काव्यलेखन :  ग्राहक नसलेली एक उच्चभ्रू टूम
ग्रंथनामा - झलक
अशोक चोप्रा
  • ‘रोचक आठवणींची पाने’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि लेखक अशोक चोप्रा
  • Fri , 22 June 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक रोचक आठवणींची पाने Rochak Athwaninchi Pane अशोक चोप्रा Ashok Chopra A Scrapbook of Memories अ स्क्रॅपबुक ऑफ मेमरीज

अशोक चोप्रा यांनी तब्बल चाळीस वर्षं भारतात वेगवेगळ्या इंग्रजी प्रकाशनसंस्थांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले, खुशवंत सिंग, शोभा डे, सलमान रश्दी अशा अनेक मान्यवर लेखकांच्या पुस्तकांचे संपादन केले. त्यांचे ‘A Scrapbook Of Memories’ हे आठवणीपर इंग्रजी पुस्तक  २०१५मध्ये प्रकाशित झाले. बरेच गाजलेही. त्याचा अलीकडेच ‘रोचक आठवणींची पाने’ या नावाने ज्योत्स्ना नेने यांनी मराठी अनुवाद केला आहे. इंडस सोर्स बुक्सतर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकातल्या एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

कविता लिहिणे ही उच्चभ्रूंमध्ये एक फॅशन आहे. त्यावर त्यांची काहीही अपेक्षा नसते. गेल्या कित्येक वर्षांदरम्यान मी किती मित्र गमावले आहेत, त्यांची गणतीही ठेवणे शक्य नाही. कारण काय, तर त्यांनी आणलेल्या त्यांच्या पत्नीच्या किंवा मेहुणीच्या कविता छापायला मी नकार दिला. अगदी त्यांच्याकडून त्या उत्तम असल्याचे शिफारसपत्र ऐकल्यानंतर देखील! अर्थात त्यांना तसे म्हणावेच लागते, हे मीही ओळखून आहे! खूप वर्षांपूर्वी माझ्या एका बालमित्राने मला पेयपानासाठी आमंत्रण दिले. तिथे त्याच्या पत्नीने मला सांगितले, “माझ्या भाचीने तुमच्याबद्दल इतकं ऐकलंय म्हणून सांगू-” आणि त्याच क्षणी ती भाची प्रवेशते, “तिला तुम्हाला अगदी भेटायचंच होतं.” यावर ती १५ वर्षीय कन्या सांगितल्याबरहुकूम ‘हॅलो’ म्हणून ‘अंकल’चा मान राखते. “तर तुम्ही तिच्या कविता एकदा वाचूनच पहा. फारच सुंदर आहेत. अगदी सहज सुचतात तिला. बेटा, आण ना. दाखव तुझी वही अंकलना-” आणि माझ्या तोंडातले ड्रिंक साफ कडू होते!

“परंतु आम्ही कविता प्रकाशित करीत नाही.” मी चाचरतो.

“का म्हणून? केकी दारूवालांचं पुस्तक- आणि निस्सीम – काय बरं त्याचं नाव (म्हणजे निस्सीम इझिकेल बरं का!) त्याचंही पुस्तक तुम्हीच केलं ना?” आता यावर मी काय बोलणार? फक्त झाले असे की, त्यानंतर त्यांचा आमचा काही संबंधच राहिला नाही.

होय, इंग्लिशमध्ये कविता लिहिणे ही चक्क फॅशन आहे. कोणीही उठतो आणि कविता लिहितो, आणि बघताबघता स्वत:ला कवी की हो म्हणवतो! आणि तो कोणीही, आपला हा काव्यगुण प्रस्तुत करण्यासाठी सहज श्रोतृवर्ग मिळवतो. कोणत्याही पार्टीत किंवा समारंभात एखाद-दोन असे कवी भेटतातच. जे एखाद्या ‘योग्य’ आणि या कवितांतील खोल अर्थ समजून घेऊ शकणाऱ्या संवेदनक्षम प्रकाशकाच्या शोधात असतात.

आपल्याकडे प्रादेशिक भाषांमध्ये जागतिक दर्जाचे काव्य लिहिले जाते आहे, परंतु दुर्दैवाने काही थोड्यांनाच फक्त स्वत:मधील इंग्लिश भाषा ‘योग्य प्रकारे’ हाताळण्याचा आत्मविश्वास असतो. परंतु त्यांच्यापैकी बहुतेक कवींचे काव्य बाजारात टिकून राहण्याएवढे समर्थ नसते. अर्थातच, प्रकाशकवर्गाने अशा प्रकारची पुस्तके प्रकाशित न करण्याचे जाहीर धोरण ठेवलेले आहे. तरीही कितीतरी उमलते कवी कविता प्रसवीतच जातात!

