नाना पाटेकर : लार्जर इन लाइफ
ग्रंथनामा - झलक
मुकेश माचकर
  • ‘नाना : वळलं तर सूत’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 13 July 2018
  • ग्रंथनामा Granthnama मुकेश माचकर Mukesh Machkar नाना पाटेकर Nana Patekar

‘नाना : वळलं तर सूत...’ हे हरहुन्नरी, अष्टपैलू अभिनेता नाना पाटेकर यांच्याविषयीचं पुस्तक. नानाविषयी अनेक मान्यवरांनी लिहिलेल्या लेखांचा समावेश असलेल्या या पुस्तकाचं संपादन व शब्दांकन श्रीकांत गद्रे यांनी केलं आहे. हे पुस्तक पुण्याच्या इंद्रायणी साहित्यनं प्रकाशित केलं असून नुकताच या पुस्तकाला राजहंस प्रकाशनाद्वारा दिला जाणारा उत्कृष्ट निर्मितीसाठी रेखा ढोले पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्तानं या पुस्तकाला हा एक लेख...

.............................................................................................................................................

‘मुक्या, भडव्या, चांगलं लिही हा या पिक्चरबद्दल. आम्ही दोघांनी ** घासली आहे खूप.'

नाना पाटेकरांबरोबरचा हा पहिला संवाद.

नानांबरोबर प्रत्यक्ष पूर्वपरिचय नसताना तो इतक्या ‘आपुलकी’ने घडून आला होता. अर्थात नानांकडून या हाकेने स्वागत होण्यासाठी पूर्वपरिचयाची अट नसते, हे नानांना ओळखणाऱ्यांना सांगायला नकोच.

साल होतं १९९८. सिनेमा होता ‘वजूद’. प्रेस शोला नाना आणि दिग्दर्शक एन. चंद्रा दारातच स्वागताला हजर होते. दारात पोहोचल्याबरोब्बर नानांनी दंडाला धरून खेचून जवळ घेत, हा डायलॉग हाणला आणि मी तंतरलोच. नाना दारातून हटल्यानंतर आपण आत जाऊयात, असा माझा प्रयत्न होता; तो त्यांनी हाणून पाडला होता. हात सोडून नाना दिलखुलासपणे म्हणाले, ‘गंमत करतोय रे. तुला हवं ते लिही. पण, तुला सिनेमा आवडणार याची खात्री आहे मला. आम्ही दोघांनी खूप मेहनत घेतलीये त्यावर.’

त्या शोनंतर सहपान आणि सहभोजनाला नाना आणि एन. चंद्रा, मी आणि तेव्हाचा ‘लोकसत्ते’चा चित्रपट समीक्षक श्रीकांत बोजेवार अशी चौघांची बैठक जमली होती. ‘वजूद’ हा नाना आणि चंद्रा यांच्या एकत्रित कामगिरीतला सर्वोच्च बिंदू होता. दोघांनीही एक अवघड विषय हाताळला होता. अभिनेता म्हणून नानाला फुल स्कोप होता आणि नानाने त्या सिनेमातला भावनांचा कॅलिडोस्कोप फार ताकदीने दाखवला होता. या सिनेमात दोघांचीही खूप भावनिक गुंतवणूक होती. तो दोघांसाठीही एक माइलस्टोन होता. ‘अंकुश’, ‘प्रतिघात’ गाजवणाऱ्या जोडीची जादू अजून संपलेली नाही, हे दाखवून देण्यासाठी दोघेही सगळी ताकद एकवटून उतरले होते. तो स्वप्नाळू उत्साह नानांच्या बोलण्यातून खळाळत होता… अतिशय निरागसपणे ते या सिनेमाबद्दल भरभरून बोलत होते. मनात येत होतं, इतके उन्हाळे-पावसाळे पाहिल्यानंतर, हिंदी सिनेमाच्या बेभरवशाच्या जगाचा इतक्या जवळून अनुभव घेतल्यानंतर हा माणूस गाभ्यात एवढा कोवळा कसा राहिला? की हाही एक थोर अभिनयाविष्कार?

पण, मग लक्षात येत गेलं की, इथं फारसं आतबाहेर काही वेगवेगळं दिसत नाहीये. हा माणूस असाही परफॉर्मर आहे आणि तसाही. आता त्याच्यात एकमेकांपासून वेगवेगळं काढण्याजोगं काही द्वैत सापडणं मुश्कील आहे. नानांशी गप्पा सुरू असताना वाटू लागल, हा माणूस इतका छान मोकळाढाकळा असताना आपण उगाचच एवढं तंतरलो… शिवाय त्यांनी ‘तो’ विषय काढलाच नव्हता… नंतरही कधीच काढला नाही.

‘तो विषय’ अर्थात नानांशी प्रत्यक्ष सामना टाळण्याचं आणि ती भेट टळत नाही म्हटल्यावर बिचकण्याचं कारण होतं मटातलं माझं पहिलं परीक्षण.

ही गोष्ट एका वर्षाआधीची. १९९७ची.

ज्या ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या इमारतीबाहेरून मित्रासोबत जाताना कधीकाळी ‘आयला, इथे गोविंद तळवलकर, अशोक जैन, कमलाकर नाडकर्णी ही सगळी आपली आवडती माणसं बसतात ना’ अशा विचाराने अंगावर रोमांचाचे शहारे दाटून आले होते, त्याच इमारतीत, त्याच ‘मटा’मध्ये याच सगळ्या थोरांबरोबर काम करण्याची संधी मला काही वर्षांत मिळाली होती. मटामध्ये नाटक आणि सिनेमा या दोन्ही विषयांवर लिहिणारे कमलाकर नाडकर्णी रिटायर होणार होते. त्यांच्यानंतरच्या रचनेत सिनेमा-परीक्षणाची वरमाला अस्मादिकांच्या गळ्यात पडली आणि स्वतंत्र परीक्षणाचा पहिलाच सिनेमा ठरला ‘यशवंत’… नाना पाटेकरांचा ‘साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है’वाला ‘यशवंत’. या सिनेमाच्या मी लिहिलेल्या परीक्षणाचं शीर्षक होतं ‘यशवंत व्याख्यानमाला : पुष्प पहिले’.

त्या दिवशी नाडकर्णींनी मटामध्ये एन्ट्री घेतली तीच मुळी ‘आता माचकर मेला’ असं मोठ्याने सांगत. मी घाबरून विचारलं, काय झालं? ते म्हणाले, ‘नानाचा फोन आला होता सकाळी सकाळी. मला म्हणत होता, कमळ्या, भडव्या, माझ्या सिनेमाबद्दल तू का नाही लिहिलंस? हा कोण आलाय नवीन माणूस? त्याने पार करून ठेवलीये आमची.’

अरे बापरे, मग?

‘मग काय, मी नानाला सांगितलं, त्याने लिहिलंय ते बरोबरच आहे. मीही त्या शोला होतो. मी असतो तर आणखी कडक लिहिलं असतं.’ नाडकर्णी (निदान आमच्यासमोर तरी) गरजले.

अरे बापरे, आता नाना पाटेकर आपल्याला फोन करून तासणार किंवा काही सांगता येत नाही, सरळ उठून ऑफिसात येऊन गचांडीच धरली तर! नानाचं रेप्युटेशनच तसं होतं खतरनाक.

नंतर नाडकर्णी म्हणाले, मी तुझी गंमत केली. नाना फार वेगळा माणूस आहे.

नानांचा ना तसा फोन आला, ना त्यांनी प्रत्यक्ष अवतीर्ण होऊन ‘परीक्षक-मर्दना’चा प्रयोग दाखवला. पण, नाना पाटेकर आपल्या पहिल्याच परीक्षणाने काहीसे दुखावले, ही भावना तेव्हापासून डोक्यात होती. कधी समोरासमोर भेट झाली तर आपली खैर नाही, असंही वाटत होतं. ‘वजूद’च्या शोला ‘मुक्या भडव्या’ अशी ‘प्रेमळ’ हाक ऐकल्यावर हातपाय गारठले होते ते त्यामुळे.

नानांच्या प्रत्यक्ष भेटीआधी नानांचं हे ‘सणकी’ रेप्युटेशन जवळपास प्रत्येकाचीच गचांडी धरत असावं. नानाची पडद्यावरची पहिली ओळखही नानाबद्दल धास्ती वाटायला लावणारी होती.

शाळकरी वयात नाना पाटेकर हे नाव कानावर आलं ‘सिंहासन’मधल्या अगदी छोट्याशा भूमिकेसंदर्भात. या सिनेमात जयराम हर्डीकर या अल्पायुषी ठरलेल्या, चटका लावून गेलेल्या गुणी नटाबरोबरच्या हाणामारीच्या दृश्यात नानाने त्याच्या पोटात खरोखरची फाईट मारली होती, अशी काहीतरी चर्चा होती. आमच्या पुलाच्या वाडीत नटाने समोरच्याला मारलेल्या फायटी हाच त्याची थोरवी जोखण्याचा एकमात्र निकष होता त्या काळात. त्यामुळे, सिनेमात खरी फाईट मारणारा नाना आणि ती सहन करणारा जयराम हे दोघेही आमचे हीरो झाले होते. वाडीत नानाची नंतर परत चर्चा झाली ‘अंकुश’च्या वेळी. सोबत नवोदित पण गुणी नटांची तगडी गँग असताना सिनेमा नानाने खिशात टाकला होता. त्याच्या अभिनयाची वाहवा सुरू होती सगळीकडे. आमच्या वाडीतली पोरं मात्र त्याच्या सुरा भोसकण्याच्या ‘कौशल्या’वर फिदा होती. ‘अरे तो पोटात सुरा मारतो ना, तो असा खुपसून बाहेर काढत नाय लगेच; तसा काढला तर ऑपोझवाला मरेल याची गॅरंटी नाही. चाकू आत घुसवला की नाना गरागरा फिरवतो मूठ; म्हंजे ऑपोझवाल्याची सगळी आतडीबितडी फाटून जातात, नंतर काढतो बाहेर सुरा. वाचण्याचा चान्सच नाय.’ सुरा खुपसून माणूस जिवे मारण्याचं हे अचूक टेक्निक सिनेमा पाहून आलेली मोठी मुलं चेवात येऊन सांगायची आणि आम्ही भोटही, जणू भविष्यात आपल्याला सुरामारीतच करीयर करायचंय, अशा भक्तिभावाने नानाचं हे गुणगान ऐकून गार व्हायचो.

अभिनय, सिनेमाचं तंत्र यांतलं फारसं काही न कळण्याच्या त्या वयातही एक कळायचं… नानाला पडद्यावर पाहिलं की पाहणारा अस्वस्थ होतो… पाहणारा कोणीही असो, तो अस्वस्थ होतोच.

हा खडबडीत माणूस त्याच्या आतली सगळी अस्वस्थता समोरच्या प्रेक्षकांवर, कशी कोण जाणे, पण सगळीच्या सगळी संक्रमित करायचा. त्याला पाहताना साधा सिनेमाही जणू थ्रीडी होऊन जायचा… त्रिमिती… तो तिथून समोरच्याच्या डोळ्यांत डोळे घालायचा आणि इथे आत चरकायचं… त्याची साधीशी हालचालही धडधड वाढवायची. त्याला पाहताना सजग सावरून बसावं लागायचं. याचा काही भरवसा नाही, हा तिथून इथे गचांडी धरेल आपली, असं वाटत राहायचं.

तरी दरवेळी नाना काही टिपिकली टेलरमेड भावखाऊ भूमिकांमध्ये नसायचा. ‘प्रतिघात’, ‘प्रहार’मधल्या नानापेक्षा ‘परिंदा’, ‘सलाम बाँबे’मधला नाना वेगळा असायचा. एकीकडे तो अमिताभपेक्षा भारी (हे तेव्हाचं सर्वोच्च मोजमाप होतं) हीरो वाटायचा (हे इन्टेन्सिटीमुळे होत असणार, अमिताभचीही त्या काळातली मुख्य ताकद तीच तर होती), तर दुसरीकडे तो कमालीचा नीच वाटायचा. ही एक कमाल होती. त्या काळातल्या कोणत्याही प्रमुख अभिनेत्याला एकाच काळात सकारात्मक आणि नकारात्मक अशा भूमिकांमध्ये पाहणं प्रेक्षकांना झेपत नसे. ते मुख्य प्रवाहात शक्य होण्यासाठी पुढच्या पिढीतला शाहरुख पडद्यावर यावा लागला. पण, नानाने शाहरुखच्याही आधी ते लीलया करून दाखवलं होतं. हीरो असा की जीव ओवाळून टाकावा, खलनायक असा की मोजून पैजारा माराव्यात. ‘प्रहार’मधून दिग्दर्शकीय पदार्पण करताना नानाने त्या कौशल्यावरची हुकुमत दाखवली होती. आज सगळे मुख्य अभिनेते एकेका सिनेमासाठी कशी मेहनत घेतली, याची कौतुकं साजरी करत असतात. नानाने या सिनेमासाठी कमांडो ट्रेनिंग घेतलं होतं, आपल्या सहकलाकारांनाही मेहनत घ्यायला लावली होती. या एकाच दिग्दर्शकाकडे माधुरी आणि डिंपल या दोघींनीही मेकअपचं बोट न लावता काम केलं असेल.  

त्याच्या कारकिर्दीतल्या सर्वोत्तम चित्रपटांमध्ये पहिल्या तिनांतली एक जागा ज्याला कायमस्वरूपी बहाल करायला हवी, तो ‘थोडा सा रूमानी हो जाए’ ऐन तारुण्याच्या काळात आला आणि आम्ही भैसाटलोच. अरे हा काय माणूस आहे का? हे काय करतोय हा? आता काय आमचं वय आहे का एखाद्या माणसाकडून असं गारुड करून घेण्याचं, असं वाटायला लावणारा हा सिनेमा होता. या सिनेमामध्ये प्रजापति नीलकंठ धूमकेतू बारिशकर म्हणून नाना? ही कल्पनाच अवघड होती. ही कल्पना मुळात अमोल पालेकरांना कशी सुचली असेल? पडद्यावर आणि पडद्याबाहेरही ‘नानागिरी’साठीच ख्यातकीर्त होत चाललेल्या ओबडधोबड नाना पाटेकरच्या तेव्हाच्या लोकप्रिय किंवा सर्वज्ञात गद्य प्रतिमेशी काहीच्या काहीच विसंगत, अतिशय हळुवार, हळवी, काव्यात्म अशी ही भूमिका म्हणजे नानाच्या अभिनयशक्तीचा उत्तुंग आविष्कार. ज्याच्या सुरा खुपसण्याच्या टेक्निकवर आम्ही फिदा होतो, त्याने च्यामारी काळजातच सुरा खुपसला, तोही रक्ताचा एक थेंबही न सांडता.

इकडे नाना ‘मुश्किल है जीना उम्मीद के बिना, थोडे से सपने सजाए, थोडा सा रूमानी हो जाए’ असं सांगत असताना देशातलं वातावरण मात्र रूमानी राहिलेलं नव्हतं. देशभर काही वेगळंच खदखदत आणि उकळत होतं. तो काळ भयाण होता. धर्माच्या नावावर झालेल्या देशाच्या फाळणीनंतरची दुसरी भावनिक फाळणी नुकतीच घडून आली होती. बाबरी मशिदीच्या पतनाने भळभळत्या जखमा चिघळून वाहायला लागल्या होत्या. सगळ्या समाजात उभी चिरफळी पडली होती. सेक्युलर असणं, परधर्मसहिष्णुता हे दखलपात्र सामाजिक गुन्हे ठरू लागले होते. सूड, बदला, समोरच्यांचा नि:पात, असल्या भावनांनी भारलेल्या समाजाला विवेकाचा, सामोपचाराचा, एकजुटीने राहण्याचा मार्ग दाखवणारा माणूस भ्याड, नामर्द वगैरे ठरू लागला होता.

अशा वेळी नानाबद्दल जी भीती वाटत होती, ती खरी ठरली… त्याने पडद्यातून हात बाहेर काढून प्रेक्षकांची गचांडी धरलीच.

मेहुलकुमारच्या ‘क्रांतिवीर’मधून त्याने मराठीजनांचीच नाही, तर अखिल भारतवर्षाची गचांडी धरली आणि पार गदगदा हलवून सोडलं सगळ्यांना. ‘ये हिंदू का खून हे मुसलमान का खून, अब बता किस का कौनसा खून है,’ असा भेदक सवाल विचारणारा प्रताप नारायण तिलक ही काही काल्पनिक व्यक्तिरेखा नव्हती- तो शुद्ध नानाच होता... सणकी, डेरिंगबाज, मनात आलं तर बुक्कीने पर्वत फोडण्याची धमक राखणारा भव्य नाना… पण ते मनात न आणणारा… लोकांनी आपली कामं आपणच करावीत, आपली धुणी आपणच धुवावीत, असा सल्ला देणारा… या सिनेमात डिंपलच्या रूपाने एक कलमवाली ‘बाई’ मौजूद असताना सिनेमा पाहायला येणाऱ्या बायकांचं प्रेरणास्थान नानाच होता… अडचणीत सापडलेल्या अबला नारीच्या रक्षणार्थ धावून जाऊन हीरो बनण्याऐवजी तिची कानउघाडणी करून तिला सक्षम करणारा अफलातून नाना… भगवानने हाथ दिये है, लगे फैलाने, लगे भीक माँगने… लगे चिल्लाने बचाव बचाव… उठाव वो लाठी, फोड दो उसका सर, असा डायरेक्ट अॅक्शनचा उपदेश करणारा नाना हा भन्नाट नायक होता… तो केवळ नानाच साकारू शकला असता.

थेट पिटातल्या पब्लिकच्या भडक आवडीनिवडींवर बेतलेला असूनही त्यांच्यापलीकडच्या सुबुद्ध जनतेच्या सुखवस्तू पार्श्वभागाखालीही बत्ती लावणाऱ्या या सिनेमाचं नेमकं रसग्रहण आताच्या काळात शक्यच नाही. कारण, तो त्या काळातल्या प्रश्नांना काळातूनच निर्माण झालेलं उत्तर देणारा सिनेमा होता. ती एक अभूतपूर्व स्वरूपाची सिनेमॅटिक घटना होती. महाराष्ट्राचे लाडके नेते जेव्हा बाबरी पाडल्याचं ‘श्रेय’ घेण्यात धन्यता मानत होते आणि वर आपण होतो म्हणूनच मुंबईतले हिंदू वाचले, अशा धादांत वल्गना करत होते, त्या काळात जराजराशाने कापरासारख्या भुरभुरणाऱ्या लोकभावनेच्या विरोधात इतक्या थेटपणे व्यक्त होणं, हे साधंसुधं काम नव्हतं. विजय तेंडुलकरांसारख्या लेखकावर ‘रामप्रहर’ हे सदर ‘बेहरामप्रहर’ ठरून अर्ध्यात बंद करण्याची वेळ आली होती. समन्वयाची आणि प्रखर हिंदुत्वविरोधी भूमिका घेणाऱ्या वर्तमानपत्रांच्या खपावर त्या भूमिकेचा थेट परिणाम झाला होता. अशा काळात ‘क्रांतीवीर’सारखा उफराट्या संदेशाचा उपदेशपट बनवण्याचे दोन धोके होते. एक सरळसरळ व्यावहारिक धोका होता, सिनेमा आपटण्याचा. दुसरा धोका त्याहून मोठा होता… तो होता नानाची सगळी लोकप्रियता क्षणार्धात पाचोळा बनून उडून जाण्याचा. नानाची पडद्यावरची आणि पडद्यामागची प्रतिमा त्याच्या मर्दानी पौरुषप्रधान व्यक्तिरेखांनी आणि व्यवहारातल्या तडकभडक वागण्याने निर्माण केली होती. बाबरी पतनोत्तर हिंस्त्र, उद्रेकी काळातल्या पौरुषाच्या संकल्पना वेगळ्या होत्या. नानाने त्या संकल्पनांवर थेट फुली मारणारी व्यक्तिरेखा साकारण्याने त्याच्या चाहत्यांच्या मनातल्या प्रतिमेचे तुकडे तुकडे झाले असते. ते जोडणं फार कठीण गेलं असतं. शिवाय महाराष्ट्रात आणि खासकरून मुंबईत तर ही पोलिटिकली अतीव इनकरेक्ट भूमिका होती. शिवसेनेशी जवळीक असलेल्या नानाला व्यक्तिगत पातळीवर मोठा फटका बसू शकला असता. हे सगळे धोके पत्करून त्याने हा सिनेमा केला, ही मोठी गोष्ट आहे. कला-संस्कृतीच्या अभिजात वर्तुळाबाहेरून महत्प्रयासाने आत येऊन कमालीच्या संघर्षातून त्याने आपली जागा बनवली होती. वडिलांच्या उपचाराचे पैसे कमावण्यासाठी ‘महासागर’ नाटक करणाऱ्या नानावर तीन हाऊसफुल्ल प्रयोगांपैकी दोन प्रयोगांच्या मध्ये वेळ काढून त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली होती एकेकाळी. त्या रखरखत्या ज्वाळांमधून ओतीव पोलादासारखी घडवलेली कारकीर्द आपल्या वैचारिक भूमिकेसाठी पाऱ्यासारखी सांडून द्यायला तयार झाला हा माणूस!

आपली मूस नेमकी कशाने घडली आहे, हे दाखवण्याची एकतरी संधी आयुष्यात प्रत्येकाला मिळत असते… नानाच्या बाबतीत 'क्रांतिवीर' ही तीच संधी होती. नानाने तिचं सोनं केलं… नव्हे, ते सोनं त्या आगीत झळाळून उठलं… नाना निव्वळ सिनेमापुरताच उपदेश करत बसला नाही; तर हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर धार्मिक विद्वेषाचा वणवा पेटलेल्या भागांमध्ये जाऊन शांततेचं आवाहन करण्याचं डेअरिंगही त्याने करून दाखवलं…

…पडद्यावर 'लार्जर दॅन लाइफ' बनणं सोपं असतं… त्यात पडदयाचा, थिएटरच्या रचनेचा, कॅमेऱ्याच्या तंत्राचा आणि पढीक देहबोलीचा मोठा वाटा असतो… पडद्याबाहेर ‘लार्जर दॅन लाइफ’ बनायला माणसाच्या आत काहीतरी भव्यदिव्य असावं लागतं… ते सुपाएवढं मोठं आणि वाघासारखं शूर काळीज नानाकडे होतं, हे ‘क्रांतिवीर’ने दाखवून दिलं.

दुर्दैवाने आपल्याकडे एखाद्या अभिनेत्याची एखादी व्यक्तिरेखा प्रसिद्ध झाली, गाजली की तिच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कॉप्या निघायला लागतात. 'यशवंत,' 'युगपुरुष', 'गुलाम-ए-मुस्तफा', अशा काही सिनेमांनी नायकाचं नाव बदललं, त्याचे संघर्ष बदलले, आतला गाभा फारसा बदलला नाही. ‘सबकुछ नाना’पट म्हणता येतील, असे हे सिनेमे होते. त्यांच्यातही नानाचे टचेस होते. पण, एकत्रित अनुभवातून निराशा हाती येत होती. त्यातल्या त्यात ‘वजूद’ने नानाची अष्टपैलू चमक दाखवली, पण, या सिनेमाला फारसा लोकाश्रय लाभला नाही. ‘अग्निसाक्षी’मध्ये नानाने हुकमी खलनायकी भूमिका समर्थपणे साकारून सगळा सिनेमा खिशात घातला होता. संजय लीला भन्साळीने पदार्पणात नानाला सीमा बिस्वाससमोर उभं करून ‘खामोशी द म्युझिकल’मध्ये त्याच्याकडून मूकबधीर बापाची अफलातून भूमिका करवून घेतली होती. दुर्दैवाने तो सिनेमा काळाच्या पुढचा होता. एकीकडे सई परांजपेंच्या ‘दिशा’मध्ये माथाडी कामगाराच्या जिण्याचे दशावतार दाखवणारा नाना दुसरीकडे शफी इनामदारच्या ‘हम दोनो’मध्ये रुबाबदार उद्योगपती बनून ऋषी कपूरबरोबर नाचला-बिचला होता. ‘हुतूतू’मध्ये फॉर्म गमावलेल्या गुलजारांनी नानाला तोंडीलावण्यासारखं वापरलं होतं. त्यात तबूही बेचव होती, तर सुनील शेट्टीची गणना कोण करी? ‘तरकीब’सारखे सिनेमे नानाने का स्वीकारले असावेत, असा प्रश्न पडत होता. ‘कोहराम’मध्ये त्याने थेट अमिताभला भिडून सॉलिड दंगामस्ती केली होती. त्यातला त्याचा बंगाली अवतार अद्भुत विनोदबुद्धीची चुणूक दाखवणारा होता. पण, तो थेट पिटातल्या प्रेक्षकांसाठीचा सिनेमा होता.

अमिताभ बच्चनप्रमाणेच नानाही आता ‘नायक’पदाच्या ट्रॅपमध्ये अडकून पडतोय की काय असं वाटत असताना नानाने ट्रॅक बदलला आणि आपल्यातला अभिनेता किती सकस ताकदीचा आहे, हे दाखवणारी सेकंड इनिंग्ज परिपक्वतेने खेळायला सुरुवात केली. ‘डरना मना है’, ‘भूत’, ‘अपहरण’, ‘ब्लफमास्टर’, ‘दस कहानियाँ’, ‘टॅक्सी नंबर नौ दो ग्यारह’, ‘राजनीती’, ‘अब तक छप्पन्न’ ही सिनेमांची नावं आठवली तरी अतिशय निगुतीने अनेक वर्षं मुरवलेल्या वाइनसारखा मुरब्बी अभिनय आठवतो. अनीस बाज्मींच्या ‘वेलकम’पटांमध्ये नानाने फ्रीकआउट मूडमध्ये आपण काय कहर करू शकतो, हे दाखवून दिलं. कधी ‘जंगल बुक’मध्ये शेरखानचा दिल दहलानेवाला आवाज बनलेला नाना मराठीत त्याच्या लाडक्या गौतम जोगळेकरने झोकात दिग्दर्शित केलेल्या ‘पक पक पकाक’मध्ये पोरांना हळुवारपणे घाबरवणारा भुत्या बनला होता. राम कदमांच्या ‘गड जेजुरी जेजुरी’मधून रूपेरी पडद्यावर आलेल्या नानाने मराठीत ‘माफीचा साक्षीदार’, ‘सूर्योदय’, ‘सूत्रधार’, यांच्यापासून अलीकडच्या ‘देऊळ’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, आणि ‘नटसम्राट’पर्यंत एका वेगळ्या दबदब्याची कारकीर्द गाजवली आहे. हा दबदबा टिपिकल ‘नायका’चा नाही, चतुरस्त्र ‘अभिनेत्या’चा आहे. नानाच्या बाबतीत हे मोठं आश्चर्य आहे. या माणसापाशी मुळात रूढ नायकासाठीचा ऐवज नव्हता. जो होता, तो पणाला लावून त्याने आपल्या पद्धतीचा नायक किंवा ‘प्रोटॅगॉनिस्ट’ प्रेक्षकांच्या गळ्यात उतरवला. त्यानंतर त्याची आवर्तनं करत राहणं सोपं होतं. पण, तो चाकोरीचा मार्ग त्याने नाकारला. एक तगडं रफटफ व्यक्तिमत्त्व, बाह्यजगातही तशीच प्रतिमा, जरबदार आवाज, खदिरांगार ओकणारे डोळे, या सगळ्या बलस्थानांच्या ‘मर्यादा’ ओलांडून वेगवेगळ्या भावच्छटांच्या भूमिका साकारण्याचं वेडं धाडस हा माणूस करत राहिला आणि वारंवार जिंकत राहिला…

त्यात काही फारसं आश्चर्य नाही म्हणा…

कारण, या माणसाला रुपेरी पडद्याचा कॅनव्हास मिळाला असता नसता तरी तो असाही लार्जर दॅन लाइफ आहे… म्हणूनच तो आपल्या टर्मवर सिनेमे करतो… रंगभूमीवरून तावून सुलाखून आलेले मराठी कलावंत हिंदीतल्या कलावंतांच्या बरोबरीचे नव्हे, तर त्यांच्यापेक्षा सरस आहेत, असं मानून आपल्या प्रत्येक सिनेमात शक्य तिथे मराठी कलावंतांची वर्णी लावतो… त्यांचा गॉडफादर बनण्याच्या भानगडीत न पडता… तो कधी पार्ट्यांमध्ये दिसत नाही… अॅवॉर्ड फंक्शनला जीन्स आणि साधं शर्ट घालून जातो… शक्य तेवढा काळ मुंबई सोडून दूर शेतावर राहतो… आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना उभारी देण्यासाठी काम करतो… आपल्याला आवडेल त्या कामासाठी हातात आहे ते वाटून मोकळा होतो…

…याचं आत-बाहेर वेगळं, झाकलं-पाकलेलं फारसं काही नाही… नसावं.

काही संस्थांतर्गत कारणांमुळे २००० सालाच्या आसपास मटामधली माझी चित्रपट-परीक्षणाची कारकीर्द संपुष्टात आली. मी पुन्हा पत्रकारितेतल्या मुख्य ‘धारे’ला लागलो… त्यानंतर एक दिवस फोन खणखणला… नेहमीची प्रेमळ हाक ऐकायला आली… पलीकडे नाना होते… ते म्हणाले, ‘अरे, तू का नाही लिहितेयस सिनेमावर? तू लिहिलं पाहिजेस. मी बोलू का तुझ्या संपादकांशी? मित्र आहे तो माझा...’ आपण घाम गाळून, रक्त ओतून बनवलेल्या सिनेमाची कधीतरी ‘यशवंत व्याख्यानमाला’ म्हणून संभावना करणाऱ्या परीक्षणकर्त्याशी ते हे बोलत होते… मला भरून आलं… म्हटलं, ‘असं काही करू नका, त्याची गरज नाही. तुम्ही मला हा फोन केलात, ही पावती फार मोठी आहे; त्यापलीकडे आता आणखी काय हवं?’

आता ती वाट खूपच मागे पडली… आताच्या वाटेवर नानांची भेट होत नाही.

पण चुकून कधी भेट झालीच की, ती जणू मागील पानावरून पुढे अशी सहजपणे सुरू होणार याची खात्री आहे. नाना आपल्यापासून फार दूर नाहीत, फक्त एका फोनच्या अंतरावर आहेत, असंच वाटत असतं कायम. मलाच का, महाराष्ट्रातल्या कितीतरीजणांना हा असा अदृश्य आधार वाटत असेल या माणसाच्या आसपास असण्याचा.

हा गौरवग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर कधी ना कधी माझा फोन खणखणेल आणि ती प्रेमळ साद ऐकू येईल… ‘मुक्या भडव्या…’

मी वाट पाहतोय.

.............................................................................................................................................

नाना पाटेकर यांच्याविषयीच्या या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4445

.............................................................................................................................................

लेखक मुकेश माचकर ‘बिगुल’ या न्यूज पोर्टलचे संपादक आहेत.

mamanji@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......