‘दीड दमडी’च्या वाचकवर्गाला ‘सेव्हिंग ग्रेस ऑफ ह्यूमर’चा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही!
ग्रंथनामा - झलक
प्रभाकर बागले
  • ‘दीड दमडी’ या पुस्तकांची मुखपृष्ठं
  • Fri , 06 July 2018
  • ग्रंथनामा झलक दीड दमडी श्रीकांत बोजेवार

‘महाराष्ट्र टाइम्स’मधील ‘दीड दमडी’ हे श्रीकांत बोजेवार यांचं लोकप्रिय सदर नुकतंच रोहन प्रकाशनातर्फे पुस्तकरूपानं प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ समीक्षक प्रभाकर बागले यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

त्याची वस्तू दीड दमडीची नाही, पण त्याचा रुबाब पाहा! वस्तूचा क्षुल्लकपणा, नगण्यपणा लक्षात आणून देण्यासाठी दीड दमडी हा शब्द फार पूर्वीपासून प्रचलित आहे. वस्तुसंबंधीचा हा शब्दप्रयोग अनेकदा व्यक्तीच्या क्षुल्लक प्रवृत्तीचा निर्देश करण्यासाठी वापरला जातो. असा नित्याचा आपला अनुभव असतो. पण अशा वास्तवाला जेव्हा सृजनशील लेखकाचा स्पर्श होतो. तेव्हा त्या वास्तवाचं रूपांतर होऊ लागतं. ते रूपकात्मतेच्या स्तरावर जात असतं. वास्तवाचं हे रूप वाचकाला आनंद देतं.

भोवतालात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात अनेकानेक घटना घडत असतात. या सगळ्यांच्यामध्ये माणूस असतो. त्या घटना त्यालाही नकळत घडवत असतात. वर उल्लेखिलेल्या क्षेत्रांची काहीएक अवस्था असते; तिचे संकेत असतात. त्या संकेताबरहुकूम मानवी व्यवहार सुरू असतो. त्याचे काही नमुनादर्श अस्तित्वात आलेले असतात. त्यांचा भंग झाला की, विसंगती निर्माण होते. राजकारणाच्या भूमीत विसंगतीचं पीक नेहमीच जोमदार राहिलेलं आहे. सत्ता टिकवण्यासाठी सत्याची लपवाछपवी सुरू असते; तिच्यासाठी अंतविरोधी विधानं केली जातात, ती आपण केलेलीच नाहीत, असं नंतर म्हटलं जातं. आणि असं म्हणत असताना आपण एका नव्याच विसंगतीला अस्तित्वात आणत असतो हे त्याच्या गावीही नसतं. आणि असेच राजकारणग्रस्त राजकीय नेते समाजात आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करताना दिसतात. आणि शब्द कृती यांच्यातील अंतर वाढतं ठेवतात. या वाढत्या स्पेसमध्ये विसंगतीला मोठा वाव असतो.

अशा विसंगतींना टिप कागदासारखं टिपणारे, स्वतंत्र दृष्टी असणारे, विनोदाचा गाभा जपणारे, या गाभ्यांचा - करुणालक्ष्यी गांभीर्यात असतो याचं भान ठेवणारे, आपल्या आविष्कारातच विसंगतीला विरचित (deconstruct) करून समाजस्वास्थ्यासाठी संगतीपूर्ण रचनेचं महत्त्व सूचित करणारे आणि या कामासाठी सशक्त विनोद उपरोधाचा वापर करणारे लेखक कमी असतात. अशा लेखकात श्रीकांत बोजेवार हे एक महत्त्वाचं नाव आहे.

पत्रकारितेच्या विश्वास राहणं म्हणजे एका अर्थानं चौफेर वर्तमान जगणं. अंगावर येणारे आय.टी.चे झोत स्वीकारत त्यांचं व्यवस्थापन करणं, सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी त्याचा अनुबंध अधोरेखित करणं, स्वत:ला अद्ययावत ठेवणं. पण त्याचबरोबर आपण ज्या वर्तमानात जगतो आहोत तो वर्तमानकाळ भूतकाळाचे अंश स्वीकारत आलेला आहे याचंही भान त्या पत्रकाराला ठेवावं लागत असतं. पण प्रामुख्यानं जीवनसंबद्ध राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात जे नवप्रवाह आलेले असतात त्यांचं सजग भान त्याला असावं लागतं. आणि ती स्वत:ला व्यक्त करत असल्यामुळं भाषा या माध्यमातील वाक्वळणांच्या नजाकतीशी नातं टिकवावं लागतं आणि त्यासाठी साहित्याचं वाचन अपरिहार्य ठरतं. ही पूर्वतयारी महत्त्वाची असली तरी पुरेशी नसते. विनोद ही संज्ञा सार्थ करण्यासाठी, विनोदी लेखन करण्यासाठी विनोदी संवेदन (instinct) असावं लागतं. या संवेदनेत हास्याची बीजं असतात. त्यांच्यासाठी आतुर असतात. या दोहोंच्या आंतरसंबंधातून हास्याचं कारंजं निर्माण होतं.

अशा पूर्वतयारीनिशी आणि उपजत विनोदी संवेदनेनिशी ‘दीड दमडी’मधलं लेखन झालेलं आहे असं ते वाचत असताना जाणवत राहतं. आणि ‘टवाळा आवडे विनोद’ हे परंपरानिष्ठ शब्द पुसले जातात. हा लेखक महत्त्वाच्या घटनांकडे कसं पाहतो ते समजून घेण्यासारखं आहे. कारण प्रत्येक घटनेभोवती अनेक संदर्भ स्पंदन पावत असतात. कधी ते कृती-उक्तीमधील विसंगतीतून निर्माण झालेले असतात, तर कधी मानवी वर्तन व्यवहाराला प्रभावित करणाऱ्यांमधील हेतूंच्या विसंगतीमधून निर्माण झालेले असतात. त्यातले काही हेतू प्रकट होतात तर काही लपवले जातात. हेतूंच्या या ‘उघड झाक’ क्रीडेतील विसंगतीकडे सूक्ष्मपणे पाहणारा हा लेखक आहे. त्यातूनच माणसाला वाचायची आणि त्याला आविष्कृत करायची एक रीतच त्यानं अस्तित्वात आणलेली दिसते. पण त्यानं तिचा साचा होऊ दिला नाही. कारण त्याची एक धारणा अशी दिसते की, मानवी स्वभावातील विसंगतीच्या तळाशीच एक उपजत असं विनोदी संवेदन सुप्त स्वरूपात पडलेलं आहे. आणि विसंगतीपरत्वे त्यात विविधता असतो. त्यामुळे त्या रीतीचा साचा होण्याची शक्यता जवळपास नसतेच, या धारणेचं भान हा लेखक सतत बाळगताना दिसतो. म्हणून तर ’दीड दमडी’मधील प्रत्येक तुकड्यात त्याचं स्वभावत: विनोदी असलेलं संवेदन वेगवेगळी रूपं घेताना दिसतं. इतकंच नव्हे त्याचा एक रूपकात्म ‘दगड’ किती पक्षांना स्पर्श करतो ते पाहण्यासाठी ‘मनमोहन सिंग लापता...’ या शीर्षकाचा एक तुकडा उदाहरण म्हणून लक्षात घेता येईल.

प्रस्तुत पुस्तकाच्या ‘सामाजिक’ विभागात ‘रेषावसान’ हे एक रचित आहे. खरं म्हणजे रेषावसानसाठी रचित हा शब्द वापरणं म्हणजे त्यावर अन्याय करण्यासारखं आहे. इतकं भावगर्भ व्यक्तित्व त्याला मिळालेलं आहे. लेखकाच्या सामाजिक जाणिवेचं प्रत्ययकारी रूप तिथं आहे असं वाटत राहतं. या सामाजिक जाणिवेचा आणि सतत वाजतगाजत राहणाऱ्या ‘सामाजिक बांधिलकेशी’ संबंध नसावा असं तत्काळ त्याच्या अभिव्यक्तीच्या प्रवाहीपणातून लक्षात येतं. आर.के. लक्ष्मणच्या पार्थिव रेषेनं वर्तणान वास्तवातल्या विसंगतींना समाजाच्या दोरीवरच वाळू घातलं. पण समाजाची दोरीएवढी कोडगी की विसंगतींना वाळू घालायला मी जागा दिली असं ती म्हणू लागली.’ हा तिचा कोडगेपणा लक्षात घेऊन आर.कें.नी आपल्या रेषेला परजलं, पन्नास वर्षं आपलं टोकदारपण टिकवलं. एवढंच नव्हे तर रेषेच्याच अंगानं तिच्या सोबतीनं रेषातीत प्रदेशाचा शोध घेतला, अमूर्ताला समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण अमूर्ताचं आकलन रूपित करायचं तर कलावंताला - आर.कें.ना रेषा या माध्यमाकडे अढळपणे यावं लागलं. याचा अर्थ असा की, त्यांची रेषा साधी नाही. ती रेषा आपलं रेषातीतपण जपणारी आहे. श्रीकांत बोजेवारांनी – ‘रेषावसान’मध्ये हे रेषातीतपण आत्मसात केल्याचं जाणवतं.

म.टा.मधील ‘दीड दमडी’ या सदराची वाचक आतुरतेनं वाट पाहत असतो. एखाद्या घडून गेलेल्या घटनेचा गाभा त्यात असतो. तो एकाच वेळी विनोदी, उपरोधिक, गंभीर, फँटसीयुक्त, सृजनसंपृक्त असा असतो. आपला भोवताल आणि राजकीय वास्तव इतकं गंमतीचं आणि गुंतागुंतीचं आहे की, ते व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या डिव्हायसेसची - आविष्कार रीतीची मागणी करत असतं. जो लेखक ही मागणी पूर्ण करतो, ती पूर्ण करत असताना नव्या डिव्हायसेसची निर्मिती करतो त्यालाच त्या त्या घटिताचे पदर उलगडता येतात. श्रीकांत बोजेवारांच्या लेखणीत ती सृजनशील क्षमता आहे. ही क्षमता आणि फॅन्टसीशी अंगसंग करणारी कल्पकता त्यांच्याकडे असल्यामुळं ते मुखवट्यांना दोरीवर वाळू घालू शकतात, वटवाघुळासारखं शीर्षासन करवू शकतात. पण याचा अर्थ त्यांच्या लेखणीला गांभीर्याचं वावडं नाही. ते त्याला आपल्या औपरोधिक विनोदात घोळत ठेवतात. त्यामुळं गांभीर्याकडे पाहण्याची त्यांची स्वत:ची रीत अस्तित्वात आलेली दिसते आणि त्यामुळंच त्यांच्या विनोद-उपरोधाची धार कधी बोथट होत नसावी. आणि मुख्य म्हणजे ते गांभीर्य आपल्या स्वत्वाचा त्याग न करता विनोद उपरोधाला आशयघन करणारं दिसतं.

साहित्य संस्कृती या विभागातील प्रत्येक घटित वाचनीय झालेलं आहे. लेखकाच्या विनोदी संवेदनेच्या विविध छटा वाचकाच्या मनाला सुखावून जातात. मध्यमवर्गीय माणसाला साहित्य-संस्कृतिविषयक चर्चा आवडत असावी असं त्याच्या पृस्तरीय सहभागानं सिद्ध केलेलं आहे. पण त्याला साहित्य-संस्कृतीतील ‘अक्षर’ लेणी समजून घेण्यातील डोकेदुखी नको असते आणि या बाबत केवळ साक्षर आहोत असं इंप्रेशन - अशी प्रतिमाही नको असते. अशा प्रकारच्या इच्छावंतांनी साहित्य-संस्कृतीचा आतला आणि बाहेरचा मोठा भूप्रदेश व्यापलेला दिसतो. हा भूप्रदेश तसाच अथंग राहावा म्हणून काही तथाकथित बहुचर्चित साहित्यिकांच्या सूक्ष्म स्वरूपाचा दंभ तिथं कार्यरत असतो. याचा अर्थ विविध हितसंबंधांमुळे साहित्य बाह्य वातावरणाचं पोषण तिथं होत राहतं आणि परिणामस्वरूप तिथं सुमारपण (medioerity) साहित्यव्यवहारात दिसू लागतं. सर्जक कल्पन, प्रतिभ स्पंदन आणि आकसयुक्त विचार आदी गोष्टींना तिथून काढता पाय घ्यावा लागतो. तिथं एक पोकळी निर्माण होते. तिथं काही गमती निर्माण होतात. श्रीकांत बोजेवारांचं विनोदी संवेदन साहित्य व्यवहारातील सुमारपणापर्यंत न पोचलं तरच नवल. हे सुमारपण त्यांना बोचणारं, अस्वस्थ करणारं आहे. कारण साहित्य विश्वाविषयी त्यांच्या काही धारणा असाव्यात असं वाटतं. हे विश्व काळाचं भान विसरायला लावणारं जसं असतं तसंच कालातीत विश्वाचं, त्यातल्या वास्तवाचं नवं भान निर्माण करणारं असतं, दृष्टीचा पल्ला वाढवणावं असतं, तिला प्रगल्भ करणारं असतं. स्वत:च्या अशा धारणांच्या पार्श्वभूमीवर जेव्हा ते त्यांच्या भवतालाकडे पाहतात साहित्यावरील चर्चेची दांभिक वैयक्तिकता लक्षात घेतात तेव्हा साहित्याला दिलं जाणारं दुय्यमपण हे शेवटी सुमारपणाचं लक्षण असतं.

या सुमारपणाचं प्रातिनिधिक रूप आपल्याला... म्हणजे भाजीवालीही ‘हिंदू’ वाचेल या एपिसोडमध्ये पाहायला मिळतं. हास्य निर्माण करणारं हे एक सुंदर रचित आहे. साहित्य आणि संस्कृतीच्या विश्वात मठ कंपूशाही फार सराईतपणे राजकारण करताना दिसते. भल्या-भल्या राजकीय नेत्यांना चीत करणारं असं ते राजकारण असतं. राजकीय नेत्याचा मुखवटा १०-१५ मिनिटातच त्याच्या बोलण्यातून दिसू लागतो. साहित्यिकाचा मुखवटा सहज लक्षात येत नाही कारण तो त्याच्या त्वचेचा भाग झालेला असतो. त्यामुळे भोळेभक्त आकर्षित होतात. त्या साहित्यिकाच्या आगेमागे वावरत असतात. भो.भ.ची. संख्या वाढत राहिली की, त्या साहित्यिकाची उंची वाढत राहते. मग त्यांच्यामधल्या संवादांना साहित्यमूल्य प्राप्त होत जातं. त्या साहित्यमूल्यावर चर्चासत्रही घेतले जातात.

श्रीकांत बोजेवारांनी अशा परिदृश्यातून एक इक्वेशनच कल्पिलेलं दिसतं. ज्ञानपीठ मिळालेले नेमाडे आणि भो.भ. यांच्यामधील संवादातून ते इक्वेशन त्यांनी उलगडत ठेवलं आहे. त्यासाठी एक भो.भ. नेमाडेंची मुलाखत घेतो आहे. त्याच्या ज्ञानाविषयीच्या अनावर तहानेनं ती मुलाखत घ्यायला प्रवृत्त केलेलं दिसतं. सराईत नेत्या करून भो.भं.ना गुंतवून ठेवण्याचा स्वभाव आणि भो.भ.चा अंगभूत स्वभाव. या दोन स्वभावांमधली जुगलबंदीमधून हा एपिसोड आकारीत झालेला दिसतो. ‘हिंदू’ची जनआवृत्ती येत आहे हे एक केवळ निमित्त. या लेखकाला एक निमित्तच हवं असतं. मग त्याचं विनोदी संवेदन त्याच्या कल्पक तळ्यात वर्तुळं निर्माण करू लागतं. आणि ती अर्थपूर्ण वर्तुळं हास्यात विसर्जित होतात.

‘दीड दमडी’मधील प्रत्येक भाग वाचकाला हसवत राहतो. हसवत हसवत त्याला तो कधी अंतर्मुख करतो, कधी विचार करायला प्रवृत्त करतो, कधी एक नवी जाणीव त्याच्या पदरात टाकतो. पण हा लेखक अशा काही उद्देशानं हा लिहित नाही. घडलेली घटना, पाहिलेलं दृश्य, वृत्ती-प्रवृत्तीतील विसंगती, उक्ति-कृतीमधील चमत्कारिक अंतर अशा अनेक मानवी कृतींकडे स्वत:च्या नजरेनं पाहतो. आणि या नजरेतच त्याचं अंगभूत असं विनोदी संवेदन काम करताना दिसतं आणि त्यातून त्याच्या लेखनाचा पोत आकार घेताना दिसतो. त्याकडे समठातेनं पाहिलं तर त्या पोतावर त्याच्या अंगठ्याची मुद्रा दिसेल - सहीपेक्षा ऑथेंटिक पृथगात्म अशी.

असं म्हणण्याचं कारण असं की, काही एपिसोड काव्यात्म अंगानं जाणारे आहेत. कवितेला एक शब्द कमी चालत नाही की एक अधिक. तिची बंदिश स्वयंपूर्ण असावी लागते. पण ती स्वयंपूर्णता आशयगर्भ असल्यामुळं स्वाभाविकपणे प्रसरणशील राहते. काही एपिसोड वाचकाच्या मनात बहुविध संदर्भ जागवणारे आहेत आणि त्या संदर्भासह हसविणारे आहेत. या अर्थानं या भागांमधील विनोद आविष्कारक आहे. म्हणून या लेखकाच्या विनोदाकडे संकेतनिष्ठा विनोदी दृष्टीनं पाहता येणार नाही असं वाटतं आणि दुसरी गोष्ट अशी की, हा लेखक आपल्या भवतालाच्या आजच्या आणि आत्ताच्या मानवी जीवनाचं आणि स्वभावाचं निरीक्षण करत प्रस्थान ठेवणारा आहे. ज्याची ग्राउंड रिअलिटजवर मांड चांगली असते तोच विसंगतीच्या गल्लीबोळात आत्मविश्वासानं फिरू शकतो. तिथं जीवनाचं मोल आणि मूल्य त्याला सापडत असतं. विनोदी संवेदन असणारा हा लेखक या मोल आणि मूल्यासकट स्वत:ला व्यक्त करणारा आहे.

जीवनविषयक प्रश्न नेहमीच गंभीर असतात. त्या प्रश्नांना शरीर-मनाला कुरतडू द्यायचं की, saving grace of humourकडे वळवायचं हे शेवटी ज्याचं त्याला ठरवावं लागतं. या लेखकानं आविष्काराच्या अन्य माध्यमांचा जसा स्वीकार केला तसा विनोदी माध्यमाचाही केला. ग्रेसेस या शब्दाला ग्रीक पुराणात विशिष्ट अर्थ आहे, त्या तीन देवता आहेत. त्या सौंदर्य, मोहकता आणि सुख या गुणांचं त्या रक्षण करणार्‍या आहेत असं समजलं जातं. विनोदाचं सामर्थ्य ज्यांना ज्यांना मूलभूतपणे जाणवलं त्यांनी कदाचित ‘saving grace of humour’ असा शब्दप्रयोग अस्तित्वात आणला असेल.

म्हणून असं म्हणावंसं वाटतं की, ‘दीड दमडी’च्या वाचकवर्गाला ‘सेव्हिंग ग्रेस ऑफ ह्यूमर’चा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. आणि तरीही अनेकांनी व्यक्त केलेली खंत मलाही व्यक्त करावीशी वाटते. जीवनाच्या साहित्य कलेच्या व्यवहारात विनोदाला आपण दुय्यम लेखत असतो. त्याला एक स्वतंत्र अस्तित्व असतं ते आपल्या गावीही नसतं. शिक्षणाच्या कोणत्याच स्तरावर त्या दृष्टीला अस्तित्व नसतं. त्या दृष्टीच्या बीजाला आपल्या करंटेपणामुळं मातीच्या क्षमतांचा स्पर्शच लाभला नाही. तो स्पर्श लाभला तर ‘दीड दमडी’ अस्तित्वात येऊ शकते, स्पर्शानुभूतीचं एक वेगळं विश्व वाचकांच्या मनात उभं राहू शकतं, निर्मळ आनंदाचा तो धनी होऊ शकतो.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4437

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......