जनाई : पंढरीची माहेरवाशीण
ग्रंथनामा - झलक
सरोजिनी बाबर
  • ‘संत जनाबाई - चरित्र व काव्य’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 12 October 2018
  • ग्रंथनामा झलक संत जनाबाई - चरित्र व काव्य Sant janabai - charitra va kavya

‘संत जनाबाई - चरित्र व काव्य’ हे श्री. संत जनाबाई शिक्षण संस्था, गंगाखेड या संस्थेने संपादित केलेले पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. डायमंड पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील हा एक लेख...

.............................................................................................................................................

बायकामाणसांनी आपल्या माहेरच्यांनी केलेल्या माहेरच्या गोष्टी आणि चंद्रमौळी झोपडीत पाहिलेलं लंकेचं वैभव मी आजवर अनेकदा ऐकलं आहे. असले सुखसोहळे पाहिले आहेत आणि त्या कारणाने होणारे सुखसमाधानाचे सोपस्कारही ऐकले आहेत. पण बाई, पंढरीच्या माहेरवाशिणीचं काही निराळंच हं सगळं. विठूरायानं जनाईच्या बाबतीत केलेलं अखंड सौभाग्याचं माहेर खरंच भारी अपूर्वाईचं. तसलं सुख जसं काय तिचं एकटीचंच म्हणावं. अशी ही गोष्ट सांगण्याजोगी नि मी म्हणते ऐकण्यासारखीदेखील.

पंढरीच्या राऊळात आजवर तशी खूप माणसं आली नि विठूरायाचं दर्शन घेऊन माघारी गेली; पण जनाई आली ती मुळी ‘विठाई माउली’ करीत नि विठूदेवाला ‘माझे पंढरीचे आई’ अशी हाक देतच. असं म्हणतात की, बाळपणीच तिच्या मनानं छंद घेतला म्हणून ती आई-वडिलांच्या बरोबर पंढरीला आली; पण देवाचं दर्शन घडलं मात्र नि तिनं तिथंच राहायचा हट्ट घेतला. तिची मनीषा पुरी झाली. विठूदेवातच आई-वडिलांचं सुख तिनं पाहिलं आणि सांगायचं म्हणजे वानराच्या पिल्लासारखी ती विठूदेवाला बिलगली. तिचं म्हणणंच मुळी की, मी देव खाईन, देव पिईन आणि देवाघरी झोपेनही. जिथे देव तिथे मी; अशीच तिची भावना.

पण विठूरायाच्या रुक्मिणीला कुठलं हे कोडकौतुक सहन व्हायला! जनीला पाहिलं की तिचा राग उफाळून वर यायचा. तिला वाटायचं की, ही कोण माझ्या सुखात आली? म्हणून तिचं नि विठूदेवाचं हे भांडण नेहमी. जेवायला बसला विठूदेव तरी खातेली पोळी जनीला लपवून ठेवील मांडीच्या आड. मोतीचूर खायला लागला तरी निम्मा घास काढून ठेवील जनीला आणि नेमकं तेच त्या रुक्मिणीला खपायचं नाही. तिचं म्हणणं ही कुणाची कोण, तेव्हा एवढा तिचा लाड!

परंतु, विठूदेव मोठा हुशार. त्यानं रुक्मिणीचं हे गाऱ्हाणं कधीच मनावर घेतलं नाही. तो आपला जनाईच्या मागं मागं सावलीसारखा असायचा. घरी आलेली लेकरंबाळं जिवापाड सांभाळावी ही त्याची मनापासूनची भावना. त्यामुळं तिच्यासाठी स्वत: कावड घेऊन चंद्रभागेचं पाणी आणताना नि ते तापवून जनीला न्हायला घालताना त्याचा ऊर दाटून यायचा. आपल्या हातानं जनीची वेणी उकलताना त्याला आनंद व्हायचा आणि हे बघून रुक्मिणी देवावर भडकली की, जनी मनातूनच संतापायची, तिला वाटायचं की विठूदेव माझा मायबाप, तर ही कोण मध्ये येतेय! अशी ती संतापली की मग रागारागानं झाडलोट करायला लागायची. विठूदेवाचा जीव घाबरा व्हायचा ते बघून. म्हणून तो नेहमीच जनीचे हात दुखतील म्हणून तिच्या वाटचे केरवारे काढायचा, दळणकांडण करायचा नि पडेल त्या कामाचा वाटेकरी व्हायचा.

