सर्व स्त्री-मनांचा विचार करणारी मंदोदरी आणि फक्त स्वत:चा विचार करणारी शूर्पणखा!
ग्रंथनामा - झलक
शरद तांदळे
  • ‘रावण राजा राक्षसांचा’ या कादंबरीचं मुखपृष्ठ
  • Fri , 05 October 2018
  • ग्रंथनामा झलक रावण राजा राक्षसांचा Ravan Raja Rakshasancha शरद तांदळे Sharad Tandale

‘रावण राजा राक्षसांचा’ ही शरद तांदळे या तरुण लेखकाची पहिलीवहिली कादंबरी अलीकडेच प्रकाशित झाली आहे. आपल्याला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी या कादंबरीतून समजून घेता येतात. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

आतापर्यंत मी तीन विवाह केलेत. कित्येक सुंदर स्त्रियांशी रममाण झालो, पण मंदोदरीला कधी काहीच वाटलं नाही. मग आज माझ्या मनात विवाहाचा विचार नसताना तिला चिंता का वाटावी? तिला जवळ बसवून म्हणालो,

“माझं आता शारीरिक भोगाचं वय संपलेलं आहे. त्यामुळे फक्त शारीरिक सुखासाठी मी विवाह करेन अशी शंका तुझ्या मनात असेल तर ती काढून टाक. माझी अर्धांगिनी फक्त तू आहेस.’’ तिच्या खांद्यावर हात ठेवून पुढं बोलू लागलो,

“सीतेला आणलं याचं कारण तुला माहीत आहे. राहिला प्रश्न तिला आणण्यासाठी मी का गेलो. तिला आणण्यासाठी मी कोणालाही पाठवू शकलो असतो. प्रहस्त, महोदर किंवा इतर कोणीही; आणि कदाचित ते तिला घेऊन आलेही असते, पण राम-लक्ष्मण यांना ओळखू शकणारा मारीच हा एकमेव असल्यानं फक्त त्याला सोबत घेऊन गेलो. ते दोघंही धनुर्धारी असल्यानं वेळ, जागा बघून निर्णय घेणं गरजेचं होतं. त्यामुळे मी स्वत: गेलो. इतर कोणालाही पाठवलं असतं तर वेंधळेपणात रामाशी लढताना ते प्राण गमावून बसले असते, त्यामुळे राम सावध झाला असता. किंवा ते जिंकले असते तर रामाचा वध झाला असता. शूर्पणखेशी त्यांनी कसा दुर्व्यवहार केला हे तुला माहीतच आहे. खर आणि दूषण यांच्या हत्येचा सूड घ्यायचा होता. शूर्पणखेच्या विनयभंगाबरोबरच त्राटिकेची हत्या करताना स्त्रीच्या भावनांशी खेळल्यानं काय दु:ख होतं, याची जाणीव त्यांना व्हायला हवी. त्यांना लंकेत आणून दंडित करण्यासाठी हा प्रपंच केला.” असं म्हणून तिला स्मितहास्य दिलं आणि उठून खिडकीबाहेर बघू लागलो. “त्यांना शिक्षा देण्यासाठी आपण सीतेला आणलंत हे समजलं, पण तिला बघण्यासाठी सकाळीच आपण अशोकवनात गेलात म्हणून शंका वाढली. मारीचाला सोबत घेऊन गेला होतात, मग तो कुठे आहे?” माझ्या उत्तरानं तिचं समाधान झाल्यासारखं वाटलं. तरीही तिने पुढं विचारलंच. मग घडलेला प्रसंग मी तिला सांगितला “मारीचामुळेच मी सीतेला आणू शकलो. घटना वेगानं घडल्यामुळे त्याचा विचार न करताच मी तिथून निघालो. तो लंकेत येतो म्हणाला आहे. येईल काही दिवसांत. गुप्तचरांना आदेश देतो मारिचाला शोधून घेऊन येण्याचे.”

सकाळपासून मारीचाचा साधा विचारसुद्धा माझ्या मनात आला नव्हता. खरंच, स्वार्थी आहे मी. त्याचा शेवटचा चेहरा आठवला. सीतेला उचलतानाचा प्रसंग डोळ्यांसमोर आला.

मी विचारमग्न झालो...

“काय झालं राजन?” माझी विचारशृंखला तोडत मंदोदरीनं विचारलं.

“काही नाही मंदोदरी, सीता लक्ष्मणाला फार विषारी शब्दांत बोलली. तिच्या विखारी बोलण्यानं ती कुटीत एकटी राहिली. त्यामुळे तिला मी सहज आणू शकलो. त्या मूर्ख स्त्रीचा आपल्या दिरावर नाही, पण वल्कलं धारण केलेल्या ॠषींवर म्हणजे माझ्यावर विश्वास बसला. खरंच, स्वकीयांवर दाखवलेला अविश्वास संकटाकडे नेतो. अशा मूर्ख स्त्रीवर माझा जीव कसा जडेल? सुंदर स्त्रीवर पुरुष आसक्त होऊ शकतो, पण ती स्त्री मूर्ख आहे हे समजल्यानंतर तो तिच्यावर प्रेम नाही करू शकत. मंदोदरी, केवळ दिसायला सुंदर असणं आणि सर्वार्थानं सुंदर असणं यात फरक आहे. तू सर्वार्थानं सुंदर आहेस.”

माझ्या बोलण्यानं मंदोदरीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आलं. तिचं समाधान झालं हे मला जाणवलं. पण तिचे प्रश्न अजूनही संपले नव्हते. तिनं मला दुसरा प्रश्न लगेच विचारला. “राजन, रामाविषयी आपण माहिती काढलीच असणार, तरीही माझ्या मनात प्रश्न आहेतच. राम सीतेला शोधत येईल? कारण पुरुषांमध्ये एकाच स्त्रीवर प्रेम असलेली फार कमी उदाहरणं आहेत, आणि रामानं तर सीतेला स्वयंवरात जिंकलं आहे. अशा जिंकलेल्या स्त्रीसाठी तो इथवर येईल?” या प्रश्नावर आधीच मंथन झाल्यानं मी लगेच उत्तरलो,

“होय. नक्की येईल तो. स्त्री जिंकली आहे म्हणजे अधिकार आला. त्याच्यासोबत असतानाही सीता पळवली गेली, हा घाव त्याच्या जिव्हारी लागला असेल. शस्त्रावर प्रभुत्व असल्यावर तारुण्यात रागावर नियंत्रण मिळवणं अवघड असतं. त्यामुळे तो नक्की येणार, किंबहुना तो यावा यासाठी आपण त्याला माहितीसुद्धा पुरवणार आहोत.”

“सीता ही रामाची पत्नी, मग लक्ष्मणही येईल का? कारण सीतेनं लक्ष्मणाला दुखावलं आहे. मला नाही वाटत दोघं हिच्यासाठी त्रास घेतील. माझ्या अंदाजानुसार सीता सापडत नाही म्हटल्यावर दोघंही परत जातील. कारण स्त्री ही स्वयंवरात जिंकलेली असो, पळवून आणलेली असो वा विवाह करून आणलेली असो विषयवासना संपल्यावर जास्त प्रेम राहत नाही. माझ्या मते तर विषयवासना पूर्ण होईपर्यंतच पुरुषाचं स्त्रीवर प्रेम असतं.” चौफेर विचार करत विचारलेल्या तिच्या प्रश्नांना उत्तरं देण्यात मला आनंद वाटायचा. तिच्याकडं कौतुकानं बघत मी म्हटलं,

“मंदोदरी, विषयवासना आणि प्रेम या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीप्रमाणे त्याचं तिच्यावर प्रेम आहे. तेरा वर्षांचा सहवास असूनही पुत्रप्राप्ती नाही झाली, याचा अर्थ त्यांचं प्रेम आध्यात्मिक पातळीवर गेलं आहे. सीतेचा आर्त टाहो मी अनुभवला आहे. त्यामुळे दोघांमध्ये प्रेम नक्की आहे. प्रेम हे विषयवासनेनं सुरू होऊन आत्म्याच्या मीलनाच्या दिशेनं जात असतं. विषयवासना क्षणिक आनंद देते, तर प्रेम सहवासानं वाढत जातं. त्या प्रेमापोटी तो नक्कीच येईल, आणि लक्ष्मण रामासाठी वनवासात आलाय म्हणजे सीतेला शोधण्यासाठी तोही निश्चित येईल. तारुण्यातील पुरुषी अहम् भावना स्वस्थ बसू देत नसते. ती दोघं नक्की येणार.”

“समजा, राम आणि लक्ष्मण इथं आले तर मग पुढे काय?”

‘हं!’ म्हणत मी एक दीर्घ सुस्कारा टाकला. काही क्षण विचार करू लागलो. मंदोदरी प्रश्नार्थक नजरेनं माझ्याकडं बघत होती.

“राक्षस संस्कृतीत स्त्रियांविषयी काय विचार आहेत हे त्यांना सांगेन. त्राटिकेची हत्या आणि शूर्पणखेच्या विनयभंगाच्या गुन्ह्याबद्दल त्यांना उचित दंड देईन किंवा शूर्पणखेलाच त्यांना दंड देण्याचा अधिकार दिला जाईल, किंवा तिला त्या दोघांपैकी कुणा एकाशी विवाह करायचा असेल तर तो मी लावून देईन.”

“ते तयार होतील?” मंदोदरीनं लगेच दुसरा प्रश्न केला.

“नक्कीच. जिवाच्या भीतीनं तर कुणीही तयार होत असतं. राक्षस सम्राट रावणाचा नातेवाईक होणं हे त्रैलोक्यात कुणालाही आनंद आणि शक्ती देणारं आहे. शूर्पणखेवर माझ्याकडून अन्याय झालाय तो भरून काढण्यासाठी जे काही करता येईल ते मी करणार. राम-लक्ष्मणालाही आता त्यांच्या आयोध्येत सन्मानाची वागणूक मिळेल की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना एखादं राज्य देऊन सुखी आयुष्य भेट देईन. त्या दोघांपैकी कोणाशीही शूर्पणखेचा विवाह झाला तर तो माझ्यासाठी फार आनंदाचा दिवस असेल, आणि तो विवाह राक्षस संस्कृतीसाठी नवीन अध्याय असेल.” मी उत्साहात उत्तर दिलं.

“राजन, जर त्यांच्यापैकी एकाचं लग्न शूर्पणखेशी लावून द्यायची इच्छा आहे तर त्यांच्यातील एकाला इथं बंदी बनवून आणायचं होतं. सीतेला नव्हतं आणायचं.”

“मंदोदरी, ते काही लहान बालक नाहीत. युद्ध करावं लागलं असतं. सर्व शक्यतांचा विचार करूनच सीतेला आणलं आहे मी. आता तिला आणलंच आहे तेव्हा भूतकाळापेक्षा भविष्यकाळाचा विचार करणं चांगलं.” माझ्या या उत्तरानं ती निरुत्तर होईल आणि आता विषय बदलेल असं मला वाटलं. पण तिचं प्रश्न विचारणं सुरूच होतं.

“समजा, ते लंकेपर्यंत पोहचू शकले नाहीत; म्हणजे दंडकारण्यात खूप रानटी टोळ्या आहेत त्यांच्याशी लढताना जर त्या दोघांची हत्या झाली किंवा जंगली श्वापदांपासून त्यांना धोका झाला तर मग ज्या सगळ्या शक्यता आपण ठरवत आहात त्या साध्य होतील?” माझ्या त्रासिक चेहऱ्याकडे न बघता तिनं विचारलं-

“होतील साध्य. कारण दंडकारण्यानंतर वालीचं साम्राज्य आहे. आजच त्याला संदेश पाठवतो. गुप्तचरांकडून सर्व टोळ्यांना आदेश पाठवतो, की यांच्यावर कुणीही हल्ला करायचा नाही. तेरा वर्षं ते अरण्यात राहत आहेत त्यामुळे श्वापदांपासून संरक्षण करायला ते निश्चितच समर्थ आहेत. आपले गुप्तचर सदैव त्यांच्याबरोबर असतील याची काळजी घेऊ.”

“समजा, ते लंकेपर्यंत नाहीच पोहचू शकले तर सीतेला आपण परत पाठवणार का? तशी वेळ आलीच तर तिला कुठे पाठवणार याचा विचार केला आहे का?”

“मंदोदरी, खरंच याचा विचार केला नाही, परंतु तो विचार करायला आपल्याकडं वेळ आहे. काही दिवस त्यांची वाट तर बघू! जर ते नाहीच आले, तर तेव्हाच्या प्राप्त परिस्थितीनुसार तिला अयोध्येला पाठवू किंवा तिच्या पित्याकडं मैथिलीस सोडू” मी सहज उत्तर दिलं आणि विषय संपला असं समजून पाण्याचा घडा उचलला.

