गांधी, विनोबा आणि जयप्रकाश लडिवाळ महापुरुष होते. त्यांच्या कडेवर बसून आपण भावी जग पाहू या!
ग्रंथनामा - झलक
मिलिंद बोकील
  • ‘गांधी, विनोबा आणि जयप्रकाश’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि त्यांची छायाचित्रं
  • Fri , 07 September 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक गांधी Gandhi विनोबा Vinoba जयप्रकाश नारायण Jayaprakash Narayan मिलिंद बोकील Milind Bokil

प्रसिद्ध कथा-कादंबरीकार मिलिंद बोकील यांचं ‘गांधी, विनोबा आणि जयप्रकाश’ हे पुस्तक नुकंतच मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला बोकील यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

महात्मा गांधी, विनोबा आणि जयप्रकाश नारायण यांच्यावर आपण लेख लिहू असं लेखक म्हणून मला कधीच वाटलं नव्हतं. कथा-कादंबऱ्या सहजतेनं लिहून झाल्या कारण त्या मनातल्या मनात स्फुरल्या होत्या. त्या लिहिताना काही सायास करावे लागले नव्हते. समाजशास्त्रीय किंवा सामाजिक लेखनही सहजगत्या झाले, कारण ते विषय काम करता करता समोर आले होते. मात्र वैचारिक लेखन करायचे म्हटले म्हणजे अभ्यास अनिवार्य होतो. असेच लेखन करायची ज्यांची प्रवृत्ती असते, ते तो करतात आणि त्यातून त्यांचे ग्रंथ निर्माण होतात. निर्मितीशील, ललित लेखकाला मात्र तसे करायचे म्हटले म्हणजे मनाची वेगळी धारणा आणि विचारांची बैठक प्राप्त करणे आवश्यक असते. ते करण्याकडे मनाचा कल असतोच असे नाही. माझेही तसेच होते. पण काही वेळा अशा गोष्टी घडतात की, आपल्या हातून वेगळ्या प्रकारचे लेखन होऊन जाते.

जयप्रकाश नारायण (जेपी) यांचा जन्म १९०२ सालचा. त्यामुळे २००१-२००२ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष होते. आम्ही जयप्रकाश नारायण यांच्या ‘संपूर्ण क्रांती’ आंदोलनाच्या माध्यमातून सामजिक कार्यात आलेलो असल्याने, पुणे येथील ‘अंतर्नाद’ मासिकाच्या संपादकांनी मला जेपींवर लेख लिहाल का म्हणून विचारले. मी अनवधानाने होकार दिला आणि तसा तो दिलेला असल्याने लेख लिहायला सुरुवात केली. त्यावेळी तसे करण्याचे मुख्य कारण म्हणजे जेपींबद्दल वाटत असलेला जिव्हाळा आणि प्रेम हे होते. खरे तर, १९७०च्या दशकात, आपल्या देशात हुकूमशाहीच्या विरोधात विद्यार्थी-युवकांचे आंदोलन जेव्हा चालू होते, तेव्हा मी त्यात सहभागी नव्हतो. कारण त्यावेळी मी एक शाळकरी मुलगा होतो. नंतर आणीबाणी आली तेव्हाही उच्च माध्यमिक शाळेत होतो. जेपींशी प्रत्यक्ष संबंध यायचे कारण पडले नव्हते. आणीबाणी उठल्यावर मुंबईला शिवाजी पार्कवर जेपींची एक विराट सभा झाली होती. त्यावेळी दूरवरून जेपींना फक्त व्यासपीठावर पाहिले होते.

मात्र त्यानंतर एक गोष्ट अशी घडली की, त्यामुळे आयुष्याला वेगळे वळण लागले. ते साल १९७९ होते. त्यात मे-जूनच्या महिन्यात माझा एक मित्र मला आमच्या डोंबिवली गावात, ‘छात्र युवा संघर्ष वाहिनी’ या संघटनेच्या मिटिंगला घेऊन गेला. आंदोलनाच्या काळात ही संघटना जेपींनी स्थापन केली होती. तिथे माझ्यासारखेच समवयस्क तरुण-तरुणी होते. तिथे माझा जेपींच्या ‘संपूर्ण क्रांती’ चळवळीशी परिचय झाला. त्यापूर्वी मी एक साधा, मध्यमववर्गीय मुलगा होतो. माझा कोणत्याही सामाजिक संघटनेशी संबंध नव्हता. वर्तमानपत्रं वाचून आणि भोवताली घडणाऱ्या घटना पाहून जेवढी माहिती आपल्याला असते तेवढीच होती. मात्र संघर्ष वाहिनीचे ते डोंबिवली युनिट मला आवडले. मी सातत्यानं तिथं जाऊ लागलो आणि निरनिराळ्या कार्यक्रमांत सहभागी होऊ लागलो. त्यातून मग मला संघर्ष वाहिनीच्या संबंध महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांची ओळख झाली. इतर समविचारी सामाजिक संघटनांचीही माहिती झाली. जेपी आधी मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलात आजारी होते. नंतर त्यांना पाटण्याला हलवण्यात आलं आणि ८ ऑक्टोबर १९७९ रोजी त्यांचं निधन झालं.

संघर्ष वाहिनीच्या माध्यमातून माझा महाराष्ट्रातील सामाजिक कार्यात प्रवेश झाला आणि नंतर मी त्याच क्षेत्रात स्थिरावून गेलो. याचे तपशील इतर पुस्तकांतून आलेले आहेत. संघर्ष वाहिनीचं सदस्यत्व हे वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंतच असल्यानं वय वाढल्यावर ते राहिलं नाही. ऐंशीच्या आणि नव्वदीच्या दशकात वाहिनीचं अस्तित्वही क्षीण होत गेलं. मात्र स्वयंसेवी संस्था आणि संघटनांच्याच कामाशी कायम संबंधित राहिल्यामुळे सामाजिक परिवर्तनाच्या विचाराची पार्श्वभूमी कधीच ढळली नाही. जेपींवरचा लेख लिहिताना ते सगळे धागे आपोआप जोडले गेले. हा लेख ‘अंतर्नाद’ मासिकाच्या ऑगस्ट २००१च्या अंकात प्रसिद्ध झाला.

त्यानंतर काही वर्षांनी म्हणजे २००४ साली, ख्यातनामा कृषिवैज्ञानिक डॉ. जयंतराव पाटील यांच्या सांगण्यावरून, त्यांनी अनुवादित केलेल्या, विनोबांच्या लेखसंग्रहाचं संपादन करून त्याला प्रस्तावना लिहिण्याचा योग आला. ते पुस्तक ‘ज्ञान ते सांगतो पुन्हा’ या नावानं प्रसिद्ध झालेलं आहे. त्या प्रस्तावनेतच म्हटल्याप्रमाणे ती लिहिण्यासाठी मी लायक व्यक्ती नव्हतो. कारण विनोबांच्या विचाराशी परिचय असला तरी मी काही त्याचा अभ्यासक नव्हतो. मुख्य म्हणजे आम्ही जेपींच्या चळवळीत असल्यानं विनोबांच्या विचारांकडे गंभीरतेनं पाहिलं नव्हतं. स्पष्टच सांगायचं तर विनोबा आम्ही वाचलेच नव्हते. मात्र डॉ. पाटील यांनी उपलब्ध करून दिलेल्या लेखांमुळे विनोबांच्या विचारसाहित्याचं विशाल दालन डोळ्यांसमोर खुलं झालं. तेव्हापासून जे वाचून सुरू झालं, ते अजूनही चालूच आहे. संपूर्ण विनोबा वाचून झालेत असं अद्याप झालेलं नाही आणि आधी वाचलेलेही पुन्हा वाचायला घेतले की, त्यातल्या प्रत्येक शब्दामधून नवीन अर्थ लक्षात येतो. प्रस्तावनेचा तो लेख ‘दीपावली’ वार्षिकाच्या २००४ सालच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आणि नंतर मुंबई सर्वोदय मंडळानं त्याची ‘दुसरा ज्ञानेश्वर’ या नावानं एक पुस्तिकाही काढली. तो लेख या पुस्तकात समाविष्ट केलेला आहे. मात्र त्यात आणखी भर घातलेली आहे. मधल्या काळात विनोबांचं जे साहित्य वाचनात आलं – भूदान व ग्रामदान या संदर्भात आणि मुख्यत: लोकनीती आणि स्वराज्य या विषयांना धरून – त्याचा समावेश त्यामध्ये केलेला आहे.

जयप्रकाश आणि विनोबांच्या विचारांचा अभ्यास करत असताना सतत लक्षात येत होतं की, ही दोन्ही असाधारण व्यक्तिमत्त्वं असली तरी त्यांच्या मागे एखाद्या भव्य वटवृक्षासारखा उभा आहे तो म्हणजे महात्मा गांधी. गांधींचा विचार न करता या दोघांचा विचार करताच येत नाही. केवळ भारतातल्याच नाही तर अख्ख्या जगातल्या सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाच्या संदर्भात गांधींना टाळून कोणालाच पुढे जाता येणार नाही. त्यामुळे या दोघांविषयी लिखाण केलेलं असलं तरी गांधीजींबद्दल लिहिणं अटळच होतं. गांधींचे विचार निरनिराळ्या निमित्तानं कानावर पडत असले तरी मुळात जाऊन गांधी वाचणं झालं नव्हतं. ते या निमित्तानं झालं आणि त्यातून गांधींवरचा लेख सिद्ध झाला. तो ‘दीपावली’ वार्षिकाच्या २०१७च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला.

या लेखातून गांधींचं आकलन करून घेण्याचा प्रयत्न असला तरी ते पूर्णांशानं साध्य झालं आहे, असं अजिबात म्हणता येणार नाही. कारण हा विषय महासागरासारखा आहे. गांधींचा वेध घ्यायला जावं तसतशी त्यांची विविध अंगं नजरेसमोर येत राहतात. मात्र महत्त्वाची गोष्ट अशी की, त्या सगळ्या अंगांमध्ये एकरूपता आहे – आंतरिक एकरूपता. गांधीजी बोलले तसे वागले. आपल्याला पटो ना पटो, पण हा माणूस आपल्या सत्यनिष्ठेपासून ढळला नाही. एवढा एकच गुण गांधींजीपासून घेतला तरी पुष्कळ झालं. ज्यांना फार गहन विचारात जायचं नाही त्यांच्यासाठी एवढं पुरेसं आहे. गांधींच्या जीवनाची गोष्ट म्हणजे एक सामान्य माणूस असामान्य कसा झाला याची गोष्ट आहे. आणि हे त्यांनी साध्य केलं ते आपल्या सत्यनिष्ठेमुळे. मात्र ही नैतिकता असली तरी गांधींबद्दल अंतिमत: जाणवतं ते हेच की, मृदुता, प्रामाणिकता आणि निर्भयता म्हणजे गांधी. गांधींच्या हस्ताक्षरातला एक संदेश आहे – ‘बी जेण्टल, ट्रुथफुल अँड फिअरलेस’. हा संदेश म्हणजेच गांधीजी आहेत.

गांधी, विनोबा आणि जयप्रकाश मिळून विसाव्या शतकातील भारतीय विचारदर्शनाचा आणि सामूहिक कृतीचा एक भव्य आलेख समोर येतो. गांधींनी नीतीच्या पायावर देश उभारणीचा एक अभिनव प्रयोग करायला घेतला, तर विनोबांनी ही नीती म्हणजे संकुचित ‘राजनीती’ नसून विश्वव्यापक ‘लोकनीती’ असली पाहिजे याचं सिद्धांतन केलं. जयप्रकाशांनी हे विचार प्रत्यक्ष समाज-परिवर्तनासाठी कसे उपयोगात आणता येतील याचा वस्तुपाठ घालून दिला. गांधींना काही चिरंतून मूल्यं जाणवली होती. विनोबांनी या मूल्यांना भारतीय विचारपरंपरेत कोणतं अधिष्ठान आहे याचं दर्शन घडवलं. विनोबा एकाद्या ऋषिप्रमाणे दार्शनिक होते, तर गांधी या विचारदर्शनानं आपलं वैयक्तिक आणि सामूहिक जीवन शुद्ध करू इच्छिणारे तपस्वी होते. जयप्रकाश या मूल्यांच्या साहाय्यानं समाज-परिवर्तन करू मागणारे संघर्षशील कार्यकर्ते होते. या तिघांच्या विचारांतली आणि कृतीतली भव्यता पाहिली की, मन स्तिमित होऊन जातं. त्यांचे हे उद्देश पूर्णत्वाला गेलेले नाहीत, पण तो दोष त्यांचा नाही. ती जबाबदारी त्यांच्यानंतर येणाऱ्यांची आहे.

हे जे सगळं विचारदर्शन आहे, त्याचा योग्य तो परामर्श दुर्दैवानेंआपण घेतलेला नाही. आपल्याकडे विभूतीपूजा होते, पण विचारांची चिकित्सा होत नाही. आपल्या पूर्वसुरींनी जे विचार मांडलेले असतात त्यांची सतत चिकित्सा करत, त्यातलं काय घ्यायचं आणि काय सोडायचं याचा विवेक करत आपण पुढे जाणं आवश्यक असतं. सध्याच्या काळात आपल्यासमोर जी राजकीय, सामाजिक आणि आर्थिक आव्हानं उभी आहेत, ती बघता असं दिसतं की, ठरावीक चौकटीतून, साचेबंद विचार करण्याऐवजी स्वतंत्र, अभिनव आणि विशाल बुद्धीनं त्यांचा वेध घेतला पाहिजे.

ह्या सगळ्याच्या वाचनानं वैयक्तिक जीवनात काय फरक पडला? गांधींमुळे हे समजलं की, के‌वळ राजकारणच नाही तर कोणतीही गोष्ट ही आपण प्रेमानंच केली पाहिजे. प्रेम असलं की मन आपोआप निर्वैर होतं; त्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. विनोबांकडून हे कळलं की, आपलं चित्त शांत असलं पाहिजे आणि जगातल्या सगळ्या घडामोडींकडे आपण समत्व भावानंच पाहिलं पाहिजे. जेपींकडून ही शिकवण मिळाली की, आपण कधीही सत्तेची आणि सत्ताधीशांची तळी उचलता कामा नये. बुद्धिजीवी माणसं सत्तेची स्तुती करायला लागली की, समाजाची – विशेषत: त्यातल्या वंचित घटकांची – फार हानी होते.

आपली लहानपणची सर्वांतत सुंदर आठवण आपण कोणाच्या तरी कडेवर बसून हिंडत असण्याची असते. कडेवर बसलो की आपण बाकीच्या सगळ्या माणसांपेक्षा उंच होतो. त्या व्यक्तिपेक्षाही उंच होतो आणि तिला दिसलं नसेल असं जग आपल्याला दिसू लागतं. मोठं झाल्यावर आपण काय करायचं? कोणाच्या कडेवर बसायचं? तर महापुरुषांच्या कडेवर बसायचं! त्यांच्या पायाशी बसलो तर आपल्याला काहीच दिसणार नाही. आपण त्यांच्या कडेवर बसून पुढचं जग पाहिलं पाहिजे.

गांधी, विनोबा आणि जयप्रकाश हे असे लडिवाळ महापुरुष होते. ते आपल्यामध्ये होऊन गेले हे आपलं फार मोठं भाग्य आहे. सुरुवातीला त्यांच्या कडेवर बसून आपण भावी जग पाहू या आणि नंतर आपण पुरेसे उंच झालो की, आपल्या स्वयंप्रज्ञेनं ते कसं घडवता येईल याचा विचार करू या!

.............................................................................................................................................

‘गांधी, विनोबा आणि जयप्रकाश’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......