तर एकदा काय झालं की, जनी चंद्रभागेवर धुणे धुवायला गेली. तुळशीवनात डागळलेला देवाचा शेला तिनं पायावर घेऊन हलक्या हातांनी धुवायला घेतला, हं. तसा काय चमत्कार झाला की, अबिराच्या वासानं सारी चंद्रभागा दरवळून गेली नि पंढरी नगरीत जनीच्या कौतुकाचा कडेलोट झाला... जनीच्या हातातील गोवऱ्या स्वत: विठूदेवाने उचलल्या नि त्यांचे ढीग करीत ते सोन्याच्या पाटीत भरले. देवानं त्या वेळी मग मोत्यांचे किल्ले रचले आणि जनाबाईच्या कामाचा भार हलका केला. हत्तीच्या दातांची फणी आणून देवानं तिचे केस विंचरले नि रेशमी गंगावन लावून तिची वेणी घातली. म्हणजेच ‘देव नि जनी’ यात जसा काय दुजाभाव उरलाच नाही.

जनाबाईची कळण्याकोंड्याची भाकरी चवीची लागती म्हणून देवानं पाचीपक्वान्नांची नैवेद्याची ताटं झिडकारली म्हणतात, आणिक जनीचा तवा चोरीला गेला तर नामदेवाला दवंडी पिटवायला लागली! अहो, तुळशीच्या काड्या गोळा करून देवानं जनीची माडी बांधली, आणिक स्वत: राऊळाभोवती मातलेल्या पवऱ्याची कडी न् कडी गोळा करून त्यानं जनीच्या गवताचा भारा बांधून दिला; म्हणून त्याचं म्हणणं की, रुक्मिणीनं नणंद म्हणूनच या जनीकडे पाहावं नि राग सोडून द्यावा. पण रुक्मिणी एवढी समंजस असती, तर मग कशाला? राऊळातील बडव्या लोकांचं ऐकून तिनं जनीवर देवाचा नवलाखा हार चोरल्याचा आळ घेतला नि तिला सुळावर चढवली; पण जनीचं पण देवावर नितांत प्रेम होतं नि देवाचा जनीवर जीव. त्यामुळे तिनं विठूदेवाच्या नावानं हाकार घालून डांगोरा पिटला, तशी त्या सुळाचं पाणी झालं. जनीवरचा आळ कुठल्या कुठं धुऊन निघाला.

म्हणून बाई जनाई, तुला माझं एकच सांगणं की, तू निचिंतीनं ऐक. देव तुझा पाठीराखा आहे. लोक काय म्हणतील याची पर्वा न करता देव तुझी कामं बिनबोभाट करीत राहतो. आणिक त्यानं तुला चांगली सांभाळायची म्हणजे करायचं तरी काय गं जनाई?

जनाई, विठू देवानं तुझा फार छळ सोसलाय गं. तुझी आईच झालाय तो; म्हणून तर तुझी आठवण झाली तरीदेखील हातातील टाळवीणांसह तो तुझ्या घरी चटकन येऊन उभा राहतो. खरं ना गं? मग? रुक्मिणी आई तुझ्याएकी देवाला बोलणार नाही असं वाग बाई.

विठूदेवाला लेकुरवाळा म्हणालीस ना गं तूच? होय ना? मग? त्या लेकुरवाळ्याची कामं आता तू करीत जा गडे आणि त्याला तू मागं एकदा म्हणाली होतीस ना, तसं एकदाचं सांगून टाक हं. म्हणावं कीˆ

विठोबा मला मूळ धाडा धावत येईन दुडदुडा

चरणीं लोळेन गडगडा माझा जीव झाला वेडा

बस्स. मग त्या नादात नामदेवाच्या घरची कामं बाजूला सरू देत, नाहीतर तुझं आणखी काही असू दे. काय? आलं ना ध्यानात?

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................