आपणाला असा प्रश्न पडू शकतो की, इंग्रजीतील भारतीय काव्य इतके ‘उचललेले’, क्षुल्लक आणि घासलेले का असते? ती आपली भाषा नसल्यामुळे त्यात आपण पुरेशी भावना ओतण्यास असमर्थ ठरतो काय? की भारतात इंग्लिश कवितेची परंपरा नाही; कारण त्यातून काहीच निष्पन्न होत नाही म्हणून? ही दोन्ही कारणे बरोबर असावीत या अशा बापुडवाण्या प्रदर्शनामागे! याबद्दल मला सुप्रसिद्ध कवी डब्ल्यू. बी. यीटस् यांचे सुप्रसिद्ध निरीक्षण आठवते, ‘आपल्या स्वत:शीच असलेल्या कलहातून काव्य जन्मते.’ आणि त्याचेच पुढे हे असे बौद्धिक राज्यात रूपांतर होते.

कोणता भारतीय कवी टी. एस. इलियट यांच्याप्रमाणे “दोज फ्रॅगमेंट्स आय हॅव शोअर्ड अगेन्स्ट माय रिइन्स” असे म्हणू शकेल? किंवा त्यांची दुसरी पत्नी, व्हॅलरी फ्लेचर हिने नोंदविल्याप्रमाणे, ‘कवी बनण्यासाठी आपण अव्वाच्या सव्वा किंमत मोजली असे त्यांना वाटे… त्यांना त्यापायी अतिशय त्रास झाला!’ काव्यप्रतिभा उमलण्यासाठी लागणारी भावनिक वेदना अनुभवण्याच्या प्रक्रियेसाठी, आपल्या समाजातील इंग्लिश जाणणाऱ्या वर्गाचे सुरक्षित सुखवस्तू आयुष्य आणि भक्कम नातेसंबंधांतून सहज मिळणारी ऊब, हे वरदान ठरण्याऐवजी अडसरच बनतात. काळजाला भिडणाऱ्या खऱ्या वेदनेचा अनुभव त्यांना कधीच मिळत नाही. अर्थात त्यांच्या कवितांमध्ये ती भावनिक अथांगता उतरू शकत नाही. सर्व आदर्शवादाचे रूपांतर जीवनदृष्टीकडे पाहण्याच्या भावनिक लगद्यामध्ये होते आणि तोच त्यांच्या अभिव्यक्तीला अडवतो. परिणामी, त्यांच्या कवितेमध्ये नसते भावना आणि विचारात नसते असोशी.

थोडक्यात, आपल्या कवींच्या जगण्यात यातना, अव्हेर किंवा एकाकीपणा या प्रतिभानिर्मितीकारक घटकांचा अभाव असतो. त्यांच्या मनात डाचणारी काही खोल दु:खे नसतीलच असा दावा जरी मी करू शकत नसलो, तरी त्यांच्या काव्यविषयांच्या निवडीवरून मी हे अनुमान काढू शकतो. ते विषय अगदीच ठरावीक, बालिश असतात, जसे की, कौटुंबिक कलह किंवा असफल प्रेम. या दोन्ही घासून गुळगुळीत झालेल्या विषयांपलीकडे जणू आपले कवी विचारच करू शकत नाहीत! काही थोड्यांनी राजकारण्यांच्या लबाड डावांवर भाष्य केलेले दिसते, परंतु कोणीही एकाकी किंवा बहिष्कृत भावावस्था चितारलेली आढळत नाही.

हेच सर्व आपल्या प्रादेशिक कवींनी यशस्वीपणे अभिव्यक्त केले आहे, त्यामागे कारण आहे. अर्थात येथील टोकाचे दारिद्रय आणि अडचणींनी भरलेले शहरी जगणे! समाजाचा नीच चेहरा सतत पाहणाऱ्या, कफल्लक जिण्यामध्ये कराव्या लागणाऱ्या तडजोडी, हीच त्यांच्या कवितेमागची स्फूर्ती बनते आणि त्यांची कविता म्हणजे भाषेच्या परिपक्वतेची परिसीमा ठरते. त्यांचे कवन हे ‘कल्पनेलाच फायदा’ बनवून वाचकाच्या स्मृतीमध्ये कोरून ठेवते, जे गद्याच्या खळाळणाऱ्या धबधब्याखालीही अचलपणे टिकून राहते.

इंग्रजी भाषेत लिहिणाऱ्या आपल्या कवींनी अशा दरिद्री जिण्याला कायमच चार हात दूर ठेवलेले आहे. मला वाटते, त्यांना दारिद्रयाच्या त्रासांचा प्रत्यक्ष अनुभव नाही त्यामुळेच! पुन्हा एकदा, मी असेही कबूल करतो की, कुणीच तसा प्रयत्न केलेला नाही- फक्त जे नमुने माझ्या वाचनात आले आहेत ते सर्व फार वरवरचे, दारिद्रयाचे उदात्तीकरण करण्याचे प्रयत्न वाटतात आणि म्हणूनच तद्दन नकली भासतात.

