा प्रसार करणारं आहे. याखेरीज वयाच्या तिशीत असलेल्या काही सीनियर मेंटर्सच्या तसंच मेंटर्स – इन द मेकिंग अर्थात मेंटर बनण्याच्या प्रक्रियेत असलेल्या तरुणांच्या कहाण्यांचाही समावेश या संग्रहात करण्यात आला आहे.

बदलांचे दूत बनलेल्या युवकांच्या या कहाण्या आणखीही अनेक युवकांना, मुलांना विचारप्रवण करतील आणि लैंगिक समानतेच्या तत्त्वावर आधारलेला, हिंसामुक्त समाज घडवण्याच्या धडपडीमध्ये आमची साथ देण्याची प्रेरणा देतील अशी आशा करतो.

.............................................................................................................................................

‘जुळो साखळी संवादाची, तुटो बेडी पुरुषपणाची’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

लेखक हरीश सदानी हे मेन अगेन्स्ट व्हायोलन्स अँड अब्यूज (मावा) या स्वयंसेवी संस्थेचे सह-संस्थापक आहेत.

saharsh267@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................