प्रत्येक पुस्तकवेड्याच्या आयुष्यात पुस्तकशोधाच्या काही सुरस आणि चमत्कारिक गोष्टी असतातच. तशा माझ्याही आहेत.
ग्रंथनामा - आगामी
निखिलेश चित्रे
  • ‘आडवाटेची पुस्तकं’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 10 August 2018
  • ग्रंथनामा Granthnama आगामी निखिलेश चित्रे Nikhilesh Chitre आडवाटेची पुस्तकं Aadvatechi Pustaka

ग्रंथसंग्राहक आणि गाढेवाचक असलेल्या निखिलेश चित्रे यांचं ‘आडवाटेची पुस्तकं’ हे पहिलंवहिलं पुस्तक लवकरच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित होत आहे.  जगभरातल्या उत्तम पण फारशा माहीत नसलेल्या लेखकांची व त्यांच्या साहित्याची सफर हे पुस्तक घडवतं. या पुस्तकाला चित्रे यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

साधारण सत्त्याण्णव साल. मी नुकताच पदवीधर झालो होतो. नोकरीचा शोध सुरू होता. नोकरीच्या मुलाखतीसाठी मुंबईला आल्यावर चर्चगेटच्या फ्लोरा फाऊंटन भागातल्या फुटपाथवर असलेल्या पुस्तकांकडे जाणं व्हायचंच. तेव्हा काफ्का, कम्यू (Camus), सार्त्र यांचं गारुड होतं. त्यांची पुस्तकं जमतील तशी मिळवून वाचत होतो. या तिघांमध्ये काफ्का खूपच जवळचा वाटायचा. त्याच्या ‘द ट्रायल’ आणि ‘द कासल’ या दोन कादंबऱ्या त्याच फुटपाथवर मिळालेल्या होत्या. त्यातही ‘द ट्रायल’ची पेलिकन प्रकाशनानं काढलेली रॉयल पुठ्ठाबांधणीची प्रत माझी आजही विशेष लाडकी आहे. त्या प्रतीच्या मुखपृष्ठावर देखणी सोनेरी वेलबुट्टी काढलेली आहे. त्या पुस्तकाला एक विशिष्ट वास आहे. तो मला थेट काफ्काच्या त्यावेळच्या जगातच घेऊन जातो. विला आणि एडविन म्यूर (Willa and Edwin Muir) या दांपत्यानं केलेला हा अनुवाद त्यावेळी काफ्काच्या वाचकांमध्ये बऱ्यापैकी लोकप्रिय होता. आज ती जागा ब्रेओन मिशेलच्या (Breon Mitchell) अनुवादानं घेतलीय.

तर असाच एकदा पालघरहून इंटरव्ह्यूसाठी मुंबईला आलो होतो. पाय आपसूकच चर्चगेटच्या फुटपाथकडे वळले. तिथे पुस्तकं चाळत हिंडताना हायकोर्टाच्या कंपाऊंडला लागून असलेल्या एका पुस्तकाच्या चळतीमधल्या जाडजूड काळ्या कव्हरच्या पेपरबॅक पुस्तकानं लक्ष वेधलं. तो काफ्कानं त्याची प्रेयसी फेलित्स बाउअर (Felice Bauer) हिला लिहिलेल्या पत्रांचा ‘लेटर्स टू फेलिस’ हा संग्रह होता. चांगला मजबूत साडेचारशे पानांचा. पुस्तकही अगदी नवंकोरं. प्लास्टिकच्या वेष्टणात गुंडाळलेलं. किंमत साडेतीनशे रुपये. ती पुस्तकाच्या शेवटच्या पानावर पेन्सिलनं लिहिलेली होती. बरीच घासाघीस करूनही विक्रेता खाली यायला तयार नव्हता. माझ्या खिशात पाससाठी घरून मिळालेले नेमके साडेतीनशे रुपयेच होते. शेवटी निमूटपणे पुस्तक खाली ठेवून स्टेशनचा रस्ता धरला. पास काढायच्या खिडकीसमोर उभा राहिलो, पण सारखी पुस्तकाची आठवण यायला लागली. आता पुन्हा हे पुस्तक केव्हा समोर येईल माहीत नाही. नवं घेणं तर परवडणारं नव्हतंच. अस्वस्थ झालो. अखेर पास न काढता तसाच सरळ परत गेलो आणि पुस्तक घेऊन टाकलं. आनंदानं ते हातात घट्ट धरून स्टेशनवर आलो आणि विदाऊट तिकीट मुंबई सेंट्रलला जाऊन पालघरला जाणारी बलसाड फास्ट पॅसेंजर पडकली. सुदैवानं त्यादिवशी टीसी आला नाही.

पुढे नोकरी लागल्यावर पुस्तकं घेणं परवडायला लागलं आणि आपसूकच वाढलंही. तेव्हाची एक गोष्ट. भारतीय विद्याभवननं बऱ्याच वर्षांपूर्वी सिंधी जैन ग्रंथमाला काढली होती. त्यात अतिशय दुर्मीळ अशा प्राकृत पुस्तकांचं पुनर्मुद्रण केलं होतं. ती सगळी पुस्तकं लवकरच संपली आणि ‘आऊट ऑफ प्रिंट’ झाली. मला त्यातली काही पुस्तकं हवी होती. विशेषकरून उद्योतनसूरीचा ‘कुवलयमाला’ हा अतिशय महत्त्वाचा कथाग्रंथ मी अनेक दिवस शोधत होतो. त्याचा शोध घेत गिरगाव चौपाटीवर असलेल्या भारतीय विद्याभवनच्या विक्रीकेंद्रात गेलो. तिथे चौकशी केल्यावर त्यांच्याकडे या मालेतला एकही ग्रंथ उपलब्ध नव्हता. मात्र त्यांच्या गोदामात काही प्रती मिळण्याची शक्यता आहे, असा आशेचा किरण तिथल्या विक्रेत्यानं दाखवला. त्यानं गोदामात दाखवायला चिठ्ठीसुद्धा दिली. गोदाम ताडदेवला होतं. मी उत्साहात पत्ता घेऊन तिथे जाऊन थडकलो. एका गंजलेल्या लोखंडी फाटकाच्या आत जुनाट इमारत दिसली. चौकीदार चिठ्ठी दाखवूनही आत सोडायला तयार नव्हता. बराच वेळ हुज्जत घातल्यावर कसाबसा आत प्रवेश मिळाला. तिथल्या सुपरवायझरला भेटून काम सांगितलं. तो माणूस प्रेमळ वाटला. तो म्हणाला, या सीरीजमधली पुस्तकं आता इथे नाहीत. वरच्या मजल्यावर माळा आहे. तिथेच काही असली तर असतील. तो मला वरच्या मजल्यावर घेऊन गेला. तिथे बल्बच्या मंद पिवळसर प्रकाशात धुळीनं भरलेले पुस्तकांचे गठ्ठे गूढ वाटत होते. त्यानं एका दोरीच्या शिडीकडे बोट दाखवलं. ‘तो बघा वर माळा आहे. तिथे जुने गठ्ठे आहेत. तुम्हीच बघा काही सापडतं का’, असं म्हणून तो खाली निघून गेला. मी ती दोरीची शिडी घट्ट धरून लोंबकळत वर चढलो. माळा लहान होता. मान वर केली तर डोकं आपटेल ही भीती. पुस्तकं अर्धवट अंधारात बुडालेली. मी एकेक पुस्तक काढून चाळायला सुरुवात केली. बराच वेळ मी खाली येत नाही म्हणून सुपरवायझर दोनदा डोकावून गेला. मी निराश व्हायची मानसिक तयारी केली होती. गोदाम बंद व्हायची वेळ झाली, लवकर आटपा, असा इशारा खालून ऐकू आला. मी एक गठ्ठा शेवटचा म्हणून बाहेर काढला. त्यातलं सगळ्यात वरचं धुळीनं माखलेलं जाडजूड पुस्तक उचललं. आधी फूक मारून आणि मग हाताने धूळ बाजूला सारली. पिवळट पुठ्ठ्यावर अक्षरं दिसली – ‘उद्योतनसूरीकृत कुवलयमाला खंड १’. दुर्दैवानं दुसरा खंड तिथे नव्हता. त्या मालेतली इतर पुस्तकंही नव्हती. पण जे मिळालं त्याचा आनंद पुढे अनेक दिवस पुरला.

एखादा लेखक आपला वाटला, की त्याची सगळीच पुस्तकं वाचण्याची आस निर्माण होते. ती प्रत्येक वेळी सहज मिळत नाहीत. मग मिळायला कठीण अशा पुस्तकांचा शोध घेण्याची अत्यंत त्रासदायक आणि तेवढीच आनंददायक प्रक्रिया सुरू होते. ही प्रक्रिया एखाद्या डिटेक्टिव्हनं हरवलेल्या हिऱ्याचा शोध घेण्याएवढीच थरारक असते. आधी स्थानिक दुकानांमध्ये त्या पुस्तकाचा शोध सुरू होतो. तो बहुधा निष्फळच ठरतो. मग ऑनलाईन शोध. तिथेही मिळालं नाही, तर परदेशी असलेल्या एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीला सांगून मागवणं. हे सगळं करूनही काही पुस्तकं हुलकावणी देतात. आपणही वेताळाला खांद्यावर घेतलेल्या विक्रमाप्रमाणे आपला हट्ट न सोडता पुस्तकाचा शोध घेत राहतो. दिवस, महिने, वर्षं जातात. ते पुस्तक कुठेतरी स्मृतीत टोचत राहून गुलबकावलीच्या फुलाप्रमाणे त्रास देत राहतं. आणि एक दिवस अचानक एखाद्या रद्दीवाल्याकडे किंवा रस्त्यावरच्या पुस्तकाच्या ढिगातून मिश्कीलपणे आपल्यासमोर येतं. आपण ते आनंदानं घरी आणतो. चाळून पाहतो. नंतर तब्येतीत वाचू, म्हणून बाजूला ठेवतो. आणि ते वाचायचं राहूनच जातं. मग पुन्हा कधीतरी घरात जागा नाही म्हणून जुनी पुस्तकं काढताना समोर येतं. आपण ओशाळल्यासारखं ते पुन्हा चाळून पाहतो. पण आता ते पुस्तक वाचायचा ऋतू ओसरलेला असतो. वाचक म्हणून आपण वेगळ्या टप्प्यावर उभे असतो. आता ते कधीच वाचून होणार नाही याची बोचरी जाणीव होते आणि आपण अपराधी भावनेनं ते पुस्तक कसायाला द्यायच्या गाईसारखं काढायच्या पुस्तकांमध्ये ठेवून देतो.

पण असे अनुभव पुस्तकवेड्यांच्या जगण्याचाच भाग असतात. त्यामुळे नाउमेद व्हायचं कारण नसतं. पुस्तक घेण्याची ऊर्मी मानसिक आणि भावनिक असते. तिच्यावर कठोर तर्काचा अंकुश ठेवून अनावश्यक पुस्तक घेणं टाळणं हाच यावरचा सर्वोत्तम मार्ग आहे. तो अमलात आणायला कितीही कठीण वाटला, तरी आवश्यक आणि अपरिहार्य आहे. घेऊन ठेवलेलं पुस्तक जर कधीच वाचलं जाणार नसेल, तर ते घेताना झालेला आनंद व्यर्थ असतो, हे प्रत्येक पुस्तकवेड्यानं स्वत:ला समजावण्याची गरज आहे. पुस्तक घेताना मनावर घट्ट नियंत्रण ठेवून ‘हे मी खरंच वाचणार आहे का?’ हा प्रश्न स्वत:ला विचारावा. त्याचं नकारार्थी उत्तर आलं, तर मोहावर मात करून त्या पुस्तकाकडे पाठ फिरवावी. नकोशी पुस्तकं काढून टाकण्याची बिकट अवस्था येऊ द्यायची नसेल तर गरज नसलेल्या पुस्तकांच्या अपरिग्रहाची ही आध्यात्मिक साधना प्रत्येक पुस्तक संग्राहकानं अंगी बाणवण्याची गरज आहे, हे मी अनुभवावरून सांगतो.

पुस्तकं घराबाहेर काढणं हा एकाच वेळी त्रासदायक आणि मोकळं करणारा अनुभव असतो. आपण घाम गाळून, वणवण करून, खिशाला भोक पाडून विकत घेतलेली पुस्तकं काढून टाकण्याची वेळ येते तेव्हा कुणी फुकट घ्यायलाही तयार होत नाही. कारण ज्यांना ती आवडतात त्या मित्रांकडे ती आधीच असतात आणि ज्यांच्या आवडीत ती बसत नाहीत, त्यांना ती अर्थातच नको असतात. मग ती रद्दीवाल्याला देण्याशिवाय पर्याय नसतो. अर्थात, तिथून त्यांचा लगदा होईल या शक्यतेबरोबरच आपला कुणी समानधर्मा त्यांना उचलून घेईल, या आशेचा दिलासा असतोच.

वाचन : संदर्भासहित कैफियत

मी का वाचतो? या प्रश्नाचं प्राथमिक उत्तर ‘आनंदासाठी’ असं देता येईल. पण वाचताना आणि वाचून झाल्यावर वाचकाच्या आत अनेक सूक्ष्म बदल घडत असतात. पुस्तक वाचणं हा एक सांस्कृतिक संवाद तर असतोच, पण त्याचबरोबर तो जैविक, भौगोलिक आणि राजकीय संवादही असतो. हा संवाद लेखक आणि वाचक दोघांच्याही क्षमतेवर अवलंबून असतो. पुस्तकं केवळ आनंदच देतात असं नाही, वेळप्रसंगी भक्कम आधारही देतात.

ऐन विशीत असताना जॉन स्टुअर्ट मिल निराशेच्या गर्तेत सापडला होता. त्याच्या आत्मचरित्रात त्यानं या अनुभवाचं अस्वस्थ करणारं वर्णन केलेलं आहे. त्यात तो म्हणतो, “आनंदाच्या अनुभूतीविषयी मनाला एक विचित्र बधिरता आली होती. एरवी आवडणार्‍या किंवा आनंददायक वाटणाऱ्या कोणत्याही गोष्टीमुळे मला आनंद तर वाटेनाच, उलट त्यामुळे मी जास्तच अस्वस्थ होत असे.’’ या निराशेतून बाहेर पडण्यासाठी त्यानं खूप प्रयत्न केले. पण काही उपयोग झाला नाही. प्रदीर्घ उदासीनं त्याला पुरतं वेढून टाकलं. त्याचा दिनक्रम आणि रोजचे व्यवहार सुरू होते. पण यांत्रिक कोरडेपणानं. त्यातून भावना हद्दपार झाल्या होत्या. ही वेदनादायक अवस्था सुमारे दोनेक वर्षं टिकली. नंतर मग हळूहळू ती ओसरत गेली. त्यात मिल त्या वेळी वाचत असलेल्या पुस्तकांनी महत्त्वाची भूमिका निभावल्याचं त्यानं लिहून ठेवलंय. त्यातही वर्डस्वर्थच्या कवितांचा मोठा वाटा होता. त्याविषयी तो म्हणतो, “या कवितांमुळे मला माझ्या आतल्या आनंदाचा स्रोतच गवसला. एक सहानुभाव जाणवला. त्यातला आनंद सर्व मानवजातीला कवेत घेणारा आहे, अशी लख्ख जाणीव झाली. शांत चिंतनात खरा आणि चिरस्थायी आनंद असतो, हे त्या कवितांनी दाखवून दिलं. सर्व मानवजातीच्या भावनांचं निगडित असणं मला वर्डस्वर्थनं शिकवलं.’’

या अनुभवातून मिलनं ललित साहित्याच्या महत्त्वाच्या गुणधर्माकडे लक्ष वेधलेलं आहे. निराशेच्या भोवऱ्यात अडकलेल्या वाचकाला ते मदतीचा उबदार हात देतं. इतर समानधर्मी वाचकांशी जोडतं. आपल्या आतलं आणि भोवतालचं जग अधिक समंजसपणे समजून घ्यायला शिकवतं. याचा अर्थ साहित्य म्हणजे मानसोपचार केंद्र किंवा व्यक्तिमत्त्व विकास शिबिर आहे असा नाही. मात्र साहित्यातून जगण्याचं आकलन समृद्ध होत असल्यामुळे त्यात वाचकाला आतून बदलण्याची ताकद असते. म्हणूनच साहित्याकडे आयुष्य समृद्ध करण्याचा मार्ग म्हणून पाहणारा तथाकथित सामन्य वाचक वाङ्मयव्यवहार जिवंत ठेवण्यात अकादमिक समीक्षकापेक्षा महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

लेखकाच्या जगण्याविषयीच्या ज्ञानातून साहित्य आकारतं. साहित्य जे वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न करतं, ते मानवी अनुभवाचंच संस्कारित रूप असतं. म्हणूनच जगण्याच्या गुंतागुंतीवर एखादा समाजशास्त्रज्ञ किंवा मानसोपचारतज्ज्ञ ज्या नेमकेपणानं बोट ठेवतो त्याच, किंबहुना जास्तच नेमकेपणानं काफ्का किंवा तुकाराम आपल्या साहित्यातून ही जटिलता व्यक्त करत असतात. श्रेष्ठ लेखक आपल्या लेखनातून कोणतंही ढोबळ विधान करत नाही. तो वाचकाला मोकळं सोडतो. अधिक सक्रिय बनवतो. प्रत्येक मानवी मेंदूत असलेली अन्वयाची आणि भिन्न घटकांमधला संबंध जोडण्याची सुप्त क्षमता वाचनातून जागी होते. त्यातून निर्माण झालेल्या बौद्धिक स्पंदनांचा आनंद दीर्घकाळ टिकणारा असतो आणि आयुष्यावर सूक्ष्म परिणाम करणाराही. स्वत:हून भिन्न असलेल्या माणसांच्या सहवासात राहण्याची, त्यांना समजून घेण्याची अद्भुत क्षमता साहित्यातून वाचकाला मिळत असते. ही भिन्नता जेवढी अधिक, तेवढं वाचकाच्या समजूतदारपणाचं आणि आकलनाचं क्षितिज रुंदावत जातं.

मिलोराद पाविच आणि बाकीचे सगळे

वाचताना काही लेखकांशी पहिल्याच भेटीत मैत्र जुळतं, काहींशी ते जुळायला बराच कालावधी जावा लागतो, तर काहींशी ते कधीच जुळत नाही. बऱ्याचदा एका आवडत्या लेखकाच्या लेखनातून दुसरा लेखक सापडतो. उदय प्रकाश यांच्या ‘ईश्वर की आँख’ या लेखसंग्रहात ‘उपन्यास में आख्यान से मुक्ति’ हा सुंदर लेख वाचल्यावर मिलोराद पाविचचा (Milrad Pavic) सुगावा लागला. त्यावेळी अ‍ॅमेझॉन भारतात आलं नव्हतं. पाविचची पुस्तकं अतिदुर्मीळ होती. पण एखादं पुस्तक मनापासून हवं असेल, तर ते सगळे अडथळे पार करून वाचकापर्यंत पोहचल्याशिवाय राहत नाही. पाविचची ‘डिक्शनरी ऑव्ह खजार्स’ (Dictionary of Khazars) ही विलक्षण कादंबरी मला वांद्रयाच्या ‘लोटस’मध्ये अचानक मिळाली. तशीच ‘लास्ट लव्ह इन कॉन्स्टॅन्टिनोपल’ (Last Love in Constantinople’) स्ट्रँडच्या वार्षिक प्रदर्शनात गवसली. जागतिक फिक्शनच्या अरण्यातली ही मंतरलेली आडवाट पुढे अनेक अज्ञात पायवाटांपर्यंत घेऊन गेली. पाविचचं लेखन वाचतानाच मला दानिलो किश (Danilo Kis) या आणखी एका विलक्षण सर्बियन लेखकाचा शोध लागला. बोर्खेसच्या आटीव, सुघटित शिल्पासारख्या कथांच्या जातकुळीतल्या कथा असलेला किशचा ‘एनसायक्लोपिडिया ऑव्ह द डेड’ (Encyclopaedia of the Dead) हा संग्रह ‘कथा’ या वाङ्मयप्रकाराचा नव्यानं विचार करायला लावणारा आहे. त्यातूनच पुढे डेव्हिड अल्बाहारी (David Albahari) हा निर्वासित सर्बियन लेखक सापडला आणि वाङ्मयव्यवहार हा ज्याच्या कथाविश्वाचा गाभा आहे अशा झोरान झिवकोविच (Zoran Zivkovic) या समकालीन सर्बियन लेखकाचाही शोध लागला. झिवकोविचच्या वाटेवरून पुढे जाताना आणखी अनेक लेखक सापडत गेले.

मिलोराद पाविचमुळे मी आधुनिकोत्तर कादंबरीचा शोध अधिक सजगतेनं आणि गांभीर्यानं घ्यायला लागलो. पुढे पाविचच्या राजकीय आणि नैतिक भूमिकेविषयी एक टिपण वाचनात आलं. त्यानं मला धक्का बसला. आवडत्या लेखकाच्या अशा नावडत्या गोष्टी कळल्यावर वाचकासमोर  प्रश्नचिन्ह उभं राहतं. लेखकाची भूमिका पटत नाही, म्हणून त्याचं लेखनही बाद करायचं की लेखकाचं जगणं आणि लेखन वेगळं मानून पुढे जायचं? या यक्षप्रश्नाला उत्तर नाही. मी त्याला सामोरा गेलो. त्याचा अनुभव प्रस्तुत पुस्तकातल्या ‘मिलोराद पाविचच्या मृत्यूनंतर’ या लेखात मांडलेला आहे.

समकालीन साहित्य वाचताना लेखकाची जीवनदृष्टी, जिव्हाळ्याच्या जागा, निवेदन तंत्रं, घाट, आशय या सगळ्या गोष्टींची मनोमन नोंद होत राहते. कथा आणि कादंबरीच्या बंदिस्त घाटाकडून अधिक मोकळ्या, लवचीक घाटाकडे जाणारा एक समांतर प्रवाह कथासाहित्यात पूर्वीपासून अस्तित्वात आहे. एकीकडे बांधेसूदपणाचा आग्रह तर दुसरीकडे खुल्या प्रवाहित्वाची आस. या दोन प्रवाहांच्या वैशिष्ट्यांना सामावून घेणारे एन्रिके विला मातास (Enrique Vila Matas) किंवा सेर्गिओ पितोल (Sergio Pitol) यांसारखे समकालीन स्पॅनिश लेखकही आहेतच.

पुरातन आख्यानांच्या पारंब्या

आख्यानातल्या मोकळ्या, लवचीक घाटाची परंपरा प्राचीन कथाठांथांपासूनची आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून साधारण चौदाव्या शतकापर्यंत भारतात प्राकृत साहित्यग्रंथांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली. प्राकृत कथासाहित्य हा आधुनिक समीक्षकांपासून दुर्लक्षित राहिलेला प्रदेश आहे. जागतिक साहित्यातल्या विविध कथनप्रकाराचा अभ्यास करणाऱ्यांसाठी प्राकृत कथाग्रंथांच्या रूपात अफाट सामग्री उपलब्ध आहे. राब्लेचं ‘गार्गान्तुआ अँड पान्ताग्रुएल’, चॉसरच्या ‘कँटरबरी टेल्स’, ‘डिकॅमेरॉन’, ‘अरेबियन नाइट्स’ अशा मध्ययुगीन दीर्घ कथाग्रंथांचा जेवढा अभ्यास झालेला आहे, तेवढा आधुनिक आख्यानरूपांच्या संदर्भात प्राकृत कथाग्रंथांचा डोळस अभ्यास झालेला नाही. हरिभद्राची ‘समराइच्चकहा’सारखी दीर्घ गद्यकृती तर कादंबरी या साहित्यप्रकाराची पूर्वज आहे. कल्पित साहित्याविषयीचं नवं रूपभान आज मराठी लेखकांमध्ये रुजताना दिसत आहे. विशेषत: कादंबरी आणि कथेच्या क्षेत्रात संरचना आणि आख्यानतंत्राच्या अंगानं नवे घाट तयार होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्राकृत कथनपरंपरेचं भान लेखकांना असणं गरजेचं आहे.

लुप्त झालेल्या बृहत्कथेपासून, हरिभद्राच्या ‘समराइच्चकहा’पर्यंत अनेक प्राकृत कथाग्रंथांनी प्रचलित लोककथांच्या संग्रहाचं मोठं काम तर केलंच, त्याशिवाय अभिजन संस्कृत साहित्याच्या चौकटी मोडून बहुजनांच्या भाषेत समृद्ध कथासाहित्याची परंपरा घडवली. आज कल्पित साहित्याकडे पाहण्याची दृष्टी अधिकाधिक व्यापक होत असताना त्या उजेडात प्राकृत साहित्याचं पुनर्मूल्यांकन होण्याची गरज आहे. या पुस्तकातला ‘एक होती कथा’सारखा लेख याच दिशेनं केलेला प्रयत्न आहे.

या भारतीय कथनपरंपरेचं डोळस भान आणि समकालीन जागतिक साहित्याचं सजग वाचन आजच्या लेखकाला अनेक दृष्टीनं उपयोगी ठरू शकेल. हिंदी लेखक मनोहर श्याम जोशी यांच्या लेखनात हे आढळतं. प्रस्तुत पुस्तकातल्या ‘लेखक जेव्हा त्रिधा बनतो’ या लेखात जोशी यांच्या ‘कुरु कुरु स्वाहा’ या कादंबरीचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची पुस्तकं मराठी वाचकासाठी आजही आडवाटेला असणं, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हिंदी कादंबरीच्या भाषा आणि संरचनेत क्रांतिकारक बदल घडवणाऱ्या ‘क्याप’, ‘कसप’, ‘कुरु कुरु स्वाहा’, ‘हरिया हरक्यूलीज की हैरानी’ अशा महत्त्वाच्या कादंबऱ्या लिहिणारे मनोहर श्याम जोशी अजून मराठी लेखक, वाचक, समीक्षकांमध्ये म्हणावे तसे वाचले जात नाहीत. कादंबरी या वाङ्मयप्रकारावर अधिकाराने लिहीत-बोलत असलेल्या एका ज्येष्ठ समीक्षकानं आपल्या कथनमीमांसेवर केंद्रित पुस्तकात तर मनोहर श्याम जोशींचं चक्क ‘शरद मनोहर जोशी’ असं बारसं करून टाकलेलं आहे.

काही अपवाद वगळता, प्रस्तुत पुस्तकातले बहुतेक लेख समकालीन जागतिक साहित्यातल्या महत्त्वाच्या कादंबऱ्यांशी संबंधित आहेत. कादंबरी हा आज जागतिक साहित्यात केंद्रस्थानी असलेला वाङ्मयप्रकार. सतत बदलता आणि समावेशक असा. औद्योगिकीकरणानंतर कादंबरीच्या रूप आणि आशयात होणाऱ्या बदलांचा वेग वाढला आणि संगणकीकरणाच्या प्रारंभानंतर कादंबरीनं झपाट्यानं रूप बदलायला सुरुवात केली. आधुनिकोत्तर कादंबऱ्यांच्या खऱ्या प्रस्थापनेला इथूनच प्रारंभ झाला. एका बाजूला वास्तववादी कादंबरीचा प्रवाह पूर्वीसारखाच जोमदारपणे वाहत असताना, आधुनिकोत्तर कादंबऱ्यांनी कादंबरी या वाङ्मयप्रकाराच्या मूलभूत निकषांनाच उद्ध्वस्त केलं. शब्दकोश, शब्दकोडं, पुस्तकपरीक्षण, प्रबंध, चरित्र, कल्पित इतिहास अशा अनेक प्रांतांत हातपाय पसरणाऱ्या आधुनिकोत्तर कादंबरीनं वाचकाला अधिक सजग आणि सक्रिय बनवलं. अधिक जागरूक वाचक निर्माण केले. त्यामुळे लेखक-संकल्पनेभोवती असलेलं गूढ वलय नष्ट व्हायला सुरुवात झाली. कादंबरीच्या रचनेतल्या बोजडपणाची जागा प्रवाही खेळकरपणानं घेतली. आधुनिकोत्तर कादंबरी प्रसरणशील आणि प्रवाही बनली. तिच्या निर्मितीप्रक्रियेत वाचक सहभागी झाला. हुलियो कोर्तासारची ‘हॉपस्कॉच’ (Hopscotch) ही कादंबरी या दृष्टीनं प्रातिनिधिक आहे. त्यात प्रकरणांच्या क्रमाची जाणीवपूर्वक उलटापालट केलेली आहे. ती वाचण्याचे दोन क्रम पुस्तकाच्या प्रारंभी दिलेले आहेत. त्यातला एक सरळ रेषेत आहेत तशी प्रकरणं वाचण्याचा. दुसरा क्रम मजेशीर आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी त्यानंतर कोणतं प्रकरण वाचायचं त्याचा क्रमांक दिलेला आहे. तो सरळ क्रमातला नाही. म्हणजे साठावं प्रकरणं पहिलं, त्यानंतर पाचवं असा. गंमत म्हणजे या पद्धतीनं वाचत गेलं, तर कथानक स्वत:चंच शेपूट गिळणाऱ्या ऑरोबोरस या सापासारखं गोल फिरत राहतं. संपतच नाही.

वर ज्याचा उल्लेख आला, त्या मिलोराद पाविच या सर्बियन लेखकानं तर प्रत्येक कादंबरीत नवे वाचनव्यूह निर्माण करून वाचनप्रक्रियेचं स्वरूपच बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. लांब कशाला, हिंदीत हजारीप्रसाद द्विवेदी यांच्या पन्नासेक वर्षांपूर्वीच्या ‘बाणभट्ट की आत्मकथा’ किंवा ‘अनामदास का पोथा’ किंवा अमृतलाल नागर यांची ‘अमृत और विष’ या कादंबऱ्या आधुनिकोत्तर वाङ्मयदृष्टीशी नातं सांगणाऱ्याच आहेत. नंतरच्या लेखकांमध्ये मनोहर श्याम जोशी, उदय प्रकाश, रघुनंदन त्रिवेदी यांच्या लेखनालाही आधुनिकोत्तर हे विशेषण लावता येतं आणि समकालीन लेखकांमधले गीत चतुर्वेदी, मनोज रुपडा किंवा मनोज पांडेय यांसारखे लेखक अशा तऱ्हेचं लेखन करत आहेत.

मराठीत अनिल दामले यांची ‘गौतमची गोष्ट’ ही पहिली निर्विवाद आधुनिकोत्तर कादंबरी असं म्हणता येईल. मकरंद साठे यांची ‘ऑपरेशन यमू’ किंवा अलीकडची ‘काळे रहस्य’, अवधूत डोंगरे यांची ‘एका लेखकाचे तीन संदर्भ’, राजन गवस यांची ‘ब-बळीचा’ आणि श्याम मनोहरांच्या ‘कळ’नंतरच्या कादंबऱ्या आधुनिकोत्तर विशेषण लावता येतील अशा आहेत.

आजच्या मूल्यहीन, चंगळवादी आणि खंडित जगण्याला व्यक्त करू पाहणारी आधुनिकोत्तरवाद ही महत्त्वाची दृष्टी आहे. ती परिपूर्ण नसली तरी तिच्यामुळे साहित्यापुरतं बोलायचं तर, लेखन आणि वाचन प्रक्रियेत ताजेपणा आला, हे नाकारून चालणार नाही. काहीच अंतिम न मानणारा आधुनिकोत्तरवाद शून्यवादाला जवळचा असला, तरी त्याच्यामुळे लेखक-वाचक संबंधात अनेक नव्या मिती जोडल्या गेल्या. रटाळ आणि एकरेषीय वास्तववादाला खीळ बसली. वाङ्मयव्यवहारातला खेळकरपणा परत आला. वाचक म्हणून मला एवढं पुरेसं वाटतं.

पडद्यावरचं वाचन

ई-पुस्तकांचं आगमन ही वाचनप्रक्रिया आणि वाचनसंस्कृतीत मूलगामी बदल घडवू शकणारी महत्त्वाची घटना. पुस्तक ही एक वस्तू असल्यामुळे ती जागा व्यापते. तिला स्पर्श करता येतो, वास घेता येतो. पानं उलटताना होणारा आवाज ऐकता येतो. पुस्तकाच्या संहितेबाहेरच्या या सगळ्या  घटकांचा वाचनप्रक्रियेत सूक्ष्म सहभाग असतो. बऱ्याच जणांच्या बाबतीत तर संहितेपेक्षा हे घटकच अधिक महत्त्वाचे ठरतात. त्यांचा वाचनावर बरावाईट परिणाम होतो. पुस्तक कितीही श्रेष्ठ दर्जाचं असो, त्याची छपाई वाईट असेल, कागद खराब असेल, किंवा ते फाटलेलं असेल, तर वाचन आनंददायक होत नाही. उलट एखादं निकृष्ट पुस्तक याच सगळ्या घटकांच्या उच्च मूल्यामुळे किमान वाचनीय होऊ शकतं. थोडक्यात, पुस्तकाचं वस्तू म्हणून असलेलं अस्तित्व त्याच्या संहितेच्या वाचनावर परिणाम करत असतं. ई-पुस्तकं पुस्तकांचं हे वस्तुत्व नाकारतात. त्यामुळे अनेक वाचकांना ती आजही आपलीशी वाटत नाहीत. मराठीत हे प्रमाण बर्‍यापैकी आहे. अनेक अस्सल वाचक ई-पुस्तकांच्या वाटेला फिरकत नाहीत, ते यामुळेच. पण खरंतर, पुस्तकांच्या वस्तू असण्याशी जोडलेले अनेक उपद्रव ई-पुस्तकांनी दूर केले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जागेचा. पुस्तकांनी व्यापलेली जागा वाचकाला गाफील ठेवून हळूहळू अख्ख्या घराचाच ताबा घेत जाते. जागेचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होण्याच्या काळात कोणत्याही पुस्तक संग्राहक असलेल्या वाचकाला या समस्येचं उत्तर शोधावंच लागतं. नव्या पुस्तकांना जागा करून देण्यासाठी बऱ्याचदा आधी घेतलेल्या (आणि वाचायची राहून गेलेल्या) पुस्तकांना बाहेर काढावं लागतं. हा प्रकार अत्यंत दु:खद असतो. ई-पुस्तकांमुळे हा प्रश्न सहजतेनं निकालात निघाला. अर्थात, त्यांनाही आभासी किंवा संगणकीय जागा लागतेच. पण ती मिळवणं त्रिमितीय जागा मिळवण्याइतकं अवघड नसतं. आयपॅड किंवा किंडलसारख्या वाचनसाधनांमध्ये हजारो पुस्तकं राहू शकत असल्यानं अख्खी लायब्ररी सोबत घेऊन कुठेही भटकता येतं. संदर्भासाठी कोणतंही पुस्तक केव्हाही चाळता येतं.

ई-पुस्तकांचा दुसरा फायदा सुलभ उपलब्धतेचा. रामायण-महाभारत-इलियडपासून ‘वॉर अँड पीस’ किंवा ‘युलिसिस’पर्यंत जगभरातली सगळी अभिजात पुस्तकं इंटरनेटवर ई-रूपात विनामूल्य उपलब्ध आहेत. वस्तू म्हणून जागा अडवणाऱ्या आणि खर्चिकही असलेल्या या थोर कलाकृतींना ई-आवृत्त्यांमुळे सहजतेनं निमूटपणे वाचकाच्या हातात येऊन बसावं लागतंय.

वाचायला नेलेलं पुस्तकं परत न येणं, पुस्तक खराब होणं, गहाळ होणं, चोरीला जाणं या सगळ्यावर ई-पुस्तकांनी काट मारली. पुस्तकांना एका स्थानी सुरक्षितपणे नेऊन ठेवलं. पुस्तकांचं लोकशाहीकरण केलं. पुस्तक या वस्तूभोवती असलेलं स्वप्नाळू वलय नष्ट करून पुस्तकाला खऱ्या अर्थानं माणसात आणलं. पुस्तकाचं खरं अस्तित्व त्याच्या संहितेपुरतं असतं, हे निर्विवादपणे सिद्ध केलं. पुस्तकाला वेढणारे संहितेबाहेरचे घटक वजा करून त्याला निखळ रूपात वाचकासमोर आणण्याचं श्रेय ई-पुस्तकांना दिलंच पाहिजे.

जाता जाता

हे पुस्तक प्रत्यक्षात आणण्याचं सगळं श्रेय माझे ज्येष्ठ मित्र सतीश काळसेकर आणि जयप्रकाश सावंत यांचं. माझ्यासारख्या आळशी वाचकाला नियमितपणे लिहितं करण्याचं अशक्यप्राय काम या दोघांनी अत्यंत जिव्हाळ्यानं आणि ममत्वानं केलं. आपली संपादकीय चिकाटी पणाला लावून आणि प्रेमळ तगाद्याचं दडपण कायम ठेवून त्यांनी सलग दोन वर्षं माझ्याकडून ‘आडवाटेची पुस्तकं’ ही लेखमाला लिहून घेतली. लेखमालेचं आणि या पुस्तकाचं नावही काळसेकरांनीच सुचवलं.

पुस्तकांविषयी लिहायला सुरुवात केल्यावर वर्षभरानं मी अरुण खोपकरांच्या संपर्कात आलो. त्यांनी माझी पुस्तकांकडेच नाही, तर जगण्याच्या एकूणच प्रक्रियेकडे पाहण्याची दृष्टी बदलली. लेखाची रचना आणि मांडणी, त्यातल्या मुद्द्यांचा क्रम, ओळींची लांबी आणि परिच्छेद या सगळ्याचा लेखाच्या आशयाशी असलेला संबंध खोपकरांशी वेळोवेळी झालेल्या चर्चांमधून स्पष्ट होत गेला. लिहिण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं जाणवली. स्वत:च्या लेखनातले दोष दिसायला लागले. लेखन-वाचन व्यवहाराविषयी नवं भान आलं.

भालचंद्र नेमाडे यांनी माझं फुटकळ लेखनही आस्थेनं वाचून दाद दिली. नव्या लेखनप्रकल्पांविषयी वेळोवेळी आपुलकीनं चौकशी केली. वाचत असलेल्या पुस्तकांविषयी खोल कुतूहलानं गप्पा मारल्या. त्यातून उमेद वाढत गेली.

पुस्तकांच्या शोधात आडवाटेला वळल्यावर पुढे त्या आडवाटेला अनेक फाटे फुटतात. वाचनाच्या अंगणात पाऊल ठेवणाऱ्या वाचकानं त्या वाटांनी पुढे जाऊन स्वत:चे लेखक शोधले, त्यातून त्याला खास त्याच्या अशा नव्या आडवाटा सापडल्या, तर मला आनंद होईल.       

-----------------------------------------------------------------------------------------

"आडवाटेची पुस्तकं" हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

      

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......