‘राग दरबारी’ या हिंदीतल्या श्रेष्ठ कादंबरीची ५० वर्षं : श्रीलाल शुक्ल यांची मुलाखत
ग्रंथनामा - मुलाखत
श्रीलाल शुक्ल
  • श्रीलाल शुक्ल आणि ‘राग दरबारी’
  • Sat , 18 August 2018
  • ग्रंथनामा Granthnama मुलाखत श्रीलाल शुक्ल Shrilal Shukla राग दरबारी Rag Darbari

हिंदीतील प्रसिद्ध कादंबरीकार, व्यंगलेखक श्रीलाल शुक्ल यांची ‘राग दरबारी’ ही कालजयी कादंबरी मानली जाते. या कादंबरीला नुकतीच ५० वर्षं पूर्ण झाली आहेत. १९६९ मध्ये या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. आजवर तिचे भारतीय आणि विदेशी मिळून १५ हून अधिक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. या निमित्तानं ‘साधना साप्ताहिका’नं  १५ ऑगस्टचा विशेषांक या कादंबरीच्या गौरवार्थ काढला आहे. त्यातील ही मुलाखत.

किताबघर प्रकाशन, नवी दिल्ली यांच्या वतीने ‘मेरे साक्षात्कार’ ही हिंदी भाषेतील नामवंत साहित्यिकांच्या पुस्तकांची मालिका प्रकाशित झालेली आहे. श्रीलाल शुक्ल यांच्या १६ मुलाखतींचे पुस्तकही या मालिकेत आहे. त्या मुलाखती १९८० ते २००० या काळात विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या आहेत. शुक्ल यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे विचार आणि लेखनकार्य यांचा वेध घेणाऱ्या त्या मुलाखती आहेत. त्यातील काही मुलाखतींमधून निवडलेले ४५ प्रश्न आणि त्यांची उत्तरे, यांचे संकलन म्हणजे ही मुलाखत आहे. ‘राग दरबारी’ विशेषांकाला अनुरूप ठरतील असेच प्रश्न येथे घेतले आहेत. - संपादक, साधना

.............................................................................................................................................

प्रश्न – तुमचा जन्म कधी आणि कुठे झाला? सुरुवातीचे शिक्षण कशा प्रकारे झाले?

शुक्ल - लखनौपासून २५ कि.मी. अंतरावर माझे गाव आहे. १९२५ मध्ये माझा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण गावातच झाले, माध्यमिक व इंटरपर्यंतचे शिक्षण कानपूर आणि लखनौ येथे झाले. अलाहाबाद विद्यापीठातून बी.ए. झालो. दरम्यान वडिलांचे निधन झाले. लखनौ विद्यापीठातून एम.ए. व एल.एल.बी. करायला सुरुवात केली, पण दोन्ही अभ्यासक्रम मधूनच सोडले. मग उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन राज्य शासनाच्या सेवेत दाखल झालो.

प्रश्न – तुमचया जीवनावर कोणत्या घटकांचा सर्वाधिक प्रभाव राहिला आहे?

शुक्ल - आर्थिक दृष्टीने गरीब असलेल्या कुटुंबात मी वाढलो. पण आमच्या कुटुंबात साहित्यिक वातावरण होते. माझे वडील संस्कृत पंडित होते. एक काका चंद्रमौलि सुकुल हे त्या काळातील प्रसिद्ध लेखक होते. त्यांच्याकडे अनेक नियतकालिके येत असत. त्यांच्या संग्रहात भरपूर पुस्तके होती. प्रेमचंद यांची पुस्तके मी तिथे वाचली. शालेय वयातच कवितालेखन सुरू केले. काही कविसंमेलनात भागही घेतला. पण बी.ए.ला आल्यावर माझ्यातील कविता हरवली. अलाहाबाद विद्यापीठात मला अनेक चांगले मित्र मिळाले. त्यापैकी धर्मवीर भारती, केशवचंद्र वर्मा, विजयदेव नारायण साही, लक्ष्मीकांत वर्मा, सर्वेश्वरदयाल सक्सेना हे माझे मित्र, पुढील दहा वर्षांत हिंदीतील नामवंत साहित्यिक म्हणून ओळखले जाऊ लागले.

प्रश्न - आपण नियमितपणे लेखन कधी सुरू केले? त्या काळात कोणत्या प्रकारचे साहित्य वाचले?

शुक्ल - संस्कृत, बंगाली, उर्दू आणि इंग्रजी साहित्य मी त्या काळात वाचले. या अभ्यासामुळे मला समीक्षा करण्याची दृष्टी मिळाली. १९५६ पासून खऱ्या अर्थाने लिहायला लागलो. कलकत्ता येथून प्रसिद्ध होणाऱ्या ‘ज्ञानोदय’ मासिकात माझे बरेच व्यंग्यलेखन त्या काळात प्रसिद्ध झाले. ‘धर्मयुग’ साप्ताहिकातही काही व्यंग्य लेख व कथा प्रसिद्ध झाल्या. विषयांच्या दृष्टीने माझे ते लेखन नवे होते. त्यामुळे त्या लेखनाकडे वाचकांचे लक्ष विशेषत्वाने वळले.

प्रश्न – तुमही पहिली कादंबरी कधी लिहिली गेली आणि कोणी प्रकाशित केली?

शुक्ल - १९५६ मध्ये ‘सुनी घाटी का सूरज’ ही माझी पहिली कादंबरी लिहिली गेली, ती त्यानंतरच्या वर्षी ‘किताब महल’ प्रकाशन, अलाहाबाद यांच्याकडून आली. ‘ज्ञानोदय’ व अन्यत्र प्रसिद्ध झालेल्या व्यंग्यलेखनाचा संग्रह भारतीय ज्ञानपीठ प्रकाशनाकडून १९५८मध्ये ‘अंगद का पाँव’ या नावाने आला.

प्रश्न – प्रशासकीय नोकरी आणि साहित्य\लेखन यांच्यातला तोल आपण कसा साधला?

शुक्ल - मला हे लवकरच कळले होते की, उपजीविकेसाठी ‘नोकरी’ विशेष उपयुक्त आहे, पण आंतरिक समाधान/शांती मात्र या नोकरीतून मिळणार नाही. म्हणून नोकरशाहीच्या दलदलीत फसणार नाही याची काळजी घेऊन मी माझे व्यक्तित्व जोपासले. १९५४ मध्ये लिहायला लागलो, पुढे मला असे वाटू लागले की, लेखनाशिवाय माझ्या व्यक्तित्वाला अर्थ नाही.

प्रश्न – नोकरशाहीने तुमच्या लेखनकार्यात कधी काही समस्या निर्माण केली का?

शुक्ल - तशी समस्या केवळ एकदा उद्भवली, १९६७-६८ मध्ये. उत्तर प्रदेश सचिवालयात मी तेव्हा उपसचिव होतो. ‘राग दरबारी’ ही कादंबरी लिहून पूर्ण झाली होती. ती छापण्यासाठी माझ्यावर कसलेही बंधन नव्हते, पण त्या कादंबरीच्या प्रकाशकाशी रॉयल्टी करारपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी मला शासनाची संमती आवश्यक होती. त्यासंदर्भात मी अर्ज केला तेव्हा, कादंबरीची हस्तलिखित प्रत मागितली होती. खरे तर तसे करण्यासाठी मी नियमानुसार बांधील नव्हतो, पण कादंबरीतील आशय पाहता, अशी भीती वाटत होती की, त्यातून काही वाद उदभवू शकतो. शेवटी मी ‘राग दरबारी’ची हस्तलिखित प्रत सरकारकडे पाठवली. मात्र ती परवानगी मिळवण्यासाठी मला माझ्याच सहकाऱ्यांशी झगडावे लागले. ‘देख रहे है’ किंवा ‘जल्दी देखेंगे’ अशी उत्तरे मला पुन:पुन्हा ऐकावी लागली..

त्या काळात प्रसिद्ध साहित्यिक अज्ञेयजी ‘दिनमान’ या नियतकालिकाचे संपादक होते आणि काही महिन्यांनी संपादकपद सोडणार होते. माझी अस्वस्थता पाहून आणि माझे मित्र सर्वेश्वरदयाल यांच्यामार्फत संमती मिळवून अज्ञेयजींनी असा प्रस्ताव ठेवला की, मी आधी वृत्तसंपादक म्हणून त्यांच्याबरोबर काम करावे आणि त्यांच्या निवृत्तीनंतर ‘दिनमान’चे संपादक व्हावे. या प्रस्तावाच्या आधारे मी थोडे नाटक करून उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले. त्या पत्रात सरकारी टोलवाटोलवी आणि नोकरशाहीची कूपमंडूकवृत्ती यांच्यावर कठोर टीका केली होती. पण आश्चर्य घडले. कसलाही झगडा/वाद निर्माण होण्याऐवजी, पुढील पंधरा-वीस दिवसांतच मला ‘राग दरबारी’ प्रकाशित करण्यासाठी परवानगी मिळाली. अर्थात, मी पण सरकारी नोकरी सोडून शेठजींची नोकरी करण्यास फारसा उत्सूक नव्हतो. त्यामुळे सुटकेचा नि:श्वास घेऊन मी होतो तिथेच राहिलो.

प्रश्‍न - पुढे आपण बढतीने आय.ए.एस झालात. तर थेट आय.ए.एस. आणि बढतीनंतर आय.ए.एस. यात काही फरक जाणवला?

शुक्ल - त्या काळात प्रशासकीय सेवेतील या दोन वर्गात आत्ताच्यासारखे द्वंद्व नव्हते.

प्रश्न – तुमचे आवडते लेखक कोण आहेत?

शुक्ल - टॉलस्टॉय, डोस्टोवस्की, चार्ल्स डिकन्स, स्विफ्ट, फॉकनर, मार्क ट्वेन, स्टीफन लिकॉक, चेखॉव इत्यादी. आधुनिक काळातील हिंदी लेखकांमध्ये रेणू, प्रेमचंद, अज्ञेय, निर्मल वर्मा, विनोदकुमार शुक्ल इत्यादी. प्रेमचंद हे मला कादंबरीकार म्हणून जेवढे भावले त्यापेक्षा अधिक कथाकार म्हणून प्रभावी वाटले.

प्रश्न – एखाद्या प्रचलित विचारप्रणालीचा आपल्या लेखनावर प्रभाव आहे का?

शुक्ल - कोणत्याही विशिष्ट विचारप्रणालीशी माझी बांधीलकी राहिली नाही. म्हणजे प्रगतीशील लेखक संघ किंवा जनवादी लेखक संघ यांचा सदस्य मी कधीच नव्हतो. परंतु साहित्याचा जो मूळ हेतू आहे, त्याबाबत माझे त्यांच्याशी मूलभूत असे काही मतभेद नाहीत. अधिक व्यापक दृष्टीने पाहिले तर मी त्यांच्या भूमिकांशी बऱ्याच प्रमाणात सहमत आहे. आजच्या भारतात जो लेखक येथील समाजजीवनातील विसंगती व अंतर्विरोध, वर्गसंघर्ष, सामाजिक-आर्थिक-राजकीय समस्या यांच्यापासून अलग राहून लेखन करतो, त्या लेखनाच्या उपयुक्ततेविषयी प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. कारण आधुनिक भारतातील एकूण चित्र कोणत्याही लेखकाला त्रासदायक व विचलित करणारे वाटणे साहजिक आहे. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ यांच्यातील दरी वाढत आहे आणि सामान्य माणूस सर्व प्रकारचा अन्याय व शोषण यांना बळी पडत आहे. हे सर्व विसरून जर कोणी लेखक शाश्वत मूल्यांची चर्चा करत असतील तर ते या समाजाशी न्याय्य पद्धतीने वागत नाहीत असे मला वाटते. त्यांच्या संवेदनांमुळे कुठे ना कुठे खोट असली पाहिजे.

प्रश्न – तुमच्या प्रमुख साहित्यकृतींमधील तुम्हाला कोणत्या जास्त आवडतात?

शुक्ल - साहित्यकृती छापून आल्यानंतर त्यातील त्रुटींवर अधिक लक्ष जाते. तेव्हा असेही वाटते की, आपण अपेक्षित काम केलेले नाही. सर्वच लेखनात काही ना काही कमतरता जाणवते. तरीही ‘पहला पडाव’, ‘रागदरबारी’ आणि ‘मकान’ या माझ्या तीन कादंबऱ्यांना मी अधिक गुण देईन.

प्रश्न -‘राग दरबारी’मध्ये वर्णन केले आहे, ते वातावरण व परिस्थिती यातून तुम्ही स्वत: गेला आहात, की त्यात कल्पनाच अधिक आहेत?

शुक्ल - त्यात हवेतून आलेल्या कल्पना नाहीत. मी जमिनीवरील सामाजिक परिस्थिती पाहिली. त्यातील अनेक व्यक्ती, घटना, प्रसंग यांच्या उभ्या-आडव्या मिश्रणातून ‘राग दरबारी’ आकाराला आली आहे.

प्रश्न – तुमच्या दृष्टीने ‘राग दरबारी’तील सर्वांत प्रिय पात्र कोणते आहे?

शुक्ल - ‘राग दरबारी’च्या ग्रामीण वातावरणात अनेक जिवंत पात्रांचे चित्रण आहे. परंतु ज्या पात्रासोबत मी काही महिने राहू इच्छितो असे एकही पात्र त्या कादंबरीत नाही.

प्रश्न – ‘राग दरबारी’ ही कादंबरी तुमही एकदाच लिहिली की, अनेक वेळा?

शुक्ल - १९६२ ते ६७ अशी पाच वर्षे मी ही कादंबरी लिहीत होतो. यातील काही प्रकरणं मी सात-सात वेळा लिहिली आहेत. पण सर्वांत जास्त वेळा लिहिलेल्या कादंबऱ्या म्हणजे ‘मकान’ आणि ‘सीमाएँ टूटती है’.

प्रश्न - लेखन करण्याची पूर्वतयारी म्हणून आपण डायरी लिहिणे, नोटस काढत राहणे असे काही करता का?

शुक्ल - नाही. लिहिण्याच्या वेळी काही टिपणे करतो, पण आधीपासून नाही. तसे करणे लेखकाला यांत्रिक बनवते असे मला वाटते.

प्रश्न - तुमच्या लेखनावर कोणत्या लेखकांचा जास्त प्रभाव आहे? विशेषत: ‘राग दरबारी’ लिहिताना कोणाचा प्रभाव होता?

शुक्ल - निराला हे माझ्यासाठी लेखनातील आदर्श आहेत. त्यांच्या ‘कुल्ली भाट’ आणि ‘बल्लेसुर बकरिहा’ या कादंबऱ्यांमध्ये तुम्हाला राग दरबारीची मूलतत्त्वं शोधता येतील.

प्रश्न – आपण ‘राग दरबारी’पेक्षा श्रेष्ठ कादंबरी लिहू शकतो, असं तुम्हाला वाटतं का?

शुक्ल - ‘राग दरबारी’मध्ये मला जितक्या उणीवा दिसतात, त्यातून असे मानायला वावच नाही की, ती खूप श्रेष्ठ कादंबरी आहे.

प्रश्न - श्रीपतरायजी आणि नेमिचंद्रजी यांनी ‘राग दरबारी’ची केलेली समीक्षा वाचून तुम्हाला काय वाटले?

शुक्ल - ती समीक्षा वाचताना मला मजा आली होती. कारण श्रीपतरायजींची समीक्षा ज्या दिवशी मी वाचली, त्याच दिवशी प्रकाशकाचे पत्र मिळाले होते, ‘राग दरबारी’ची दुसरी आवृत्ती येत असल्याचे.

परंतु प्रचलित परंपरेप्रमाणे ‘टीका/समीक्षा हा गटबाजीचा भाग आहे’ असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे, असे मी कधीच केले नाही. कारण त्या समीक्षकांशी माझा परिचयही नव्हता. कोणत्याही प्रतिकूल मतांना/टीकेला मी माझ्या विवेकाच्या आधारे स्वीकारतो किंवा नाकारतो. पण तरीही आज पुन्हा ‘राग दरबारी’ लिहायला बसलो तर, सध्या असलेले दोष व उणीवा यांच्यासहच लिहीन. मात्र हेही शक्य आहे की, श्रीपतराय किंवा नेमिचंद्र किंवा अन्य कोणी लेखक ही कादंबरी तिसऱ्या, चौथ्या प्रकारे लिहितील.

प्रश्न -‘राग दरबारी’वर दूरदर्शन मालिका तयार झाली, आपल्या कादंबरीचे हे रूपांतर आपणंस कसे वाटले?

शुक्ल - ‘राग दरबारी’ची दूरचित्रवाणी मालिका बनवणे हे काम कठीण होते. याचे कारण या कादंबरीचे खरे मोल आहे ते तिच्या भाषिक सरंचनेत. कोणत्याही प्रकारच्या दृकश्राव्य माध्यमात ते मूल्य हरवणारच. शिवाय, मालिका किंवा चित्रपटातून अपेक्षित असते असे कोणतेच आकर्षण ‘राग दरबारी’मध्ये नाही. या कादंबरीत स्त्री-पात्र नाही. त्यामुळे मालिका व चित्रपटात जो रोमँटिक कारभार असतो, तो इथे शक्य नाही. या कादंबरीत जबरदस्त म्हणावा असा घटनाक्रम नाही. त्यामुळे तिचे दृकश्राव्य रूपांतर जरा कठीणच काम आहे.

शमा झैदी आणि सथ्यू हे दोघे ‘राग दरबारी’वर चित्रपट बनवायला उत्सुक होते, पण मी त्यांच्या उत्साहावर पाणी टाकले. तरीही आता ‘राग दरबारी’वर जी मालिका तयार झाली, तिच्यापेक्षा अधिक चांगली बनू शकली असती.

प्रश्न - ‘राग दरबारी’चे अनुवाद काही भारतीय व काही परदेशी भाषांमध्ये झाले आहेत. आपण त्या अनुवादांवर समाधानी आहात?

शुक्ल - ‘राग दरबारी’मध्ये जो माहौल आहे तो विदेशी भाषेत रूपांतरित करणे अत्यंत कठीण आहे. युरोपियन वाचकांना तो समजून घेता येणे अवघड आहे. पण तरीही जिलियन राइट यांनी केलेला इंग्रजी अनुवाद बढिया आहे. भारतीय भाषांमध्येही चांगला अनुवाद झाला आहे.

प्रश्न – तुमच्या प्रिय साहित्यिकांविषयी सांगता?

शुक्ल - ज्यांचे साहित्य वाचायला मी उत्सुक असतो ते प्रिय असा अर्थ तुम्हाला अभिप्रेत असेल तर निर्मल वर्मा, भीष्म साहनी, कृष्णा सोबती, उदय प्रकाश.

प्रश्न – कवींना विसरलात?

शुक्ल - कुँवर नारायण, केदारनाथ सिंह, लीलाधर जगूडी. जगूडी यांचे लेखन अधिक आश्वासक आहे, ते अद्यापही विकसित होत आहेत असे वाटते.

प्रश्न – विदेशी साहित्यिक?

शुक्ल - काही आहेत, पण ज्यांचे लेखन वाचताना वाटायचे की, यांना नोबेल पुरस्कार मिळायला हवा असे दोन आहेत. नंतर त्या दोघांनाही नोबेल मिळालेही. सालबेलो आणि गार्डीमर.

प्रश्न -‘राग दरबारी'च्या तुलनेत ‘विश्रमापूर का संत’ या कादंबरीचे मूल्यमापन आपण कसे कराल?

शुक्ल - या दोन्ही कादंबऱ्यांची तुलना होऊ शकत नाही. दोन्ही भिन्न प्रकारच्या व भिन्न आशयविषयाच्या कादंबऱ्या आहेत. तुम्ही डिकन्सच्या ‘पिकविक पेपर्स आणि ‘अ टेल ऑफ टू सिटीज’ यांची तलुना करू शकता का?

प्रश्न - आजकालच्या लेखनात एक प्रकारची निराशा दिसते? तुमच्यातला लेखकही निराशावादी झाला आहे का?

शुक्ल - या प्रश्नावर सामान्य नागरिकांची काय प्रतिक्रिया आहे, याचा आपणच स्वत: विचार करा. आजच्या सामाजिक स्थितीमध्ये आशावाद कायम ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. हे खरे नाही का?

प्रश्न - तुम्ही स्वत:ला एखाद्या विचारधारेच्या जवळचे मानत असाल ना?

शुक्ल - याचे उत्तर मी अनेक वेळा दिले आहे. मी रस्त्याच्या मध्यमभागापासून काही पावले डावीकडे उभा आहे.

प्रश्न – लेखकाचे म्हणून असे काही सामाजिक उत्तरदायित्व असते, असे आपण मानता काय?

शुक्ल - माझी सहानुभूती कोणाला आहे, या मर्यादित अर्थाने बांधिलकी मानतो. उदाहरणार्थ, तुम्ही मला विचारले की, ‘तुमची सहानुभूती कोणाच्या बाजूला आहे, पायी चालणाऱ्याच्या की मोटारगाडीतून धावणाऱ्याच्या?’ तर मी सांगेन, पायी चालणाऱ्याच्या. पण यापलीकडे जाऊन राजकीय कार्यक्रम आप आपल्या सर्जनशील बांधीलकीचे बंधन मला स्वीकारार्ह वाटत नाही. माझ्याजवळ लेखन हे असे एक क्षेत्र आहे, जिथे मी माझे स्वातंत्र्य शोधू शकतो. हे असे क्षेत्र आहे जिथे माझ्या वरिष्ठाला घाबरत नाही आणि पत्नीलाही.

प्रश्न – तुम्ही व्यंगलेखन का करता?

शुक्ल - मी मूलत: लेखक आहे. व्यंग्य लेखन मी जाणीवपूर्वक करीत नाही. कादंबरी, कथा, हास्य कथा, लेख व साहित्य समीक्षा असे विविध प्रकारचे लेखन मी सातत्याने करत आलो आहे. विषय, घटना-प्रसंग आणि अभिव्यक्ती यांची मागणी म्हणून जिथे मला व्यंग्यात्मक शैलीचा उपयोग अधिक उपयुक्त व स्वाभाविक वाटतो, तिथे मी व्यंगलेखन करतो.

प्रश्न - व्यंग्य लेखनामुळे वर्तमानात सामाजिकआर्थिक बदल होऊ शकतात? जर हो तर ते लेखन समाजबदलाला कशा प्रकारे प्रेरित करते?

शुक्ल - लेखन मग ते व्यंग असो वा अन्य कोणत्या प्रकारचे, प्रत्यक्षपणे सामाजिक बदल घडवू शकत नाही. सामाजिक बदलांची प्रक्रिया राजकीय व अन्य उपायांनी चालू असते. त्यात साहित्याची भूमिका महत्त्वपूर्ण असते. पण अप्रत्यक्षपणे.

प्रश्न - ‘राग दरबारी’ कादंबरीने स्वतंत्र भारतातील लोकशाहीवरील आदर्शाचा मुखवटा उतरवला आहे. आपली लोकशाहीव्यवथा सडलेली आहे. ती अधिक वाईट अवस्थेत जाण्यापासून कसे रोखता येईल?

शुक्ल - प्रबुद्ध व्यक्तींच्या नेतृत्वाखाली जनता सशक्तपणे संघटित झाली आणि राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील भ्रष्टाचार व कुव्यवस्था यांच्या विरोधात उभी राहिली तर ते हे होऊ शकते. अन्य कोणता उपाय मला दिसत नाही. पण आजचे राजकीय नेतृत्व या दिशेने जाईल असे वाटत नाही.

प्रश्न - ‘राग दरबारी’मधील धूर्त नेता वैद्यजी, प्रिन्सिपल, सनीचर, छोटे पहलवान आणि सर्वांचा न्याय करणारे पंच, या व्यक्तिचित्रांमध्ये मागील तीन दशकांत काही बदल झालाय असे आपणास वाटते का?

शुक्ल - जर काही बदल झालाच असेल तर तो हा आहे की, आपली नोकरशाही पूर्वीपेक्षा जास्त भ्रष्ट, बेशरम आणि क्रूर झाली आहे.

प्रश्न - सुरक्षा, गिरफ्तारी, सपोला, दुराचरण, परीदीन की प्रेमगाथा, या कथांमधून आपण लोकशाहीतील विकासयोजनांवरील मुखवटा उतरवला आहे. या योजनांमध्ये घुसलेल्या अपप्रवृत्तीमुळे आपण मागे पडत गेलो आहोत?

शुक्ल - आपण मागे पडत गेलो यामागे योजनांमधील भ्रष्टाचार व अकार्यक्षमता हे एक कारण आहे. पण यापेक्षा महत्त्वपूर्ण कारणे अन्य काही आहेत. १. प्राथमिक शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, कुटुंबनियोजन इत्यादी घोषित कार्यक्रमांमध्ये राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासनाची कामाप्रती निष्ठा यांचा पूर्ण अभाव, २. आर्थिक धोरणे आखताना स्पष्ट विचार आणि सैद्धांतिक बांधिलकी यांचा अभाव, ३. शासकीय\सरकारी खर्चामध्ये ढिसाळपणा, ४. मध्यम व कनिष्ठ मध्यमवर्गाची उपेक्षा.  

प्रश्न - ‘दंगा’ या आपल्या कथेतून हे स्पष्टपणे पुढे येते की, प्रशासन किती संवेदनाहीन पद्धतीने चालत असते. तुम्ही व्यवस्थेच्या विद्रूपतेवर सातत्याने प्रहार केले आहेत. तर मग सांगा व्यवस्था समाजन्मुख का होत नाही?

शुक्ल - कारण संपूर्ण व्यवस्थेत, मग ती संसद/विधिमंडळ असो, कार्यपालिका/मंत्रिमंडळ असो, वा न्यायपालिका असो, या सर्व ठिकाणी कार्यरत असणाऱ्या लोकांमध्ये उच्चवर्गीय, अभिजन व व्हीआयपी मानसिकता भिनलेली असते.

प्रश्न - ‘यह घर मेरा नही’ या कथेत स्वतंत्र भारतातील दुष्टपणा आणि दाभिंकता यांचे प्रतिबिंब पहायला मिळते. तर तुमच्या दृष्टीने, दुष्टपणा व दांभिकता यांच्यापासून समाजजीवन मुक्त कसे करता येईल?

शुक्ल - याचे साधे-सरळ उत्तर नाही. राजकारणाच्या बाहेर जाऊन जर शुद्ध व नैतिक मूल्यांच्या आधारावर सामाजिक नेतृत्व उभे राहिले तर कदाचित वर्तमानातील मूल्यहीनतेच्या विरोधात पर्याय दिसू शकेल. गांधी व जयप्रकाश यांनी राजकारणात राहूनही तसा पर्याय दिला होता.

प्रश्न - सत्तरच्या दशकात प्रसिद्ध झालेल्या ‘राग दरबारी’मधील सत्य, एकविसाव्या शतकातही जसेच्या तसे पहायला मिळते. हा प्रकार तुम्ही तुमच्या कादंबरीची सफलता मानता की, आपल्या लोकशाही राष्ट्राचे दुर्भाग्य?

शुक्ल - आपल्यासारख्या विकसनशील देशाची स्थिती लवकर बदलत नसते. पण जे काही बदल झालेत, ते निराशाजनकच आहेत. आपली सातत्यपूर्ण अधोगती होत आली आहे, आपण अधिकाधिक अनैतिक होत चाललो आहोत. स्वातंत्र्यानंतर स्थिती सुधारलेली नाही, अधिक बिघडलेली आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भले ही आपण मोठा पल्ला गाठला असेल, पण सभ्य व सुसंस्कृत समाजनिर्मितीच्या बाबतीत आपण बेपर्वाई दाखवत आलो आहोत. त्यामुळेच भ्रष्टाचार आणि नैतिक मूल्यांची अधोगती हा आता चर्चेचा मुद्दा होत नाही. समाज तत्कालीन घटनांमुळे तेवढ्यापुरता प्रभावित होतो. पण पुन्हा पहिल्यासारखी स्थिती येते.

प्रश्न - ‘राग दरबारी’मध्ये जी भाषा आहे, ती पूर्वी आपल्याकडे नव्हती. किंबहुना एकूण हिंदी साहित्यात तशी शक्यता नव्हती. ही भाषा म्हणजे एक विस्फोट होती. तर ही भाषा कशी आकाराला आली?

शुक्ल - एका बाजूला अवधी आहे, दुसऱ्या बाजूला इंग्रजीतील वाक्प्रचार येतात. इंग्रजीतील वाक्प्रचारांचा अनुवाद नाही तर, त्यांचा गाभा हिंदीत आत्मसात करण्याचा प्रयत्न मी केला आहे. पण मूलत: अवधी आहे आणि खडीबोलीचे व्याकरण व क्रियापदं यांचा वापर केला आहे.

प्रश्न - ‘राग दरबारी’मध्ये बेलाचा अपवाद वगळता स्त्रीपात्र नाही. आणि बेलाचे पण विशेष स्थान नाही.

शुक्ल - भारतीय खेडी पुरुषप्रधान आहेत. स्त्रियांचे अस्तित्व त्याअनुषंगाने येते. पण ‘राग दरबारी’मध्ये स्त्री-पात्र येत नाहीत, याचे कारण त्या कादंबरीचे जे कथासूत्र आहे आणि तंत्र आहे, त्यात स्त्रियांचे पात्र येण्याची शक्यता नाही.

प्रश्न - ‘राग दरबारी छापली जाण्यापूर्वी ती इतकी महत्त्वपूर्ण ठरले असे तुम्हाला वाटत होते?

शुक्ल - माझ्या डोक्यात ही गोष्ट स्पष्ट होती की, काहीही असो, उपहासपूर्ण शैलीत लिहिली गेलेली ४५० पानांची अशी कादंबरी केवळ हिंदीच नाही तर, एकूण भारतीय भाषांमधील पहिली आहे. जेव्हा एक पूर्णत: वेगळा प्रयोग केला जातो, तेव्हा त्यात काही ना काही उणीवा राहणारच. तेव्हाही आणि आजही माझ्या मनात हे स्पष्ट आहे की, चांगली साहित्यकृती दोषरहित असणे आवश्यक नाही.  ‘राग दरबारी’ लिहून झाल्यावर मला हे माहीत होते की, काही उणीवा असतील तरीही ही कादंबरी विशेष प्रभाव टाकून जाणार आहे.

प्रश्न - एक महान लेखक या नात्याने तुम्हाला भारतीय समाजापुढील मुख्य आव्हाने कोणती दिसतात?

शुक्ल - महान लेखक वगैरे सोडून द्या, एक व्यक्ती म्हणून मला असे वाटते की, राजकीय दिशाहीनता ही सर्वांत मोठी समस्या आहे. या समस्येने सर्व राजकीय पक्ष ग्रस्त आहेत. भले सर्वांचे निवडणूक जाहीरनामे वेगवेगळे असतील, पण कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यातून समाजाचे समग्र रूप स्पष्ट होत नाही. सर्व पक्षांची उद्दिष्टे तत्कालीन स्वरूपाची असतात. त्यामुळे समाजाच्या सव४ांगीण विकासाची दिशा सापडत नाही.

प्रश्न – भारतीय लोकशाहीचे भविष्य?

शुक्ल - अराजकता आणि विस्कळीतपणा शतकानुशतके झेलण्याची भारताची क्षमता असाधारण म्हणावी अशी आहे. या आधारावर आपण असे म्हणू शकतो की, भारतीय लोकशाहीचे भविष्य तेच आहे जे आजचे वर्तमान आहे.

प्रश्न – तुमच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वांत मोठी शक्ती कोणती आणि मोठा दुर्गुण?

शुक्ल - दुर्गुण फार सहजतेने सांगू शकतो. तो हा आहे की, कोणत्याही विषयावर एकाग्रचित्ताने मी दीर्घकाळ काम करू शकत नाही. माझी सर्वांत मोठी शक्ती ही आहे की, (मेकॅनिकल किंवा तांत्रिक गोष्टी सोडून) नव्या गोष्टी, नव्या व्यक्ती, नवे विचार यांच्यासंदर्भात माझ्यात कमालीची जिज्ञासा असते. हे सर्व जाणून घेणे, समजून घेणे आणि कोणताही नवा मानवी अनुभव घेणे यासाठी माझी बुद्धी जास्त शोधक आहे.

प्रश्न – आज मागे वळून स्वत:च्या लेखनाकडे पाहता तेव्हा काय वाटते?

शुक्ल - कदाचित प्रत्येक लेखकाचा हा अनुभव असेल... मला असे वाटते की, आत्तापर्यंत जे काही लेखन झाले ते सर्व काठाकाठाने लिहिले आहे. प्रवाहाच्या मध्यात जाऊन लाटांचा सामना करण्याचे आव्हान बाकी आहे.

अनुवाद -  विनोद शिरसाठ

(‘साधना’ साप्ताहिकाच्या १८ ऑगस्ट २०१८च्या अंकातून.)

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -