वस्तुस्थिती आणि परंपरेने लादलेल्या नियमांपलीकडे मी घडत होते, ही या रानभाज्यांची खूप मोठी देण आहे!
ग्रंथनामा - झलक
नीलिमा जोरवर
  • ‘बखर रानभाज्यांची : प्रवास रानभाज्यांच्या शोधाचा’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 07 September 2018
  • ग्रंथनामा झलक बखर रानभाज्यांची नीलिमा जोरवर

निसर्ग अभ्यासक आणि कार्यकर्त्या नीलिमा जोरवर यांचे ‘बखर रानभाज्यांची : प्रवास रानभाज्यांच्या शोधाचा’ हे पुस्तक नुकतेच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित झाले आहे. पश्चिम घाटातल्या रानभाज्यांची सचित्र माहिती देणाऱ्या या पुस्तकाची जोरवर यांनी सांगितलेली पार्श्वभूमी कम त्यांचे मनोगत...

.............................................................................................................................................

सह्याद्री... कधी एखाद्या भक्कम आधारासारखा तर कधी एखाद्या प्रेमळ मित्रासारखा, कधी एखाद्या अवखळ प्रियकरासारखा तर कधी लेकरांची काळजी वाहणाऱ्या मायाळू पित्यासारखा आणि ममत्वाने खाऊ-पिऊ घालणाऱ्या आईसारखा... अनेक अर्थाने माणसाचे नाते याच्याशी जोडलेले आहे. फक्त माणसाचेच नाही तर निसर्गातील अनेक पशू, पक्षी, कीटक आणि असंख्य जिवांचे वसतिस्थान आणि भरणपोषण येथे होते. असा हा सृष्टीचा अद्भुत आविष्कार, जीवनसखा सह्याद्री! अजस्र आणि मोहक. येथील निळे-काळे डोंगर, पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, हिरवाई आणि रंगीबेरंगी फुलांनी बहरलेला पावसाळ्यानंतरचा मोहक सह्याद्री! तर पाऊसपाणी आटल्यावर निष्पर्ण वृक्षांनी उन्हांतान्हात एका वेगळ्या चैतन्याने मुसमुसलेला हा सृष्टिसखा सह्याद्री..! याच्या या निसर्गकळा आणि वेगवेगळ्या रूपांतील सौंदर्य वर्णन करायला शब्द हे खूप तोकडे माध्यम आहे. येथील हा सह्याद्री, येथील निसर्ग ही अनुभवण्याचीच गोष्ट आहे. केरळपासून गुजराथच्या डांग जिल्ह्यापर्यंत अरबी समुद्राला समांतर असणाऱ्या या डोंगररांगांना पश्चिमघाट म्हणूनही ओळखले जाते. जगातील अत्यंत संवेदनशील असलेल्या १४ ठिकाणांपैकी हा एक. याला इंग्रजीत ‘बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट’ असे म्हटले जाते. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैव किंवा जीव विविधता. मग यामध्ये सर्व प्रकारच्या जिवांच्या विविधतेचा समावेश आला. अगदी साध्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या बुरशीपासून ते मोठाल्या वृक्षांपर्यंत. जगातील अनेक दुर्मीळ जीव येथे सापडतात. काही तर जगाच्या पाठीवर फक्त येथेच आढळतात ज्याला आपण प्रदेशनिष्ठ असे म्हणतो.

याच समृद्ध पश्चिमघाटाचा उत्तरेकडील भाग म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील पश्चिमेला असणारा अकोले तालुका. समृद्ध जंगल, उंच-सखल डोंगररांगा यांमुळे येथे असलेले हरिश्चंद्र, अलंग, मलंग, कुलंग, मदनगड, रतनगड आणि पाचपट्टा असे किल्ले, तर महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई हेही येथेच. पावसाळ्यात १२०० ते २२०० मिमीपर्यंत पडणारा पाऊस; अढळा, मुळा किंवा मळगंगा, प्रवरा, कृष्णवंती अशा नद्यांचे उगमस्थान असलेला हा भूभाग. येथील एकूण ३६१.७१ चौ.कि.मी. परिसर हा ‘कळसूबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्य’ म्हणून संरक्षित करण्यात आला आहे. साहजिकच येथील निसर्गाची भुरळ अनेकांना न पडली तरच नवल! याच निसर्गाच्या मोहात मीही पडले आणि निसर्गाच्या ओढीने वारंवार येथे येऊ लागले. हे सर्व करत असताना पर्यावरण या विषयाचाही वेगवेगळ्या माध्यमांतून अभ्यास करत होते. त्यातूनच अकोले, राजूर महाविद्यालयातून युवक-युवतींसोबत ‘नेचर क्लब’ या उपक्रमाद्वारे निसर्ग प्रत्यक्ष निसर्गात जाऊन समजून घेणे व समजावून देणे हे सुरू झाले. २००९-१० साली तज्ज्ञांच्या मदतीने अभयारण्य परिसरातील जैवविविधतेचा अभ्यास प्रकल्प आम्ही वर्षभर येथे राबवला. यातूनच अनेक गोष्टी समोर येत गेल्या आणि येथील निसर्ग संवर्धनाची जबाबदारी वाटू लागली. या सर्व डोळस भटकंतीतून येथील परिसराला, माणसांना, त्यांच्या जीवनपद्धतीला समजून घेण्याची जणू नशाच चढली. यांमुळे पुन्हापुन्हा, वेगवेगळ्या हंगामात येथे खेचत येऊ लागले. हे करत असतानाच इथल्या निसर्गाचे पर्यावरणीयदृष्ट्या असणारे महत्त्वही लक्षात येत होते.

जंगल जैवविविधता आणि पाणी या दृष्टीने अकोले तालुक्याचे आगळेवेगळे महत्त्व आहे. या तालुक्याचे भौगोलिक आणि हवामानाच्या दृष्टीकोनातून ढोबळमानाने तीन भागात विभागणी करता येते. भंडारदरा, कळसूबाई, हरिश्चंद्रगड हा संरक्षित असलेला निमसदाहरित, पानझडी जास्त पावसाचा प्रदेश, दुसरा कोतूळ-धामणगाव-मोर्चेवाडी ते खिरवीरे हा मध्यम पावसाचा डोंगरभाग व त्यावरील जंगल भाग; तर तिसरा टप्पा हा कोरडा, कमी पर्जन्यमानाचा परंतु सिंचनाच्या सोयीमुळे आता बागायती झालेला भाग. या प्रत्येक भागाचे वैशिष्ट्य हे वेगवेगळे म्हणजे तीनही टप्प्यात पर्जन्यमानात जशी विविधता, तशीच येथील मातीच्या रंग-आकारातही विविधता आणि त्यानुसार बदलणाऱ्या झाडांच्या प्रजाती. म्हणजे जसे अभयारण्य परिसरातील जंगलात जशी झाडांची विविधता जाणवते; तशीच अगदी कमी पर्जन्यात उगवणाऱ्या, टिकणाऱ्या अशा उपयुक्त झाडांची विविधता तिसऱ्या टप्प्यात दिसते, तर मधल्या टप्प्याचे आणखी वेगळे वैशिष्ट्य त्यामुळे संपूर्ण अकोले तालुका हाच महत्त्वपूर्ण आहे.

महादेव कोळी आणि ठाकर या दोन आदिवासी जमाती येथे मुख्यत्वे राहतात. इतरही अनेक मूळ रहिवासी या भागात आहेत. या आदिवासी व इतर कष्टकरी जमाती येथील निसर्गाशी संबंधित उपजीविकेवर अवलंबून दिसतात. जसे की पशुपालन, शेती व जंगल यांवर आधारित उपजीविका. याला जोड असते ती परिसरात उगवणाऱ्या रानभाज्यांची आणि पारंपरिकरित्या जतन केलेल्या वेगवेगळ्या पिकांच्या विविधतेची. मुख्यत: भात, मिलेट या पारंपरिक पिकांबरोबरच आता कांदा, ऊस, टोमॅटो अशी नगदी पिकेही मोठ्या प्रमाणात घेतली जातात. यासोबतच वालवर्गीय, भोपळावर्गीय फळभाज्या मोठ्या प्रमाणात तर विविध पालेभाज्या आणि कडधान्य हेही थोड्याबहुत प्रमाणात पिकवले जातात. अशा मिश्र प्रकारच्या समाजव्यवस्थेत एक समान दुवा सगळीकडेच आढळतो व तो म्हणजे परिसरात मिळणाऱ्या व उगवणाऱ्या रानभाज्या आणि त्याशी जोडलेली खाद्यपरंपरा. संपूर्ण अकोले तालुक्यात मिळणाऱ्या रानभाज्या व त्यांची पाककृती आपल्याला पानोपानी वाचायला मिळेलच. पण त्याबरोबरच खऱ्या अर्थाने ज्यांनी ही खाद्यपरंपरा टिकवून ठेवली, सातत्याने विकसित केली, त्या ठाकर समाजाच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असलेल्या या खाद्यसंस्कृतीची ओळख होऊ शकेल. महादेव कोळी हा समाज शेतीवर जास्त प्रमाणात अवलंबून असल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे यांचे याबद्दलचे ज्ञान व खाण्याचे प्रमाणही मर्यादित आहे. परंतु ठाकर समाज हा अजूनही समूहाधारित व जंगलाधारित आहे. आजही येथील लहान मुलालाही जंगलातील मेवा गोळा करून खाणे, खेकडे पकडणे, मासे मारणे याचबरोबर पक्षी मारून खाणे, हे कौशल्य चांगल्या पद्धतीने जमते व त्याबद्दलचे ज्ञानही त्यांच्याकडे परंपरेने व अनुभवातून येत जाते.

पावसाळ्यात पिकणारी शेती व त्यातून वर्षभरासाठी लागणारे धान्य उत्पादन, मग उरलेले वर्षभर अन्नाचा स्रोत म्हणून जंगल जवळ होतेच; ज्यातून प्रत्येक हंगामात विविध प्रकारची पाने, फुले, फळे, कंदमुळे यांचा अन्नासाठी वापर केला जात असे, जे आजही चालू आहे. पावसाळ्यात शेतीची प्रचंड कामे, बाजारातून विकत आणून भाजीपाला खाणे, ही न परवडणारी बाब. त्यामुळे येथे आपोआप उगवणाऱ्या भाज्या, रानात मिळणारी फळे ह्यांचा वापर आहारात मोठ्या प्रमाणात असणे साहजिकच होते. काही भाज्या या वैशाखात सुकवून ठेवल्या जातात, ज्या अडीनडीला उपयोगात आणता येतात. यात भोकर, सायरीचे दोडे, मोहाचे दोडे, अळू यांसारख्या सुकवून ठेवलेल्या भाज्यांचा वापर हमखास होतोच.

भात, नाचणी आणि वरई ही भंडारदरा परिसरातील मुख्य धान्य पिके. नाचणी खाणाऱ्यांचे व उगवण्याचे प्रमाणही आता खूप कमी झाले आहे. नाचणीला उत्पन्न कमी असते, त्यामानाने भाताचे संकरित वाण केले तर त्याला जास्त भाव मिळतो. साहजिकच अतिशय तोकडी शेती असल्यामुळे वर्षभर गुजराण होईल व आर्थिक गरजाही भागवेल असा भात पेरला जातो. वरई जास्त करून उपवासालाच खाल्ली जाते. भात हे त्या तुलनेत हलक्या प्रतीचे किंवा कमी जीवनसत्त्व असणारे धान्य आहे, अशा स्थितीत आरोग्याच्या दृष्टीने या लोकांसाठी या जंगलातील भाज्या व फळे खूप महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. शरीराला आवश्यक असणारी महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे, प्रथिने, व सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची गरज या रानभाज्या पूर्ण करतात. शुद्ध हवा, जंगलातील शुद्ध भाज्या आणि सोबतीला भरपूर कष्ट यांमुळे जीवनशैलीमुळे उद्भवणारे बरेच आजार इकडे फिरकतही नाहीत. या रानभाज्यांच्या केलेल्या अभ्यासात असे लक्षात येते की, बऱ्याचशा रानभाज्या या औषधी आहेत. जसे की भारंगी, टाकळा ही पावसाच्या सुरुवातीला मिळणारी रानभाजी ही जंत व कृमी यांचा नाश करणारी आहे. त्यामुळे पावसानंतर वाहणाऱ्या नव्या पाण्याने होणारे पोटाचे आजार होण्याचा धोका कमी होतो.

सुरुवातीला जेव्हा मी येथे यायला सुरुवात केली ते केवळ निसर्गाच्या ओढीतून, आत्मिक आकर्षणातून. पण जसजसे येथील लोकांशी बोलू लागले तसतसे त्यांचे अंतरंग मला कळू लागले आणि त्याबरोबर त्यांच्या समृद्ध परंतु संघर्षाने युक्त असलेल्या जीवनाचीही ओळख होत गेली. जंगल आणि त्यांचे असणारे अतूट नाते लक्षात येत गेले.

आणि माझेही यांच्याशी नाते नकळत जुळत गेले, जसे की प्रवासात गावकऱ्यांशी, विशेषत: गावकरी महिलांशी, गप्पा मारणे हा माझा आवडता उद्योग. दोन-तीन तासांच्या या सार्वजनिक वाहनातून केलेल्या प्रवासाचा शीण यांच्याशी बोलून निघून जायचा. सुरुवातीला हे लोक स्पष्ट बोलत नसत. एकदा अशाच एका जीपमधून प्रवास करताना, आमच्यासोबत शेंडीच्या बाजाराला निघालेल्या शेतकरी व इतर भरेकरी महिला होत्या. सुरुवातीला आमचा संवाद काही नीट होईना, मग मी एकेका रानभाजीचे नाव घ्यायला सुरुवात केल्यावर त्यांतील एक महिला म्हणाली, “ह्या ताईला आपल्या सगळ्या भाज्यांची नावे माहीत आहेत, म्हणजे ही आपल्याच इथली असणार.’’ तिला व इतरांना झालेल्या या जाणिवेमुळे आमच्या गप्पा नंतर खुलेपणाने झाल्या. हा अनुभव मला पुनःपुन्हा येत होता. आपले बोलणे काही चुकते का, असे त्यांना वाटे. पण जेव्हा मी वेगवेगळ्या जंगलातील भाज्यांची नावे मुद्दाम बोलण्यात घेई, तेव्हा आमचे नाते अधिक आत्मीय बनत होते. या भाज्यांच्या प्रवासात मी खऱ्या अर्थाने त्यांच्याशी जोडत गेले.

उडदावणे गावातल्या गांगड आजी-आजोबांच्या घरी एकदा रात्री निवांत गप्पा मारण्याचा योग जुळून आला. आजोबा एकदम कलाकार माणूस, तरुणपणातही कलंदर आणि स्वच्छंदी. त्यांना तमाशाचा नाद लागलेला, म्हणजे ते स्वत:च नट बनून अनेकदा नटी बनून तमाशा सादर करायचे. पूर्वीच्या काळी त्यातून पुरेसे उत्पन्न यायचे नाही. शेती पिकत नसे अशा वेळी घरातील पोरा-बाळांची जबाबदारी आजीवर येऊन पडलेली. आजी सांगतात, “तेव्हा शेंडीला धरणावर साहेब लोक राहायचे. मी जंगलातून कैलीची भाजी आणून या कॉलनीत विकायला न्यायचे. चार पैसे मिळायचे. त्यातूनच कधीकधी बाजरी आणायचे. नाहीतर हीच कैलीची भाजी भरपूर शिजवून पोरांना खाऊ घालायचे. पंद आणायचे, ते शिजवून खायचे आणि त्याची भाकरी नाहीतर ढोकळ करायचे.’’

“आजही आमच्या गावाला, आम्हांला बाजारातून भाज्या जास्त विकत आणाव्या लागत नाहीत. आम्ही अजूनही ९० टक्के भाज्या या जंगलातून किंवा परिसरात मिळणाऱ्या खातो. शहरात आलो तर सर्वच तडजोड करावी लागतेय. कोबी, बटाटा, फ्लॉवर खावा लागतो.’’ शहरात नोकरीनिमित्ताने राहायला आलेला बाळू सांगत होता. एकदा करवंदाचे वेगवेगळे पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण या भागात घेत असताना, आम्ही साखर घालून करवंदाचा जॅम तयार केला. त्यातल्या एकाही लहान मुलाने हा गोड जॅम खाल्ला नाही. येथे गोडाची व्याख्या वेगळी आहे. साखर फक्त चहासाठीच वापरली जाते. इतर पदार्थांसाठी नाही.

अभयारण्य परिसरातील लोकांची ही स्थिती आहे, तर याउलट खालच्या भागातील बागायतदार शेतकरी वेगवेगळी भाजीपाला पिके शेतात पिकवू लागले आहेत. यांत कोबी, फ्लॉवर, कांदा, टोमॅटो ही पिके जास्त आहेत. भरपूर रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या वापरामुळे हे विषयुक्त अन्न त्यांचा खाण्याचा भाग झाला आहे. शेताला वसवा नको याकारणाने अन्न म्हणून उपयोगात असणारे अनेक वृक्ष, वेली, तण यांना उपटून किंवा तोडून टाकले जाते. यांमध्ये अनेक महत्त्वाचे वृक्ष जसे हादगा, भोकर, मुरमाठी तर फांदभाजी, हरणदोडी, कुळू, शिंदळ माकडे, शेरण्या व अमारंथ या कुळातील रानभाज्या नष्ट होत आहेत. त्यामुळे येथील विविधता तर धोक्यात येतेच, परंतु येथील लोकही या आरोग्यपूर्ण खाण्यापासून दूर राहतात. शिवाय जे नष्ट होते ते कायमचेच.

या भागातील शेतकऱ्यांसोबतच येथील ग्राहकांनाही ही तडजोड स्वीकारावी लागते. जी खूपच जीवावर येते. संगमनेरला राहायला आल्यापासून रानभाज्या सोडाच, पण साध्या पारंपरिक किंवा ज्याला आपण गावठी म्हणतो अशा भाज्याही येथे मिळत नाहीत. पालक, शेपू, मेथी, चुका आणि कांदापात फक्त आणि त्याही भरपूर खते घातलेल्या, बेचव! जेव्हा हे खाण्याची वेळ आली, तेव्हा आपण काय गमावतोय याची जाणीव मला अस्वस्थ करून गेली. हे इतरांनाही कळले, तर हे टिकविण्याची आपली जबाबदारी किती मोठी आहे, याची जाणीव होते.

बऱ्याचदा रानभाज्यांबद्दल बोलताना तज्ज्ञ किंवा त्यावर काम करणारे लोक म्हणतात की, या भाज्या खाल्ल्या जात नाहीत म्हणून संपत आहेत किंवा इतरांना त्यांची माहिती व्हावी म्हणून स्पर्धा-प्रदर्शने आयोजित करणारे खूप लोक आहेत; परंतु एवढ्याने त्याचे संवर्धन होणार नाही. बारीपाडा गावाने १२-१३ वर्षांपूर्वी रानभाज्या स्पर्धा घ्यायला सुरुवात केली होती. त्या काळात जेव्हा शहरी किंवा आदिवासीं व्यतिरिक्त लोकांना याविषयी कोणतीही माहिती नव्हती त्यावेळी हे ठीकच होते, त्याचे परिणामही तेथे चांगले जाणवतात. गावपातळीवरच यांचे संवर्धन होणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कारण यांतील बऱ्याचशा भाज्या या त्या-त्या वातावरणाशी व वसतिस्थानाशी संबंधित आहेत. त्या-त्या ठरावीक ठिकाणीच आढळतात. शिवाय आज आपल्या वापरात असणाऱ्या अनेक वाल-भोपळावर्गीय भाज्या तसेच कडधान्य व तेलबियांचे जंगली भाऊबंध येथे आढळतात. त्यासाठीही एक महत्त्वाची जैव बँक किंवा बियाणे बँक म्हणूनही या भाज्या अस्तित्वात राहणे, हे महत्त्वाचे आहे.

आजच्या शेतीचा विचार करता, शेती ही जगण्यासाठी नव्हे तर बाजारासाठी केली जात आहे. यामुळे अनेक पारंपरिक पिके व त्यांची बियाणे आपण गमावून बसलो आहोत. रासायनिक खतांच्या वापरामुळे जमीन, पाणी या सगळ्यांचेच प्रदूषण झाले आहे. त्याचे परिणाम आरोग्यावर दिसत आहेत. गेल्या सात-आठ वर्षांत पांढऱ्या पेशी किंवा लाल पेशी यांच्याशी संबंधित आजार, कॅन्सर यांचे प्रमाण वाढले आहे.

जरी याचे एकच एक कारण रासायनिक शेती आहे हे आपण सांगू शकलो नाही, तरी याच्याशी असलेला घनिष्ठ संबंध आपण पडताळून पाहू शकतो. एका अभ्यासानुसार जगातले तीन लाख लोक वर्षांला कीटकनाशकाच्या विषबाधेमुळे मरतात. (स्रोत - द बुक ऑफ इंडिअन ट्री). अन्नसुरक्षेसाठी जास्तीतजास्त उत्पादन व जास्तीतजास्त उत्पादनासाठी रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर हे सूत्र असलेल्या अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेत पोषण सुरक्षा, आरोग्य सुरक्षा यांचा विचार होताना दिसत नाही. तसेच जंगलांपासून मिळणार्‍या या अन्नाचा हिशोबही यात केला गेलेला दिसत नाही.

कोणतीही खते, औषधे द्यावी न लागणारी, मानवी निगा घेण्याची गरज नसलेली ही जंगलातील न पिकविता मिळणारी फळे आणि भाजीपाला चव आणि वैविध्य देतात म्हणूनच आपल्या अन्नाला काही वेगळीच रंगत येते. शिवाय प्रत्येक हंगामात, भर उन्हाळ्यातसुद्धा, फळांनी लगडलेले वृक्ष पाहिले की सृष्टीच्या किमयेचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. मानवाबरोबरच इतर पशुपक्ष्यांच्या-कीटकांच्या अन्न, पाण्याबरोबरच पोषक तत्त्वांचीही सोय या वृक्षांतून होते. जमिनीत साठवून ठेवलेल्या पाण्याला रणरणत्या उन्हांत जिवांसाठी उपलब्ध करून देण्याची किती ही अफलातून आयडिया. पावसाळ्यात मिळणार्‍या वेगवेगळ्या हिरव्या भाज्या व फळभाज्या, त्यांनतर मिळणारी त्यांची फुले व फळे, डिसेंबर-जानेवारीत मिळणारे कंद आणि पुन्हा वसंतात फुललेल्या झाडांपासून व फळांपासून उपलब्ध होणारे अन्न. वर्षभर वेगवेगळ्या प्रकारात हे अन्न उपलब्ध असतेच.

