मानवी जीवनाची वैश्विक साम्यस्थळे आणि रशियन सांस्कृतिक जीवनाची वैशिष्ट्ये सांगणाऱ्या कथा
ग्रंथनामा - झलक
मेघा पानसरे
  • ‘सोविएत रशियन कथा’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Sat , 22 September 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक सोविएत रशियन कथा Soviet Russian Katha मेघा पानसरे Megha Pansare

‘सोविएत रशियन कथा’ हे पुस्तक नुकतंच लोकवाङमय गृहातर्फे प्रकाशित झालं आहे. यात १७ कथांचा मूळ रशियन भाषेतून मेघा पानसरे यांनी मराठी अनुवाद केला आहे. या संग्रहात मक्सीम गोर्की, अर्कादी अव्येर्चिन्का, कन्स्तन्तीन पऊस्तोव्स्की, व्लादीमिर लिदीन, मिखाईल जोशिन्का, अन्द्रेइ प्लातोनव, विनिअमीन कव्येरिन, अर्कादी गइदार, मिखाईल शोलखव, सिर्गेइ अन्तोनव, यूरी नगीबिन, मक्सूद करीयेव, यूरी कजाकव, चिन्गीज अइत्मातव, वसीली शुक्शीन, वलेन्तिन रास्पूतिन या १६ लेखकांच्या एकंदर १७ कथांचा समावेश आहे. शिवाय ‘रशियन साहित्य : एक दृष्टिक्षेप’ हे परिशिष्टही आहे. या संग्रहाला अनुवादक मेघा पानसरे यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश.   

.............................................................................................................................................

रशियन भाषेशी माझा परिचय झाला त्याला जवळजवळ तीन दशके झाली. या संपूर्ण काळात रशियन भाषेचे अध्ययन, अध्यापन, भाषांतर आणि संशोधन अशा चार स्तरांवर माझे काम चालू राहिले. परंतु या सर्व प्रक्रियेत रशियन साहित्याचे भाषांतर ही माझ्यासाठी स्वयंप्रेरित आणि आत्यंतिक आनंददायी कृती राहिली आहे. भाषांतरकार ही दूरदेशीच्या साहित्य आणि संस्कृतीचा मातृभाषेतील वाचकांना परिचय करून देणारी माध्यम-व्यक्ती असते. अलीकडे जागतिक स्तरावर साहित्यिक भाषांतराला अतिशय महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. आज जगातील विविध भाषांतील प्रतिभाशाली साहित्यकारांचे लेखन मराठीत उपलब्ध होते आहे. परंतु बहुसंख्य भाषांतरे ही मूळ साहित्यकृतीच्या इंग्रजी भाषांतरावरून होतात. तेव्हा मूळ भाषेतून होणारे भाषांतर ही निश्चितच एक अधिक जबाबदारीची कृती ठरते, असे मला वाटते. त्यामुळेच ‘सोविएत रशियन कथां’च्या मराठी संग्रहाचे प्रकाशन ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे.  

१९९३ मध्ये एकदा कोल्हापुरातील दैनिक ‘सकाळ’च्या पुरवणीसाठी ‘रशियन कथा’ हे सदर सुरू करण्याचा मानस जयसिंग पाटील यांनी व्यक्त केला. वर्षभरात दर पंधरा दिवसांनी एका कथेचे मी रशियनमधून मराठीत भाषांतर करून द्यायचे असे ठरले आणि मी उत्साहाने कामाला सुरुवात केली. वृत्तपत्रातील सदराला जागेची मर्यादा असते. तेव्हा अशा लहान कथा शोधणे हे मोठेच काम होते. आमच्या रशियन भाषा अभ्यासक्रमातील अनेक कथा यासाठी उपयोगी ठरल्या. कथा निवडीमध्ये अर्थातच कालक्रम वा विशिष्ट लेखक वा विषय असा कोणताही निकष नव्हता. रशियन साहित्य हे प्रामुख्याने तीन ऐतिहासिक टप्प्यांत विभागले जाते : क्रांतिपूर्व रशियन साहित्य, १९१७ ते १९९१ पर्यंतचे सोविएत साहित्य व १९९१नंतरचे उत्तर-सोविएत साहित्य. ‘रशियन कथा’ या सदरात जशा अभिजात रशियन लेखक अन्तोन चेखवच्या कथा प्रसिद्ध झाल्या तसेच सोविएत कथाही प्रसिद्ध झाल्या. या कथांनी मला रशियन भाषा व साहित्याची अभ्यासक आणि भाषांतरकार अशी दुहेरी ओळख मिळवून दिली. वाचकांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला. कित्येक वाचकांनी या कथाविश्वातून उलगडणारे रशियन लोकजीवन, संस्कृती समजून घेता आल्याचा आनंद व्यक्त केला. या अनुभवानंतर मी एकूणच ‘साहित्यिक भाषांतर’ या क्षेत्रात मनापासून रमले. जयसिंग पाटील व ‘दैनिक सकाळ’ची मी खरोखरच ऋणी आहे.

दरम्यान ‘केल्याने भाषांतर’ या पुण्यातून प्रसिद्ध होणार्‍या मासिकाशी मी जोडले गेले. हळूहळू इतरही मासिकांसाठी भाषांतर करू लागले. आजपर्यंत कथा, कादंबरीतील अंश व कविता अशा ४० साहित्यकृतींचे भाषांतर प्रसिद्ध झाले आहे. या प्रकाशित रशियन साहित्याचे मराठी भाषिक-सांस्कृतिक विश्वात जतन करण्याच्या उद्देशाने काही निवडक कथांचे पुस्तक प्रसिद्ध करत आहोत. अन्तोन चेखवच्या कथा ऐतिहासिकदृष्ट्या रशियन क्रांतिपूर्व कालखंडाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्या कथा बाजूला काढून त्यांचे वेगळे पुस्तक प्रकाशित करण्याचा मी विचार केला.

प्रस्तुत कथासंग्रहासाठी निवडलेल्या कथा सोविएत काळातील काही महत्त्वाचे साहित्यिक व त्यांच्या लेखनाचा एक मोठा पट आपल्यासमोर उभा करतात. ‘मकार चूद्रा’ ही मक्सीम गोर्कीची पहिली कथा त्याने क्रांतिपूर्व काळात १८९२ साली लिहिलेली आहे. या जिप्सी कथेतून त्याने व्यक्त केलेली स्वातंत्र्याची भावस्पर्शी कल्पना भावी जीवनात त्याला क्रांतीच्या मार्गाने घेऊन गेली. मक्सीम गोर्की हा म्हणूनच सोविएत साहित्याचा उद्गाता बनला. गोर्कीच्या कथेपासून सुरुवात करून त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या सोविएत काळातील अनेक संवेदनशील लेखकांच्या १७ कथांचा समावेश या संग्रहात केलेला आहे. १८९२ ते १९८४ हा काल व्यापणाऱ्या या कथा आहेत. या कथालेखकांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते समाजाच्या विविध स्तरांतून आलेले, वेगवेगळ्या विद्याशाखांचे शिक्षण घेऊन व्यावसायिक जीवन जगत साहित्यनिर्मिती करणारे लोक आहेत. अनेक साहित्यिक अतिशय गरीब कुटुंबांतून येऊन खडतर परिस्थितीतही लेखनातून अभिव्यक्ती करणारे सर्जनशील लोक आहेत. सोविएत रशियाच्या ऐतिहासिक प्रवासात वाट्याला आलेल्या क्रांती, गृहयुद्ध, दुसरे महायुद्ध, अंतर्गत राजकीय दबाव व संकटे, पिरिस्त्रोइका व ग्लासनस्तसारखी राजकीय धोरणे अशा सर्व घटनांत एक नागरिक व साहित्यिक या भूमिकांतून त्यांनी सहभाग घेतला. आपले मातृभूमीवरील प्रेम व पितृभूमीप्रती कर्तव्य यांच्याशी बांधीलकी असणारे जीवन ते जगले आहेत. लेखकांच्या संक्षिप्त परिचयातून आपल्याला या गोष्टींची जाणीव होते. लहान मुलांच्या भावविश्वापासून प्रेम, विवाह, कुटुंब आणि स्त्री, सामाजिक-राजकीय जीवन, पर्यावरण असे विविध विषय या कथाजगतात चित्रित झाले आहेत. त्यातून एका बाजूला मानवी जीवनाची वैश्विक साम्यस्थळे जाणवतात, तर दुसऱ्या बाजूला खास रशियन सांस्कृतिक जीवनाची वैशिष्ट्येही समजून घेता येतात. मराठी वाचकांना या रशियन सोविएत कथा आवडतील, अशी मला आशा आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -