व्यंगविनोद आणि अश्लीलता!
ग्रंथनामा - झलक
मनोहर सप्रे
  • ‘मनोहारी’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Sat , 06 October 2018
  • ग्रंथनामा झलक मनोहारी Manohari मनोहर सप्रे Manohar Sapre व्यंगचित्रकार Cartoonist

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांचं ‘मनोहारी’ हे नवं पुस्तक नुकतंच प्रफुल्लता प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. त्यातील हे एक प्रकरण.

.............................................................................................................................................

खूप वर्षांपूर्वी ‘सोसायटी अँड मॉरल्स’ या पुस्तकात आरंभीच उपस्थित केलेला एक सवाल व्यंगविनोदाच्या निमित्तानं डोळ्यांसमोर येतो! तो म्हणजे जिच्याविषयी सारा समाज नैतिक हाकाटी करतो ती खून, मारामाऱ्या, फसवाफसवी, शारीरिक छळ, दरोडे अशी गुन्हेगारी साहित्य आणि सिनेमाचा विषय म्हणून आम्हाला बिनदिक्कत चालते, मग त्यातल्या लैंगिकतेबाबत आम्ही एवढे हळवे आणि अनुदार होतो, ते का? एकूण व्यंगविनोदाबाबतही नेमका हाच सवाल उभा होतो, म्हणून त्याचं लैंगिकतेशी नातं काय हा प्रश्न उभा होतो!

एक गोष्ट मात्र निश्चित की, श्लील-अश्लील हा भेद मुळातच स्थळ, काळ, परिस्थिती, संदर्भ आणि व्यक्ती इतक्या विविधतेला सापेक्ष आहे. या सगळ्यात काळानुसार बदल होत जातात. मात्र कालचं अश्लील आज श्लील म्हणून दुर्लक्षित होतं. साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या आचार्य अत्र्यांच्या ‘ब्रह्मचारी’ सिनेमात मीनाक्षीला पोहण्याच्या पोशाखात दाखवल्यानं कोण हाहाकार माजला होता! आज स्त्रीच्या उघड्या अंगाविषयी कुणाला खंत वाटत नाही आणि वाटलीच तर उरलेल्यांविषयीच हळहळ वाटते! आज जे विनोद आणि जी व्यंगचित्रं विविध प्रसारमाध्यमांतून लोकांपर्यंत पोचतात, त्यातला एखादा पण पूर्वी बाहेर आला नसता!

श्लील-अश्लील हा निवाडा ज्या निकषावर होतो, तो म्हणजे समाजमान्यताप्राप्त लैंगिकता. वस्तुत: माणसातल्या प्राणित्वाचा एक अंगीभूत भाग म्हणून लैंगिकता हे एक निसर्गवास्तव आहे. पशुप्रमाणे त्यात नैतिक-अनैतिक असा कुठलाच मूल्यभेद नाही. पशुप्रमाणेच मुक्त व स्वैर लैंगिक संबंध संपून मानवात स्थिर असे युगुल (pair bond relation) संबंध निर्माण झाले, तेव्हा कुठे लैंगिक नियमन हा समाजव्यवस्थेचा मूलाधार झाला. आणि तेथून श्लील-अश्लील हे भेद सुरू झाले. आरंभीच्या साऱ्या समाजव्यवस्था याबाबत कडक आणि कठोर होत्या. मात्र यंत्रयुगाच्या सुरुवातीनंतर क्रमानं होत गेलेल्या शहरीकरणातून मानवी समूहात जे बदल झाले, त्यात व्यक्तिस्वातंत्र्यात जलदगतीनं होत गेलेली वाढ हा फार मोठा घटक होता! त्यातून सनातन्यांची व्यक्तिजीवनावरची पकड सैल होत गेली. या ओघात विनोदाच्या प्रांतात पाश्चात्य विनोदात मिस्किलीच्या माध्यमातून लैंगिकतेचा शिरकाव झाला आणि पुढे तिचा अश्लीलतेकडे जरा जादा झुकाव सुरू झाला. ‘परमिसिव्ह’ समाजव्यवस्थेमुळे या प्रक्रियेला जोरकस उत्तेजन मिळाल्यामुळे जागतिक पातळीवरच्या विनोदात हा गुणविशेष अनिर्बंध पाझरला. ‘प्लेबॉय’ आणि ‘मॅड’ यांसारख्या नियतकालिकांनी ब्रँड म्हणून जागतिक व्यंगविनोदाला आकार देणं हा याचा पुरावा!

अश्लील माध्यमाची एक जमेची बाजू म्हणजे त्यातून सांगितलेला विनोद समजायला विशेषसा बौद्धिक व्यायाम लागत नाही. शिवाय अधिक धारदार म्हणून जादा हास्यकारी होतो. फक्त त्यात अश्लीलतेचा अतिरेक होऊन तो बीभत्स होण्याची शक्यता वाढते. ही अवस्था टाळण्यासाठी योग्य त्या संतुलनासाठी कोणता निकष लावावा हा कूट प्रश्न निर्माण होतो. मात्र उपहासिक विनोदांबाबत अश्लीलता काही प्रमाणात क्षम्य ठरते, कारण त्यातली अश्लीलता साध्य नसून टीका म्हणून केवळ साधनीभृत असते.

व्यंगविनोदाची व्यक्ती व वर्ग सापेक्षता लैंगिकतेचा जरा जरी सार्वजनिक उल्लेख झाला तरी सनातनी अश्लीलतेची ओरड करतात. लैंगिकता आणि अश्लीलता या संज्ञा अध्येमध्ये संलग्न केल्या जात असल्या तरी तत्त्वत: त्या एक नाहीत. अन्यथा लैंगिक शिक्षणावरची पुस्तकं अश्लील ठरतील की! याचा अर्थ हा की केवळ व्यंगविनोदात लैंगिकतेचा वापर केला म्हणून तो अश्लील ठरत नाही! लैंगिकता ही मानवी प्राण्याची नैसर्गिक अशी सुप्त प्रेरणा आहे. परंपरागत सांस्कृतिक संस्कार म्हणून तिची प्रगट अभिव्यक्ती नाकारली जाते. विनोदाच्या आडवळणी माध्यमातून खुबीदारपणे ती व्यक्त केल्यावर ती हास्यकारी ठरते.

थोडक्यात वास्तवाचंच विडंबनात्मक रूपांतर म्हणजे विनोद, मग तो शाब्दिक असो वा चित्रित असो! पुरुषाला स्त्रीविषयक कायम नैसर्गिक आकर्षण असतं, हे चिरंतन वास्तव हास्यकारकतेतून अधोरेखित करणं हीच तर त्यातली व्यंग्यचित्रकारांची इच्छा आणि किमया आहे! यात कुठलीच ठळक विकृती नसल्यानं लैंगिक संदर्भ असूनही त्यात काहीएक आक्षेपकारी नाही! पुरुषी वासनेच्या वेगळेपणाच्या संदर्भातलं सोबतचं व्यंगचित्र बघा. त्यात घराची यजमानीण मैत्रिणीला म्हणते, “मला बाई हे घर मुळीच आवडलं नव्हतं, पण यांचाच हट्ट पडला ना?... म्हणे काय छान दृश्य दिसतं इथनं!” आता बोला!

जीवनमूल्यांकडे बघण्याची स्त्री-पुरुष यांची नजर व्यक्तीसापेक्ष म्हणजे संपूर्णपणे वेगवेगळी असते, हे आपण सगळे प्रत्ययही अनुभवतो. ती किती पराकोटीची भिन्न असू शकते याचा ‘रीडर्स डायजेस्ट’मध्ये आलेला एक बहारीचा किस्सा माझ्या जमेस आहे. वरवर चावट वाटणाऱ्या त्यात स्त्री-पुरुष जीवनवास्तवाची एक विलक्षण आणि धारदार अनुभूती देण्याचं सामर्थ्य आहे. नग्न चित्रकारितेत खास प्रावीण्य असलेला एक चित्रकार असतो. घरातच त्याचा स्टुडिओ असतो. तिथं नग्न मॉडेल या नात्यानं पोज द्यायला एक तरुणी त्याच्याकडे रोज येत असते. एके दिवशी ती अशीच येऊन कपडे उतरवायला लागली असता चित्रकार म्हणतो, “असू दे, आज काम बंद ठेवू या. मला बरं नाही म्हणून मूड नाही. फक्त एक कप चहा मात्र करून देशील तर बरं!” मॉडेलनं त्याप्रमाणे त्याला चहा करून दिला आणि तो तो घेत असता ती त्याच्याशी बोलत बसली. दरम्यान, गेटचं लॅच उघडल्याचा आवाज आला. तो ऐकताच चित्रकार गडबडून म्हणतो, “बाप रे! बायको आलेली दिसते?... चटकन कपडे काढ बघू!” चित्रकारी संदर्भात मॉडेलची नग्नता अक्षम्य ठरू नये, मात्र तिनं ‘वस्त्रात’ नवऱ्याला चहा करून देणं मात्र बायकोला गैर व संशयास्पद वाटावं हा निखळ विनोद नाही, तर या उपहासातून स्त्री स्वभावाची सार्वत्रिकता दर्शवणं आहे!

व्यंगविनोदाच्या प्रांतात असल्याच सापेक्षतेपायी एक मजेशीर विरोधाभास आढळतो. तो म्हणजे जिथं अश्लीलता मूळ चित्र वा मजकूर यात कणभरही नसते, तिथं नकळत वाचक वा प्रेक्षकच आपणहून ती गृहीत धरून चालतात. जसं एका छोट्याशा खाजगी ‘गेट टूगेदर’मध्ये रात्रीचे दहा वाजून गेलेत म्हणून एक तरुण विवाहिता उठून पलीकडल्या पुरुषांच्या जमावातल्या आपल्या नवऱ्याला जरा चढ्या आवाजात म्हणते, “अहो, चला की! जवळजवळ झोपायची वेळ झालीय!” त्यावर लगेच सगळ्या चेहऱ्यांवर मिस्कील हास्य झळकतं, ते मग का?

या पुढलं उदाहरण तर एक अतर्क्य अशी अफलातून वास्तव घटना आहे, दादरच्या एका बँकेत वास्तवात घडलेली! एक बाई तिथल्या काउंटरवर अकाउटंटशी तंटत असतात. त्यांच्या अकाउटंचे तपशील काही केल्या बँकेशी जुळत नसतात. तेव्हा त्या आरडाओरड करत म्हणतात- “अहो असं काय म्हणताय, जमणार नाही म्हणून! तुम्ही तुमचंच धरून बसलात तर कसं होईल? तुम्ही माझी फिगर पहा ना नीट. हवं तर मी सगळं उघडून दाखवते तुम्हाला. मग तुम्ही हात लावा. तुम्ही आधी खाली तर बघा. खालची फिगर बघा. मग तुमचं पाहा! सगळं तुमच्या हातात आहे! आपण दोघांनी बसून नीट केलं तर सगळं नीट जमेल. तुमची करायची इच्छा पाहिजे फक्त. अगदी तुम्ही माझी फिगर धरून उलटे खालून वर करत गेलात ना तरी मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही रोज करता म्हणजे आम्ही कधी केलंच नाही असं नाहीये. स्वत:च माझ्या हातांनी हे सगळे करू शकते!” तात्पर्य, यावर तुमची प्राथमिक प्रतिक्रिया काय ते तुम्हीच बघा!

व्यंगविनोदाची संदर्भ सापेक्षता!

सारे ज्याला चक्क अश्लील म्हणून शिक्का मारतील असा एक खाससा अफलातून किस्सा माझ्या जमेस आहे. तो मुद्दाम इथं देतो. विशेष म्हणजे त्यातल्या तिन्ही घटनांत परिस्थितीजन्य संदर्भ समान आहे. मात्र प्रत्येकाचं लक्ष्य म्हणजे बेअरिंग वेगवेगळं आहे. संकरित पैदाशीसाठी गाय फळवणं यासाठीचे हे सारे प्रयत्न आहेत. अश्लीलतेकडे स्पष्ट झुकलेल्या पहिल्या उदाहरणात हा प्रयोग दाखवण्यासाठी व्हेटेरनरी कॉलेजमधील प्राचार्य मुला-मुलींना एकत्र करून सर्वांना उद्देशून म्हणतात, “तुम्ही समोर जे जे दिसतं ते लक्षपूर्वक पहा आणि नंतर ते वहीत सविस्तर लिहून अखेर तुमचा निष्कर्ष नोंदवा!” तिथं एक गाय आणली जाते. पाठोपाठ एक वळू आणून तिच्यावर सोडला जातो. तो गायीभोवती फक्त चार-सहा फेऱ्या मारून स्तब्ध उभा राहतो. गायीतच काही तरी गडबड असावी हे वाटून मग दुसरी गाय आणण्यात येते, पण वळूचं पुन्हा तेच! अशा क्रमानं चार-पाच गायी बदलून होतात, पण वळूचं प्रत्येक वेळी तेच! हे पाहून प्राचार्य वैतागून प्रयोगशाळेत जाऊन एक थोरला चिमटा घेऊन येतात आणि त्यानं वळूच्या माथ्यावरचे बचकाभर केस उपटतात. तसा चिडून वळू पुढलं काम फत्ते करतो. प्रयोग संपतो, तसे विद्यार्थी नोटबुकमध्ये लिहू लागतात. प्राचार्य प्रत्येकामागे उभा राहून वाचत जातात. एका मुलीनं सर्व काही सविस्तर लिहून खाली आपला निष्कर्ष लिहिलेला असतो- “या प्रकारे आमच्या प्राचार्यांना टक्कल का आहे, हे आम्हाला समजलं!”

दुसऱ्या उदाहरणातही स्थिती तीच असते, तिथंही गायी पाठोपाठ तशाच बदलल्या जातात, पण आयात केलेल्या अमेरिकन वळूचं फेऱ्या मारणं आणि नंतर स्तब्ध होणं तसंच! अखेर वळूतच काही गडबड असावी म्हणून कॉलेजचे प्राचार्य ताबडतोब अमेरिकेत मेल पाठवून हे असं का, अशी विचारणा करतात, तेव्हा तडक उत्तर येतं की, “आम्ही वळूचा बायोडाटा काळजीपूर्वक तपासला, तेव्हा लक्षात आलं की, आम्ही चुकून तुम्हाला ‘कन्सलटंट’ पाठवलाय!”

तिसऱ्या प्रयोगातही प्रसंग व रचना तीच, फक्त तो प्रकार बघायला पती-पत्नी असं एक जोडपं गेलेलं असतं. तेथील रेतन विधी पाहून पत्नी उत्सुकता म्हणून तेथील तज्ज्ञाला विचारते, “का हो, एक वळू गायीला किती वेळा फळवू शकतो?” उत्तर येतं, “आठ-दहा वेळा!” बाई कोपरखळी मारून नवऱ्याला उपरोधानं म्हणते, “बघा हो!” नवराही बेटा चांगलाच बेरकी असतो. तो तज्ज्ञाला विचारतो, “काय हो, गाय तीच का वेगवेगळ्या?” त्यावर उत्तर येतं- “वेगवेगळ्या!’’ मग नवरा बायकोला म्हणतो, “बघ ग!”

वरील तिन्ही उदाहरणांपैकी पहिल्यात कल्पनारम्य चमत्कृतीतून निखळ हसवणं हा हेतू आहे. दुसऱ्यात ‘कन्सल्टन्ट’ या एकूण ‘निष्क्रिय’ वर्गावर उपहासिक टोमणा वा सटायर आहे, तर तिसऱ्यात फक्त विवाहितांनाच समजेल अशा बेरकी मानसशास्त्रीय वास्तवाचा मिस्किली चिमटा आहे! तात्पर्य, वरील दुसऱ्या आणि तिसऱ्या किस्स्यात अश्लीलता हे फक्त माध्यम आहे, तर पहिल्यात ते केवळ उद्दिष्ट आहे! मात्र सामान्यत: वाचक हा मूलभूत फरक विसरून त्यांना सर्रास एकाच मापानं निखळ हास्यकारीच मानतात. मुळात ही त्यांच्या रसिकतेतली उणीव आहे.

व्यंगविनोदातली सांकेतिक सूचकता!

सोबत ‘कॉल बेल’वरचं एक बहारीचं व्यंगचित्र दिलेलं आहे. त्यात कॉलबेलचं बटण म्हणून स्तनाग्राचा वापर दाखवला आहे. हीच त्यातली अश्लीलतेची झाक आहे, पण व्यंग्यचित्रकारानं केवळ आपल्या विलक्षण कल्पकतेनं तीवर मात केलेली आहे. आणि परिणाम म्हणून हे चित्र केवळ मिस्किलीत जमा झालं आहे. तात्पर्य, खाद्यान्नात मसाल्यानं जी लज्जत येते, तीच नेमकी केवळ सांकेतिक शृंगारिक लैंगिकतेनं येते.

याचा एक नमुनेदार किस्सा असा - एक पत्नी नवऱ्याला म्हणते, “शेजारच्या जोश्यांनी सिगरेट सोडली, नाही तर तुम्ही बघा, कशातही जरासुद्धा संयम नाही!” यावर नवरा तापून म्हणतो, “ठीक आहे! आता दाखवतोच तुला माझ्यात किती संयम आहे तो! आजपासून आपण वेगवेगळ्या खोल्यात झोपायचं!” लगेच तशी सुरुवात होतेही! असे दोन-चार दिवस गेल्यावर एके दिवशी रात्री नवऱ्याच्या दारावर हलकी थाप पडते. तो दार उघडून बघतो, तो बाहेर बायको उभी! नवरा विचारतो, “काय ग?” त्यावर ती उत्तरते, “अहो, जोश्यांनी सिगरेट सुरू केली की!”

थोडक्यात असं म्हणता येईल की, अश्लीलतेकडे झुकलेल्या विनोदात वा व्यंगचित्रात सांकेतिकता जेवढी सूक्ष्म तेवढा त्याचा कलात्मक दर्जा थोरला! वेगळ्या भाषेत सांकेतिकता ही एक प्रकारची अंतर्गत मर्यादा वा ‘सेन्सॉरशिप’च की! याच कोटीतलं ज्याला अभिजात म्हणता येईल, असं सोबतचं एक व्यंगचित्र. तसं पाहता छोट्या मुलाला घेऊन फिरायला निघालेले आई-बाप हे काही फार दुर्मीळ दृश्य नव्हे! पण या व्यंग्यचित्रातली खुमारी त्यातल्या तिघांच्या कपड्यांच्या डिझाईनवरून लगेच ध्यानात येईल! मुलाच्या कपड्यांवरचं चौकडीचं डिझाईन हा उघडच मातापित्याच्या लैंगिक मीलनाचा संकेत आहे, म्हणजे एक प्रकारे ती अश्लीलता असूनही संकेती तंत्रामुळे तिला हास्यकारी स्वरूप आलं आहे. आणि हीच व्यंग्यचित्रकारितेची खरी किमया!

अश्लीलता, सामाजिक-राजकीय टीकेचं एक प्रभावी माध्यम!

अश्लीलता एक अभिव्यक्ती माध्यम म्हणून फार प्रभावी असल्यानं अलीकडे विनोदातून तिचा वापर सामाजिक, राजकीय टीकाकार फार मोठ्या प्रमाणावर करू लागला आहे. सामाजिक पातळीवरचा त्याचा एक नमुना असा. घटना अमेरिकेतली! एका तरुणाचं शेजारच्या मुलीवर प्रेम असतं. आपण तिच्याशीच लग्न करणार असं तो जाहीर करतो. बापाचा या प्रस्तावाला कडाडून विरोध असतो, पण याचं कारण काय ते तो काही केल्या सांगत नाही. अखेर निकरावर येऊन मुलगा ते विचारतो, तेव्हा बाप कुजबुजत म्हणतो, “अरे, ती तुझी बहीण आहे!” हे ऐकून मुलाला पराकोटीचा धक्का बसतो आणि तो गलितगात्र होतो. त्याची ही हालत पाहून आई पाठीवर हात फिरवून त्याला म्हणते, “बेटा, तू बिनदिक्कत तिच्याशी लग्न कर... तू काही तिचा खरा भाऊ नाहीस!” आजच्या अमेरिकन समाजातल्या नैतिक घसरणीवरचा हा अप्रतिम परिणामकारी उपहास आहे! आता बोला!

कायम वादग्रस्त ठरलेल्या श्लील-अश्लील या द्वंद्वाबाबत समारोपात एवढंच म्हणता येईल की, ही बाब प्राय: ‘पुरुषार्थी’ आहे आणि याला कारण पुरुषाचं दुपेडी व्यक्तिमत्त्व, समूहात आणि खासगीत वेगवेगळं असलेलं! समूहात वावरताना माणूस कायम संभावितपणाचा मुखवटा घालून असतो. त्याच्या बोलण्या-चालण्याला अदृश्य मर्यादा असतात. मात्र हाच माणूस खासगी मैफिलीत ‘खासे’ जोक्स न कचरता सांगत असतो!

विषयासंदर्भात दुसरा एक सहसा विचारात न घेतला जाणारा मुद्दा आहे, तो म्हणजे अश्लील व्यंगविनोदांच्या प्रांतात स्त्रियांचा सहभाग जवळपास नगण्य आहे. फार तर त्यांच्याबाबत एक सुप्त ग्राहकता त्यांच्यात असू शकेल! एकूण व्यंगकारितेत स्त्रिया अभावानंच असणं हा म्हणून केवळ योगायोग मानता येत नाही! यात त्यांच्यासाठी ‘विनयभंग’ हा मुद्दा महत्त्वाचा असावा वा याला सामाजिक सेन्सॉरशिप तरी कारणीभूत असावी. मात्र असल्या सगळ्या किस्स्यांत ‘पात्र’ म्हणून स्त्री सहभाग हा अटळपणे असतोच!

विषयाच्या समारोपातला अखेरचा मुद्दा म्हणजे माध्यम म्हणून लैंगिकतेचा प्रमाणित आणि संयमित वापर गैर नसून रास्त असतो. विनोदाला अश्लीलतेचा सूचकसा हलका स्पर्श देण्यातून कितीतरी अभिजात विनोद निर्माण झालेले आहेत! त्यातला एक बेहद्द नमुना म्हणून एका फ्रेंच व्यंगचित्राचा दाखला देतो. त्यात जेमतेम दहा-अकरा वर्षांची एक बाला आपल्या नितंबांवर ब्रेसियर लावून आरशात पाठमोरी बघताना दाखवली आहे. बालवयात सर्वांनाच आपण केव्हा मोठे होऊ याची उत्सुक घाई असते. त्यातून तारुण्याच्या उंबरठ्यावर ‘फॅन्टसीज’ निर्माण होतात. कारण त्या फार सुखद असतात. प्रस्तुत व्यंगचित्रात वयात येण्याची ही उमंग मिस्किलीतून रेखाटली आहे. मुलं बऱ्याचदा खोट्या-खोट्या मिशा लावतात, तसलाच हा प्रकार! म्हणूनच माध्यम लैंगिक असूनही हे चित्र मानसशास्त्रीयदृष्ट्या अभिजात मानलं गेलं आहे!

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................