शेती एके शेती न करता उपलब्ध असणाऱ्या रानभाज्या यांचा विचार केला, तर आजच्या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर हे न उगवता उपलब्ध असणारे अन्न आपल्याला जगवू शकेल अशी खात्री वाटते. यंदाच्याच २०१६च्या जून महिन्यातील गोष्ट. शेतामध्ये कोथिंबिरीचे पीक घेतले होते. परंतु कोथिंबीर काही नीट जमली नाही. तिला बाजारात भावही नव्हता. याच शेतात रानमाठ मोठ्या प्रमाणात उगवला होता. ती पालेभाजी लोक आवडीने खातात. म्हणून त्याच्या जुड्या बांधून बाजारात विकल्या जाऊ लागल्या. त्या शेतातील कोथिंबीर तोट्यात गेली, पण त्याची तूट भरून काढत या रानमाठाच्या भाजीने चक्क दीड महिन्यात ४० हजार रुपये कमवून दिले. दुसऱ्या एका शेतकऱ्याने हदग्याच्या झाडाची बाग लावली. कोणतीही आदाने न देता त्या बागेतून त्याला मोठ्या प्रमाणात फुले आणि शेंगांची विक्री करून चांगले पैसे मिळत आहेत. नागपूरच्या अनंत भोयर यांनी रस्त्याच्या कडेला उगवलेल्या टाकळ्याची कॉफी बनविली, ती लगेचच संपली. पुढच्या वर्षी जास्त कॉफी बनवण्यासाठी आपल्या शेतातच टाकळा पेरायचा, असे त्यांनी ठरवून टाकले. अशा एक ना अनेक गोष्टी याविषयी आपल्याला पाहायला, ऐकायला मिळतील.

पुस्तक लिहिण्याचा उद्देश इतकाच आहे की, या सर्व अन्नविविधतेला आपल्याला जपायचे आहे. ज्या काही थोड्या ठिकाणी हे शिल्लक आहे, ते टिकवण्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न होणे गरजेचे आहे. लोकांच्या आहारात ते जरूर असायला हवे, पण त्यासाठी त्याचे जास्त उत्पादनही व्हायला हवे. जे आज फक्त गोळा केले जाते ते परसबागेत, शेतात, बांधाच्या कडेला लावले गेले पाहिजे. त्यासाठी वेगवेगळे प्रयोग झाले पाहिजेत, हे सर्व टिकवण्याच्या परंपरा पुन्हा पुनरुज्जीवित झाल्या पाहिजेत. देवराई किंवा ठरावीक पूजा केल्याशिवाय नवीन येणाऱ्या अन्नधान्याचे सेवन न करणे किंवा ज्या घराण्याच्या देव्हाऱ्यात यांपैकी कोणताही देव असेल, त्या घराण्याने त्याचे सेवन न करणे अशा अनेक आदिवासी परंपरा आहेत. ज्या आजही काही प्रमाणात टिकून आहेत. त्या पुन्हा संरक्षित करणे, त्यांचे नैतिक मूल्यसंवर्धन करणे या तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

जंगल, त्याला जोडून येणाऱ्या रानभाज्या, निसर्गाची विविध रूपे, त्याच्याशी जवळीक, येथील माणसे आणि निसर्ग समजून घेताना एक माणूस म्हणून मी घडत गेले. वस्तुस्थिती आणि परंपरेने लादलेल्या नियमांच्या पलीकडे जाताना मी घडत होते, ही या रानभाज्यांची माझ्यासाठी खूप मोठी देण आहे. यांमुळे माझ्या अस्तित्वाला एक नवी ओळख मिळाली. हा निसर्गाचा अनमोल खजिना तुमच्या सर्वांसमोर ठेवताना मनस्वी आनंद होत आहे. हाच निखळ आनंद पुस्तक वाचून वाचकांनाही मिळो, हीच अपेक्षा!

.............................................................................................................................................

‘बखर रानभाज्यांची’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा आणि विशेष सवलत मिळवा -

https://www.booksnama.com/book/4524/Bakgar-Ranbhajyanchi

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -