प्रेषित मुहम्मद (स) - अरबांचाच नव्हे तर अखिल मानवजातीचा ‘तारणहार’!  
ग्रंथनामा - आगामी
डॉ. जयसिंगराव पवार
  • ‘प्रेषित मुहम्मद (स) - नवयुगाचे प्रणेते’ या चरित्रग्रंथाचे मुखपृष्ठ
  • Fri , 12 October 2018
  • ग्रंथनामा आगामी सय्यद इफ्तेखार अहमद Sayyad Iftikhar Ahmad प्रेषित मुहम्मद - नवयुगाचे प्रणेते Preshit Muhammad Navyugache Pranete

सय्यद इफ्तेखार अहमद यांच्या ‘प्रेषित मुहम्मद (स) - नवयुगाचे प्रणेते’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन २० ऑक्टोबर रोजी सोलापुरात समारंभपूर्वक होत आहे. या पुस्तकाला प्रसिद्ध इतिहासकार, चरित्रकार डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेली प्रस्तावना...

............................................................................................................................................

आमचे सन्मित्र, उर्दू-फार्सीचे अभ्यासक व साहित्यिक, पत्रकार व इतिहासकार जनाब सय्यद इफ्तेखार अहमद यांच्या ‘प्रेषित मुहम्मद (स) - नवयुगाचे प्रणेते’ या ग्रंथास पुरस्कार लिहिताना आम्हास मनस्वी आनंद होतो आहे. पैगंबरसाहेबांच्या जीवनकार्यावर एवढा विस्तारपूर्वक व विवेचक असा हा मराठीतील (माझ्या माहितीनुसार) पहिलाच ग्रंथ आहे. आपल्या मुस्लिम बांधवांनाच नव्हे तर मराठी बांधवांनाही पैगंबरसाहेबांचे हे जीवनचरित्र परिचित करून दिल्याबद्दल मी लेखकाचे मनापासून अभिनंदन करतो.

प्रस्तुतचा चरित्रग्रंथ एका अर्थाने इतिहासग्रंथच आहे. म्हणूनच मी लेखकास ‘इतिहासकार’ म्हणून संबोधिले आहे. इतिहासकार हा भूतकाळाचे चित्रण आपल्यासमोर उभे करतो. हे करत असता, त्याने वर्तमानकाळाचा चष्मा वापरावयाचा नसतो, तर त्या काळाच्या अंतरंगात प्रवेश करून त्या काळाचे मापदंड वापरावयाचे असतात, हा दंडक त्याने पाळायचा असतो. हे इतिहासकाराच्या कार्याचे सूत्र लेखकाने प्रथमच स्पष्ट केले आहे. या दंडकाचे पालन चरित्रग्रंथात सर्वत्र झालेले आहे.

पैगंबरसाहेबांच्या उदयाच्या वेळी अरबांची अवस्था रानटी माणसांसारखी होती. मानवी मूल्ये नावाची गोष्ट जणू त्यांना माहीतच नव्हती. नैतिकदृष्ट्या समाजाचे अध:पतन किती झाले होते, याला सीमा नव्हती. बापाच्या मृत्युनंतर त्याच्या इस्टेटीची जशी वाटणी होई, तशी त्याच्या स्त्रियांचीही होई. त्या मुलांच्या सावत्र आयांचीही वाटणी केली जाई! मुलीचा जन्म अपवित्र व संकट मानला जाई. तिला जन्मत:च जिवंत पुरले जाई व त्यात समाजाला काही क्रौर्य वाटत नसे! इफ्तेखार साहेब म्हणतात, “असा हा जीर्ण झालेला मानवी समाज... एका खाईच्या तोंडावर होता आणि तो कोणत्याही क्षणी त्यात लोटला जाईल अशी स्थिती होती. अशा वेळी मानवतेला गरज होती, एका तारणहाराची!”

या अंध:काराच्या पार्श्वभूमीवर अरबांचाच नव्हे तर अखिल मानवजातीचा ‘तारणहार’ म्हणून पैगंबरसाहेबांचा उदय झाला. जगाचा इतिहास सांगतो की, ज्या ज्या वेळी समाजातील नैतिक मूल्ये रसातळाला पोहोचतात; ज्या ज्या वेळी समाजातील अत्याचाराची परिसीमा गाठली जाते, त्या त्या वेळी समाजाला नैतिक अधिष्ठान देणारे, त्याला सन्मार्गावर आणणारे महात्मे उदयाला येतात. पैगंबरसाहेब अशाच महात्म्यांपैकी, महामानवांपैकी होते.

“बुडती हे जन ।  देखवेना डोळा। म्हणून कळवळा ।  येत असे ।।” या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे पैगंबरसाहेबांना ‘बुडणाऱ्या’ अरब समाजाचा कळवळा येत असे. या अशा अधोगतीला गेलेल्या, बुडणाऱ्या, समाजाला तारण्यासाठी त्यांनी ईशचिंतनाचा मार्ग धरला आणि मक्केजवळच असणाऱ्या ‘हिरा’ नामक गुहेत आपले प्रस्थान ठेवले. ईश्वरावर असीम श्रद्धेमुळे त्यांना साक्षात ईश्वरीय साक्षात्कार होऊ लागले व या साक्षात्कारांतूनच नव्या युगाची सूत्रे खुद्द ‘अल्लाह’कडून सांगितली गेली आणि मग ‘अल्लाह’नेच ती जगाच्या मार्गदर्शनासाठी घोषित करण्याचा पैगंबरसाहेबांना आदेश दिला, असे पवित्र कुरआन सांगते.

ईश्वरीय साक्षात्कार होण्यापूर्वी पैगंबरांचे चारित्र्य समाजाला आदर्शभूत होते. ते सचोटीची, सौजन्याची, सत्यवचनीपणाची जणू मूर्तीच होते. पवित्र कुरआनात त्यांचे वर्णन आलेले आहे.

“मक्केच्या अरब लोकांमध्ये प्रेषित जन्माला आले त्यांची वाढ झाली, मैत्री झाली. त्यांच्यातच ते तरुण झाले. त्या लोकांत राहूनदेखील प्रेषित त्यांच्यापेक्षा वेगळे होते. कधी खोटं बोलत नसत. त्यांचं जीवन सचोटीचं होतं. कष्टाचं होतं. सर्व लोक त्यांचा आदर-सन्मान करीत. त्यांची विश्वासार्हता पाहून लोकांनी त्यांना ‘अल-अमीन’ची उपाधी दिली होती. म्हणजे ‘विश्वसनीय’. कुणाला वाईट बोलत नसत. कधीही कुणाला अर्वाच्च बोलले नाहीत. सर्वांशी गोड बोलत. गोडीनं वागत. कुणाला लुबाडलं नाही. लोक आपल्या मौल्यवान वस्तू त्यांच्याकडे सुरक्षिततेसाठी ठेवत. शत्रूंनादेखील त्यांच्यावर असीम विश्वास होता. लोकांना फसवत नसत. लोकांसाठी सहन करत. अनाथांना, विधवांना मदत करीत. कोणतेही अवगुण त्यांच्या अंगी नव्हते. मद्यपान, जुगार याकडे कधी पाहिलंसुद्धा नाही. आपल्या लोकांमध्ये दहशत, अनाचार, रक्तपात घडत असल्याचं पाहून त्यांना खेद वाटे.”

पवित्र कुरआनात व्यक्त झालेल्या या पैगंबरसाहेबांच्या चरित्राचे परिशीलन करताना हे स्पष्ट दिसून येते की त्यांचा सर्व उपदेश सद्वर्तनावर अधिष्ठित होता. ‘समता व बंधुत्व’ ही दोन मानवी मूल्ये त्यांच्या नवसमाजाच्या निर्मितीची मार्गदर्शक तत्त्वे होती. खरे तर पैगंबरसाहेबांनी स्थापित केलेल्या इस्लामची ही मूलतत्त्वेच होती. एका ठिकाणी समतेच्या तत्त्वाचा उद्घोष करताना त्यांनी म्हटले आहे,

“तुमचा विधाता, पालनहार, स्वामी एकच आहे. तुम्ही सर्व आदमची संतती आहात. आदम यांची निर्मिती मातीपासून केली होती. म्हणून कुणी उच्च-नीच, प्रतिष्ठित-तिरस्कारित, काळा-गोरा, असे कोणतेच भेद पाळण्यात काही अर्थच नाही. एका कुटुंबात मुले-मुली जसे समान असतात, तसेच सारे मानव अल्लाहच्या परिवारातले असल्यानं सर्व समान दर्जाचे आहेत.”

समतेइतकाच बंधुतेवर पैगंबरसाहेबांनी जोर दिला होता. किंबहुना त्यांच्या दृष्टीने समतेपेक्षा बंधुत्व अधिकमहत्त्वाचे होते. बंधुत्वाचे नाते त्यांनी केवळ इस्लामपुरतेच मर्यादित ठेवले नाही. पैगंबरसाहेबांनी ज्या बंधुतेचा पुरस्कार केला होता, त्याच्यावर भाष्य करताना चरित्रकाराने म्हटले आहे, “बंधुत्वाचं हे नाते समतेपेक्षाही अधिक एकमेकांशी जवळीक निर्माण करणारे आहे आणि हे नाते प्रेषितांनी केवळ मुस्लिमांपुरतंच मर्यादित ठेवलं नाही. जर कुणाचा शेजारी उपाशी असेल तर असा मनुष्य मुस्लिमच होऊ शकत नाही. मग हा शेजारी कोणत्याही धर्माचा, वंशाचा असो. प्रत्येकानं आपल्या शेजाऱ्याची चिंता करावी. म्हणजे एखाद्या वस्तीतली सारी माणसं एकमेकांचे शेजारी आणि त्या वस्तीला लागून दुसऱ्या वस्तीचे लोक त्या वस्तीचे शेजारी होतील. याचा विस्तार होत एका राष्ट्राचे सारे नागरिक आणि राष्ट्राला लागून असलेल्या राष्ट्राचे सारे नागरिक एकमेकांचे शेजारी होतील.”

समता व बंधुता या तत्त्वांना अनुसरून आचरण करण्याचे तर ‘सद्वर्तन’ हा एकमेव मार्ग असतो. इस्लाममध्ये ‘अल्लाह’च्या उपासनेसंबंधी काही नियम व बंधने सांगितली गेली असली तरी सद्वर्तन हीच ‘अल्लाह’ची खरी उपासना होय. पैगंबरसाहेबांनी आपल्या अनुयायांना जी शिकवण दिली, ती काही गहन तत्त्वज्ञानाची नव्हती. अगदी साध्यासुध्या भाषेत त्यांच्या शिकवणीची सूत्रे सांगितली गेली होती. त्यांच्या शिकवणीनुसार, “धर्मग्रंथांचं भलंमोठं ज्ञान सर्वांनी बाळगणं मुळीच गरजेचं नाही. उपासना म्हणजे काही ठराविक विधी ठराविक वेळेवर पूर्ण करणं एवढंच नाही. लोकांशी चांगलं बोलणं, त्यांना क्षमा करणं, कुणास पाहताना स्मित हास्य करणं, रस्त्यातून त्रासदायक वस्तू बाजूला सारणं अशी परोपकारी कामं म्हणजे ईश्वराच्या उपासनाच आहेत. आपसांतल्या संबंधांमध्ये आपुलकीचा व्यवहार करणं, विधवेची सेवा करणं, गोरगरीब, गरजू, वंचित, पीडितांच्या हक्कांसाठी झटणं हीदेखील अल्लाहची उपासनाच. एवढंच नव्हे तर एकदा प्रेषित म्हणाले, आपसांतले संबंध जोपासणं नमाजपेक्षाही महत्त्वाचं आहे.”

लोकांनी फक्त नमाज, रोजे यासारख्या इस्लामच्या उपासनेच्या प्रकारातच गुंतून राहू नये; किंवा नमाज, रोजे अशा बाबी पुऱ्या केल्या म्हणजे इस्लामच्या अनुयायाने कर्तव्य पुरे केले, या समजुतीत राहू नये म्हणून अल्लाहने पैगंबरासाहेबांच्या तोंडून आदेश दिला आहे, “अल्लाहची भक्ती करा, त्याचा कोणी भागीदार करू नका आणि मातापित्याशी दयेनं वागा. तसेच जवळच्या नातेवाईकांशी, अनाथांशी, निराधारांशी, निकटच्या शेजाऱ्यांशी, निकटवर्ती, अनोळखी,  सान्निध्यातील लोकांशी, प्रवाशांशी आणि तुमच्या अधीन असलेल्यांशी सद्वर्तनाने वागा. कारण अल्लाहला उद्दाम व गर्विष्ट माणसं आवडत नसतात.”

प्रत्येकाने आपल्या मातापित्याची सेवा भिक्तभावाने केली पाहिजे; प्रत्येक पुत्राचे ते नैतिक कर्तव्य आहे, असे पैगंबरसाहेब आपल्या अनुयायांना बजावतात. “मातापिताच तुमच्यासाठी स्वर्ग आहेत आणि (त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास) तेच तुम्हाला नरकाचे कारण बनतील. अल्लाहची प्रसन्नता मातापित्यांना प्रसन्न ठेवण्यात आहे आणि त्यांची नाराजी म्हणजे अल्लाहची नाराजी.”

एकदा पैगंबरसाहेबांचे एक अनुयायी त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, “मला जिहादमध्ये सहभागी व्हायचे आहे.” तेव्हा पैगंबरांनी विचारले, “तुझे आईवडील हयात आहेत?” त्या व्यक्तीने “हो’ म्हटल्यावर पैगंबरसाहेब म्हणाले, “जा, त्यांची सेवा करा. हाच तुमचा जिहाद आहे.”

केवढी ही उच्च विचारसरणी! धर्म व अधर्म यांचा अर्थच पैगंबरसाहेबांनी या ठिकाणी सांगितला आहे. सद्वर्तन म्हणजे धर्म. दुर्वर्तन म्हणजे अधर्म. इस्लाम हा समता व बंधुता या दोन वैश्विक तत्त्वांवर आधारलेला सद्वर्तनाच्या आचरणाचा धर्म असल्याचे पैगंबरसाहेबांनी आपल्या ईश्वरीय वचनांतून अनेक ठिकाणी घोषित केले आहे.

आईबापाप्रमाणेच त्यांनी कुटुंबातील मुलींना (कन्यांना) संरक्षणाचे छत्र दिले. अज्ञानी अरबांच्या मुलींच्या बाबतीत कुप्रथेचा संदर्भ मागे येऊन गेलाच आहे. अरबांना सन्मार्गावर आणण्यासाठी पैगंबरसाहेबांनी घोषित केले की, मुलीचा जन्म हे संकट नाही. तसेच ती अवमानकारक गोष्टही नव्हे. ते एक स्वर्गप्राप्तीचे साधन आहे. मुलींचे संगोपन करणे, त्यांना मायेने वाढवणे, हे कुटुंबप्रमुखाचे कर्तव्यच असून त्याद्वारे त्याला खात्रीने स्वर्गप्राप्ती होईलच, शिवाय त्याला स्वर्गात प्रेषितांचे सान्निध्य लाभेल!

कुटुंबातील स्त्रियांना, विशेषत: पत्नींना अतिशय सन्मानपूर्वक वागवले पाहिजे; त्यांच्या बाबतीत तुम्ही अल्लाहचे भय बाळगा; अल्लाहने तुमच्या वचनाप्रमाणे त्यांना तुमच्या स्वाधीन केलेले आहे, असे पैगंबरसाहेबांनी आपल्या प्रवचनांत अनेकदा सांगितले आहे.

सांप्रत आपल्या देशात मुस्लिम समाजात दिला जाणारा एकतर्फी तलाक, त्याला सर्वोच्च न्यायालयाने कायद्याने केलेली बंदी, यावर बरीच चर्चा चिकित्सा विचारवंतांमध्ये व मुस्लिम पंडितांमध्ये चालू आहे. या संदर्भात पैगंबरसाहेबांचे तलाकविषयीचे उद्गार खूप काही सांगून जातात. ते म्हणतात, “अल्लाहनं विहित केलेल्या सर्व गोष्टींत तलाक ही सर्वांत वाईट पद्धत आहे. धरतीवरील सर्व गोष्टींत तलाकएवढी वाईट गोष्ट अल्लाहने दुसरी बनविली नाही!” याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, इस्लामने तलाकचा अधिकार पतीला दिला असला तरी तो अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतच वापरला जावा, सरसकट नव्हे.

स्त्रीचा केवळ तिच्या पतीच्या संपत्तीतच वाटा असतो असे नाही; तर मातापित्याच्या संपत्तीवरही तिचा हक्क असतो असे पवित्र कुरआनमध्ये अनेक ठिकाणी नमूद केले आहे. एवढेच नव्हे तर स्त्रीला स्वतंत्रपणे व्यापारउद्योग करून धनसंपत्ती बाळगण्याचा अधिकारही कुरआनने दिला आहे. पैगंबरसाहेबांच्या पहिल्या पत्नी हजरत खदीजा (र.) यांचा मोठा व्यापार असल्याचे त्यांच्या चरित्रात नमूद आहे.

प्रत्येक महामानवाच्या हृदयात केवळ करुणा भरलेली असते असे नाही, तर करुणेचा महासागर सदैव भरतीच्या अवस्थेत हेलावत असतो. पैगंबरसाहेबांच्या हृदयातही हा महासागर कसा हेलावत होता, याचा प्रत्यय त्यांनी सच्च्या मुस्लिमाने आपल्या शेजाऱ्यांशी वागताना कोणता व कसा ‘शेजारधर्म’ बाळगावा, याविषयी दिलेले आदेश वाचल्यावर आल्याशिवाय राहत नाही.

“प्रेषित मुहम्मद (स) विचारतात, तुम्हाला माहीत आहे शेजाऱ्याचे काय हक्काधिकार आहेत? त्यानं मदत मागितल्यास त्याची मदत करा. त्यानं कर्ज मागितल्यास त्यास कर्ज द्या. तो उपाशी राहत असल्यास त्याच्या जेवणपाण्याची सोय करा. आजारी पडल्यास त्याची विचारपूस करा. त्याचं काही शुभ घडलं असेल तर त्याला शुभेच्या द्या. अडचणीत सापडला असेल तर त्याला धीर द्या. तो मरण पावल्यास त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी व्हा. त्याच्या घरापेक्षा उंच घर बांधून त्यांच्या हवेत अडथळा आणू नका. तुम्ही घरी काही शिजवत असल्यास त्याचा वास त्याच्या घरात जाऊ देऊ नका. जे काही पक्वान्न केले असेल त्यातून त्यालासुद्धा द्या. जर तसे जमत नसेल तर आपल्या मुलांच्या हातात ती खायला देऊन त्यांना बाहेर जाऊ देऊ नका, ज्यामुळे शेजारील मुलांना त्यापासून वंचित असल्याचं दु:ख होऊ नये.”

कोणासही गुलाम करणे, पैगंबरसाहेबांना निर्दयी वाटत होते. गुलामालासुद्धा अधिकार असतात, त्यांना चांगले अन्न व वस्त्र द्यावीत, कुवतीपेक्षा जास्त काम सांगू नये, अशी त्यांची शिकवण होती. एके ठिकाणी त्यांनी म्हटले आहे की गुलाम तुमचे बांधव आहेत आणि अल्लाहनं त्यांना तुमच्या ताब्यात दिले आहे. बंधुता हे तत्त्व त्यांनी गुलामालाही लागू केले होते.

ज्यूंसारख्या इतर धर्मियांना पैगंबरसाहेब शत्रू मानत नव्हते, याचा पुरावाही त्यांच्या चरित्रात मिळतो. जेव्हा त्यांनी मक्केहून मदीनेत स्थलांतर केले त्या वेळी ज्यूंची मोठी वस्ती तिथे होती. पैगंबरसाहेबांनी त्यांच्याशी करार केला. त्यानुसार ज्यूंना आपल्या धर्मानुसार जगण्याचे, धर्माच्या नियमांचे पालन करण्याचे स्वातंत्र्य दिले गेले. पण अरबांपैकी कुरैशी जमातीच्या लोकांनी पैगंबरांचे व त्यांच्या अनुयायांचे जगणेच धोक्यात आणले तेव्हा मात्र त्यांना अल्लाहच्या आदेशानुसार स्वसंरक्षणार्थ युद्धे करावी लागली. असा हा लष्करी संघर्ष २३ वर्षे चालला आणि त्यासाठी पैगंबरसाहेबांना २७ लढाया लढाव्या लागल्या! या लढाया इस्लामच्या संरक्षणासाठी होत्या. प्रदेशप्राप्तीसाठी अथवा धनदौलतीसाठी नव्हत्या. या संदर्भात पैगंबरसाहेबांचे उद्गार असे आहेत,

“अल्लाहच्या गौरवासाठी जो लढतो तोच अल्लाहच्या कारणास्तव युद्ध करतो. इस्लामचा स्वीकार करणं अथवा नाकारणं हा ज्याचा त्याचा आणि अल्लाह व त्या व्यक्तीच्या अखत्यारीतला प्रश्न आहे.”

प्रस्तुत चरित्रकाराने या संदर्भात केलेले भाष्य फार महत्त्वाचे आहे. तो म्हणतो, “बळजबरीनं कुणास इस्लाम स्वीकारण्याची सक्ती पैगंबरांनी केली नव्हती.”

इस्लामच्या प्रसारासाठी पैगंबरसाहेबांनी तलवार हाती घेतली, असा जो सार्वत्रिक समज अनेकांचा झालेला असतो, त्यास हे चरित्र सत्य काय होते, याचे दर्शन घडवते. हे खरे की नंतरच्या काळातील मुस्लिम राज्यकर्त्यांनी इस्लामच्या नावे अनेक लढाया, कत्तली, लुटालूट करून धर्मप्रसार केला, आपली राज्ये स्थापन केली, किंवा वाढवली. पण त्यांना इस्लामचे सच्चे अनुयायी म्हणता येणार नाही. पैगंबरसाहेबांच्या चरित्रात अशी हिंसक कृत्ये आढळत नाहीत. पैगंबरांचे सर्व आचरण, सर्व शिकवणूक, सर्व धार्मिक नियम हे मानवधर्माच्या चौकटीत बसणारे होते. येथे धर्माच्या नावावरची हिंसा निषिद्ध होती.

या चरित्रग्रंथात पैगंबरसाहेबांविषयी एक आठवण सांगितली आहे. ती फार उद्बोधक आहे : “प्रेषित मक्केजवळील ताईफ या शहरास इस्लामच्या प्रचारास गेले असता तिथल्या लोकांनी लहान मुलांना त्यांच्यावर दगडांचा मारा करण्यास सांगितलं. ते रक्तबंबाळ झाले. त्यांची पादत्राने रक्ताने माखून गेली. अशा वेळी त्यांचे सेवक ह. झैद यांनी त्यांना सांगितलं, “ताईफच्या लोकांना तुम्ही शाप द्या.” पण प्रेषितांनी आपले हात पसरून अल्लाहजवळ प्रार्थना केली, “हे अल्लाह! ताईफवाल्यांना सद्बुद्धी दे.” दोन देवदूत त्यांच्याकडे आले नि म्हणाले, “जर आपण आज्ञा दिली तर आम्ही या वस्तीला त्या डोंगरांमध्ये चिरडून टाकू.” प्रेषित म्हणाले, “नाही. मी दयावान बनवून पाठवला गेलोय.”

उहुदच्या युद्धात प्रेषित मुहम्मद (स) यांना इजा पोचली. त्यांचे सोबती म्हणाले, “विरोधकांना शाप द्या.” प्रेषित म्हणाले, “मी लोकांना कष्टात टाकण्यासाठी नव्हे तर त्यांच्यावर कृपावर्षाव करण्यासाठी आलो आहे.”

इतिहासातील इस्लामचे अनुयायी पैगंबरसाहेबांचे जीवनचरित्र आदर्शभूत मानून वागले काय? इतिहासातील उदाहरणे सोडून देऊ. आज इस्लामचे स्वत:चे सच्चे अनुयायी म्हणवणारे आपल्याच बांधवांच्या कत्तली, हत्या करण्यात धन्यता मानत नाहीत काय? मस्जिदमध्ये शांतपणे नमाज अदा करणाऱ्या आपल्याच बांधवांवर स्वत:ला `इस्लामचे वीर' म्हणवणारे बॉम्ब टाकून अथवा मशीनगन चालवून ‘जिहाद’चा पुकारा करतात, तेव्हा ते पैगंबरसाहेबांच्या शिकवणुकीपासून आपण शेकडो कोस दूर गेल्याचे भान ठेवतात काय? जेव्हा शाळांमधील निरपराध निरागस मुलांवर गोळ्यांचा वर्षाव केला जातो, त्या वेळी त्या ‘वीरां’ना आपल्या घरातील मुले आठवत नसतील काय?

या सर्व प्रश्नांची उत्तरे दुर्दैवाने नकारार्थी द्यावी लागतील. आज आपण पुन्हा एकदा पैगंबरपूर्व काळातील समाजाच्या हीनावस्थेच्या दिशेने वाटचाल करत आहोत की काय, हा प्रश्न जगातील शांतताप्रिय लोकांना सतावत आहे. प्रस्तुत लेखकही याच प्रश्नाने अस्वस्थ झाला आहे. त्यांनी आपल्या चरित्रग्रंथाच्या शेवटी हाच प्रश्न उपस्थित करून हिंसाचार, अत्याचार यांनी ग्रासलेल्या जगाच्या भविष्याकडे आपणा सर्वांचे लक्ष वेधवून घेतले आहे. अस्वस्थ व चिंताग्रस्त भावनेने ते विचारतात,

“आपण जगाची सद्य:स्थिती पाहिली तर असे दिसतं की काळाचं हे चक्र कदाचित इस्लामपूर्वी जेव्हा मानवता विध्वंसाकडे लोटत होती, त्याच वळणावर तर थांबलं नाही? पाश्चात्य विचारवंत असे म्हणतात (पण आम्हाला मान्य नाही) की माणसाची उत्पत्ती माकडापासून म्हणजेच जनावरापासून झालीय. माकडाचं एकदा माणूस झाल्यावर पुन्हा प्रतिउत्पत्ती होऊन माणूस माकड होणार आहे की काय! लोक ज्यास सभ्यता म्हणतात त्या मानवी सभ्यतेचे पाशवी सभ्यतेमध्ये रूपांतर होत आहे का? हा प्रश्न आज मानवजातीसमोर उभा आहे.”

जनाब सय्यद इफ्तिखारसाहेब यांचे आम्ही पुनश्च अभिनंदन करतो ते एवढ्यासाठी की त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण, संशोधनपूर्ण असे मुहम्मद पैगंबरसाहेब यांचे चरित्र मराठीत आणले आहे. त्यासाठी त्यांनी ५० हून अधिक साधनग्रंथांचा आधार घेतला आहे. त्यांच्या प्रतिपादनात कुठेही अभिनिवेश नाही. अत्यंत सोप्या शैलीत रसाळ भाषेत त्यांनी पैगंबरसाहेबांचे हे चरित्र लिहून केवळ इस्लामचीच नव्हे तर मराठी भाषेचीही सेवा केली आहे. माझ्यासारख्या मुस्लिमेतर व्यक्तीलाही या चरित्रातून खूप शिकायला मिळाले, हे या ग्रंथाचे यशच म्हणावे लागेल! मला या ग्रंथासाठी ‘पुरस्कार’ लिहावयास सांगून खरे तर त्यांनी माझ्याकडून पैगंबरसाहेबांच्या चरित्राचा अभ्यास करवून घेतला, याबद्दल मी त्यांचा ऋणी याहे. त्यांच्या पुढच्या वाटचालीस माझ्या शुभेच्छा!

............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

पुस्तक २५ ऑक्टोबरनंतरच उपलब्ध होईल याची नोंद घ्यावी.

............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 16 October 2018

लेखातलं हे वाक्य कळीचा मुद्दा आहे : >>नमाज, रोजे अशा बाबी पुऱ्या केल्या म्हणजे इस्लामच्या अनुयायाने कर्तव्य पुरे केले, या समजुतीत राहू नये <<. हे वाक्य बकऱ्यांची कुरबानी देणाऱ्यांना समजावून सांगायला हवंय. मुस्लीम विचारवंतांनी हे आव्हान स्वीकारलेलं बघायला आवडेल. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......