‘देशीवादा’च्या दुश्मनांविरुद्ध आम्हास फुले-जेधे-जवळकरांच्या शब्दांत लेखनी चालवावी लागते आहे!
ग्रंथनामा - झलक
सुशील धसकटे
  • रावसाहेब कसबे, भालचंद्र नेमाडे आणि ‘देशीवाद - समाज आणि साहित्य’ व ‘देशीवादाचे दुश्मन’ या पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Thu , 19 July 2018
  • ग्रंथनामा झलक देशीवादाचे दुश्मन Deshiwadache Dushman अशोक बाबर Ashok Babar भालचंद्र नेमाडे Bhalchandra Nemade देशीवाद Deshivad रावसाहेब कसबे Raosaheb Kasbe देशीवाद - समाज आणि साहित्य Deshivad - Samaj Ani Sahitya

प्रसिद्ध कादंबरीकार, ज्ञानपीठ विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा ‘देशीवाद’ हा सिद्धान्त सुरुवातीपासूनच मराठी साहित्यात वादाचा विषय झालेला आहे. आजवर त्याच्या बाजूनं आणि विरोधात बरंच काही लिहिलं-बोललं गेलं आहे. प्रसिद्ध विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी ‘देशीवाद : समाज आणि साहित्य’ हे पुस्तक लिहून नेमाड्यांवर आणि त्यांच्या देशीवादावर टीका-टिपणी केली आहे. त्याला प्रत्युत्तर देणारं ‘देशीवादाचे दुश्मन’ हे अशोक बाबर यांनी लिहिलेलं पुस्तक नुकतंच हर्मिस प्रकाशनानं प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाला प्रकाशकानं ‘नाळ’ या नावानं लिहिलेल्या प्रकाशकीयाचा हा पहिला भाग. उद्या दुसरा आणि परवा तिसरा व शेवटचा भाग प्रकाशित होईल.

.............................................................................................................................................

इतिहास कधी कधी पलटून समोर उभा ठाकतो, असं म्हणतात.

१९२५ मध्ये सत्यशोधक दिनकरराव जवळकर यांनी देशाचे दुश्मन नावाचे पुस्तक लिहिले त्याला आज ९३ वर्षे उलटली आहेत. देशीवादाचे दुश्मन या पुस्तकाच्या निमित्ताने ९३ वर्षांपूर्वीच्या जेधे-जवळकरांच्या सत्यशोधकी इतिहासाचा पुन:प्रत्यय आज येत आहे. ‘देशाचे दुश्मन’ व ‘देशीवादाचे दुश्मन’ असे दोन्ही पुस्तकांच्या नावात पुष्कळ साधर्म्य असले तरी, आजचे दुश्मन मात्र वेगळे आहेत. ‘देशाचे दुश्मन’ या पुस्तकाच्या निर्मितीमागे असलेल्या कारणांपैकी मुख्य कारण म्हणजे, पुण्यामध्ये जोतीराव फुले यांचा पुतळा उभा करण्याच्या केशवरावांच्या मागणीला तत्कालीन काही ब्राह्मणांनी केलेला तीव्र विरोध, तसेच जोतीरावांवर कुत्सितपणे टीका करणारे चिपळोणकर-टिळक-एकंदर भटशाही या ‘दुश्मनां’ना खरमरीत उत्तर देण्यासाठी जवळकरांनी अतिशय तिखटपणे लेखनी परजली होती. देशभक्त केशवराव जेधे यांनी या पुस्तकाच्या प्रकाशकाची भूमिका पार पाडली होती. ‘देशाचे दुश्मन’वरील खटल्यात जवळकरांच्या बाजूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केस लढवली होती. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात नाहीत, याची खंत असली तरी त्यांचा तगडा देशी विचार आमचेबरोबर आहे.

आज देशीवादाच्या दुश्मनांनी आमचेवर अशाप्रकारचे पुस्तक फुले-जेधे-जवळकरी शैलीत लिहिण्याची आणि छापण्याची वेळ आणलेली आहे. रा. भालचंद्र नेमाडे गेली चाळीस-पन्नास वर्षे झाली राज्य-देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशीवादाची मांडणी लावून धरत असतानाच, दुसरीकडे त्यांनी आपल्या काव्य-कादंबरी-टीकादी लेखनाने मराठी वाङ्मय समृद्ध केले आहे. रा. नेमाड्यांची एकंदर वाङ्मयीन-भाषिक कामगिरी पाहता नुकतेच त्यांना सुवर्णमहोत्सवी ज्ञानपीठाने गौरवण्यात आले. १९६० पासोन वाङ्मयक्षेत्रात सतत नेमाड्यांचे नाव चर्चेत राहिलेले आहे. शतकावर ठसा उमटणारा लेखक म्हणोन साने गुरुजींनंतर रा. नेमाड्यांचेच नाव समोर येते. अगदी तरुणांपासोन ते ज्येष्ठांपर्यंत आणि खेड्यांपासोन ते परदेशापर्यंत त्यांचे असंख्य चाहते आहेत. त्यांचा हा सन्मान आणि कीर्ती न पाहवणाऱ्या काही छोट्या दिलाच्या मंडळींनी सातत्याने गेली चाळीस-पन्नास वर्षे देशीवाद आणि नेमाड्यांवर कुत्सितपणे टीका करण्याचे प्रकार चालवले आहेत. याचे अंतस्थ हेतू वेगवेगळे असल्याचे दिसून येते. झटपट प्रसिद्धी मिळवावयाची असेल तर नेमाडे यांना पाचपन्नास शिव्या देणारा छटोर लेख लिहिला की भरपूर नाव होते, हे अनेकांच्या ध्यानात आल्यानंतर हा उद्योग भरपूर तेजीत आला. ज्ञानपीठानंतर तर ह्या गावगन्ना टीकेच्या प्रकारात लक्षणीय वाढ झालेली आहे. कालपर्यंत आम्ही अशा गावगन्ना बोंबांकडे साफ दुर्लक्ष केले. आज याचा कळस अशा टीकाकारांचे शिरोमणी रावसाहेब कसबे यांच्या ‘देशीवाद : समाज आणि साहित्य’ या ग्रंथाने गाठला आहे. आपण फार्फार विचक्षण टीका चालवून नेमाडे आणि देशीवाद्यांना कात्रजचा घाट दाखवला असलेचा आव या ग्रंथाच्या पानापानांतून दिसतो. वास्तविक ही टीका द्वेष-आकस-अहंपणा-मनाचा कोतेपणा-अज्ञान-स्वार्थ अशा नाना विकारांनी खचाखच भरलेली आहे. शिवाय अशा पावसाळी टीकाकारांमुळे देशीवाद-देशीवादी परंपरा-नेमाडे आदींबद्दल कारण नसताना गैरसमज, द्वेषभावना पसरत आहे. याचमुळे आम्हास ही मंडळी देशीवादाचे दुश्मन वाटतात. म्हणोन अशा दुश्मनांविरुद्ध आम्हास फुले-जेधे-जवळकरांच्या शब्दांत लेखनी चालवावी लागते आहे. जेधे-जवळकरांनी अशी ‘आग्यावेताळ’ तिखट भाषाशैली मराठीला दिली, हे मराठी भाषेवरील त्यांचं मोठं ऋण भाषाशास्त्राचा एक विद्यार्थी म्हणून आम्ही मान्य करीतो. सपक वरण ते झणझणीत मटनाचा रस्सा, अशा या मराठीच्या भाषिक आविष्काराच्या शैलीचा अभ्यास आजवर कोणालाच करावासा वाटू नये, किंवा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यासारख्या हाडाच्या भाषा अभ्यासकाचं नाव आपल्याकडील भाषेच्या कोणत्याही पुस्तकात, भाषाशास्त्रीय अभ्यासक्रमात, चर्चेत घेतलं जाऊ नये, यात इथली कोती पाठांतरवादी शैक्षणिक दृष्टी दिसून येते. म्हणूनच इथल्या देशीयतेचा समग्र अभ्यास आणि प्रसार आम्हाला महत्त्वाचा वाटतो. आज ना उद्या याचे महत्त्व सामान्य वाचकासही पटणार आहे.

सदरहू देशीवादाचे दुश्मन या पुस्तकामुळे जेधे-जवळकरांनंतर अनेक वर्षांनी खंडीत झालेली जोतीराव फुल्यांची सत्यशोधकी परंपरा पुन: उजागर करण्याची संधी यानिमित्ते आम्हास मिळते आहे, याचे समाधान आहेच. मात्र एका गोष्टीचे दुर्दैव वाटते, की जेधे-जवळकरांसमोर ‘चिपळोणकर-टिळक-भटशाही’ असा एकच मनुवादी दुश्मन होता; आज त्यांचेजागी एकीकडे चिपळोणकर-टिळक परंपरेतील मनुवादी आणि दुसरीकडे बहुजनांतीलच काही मंडळी सवतीमत्सराने ग्रासून दुश्मन म्हणोन उभे ठाकले आहेत. रा. नेमाड्यांनी त्यांचं कार्य अदा केलेलं आहेच, आता आमच्या व येणाऱ्या तरुणपिढ्यांना ह्या दोन्ही दुश्मनांशी सामना करत देशीवादाची मांडणी पुढे नेण्याचे कार्य नेटाने पार पाडावे लागणार आहे. त्या कार्यातील ‘देशीवादाचे दुश्मन’ हा सवाल पहिला आहे. असे अनेक सवाल इथूनपुढे उपस्थित होत राहतील, याचे नम्य सूतोवाच या ग्रंथाने करत आहोत.

आमचे गुरुजी र. अशोकराव बाबर जवळकरांच्या, तर आम्ही जेधेंच्या भूमिकेत आहोत. जवळकर वयाने अगदी तरुण होते, तर केशवराव ज्येष्ठ. म्हणजे लिहिणारा तरुण, तर छापणारा ज्येष्ठ होता. आता लिहिणारे बाबर गुरुजी ज्येष्ठ, तर आम्ही छापणारे पडलो तरुण. महत्त्वाचं म्हणजे ३ मे हा सत्यशोधक दिनकरराव जवळकर यांचा स्मृतिदिवस आहे. अशा काही बाबी सहजात जुळून आल्या. बाबर गुरुजींनी या ग्रंथाला मनमोकळे मनोगत लिहिण्यास सांगितलं. त्यामुळे आम्हीही आमच्या स्वभावानुसार हातचं राखून न ठेविता व आमच्या देशी परंपरेशी असलेली नाळ कायम घट्ट करत केशवराव जेधे यांची भूमिका पार पाडत आहोत. आम्ही आमच्या बुद्ध ते नेमाडे या मूळ विचारधारेशी घट्ट बांधिलकी मानणारे असल्यानं आम्हाला निखळ सांस्कृतिक-सामाजिक-वैचारिक हस्तक्षेप करत राहणं, हे आद्य कर्तव्य वाटतं. या कर्तव्यापुढे स्वार्थी हितसंबंधी राजकारण, तात्कालिक फायदे, पदे-सन्मान-पुरस्कारं याचा आम्हाला सोस नाही.

वास्तविक, कसबे यांचा तो ग्रंथ प्रकाशित झाल्यावर आम्ही तो रटाळ पाल्हाळीक भंकस आत्मगौरवपर मजकूर अक्षरश: मनावर बळजबरी करोन वाचिला. लेखकसुद्धा वाचकांवर बळजबरीनं शाब्दिक अत्याचार करितात, हे या ग्रंथामुळे कळले. केवळ रा. नेमाडे यांचे प्रेमापोटी आम्ही हे मानसिक अत्याचार सहा वेळा सहन केले. त्याच वेळी आम्ही रावसाहेबांचे हे आव्हान मनोमन स्वीकारून या अनुषंगाने आपल्या मतीकुवतीप्रमाणे लिहायला घेऊन त्याची वीसेक पानं खरडून झाली होती. काही संदर्भग्रंथ जमवून त्यांचे वाचनही आरंभले होते. दरम्यान आम्ही तथाकथित पगारी अथवा विद्यापीठी नोकरदार वगैरे नसल्यानं जगणं वारंवार हावी होऊ लागल्यानं मध्ये मध्ये निर्माण होणाऱ्या अडथळ्यांमुळे पुढील लेखन होत नव्हतं. मग रा. बाबर गुरुजींना भेटून त्यांनीच याविषयाची मांडणी करावी, अशी विनंती आम्ही केली. गुरुजींनी आमची ही विनंती मान्य करून देशीवादाची व्यापक आणि अभ्यासपूर्ण मांडणी केली. ही मांडणी तरुणांपासोन सगळ्यांनाच उदबोधक व ज्ञानात भर घालणारी जशी आहे, तशीच देशीवादाकडे बघण्याची मूलभूत नजर देणारी आहे, यात शंका नाही. यानिमित्ताने आम्ही रा.कसबे सरांशी मनोगतरूपी पत्रसंवाद करू इच्छितो, तो येणेप्रमाणे...

प्रति

रा. रा. रावसाहेब कसबे

यांसी त्रिवार जोहार...जोहार...जोहार

एक तरुण. आज वय, उदाहरणार्थ पस्तिशी वगैरे ओलांडलेलं. म्हणजे तसं फार्फार वगैरे ज्येष्ठबिष्ठ नाही. मग तुम्ही म्हणाल ‘हा पस्तिशीचा, म्हणजे या पोट्ट्याला काय कळणार!’ तर तुमचं हेही बरोबरच! पण हा पस्तिशीचा पोरगा पगडीवाल्या रा.रा. जोतीराव फुले आणि मिशावाल्या रा. रा.भालचंद्र नेमाडे या थोरल्या लेखकाच्या नादी लागून शंभरपट ग्रंथ वाचण्याच्या वगैरे उद्योगाला लागलेला असल्यानं काही सांगू इच्छितो. कारण शेतात तण जादा सोकवता कामा नये, नाही तर ते उभं पीक नष्ट करितात या ‘शेतकऱ्याच्या आसूडा’तील आणि कृषिजनसंस्कृतीतील गहन महत्त्वाच्या सफाई उपक्रमाची याद झाल्यानं ल्हान तोंडी मोठा घास वगैरे प्रमाद होणं नाइलाजे आलंच. खरंतर आपला थेट परिचर नसला तरी आपल्या जाड्याभरड्या अनेक ग्रंथांतून मी आपल्या विचारविश्वात बरंच फिरून वगैरे आल्याचं प्रामाणिकपणे नोंदीतो. माझ्यासारख्या पोराला आपल्या लेखनाचं जाणवलेलं वैशिष्ट्ये म्हणिजे जगभरातल्या अनेक विद्वानांच्या लेखनाचे नमुने, त्यांच्या पुस्तकातील अवतरणे आणि त्यांच्याबद्दलची माहिती आपण आपल्या लेखनात पोटलेखनाच्या (जसे पोटभाडेकरू असतात तसे) स्वरूपात देत असल्याने अनायसेच घरबसल्या ‘वैश्विक’ (अ)वाचनाची सफर घडते. आपल्या अशा या प्रप्रप्रगाढ विद्वत्तेनं दिपोन गेल्यानं आपणाला भेटण्याची हिंमत माझ्याच्यानं कधी झाली नाही. आपला देशीवादावरील ग्रंथ छापोन आल्यावर जिंदगीतल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींना टाच मारोन पै पै जमा करोन आम्ही तो खरिदला. आमच्या काही हितचिंतकी मित्रांनी (जसा तुमच्या कांही मित्रांनी तुम्हांस सल्ला दिधला होता तसाच...) आम्हांस ‘कशाला उगाच उकांडा चिवडता, काय आहे त्यात? नेमाडेद्वेषाने हे लोक पछाडलेले आहेत, तेव्हा अशा भैरोजळपांवर वेळ न घालवावा’ असा आमच्याप्रती काळजीयुक्त सल्ला दिधला होता. पण ‘झोत’चा देशी प्रभाव आणि आपली करारी बाण्याची प्रतिमा आमच्या मनी थोडीबहुत असल्यानं आम्ही म्हटलं “नाही, डॉ. कसबे सर तसे नाहीत. त्यांनी लिहिलंय म्हणिजे त्यात तथ्य असणार!’'

लोकवाङ्मय गृहाने ज्या लेखकाची पुस्तकं छापिली, त्याच लेखकाची बदनामी करणारं पुस्तक छापोन, विचार गुंडाळोन धंदा करावा नेटका, हा चुकीचा पायंडा या निमित्तानं ग्रंथप्रकाशन क्षेत्रात पाडल्यानं, याचं एक प्रकाशक म्हणोन आम्हास वाईट जरूर वाटलं. लोकवाङ्मयप्रमाणेच कृती करणारे अन्यही लोक प्रकाशन व्यवहारात दिसतात. जे लेखक नेमाडे किंवा देशीवादी यांना शिव्या देतात, अशा लेखकांचे ग्रंथ ‘निमंत्रण’ देऊन छापण्याचे उद्योगही सुरू झाले आहेत. ग्रंथप्रकाशन हा सांस्कृतिक व्यवहार असल्यानं त्यातून निरोगी सांस्कृतिक-वैचारिक हस्तक्षेप झाले पाह्यजेत, या विचाराशी आम्ही बांधील आहो. चार टिनपाट भाडोत्री लोकांचं कोंडाळं करोन सांस्कृतिक दहशत उत्पन्न करणे, उथळ बुद्धीने वाट्टेल तसं करत कोणा ‘प्रस्थापित’ प्रकाशकाला टस्सल देण्याची मनीषा बाळगणं, हे आमच्या कार्याचं उद्दिष्ट मुळीच नव्हे. चांगलं लेखन वाचकांसमोर नीटपणे ठेवणं, ग्रंथ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं, ही आम्हाला आमची महत्त्वाची जबाबदारी वाटते. ग्रंथप्रकाशक-मुद्रक म्हणोन आपणाला एक नैतिकता पाळावी लागते, ही शिकवण आम्ही आमचे या क्षेत्रातील पूर्वज रा. जावजी दादाजी आणि महाराज सयाजीराव गायकवाड यांजकडून घेतलेली असल्यानं छाटछूट भाडोत्री लोकांच्या नादी लागोन असे प्रमाद आमच्याकडून होणे नाही. तरीही आम्ही लोकवाङ्मय गृहाचे यासाठी अभिनंदन करू इच्छितो, की त्यांनी ‘मराठी’तील वैश्विक विचारवंत रेव्हरंड कसबे यांचा हा ग्रंथ छापून त्यांची प्रप्रप्रगाढ विद्वत्ता आम्हासारिख्या तरुणांसमोर ठेविली आणि सकळ जन शहाणे केले

...तर कसबे सर, आपल्या या ग्रंथातील नेमाडेंना फॅसिस्ट वगैरे म्हणवणारा लेख पोटाची वगैरे महत्त्वाची कामंधामं सोडून वाचिला. म्हटलं तर करमणूक झाली, म्हटलं तर फुका वेळ वाया गेला. खोदा पहाड निकला चुहा, असंच झालं. यापूर्वीही आपण ‘परिवर्तनाचा वाटसरू’मध्ये प्राच्यविद्याविद् शरद् पाटील यांच्यावर असाच तथाकथित परखड कसबी लेख खरडला होता. त्यातून पुढं साध्य काय झालं काही कळलं नाही. शरद पाटील यांनी मराठीला मूलभूत अब्राह्मणी अन्वेषनपद्धती आणि विचार दिला. त्यांच्या पश्चातही त्यांच्या विचारकार्याचा दरारा आणि आदर अजूनही टिकून आहे आणि पुढेही सदोदित टिकून राहील. मात्र कसबे सर आपण काय दिलं? आपण कोणता मूलभूत सिद्धान्त किंवा अन्वेषण पद्धत दिलीत? तर काहीच नाही. ‘शरद पाटील यांना मी कसं समजून सांगायचो, सल्ला द्यायचो’ वगैरे आपली स्व-टिमकी वाजवणारी लेखनशैली आम्हास चांगलीच परिचित असल्यानं, आम्ही ते फार्फार मनावर घेत नाही. नेमाडेंवरील या लेखनानं आपण नेमाडे यांच्या विरोधात धडक कृती मोहीम हाती घेऊन नेमाडेविरोधी टोळीचं म्होरकेपण स्वत:कडे घेतल्याचंही लक्षात आलं. पुण्यातल्या सम्यक् साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणातही आपण ‘मिशांसकट देशीवाद उखडून टाकणार’ अशी भीमगर्जना केल्यानं आमच्यासह अनेकांच्या मनात धडकी भरोन क्षणात... ‘रेव्हरंड कसबे सर एका हातात तलवार आणि एका हातात पिस्तोल घेवोण... डोक्याला शिरस्त्राण (सॉरी, मला ‘हेल्मेट’ म्हणायचं होतं...) बांधोन... सोबत देशीवादविरोधी विचक्षण निवडक सरदारांना घेवोन दारूगोळ्यांनिशी मुंबैच्या दिशेने त्वेषाने चाल’ करत असलेचं चित्र भराभर डोळ्यांसमोरून गेलं आणि सभागती हात झटक्न आमच्या ओठावर्ल्यां तरुण काळ्या मिशांवर गेला... काय सांगावं आपल्याही मिशा बघोण कोण अंगावर धावून आला तर...! स्सावधान...!! असो, ती वेळच डेंजर होती. मग भानावर आल्यावर कळलं, की हातात लेखणी घेऊन वैश्विक सत्य वगैरे असलंच काहीतरी सामान्य लोकांना न कळणारे लिहिणारे रे. कसबे सर नेमाडेंच्या द्वेषानं पछाडोन सांस्कृतिक दहशतवादाची भाषा तर बोलत नाहीत ना...

विशेष म्हणजे गेले काही दिवस आम्हीही फॅसिस्ट म्हणिजे काय या शब्दाच्या (की शब्दच्छलाच्या?) मागे लागलो होतो, तेही अनायसे आपल्या लेखनातून नीट कळलं. एकीकडे, अनेक निरपराध लोकांना ठार करणारा, स्वत:चे अधिकार शस्त्राच्या-पिस्तुलाच्या बळावर स्वैरपद्धतीनं वापरणारा हुकुमशहा आणि दुसरीकडे, लेखन-वाचन करणारे नेमाडे या दोहोंना एकच- फॅसिस्ट संबोधन वापरणं, हे विचारवंत-अभ्यासक असल्याचं द्योतक मुळीच नसल्यानं आपल्या या सगळ्या कसबी खर्ड्यात निखळ टीका काही आम्हांस आढळिली नाही. म्हणिजे ही पण ‘असहिष्णू’च प्रकारात मोडणारी गोष्ट जाहली. नेमाडे यांजविषयीचा द्वेष-मत्सर-आकस मात्र आपल्या लेखनात शब्दोशब्दी जाणवत राहिला. यावरून कसबे सर, आपणाला किती गंभीर घ्यायचं, हेही ओघानंच लक्षात आलं.

एकाच लेखात कितीतरी मुद्द्यांची सरमिसळ करून आणि नेमाडेंवर उथळ शेरेबाजी चालवोन आपणही लेखनशिस्त तोडिली आहे. तेव्हा नेमाडे यांना बेशिस्त म्हणताना पुनर्विचार व्हावा एवढंच. शिवाय अनेक ठिकाणी नेमाड्यांना हे कळत नाही-ते कळत नाही, नेमाडे बेशिस्त आहेत, थापेबाज, बरळत, भोंगळ, मनोग्रस्त, निर्ढावलेले, कोडगेपण, बेइमानी वगैरे वगैरे वैचारिक लेखनशिस्तीला न शोभेसे उथळपणे म्हणिता म्हणिता आपण स्वत:ही पटरी सोडून एका विचारवंताला न शोभावी अशी बेशिस्त भाषा नेमाडे यांजसारिख्या जागतिक दर्जाच्या लेखकासाठी चालवून मत्सरद्वेषभावनेतून स्वत:चा तोल कसा जाऊ शकतो, हेच सिद्ध केलं. जो माणूस खेड्यातल्या तरुणापासून ते जागतिक स्तरावरच्या लेखकांचं विविध प्रकारचं लेखन वाचितो, जो शिमल्याच्या भाषा संस्थेत नॅशनल फेलो म्हणून संशोधन करितो, जो भाषाशास्त्राचा अभ्यासक आहे वगैरे वगैरे त्या माणसाला टिपा-नोंदी-संदर्भ कसे द्यावेत, की देऊच नयेत, हे माहीत नसेल काय, कसबे सर? ही तर तुम्ही हसण्याचीच गोष्ट केली. आज आम्हास असा अर्थ काढण्यास वाव मिळाला आहे, की इतक्या वर्षांनी कसबे यांना कळलं की ‘नेमाडे यांना काय काय कळत नाही’ वगैरे वाचून ‘कसबे यांना आजपावेतो काय काय कळलं’ हे आम्हा तरुणांना आता नीटच कळलं. हा संपूर्ण कसबी खर्डा वाचल्यावर आमच्या सामान्यज्ञानात एका गुणाची भर पडिली, की आता मार्क्स-आंबेडकर यांजनंतर डॉ. रावसाहेब कसबे हेच एकमेव विचारवंत-अभ्यासक-लेखक वगैरे शिल्लक म्हणोण आहेत. बाकीच्यांना (थोरात-कोत्तापल्ले वगळोन) काय म्हणोण काय कळत नाही. कसबे यांच्यासारखा कट्टर इंग्रजी भाषाप्रेमी आणि ब्रिटिशसमर्थक असा मोठ्ठा वैश्विक विचारवंत-अभ्यासक मराठीत (इंग्लंडमध्ये?) असताना वाचक-तरुणलोक नेमाडे यांच्याच पाठीमागे का धावावेत? ही नेमकी काय भानगड आहे? म्हणिजे कसबे सर म्हणतात त्याप्रमाणे नेमाडे यांना काही कळत नाही, हे मान्य केलं तर मग वाचकांना-लोकांनाही काही कळत नाही, असं म्हणावं लागेल. म्हणजे कसबे सरांच्या म्हणण्यानुसार लोकही मूर्खच ठरले. पण आम्हांस असे वाटते की, आपण लोकांना एक वेळ मूर्ख बनवू शकतो, पन्नास-साठ वर्षे तर नक्कीच नाही, कसबे सर.

भालचंद्र नेमाडे यांजमुळं मराठी साहित्यात कोसलापासून जी एक मानसिक-वैचारिक-सांस्कृतिक घुसळण सुरू जाहली ती ‘हिंदू’ मार्गे उत्तरोत्तर वाढतच आहे नि त्यातून कालपर्यंत भले भले समजले जावेत असे लोक आज मुळांपासून घुसळून निघावेत, ही मराठीच्या आरोग्याच्या दृष्टीनं एक चांगली बाब आम्ही समजतो. अशा घुसळणीतूनच लोणी बाहेर येतं. एखाद्या लेखकामुळे, त्याच्या विचारांमुळे पन्नास-साठ वर्षे मराठी समाज इतका ढवळून निघावा, अशी ही पहिलीच घटना असावी. आणि हा मान पुन्हा नेमाड्यांसारख्या मातबर लेखकानंच पटकवावा, ही पण थोरली गोष्ट जाहली. नेमाडे जे मांडत आहेत त्यात काही तथ्य आहे म्हणूनच इतकी वर्षे सातत्याने ही घुसळण होत आहे. ज्यात काडीचे तथ्य नसते ते त्याच्या हयातीतच काळाच्या उदरात गडप होतं, असं आम्ही वाचोन होतो. कसबे सर, आपल्या म्हणण्यानुसार त्यात तथ्य नसेल तर मग पन्नास-साठ वर्षे चर्चा करणारे महाराष्ट्रातील-एकंदर देशातील आणि जागतिक स्तरावरील सर्वच माणसं मूर्ख म्हटली पाहिजेत. मग आपण तरी कशाला हा खर्डा खरडण्याचा खटाटोप केलात?

पण ते काहीही असो, रा. नेमाडे मास्तरांना आम्ही पुष्कळ धन्यवाद देऊ ईच्छितो. कारण मास्तरांनी आम्हा तरुणांसकट आपल्यासारख्या अनेक ज्येष्ठाफिष्ठांनाही ‘लाईफटाईम’ गृहपाठ दिधला. इथं एक बाब आवर्जून सांगतो, इतकेवेळा आम्ही रा. नेमाडे यांना भेटलो, पण एकाही विरोधकाविषयी- विशेष नोंद करण्यासारखी बाब म्हणजे खुद्द आपल्याबद्दलही त्यांनी कधी अनुद्गार वा द्वेषबुद्धीनं वावगा शब्द काढलेला आम्हास आठवत नाही. हे एवढ्यासाठी, की नेमाडेंनी आम्हाला देशीवादी विचार दिला असला तरी उठसूट कुणाचा द्वेष करा, द्वेषबुद्धीनं उठसूट कोणावर लेखनी चालवा, असं काही त्यांनी शिकवलेलं नाही. आपल्या या ग्रंथात आम्हाला तरुण म्हणोन इथं लिहायलाही लाज वाटतील, अशापद्धतीनं- पातळी सोडून - शेलक्या विशेषणांच्या आडून ज्या शिव्या आपण नेमाडे आणि देशीवादी मंडळींना दिल्यात, त्यातून कसबे सर, आपलं अंतरंग (अ)विचारांनी किती ‘प्रगत...आधुनिक नि प्रबुद्ध’ आहे, हे कळतं. कारण बुद्ध-फुले-मार्क्स-आंबेडकर यांचं नाव घेणारा कोणताही माणूस इतकं असभ्य लिहू शकत नाही. आपल्याप्रमाणेच ‘बुद्ध-मार्क्स-आंबेडकर’ यांचं नाव घेत आपले अर्धवट चेलेही (हा आपलाच शब्द) लाज गुंडाळोन ज्या पद्धतीची भाषा नेमाडे आणि देशीवादी मंडळींबाबत सोशल मीडियावर वापरतात, त्यावरून खाण तशी माती या म्हणीचीच प्रचीती रेते.

नेमाडे यांचं काहीच न वाचलेल्या शेंबड्या पोरापासून ते अगदी जख्ख ज्येष्ठ म्हणावं इथपर्यंत नेमाडे यांना विपुल टीकाकार लाभले. त्यामुळे सरसकट सगळ्यांनाच ‘टीकाकार’ म्हणावं का, असाही एक प्रश्न उरतो. कारण या टीकाकारांच्या यादीतील ज्यांनी व्यक्तिद्वेषी टीका न करिता मराठी विचारविश्वाला पुढं घेऊन जाणारी ‘समृद्ध टीका’ केली, असे टीकाकार बोटावर मोजण्याइतपतही निघाले नाहीत. बाकी बहुतेकांनी नेमाडे कुठंच बेसावध सापडत नाहीत म्हटल्यावर शोधाशोध करून कुठं पद्मश्री, कुठं जातिव्यवस्था, कुठं साहित्य अकादमी, कुठं देशीवाद, साहित्य संमेलन, इंग्रजीविषयीची मतं वगैरे मुद्द्यांना ढाल बनवून त्या आडोन नेमाडे यांच्यावर व्यक्तिद्वेषमूलक पांजरपोळ टीकाच जादा केल्यानं त्या टीकेला ‘टीका’ न म्हणिता बोंब (आमचेकडे मराठवाड्यात शिमग्याला अश्लील शिव्या घालत हाताची मूठ तोंडावर ठेवून बोंऽ बोंऽऽ बोंबलण्याची प्रथा आहे.) असा अस्सल देशी शब्द वापरणंच योग्य होईल.

नेमाडेंना अकादमी मिळाला तेव्हा कुणीएक स्वत:स संपादक म्हणविणाऱ्या वर्तमानपत्रीने ‘छाछुगिरीला पारितोषिक’ असा सनातनी गरळादी अग्रलेख टाकिला होता. तर कोणा छटाकबुद्धीच्या विद्यापीठीय बंडलबाज व्यक्तीनं भीतीपोटी स्वत:चं खरं नाव झाकोन पावसकर असं काहीतरी कोकणस्थाचं टोपण नाव धारण करोन वर्तमानपत्रातून उलटी केली होती. स्वत:च्या खऱ्या नावानं लिहिण्याची हिंमत अशा सज्जनतेचा बुरखा घेतलेल्या षंढांमध्ये नसते. तर कुणा एका गल्लीतल्या मर्कट उपटसुंभानं खालच्या पातळीवर जाऊन नेमाडेंची बदनामी करणारी संपादकीय खरडून अंक काढत नुस्तेच वांझोटे खेळ केले. या सगळ्या वांझोट्या खेळात आणि माकडचाळ्यात बहुजन सवतीमत्सर नि व्यक्तिगत आकसच जादा दिसतो. ह्या उपटसुंभांच्या अशा बोंबा आणि थुकराट खेळ आता नित्याचेच झाल्यानं रोजचं मढे त्यांस कोण रडे या न्यायानं त्याकडे आम्ही सपशेल कानाडोळा करितो. इतकं जंगजंग पछाडूनही नेमाडेंना ज्ञानपीठ मिळायचं काही थांबलं नाही, यामुळे हा शोक अनावर झालेल्या अनेकांनी स्वत:चा खिसाही उधळिला. ज्यांच्या शोकाला पारावार उर्ला नाही अशांनी त्यानंतरच्या काही रात्री बिअरबारवाल्यांचा धंदा फारच तेजीत केला म्हणे! हे आयकून आम्हांस यांची कीव आलेवांचून राहिली नाही. तात्पर्य, सत्य झाकता येत नाही, दडपवता येत नाही, इतका बोध आम्हांस झाला. फुले-शाहू-आंबेडकरांचं (फुशाआं) नाव घेता घेता कितीक लोकांनी तात्त्विक आणि नैतिक बाजू कायम सांभाळिली? फुशाआंचं नाव घेत इथे अनेकजण मोठे जाहले. म्हणिजे हळूहळू प्रस्थापित झाले. प्रस्थापित होण्याचं एक महत्त्वाचं लक्षण म्हणिजे विद्रोहाला शांत करत करत आपल्या कोडग्या भूमिकेचं लंगडं समर्थन करत करत कुठल्या कुठल्या कमिट्यांवर जाणं, अभामसा संमेलनाचं अध्यक्ष होणं, कुठल्या तरी विद्यापीठाचं कुलगुरू होणं, स्वत:चे गटतट उभे करणं इत्यादी इत्यादी प्रकार आम्ही तरुणांनी फार जवळून डोळसपणे पाहिले. म्हणिजे व्यवस्था नाकारिता नाकारिता आपण व्यवस्थेचे लाभार्थी जाहलो कसे आणि लाभार्थी होता होता प्रस्थापित जाहलो कसे, हा प्रश्न फुशाआंचं नाव घेणाऱ्यांनी स्वत:स विचारण्याची वेळ कधीच गुदरली आहे. कारण व्यवस्था नाकारण्याचं कंत्राट घेणारेच आता व्यवस्थेचे महापौर झालेत, हे दर्दनाक वास्तवदर्शी चित्र बघणे मात्र आमच्या पिढीच्या वाट्यास आलें. लिहायचं एक-बोलायचं दुसरं-आणि करायचं तिसरंच, असा फुशाआं यांच्या नावानं हा रौंदाळा चालू आहे.

नेमाडे यांच्या जातिव्यवस्थेबद्दलच्या विचारांवर मधूनमधून टीका करण्याची काही लोकांस भाद्रपदी खोडच लागलेली आहे. कसबे सर आपणही याचा ‘परामर्ष’ घेतला आहे. वास्तविक जातिअंताबद्दल बेंबीपासून ओरडणाऱ्यांनी आणि आज सहावा (सातवाही येऊ घातलाय म्हणे?) वेतन आयोग लाटणाऱ्यांनी तरी स्वत:च्या जाती, स्व-जातीपासून मिळणारे फायदे-सवलती-आरक्षणं नाकारिले का? ‘मला नोकरी मिळाली, पण झोपडपट्टीतील, खेड्यातील कुडात राहणाऱ्या माझ्या गरीब बांधवाला आर्थिक सवलतींची खरी गरज आहे, तर मी आता सवलती नाकारितो,’ असं कुठला सुशिक्षित सहावा वेतन आयोग घेणारा नोकरदार म्हणितो? एकदा का जात नाकारिली म्हणिजे त्यापासून मिळणारे फायदेही जाणार, असं लफडं. विचार सोडू, पण फायदे नाही. म्हणिजे एकीकडे स्व-जात कुरवाळत फायदे उपटायचे आणि दुसरीकडे जातिअंतावर बोलायचं असा ‘पुरोगामी’ डबलगेम चालू आहे. कशासाठी? समतेसाठी की समरसतेसाठी? तळमळीने समतेची (समरसतेची नव्हे बरं!!) भाषा करणारे असं दुटप्पी वागत नाहीत. जात्यंतावर बोलायचं तर स्व-जात प्रथम मनातून आणि नंतर कागदावरून पुसावी. जातीच्या आधारे तरुणांना गुंगी देऊन स्वत:चे ‘करिअर’ करणाऱ्यांनी असले धंदे आता बंद करावेत!

वरवर व्यासपीठावरून जातिअंताबद्दल बोलायचं आणि प्रत्यक्ष व्यवहारात जातीय राजकारणं, कुरघोड्या करायच्या, हा रोजचाच खेळ आहे. विद्यापीठं ही तर अशा भानगडबाज लोकांचे अड्डेच झालेत. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतरच्या सगळ्या चळवळी- विशेषत: बहुजन समाजातून होणाऱ्या चळवळी- जनमानसांपासून, तरुणांपासून तुटण्याचं हे एक प्रमुख कारण. सेक्युलर बुरख्याखालच्या छुप्या अस्मितावादी जातीय चेहऱ्यांनी आणि करिअरिस्ट कार्यकर्त्यांनी-नेतृत्वांनी चळवळी खाल्ल्या. फुशाआंचं नाव घेत बहुजन जातींतील तथाकथित बुद्धिवादी म्हणवल्या जाणाऱ्या बहुतांश लेखक-प्राध्यापक-विचारवंतांनी आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी (जाणीवपूर्वक?) केवळ ब्राह्मण मुलींशी, तर काहींनी मराठा जातीतील मुलींशी ठरवून लग्ने केली. यास जातिअंत म्हणावं का सूड? महर्षी शिंदे-गांधी आणि बाबासाहेबांसकट अनेक महापुरुषांनी आंतरजाती लग्नं झाली पाहिजेत, असं म्हटलेलं होतं. याचा ‘केवळ उच्चजातींतील मुलींशीच लग्नं करणे’ असा सोईचा अर्थ घेऊन अनेकांनी जाणीवपूर्वक प्रेमाबिमाचे नाटकाआडोन उच्चजातींतील मुलींशी लग्ने केली. बहुजन म्हणविल्या जाणाऱ्या आपल्यापेक्षा खालच्या जातींतील गोरगरीब-होतकरू मुलींशी लग्ने का केली नाहीत. आपल्यापेक्षा खालच्या जातींतील गरीब मुलींशी लग्न करायला लाज का वाटावी? कमीपणा का वाटावा? असं केलं असतं तर त्या पिछड्या जातीतील मुलींनाही उभं राहण्याचा, प्रबोधनाचा एक मार्ग खुला जाहला असता आणि शिंदे-गांधी-आंबेडकर यांचा विचार खऱ्याअर्थानं सार्थकी लागला असता. मात्र असं झालं नाही, हेच पुरोगामी वास्तव आहे. याचाच अर्थ असा की बुद्ध येऊ द्या, तुकाराम येऊ द्या, फुले-शाहू-गांधी-शिंदे-आंबेडकर येऊ द्या आम्ही आमची जात सोडणार नाही, असा पण केल्यागत इथला समाज वाटचाल करितो आहे. म्हणिजेच इथं कोणीही आपली ‘जात’ टाकून द्यायला तयार नाही. नेमाडेही हेच सांगत आहेत. ‘जाती फारच चांगल्या आहेत, त्या कायमच टिकल्या पाहिजेत’ असं नेमाडे यांनी कुठे लिहिल्याचं, कुठे बोलल्याचं आमच्या तरी वाचण्यात-ऐकिवात नाही. ‘बुद्ध-अखिल संत-फुले-शाहू-शिंदे-आंबेडकर-गांधी ही अशी मोठी मोठी माणसं येऊन गेली, पण जाती काही गेल्या नाहीत. त्यामुळे आताही जाती जातील असं दिसत नाही, त्या जाणं कठिण आहे,’ अशा आशयाचं ते बोलल्याचं आम्हाला ठाऊक आहे. या विधानात जातिव्यवस्थेचं समर्थन कुठं आलं? धडधडीतपणे जे दिसतंय तेच नेमाडे सांगत आहेत. असं सांगणं म्हणजे जातीचं समर्थन कसं काय असू शकतं? त्यांच्या या विधानाचा विपर्यास करून किंवा वृत्तपत्रीय बातम्या वाचोन चिंचेच्या झाडाला कैऱ्या चिकटवण्यात कसली आलीय ‘इंटेलेक्चुअलशीप’? शिवाय चिंच काय आणि कैरी काय दोन्हींची चव आंबटच! यातून एवढंच कळतं आपल्याकडे नीट ऐकूनही घेतलं जात नाही, की नीट वाचलंही जात नाही. आणि नीट वाचलंच तर त्याचं एकंदर व्यापक परिप्रेक्ष्यावर आकलन होत नाही. आणि झालंच सत्याचं आकलन तर दांभिक पोझ घेतल्यानं ते उघडपणे मान्य करवत नाही, ही बोंब. हां, एक गोष्ट आहे, ती म्हणिजे ‘जाती काही जाणार नाहीत’ असं का नेमाडे यांनी म्हटलं की केवळ लेखनातून-भाषणातून लटकाच जातिअंत करणाऱ्या अस्मितावाद्यांच्या वैचारिक धंदेबाजीला चाप लागून आता पुढं काय? हा सवाल त्यांज समोर जरूर उभा राहतो. या अर्थी नेमाडे यांस होणारा विरोध आम्ही समजू शकतो.

............................................................................................................................................

‘देशीवादाचे दुश्मन’ या रा. रा. अशोक बाबर यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4443

............................................................................................................................................

लेखक सुशील धसकटे तरुण कादंबरीकार आहेत. ‘जोहार’ ही त्यांची कादंबरी बहुचर्चित ठरली आहे.

hermesprakashan@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

mahesh ratte

Fri , 20 July 2018

संपादकीय टिप्पणीमधील 'प्रच्छन्न' हा शब्द काढलेला दिसतो आहे. स्वागतार्ह बदल आहे, परंतु असा बदल वाचकाच्या प्रतिक्रियेवरून केल्याचे नमूद करणे आदर्श संपादकीय नियमांना धरून ठरले असते. असो. बदल झाला हेही नसे थोडके. कसबे यांच्या मांडणीत अनेक दोषस्थळे आहेत, तशीच नेमाडे यांच्या मांडणीतही दोषस्थळे आहेत. त्यावर दोन्ही बाजूंनी भक्तिभावाने उत्तेजित होऊन युक्तिवाद करण्याने काही साधणार नाही. असो.


mahesh ratte

Thu , 19 July 2018

'देशीवादाचे दुश्मन’ हे पुस्तक 'लवकरच प्रकाशित होत आहे', असे आपण म्हटले आहे. पण हे पुस्तक काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झाले असून प्रस्तुत वाचकाने एका आठवड्यापूर्वी त्याची प्रत स्वतः विकत घेतलेली आहे. जमले तर तथ्यांची तपासणी करून अशा टिपा जोडाव्यात. रावसाहेब कसबे यांनी देशावादावर केलेली टिप्पणी 'प्रच्छन्न' असल्याचे आपण म्हटले आहे. यावर आपल्याला काही सुचवणे म्हणजे उपड्या घड्यावर पाणी घालण्यासारखे आहे. अशा वादांमधे संपादकीय बाजू घ्यायची असली तरी पुरेशा आकलनातून ती घ्यावी, अन्यथा आपल्या अशा शेरेवजा टिप्पण्याच 'प्रच्छन्न' ठरणार आहेत, हे जमले तर समजून घ्यावे. अन्यथा सोडावे. आपली पाठ स्वतःच थोपटण्यात रममाण होणारे दिसता आपण.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......