नजूबाईंच्या लेखनाचा पाया मातृसत्ता-स्त्रीसत्ताक आहे. त्याला समतेचा आधार आहे.
ग्रंथनामा - झलक
सुशील धसकटे
  • नजूबाई गावित आणि त्यांची ग्रंथसंपदा
  • Thu , 20 September 2018
  • ग्रंथनामा Granthanama झलक नजूबाई गावित Najubai Gavit भिवा फरारी Bhiva Farari आदोर Aador नवसा भिलणीचा एल्गार Navsa Bhilneecha Elgar

पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान आणि ग्रंथाली वाचक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'बलुतं’च्या चाळिशी'प्रीत्यर्थ 'आत्मकथन' या साहित्यप्रकारास 'बलुतं पुरस्कार' सुरू करण्यात येत असून या वर्षीचा पहिलावहिला पुरस्कार कॉ. नजूबाई गावीत यांच्या 'आदोर'ला घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण आज, २० सप्टेंबर २०१८ रोजी मुंबईत 'बलुतं’ची चाळिशी' या एकदिवशीय संमेलनाच्या उदघाटन सत्रामध्ये करण्यात येत आहे. ११,००० रु. रोख, गोधडी आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यानिमित्तानं गावित यांच्याविषयी गतवर्षी ‘अक्षरनामा’वर प्रकाशित झालेल्या लेखाचं हे पुनर्प्रकाशन.

.............................................................................................................................................

नजूबाई गावित या 'घरोट्या'तील लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या नाहीत. त्या पैठणी वा उच्च दर्जाची खादीची साडी नेसून लेखिका म्हणून मिरवणाऱ्या; मान-सन्मानावर डोळा ठेवून कोणी दुखवलं जाणार नाही असं 'सर्वमान्य' कोटीतलं लिहिण्याची काळजी घेणारी तथाकथित ‘करिअरिस्ट’ लेखिकाही नाहीत. की समाजावर 'उपकार' करायला निघालेल्या चळवळीतील स्वयंघोषित हौशी सामाजिक कार्यकर्त्याही नाहीत.

आहे ते दाबून आणि नाही ते रंगवून स्त्री-पुरुष संबंधांवर नकली बोल्ड पद्धतीनं लिहिणं; आपल्याकडील सामाजिक पर्यावरणाचा फार विचार न करता-ग्राउंड रिअॅलिटी जाणून न घेता लेखनात योनी-लिंग अशी बिनधास्त भाषा वापरणं, आपणही पुरुषांपेक्षा कमी नाही असा आविर्भाव दाखवत नकळत पुन्हा पुरुषी वळणाचं एकसुरी लिहून आपण कसे 'मॉडर्निस्ट' आहोत वगैरे असं दाखवण्याचा एक ट्रेंड आपल्याकडे स्थिरावताना दिसत आहे. नजूबाईंना अशी दिखाऊ 'मॉडर्निस्ट' पोझ घ्यायचं कारण नाही. त्यांनी ती कधी घेतलीही नाही. कारण त्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून, समाजाच्या खालच्या समजल्या जाणाऱ्या समूहातून आलेल्या असल्यानं एकप्रकारे जगण्यातील समृद्धता त्यांच्या ठायी आहेच. त्यामुळे नजूबाई या सर्व ढोंगी साहित्यिक पर्यावरणापासून शेकडो मैल दूर आहेत.

मुळात आदिवासी समाजात स्त्री पुरुष नात्यांत जितका मोकळेपणा आहे, त्याच्या एकपटही मोकळेपणा स्वतःला उच्चकुलीन-सवर्ण-कल्चर्ड वगैरे समजणाऱ्या समाजात किंवा या समाजातील शिकलेल्यांमध्ये फार जाणवत नाही. त्यामुळे नजूबाईंच्या लेखनातील स्त्री-पात्रं स्वाभाविकच मोहाची दारू पिताना दिसतात, पुरुषाशी दोन हात करताना दिसतात, परिस्थितीशी संघर्ष करताना दिसतात, आपल्याला आवडणाऱ्या पुरुषाबरोबर पळून जाताना दिसतात. असं पळून गेलं की, त्यांचं लग्न करून द्यायचं, अशी रीत आदिवासी समाजात आहे. प्रत्यक्ष जगण्याच्या पातळीवरील हा पुरोगामीपणा स्वतःला शिक्षित, नागरी, शहरी समजणाऱ्या समाजात अभावानंच आढळतो. यावरून आदिवासींच्या तुलनेत आपले जगण्या-वागण्या-बोलण्याचे पुरोगामित्वाचे दावे किती वरवरचे, पोकळ आहेत, हे जाणवतं.

शिवाय उच्चवर्णातील स्त्रियांकडे असलेला वागण्या-बोलण्याचा-वावरण्याचा-दिसण्याचा-चेहराविहीनतेचा न्यूनगंड नजूबाईंकडे नाही. कारण त्या आदिवासी जमातीतून म्हणजे तथाकथित 'खाल'च्या समजल्या वर्णातून आलेल्या आहेत. खालच्या थरात स्त्रियांना वावरण्याचा जो मोकळेपणा आहे, बंदिस्तपणाचा काच 'वरच्यां'पेक्षा अधिक सैल आहे, तो वरची प्रत्येक पायरी चढताना संकुचित होत होत गेलेला दिसतो.

.............................................................................................................................................

रविशकुमार या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

नजूबाईंचं लेखन भाषेच्या दृष्टीनं फार 'पॉलीश' केलेलं नसल्यानं कोणाला ते आवडणारही नाही. परंतु आदिवासी 'मावची' बोलीचा आविष्कार, शब्द, वाक्यं, त्यांचं जगणं, त्यांचं अनुभव विश्व, त्यांच्यातील ताणतणाव, आदिवासी संस्कृती, अस्सल देशी भान अशा कितीतरी गोष्टी यातून कळत जातात. म्हणजे मराठीला अपरिचित असं भावविश्व-अनुभवविश्व नजूबाईंच्या लेखनातून येतं. शिवाय कुठे डिप्लोमॅटपणा नाही. जे आहे ते नितळ. अल्पशिक्षित असल्या तरी पुस्तक करताना तीन-तीन, चार-चार वेळा त्याचं पुनर्लेखन केल्याशिवाय पुस्तक छापायची घाई त्यांनी केली नाही, ही गोष्ट लेखक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची आहे.

जेमतेम चौथी शिकलेल्या नजूबाई या आदिवासी-दलित-शेतकरी-कष्टकरी सत्यशोधक कम्युनिस्ट चळवळीतील सच्च्या आणि लढाऊ कार्यकर्त्या आहेत. 'अब्राह्मणी साहित्य व कला महासभा' स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला होता. अतिशय साधं राहणीमान, चेहरा उन्हातान्हात काम करून रापलेला, आवडो न आवडो स्पष्ट बोलणाऱ्या. दोन तीन पुस्तकं येऊनही जाणीवपूर्वक कसलीही 'पोझ' घेणं नाही. पुस्तकांबद्दल विचारलंच तर म्हणतात- "मी जे समाजाकडून घेतलं, तेच मी समाजाला परत केलं. त्यात माझं असं काय होतं? ते आता समाजाचं झालंय. आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर अजून खूप काम करायचं बाकी आहे, आणखी लढे उभे करायचे आहेत."

नजूबाईंनी खेडोपाडी, वाडीवस्ती, पाडे, डोंगर माळरान पिंजून उन्हातान्हात, पावसापाण्यात रस्त्यांवर उतरून अनेक आंदोलनं केली आहेत. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या लढ्यातही त्यांचा सहभाग होता. खऱ्या अर्थानं नजूबाई या रणरागिणी आहेत. आपल्याकडे गोदूताई परुळेकर, मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर अशा काही स्त्रियांनाच 'रणरागिणी' म्हणायचा प्रघात आहे की काय कळत नाही. सारखी सारखी यांचीच चर्चा केली जाते. माध्यमांना तर यांच्याशिवाय दुसऱ्या 'बहुजन' स्त्रिया दिसतच नाहीत.

असं असलं तरी कुठल्याही विद्यापीठीय चर्चाविश्वाच्या, तथाकथित अभिजन-बहुजन स्त्रीवादी चर्चाविश्वाच्या वर्तुळाबाहेर त्यांना ठेवलं गेलं. मराठी साहित्याच्या, लेखकांच्या, समीक्षकांच्या, माध्यमांच्या, (फुले ?)-आंबेडकरी वारसा सांगणाऱ्या दलित चर्चाविश्वाच्या दृष्टीनं नजूबाई ‘आदिवासी आणि दलित’च राहिल्या. त्यांच्या लेखनाची चर्चा करावी असं कोणाला वाटलं नाही, की या बाईला बोलावून त्यांची भावना जाणून घ्यावी, असंही कोणाला वाटलं नाही. वाटत नाही.

नजूबाईंची ‘भिवा फरारी’ ही आदिवासी स्त्रीनं लिहिलेली भारतातील पहिलीच कादंबरी आहे. त्या अर्थानं त्यांचं महत्त्व अधोरेखित होतं. 'तृष्णा' ही आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. यातील 'अदोर' हा भाग स्वतंत्रपणे इंग्रजीमध्ये आलाय. एक कथासंग्रह आहे. नजूबाईंच्या लेखनाची प्रेरणा प्राच्यविद्यापंडित शरद पाटील हे आहेत. त्यामुळे या लेखनाचा पाया हा मातृसत्ता-स्त्रीसत्ताक हा आहे. त्याला समतेचा आधार आहे.

बहिणाबाई चौधरी, दुर्गाबाई भागवत, कमल देसाई, गौरी देशपांडे (काही पुस्तकं), मेघना पेठे (‘आंधळ्याच्या गायी’), नजूबाई गावित असे सन्माननीय अपवाद केले तर स्वातंत्र्यानंतरच्या काळात मनावर घेऊन वेळ खर्चून वाचावं... पुन्हा पुन्हा वाचावं... अशी आश्वासक स्थिती नाही. ती व्हावी अशी अपेक्षा पल्लवित करू या.

............................................................................................................................................

नजूबाई गावित यांच्या ‘नवसा भिलणीचा एल्गार’ या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

............................................................................................................................................

लेखक सुशील धसकटे तरुण कादंबरीकार आहेत. ‘जोहार’ ही त्यांची कादंबरी बहुचर्चित ठरली आहे.

hermesprakashan@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......