आपल्या इंग्लिश कवींचे काव्यविषय फक्त पोकळ असतात असे नाही, तर त्या बहुतेकांची आपली पुस्तके छापवून घेण्यातली घिसाडघाईही त्यांचा अपरिपक्वपणाच अधोरेखित करते. काव्य हेच आधी आपल्या प्रकाशकांना दूर पळवते, कारण त्यांचे नसलेले विक्रीमूल्य. तरीही असे कवितासंग्रह प्रकाशित होतात, ते बहुधा त्यांच्या कर्त्यांनी स्वत:च्या क्षणिक औटघटकेच्या प्रसिद्धीसाठी ओतलेल्या धनराशीमुळेच. कित्येक प्रकाशही असेच दुसऱ्यांच्या द्रव्यावर जगतात आणि कित्येक कवी एखाद-दुसऱ्या कवितेच्या पुंजीवर टिमकी वाजवून घेतात. कलकत्त्यामधील पी. लाल यांची लेखकांसाठीची कार्यशाळा आठवून पाहा.

या सर्व वास्तवातून पुढे येणारे कटू सत्य हेच की, मुळात इंग्लिश कविता प्रकाशन हा भारतात एक धूर्त धंदा बनून राहिला आहे. आढ्यताखोर प्रकाशनाचे एक सर्वोत्तम उदाहरण आहे. ऐंशीच्या दशकात जेव्हा मी मॅकमिलन इंडियामध्ये काम करीत होतो, तेव्हा आम्ही एका इंग्लिशच्या प्राध्यापकांचा किमान जाडीचा (पातळसर) कवितासंग्रह प्रकाशित केला होता. त्यामागचे कारण एकच होते की, मॅकमिलनची कित्येक प्रकाशने वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये त्यांच्या शिफारशीमुळे घेतली गेली होती. तसेच आंध्र प्रदेशमधील एका इंग्लिशच्या प्राध्यापकांनीही तिकडच्या अनेक विद्यापीठांमध्ये पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या तब्बल तीन वर्षांसाठी आमची पुस्तके लावून घेतली होती. कधीही काव्यसंग्रह न छापणाऱ्या मॅकमिलनने त्यांच्या कवितासंग्रहाचे मात्र ५०० प्रतींचे छोटेखानी प्रकाशन केले होते, ज्यामुळे त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळू शकत होता. तो त्यांना मिळालाही. कारण पुरस्कार समितीच्या सरकारी अध्यक्षांच्या मुलीचे पीएच.डी.साठीचे ते मार्गदर्शक होते! तसेच एका मुद्रकाचे, जो फावल्या वेळात प्रकाशनही करीत असे. त्याने फक्त धनराशी हे एकच ध्येय पाहिले आणि अत्यंत टुकार कवितासंग्रहांचे प्रकाशन केले. कारण त्याचा कवी होता पंजाब सरकारमधील एक उच्च पदस्थ अधिकारी. त्यामुळे त्या मुद्रकाच्या पदरात सरकारी प्रकाशनांची एक भक्कमशी मागणी पुरस्कार म्हणून पडली! ‘पोएटिकल किकबॅक’ किंवा ‘काव्यगत मोबदला’ म्हणा. अशी किती उदाहरणे सांगावीत?

अर्थात माझ्या या सर्व प्रवचनाचा अर्थ असा नव्हे की, आपल्याकडे गुणवत्ता नाहीच. माझ्या विधानाला सन्माननीय अपवाद आहेतच. जसे, ‘ऑक्सफर्ड पोएट्री सीरिज’ किंवा ए. के. रामानुजन, डॉम मोराएस, प्रीतीश नंदी, निस्सीम इझिकेल, केकी. एन. दारूवाला आणि अर्थातच अभिजात कवी, विक्रम सेठ. शिवाय ‘पोएम्स ऑफ गीतांजली’ला येथे विसरून चालणारच नाही. ते पुस्तक ओरिएल प्रेस, यूएसए यांना अपघातानेच सापडले आणि त्यांनी ते १९८२मध्ये प्रकाशित केले, त्याची कवयित्री १७ वर्षीय गीतांजली हिच्या अकाली मृत्यूनंतर!

.........

‘आपल्या स्वत:शी असलेल्या कलहातून काव्य जन्मते,’ हे जणू एक सुभाषित झाले आहे. हा कलह जितका तीव्र तितकी कविता प्रभावी! एखाद्या कवीचे काव्य – किंवा त्याचे जीवन यांविषयी काही परीक्षण करणे असेल तर येणारी मुख्य अडचण म्हणजे, त्याचे काव्य असते शब्दांनी अवगुंठित असणारी त्याची कल्पना. त्या शब्दांची फोड करू गेल्यास त्यातून काहीतरी निसटून जाते- ताल, सूर किंवा तिचा आत्मा!

काव्यवाचन हे काव्य समजावण्याच्या किंवा रसग्रहणाच्या प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचे असते आणि म्हणूनच स्वत:शिवाय दुसऱ्या कोणी, अगदी सिद्धहस्त अभिनेत्यांनीही आपली कविता वाचणे हे कवींना मान्य नसते. बहुतेक वाचक कविता हे अर्थ लावून समजून घेण्याचे गद्य असे मानतात. पारंपरिक काव्यरचनांमधील ताल, छंद किंवा वृत्तबद्धता यांच्यातील परस्परसंबंध समजून घेण्याचा कधीच प्रयत्न होत नाही. मग आधुनिक कवितेतील तालबद्ध सुसंघटन शोधून काढणे तर दुरापास्तच होते.

आजकाल कवींनी स्वत:च्या काव्याचे योग्य वाचन आणि सादरीकरण करण्यामध्ये नैपुण्य, हातोटी मिळवल्यामुळे त्यांना सादरकर्त्याची भूमिकाही अंगावर घ्यावी लागते. अर्थात, त्यातही दर्जाचा फरक राहणे क्रमप्राप्त आहे. विक्रम सेठ आणि केकी दारूवाला हे कवी श्रोत्यांपुढे अत्यंत प्रभावी काव्यवाचन (गायनही) करतात. कोणत्याही सराईत अभिनेत्यापेक्षाही अधिक भावप्रवण, आणि तरीही त्यातील समजूत आणि बौद्धिक भाग व्यवस्थित जपून, शिवाय शुद्ध उच्चार आणि गेयता – सूर सर्व काही लक्षणीय ठेवून. म्हणूनच स्वत: कवीचे काव्यगायन श्रोत्यांसाठी रसग्रहणपरिपोषक ठरते.

उत्तम काव्य हे नेहमीच भावनांच्या झंझावातातून निर्माण होते. अतिशय वेदनामय तरीही अनावर लोभस अशी जादू! त्यातून प्रत्यक्ष काही होताना दिसले नाही तरी मनाला मात्र हलवून सोडणारे, कदाचित आपल्या मनातल्या निद्रिस्त वादळाला जागे करणारे! आपल्याला कधीच न जाणवलेल्या आपल्याच अंतर्मनातील प्रक्षोभाचे प्रतिबिंब, बेचैन करणारे.

.............................................................................................................................................

रोचक आठवणींची पाने – अशोक चोप्रा, अनुवाद : ज्योत्स्ना नेने, इंडस सोर्स बुक्स, मुंबई, मूल्य – ४२५ रुपये

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4432

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 22 June 2018

ज्योत्स्ना नेने, अनुवाद फक्कड जमलाय. अशोक चोप्रांना काय सांगायचंय ते नेमकं उतरलंय. शब्द अनुवादित असले तरी. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. असो. अशोक चोप्रांशी निदान लेखापुरता तरी सहमत आहे. त्यांनी मांडलेल्या भारतातल्या इंग्रजी कवितेच्या समस्या एका अर्थी वैश्विक आहेत. मराठीत आपण ज्याला त्रिताप म्हणतो त्याशिवाय काव्य जन्मास येत नसतं. आणि उच्चभ्रू भारतीयांचा त्रितापांशी काडीमात्र संबंध नाही. मग सकस इंग्रजी काव्य निर्माण होणार कसं? दुसरा प्रश्न असा की जरी त्रितापांचा अनुभव आला तरी तो शब्दबद्ध करण्यासाठी नात्यांची एक ठाम चौकट लागते. पण हल्ली कौटुंबिक नाती तकलादू होत चाललीत. त्यामुळे कवीस आलेल्या अनुभवांना व्यक्त करण्यासाठी यथोचित भावनिक पार्श्वभूमी लाभंत नाही. माझ्या मते कुटुंबाकरिता जो त्याग करावा लागतो, त्यातून त्रितापांशी ओळख होते व ती पुढे काव्य प्रसावायला उपयोगी पडते. म्हणूनंच की काय (अशोक चोप्रांनी म्हंटलंय तशी) भारतीय भाषांत जागतिक दर्जाची काव्यनिर्मिती होते आहे. भारतातलं इंग्रजी साहित्य नेहमीच परावलंबी राहणार आहे. मात्र हेच परावलंबन एक वेगळं दालन खोलतं. ते म्हणजे अनुवादाचं. ज्यांना खरोखरीच इंग्रजी काव्य करायचंय त्यांनी भारतीय भाषेतलं एखादं अस्सल काव्य इंग्रजीत अनुवादित करायचा प्रामाणिक प्रयत्न करून पहावा म्हणून सुचवेन. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......