जोशी योद्धा होते. योगी होते. व्यासंगी होते. विद्वान होते. धोरणी होते. हळवे होते. पण त्यांचा सगळा अट्टाहास हा स्वातंत्र्यासाठी होता.
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
निखिल कुलकर्णी
  • शरद जोशी आणि त्यांच्या दोन चरित्रांची मुखपृष्ठं
  • Fri , 19 October 2018
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो शरद जोशी Sharad Joshi शेतकरी संघटना Shetkari Sanghatana अंगारवाटा…शोध शरद जोशींचा Angarwata भानू काळे Bhanu Kale शरद जोशी...शोध अस्वस्थ कल्लोळाचा SHARAD JOSHI... Shodh Aswasth Kallolacha वसुंधरा काशीकर-भागवत Vasundhara Kashikar-Bhagvat

‘योद्धा शेतकरी’ असं ज्यांचं सार्थ वर्णन केलं गेलं ते शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांचं तीन वर्षांपूर्वी १२ डिसेंबर २०१५ रोजी वयाच्या ८०व्या वर्षी निधन झालं. त्यानंतरच्या काळात त्यांची दोन चरित्रं प्रकाशित झाली. तिसरं चरित्रपर पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे. त्यानिमित्तानं अमेरिकास्थित उच्च पदस्थ महाराष्ट्रीय व्यक्तीनं शरद जोशींविषयी व्यक्त केलेल्या भावना...

.............................................................................................................................................

शरद जोशी हे भारतीय राजकारण आणि समाजकारणातलं एक अतिशय ठाशीव आणि उमदं व्यक्तिमत्त्व आहे. आणीबाणीनंतरच्या भारतीय राजकारणाचा आणि समाजकारणाचा इतिहास जोशींच्या योगदानाशिवाय अगदीच एकांगी आणि अपूर्ण ठरेल असं माझं अगदी स्पष्ट मत आहे. 

पण अशा सगळ्या भेदाच्या राजनीतीच्या काळात, खरं तर भारतामध्ये सर्वांत जास्त लोकसंख्या असलेल्या अशा अल्पभूधारक शेतकऱ्याच्या पदरात काय पडतंय? त्याचं पोर रात्री उपाशी का झोपतंय? याचा विचार करण्याचं भान बहुतेक राजकीय पक्षांनी हरवलेलं दिसतं. नेमक्या याच काळात जोशींनी देशाच्या या दुर्लक्षित आणि पिचलेल्या वर्गाला संघटित करून, त्याला त्याच्या न्याय्य हक्कांसाठी एक शक्ती म्हणून उभं करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, तो केवळ अजोड आहे. हा वर्ग बऱ्याच दृष्टीनं निरक्षर आहे. त्याला नव्या जगाचं अर्थशास्त्र कळत नाही. त्याला डंकेल प्रस्ताव काय ते माहीत नाही. मूल्याधारित किंमत कशी काढतात, याची त्याला कल्पना नाही. हमीभाव म्हणजे काय हे त्याला ठाऊक नाही. त्याच्या जवळ आहे ते फक्त वडिलोपार्जित आणि परंपरागत साधनं वापरून शेती करण्याचं कसब. त्याचा विश्वास आहे त्याच्या काळ्या आईवर आणि तो वाट पाहतो आभाळातल्या देवाच्या कृपेची. आणि मग ही कृपा झाली नाही एखाद्या वर्षी तर त्याच्या मायेचं श्राद्धही खोळंबतं आणि मुलीचं लग्नही!! गावातल्या गावकीची आणि सावकारीची भुतावळ त्याला खुणावत राहते आणि मग त्याच्या गळ्याभोवतीचा फास आवळतच जातो.  

अशा भाबड्या बळीराजाला, या दुष्ट चक्रातून सोडवायचं असेल, त्याला बदलेल्या जगात, जगण्यासाठी सक्षम करायचं असेल, तर नव्या जगाचं ज्ञान, त्याला समजेल अशा भाषेत सोपं करून सांगावं लागेल, हा एकमेव विचार घेऊन जोशींनी त्यांचं आयुष्य उधळून दिलं.

स्वित्झर्लंडमधल्या, सर्व ऐहिक सुखसोयींनी युक्त असलेल्या महालात बसून, कुठेतरी वर्ध्याच्या नाहीतर यवतमाळच्या रखरखीत उन्हात, पाण्याविना फाटून गेलेल्या जमिनीवर, बाभळीच्या झाडाखाली, गेल्या वर्षी आत्महत्या केलेल्या लेकराचं पोर मांडीवर घेऊन बसलेल्या त्या माऊलीचं करपून काळवंडून गेलेलं काळीज त्यांना का आठवलं असेल? त्यासाठी आभाळाएवढं अंतःकरण असावं लागतं. ज्या मातीतून आपण आलो, त्या मातीशी असलेली नाळ जिवंत असावी लागते. माय देशात घडणाऱ्या प्रत्येक उभ्या-आडव्या घटनेनं आतड्याला पीळ पडावा लागतो. काळजाला घरं पडावी लागतात. अस्वस्थ होऊन करुणेचे डोह काठोकाठ भरून यावे लागतात. हे काही सामान्य माणसाचं काम नाही. 

आणि एखादी बातमी ऐकून, एकवेळ एखाद्याला असा पीळ पडेलदेखील. पण हातातली सगळी सुखं सोडून त्या बाभळी खाली बसलेल्या माउलीला सावली देण्यासाठी, त्या वर्ध्याच्या नाहीतर यवतमाळच्या उन्हात कायमचं येऊन राहायला त्या माऊलीच्या काळजाशी एक होता यायला लागतं. त्या योगे जोशींनादेखील ज्ञानोबांसारखं ‘माऊली’च म्हणावं लागेल असं मला वाटत आलेलं आहे. आणि हा भाबडा शेतकरीदेखील जेवढ्या आत्मीयतेनं ज्ञानोबांच्या संगतीनं पांडुरंगाच्या दर्शनाला वर्षानुवर्षं जात आलेला आहे, तेवढ्याच आत्मीयतेनं त्यानं या माउलीलादेखील संगत केलेली आहे. 

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी कीलक करा -

https://tinyurl.com/y86lc3fq

.............................................................................................................................................

मग त्या लक्ष लक्ष सभा असोत किंवा लक्ष्मीमुक्ती सोहळा असो. काही जण याला महाअधिवेशन म्हणतात, काही जण महासंग्राम म्हणतात. पण लंकेच्या पार्वतीला तिचा नवलाख गौरी हार परत करण्याचा तो प्रसंग म्हणजे मला तरी सोहळाच वाटत आलेला आहे. घरच्या लक्ष्मीला शिक्षित करून, तिला व्यवहाराची भागीदारी देऊन, एक महत्त्वाचा घटक म्हणून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयोग मला तर शेतकऱ्याच्या स्त्रीला गार्गी आणि वैदेही यांची प्रतिष्ठा परत मिळवून देण्यासारखाच वाटतो.

एखाद्या समस्येच्या मुळाशी जाऊन, त्याची वैचारिक मीमांसा करून, त्याच्या निराकरणासाठी अनेकविध विकल्प तयार करून त्यातून जो समाजाला झेपेल, रुचेल आणि पटेल असा विकल्प अमलात आणायला एक अंगभूत धोरण असावं लागतं. स्वत:चा असा एक निश्चित विचार असावा लागतो. त्या विचारावर निष्ठा असावी लागते. विश्वास असावा लागतो. आपण जे शिकलो त्याचा आपल्या समाजासाठी, देशासाठी कसा उपयोग करता येईल, याचा अखंड शोध घेत राहावं लागतं. एखाद्या वेळी एखाद्याला काही समजलं नाही, तर त्याचं बोट धरून धुळाक्षरं परत परत गिरवावी लागतात. याच्यासाठी योग्याचा संयम लागतो आणि योध्याचं धैर्य लागतं. 

ज्या काळात, जवळ जवळ सर्वच राजकीय पक्ष, समाजाचे जास्तीत जास्त तुकडे कसे करता येतील याच्या मागे लागले होते, त्या काळात जोशी, एका अत्यंत फाटलेल्या, विखुरलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या विपन्न झालेल्या समाजाला एकत्र बांधायचं काम करत होते. त्यांच्यात पिढ्यानपिढ्या साचून राहिलेलं अज्ञान आणि अनास्था दूर करत होते. त्यांचं हे समाजकारण आणि राजकारण इतकं प्रभावी ठरलं की, त्यावेळच्या प्रस्थापित नेत्यांनीदेखील त्याचा धसकाच घेतलेला होता.

हे बऱ्याच अंशी Disruptive Technology सारखं झालं होतं. Disruptive Technology म्हणजे असे काही अफलातून शोध लावले जातात की, ज्यामुळे आताच्या गरजाच कधी कधी नाहीशा होतात. किंवा त्या गरजा पूर्ण करणाऱ्या नव्या वस्तू इतक्या कमी किमतीला उपलब्ध होतात, की त्या गरजा पूर्ण करणाऱ्या, जुन्या तंत्रज्ञानावर आधारित वस्तू, अतिशय महाग वाटू लागतात. मग त्या कुणी घेईनासं होतं. उदाहरण द्यायचं झालं, तर डिजिटल फोटोग्राफीचा शोध लागल्यानंतर फिल्मचा कॅमेरा, त्याचा रोल, तो रोल धुऊन मग त्याचे फोटो प्रिंट करणारी यंत्रणा, यांची मागणी आणि आवश्यकता कित्येक पटींनी कमी झाली. 

दारिद्र्यानं गांजलेला, व्यापाऱ्यांनी नाडलेला आणि राजकारणानं पिचलेला शेतकरी जेव्हा शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली एक होऊ लागला, तेव्हा त्याला जातीचे, धर्माचे आणि भाषेचे भेद दिसायचे बंद होत गेले. मग असल्या भेदांचं संकुचित राजकारण करणाऱ्या अनेक राजकारण्यांची दुकानं बंद व्हायची वेळ आलेली होती. लौकिक अर्थानं कमी शिकलेल्या, आपल्याच पारंपरिक आचरणात गुरफटून गेलेल्याला, एका कोशात जगणाऱ्या शेतकऱ्याला आर्थिक स्वातंत्र्याचे अति क्लिष्ट विचार शिकवण्याचा जो महाकाय पराक्रम जोशींनी करून दाखवला तो एकमेवाद्वितीय होता.     

जोशी योद्धा होते. योगी होते. व्यासंगी होते. विद्वान होते. धोरणी होते. हळवे होते. पण त्यांचा सगळा अट्टाहास हा स्वातंत्र्यासाठी होता. व्यक्ती हा त्यांच्या जगण्याचा केंद्रबिंदू होता. मुळात सरकारचं अस्तित्व हेच व्यक्तीच्या परावलंबित्वाचं  जिवंत प्रतीक आहे यावर त्यांचा ठाम विश्वास होता. संरक्षणापासून सुरुवात होऊन हळूहळू समाज आपल्या एकेक जबाबदारीसाठी सरकाराला आपल्या स्वातंत्र्याचा तुकडा तोडून देत जातो. आणि सततच्या संरक्षणामुळे परावलंबी झालेला माणूस त्याचा आत्मविश्वास गमावून बसतो. आणि मग आशाळभूतपणे सरकारकडे डोळे लावून बसण्याशिवाय काही पर्यायच शिल्लक राहत नाही. स्वातंत्र्याची इतकी सोपी व्याख्या करताना जोशी गावातल्या साठ वर्षांच्या म्हातारीचं उदाहरण देत, जिला रात्री अंधारात बाहेर जायला पाच वर्षांचा नातू सोबतीला लागतो. स्वातंत्र्य, स्वतंत्रतावाद, खुली बाजारपेठ, स्वातंत्र्याच्या कक्षा ही जोशींची मांडणी थक्क करते.

जोशी NGO आणि कार्यकर्त्यांविषयी त्यांची मतं अगदी मोकळेपणाने मांडत. ही मतं इतकी परखड आहेत की, त्यांच्या तराजू-काट्यानं आजचे सामाजिक क्षेत्रातले देशभरातले कार्यकर्ते मोजायला घेतले तर हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेदेखील कार्यकर्ते उत्तीर्ण व्हायचे नाहीत. भोंदू, तकलादू आणि केवळ आत्मवंचनेसाठी समाजसेवा करणारा कार्यकर्ता जोशी सफाईनं शोधू शकत.

याचं कारण सांगताना त्यांच्या स्वत:मध्ये निर्माण झालेला Don Quixote सांगायलादेखील ते कसलाही अनमान करत नाहीत. Cupidity often brings greater benefits than greatness! महानतेपेक्षा माणसाचा स्वार्थातूनच जास्त फायदा होऊ शकतो, यावर त्यांचा ठाम विश्वास होता.

भारतासारख्या सर्व प्रकारच्या ‘महात्म्यां’नी बजबजलेल्या आणि चलनी नोटांपासून ते सरकारी भिंतींपर्यंत त्यांचे फोटो लावून त्यांच्या नावाखाली बिनदिक्कतपणे स्वत:ची राजकीय आणि सामाजिक दुकानं चालवणाऱ्यांच्या देशात, जोशींसारखा ‘स्वार्थ हेच सर्व समष्टीचं मूळ आहे’ असं छातीठोकपणे सांगणारा नेता जन्माला येणं, हे इथल्या भोंदू कार्यकर्त्यांना आणि भेदाच्या तव्यावर स्वार्थाच्या पोळ्या भाजणाऱ्या त्यांच्या महान नेत्यांना अजिबात झेपणारं नव्हतं. अजूनही नाही. कुठल्याही समाजाला त्याच्या त्याच्या  वकुबाप्रमाणेच नेते लाभत असतात. पण त्या हिशेबानं भारतीय राजकारणातला आणि समाजकारणातला जोशींचा वावर म्हणजे एखादा अपघात वाटावा अशीच अवस्था आहे. त्यांचे विचार समजावून घेऊन ते अमलात आणण्यासाठी अजूनही बरेच एकसंध प्रयत्न करावे लागणार आहेत. 

जोशींचे विचार हे जसेच्या तसे स्वीकारणं हे भारतीय समाजाला अजूनही कठीणच आहे. जोशी जेव्हा हे विचार घेऊन भारतात आले, तेव्हा तर ते पटणं अजूनच अवघड असणार. शरद जोशी समजायला आपल्याला भगीरथ प्रयत्न करावे लागतील. 

.............................................................................................................................................

शरद जोशी यांच्या चरित्रांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

..................................................................................................................................

लेखक निखिल कुलकर्णी हे सॅन होजे (अमेरिका) येथील क्रॉनिकेअर हॉस्पीसचे डायरेक्टर आहेत.

nskulkarni@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......