एका कुरुंदकराने दुसऱ्या कुरुंदकराला वाहिलेले अर्घ्य
ग्रंथनामा - आगामी
राम शेवाळकर
  • ‘संगत नरहरची’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 13 July 2018
  • ग्रंथनामा Granthnama संगत नरहरची Sangat Narharchi मधू कुरुंदकर Madhu Kurundkar

‘संगत नरहरची’ या मधु कुरुंदकर यांच्या पुस्तकाची तिसरी आवृत्ती येत्या १५ जुलै रोजी साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. (कै.) विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्याविषयीच्या हृद्य आठवणी सांगणाऱ्या या पुस्तकाला ज्येष्ठ लेखक (कै.) राम शेवाळकर यांनी लिहिलेली प्रस्तावना...

.............................................................................................................................................

मराठवाडा हे मराठीचे माहेरघर. मराठी या प्रदेशामध्ये रांगली, बाळसली, वाढली. तिच्या शैशवाचे लोभस विभ्रम इथेच प्रगट झाले. तिच्या यौवनाच्या मोहक लीलाही इथेच बहरून आल्या आणि भगवेपणाकडे कलणारे परिपक्व प्रौढत्वही इथेच प्रभावी झाले.

मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याचेही असेच एक अनन्यसाधारण वैशिष्ट्य आहे. मराठी भाषेची कूस धन्य करणारे महत्त्वाचे सारस्वतकार परभणी जिल्ह्यातच होऊन गेले, असा परभणीकरांचा रास्त दावा असतो. हैदराबाद संस्थानातील मराठीच्या अभ्यासकांची व अध्यापकांची गंगोत्री मानल्या गेलेल्या डॉ. नांदापूरकरांचा परभणी जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा हा एक अभिमानास्पद मर्मबिंदू होता. त्यासाठी ते प्राचीन व अर्वाचीन सारस्वतकरांची एक यादीच वेळोवेळी उद्धृत करीत असत. त्या यादीत कासार बोरीचा भास्करभट्ट कवीश्वराचार्य, नरसीबामणीचा नामदेव, गंगाखेडची जनाबाई यांचा उल्लेख असेच; पण परतूरजवळच्या जाम येथील रामदासांचाही उल्लेख असे. अर्वाचीन काळातील बी. रघुनाथ, नांदापूरकर, कहाळेकर, कस्तुरेशास्त्री वसेकर अशी नावे गौरवाने उच्चारली जात. त्यात नंतर त्यांच्याच सख्ख्या भाच्याच्या नावाची भर पडली. एवढे नव्हे, तर पुढे-पुढे ते नाव इतके उजळत गेले की, केवळ परभणी जिल्ह्यानेच नव्हे तर, बृहन्महाराष्ट्राच्या विचारविश्वाने ते नाव गौरवाने डोक्यावर घेतले. काही दिवसांपर्यंत अख्ख्या मराठवाड्याशीच त्या नावाचे समीकरण झाले. अध्यापन, साहित्य, समीक्षा, सौंदर्यशास्त्र, तत्त्वज्ञान, राजकीय विचार, चित्र, नाट्य, संगीत आदी कला, समाजवादी चळवळ, राष्ट्रसेवा दल- अशा विविध विषयांशी निगडित म्हणून ते नाव महाराष्ट्रभर अखंड दुमदुमत राहिले. नावाबरोबर त्यांच्या लेखणीने व रसवंतीनेही अवघा मराठी प्रदेश सतत निनादत ठेवला. ते नाव धारण करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाने वैचारिक प्रबोधनाच्या उद्देशाने सर्व मराठी जग पुन: पुन्हा पायाखाली घातले. सर्व महाराष्ट्र त्यांच्या या ज्ञानदायक व विचारप्रवर्तक संचारासाठी आतुर असायचा.

असे हे विक्रमी नाव म्हणजे नरहरी कुरुंदकर. आपल्या बुद्धिमत्तेने, व्यासंगाने, मूलगामी चिंतनाने व आत्मविश्वासपूर्ण प्रतिपादनाने अवघ्या मराठवाड्याचे वैचारिक वाङ्मयीन व सांस्कृतिक नेतृत्व कुरुंदकरांनी आपल्याकडे घेतले. मराठवाड्यातील राजकीय कार्यकर्ते- एवढेच नव्हे तर, राज्यकर्तेसुद्धा कुरुंदकरांच्या या वाढत्या प्रभावाची दखल घेऊ लागले. उर्वरित महाराष्ट्रालाही मराठवाड्यातील विवेकाचा प्रवक्ता म्हणून कुरुंदकरांना मान्यता द्यावी लागली. अवघ्या महाराष्ट्राचे वैचारिक नेतृत्व करू शकण्याची क्षमता असलेल्या कुरुंदकरांनीही इतरत्र मराठवाड्याचे प्रतिनिधित्व करण्यास कमीपणा मानला नाही. काही वेळा त्यांचा हा पवित्रा अंगाशीही आला. त्यांना त्यापायी वादळाला व अपकीर्तीला तोंडही द्यावे लागले. फार मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

कुरुंद्यासारख्या एका लहान खेड्यातील एका घराण्याचे नाव या माणसाने निरंतरासाठी उजळ केले. वसमतसारख्या एका छोटेखानी तालुक्याच्या गावाला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर अधोरेखित केले. अकल्पित वाटावी अशी ही उत्तुंग गरुडझेप या माणसाला कशी साध्य झाली, याबद्दलचे कुतूहल कुरुंदकरांबद्दल आस्था बाळगणाऱ्या सर्वांमध्ये असणारच. ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने या व्यक्तिमत्त्वाची घडण कोणत्या वातावरणात व कशी झाली याचे आलेखन कुणा तरी समीपस्त जिव्हाळ्याच्या मित्राने करायला हवे. मधु कुरुंदकर यांचा प्रस्तुत प्रयत्न म्हणजे त्या दिशेने पडलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.

मधु कुरुंदकर हे तसे चरित्रनायकाच्या नातेसंबंधातील एक घटक होत. पण दोघेही समवयस्क असल्यामुळे दोघांचे संबंध नात्यापेक्षा मैत्रीचेच राहिले. त्यामुळे चरित्रनायकाच्या व्यक्तित्वाचा विकास लेखकाला अगदी जवळून न्याहाळता आला. चरित्रनायकाचे लहानपणीचे रूप, वेश, सवयी, आवडी, लकबी व वागणे-बोलणे याचे निरीक्षण तर त्याने केलेच; पण तेव्हापासूनच इतर चारचौघांपेक्षा असलेल्या त्यांच्या वेगळेपणाची दखलही घेतली. लहानपणी समकालीनांमध्ये अशा वेगळेपणाचे स्वागत फारसे आपुलकीने वा सहानुभूतीने केले जात नसे. या लोकविलक्षण वागण्या-बोलण्याचे वर्णन चक्रमपणा, विक्षिप्तपणा, शिष्टपणा, गर्विष्ठपणा अशा लोकमान्य शब्दांनी केले जाते. तसेच ते चरित्रनायकाचेही केले गेले असणार. आपल्या पुरुषार्थाने जगातील आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान कालांतराने सिद्ध व प्रस्थापित झाल्यावर ही सर्व लोकप्रिय वर्णने नंतर फिरवून घेतली जातात व त्यांना गौरवाची कांती चढते.

या पुस्तकाचा बव्हंशी भाग दोघांच्याही विद्यार्थी वयातील घटनांचा तपशीलवार मागोवा घेण्यात रंगलेला आहे. हैदराबादमध्ये पोलिसी कारवाई झाली, त्या वेळी दोघांचीही विद्यार्थीदशा संपत आलेली होती आणि इंटर सायन्सच्या परीक्षेला पुन: पुन्हा बसण्याचा सराव तेवढा चालू होता. दोघांचीही लग्ने झाली व स्वत:च्या जीविकेचा शोध घेण्याची जबाबदारी दोघांवरही पडली. त्यानंतर हे सौहार्दाचे सहजीवन स्वाभाविकपणेच विरळ होत गेले. प्रत्येकाच्या आयुष्याची स्वतंत्र विश्वे तयार झाल्यावर येणारा औपचारिकपणा, शुष्कपणा व दुरावलेपणा दोघांच्याही संबंधांत आला. इथपर्यंतचे वर्णन लेखकाने अतिशय समरसून व जिव्हाळ्याने केले असल्याने ते नेटके उतरले आहे. दोघांच्याही संबंधात अंतर उत्पन्न झाल्याच्या अप्रिय वास्तवाची सविस्तर कारणमीमांसा करण्याची आवश्यकता लेखकाला वाटली नाही. कुरुंदकरांच्या वाढत्या वयातील बदलत्या मानसिकतेचा शोध त्यातून लागता येणे शक्य होते.

आपापले वैयक्तिक व कौटुंबिक जिव्हाळे निर्माण झाल्यावर कोवळ्या वयातील भाबडा ओलावा आपोआप विरून जातो. कित्येकदा एखाद्या असामान्य पुरुषाचे वाढते कर्तृत्वही तोपर्यंतच्या संपर्कातील सोबत्यांना दूर ठेवत जाते. पुष्कळदा अशा तेजस्वी माणसाच्या उत्कर्षामुळे लहानपणच्या सवंगड्यांच्या मनात न्यूनगंड उत्पन्न होतो. क्वचित मत्सर व असूयाही जागृत होते. काही वेळा कर्तृत्ववान यशवंतांच्या अहम् संतुष्ट वागण्यामुळेही जवळची हळवी माणसे दुखावली जातात. तसेच अशा असामान्यांचे वाढते तेज जवळच्यांना मानवेनासे होते. त्याच्या कर्तृत्वाचे क्षितिज वाढत असते आणि पूर्वीच्या जिव्हाळ्याचे क्षेत्र काही प्रमाणात ओस पडत असते. ‘हा माणूस आता आपला राहिला नाही’, अशी खंत त्यातूनच उमळत असते.

लेखक व चरित्रनायक यांच्या संबंधांबाबत यापैकी वा या व्यतिरिक्त नेमके व निश्चित असे काय घडले असावे, हे कळण्यास लेखकाच्या सावध मौनामुळे आता वाव नाही. पण लहानपणापासून जेवढा कुरुंदकर आपल्याला या चित्रणातून उमगतो, तोही पुरेसा बोलका आहे. प्रभातकालीन बालसूर्याचे तेज व धगही त्यातून पुरेशी प्रगट होते. लेखकाची दृष्टी साहजिकच आपुलकीने व अभिमानाने ओथंबलेली आहे. त्यामुळे निर्लेप आकलनाची व वस्तुनिष्ठ चित्रणाची अपेक्षा करता येत नाही. अलीकडे असामान्य पुरुषांच्या वा प्रतिभावंतांच्या व्यक्तित्वाचा शोध समाजशास्त्राच्या व मानसशास्त्राच्या व्यक्तित्वाच्या साह्याने घेतला जाण्याची प्रथा रूढ होत आहे. त्यामुळे असामान्यपणाच्या भरजरी कवच्याआडचा निखळ माणूस समजून घेणे सोपे जाते. मधु कुरुंदकरांच्या या प्रयत्नांमुळे ही वाट आता रहदारीसाठी उपलब्ध झाली आहे. अधिक धिटाईने व आत्मविश्वासाने व्हावयाच्या व्यक्तिशोधाची आशा त्यामुळेच बाळगायला हरकत नाही.

चरित्रनायकाचा चतुरस्र अभ्यास स्वतंत्र व मौलिक चिंतन, अतीतातील वा वर्तमानातील घटितांचा आगळा अन्वयार्थ लावण्याची क्षमता व तो नेमकेपणाने मांडता येण्याजोगा उद्दाम आत्मविश्वास या सर्व गुणवैशिष्ट्यांचे बीजारोपण व विकसन लेखकाने रेखीवपणाने टिपले आहे. कुरुंदकरांचा लोकसंग्रह व आपल्या माणसांसाठी आपणहून झीज सोसण्याची तयारी हे गुणही बाल्यावस्थेतही विद्यमान होते, हेही त्यांनी विविध प्रसंगांमधुन स्पष्ट केले आहे. स्वातंत्र्यानंतर नक्षलवादी असल्याच्या संशयापोटी आडमुठ्या पोलीस यंत्रणेकडून आठवडाभराची जेलयात्रा घडली, हा प्रसंग मलाही नवा वाटला. मानवेंद्रनाथ रॉय यांना शंका विचारण्याची आठवणही मला अज्ञात होती. या बाबतीत कॉम्रेड रॉय व डॉ.राममनोहर लोहिया या दोन नावांबद्दलची गल्लत माझ्या मनात अद्यापही आहे.

मधु कुरुंदकर हे कवी व लेखक म्हणून संपूर्ण कुरुंदकर परिवारात पहिल्यांदा प्रसिद्धीच्या प्रकाशात आले. ‘भृंगराज कुरुक्षेत्री’ या टोपण नावाने त्यांनी सुरुवातीला काव्यलेखन केले. मधु कुरुंदकर असे त्यांचे सुटसुटीत नामकरण करण्याचे श्रेय अनंत भालेरावांचे. काव्यलेखनाबद्दल भालचंद्र महाराजांची प्रतिक्रिया कळण्याचा व त्यांच्याच धर्तीची संख्येने दुप्पट कविता रातोरात नरहरी कुरुंदकरांनी रचून दाखवल्याचा प्रसंग लेखकाने चित्रमय पद्धतीने रंगविला आाहे. एकूणच, त्यांचे चरित्रलेखन हे कादंबरीसारखेच चित्तवेधक उतरले आहे.

कुरुंदकरांसारखी माणसे आकलनाच्या बाबतीत नेहमी आव्हानच ठरत असतात. सर्व बाजूंनी मनाजोगे रेखाटूनही शेवटी मन असंतुष्टच राहून जाते. कारण काही अंगे व पैलू आकलनाच्या चाळणीतून निसटूनच गेलेले असतात. तरीपण असे आव्हान स्वीकारणे हे एक साहस असते. ते पत्करल्याबद्दल व पेलण्याची आकांक्षा इतरांमध्येही उत्पन्न करण्याची प्रेरकता अक्षुण्ण ठेवल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच.

एका कुरुंदकराने दुसऱ्या कुरुंदकराला वाहिलेले हे अर्घ्य वाचकांनाही हृद्य वाटेल, अशा विश्वास वाटतो.

.............................................................................................................................................

‘संगत नरहरची’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4444

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......