महाभारत हा प्रत्येक काळाचं आव्हान स्वीकारत वाहणारा अखंड प्रवाह आहे. महाभारत हे प्रत्येक काळाचं, पिढीचं असू शकतं!
ग्रंथनामा - झलक
रवींद्र शोभणे
  • ‘उत्तरायण’चे मुखपृष्ठ
  • Fri , 12 October 2018
  • ग्रंथनामा झलक उत्तरायण Uttarayan रवींद्र शोभणे Ravindra Shobhane महाभारत Mahabharata

‘उत्तरायण’ हे डॉ. रवींद्र शोभणे यांचं बहुचर्चित पुस्तक. २००१मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाने महाराष्ट्र फाउंडेशनसह अनेक पुरस्कार मिळवले. नुकतीच या पुस्तकाची दुसरी आवृत्ती मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केली आहे. या पुस्तकाला शोभणे यांनी ‘महाभारत - एक अन्वयार्थ’ या नावाने दीर्घ प्रस्तावना लिहिली आहे. तिचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

महाभारताच्या संदर्भात पुराणग्रंथ, महाकाव्य, तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र अशा अनेक शास्त्रांच्या कसोट्यांमधून पाहता येते. या कसोट्या लावून पाहताना त्या त्या शास्त्राच्या अनुषंगाने महाभारताच्या नव्या आकलनाच्या दिशा स्पष्ट होऊ लागतात. या दिशेने हा विचार करीत असताना महाभारतांसंबंधीचा दृष्टिकोन निश्चित करणे अधिक महत्त्वाचे ठरते. आणि हा असा दृष्टिकोन ठरवताना आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोनाचीच कास धरावी लागते. कारण ऐतिहासिक दृष्टिकोन स्वीकारला तर त्यात इतर सर्व आयामांचा, शास्त्रांचा विचार होऊ शकतो. शिवाय आपण महाभारतातील व्यक्ती-घटनांची तर्कसंगत, तर्कनिष्ठ अशी मांडणीही करू शकतो. या दृष्टिकोनाशिवाय सामान्य जनमानसामध्ये आणखी एक दृष्टिकोन रूढ स्वरूपात असल्याचे दिसते; आणि तो म्हणजे पारंपरिक आध्यात्मिक किंवा सश्रद्ध दृष्टिकोन. परंतु हा पारंपरिक आध्यात्मिक, सश्रद्ध दृष्टिकोन स्वीकारून या महाकाव्याचा अन्वय लावण्याचा प्रयत्न करायचा, तर श्रद्धेची किंबहुना अंधश्रद्धेचीच पुटं त्यावर चढत जातात. परिणामी निखळ मानवीय पातळीवर, मानुषतेच्या पार्श्वभूमीवर यातील व्यक्ती-घटनांची संगती लावणे केवळ दुरापास्त होऊन बसते.

प्रस्तुत अनेक शास्त्रांच्या आधारे या महाकाव्याची समीक्षा-चिकित्सा करता येते. ती तशी होणेही आजच्या समाजमनाच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे; तथापि या सबंध शास्त्रांच्या मागे ऐतिहासिक दृष्टिकोनाची पार्श्वभूमी तयार ठेवली तर महाभारतातील व्यक्ती-घटनांची आणि तत्सदृश्य अनेक घटकांची निश्चित अशी संगती लावणे सुकर होते. मराठी आणि इतरही भारतीय भाषांमध्ये प्रामुख्याने महाभारताचा विचार करताना त्या त्या विचारवंतांनी हाच दृष्टिकोन स्वीकारल्याचे दृष्टोत्पत्तीस येते. मराठीत डॉ. ना. गो. नांदापूरकर, डॉ. इरावती कर्वे, अनंतराव आठवले, दाजी पणशीकर, शं.दा. पेंडसे, नरहर कुरुंदकर, बाळशास्त्री हरदास, डॉ. रावसाहेब कसबे, दुर्गा भागवत, डॉ. आ. ह. साळुंखे इत्यादी विचारवंतांनी महाभारताच्या संदर्भात हाच दृष्टिकोन प्रामुख्याने स्वीकारलेला आहे. त्यामुळे मराठीत महाभारताच्या संदर्भात जे सैद्धांतिक-वैचारिक लेखन झालेले आहे (प्रामुख्याने वरील विचारवंतांच्या लेखनाच्या अनुषंगाने) ते निश्चित विचारप्रवर्तक, तर्कशुद्ध, तर्कसंगत आणि वेगळे आयाम सिद्ध करणारे असे झालेले आहे.

त्या दृष्टीने आणि तुलनेने विचार करावयाचा झाल्यास मराठीतील ललित लेखकांनी जे पौराणिक कादंबरीवाङमय निर्माण केलेले आहे, त्याचा विचार करता असे दिसून येते की, हे कादंबरीलेखन बरेचसे देवत्वपूजक, विभूतिपूजक, व्यक्तिवादी, आदर्शवादी, भव्योदात्तत्त्वाचा पाठपुरावा करणारे असे आहे; आणि म्हणूनच समीक्षकांचा, विचारवंतांचा पौराणिक (तसेच ऐतिहासिकसुद्धा) ललित लेखनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काहीसा गौणत्वदर्शक, तुच्छतादर्शक असा झालेला आहे.

या अशा स्वरूपाच्या पौराणिक-ऐतिहासिक ललित लेखनामुळे पुनरुज्जीवनवादी दृष्टिकोनच प्रामुख्याने मराठीत तरी रूढ झाला. इतिहासाचे, पुराणकथांचे उदात्तीकरण, त्यातील भव्यतेचे आकर्षण, त्यातील जनमानसांच्या जीवन-मरणाशी सुतराम संबंध नसणारे, किंबहुना जनमानसांच्या हिताच्या आड येणारे, चातुर्वर्ण्याश्रमाचा पुरस्कार करणाऱ्या तत्कालीन आदर्शांची मोळी बांधून हे वाङमय केवळ सामंतशाहीपुरतेच मर्यादित राहिले. (हे काम दूरदर्शनवरील अशा प्रकारच्या पौराणिक, चमत्कारांनी परिपूर्ण असणाऱ्या मालिकांनी अधिक प्रामाणिकपणे केलेले आहे; आणि सतत करीत आहेत असे ठामपणे म्हणावे लागेल.) हे अशा प्रकारचे लेखन वाङमय प्रकारांच्या इतिहासात खपाचे विक्रम मोडणारे, नवे विक्रम प्रस्थापित करणारे, लोकप्रियतेचे मानदंड निर्माण करणारे ठरले. (कर्णाच्या जीवनावरील कादंबऱ्या आणि नाटके या विधानाची साक्ष द्यायला पुरेशी बोलकी आहेत.) यामुळे मराठी वाचकांची ही अशी आवड लक्षात घेऊन मराठी लेखक-प्रकाशकांनी या प्रकारच्या लेखनाला अधिक ‘सुपीक’ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे दिसून येते.

या पार्श्वभूमीवर ‘उत्तरायण’चा विचार करताना आणि तत्सदृश्य आदर्शांचा विचार करताना माझ्यासमोर मराठीतील महाभारतावरील सैद्धांतिक-वैचारिक लेखनच प्रामुख्याने होते. इथल्या पौराणिक ललितलेखनाने घालून दिलेले भव्योदात्ततेचे, आदर्शत्वांचे निकष माझ्या दृष्टीने अस्वीकारार्ह असेच होते, आणि म्हणून महाभारतासंबंधीचा मी विचार करताना आणि दृष्टिकोन स्वीकारताना प्रामुख्याने ऐतिहासिक दृष्टिकोनाचा अवलंब करणे अपरिहार्य होते.

महाभारताकडे या दृष्टिकोनातून पाहताना महाभारताचा कालखंड निश्चित करणे, त्या संदर्भातील काही जाणकारांचे, संशोधकांचे संशोधन प्रमाण मानणे महत्त्वाचे ठरते. महाभारताच्या घटनांचा आणि महाभारत युद्धाचा कालखंड बहुतेक संशोधकांनी इ.स.पूर्व तेरावे ते बारावे शतक हा गृहीत धरलेला आहे. हैदराबादमधील बी.एम. बिर्ला विज्ञान केंद्राच्या (महासंचालक डॉ. बी.जी. सिद्धार्थ) संशोधकांनी खगोलशास्त्राच्या आणि पुराणवस्तूंच्या आधारे अगदी अलीकडे जे संशोधन वृत्तपत्रांतून प्रसिद्ध केले, त्यानुसार महाभारत युद्ध हे इ.स.पूर्व १३५० मध्ये लढले गेल्याचे सप्रमाण सिद्ध केलेले आहे. हा कालखंड महाभारताच्या संदर्भात प्रमाण मानला तर महाभारतासंबंधीचा ऐतिहासिक दृष्टिकोन अधिक स्पष्टपणे प्रकट व्हायला मदत होते. तथापि स्वतःला कडवे डावे, पुरोगामी म्हणविणारे (अनेक दलित साहित्यिकसुद्धा) महाभारत (आणि रामायणही) घडलेलेच नाही, तर ते केवळ महर्षी व्यासरचित कल्पित महाकाव्य आहे, या मतावर ठाम आहेत. अर्थात त्यांचे हे मत पूर्णतः ग्राह्य मानायचे, तर या महाकाव्याकडे ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहताना गोंधळ उडतो.

हा गोंधळ कालनिश्चितीपासून तर समाजशास्त्रीय संकल्पनांपर्यंत जाणवतो. तेव्हा महाभारत घडलेलेच नाही, ते कल्पित महाकाव्य आहे, या वादाच्या उत्तरार्थ काथ्याकूट करीत बसण्यापेक्षा या महाकाव्याकडे पाहण्याचा हा एक दृष्टिकोन आहे, एक प्रयत्न आहे, हे इथे नमूद करणे मला महत्त्वाचे वाटते.

महाभारताच्या कुरुवंशाशी महाभारतकर्त्या व्यासांचा प्रत्यक्ष रक्ताचा संबंध आलेला आहे. तो जसा सत्यवतीचा (महाभारताची कुलवर्धिणी) कानीनपुत्र आहे, तसाच तो या कुरुकुलाचा प्रत्यक्षपणे वंशवर्धकही आहे, त्याने दिलेल्या नियोगाने खंडित होऊ पाहणाऱ्या या वंशवृक्षाचा पुढे विस्तार झाला, या दोन घटनांचा संदर्भ लक्षात घेतला तर वरील शंकेचे निरसन व्हायला मदत होईल; असे वाटते.

मूळ महाभारतकथा म्हणजे ‘हा जय नावाचा इतिहास आहे’ हे काव्य होय. महाभारतयुद्धाच्या समाप्तीनंतर कृष्णद्वैपायनमुनींनी, म्हणजेच व्यासांनी आपल्या जेत्या नातवंडांचा युद्धातील जय आणि हस्तिनापूरच्या राज्यशासनावरील त्यांची राजा म्हणून प्रतिष्ठापना या दोन घटना लक्षात घेऊन मुळात ८८०० श्लोकांचे हे काव्य रचले. त्यानंतर हे काव्य त्यांनी आपल्या चारही शिष्यांना (वैशंपायन, जैमिनी, पैल आणि सुंतु) कथन केले. पुढे चारही शिष्यांनी आपापल्या परीने या काव्याची पुनर्मांडणी केली. (जैमिनीने पुनर्मांडणी केलेले महाभारत हे दुर्योधनाच्या अंगाने जाणारे होते असा तर्क आहे; पण आज मात्र जैमिनीचे महाभारत अस्तित्वात नाही. (‘युगांत’ची प्रस्तावना)

आज सर्वत्र महाभारत ज्या आधारभूत ग्रंथावर रचलेले आहे, तो ग्रंथ म्हणजे वैशंपायनाचा भारत हा ग्रंथ प्रमाण मानण्यात येते. परीक्षिताचा वध तक्षक नावाच्या नागाने केल्यामुळे नागवंशीयांचा समूळ निःपात करण्याच्या प्रयत्नात असलेल्या परीक्षितपुत्र राजा जनमेनजयाला त्याच्या या अशा विध्वंसक कृत्यापासून परावृत करण्यासाठी वैशंपायनाने त्याला त्याच्या पूर्वजांची, पूर्वजांच्या हातून घडलेल्या भीषण संहाराची गोष्ट सांगितली. हे पुनर्रचित भारत चोवीस हजार श्लोकांपर्यंत गेले.

जेत्यांच्या इतिहासाची, त्यांच्या पराक्रमांची महती त्यांच्या वंशजांना सांगण्याच्या मूळ मानवी प्रवृत्तीतून वाढत गेलेले हे महाभारत कुठल्या अंगाने वाढत गेलेले असावे, याचा अंदाज येतो. पुढे हेच काव्य सौतीने शौनकाला कथन केले, तेव्हा त्याचे रूपांतर महाभारतात झाले. आणि ही चोवीस हजारांवर असलेली श्लोकांची संख्या एक लाखाच्या घरात गेली. (ही निश्चित श्लोकसंख्या ९५५८६ एवढी आहे, तर संशोधित आवृत्तीत ती ८९१३६ एवढी आहे.)

आज मराठीपुरता विचार करावयाचा झाला तर आपल्याला नीलकंठप्रतीजवळ यावे लागते. त्यानंतरची भांडारकर संशोधन केंद्राची संशोधित आवृत्ती. म्हणजेच महाभारताचा हा विस्तार लक्षात घेता तो व्यास-वैशंपायन-सौती-देवबोध-विमलबोध-सर्वज्ञनारायण-अर्जुनमिश्र-नीलकंठ इथपर्यंत स्वीकारावा लागतो. म्हणजे मूळ महाभारताचा कालखंड (इ.स.पू. बारावे शतक) व्यास ते नीलकंठ (इ.स. १७००) हा प्रवास महाभारताच्या लेखनाच्या दृष्टीने आणि लेखनासोबतच भारतीय समाजातील मूल्य परिवर्तनाच्या-समाजशास्त्रीय विकासक्रमाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा कसा आहे, हे समजून घ्यावे लागते.

मौखिक परंपरेने चालत आलेले हे महाभारत इ.स.पूर्व ८०० ते इ.स. ८०० या कालखंडात लिखित स्वरूपात समाजासमोर आलेले असावे, असाही विचार मांडला जातो. त्या दृष्टीनेही हा विकासक्रम लक्षात घेण्याजोगा आहे. भारताच्या इतिहासात महाभारत हेच एकमेव महाकाव्य असे असावे, की ज्याची परिष्करणे, संशोधने, पुनर्लेखने, पुनर्निर्मिती शतकानुशतके, पिढ्यानपिढ्या सुरू आहे. आजही प्रतिभासंपन्न लेखकापासून तर सर्वसामान्य वाचकांपर्यंत प्रत्येक स्तरावरील जनमानसाला या महाकाव्याची, या महाकाव्यातील व्यक्तींची प्रचंड मोहिनी आहे. पारंपरिक श्रद्धेतून, भक्तिभावापासून तर आधुनिक समाजशास्त्रीय, मानववंशीशास्त्रीय, मानसशास्त्रीय कसोट्यांपर्यंतच्या अनेक दृष्टिकोनातून महाभारतावर वैचारिक-सैद्धांतिक आणि ललितलेखन होत असतेच. या दृष्टीने विचार करता महाभारतासंबंधी प्रत्येक शतकाचा, अर्धशतकाचा, पिढीचा असा स्वतंत्र दृष्टिकोन व प्रत्यय असतो.

महाभारताशी प्रत्येक पिढीचा, प्रत्येक काळाचा स्वतंत्र दृष्टिकोन व प्रत्यय असतो; याचाच अर्थ त्या त्या काळातील जीवनजाणीवांशी, जीवनविषयक दृष्टिकोनाशी, समाजशास्त्रीय, राज्यशास्त्रीय, अर्थशास्त्रीय, मानसशास्त्रीय आयामांशी महाभारताचा प्रवाह अविरत समांतरपणे वाहता असतो, असाच निघतो.

भांडारकर संशोधन केंद्राने, त्यातील अभ्यासकांनी वर्षोनुवर्षे खपून संशोधित अशी महाभारताची आवृत्ती तयार करण्याचे अपूर्व आणि अमूल्य काम केलेले आहे; तथापि हीच आवृत्ती आता यापुढे अंतिम समजायची असे ठामपणे कुणीही म्हणू शकत नाही. कारण महाभारतासंबंधी सातत्याने नवे संशोधन, नवे लेखन सुरू असतेच. आणि संशोधनाच्या क्षेत्रात कुठलेही संशोधन वा कुठलेही लेखन हे अंतिम, कायमस्वरूपी ठरू शकत नाही. म्हणूनच महाभारताचा हा प्रत्येक काळाचं आव्हान स्वीकारत वाहणारा अखंड प्रवाह आहे. त्याच दृष्टीने महाभारत हे प्रत्येक काळाचं, पिढीचं असू शकतं, या विधानातील सत्यार्थ स्वीकारावा लागतो.

महाभारताच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाचा विचार म्हणजे महाभारतकारांनी महाभारताच्या वंशवृक्षाच्या मूलस्रोताचा विचार प्रजापित्यापासून केलेला आहे. याचाच अर्थ मानवनिर्मितीच्या मुळापासूनचा हा विचार आहे. यातूनच मानववंशशास्त्रीय संकल्पनांचाही विचार अधिक साक्षेपाने समोर येतो. इतिहासकारांच्या मते प्रजापित्यापासून सुरू होणारा हा मूळ आर्यवंश. या मूळ आर्यवंशीयांचं वसतीस्थान उत्तरध्रुव किंवा युरोपच्या परिसरात कुठेतरी असावे. (हा विचार बराचसा वादग‘स्त आहे.) आर्यांचा मुख्य व्यवसाय गोपालनाचा. आर्यांनी हा व्यवसाय पुढच्या प्रवासात स्वीकारला असावा व तोच व्यवसाय पुढे त्यांचा मुख्य व्यवसाय ठरला. त्यांना आपल्या गोधनासाठी उत्तर प्रांतात कुरणाची सोय नसल्यामुळे कुरणाच्या शोधात त्यांच्या टोळ्या दक्षिणेकडे प्रवासाला निघाल्या. या टोळ्यांपैकी एक टोळी पूर्ववैदिक काळाच्या दरम्यान भारतात आलेली असावी आणि यातूनच संस्कृती-वर्ण-वंश संकराच्या प्रक्रियेतून इथला आर्य समाज निर्माण झाला असावा.

आर्यांचे पूर्वज म्हणजे देवसंस्कृती. आणि ही देवसंस्कृती हिमालयापलीकडच्या पट्ट्यात (तिबेट, रशिया) अस्तित्वात होती. (देवलोकात जाण्या-येण्याचे जे संदर्भ महाभारतात व इतर गं‘थांत सापडतात, त्यावरून ही संकल्पना अधिक स्पष्ट होते.) आर्यांनी निसर्गातील शक्तींना केंद्रस्थानी ठेवून शक्तिरूप, प्रतीकात्मक देवतांचे मानवीकरण, आणि मूर्तीकरण झाले. देवलोकाच्या संदर्भाचा आधार घेऊन आपल्या महाकाव्यातील आणि पुराणग्रंथातील स्वर्ग, मृत्यू, पाताळ या संकल्पनांचीही सहजपणे संगती लावता येते.

भारताच्या भौगोलिक परिसराचा विचार करता उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे प्रवास करताना देवलोक, ब्रह्मावर्त (स्वर्ग किंवा देवलोक), आर्यावर्त (मृत्युलोक) आणि अनार्यावर्त (पाताळ लोक) या संकल्पना सहजपणे स्पष्ट होऊ लागतात. प्राचीन काळी पृथ्वीची संकल्पना व मर्यादा त्या त्या राजाच्या राज्यापुरती आणि सत्तासीमेपुरती मर्यादित होती. म्हणूनच त्या काळातील प्रत्येक राजाला भूपती किंवा पृथ्वीपती असे संबोधन सरसकट वापरले जात होते. वैदिक संस्कृतीच्या दृष्टीने विचार करावयाचा झाल्यास महाभारताचाकाळ हा उत्तरवैदिक काळ म्हणून ग्राह्य धरावा लागतो. धर्मसूत्रोत्तर काळ असेही या काळाला म्हणता येईल. वैदिक धर्म हा त्रयीविद्येचा (त्रग्वेद, यजुर्वेद, सामवेद) धर्म आहे.

त्यात अथर्ववेदाला स्थान नाही. महाभारतकाळाची, त्या काळातील सामाजिक, सांस्कृतिक जीवनाची, जीवनपद्धतीची अधिक अचूक संगती लावायची झाल्यास सिंधू संस्कृती मी प्रमाण म्हणून केंद्रस्थानी ठेवतो. कारण भारतीय प्राचीन इतिहासाचा विचार करताना सिंधू संस्कृती (महंजोदारो आणि हडप्पा) आणि त्या संस्कृतीच्या माध्यमातून प्रस्थापित झालेले राहणीमान, लोकजीवन याचा गांभीर्याने विचार केला तर उत्तरवैदिक खंडातला अखेरचा टप्पा म्हणून आपण ज्या महाभारतकाळाचा विचार करतो, त्याची समाजशास्त्रीय संगती अधिक अचूकपणे लावता येईल. (महाभारतकाळाला मी उत्तरवैदिक काळाचा अखेरचा टप्पा समजतो. कारण महाभारतयुद्धानंतर आणि जनमेनजय-नाग संघर्षानंतर युगांताची संकल्पना गृहीत धरलेली आहे. ही युगांतीची, जीवनमूल्यांच्या, धर्मूल्यांच्या परिवर्तनाची प्रकिख्या याच काळात घडत गेली आणि नंतर जनमानसात वैदिक धर्माचे असलेले स्थान बाजूला सरून ते स्थान जैन आणि बौद्ध धर्माने घेतले, हे नाकारता येत नाही.)

या काळातील आणखी एक महत्त्वाचे परिवर्तन म्हणजे धर्मसत्ताक राज्याची संकल्पना मागे पडली होती. महाभारतकाळात धर्मगुरू, राजगुरू, राजपुरोहित अशी तत्कालीन शासनयंत्रणेवर धर्माच्या नावावर अधिसत्ता गाजविणारी व्यवस्था दिसत नाही. म्हणजेच धर्मसत्तेच्या जाचातून राजसत्ता मुक्त झाली होती. गणसत्ता आणि लोकसत्तेच्या उदयाची ही सुरुवात होती. शासनव्यवस्थेत लोकप्रतिनिधींच्या सहभागाची प्रकिख्या याच काळातत सुरू झाल्याचे दिसून येते. हा काळ कुलसत्तेचा, वंशसत्तेचा होता असेही म्हणावे लागेल.

या (ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय) पार्श्वभूमीवर महाभारतातील व्यक्तींची-घटनांची सूत्रबद्ध, तर्कसंगती लावायची, त्यातून निखळ मानवीय पातळीवर त्यांच्या जीवनाचा अन्वय लावायचा तर सर्वप्रथम महाभारतातील वर-शाप, दैवी चमत्कार, योगायोग, पुनर्जन्म इत्यादी अमानवीय, अतार्किक गोष्टींना बाजूला सारणे, नाकारणे महत्त्वाचे होऊन बसते. महाभारतातील बहुतेक व्यक्ती आणि त्यांच्या आयुष्यातील घटना या अशाच अमानवीय, अतार्किक गोष्टींमुळे झाकोळून गेलेल्या आहेत. यामुळे या माणसांचे दैविकरण, विभूतिकरण होत गेले. मानुषीकरणाच्या सगळ्या शक्यता (महाभारताच्या वाढत जाणाऱ्या आवृत्तीनुसार) धूसर होत गेल्या.

महाभारतातील प्रमुख व्यक्तिरेखा म्हणून भीष्म, कुंती, गांधारी, द्रौपदी, अर्जुन, कर्ण, दुर्योधन, एशत्थामा, धृतराष्ट्र, शिखंडी, द्रोण, कृष्ण, विदुर, युधिष्ठिर, व्यास, पांडू इत्यादींचा विचार तार्किक, मानवीय पातळीवर करावयाचा झाल्यास, त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटितांची या पार्श्वभूमीवर संगती लावायची झाल्यास सर्वप्रथम त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटितांची या विभूतिमत्वाचा मुलामा बाजूला सारणे महत्त्वाचे ठरते. हा मुलामा बाजूला सारणे, ही गोष्ट समाजमनाच्या पारंपरिकतेचा आणि श्रद्धेचा विचार केला तर धोक्याची आणि धक्कादायक होऊन बसते; तथापि एखादी भूमिका स्वीकारली तर त्या भूमिकेला प्रामाणिक राहून नवी मांडणी करणे किंवा नव्या मांडणीची पार्श्वभूमी तयार करणे, हेही आवश्यकच ठरते.

या महाभारतकथेचा विचार करताना भारतीय इतिहासातील (आधुनिक) काही टप्प्यांचा, स्थित्यंतरांचा विचार नकळतपणे समोर येतो. आधुनिक इतिहासाशी, समकालीन राजकीय स्थित्यंतरांशी समांतर नाते सांगण्याची महाभारतात प्रचंड संभाव्यगर्भता आहे, हे नाकारता येत नाही. (रामायणाच्या संदर्भात असे म्हणता येत नाही. कारण रामायण हे आदर्शांच्या, ध्येयनिष्ठांच्या वरच्या पातळीवर वावरत असते) महाभारत हा भारतीय समाजमनाचा, मानुषतेचा, सामाजिक-मानसिक स्थित्यंतराचा प्रचंड आरसा आहे. म्हणूनच महाभारतकथेवर आधुनिक काळातही अनेक भारतीय भाषांधून लेखन होत असते. महाभारतकथेवर (किंवा पौराणिक कथेवर) ललित पातळीवर लेखन करणे हे प्रतिकृतिवादी लेखन आहे, हा तथाकथित समीक्षकांचा आरोप तपासून पाहणेही या दृष्टीने महत्त्वाचे वाटू लागते.

मी महाभारताकडे पाहताना आधुनिक इतिहासाच्या, समकालीन घटनावास्तवाच्या चौकटीतूनच पाहण्याचा प्रयत्न करतो. महाभारतकथा ही कुठल्याही कालखंडातील भारतीय समाजाच्या वैभवाची, अधःपतनाची, मूल्यवर्धनाची आणि मूल्यर्‍हासाची कथा आहे, हा विचार मग प्रधान होत जातो. यातील कुठलीही व्यक्ती मग केवळ पुराणकाळात अडकून पडत नाही. या कथेची आधुनिक इतिहासाशी सांगड घालण्याचा प्रयत्न करावयाचा झाल्यास स्वातंत्र्याच्या आगेमागे घडत गेलेला भारतीय इतिहास, जागतिक पोर्शभूीवर लढलेले दुसरे महायुद्ध, दुसऱ्या महायुद्धाच्या भीषण संहारानंतर झालेली सर्वांगीण मूल्यांची होळी, त्यातून उभा राहिलेला, नवमूल्यांचा स्वीकार करणारा समाज या पद्धतीने ही इतिहासाची चौकटही तपासून पाहता येते. तदनुषंगाने महाभारतातील व्यक्ती आणि आधुनिक इतिहासातील व्यक्ती यांचीही कुठेतरी तुलना (समांतर पातळीवर) होऊ पाहते. ही तपासणी करताना ती हट्टाग्रहाने होऊ नये, तर किमान काही घटितांच्या अनुषंगाने व्हावी, एवढेच नमूद करावेसे वाटते. आधुनिक राजकीय विचार करताना भारत-पाकिस्तानची फाळणी ही मला नेहमीच हस्तिनापूर-इंद्रप्रस्थाच्या विभाजनाला समांतर वाटते.

दुसऱ्या महायुद्धाच्या मुळाशी प्रामुख्याने हिटलर उभा होता. त्याने त्या काळी आपल्या जर्मनवंशाच्या विशुद्धतेच्या आत्यंतिक हट्टापोटी लाखो ज्यूंची कत्तल केली होती. हिटलरची वंशशुचितेची संकल्पना आणि दुर्योधनाची वंशशुचितेची संकल्पना, युद्धोत्तर हिटलरचा मृत्यू आणि दुर्योधनाचा मृत्यू, युद्ध आणि शांती या अंगाने जाणारी कुरुवंशाची महाभारत युद्धोत्तर समाजव्यवस्था, युगांताची प्रकिख्या या अर्थाने मी महाभारत कथेकडे पाहू इच्छितो.

प्राचीन भारतीय इतिहासातील मूळ आर्य वंश (पूर्ववैदिक किंवा वैदिक काळातील) आणि इथली अनार्य-द्रविडी संस्कृती हा संकर इतिहासाच्या प्रकि‘येत अटळ होता. कुठल्याही साम्राज्यावाद्यांना या पद्धतीने इथल्या मूळ संस्कृतीला, वंशाला सामोरे गेल्याशिवाय, या वंश-संस्कृतीतील रक्त-नातेसंबंधाचा स्वीकार केल्याशिवाय यशस्वीपणे आपली राजकीय मुळं पसरवताच आलेली नाहीत हा इतिहास आहे.

बाहेरून आलेले मूळ आर्यपुरुष आणि अनार्य संस्कृतीतील स्त्रिया यांच्या अटळ संकरातूनच आणि नातेसंबंधातून पुढील आर्यवंश उभा राहिला. वैदिक धर्माची उभारणी करणाऱ्या ब्रह्मवृंदांनी यापेक्षा वेगळा मार्ग नव्हताच. त्यांनीही अनार्य स्त्रियांपासून (वसिष्ठ-अरुंधती व पराशर-सत्यवती) आपली वैदिक धर्मपरंपरा पुढे संक्रमित केली. तत्कालीन समाजाच्या सौहार्दपूर्ण जीवनासाठी आणि संबंधांसाठी ही प्रक्रिया अटळ आणि आवश्यक होऊन बसली होती. महाभारतकाळात तर हा वर्णसंकर फार मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून येतो. यातूनच पुढे जातिव्यवस्थेचा आणि कार्यविभागणीचा जन्म झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. या काळात शुद्ध आर्यवंशाचा अट्टाहास अनाठायी होता. पांडवकुल हे तर अनार्यवंशीयांशी घट्टपणे नातेसंबंध प्रस्थापित करणारे कुल होते. म्हणूनच हे युग-युगांताच्या, नव्या मूल्यबदलाच्या शिलाखंडावर उभे असलेले युग होते असे म्हणणे अधिक संयुक्तिक वाटते.

भगवद्गीता हा जुन्या सनातन कुलधर्माच्या अंताची शिकवण देणारा आणि नव्या वर्णाश्रम धर्माचा उपदेश देणारा धर्मग्रंथ आहे. भारतीय समाजाच्या ऐतिहासिक विकासक्रमात या ग्रंथातील तत्त्वज्ञानाने एक महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. (डॉ. रावसाहेब कसबे - मानव आणि धर्मचिंतन) भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाचे स्वरूप आणि दिशा भारतीय नवसमाजाच्या उर्जितावस्थेच्या दिशेने जाणारे होते. म्हणूनच यादवकालीन मराठी समाज हतबुद्ध आणि किंकर्तव्यमूढ, दिशाहीन झाला होता, तेव्हा ज्ञानेश्वरासारख्या द्रष्ट्या पुरुषालाच संपूर्ण वैदिक वाङ्य, महाकाव्ये, श्रुति-स्मृतिकाव्ये बाजूला सारून पुन्हा भगवद्गीतेचेच बोट धरून इथल्या समाजाला जीवनसन्मुख आणि कार्यप्रवण करावे लागले, हा सातशे वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. या अर्थाने डॉ. इरावती कर्वे किंवा डॉ. रावसाहेब कसबे महाभारतयुद्धोत्तर कालाकडे ज्या ‘युगांता’च्या संकल्पनेतून पाहतात, ती अधिक स्वीकारार्ह वाटते.

महाभारत कथेचा शेवट वाचून स्वतःला पुरोगामी, नवमतवादी म्हणविणारेसुद्धा विस्मयाने थक्क होतात. धृतराष्ट्र, विदुर, गांधारी आणि कुंती यांचा अग्निप्रवेश आणि त्यानंतर काही वर्षांनी पांडवांचे स्वर्गारोहणप्रसंगी होणारे पतन या सर्व घटनांची संगती आणि त्यातून प्रातिभ पातळीवर अभिव्यक्त होणारी संभाव्यगर्भता केवढी प्रचंड आहे! हे आव्हान एखादा प्रतिभावंतच स्वीकारू शकेल, एवढे मोठे आहे. या परंपरेचा एक लहानसा, क्षीणसा अंश होण्याची माझी ही धडपड आहे. ती या अर्थाने जाणकार वाचक समजून घेतील अशी आशा आहे. या निमित्ताने मी मांडलेली भूमिका एखाद्यावेळी कुणाला पटणार नाही; पण ती साधार आहे एवढेच इथे प्रामाणिकपणे मला नमूद करावेसे वाटते.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................