‘माग्रस’ : एका वाचक चळवळीची पन्नास वर्षे
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
हर्षवर्धन निमखेडकर
  • डावीकडे खाली कवि आरती प्रभू यांचं स्वागत करताना कवि ग्रेस आणि उजवीकडे सुधीर देव एका सभेत मनोगत व्यक्त करताना. त्याखाली माग्रसची एक जुनी बैठक
  • Fri , 24 August 2018
  • ग्रंथनामा Granthnama वाचणारा लिहितो माग्रस Magras सुधीर देव Sudhir Deo

आज ‘माग्रस’ या नागपुरातील वाचक चळवळीचा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन आहे. माग्रस म्हणजे माझा ग्रंथसंग्रह. कोणतंही औपचारिक प्रारूप, स्वरूप, आकृतीबंध नसलेली एक चळवळ. मुळात नागपूरच्या वाचनप्रिय लोकांसाठी सुरू झालेली, पण नंतर विदर्भ आणि विदर्भाबाहेरही पसरलेली ही एक कल्पना. त्यानिमित्त हा लेख.

.............................................................................................................................................

माग्रस म्हणजे माझा ग्रंथसंग्रह. कोणतंही औपचारिक प्रारूप, स्वरूप, आकृतीबंध नसलेली एक चळवळ. मुळात नागपूरच्या वाचनप्रिय लोकांसाठी सुरू झालेली, पण नंतर विदर्भ आणि विदर्भाबाहेरही पसरलेली ही एक कल्पना. तिला संस्था म्हणता येणार नाही, कारण माग्रसचे तसे सेट-अपच नाही. हा एक अनौपचारिक प्रयास आहे. ग्रंथप्रेमींचं ग्रंथप्रेम अधिकाधिक वाढावं,  त्यांनी पुस्तकं विकत घेऊन वाचावीत आणि स्वतःचा ग्रंथसंग्रह वाढवावा, या भावनेतून जन्माला आलेला हा एक उपक्रम आहे, असंच याचं वर्णन करता येईल. पन्नास वर्षांपूर्वी १९६८ मध्ये याच दिवशी काही समविचारी व्यक्तींना सोबत घेऊन सुधीर देव या रसिक माणसानं माग्रसची पहिली सभा आयोजित केली आणि तिथूनच या दीर्घ प्रवासाची सुरुवात झाली.

पन्नास वर्षांपूर्वी मध्यमवर्गीय मराठी लोकांची आर्थिक स्थिती काही वेगळीच होती. आज जी सुसंपन्नता दिसते, ती तेव्हा नव्हती. सहावा आणि सातवा वेतन आयोग जन्माला यायचा होता. त्यामुळे बहुसंख्य वाचक वाचनालयांतून पुस्तकं आणून वाचायचे. पुस्तकांच्या किमती अगदी दहा वीस रुपये असल्या तरी तेवढीही रक्कम एकदम देणं जड वाटायचं. सुधीर देवांची स्वतःची पण हीच कथा होती. पण त्यांना वाचनाचा शौक तर जबरदस्त होता. त्यातच चांगल्या पुस्तकांचा संग्रह करण्याची तीव्र इच्छासुद्धा होती. मग त्यांनीच यावर एक उपाय शोधला. बँकेत जमा करतो, तसे दरमहा काही पैसे वेगळे ठेवायचे, बारा महिन्यांनंतर जमा झालेल्या रकमेतून आपल्या आवडीची दोन-तीन पुस्तकं विकत घ्यायची, हा इतका साधा फंडा होता. म्हणजे पुस्तक विकत घेतल्याचंही समाधान आणि आकस्मिक एकदम खर्च करण्याची गरज नाही.

त्या काळच्या कौटुंबिक बजेटमध्ये या बाबीचं महत्त्व जास्त असायचं. यातूनच मग अन्य, दुय्यम उद्देशही पुढे आले. यानिमित्तानं समविचारी लोक एकत्र येतील, त्यांच्यात साहित्यविषयक विचारांचं आदानप्रदान होईल, वेगवेगळ्या प्रकाशकांशी, लेखकांशी संपर्क साधता येईल, आणि ही चळवळ या सर्वांना जवळ आणेल, हेसुद्धा यात अध्याहृत होतं.

झालेही तसंच. सुधीर देवांचा हा प्रस्ताव नागपुरातल्या अनेक पुस्तकवेड्यांना पसंत पडला आणि त्यांनी देवांना बहुमोल सहकार्य केलं. या सर्वांच्या पाठिंब्यानं गेली पन्नास वर्षं नागपुरात (आणि बाहेरही) माग्रसचं कार्य सुरू राहिलं आहे.

देव स्वतः या उपक्रमाचे सूत्रधार आहेत. त्यांच्या कल्पक मेंदूतून त्यांनी या प्रदीर्घ वाटचालीत विविध छटा आणि आयाम असलेले कार्यक्रम शोधून काढले आणि राबवले. म्हणजे फक्त पुस्तक खरेदी विक्री हाच मर्यादित हेतू न ठेवता त्यांनी माग्रसचा आवाका वाढवला. तोवर माग्रसचं नाव सर्वदूर झालं होतं. विविध क्षेत्रांतली मंडळी त्यांच्यासोबत आता येऊ लागली होती. यात राजकारणी होते, वकील, डॉक्टर, इंजिनिअर होते; प्राध्यापक, पत्रकार, चित्रकार, संगीतकार हेसुद्धा होते. बँक आणि सरकारी कर्मचारी, शिक्षक, गृहिणी हे पण होते. या सगळ्यांच्या सहभागातून माग्रसचा एक-एक वर्षांचा इतिहास लिहिला गेला आहे.

याच दरम्यान मराठी मध्यमवर्गीयांना बऱ्यापैकी पैसा मिळू लागला. त्यामुळे महागडी पुस्तकं विकत घेणं आता सहज शक्य झालं. हे सगळं माग्रसच्या बॅनरखाली नागपूरबाहेरही विविध ठिकाणी स्थानिक पुस्तकप्रेमींच्या पुढाकारानं घडून येत होतं. या काळात माग्रसने प्रत्यक्ष ग्रंथव्यवहारव्यतिरिक्त जे उपक्रम चालवले, त्यात ‘अक्ष’ नावाचं अनियतकालिक, मासिक स्नेहभेटी, वार्षिक स्नेहभेट, पुस्तक प्रकाशन, साहित्यविषयक चर्चा, मान्यवर लेखकांच्या भेटी आणि अन्य ललितकलांवरसुद्धा आधारित कार्यक्रम यांचा समावेश आहे.

सुधीर देव अत्यंत उत्साही आणि कल्पक गृहस्थ आहेत. त्यांचा स्वतःचा ग्रंथसंग्रह जसा जोरदार आहे, तसाच त्यांचा लोकसंग्रहही काबिले तारीफ आहे. अहंगंडानं पछाडलेल्या स्वनामधन्य साहित्यपुंडांसोबतच अत्यंत साध्या, सरळ, डाऊन टू अर्थ प्रामाणिक लेखकांशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हे सगळे सुधीर देव आणि त्यांच्या तेवढ्याच कर्तबगार पत्नी अपर्णा देव या दोघांवरही मनापासून प्रेम करतात. देवांचे वय आज ऐंशीच्या पुढे आहे. तब्येतीची गाऱ्हाणी सुरू झाली आहेत, पण त्यांचा उत्साह अजूनही तसाच कायम आहे.

गेल्या दहा-पंधरा वर्षांत एकूणच पुस्तक वाचनाचं प्रमाण कमी झालं आहे. एकविसाव्या शतकातल्या नव्या पिढीजवळ तर वेळच नाही. त्यामुळे आज माग्रसची चळवळ पूर्वीएवढीच अॅक्टिव्ह आहे, असं म्हणता येणार नाही. याच सोबत, या ना त्या कारणांनी देवांवर नाराज होणारे, माग्रसपासून दूर गेलेलेही काही लोक आहेतच. देवांच्या सर्वच इच्छा पूर्ण झाल्या असतील असं मला वाटत नाही. काही उणिवा राहिल्या असतील, काही प्रयास अपुरे पडले असतील, काही चुका झाल्या असतील, काही स्वप्नं बाकी असतीलच. पण एकंदर गोळाबेरीज केली तर गेल्या पन्नास वर्षांचा माग्रससह देवांचा हा प्रवास बघणं हे मनोरंजक आणि अनुभवसमृद्ध करणारं होतं, असंच म्हणावं लागेल.

एका ग्रंथप्रेमीनं अन्य ग्रंथप्रेमींसाठी, आणि ती ही इतक्या सातत्यानं चालवलेली अशी दुसरी कोणतीच अनौपचारिक चळवळ भारतात नसावी, असं माझं मत आहे. नागपूरच्या साहित्यविषयक इतिहासात माग्रसचं नाव आवर्जून घ्यावं लागेल एवढी मोलाची कामगिरी देवांनी केली आहे, हे अभिमानानं नमूद करावंसं वाटतं.

बदलत्या काळानुरूप आज माग्रसचं काय प्रयोजन आहे, देवांनंतर माग्रसचं काय होणार, असंही कोणाला वाटू शकतं. पण आजच्या या वर्धापनदिनी तरी या शंका कुशंका दूर ठेवून मोकळ्या, निरभ्र मनानं सुधीर देवांचं त्यांच्या या अविरत ग्रंथसेवेसाठी कौतुक करायलाच पाहिजे. त्यांचं अभिनंदन, माग्रसच्या भावी वाटचालीसाठी आणि सुधीर व अपर्णा देव या दोघांच्या दीर्घायुरारोग्यासाठी शुभेच्छा.

.............................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत आणि वुडहाऊसचे अभ्यासकही.

bosham@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -