समाज म्हणून आपण भयंकराच्या दारात उभे आहोत! (उत्तरार्ध)
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
नितिन भरत वाघ
  • दिनकर मनवर आणि त्यांचा कवितासंग्रह
  • Fri , 19 October 2018
  • पडघम साहित्यिक दिनकर मनवर Dinkar Manvar पाणी कसं अस्तं दृश्य नसलेल्या दृश्यात

‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या संग्रहात एकूण १२२ कविता आहेत. या १२२ कवितांत फक्त दोनदाच स्त्री अवयवाचा प्रतिमारूपात उल्लेख आला आहे. त्याव्यतिरिक्त एकाही ओळीत एकही शब्दानं स्त्री अवयवाचा संदर्भ नाही. पहिला उल्लेख ‘पाणी कसं अस्तं’ या कवितेत आहे तर दुसरा ‘सूक्त’ या कवितेत असा आहे :

‘हे महाकारुणिक पाण्या

तुझी कृपादृष्टी राहू दे निरंतर आम्हा पामरांवर

तू आईच्या स्तनातून स्त्रव

भागव आमच्या मुलांची भूक,

तू भागव आमच्या शेतांची तृष्णा’

‘पाणी कसं अस्तं’ या कवितेत एका ओळीत स्त्री अवयवाचा प्रतिमा म्हणून वापर केला आहे.

‘पाणी कसं अस्तं आकाशासारखं निळंशार

किंवा अंगठा छाटल्यावर उडालेल्या

रक्ताच्या चिळकांडीसारखं लालसर,

पाणी कसं अस्तं स्वच्छ, पातळ, की निर्मळ?

काळं असावं पाणी कदाचित,

पाथरवटाने फोडलेल्या फाडीसारखं राकट काळं

किंवा आदिवासी पोरीच्या स्तनांसारखं जांभळं

किंवा पाणी हिरवं नसेल कशावरून?

(पाणी कसं अस्तं हे मला अजूनही कळू दिलेलं नाहीये)’

‘दोन ताहितीयन स्त्रिया’, (१८९९), पॉल गोगँ

या कडव्यातल्या प्रत्येक प्रतिमा एका निश्चित संदर्भांसह अवतरतात. एक अध्याहृत प्रश्नचिन्ह असलेलं कडवं आणि पुढे त्याचं उत्तर, या प्रकारे या कवितेची रचना आहे. एका दृश्य प्रतिमेसमोर त्याचंच प्रतिबिंब भासणारी प्रतिमा द्विरुक्तीसारखी समोर येते. आकाशासारखं निळंशार (आकाश) / रक्ताच्या चिळकांडीसारखं लालसर (एकलव्य) / काळं पाथरवटानं फोडलेल्या फाडीसारखं राकट काळं (खडक/दगड) / स्तनांसारखं जांभळं (‘दोन ताहितीयन (आदिवासी) स्त्रिया’). या चारही प्रतिमांच्या संरचनेत कवीच्या मनात प्रत्येकी एक निश्चित प्रतिबिंब असलेली दृश्यमान प्रतिमा आहे, विशेष भौतिक संदर्भ आहे. इतर प्रतिमांचे संदर्भ थेट आहेत तर, ‘आदिवासी पोरीच्या स्तनांसारखं जांभळं’ या ओळीचा संदर्भ पाश्चात्य चित्रकार गोगँचा आहे. याविषयी मी ‘अक्षरनामा’मध्येच एक लेख लिहिला होता, त्यात स्पष्टीकरण दिलं होतं. ते थोडी अधिक भर घालून इथं देत आहे.

प्रशांत महासागरातील ताहिती (Tahiti) या फ्रेंच पॉलिनेशीयन, बेटांवर सुप्रसिद्ध पोस्ट-इंप्रेशनिष्ट चित्रकार पॉल गोगँ (Paul Gauguin; १८४८-१९०३) काही वर्षं जाऊन राहिला होता (१८९१-९३). त्याला मानवी अस्तित्वासंबंधी काही मूलभूत प्रश्नांचा विचार करायचा होता. उदा., ‘आपण कुठून आलो? आपण कोण आहोत? आपण कुठे चाललो?’ हे त्याचं एक विख्यात चित्रं. आधुनिक जगाशी अस्पर्श म्हणून अधिक निसर्गाच्या जवळ असणाऱ्या समाजाची त्यानं निवड केली. तिथं त्यानं ताहितीयन पारंपरिक समूहांच्या (आदिवासी) समाजजीवनाची अनेक चित्रं काढली, जी खूप प्रसिद्ध आहेत. त्या चित्रांचा संदर्भ मनवर यांच्या या ओळीला आहे (विशेषतः ‘दोन ताहितीयन स्त्रिया’ हे पेंटिंग, १८९९). दिनकर मनवर हे केवळ कवीच नाहीत तर नावाजलेले चित्रकारही आहेत, ही माहिती अभ्यासक्रमातील कवीची ओळख या सदरात दिली असेलच. मनवर यांचा चित्रकलेचा अभ्यास आहे, चित्रकलेच्या सगळ्या महत्त्वाच्या चळवळींची, शैलींची त्यांना माहिती आहे. ते संदर्भ त्यांच्या कवितेत येणं अत्यंत साहजिकच आहे. व्यक्तीनं पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या अनेक गोष्टी नेणीवेत संचयीत होत असतात आणि कोणतीही कलाकृती स्वतंत्रपणे अवतरत नाही, तर अनेक इतर कलांचा समुच्चयांच्या संदर्भांसहित ती निर्माण होते.

साधारणपणे ज्यांना कवितानिर्मितीची प्रक्रिया माहीत असते, त्यांना कळते कवितेत संदर्भ कसे अवतरतात. आधी म्हटल्याप्रमाणे अनेक प्रतिमा, संदर्भ विचारात अमूर्त स्वरुपात रुतून बसलेले असतात आणि अचानक कधीतरी ते शब्दरूप किंवा चित्ररूप धारण करतात. कलाकृतीमधील बाह्यकलाकृतीच्या संदर्भांना आंतरसंहितात्मता (Inter-textuality) म्हणतात. साहित्यातील आंतरसंहितात्मता बऱ्याचदा अकॅडेमिक वादाचा मुद्दा असतात, म्हणजे साहित्यात आंतरसंहितात्मता असावी की नसावी. कारण आंतरसंहितेतले सगळेच संदर्भ वाचकास ज्ञात असतीलच असं नाही. आंतरसंहितात्मतेमुळे साहित्यकृतीचे आकलन, विश्लेषण संदर्भ न समजल्यानं बऱ्याचदा दुर्बोध आणि कठीण बनतं. कवितेच्याबाबतीत तर शब्दरूपात कोणत्या संदर्भात काय अवतरेल हे कोणीच सांगू शकत नाही. कारण कवितानिर्मितीच्या Tour de force मध्ये जे काही अवतरतं, त्यावर कवीचा कोणताही बांध रहात नाही, तो फक्त लिहितो.

‘पोटॅटो इटर्स’ (१८८५), व्हिन्सेंट व्हान गॉग

आता मनवर यांच्या कवितेमध्ये चित्रकाराचे किंवा चित्रांचे संदर्भ कसे येतात त्याचं (आंतरसंहितात्मतेचं) अजून एक उदाहरण पाहता येईल. ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या संग्रहात ‘सांगण्यासारखं काय आहे आपल्याजवळ’ ही कविता आहे त्यातील ओळी :

‘समजा आपण पाहतो एखाद्या चित्रात जे

तर त्यात ते असतंच असंही नाही होत

म्हणजे एखादं चित्र हे निव्वळ

बटाटे खाणाऱ्यांचं चित्र नसतंच मुळात

नि त्या चित्रात नसते दाखविलेली भूक

ती तर कायम असतेच समस्त पोटॅटो इटर्सच्या डोळ्यात’

या कडव्याला व्हिन्सेंट व्हान गॉग या प्रसिद्ध चित्रकाराच्या चित्राचा ‘पोटॅटो इटर्स’चा (१८८५) संदर्भ आहे. व्हिन्सेंटनं काढलेल्या अत्यंत महत्त्वाच्या चित्रांपैकी हे एक चित्र आहे. तो नेदरलँड्समधील न्युनेन या खाणकामगारांच्या गावात ख्रिस्ती धर्म प्रवचक म्हणून गेला होता, त्या काळात आपल्या चित्रांचा विषय म्हणून तेथील कामगारांचं जीवन निवडलं होतं. तेथील कामगारांच्या जगण्याविषयी त्यानं आपल्या पत्रांतदेखील दु:खमय वर्णन केलं आहे. या चित्रातील बटाटे महत्त्वाचे आहेत, कारण ते पूर्वापार गरिबांचं अन्न आहे, त्या काळात (कदाचित आजही) कामगार वर्गाला फक्त उकडलेले बटाटेच खाणं फक्त शक्य व्हायचं आणि तेही पोटभर नाही. त्यामुळे चित्रात जरी भूकेचं चित्रण नसलं तरी भूक ही कायमच आहे ती बटाटे खाणाऱ्यांच्या डोळ्यात. मनवर यांच्या कवितेतील या ओळींचा अर्थ कळण्यासाठी मी मुद्दाम व्हिन्सेंट व्हान गॉगनं या चित्राविषयी आपल्या भावाला पत्रात काय म्हटलं होतं ते देतो, ते खूप महत्त्वाचं आहे.

…I have tried to emphasize that those people, eating their potatoes in the lamplight, have dug the earth with those very hands they put in the dish, and so it speaks of manual labour, and how they have honestly earned their food.

I have wanted to give the impression of a way of life quite different from that of us civilized people. Therefore I am not at all anxious for everyone to like it or to admire it at once.

All winter long I have had the threads of this tissue in my hands, and have searched for the ultimate pattern; and though it has become a tissue of rough, coarse aspect, nevertheless the threads have been chosen carefully and according to certain rules. And it might prove to be real peasant picture. I know it is. But he who prefers to see the peasants in their Sunday-best may do as he likes. I personally am convinced I get better results by painting them in their roughness than by giving them a conventional charm….

दिनकर मनवर यांच्या कवितेतील या ओळी समजून घेण्यासाठी व्हिन्सेंट व्हान गॉगच्या या चित्राचा संदर्भ माहीत असणं आवश्यक आहे. हे झालं आंतरसंहितात्मतेसबंधात दुसरं उदाहरण. ‘पोटॅटो इटर्स’संबंधी एक महत्त्वाची गोष्ट इथं मुद्दाम सांगणं आवश्यक वाटतं. २०१५ साली व्हिन्सेंट व्हान गॉगच्या पुण्यतिथीला १२५ वर्षं पूर्ण झाली होती, त्याला आदरांजली म्हणून भारतातले एक महत्त्वाचे चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी ‘पोटॅटो इटर्स २०१४’ हे चित्रं काढलं होतं. आज इतक्या वर्षांनंतर जागतिकीकरणाच्या काळात कामगार वर्गाची स्थिती कशी आहे, त्यांच्यात काय बदल घडला आहे ते दाखवलं आहे. एक चित्र शंभर वर्षाचा बदल, पट किती ताकदीनं दाखवू शकतं ते या चित्रात कळतं. अर्थात या महत्त्वाच्या चित्राची दखल ना समीक्षकांनी घेतली ना माध्यमांनी.

‘पोटॅटो इटर्स २०१४’ चंद्रमोहन कुलकर्णी

‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या संग्रहात दिनकर मनवर यांचा स्त्रियांविषयक दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या दोन महत्त्वाच्या कविता आहेत. ‘बाया पाणी झाल्या आहेत काळंशार’ आणि ‘पेशी’. घरात एखादी व्यक्ती मेल्यानंतर ज्या धीरोदात्तपणे स्त्रिया त्या दु:खाला सामोऱ्या जातात त्याचं वर्णन आहे. व्यक्तीच्या दु:खाचं वास्तव स्वीकारत रोजच्या जगण्यातली रीत वस्तुस्थितीचं भान स्त्रियांना सुटत नाही, जबाबदारीची जाणीव आड होत नाही. स्त्रिया मानसिकदृष्ट्या किती कणखर असतात याचं वर्णन छोट्या छोट्या कृतीतून मनवर यांनी केलं आहे,

‘एकमेकींच्या आधारानं उठून उभ्या राहतात

डोळ्यांना पाणी लावून जड अंत:करणानं

दिवा लावतात चूल पेटवून सगळ्यांना खाऊपिऊ घालतात

नी सगळे झोपी गेल्यावर पुन्हा घोळका करून

आख्खी रात्र भिजक्या डोळ्यांनी पिंजून काढतात

 

कुणी समजवायच्या आधीच समजतात

सकाळीच उठतात सडा सारवण करतात

डोईवर पदर घेऊन परसातल्या वेलींना

पाणी हातात घालून हात जोडतात झालं गेलं विसरून

नी पुन्हा रांधण्यासाठी आपसूक तयार होतात’

या स्त्रियांच्या अलौकिक क्षमतेचं निरीक्षण करता करता कवीला जो प्रश्न पडतो, ती कवीनं बायकांना दिलेली मानवंदनाच आहे. स्त्रियांमध्ये असं काय असतं जे पुरुषांमध्ये नसतं?

बायांनो अशा कोणत्या पेशी

विभागून गेल्या असतील तुमच्या शरीरात

आमच्यातून विलग होताना

ज्या तुम्हाला कायम बळ देत राहतात

हा दु:खाचा चिरंतन पहाड पार करण्यासाठी?

कोणत्याही प्रकारे आवेशी उदात्तीकरण न करता आगदी साध्या विषयाचा वापर करून, ताकदीनं स्त्री-शक्तीचं खरं तर सामर्थ्याचं वर्णन केलंय. स्त्री निसर्गत:च श्रेष्ठ असते याची स्पष्ट जाणीव कवीला आहे, शारीरिकदृष्ट्या पुरुष थोडासा बलवान असेलही, मात्र मानसिकदृष्ट्या तो नक्कीच कमकुवत असतो, असं कवीला वाटतं कारण स्त्रियांमध्ये ‘दु:खाचा चिरंतन पहाड पार करण्याची क्षमता आहे.’ दु:ख सहन करण्यापेक्षा मोठी क्षमता व ताकद कोणतीच नसते. वर्तमान परिस्थितीचा विचार केला आणि आत्महत्या हा विषय अभ्यासला तर समजते मनवर नेमक्या कोणत्या ताकदीविषयी बोलताहेत. कितीही संकट आली तरी बायका आत्महत्या करत नाही, तुलनेत पुरुष बघितलं तर त्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण कितीतरी अधिक आहे. हेच ते स्त्रियांचं जगणं आणि त्यातील संघर्ष पेलण्याचं सामर्थ्य आहे. पुरुषाचं खुजंपण मनोमन मान्य करणाऱ्या कवीचा स्त्रियांप्रती असणारा भाव किती नितळ आणि ‘जोहार’ करणारा आहे हे दिसून येतं.

‘अजूनही बरंच काही बाकी’ हा दिनकर मनवर यांचा दुसरा संग्रह, यात एकूण ९१ कविता आहेत, या संपूर्ण कवितांत स्त्री देहाचं एकही वर्णन नाही किंवा स्त्रीच्या बाह्यरूपाचा वापर प्रतिमा म्हणून केलेला नाही तर केवळ एका कवितेत गर्भाचा आणि नाभीचा उल्लेख आलेला आहे. या संग्रहात आधीच्या संग्रहाप्रमाणेच स्त्रियांविषयक म्हणता येतील अशा मोजक्याच पाच कविता आहेत. ‘मरणाच्या दारात उभा असूनही’ या कवितेतील,  

तुझ्यात आईकडून आलेल्या पेशी करुणेच्या

ज्या शाबूत आहेत थोड्याफार आजही ...

या ओळी कवीची मातृप्रधान मनोभूमिका स्पष्ट करतात. आईच्या आजारपणाचं दु:ख, त्या आजारपणात तिची झालेली होरपळ आणि नंतर तीचं मरण यावर एक कविता आहे. दुसऱ्या एका कवितेत गावातून शहरात आलेल्या स्त्रीची तगमग, तिची नव्या जगात, नव्या माहोलात सामावून जाताना होणारी फरफट, मोठ्या शहरात तिचा संकुचित झालेला अवकाश मांडला आहे,

या फ्लॅटच्या अवकाशात तिला

बागडता येत नाही

फुलपाखरासारखं मनसोक्त

की पिंगा घालत नाही

वाऱ्याची झुळूक

तिच्या केसातूनही

‘बाईच्या काळजात माझा जीव’ या कवितेत दु:खाच्या शापातून मुक्त होण्यासाठी कवी तिची करुणा भाकतोय. ‘स्त्री’च्या अस्तित्त्वाशिवाय आपले अस्तित्त्व अपूर्ण आहे आणि आपल्या दु:खाला स्त्रीच्या मायेशिवाय, करुणेशिवाय दूर करता येणार नाही, याची कल्पना कवीला आहे.

त्या बाईच्या काळजात माझा जीव

पडलाय अडकून

नि त्यात माझी अपूर्ण कविता

पण तिला याची काहीही कल्पना नाहीये

एक बाई नकळत येते

तिचे दु:ख माझ्या गळ्यात पडलंय अडकून

ती मला अलगद कुशीत घेते

नि दुसऱ्या एकाकी बाईच्या काळजात

ढकलून जाते काळोखात निघून

मी वाट पाहत राहतो,

पुन्हा एकाकी बाईची

जिच्या नाभीतून दरवळतोय सुगंध

चिरंतन करुणेचा,

जो हुंगून मी होईल मोकळा

या दु:खाच्या शापातून  

बाईपणाचं दु:ख ही सर्वकाळ व्यापून उरणारी गोष्ट आहे. जे फक्त बाईलाच समजतं. कितीही कल्पना केली तरी पुरुषाच्या वाट्याला बाईपण आणि मायपण येऊ शकत नाही. जर हे मायपण आणि बाईपण कवीला मिळालं असतं तर त्याला कविता लिहायची गरजच भासली नसती. कवीने दिलेल्या ओळीतून हा आशय इतका थेट व्यक्त होतो की त्यावर स्वतंत्र भाष्य करण्याची गरजच नाही.

बायांनो

माझ्याकडे तुमच्यासारखं

काळीज नाहीये महाकारुणिक

की दु:खाच्या पेशीही

सतत स्त्रवणाऱ्या

मला जन्म हवा होता

बाईच्या जातीचा

नि जात्याची घरघर सतत घरभर

म्हणजे दु:ख काय असते

बाईजातीचे

हे कळले असते

मग कदाचित मी

नसत्या लिहिल्या ह्या कविता

कोरड्या अश्रुंच्या

कापलेल्या झाडांच्या

काळजावर’

‘खरं तर त्या स्त्रीला मी’ या शीर्षकाची एक स्त्रीवरची कविता काहीशी गूढतेकडे वळणारी आहे. एक प्रकारचा जादुई वास्तववाद या कवितेत आहे, जॉन डन नावाचा एक मेटाफिजिकल म्हणून ओळखला जाणाऱ्या कवीच्या जातकुळीची ही कविता आहे. असं असलं तरी अंतिमत: ही कविता करुणेच्या वाटेवरच जाते. मी दिनकर मनवर यांची कविता महाकरुणेचं ‘पसायदान’ मागणारी कविता आहे असं म्हणतो, ती का त्याचं उदाहरण म्हणून ही कविता पाहता येईल. ती कविता मुद्दाम इथं देतो.  

खरं तर त्या स्त्रीला मी ओळखत नव्हतो

ज्या वेळी तिने माझ्यापुढे अगतिकपणे

मदतीसाठी आपले दोन्ही हात पसरले होते

माझ्या काळजात थोडी करुणा

बाकी होती त्या करुणेनेही तिला

थोडेदेखील ओळखले नव्हते

नकळतपणे दिवसभर मी तिचे

दोन्ही हात घेऊन भटकत राहिलो

त्या हातात तिची भूक दडून होती

संध्याकाळी परतून जेव्हा मी

त्या जागेवर आलो तेव्हा तिथे

अगतिकपणे ती स्त्री उभी नव्हती

पण जिथे त्या स्त्रीच्याऐवजी

अगतिकपणे भूक तिची

माझी वाट पाहत उभी होती

या वेळी मी माझे दोन्ही हात

अगतिकपणे तिच्यापुढे पसरले होते  

माझ्या मते ही मराठीतली अलीकडच्या काळातली सर्वोत्कृष्ट कविता आहे. तिचा नीट अभ्यास झाला पाहिजे. दिनकर मनवर कवितेकडे साध्य म्हणून पाहत नाहीत तर साधन म्हणून पाहतात. एका निरंतन शोधाचं, दु:खमुक्तीचं साधन म्हणून कवितेकडे, भाषेकडे ते पाहतात. त्यांच्या कवितेचा मूळाधार करुणा आहे. त्यामुळे त्यांच्या कवितेतील स्त्रियांप्रतीचा भाव देखील तसाच आहे. एखाद्या कवीचा स्त्रीविषयक दृष्टिकोन हा स्वतंत्रपणे अभ्यासायचा विषय असतो, त्यावर शोधनिबंध, प्रबंध लिहिले जातात, इतका तो महत्त्वाचा असतो. निमित्तेमात्र दिनकर मनवर यांच्या कवितेत अवतरणारी स्त्री या विषयाचा धावता आढावा घेता आला. आदिशक्ती, माया अशा अलौकिक किंवा गूढवादी स्वरूप न देता अगदी हाडामांसाची आपल्या जगण्याचा लढा, सर्व स्तरावर लढणारी स्त्री त्यांच्या कवितेत आढळते, सर्वात महत्त्वाचे कोणत्याही अभिनिवेशाशिवाय, त्याचं कारण त्यांची कविताही अभिनिवेशी नाही. त्यांच्या कवितेत स्त्री आपल्या दु:खाचं भांडवल करत नाही, आक्रस्ताळेपणा करत नाही मात्र असं नाही की मुकाट्यानं सोसून घेतात, त्या सोसण्यामध्ये समजदार सहनशीलता आहे. ती सहनशीलता खूप विचारांती क्षमाशील भावनेनं आलेली आहे. अधिकाधिक कवितांमध्ये ‘पाणी’ संदर्भ म्हणून येत असतं म्हणून फार पेटणं त्यांच्या कवितांत नाही, त्यामुळे त्यांनी चित्रित केलेल्या स्त्रियांमध्येही नाही. मुख्यत: दिनकर मनवरांची कविता आत्मशोधाच्या वाटेवर निघालेली कविता आहे, त्या वाटेवर स्त्रियांचा वावर तसा कमीच आहे, तेव्हा अरुण कोलटकर, नामदेव ढसाळ, ग्रेस किंवा दिलिप पु. चित्रे या साठोत्तरी किंवा त्याआधीचे पु. शि रेगे, आरती प्रभू यांच्या कवितेत जशी स्त्री पूर्ण रूपानं अवतरते तशी दिनकर मनवर यांच्या कवितेत येत नाही. त्यांच्या कवितेची जातकुळी बुद्ध विचाराच्या अध्यात्माची (ध्यान समाधीमार्ग या अर्थाने) आहे. तिचा मूळ पिंड दु:खाचा शोध घेणे, मानवमुक्तीचा मार्ग शोधणे हा आहे, यात स्त्रियाही आल्याच.

हा लेख ज्या कारणासाठी लिहायला घेतला त्यासंदर्भात, या लेखाचा शेवट करताना मला मनवरांच्या ‘मरण्यापूर्वी मी माझ्याच कविता’ या कवितेतील दोन ओळी वापरायच्या आहेत.

केवळ मीच तेवढा आरोपीच्या पिंजऱ्यात

उभा राहून मृत्यूची वाट पाहत

मरणापूर्वी माझ्याच कविता वाचत असेल

डोळ्यावर पट्टी बांधलेल्या

न्यायदेवतेसमोर.

आमेन.

संदर्भ -१) शिल्पायन, रॉय किणीकर, २) Vincent by himself, Bruce Bernard, ३) Gauguin by himself, Belinda Thompson, ४) दृश्य नसलेल्या दृश्यात, दिनकर मनवर, २०१४, ५) अजूनही बरंच काही बाकी, दिदनकर मनवर, २०१६

.............................................................................................................................................

लेखक नितिन भरत वाघ कादंबरीकार व समीक्षक आहेत.

nitinbharatwagh@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................