“राजन, तिचं आयुष्य नंतर सुखी होईल? तिला नंतर आर्य समाज स्वीकारेल? मला तर नाही वाटत. जर समाजानंच नाही स्वीकारलं तर पत्नी म्हणून राम तिचा पुन्हा स्वीकार कसा करेल? प्रत्येक पुरुषप्रधान संस्कृतीनं स्त्रीला भोगवस्तूच मानलं आहे. सीता सुंदर आहे आणि परपुरुषाच्या सान्निध्यात आहे. असं असताना तिच्या पावित्र्यावर कोणी विश्वास ठेवेल का? तिचं मन समजावून घेऊन तिचा पति तरी तिला पवित्र समजेल का? या सर्व प्रश्नांचं उत्तर ‘नाही’ असंच आहे. राजन, स्त्रीचं शील आणि पावित्र्य हे तिच्या आत्म्यानं, विचारानं किंवा प्राप्त अवस्थेवरून नाही ठरवलं जात, तर ते फक्त तिच्या शरीरानं ठरवलं जातं. समाज तिचा आक्रोश आणि दु:ख याकडं बघणार नाही. तिच्या भावनेचाही विचार करणार नाही. अपहरणानं तिच्या चारित्र्यावर डाग लागला आहे, जो आता कधीच पुसून निघणार नाही. कारण आजवर आपण अनेक स्त्रियांवर केलेली बळजबरी त्रैलोक्यात सर्वांना माहीत आहे. सीतेचं आयुष्य शापित झालं.” विखारी बोल बोलून मंदोदरीनं माझ्यावर शाब्दिक हल्लाच केला.

“मंदोदरी, स्त्रियांवर मी केलेले बलात्कार तरुणपणातील होते आणि ते प्रतिशोधातून होते. भूतकाळातील घटनांचा संबंध आताच्या प्रसंगाशी जोडू नकोस.” मी रागात म्हणालो.

“राजन, संबंध जोडणं आणि न जोडणं यापेक्षा आपण सुद्धा त्या वेळी स्त्रीलाच प्रतिशोधाचं साधन म्हणून वापरलं. त्यांनी शूर्पणखेच्या शरीराचा केलेला विनयभंग आणि आपण सीतेच्या चारित्र्याचा केलेला विनयभंग दोन्हीही सारखंच. राजकीय डावपेचात कोणीही जिंकत असेल, पण पराजय मात्र कायम स्त्रीचाच होत असतो. तो पराजय मला शूर्पणखा आणि सीता या दोघींमध्ये दिसत आहे.”

मंदोदरीच्या तिखट बोलण्यानं मी अस्वस्थ झालो. तिनं क्षणात मला आणि स्वत:ला दोन विचारधारांत वेगळं केलं. आई, शूर्पणखा, वेदवती, सीता या सगळ्यांचं प्रतिनिधित्व ती करू लागली, तर मी राम, इंद्र आणि कुबेर यांच प्रतिनिधित्व करू लागलो. आईवर झालेला  अन्याय भोगी पुरुषसत्ताक संस्कृतीचं मूळ रूप होतं, तर वेदवतीवरील बलात्कार हा पौरुषी आक्रमक वृत्तीचा उद्रेक होता. शूर्पणखेचा विनयभंग ही तिच्या प्रेमभावनेची हत्या होती; आणि सीता ही त्यांना धडा शिकवण्यासाठी मी वापरलेली बाहुली होती. त्राटिकेची हत्या मातृसत्ताक संस्कृती उदध्वस्त करण्याचं षढयंत्र होतं. कुबेराच्या सुनेवर केलेला बलात्कार प्रतिशोध घेण्याची क्रूर पद्धत वाटू लागली. मी अस्वस्थ झालो. विचारांच्या भोवऱ्यात गटांगळ्या खाऊ लागलो. मंदोदरीला काय उत्तर द्यावं समजेना. ती शांतपणे माझ्याकडं बघत होती.

“मंदोदरी, तरुणपणात मी विचारानं पोक्त नव्हतो. काळानुरूप माझ्यात बदल झालेत. लहान मुलं सुद्धा बालवयात छोट्या प्राण्यांना मारतात, त्यांचा छळ करतात. तरुणपणात विचार कमी, आक्रमकता जास्त असते. त्या वयात झालेल्या चुकांचा दोष त्या अल्लड वयाचा सुद्धा असतो. त्या वयातील चुकांची तू उतारवयातील घटनांशी सांगड घालू नको. वयानुसार प्रत्येक जण प्रगल्भ होत असतो. मी जर आता तरुण असतो तर प्रतिशोध हा सीतेवर बलात्कार आणि राम-लक्ष्मणाच्या क्रूर हत्येनंच झाला असता. परंतु आता मी राक्षस संस्कृतीचा जबाबदार अनुयायी आहे.” माझ्या बोलण्यावर ती शांतपणे खिडकीतून बाहेर बघत उभी राहिली.

आई आणि मंदोदरीचा अपवाद सोडला तर इतर स्त्रीमनांचा मी विचारच केला नव्हता. स्त्री म्हणजे भोग, या विचाराचा मी नाही. तरीही माझ्या हातून परत एकदा स्त्रीमनाची हत्या झाली. एका स्त्रीच्या विनयभंगाचा पुरुषाकडून प्रतिशोध घेण्याऐवजी मी सुद्धा स्त्रीचाच विनयभंग केला. खरंच, आम्ही सगळे पुरुष दोषीच आहोत.

जर मीही दोषी आहे तर रामाला दंड करण्याचा मला अधिकार आहे का? नाही. मी दोषी कसा असेन? मी फक्त सीतेचं अपहरण करून आणलं आहे. मी विनयभंग कुठे केलाय? मंदोदरी जरा जास्तच बोलली. माझ्या दोन्ही मनाचं द्वंद्व सुरू झालं. जर शरीरच पावित्र्याचं द्योतक असेल तर सीतेचा उपमर्द माझ्याकडून होणार नाही. मंदोदरीवर जर सीतेची काळजी घेण्याची जबाबदारी टाकली तर सीतेच्या पावित्र्यावर कोणीही अविश्वास दाखवू शकणार नाही. अचानक लहानपणी पकडलेल्या फुलपाखराची मला आठवण झाली. पण त्या वेळी ते फुलपाखरू मी मुक्त केलं होतं तरी त्याचा रंग माझ्या हातांना लागला होता. सीतेच्या चारित्र्यहननाचा रंग माझ्या हातावर नको लागायला.

“राजन, एवढा कशाचा विचार करत आहात? आपण एकदम गंभीर झालात! बोलण्याच्या ओघात माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करा.” माझं विचारचक्र मध्येच तोडत मंदोदरी म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर थोडा ताण जाणवत होता.

“नाही मंदोदरी. तू माझा आरसा आहेस. आजपासून सीतेचे आणि अशोकवनाचे सर्व अधिकार तुझ्याकडं असतील.” मी झटकन निर्णय दिला. त्यावर स्मितहास्य करत ती म्हणाली-

“राजन, आपण आज्ञा कराल तसंच होईल.” मी तिच्या डोळ्यांमध्ये बघितलं. “त्रैलोक्यातील सर्वांत शक्तिशाली राजा हा त्याच्या पत्नीचं मत विचारात घेतो, तिला समजून घेतो, तिच्याशी चर्चा करतो हे सहजासहजी कोणाला पटणार नाही.” हसत ती म्हणाली.

“कोणाला पटो वा न पटो. पण तू माझी ओळख आहेस मंदोदरी. मी खरोखर खूप भाग्यवान आहे.” ती तिच्याजवळ जाऊन म्हटलं.

“राजन, भाग्यवान तर मी आहे. आणखी एक गोष्ट, भविष्यात काहीही झालं तरी कोणावरही बळजबरी नको. मग तो राम असो, लक्ष्मण असो, सीता असो वा आणखी कुणी. रामाला किंवा लक्ष्मणाला शूर्पणखेसोबत लग्नासाठी बळजबरी नको. त्यांना उचित दंड जरूर द्या. शूर्पणखेला आणखी दु:ख मिळेल अशी कोणतीही कृती होऊ नये. शेवटी विवाहबंधनं ही आनंदानं होत असतात, मृत्यूच्या भयानं नाही. जर त्यांनी शूर्पणखेला स्वीकारलं नाही तर तिला समजावून तिचा दुसरीकडं विवाह करून द्यावा आणि रामानं सीतेला स्वीकारलं नाही, तर तिला इथंच ठेवावं. तिला परत कुठंही पाठवू नये. कारण तिचे मागचे सर्व दरवाजे आता बंद झाले आहेत. आपण सीतेशी विवाह करावा किंवा तिला लंकेत जो आवडेल त्याच्याशी विवाह करू द्यावा. यासाठी कुठलीही जबरदस्ती होऊ नये. एक वर्षाचा अवधी तिला द्यावा. पूर्ण ॠतुचक्र संपल्यावर निश्चित तिच्या विचारांमध्ये बदल होईल. कारण स्त्री कितीही दु:खी वा कठोर झाली तरी तिला पुरुषाचा आधार हा लागतोच. वेलसुद्धा वृक्षाचा आधार घेऊनच बहरते. वृक्षाविना वेल जास्त दिवस नाही जगू शकत.”

मी सीतेशी विवाह करावा, या मंदोदरीच्या सल्ल्यानं मी आचंबित झालो.

“ठीक आहे. बघू नंतर. तुला हवं तसंच होईल. काही सुंदर वेलींमुळे झाडंही सुंदर दिसतात. तसंच मंदोदरी, तू या झाडाला सौंदर्य प्राप्त करून देणाऱ्या वेलीसारखी आहेस. सकाळची सूर्याची किरणं आल्हाददायक वाटतात, मध्यान्ही तीच किरणं प्रखर उष्णतेनं कासावीस करतात तर सायंकाळी पुन्हा तीच उष्ण किरणं परत सुखकारक होऊन शीतलतेच्या अधीन होतात.” माझ्या बोलण्यानं तिचा चेहरा प्रसन्न झाला. तिनं हसून माझ्याकडं बघितलं.

“मंदोदरी, तुझे विचार तू सूताला श्रृतीमध्ये सामील करण्यास का सांगत नाहीस? सर्वांना कळायला हवेत तुझे विचार.”

“राजन, स्त्रीनं सांगितलेले विचार लोकांना पटतील? ते तर कधीच शक्य नाही. तसंही माझं दिसणं, हसणं, बोलणं आणि विचार फक्त तुमच्यासाठीच आहेत. आपण सन्मान केलात तरी माझं जीवन सार्थक झालं. विचार लिहून ठेवण्यापेक्षा आपण ते स्वीकारलेत तर राक्षस संस्कृतीही स्वीकारेल.”

“मंदोदरी, राक्षस संस्कृतीत स्त्रियांना समान वागणूक आहे हे तुला माहीत असूनही असं दुजेपणानं बोलणं चुकीचं आहे.”

“कोणतीही संस्कृती पुरुषांचा मूळ स्वभाव नाही बदलू शकत आणि राक्षस संस्कृती म्हणजे आपण एकटेच नाही राजन.” तिनं तिचे विचार स्पष्टपणे मांडले.

स्त्रीच्या आपण कितीही जवळ असलो तरी तिच्या मनाचा थांग लागणं शक्य नसतं. मंदोदरी हुशार होती. सहज न समजणारी. तिला खूश ठेवणं एक दिव्यच होतं.

‘शूर्पणखेला भेटून येतो.’ विषय संपवून मी उठलो. मंदोदरीनं ‘भोजन झाल्यानंतर जा’ म्हटल्यानं भोजनकक्षाकडं आलो. जेवतानासुद्धा मंदोदरीचं बोलणं डोक्यातून जात नव्हतं. विचारांच्या तंद्रीतच भोजन उरकलं अन् मी शूर्पणखेच्या दालनाकडं निघालो. मंदोदरीही माझ्या मागं निघाली. आम्ही येणार असल्याची वर्दी दिली गेली. शूर्पणखेशी काय बोलावं हे कळत नव्हतं. तिच्या जखमेवर उपचार चालूच होते. बिछान्यावर सेविका तिची सुश्रूषा करत होती.

मला बघताच हर्षभरित होऊन शूर्पणखा ओरडली. “राक्षस सम्राट रावणाचाऽ विजय असोऽऽ! बंधू, आज मी खूप आनंदात आहे. मला आताच समजलं, सीतेला तू आणलंस. मारलंस त्या दोघा नीच आर्यांना?”

“नाही. त्या दोघांना नाही मारलं. फक्त सीतेला घेऊन आलो आहे.” मी आसनावर बसत शांतपणे म्हटलं.

“काय?” ती ताडकन बिछान्यावरून उठली आणि माझ्या जवळ आली. “त्यांचा वध नाही केलास? खर, दूषणाची हत्या करणाऱ्यांना तू असंच सोडून दिलंस? क्षमा केली की काय त्यांना, की तुझाही पराभव केला त्यांनी? प्रतिशोध घेण्यासाठी गेला होतास ना? मग काय फक्त सीतेला आणलंस?” उत्तेजित होऊन शूर्पणखा प्रश्नांमागून प्रश्न विचारू लागली. मनाला झोंबणारे होते ते प्रश्न. तिच्या विद्रुप झालेल्या चेहऱ्यासोबत शब्दही विद्रुप झाले होते. 

“रावणा, फक्त ती सुंदर आहे म्हणून तिला तू आणलंस का? माझ्या अशा अवस्थेला कारणीभूत असणाऱ्यांचा, आपल्या बंधूंना मारणाऱ्यांचा प्रतिशोध तू सीतेसोबत शय्या करून घेणार आहेस का? राम-लक्ष्मणाचं छाटलेलं मस्तक बघायचं आहे मला. माझी दुर्दशा करणारे अजूनही मुक्त आणि जिवंत आहेत. तू जीव मुठीत घेऊन पळालास का? सांग मला.” कडवट बोलून ती जोरजोरात ओरडू लागली.

कशाचंही भान न ठेवता मंदोदरीसमोर ती माझा अपमान करू लागली. तरीही मी शांत बसलो. तिची वेड्यासारखी बडबड मला नकोशी झाली. तिच्या रागाचा आवेग कमी होत नव्हता. हुंदके देत ती बोलू लागली,

“सीतेशी विवाह कर आणि सुखाचा संसार कर. माझ्यावरील प्रतिशोधानं तुला एक सुंदर स्त्री मिळाली ना? आता मलाही मारून टाक, म्हणजे सावत्र भावांचा प्रतिशोध घेतलास की नाही, हे विचारण्यासाठी सुद्धा मी जिवंत राहणार नाही. मग तू खुशाल सुखांचा उपभोग घे.”

‘सावत्र’ शब्द वापरून तिनं माझ्या मनावर घाव घातला. मंदोदरी तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. ती मंदोदरीच्या गळ्यात पडून रडू लागली. तिची अवस्था बघून माझ्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

“शूर्पणखे, शांत हो. अगं माझं ऐकून तर घे. मी सीतेला शारीरिक सुखासाठी नाही आणलं, तुझ्यावरील अन्यायाच्या प्रतिशोधासाठीच आणलं आहे. खर आणि दूषणाच्या हत्येला जबाबदार असणाऱ्या त्या दोघांना लंकेत दंड देण्यासाठी तिला आणलं आहे. समजून घे मला. असा त्रागा नको करूस.” मी भावनाविवश होऊन तिला समजावू लागलो. काही वेळानं ती शांत झालेली बघून मी परत बोलू लागलो

“शूर्पणखे, मधमाशांच्या पोळ्याच्या केंद्रस्थानी एक नारी माशी असते. तिला आपण पकडलं की सगळ्या नर मधमाशा वश होतात, तसंच मी सीतेला आणलं आहे, ती दोघंही तिच्यासाठी हतबल होऊन इथं लंकेत येतील. आपल्याकडं सीतेची याचना करतील. तेव्हा मग त्यांना दंड देईन, किंवा दोघांपैकी तुला जो आवडेल त्याच्याशी तुझा विवाह लावून देईन. आयुष्यातील सगळ्याच लढाया क्रोधात उतावीळ होऊन नसतात लढायच्या. ज्या गोष्टी साधी बुद्धी वापरून होत असतील तिथं उगाच शस्त्र उचलण्याची गरज नाही. तुझ्यावरील अन्यायाचा प्रतिशोध मला तुझ्या डोळ्यांदेखत घ्यायचा आहे. त्यांनाही समजायला हवं, की तू कोण आहेस. शूर्पा, त्यांना मारण्यापेक्षा तुला जो आवडेल त्याच्याशी तुझा विवाह व्हावा अशी माझी इच्छा आहे. त्यामुळेच नाही मारलं त्या दोघांना. त्यांच्या वधानं तुला तात्पुरतं समाधान मिळेल; पण तुझं पुढील आयुष्य सुखी होणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे.” माझ्या समजावण्यानं काही प्रमाणात तिचं समाधान झालेलं दिसलं. स्वत:ला सावरत ती म्हणाली,

“त्यांनी विवाहाला नकार दिला तर?”

“मग तुला हवा तसा प्रतिशोध तू घे. त्यांनी तुझा उपमर्द केलाय, मग दंडही तूच देणार.” मी तिला आश्वस्त केलं.

“रावणा, तू आता सीतेचा चेहरा विद्रुप बनव, तिचंही नाक आणि कान कापलेला चेहरा मला दाखव, तेवढंच माझ्या मनाला समाधान वाटेल. त्याच्या पत्नीचं नाक आणि कान कापलेलं बघितल्यावर मला होणाऱ्या त्रासाची त्यांना कल्पना येईल. स्त्रीचा चेहरा विद्रुप केल्यावर तिला किती दु:ख होतं याची जाणीव सुद्धा त्यांना होईल.”

तिच्या अशा विचित्र अपेक्षेनं मी गोंधळलो. काहीच प्रतिउत्तर न देता मंदोदरीकडं बघितलं. तिच्या खांद्यावर हात ठेवत मंदोदरी शांतपणे म्हणाली, “शूर्पा, तुम्हाला या अवस्थेत बघून मन द्रवतं. त्या मूर्खांनी स्त्री-मन न जाणता तुम्हाला आणि आम्हालाही आयुष्यभराचं दु:ख दिलंय, पण जो त्रास तुम्हाला होतोय तोच सीतेला झाल्यानं तुमचा त्रास काही कमी होणार नाही. त्यामुळे हे विषारी विचार सोडून द्या. आपणही रानटीपणे वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक उरेल?” मंदोदरीच्या बोलण्यावर कठोर शब्दांत शूर्पणखा म्हणाली,

“मंदोदरी, चेहरा माझा विद्रुप झालाय. तुमचा झाला असता तर तुम्ही हाच विचार केला असता का? आपण श्रेष्ठ आहात, बुद्धिमान आहात, पण मला सध्या तरी अशा सल्ल्याची गरज नाही.” आणि माझ्याकडे बघत ‘तुझा जीव जडला आहे का तिच्या सौंदर्यात?’ अशा तीक्ष्ण शब्दांनी तिनं आम्हा दोघांना निरुत्तर केलं. ती काहीच ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हती. सध्या तरी तिचा राग निवळणं अवघड होतं. मी नजरेनंच मंदोदरीला बाहेर जाण्यासाठी खुणावलं.

“आपण काळजी घ्या.” शूर्पणखेला सांगून मंदोदरी दालनाबाहेर गेली. मी उठलो.

“शूर्पणखे, तू म्हणतेस तसंच होईल. उद्या दरबारातील मंत्रिगणाचा सल्ला घेतो, मग पुढं काय ते ठरवू आपण. पण सध्यातरी तुला औषध वेळेवर घेऊन आराम करण्याची गरज आहे.” माझ्या बोलण्यानं ती केविलवाण्या नजरेनं माझ्याकडं बघून रडू लागली. तिची ती अवस्था बघून माझं मन अस्वस्थ झालं. तिला शय्येवर झोपवलं आणि निघताना म्हटलं,

“काळजी घे स्वत:ची.”

“घेते, पण खरं सांग. मी आता सुंदर नाही ना दिसत?” असं म्हणत ती हुंदके देऊ लागली.

“नाही शूर्पा, तू अजूनही सुंदर दिसतेस. उपचार झाल्यावर तर तू आणखीनच छान दिसशील.” असं समजावताना माझा कंठ दाटून आला. जास्त वेळ मी तिथं थांबलो असतो तर मलाही रडणं आवरता आलं नसतं. सेविकांना सूचना करून लगेच मी दालनाबाहेर पडलो.

शयनकक्षात मंदोदरी शांतपणे मंचकावर बसली होती. शूर्पानं तिचा उपमर्द केल्यानं ती उदास झाली होती.

“शूर्पाचे शब्द मनावर नको घेऊ.” तिच्या डोक्यावरून हात फिरवत मी म्हटलं.

“नाही राजन, त्यांचं मन मी समजू शकते. माझ्यावर असा प्रसंग उद्भवला असता तर कदाचित मीही अशीच आक्रमक झाले असते.”

“मग उदास का बसलात?”

“उदास नाही राजन. पण त्यांनी जो प्रतिशोधाचा मार्ग सांगितला तो माझ्या मनाला पटत नाहीये. अशी कृती नको व्हायला एवढीच इच्छा आहे. प्रतिशोध घेऊ नये असं नाही, पण जी कृती त्यांनी केली ती आपणाकडून नको व्हायला. स्त्रीवर शस्त्र उचलणं हे आपल्या प्रतिष्ठेला शोभणारं नाही.”

“नाही मंदोदरी, तेवढं ज्ञान आहे आम्हाला. तू उगाच चिंता करते आहेस.” मी स्मितहास्य करत म्हटलं, “कठोर वाटतेस पण मनानं खूपच हळवी आहेस. सीतेची जबाबदारी आता तुझ्यावर आहे. शूर्पा प्रतिशोधासाठी तळमळत आहे. तिला अशोकवनात प्रवेश देऊ नका. ती कोणत्याही स्तरावर जाऊन बोलली तरी तिला समजावून घ्या. दोघींवरही कडक लक्ष ठेवण्याचे आदेश द्या.”

मंदोदरीच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मितहास्य तरळलं. तणाव थोडा कमी झाला. स्त्रियांचे सुद्धा किती वेगवेगळे विचार असतात! सर्व स्त्री-मनांचा विचार करणारी मंदोदरी आणि फक्त स्वत:चा विचार करणारी शूर्पणखा. महादेवा, स्त्री-मन समजणं खरंच अवघड आहे.

.............................................................................................................................................

या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 10 October 2018

छान कादंबरी दिसतेय. वाचायला आवडेल. -गा.पै.