जॉन होम्स : जिवंतपणीच दंतकथा बनलेल्या अनभिषिक्त सम्राटाची शोकांतिका
दिवाळी २०१८ - माणसं : कालची, आजची, उद्याची
विवेक कुलकर्णी
  • जॉन होम्स
  • Wed , 24 October 2018
  • दिवाळी २०१८ माणसं : कालची आजची उद्याची जॉन होम्स John Holmes

भारतीय समाज लैंगिकतेबाबत दुटप्पीपणे वागतो. एकीकडे खजुराहोसारखी मैथुन शिल्पांनी भरलेली अभिजात शिल्पकला इथे आहे म्हणून कोण अभिमान गाजवतो; तर दुसरीकडे कला, साहित्य, सिनेमात लैंगिकतेविषयी चित्रण आलं की आक्षेप घेतो. इथल्या समाजात स्त्री-पुरुष लैंगिकतेवर मनमोकळी चर्चा करताना आढळत नाहीत. वयात येणारी मुले ते प्रौढ पुरुषांपर्यंत सर्वच जण सर्वसाधारणपणे बोलताना मात्र सढळपणे हातचं न राखता अश्लील पातळीवर येतात. ‘सनी लिओनी’सारख्या परदेशस्थ भारतीय पोर्नस्टार ललना इथल्या मुख्यधारेतल्या सिनेमात अचकटविचकट हावभाव, मादक नृत्य करत पडद्यावर दिसतात, तेव्हा ते पुरुष प्रेक्षकांना आवडतं व त्यांच्या मदहोशीनं भरलेल्या स्वप्नांची ती राणी व्हावं असं त्यांना मनोमन वाटायला लागतं. तिच्या व्हिडिओ क्लिप्स मोबाईलमध्ये सर्रास आढळतात. ती एकीकडे पुरुषांच्या वासना चाळवण्याचं काम करते, तर दुसरीकडे स्त्रियांनी पोर्न बघावं का नाही यावर चर्चा केली जाते.

तरीपण एका आकडेवारीनुसार तीस टक्के भारतीय स्त्रिया इंटरनेट पोर्न बघतात. भारतीय लोकसंख्येचा विचार केल्यास ही टक्केवारी आश्वासक नाही, कारण याच वेळी पुरुषांचं प्रमाण सत्तर टक्के आहे. हे तीस टक्क्यांचं प्रमाणदेखील चोरीछुपे बघणार्‍याचं असणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. आपल्या मनात असणार्‍या लैंगिकतेसारख्या नैसर्गिक भावनांना चोरीछुपे बघून त्याचा निचरा करायला भाग पाडलं जातं. त्यामुळेच असेल कदाचित ‘इंडियन मास्टरबेशन’ असा की-वर्ड टाकून पोर्न साईट्सवर सर्च केलं की, पुरुषांच्या मानानं खेडेगावापासून ते महानगरीय उच्चभ्रू वर्गातल्या पण सर्व वयोगटातल्या स्त्रियांचेच व्हिडिओज जास्त बघायला मिळतात. एका अर्थानं ही बंडखोरी असावी वर्षानुवर्षं पुरुषी वर्चस्ववादी वातावरणातून मुक्त होण्याची.

या पार्श्वभूमीवर नुकतीच सनी लिओनीच्या आयुष्यावर आधारित ‘करणजीत कौर – द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ नावाची वेब सिरीज जुलै महिन्यात प्रदर्शित झाली. त्यात तिचा एका शीख कुटुंबातली मुलगी ते पोर्नस्टार ते बॉलिवुड अभिनेत्री असा प्रवास दाखवण्यात आला आहे. तिचं भारतीय वंशाची असून पोर्न उद्योगात काम करणं वगैरे गोष्टींची आतापर्यंत बरीच चर्चा झालीय. पोर्नस्टारनी भारतीय सिनेमात काम करून वलयांकित होणं हे पहिल्यांदाच घडतंय.

पण ज्या देशात पोर्न उद्योगाचा सुवर्णयुग अवतरला, जे तिथल्या मुख्यधारेतल्या सिनेमानं कात टाकण्याला समांतर झालं, त्या देशात मात्र पोर्नस्टारनी मुख्यधारेतल्या सिनेमात काम करणं ही नावीन्यपूर्ण गोष्ट नव्हती. तो देश म्हणजे अमेरिका व अर्थात उद्योग म्हणजे हॉलिवुड. तिथंच एका कलाकाराच्या आयुष्याचा शोकांत उदयास्त झाला, त्याविषयीचा हा वृतांत.

......................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - 

https://tinyurl.com/y86lc3fq

......................................................................................................................................................

सत्तरच्या दशकात हॉलिवुड सिनेमानं कात टाकायला सुरुवात केली होती. कथेपासून ते सादरीकरणापर्यंत सर्वच बाबतीत सिनेमानं कात टाकून ‘नव्या हॉलिवुड’ला जन्म दिला होता. कथेत विविध प्रकारच्या विषयांचा वापर सढळपणे वाढला होता. सोबतच पडद्यावरील हिंसेला नवे आयाम मिळत होते. ‘सायको’ (१९६०), ‘बोनी अँड क्लाईड’ (१९६७), ‘द वाईल्ड बंच’ (१९६९), व ‘ईजी रायडर’ (१९६९) सारख्या सिनेमांनी साठच्या दशकातच त्याचं सुतोवाच केलं होतं. पडद्यावरील हिंसेला सेक्सची जोड मिळायला लागली होती. ती कलात्मक पद्धतीनं येत होती त्यामुळे त्यातील प्रतिक-प्रतिमांचा त्या पिढीवर प्रभाव पडणं नैसर्गिकच होतं. तसंच व्हिएतनाम युद्धाच्या क्रूर अनुभवातून अमेरिकन जनता गेली होती. तिला एकाच वेळी कलात्मक, मनोरंजनात्मक व वास्तववादी हवं होतं, जे ‘मार्टिन स्कोर्सेसी’, ‘स्टीवन स्पीलबर्ग’, ‘जॉर्ज ल्युकस’, ‘विलियम फ्रीडकिन’, ‘फ्रान्सिस फोर्ड कपोला’ व इतरांच्या सिनेमांमधून मिळायला लागलं. सोबत अडल्ट फिल्म्स व थिएटर्सची निर्मिती ही व्हायला लागली होती.

अँडी वॉरहोलचा ‘ब्लू मुव्ही’ (१९६९), लिंडा लवलेसचा ‘डीप थ्रोट’ (१९७२), जॉर्जिना स्प्लेविनचा 'द डेव्हील इन मिस जोन्स' (१९७३) व मेरलीन चेंबर्सचा ‘बिहाईंड द ग्रीन डोअर’ (१९७२) या फिल्म्सच्या यशासोबत पोर्न उद्योगाची पायाभरणी पक्की झाली. ‘जॉनी वॉड’ हा खाजगी गुप्तहेर पात्र म्हणून पहिल्यांदा १९७१ साली आलेल्या ‘जॉनी वॉड’ सिनेमामध्ये दिसून आला. या सिनेमामुळे ‘जॉन होम्स’चं नाव झालं. या सिनेमांच्या यशानं पोर्न फिल्म्स हॉलिवुडच्या मुख्यधारेतल्या सिनेमांसोबत समांतरपणे मार्गक्रमणा करणार असं दिसायला लागलं. दिग्दर्शक ‘बॉब चिन’सोबत जॉनचे चांगले संबंध जुळले होते. त्यांनी ‘जॉनी वॉड’ या पात्रालाच केंद्रस्थानी ठेवून आणखी काही सिनेमे बनवायला सुरुवात केली. त्यातलेच काही म्हणजे ‘अराउंड द वर्ल्ड विथ जॉनी वॉड’ (१९७५) आणि ‘हिअर कम्स जॉनी वॉड’ (१९७५) यांनी हे पात्र प्रेक्षकांत लोकप्रिय झालं. त्यांनी एकूण नऊ सिनेमे बनवले.

त्यांची सर्वांत चर्चिली गेलेली फिल्म म्हणजे ‘द जेड पुसीकॅट’ (१९७७). यात एका जेड पुसीकॅट या जपानमधल्या संग्रहालयातून चोरल्या गेलेल्या मौल्यवान वस्तूला शोधायची जबाबदारी त्याच्यावर येते. पण या शोधकार्यात मात्र त्याचं स्त्रियांची संग करणं थांबत नाही. सिनेमात एक खलनायिका (लिंडा वाँग) सोडली तर सर्व स्त्रियांची तो संग करतो. ती खलनायिका मात्र तिच्या एका सहकारी स्त्रीसोबत (जॉर्जिना स्प्लेविन) समलैंगिक संबंध ठेवताना दाखवण्यात आलं आहे. ती सहकारी स्त्री पुढे जॉनी वॉडसोबत संग करते. तरीही कथेच्या पातळीवर हा सिनेमा विश्वसनीय ठरतो, ते त्याला दिलेल्या गुप्तहेरकथेच्या चौकटीमुळे. ही कलात्मक किंवा निर्दोष असणारी कथा नाही. सिनेमाच्या नायकाला एका बिंदूपासून दुसर्‍या बिंदूपर्यंत जाण्यासाठी जो उद्देश हवा असतो, त्यासाठी त्याची योजना केलेली आहे. त्यामुळे गुप्तहेर कथेत जसे धागेदोरे असतात; खलनायक, त्याचे साथीदार, त्यांनी गुप्तहेरावर हल्ला केलेला असतो तसंच इथंही आहे. वेळप्रसंगी खलनायक मंडळी मुख्यधारेतल्या सिनेमातल्या खलनायकांसारखी नायकावर गोळ्या झाडायला मागेपुढे पाहत नाहीत. कथा पुढे सरकण्यासाठी संवादांची गरज असते, जी पात्रांना शोभून दिसणारी हवीत, तीही आहेत. उदाहरणादाखल खालील दोन प्रसंगात तो कसं काम करतो ते दिसून येतं.

पहिला प्रसंग : जेड पुसीकॅट चोरणारा पॉल हा जॉनीचा मित्र असतो. तो बर्‍याच दिवसांपासून गायब आहे म्हणून त्याची बहीण जॉनीकडे येऊन त्याला काही माहिती देते. तो त्याला शोधायचं वचन देतो. तिच्यासोबत त्याच्या घरी जातो. तिथं एक वस्तू सापडते, ती एक चावी असते. तो एक क्लू असतं. त्यानुसार त्याला सॅन फ्रान्सिस्कोला जायचं असतं. पॉलची बहीण मात्र चिंतीत असते. तिची चिंता दूर करण्यासाठी तो लगेच तिला आपल्या बाहुपाशात घेऊन प्रेम करायला लागतो. यामुळे सॅन फ्रान्सिस्कोला जायचं विमान चुकणार हे पण बोलतो.

दूसरा प्रसंग : वरील प्रसंगानंतर लगेचच तो सॅन फ्रान्सिस्कोला पोचतो. पॉल जिथं उतरलेला असतो, त्या हॉटेलातील खोलीत राहतो. त्याला एक पाकीट मिळतं, ज्यात काही वस्तूंमध्ये एक चायनीज टुथब्रश असतं. त्याचे प्रश्न सुटण्यापूर्वी वाढायला लागतात. तेवढ्यात जेनी नावाची तरुणी पॉलला शोधत येते. तिची काही डॉलर्सची उधारी पॉलनं देणं बाकी असतं. तिला आश्चर्य वाटतं की, जॉनीसुद्धा त्याच वस्तूच्या मागे असतो, ज्याच्याबद्दल पॉलनं तिला सांगितलेलं असतं. पॉलचा पत्ता नसतो त्यामुळे त्यांच्याकडे बराच वेळ असतो. मग काडीचाही वेळ न दवडता जॉनी तिच्यासोबत प्रेमाचे नैसर्गिक चाळे करायला लागतो. 

या दोन्ही प्रसंगांना चांगल्या पार्श्वसंगीताची जोड देऊन भरपूर प्रकाशात चित्रित केलेलं आहे. तसंच अभिनेत्यांचे महत्त्वाचे अंगप्रत्यंग प्रेक्षकांना दिसणं गरजेचं असल्यामुळे ते कॅमेर्‍यात त्यांच्या चेहर्‍यावरच्या हावभावांसहित दाखवलं जातं. त्यामुळे त्याचं हार्डकोअर असणं कुठेही लपत नाही. मग हे प्रसंग झाले की, तो मौल्यवान वस्तू शोधायला बाहेर पडतो. याची रचना एकाच वेळी गुप्तहेरकथा आणि हार्डकोअर पोर्न अशी आहे. त्यामुळे प्रेक्षक शेवटपर्यंत खिळून राहतो. त्याला त्या मौल्यवान वस्तूत फार स्वारस्य उरत नाही. ती गोष्ट फक्त कथानक पुढे सरकायला हवं यासाठी उपयोगाला येते. त्याचं कुतूहल व उत्सुकता उरते ती जॉनीच्या स्त्रियांसोबतच्या संबंधाशी. हा सिनेमा यशस्वी होण्याचं कारण दिग्दर्शक बॉब चिननं याच्याकडे एक कथा सांगायची या दृष्टीनं बघितल्यामुळे. तसंच दुसरं एक कारण आहे ज्याबद्दल पुढे पाहू.

त्यांनी हाच फॉर्म्युला, गुप्तहेरकथा व हार्डकोअर पोर्न, पुढे ‘द चायना कॅट’ (१९७८) या सिनेमात वापरला. यात जेड पुसीकॅटसारखीच अजून एक मौल्यवान वस्तू जॉनीकडून हस्तगत करण्यासाठी बर्‍याच मादक अप्सरा आपल्या सौंदर्याचे जलवे दाखवत, त्याला वश करण्याचा प्रयत्न करतात. त्या सर्व अप्सरांसोबत संग करून तो त्यांचे मनसुबे धुळीस मिळवतो. या व इतर सिनेमांमुळे जॉन होम्स हे नाव सर्वदूर पसरलं. १९८७ साली त्याच्या कारकिर्दीची अखेर झाली तेव्हा एका आकडेवारीनुसार किमान ५४४ सिनेमात त्यानं काम केलं होतं. ‘बुगी नाईट्स’ (१९९७) या मुख्यधारेतल्या सिनेमाची प्रेरणा ‘द जेड पुसीकॅट’ व होम्सच्या आयुष्यामधूनच दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसनला मिळाली होती.

असं म्हटलं जातं की, जॉन होम्स सुप्रसिद्ध पोर्नस्टार झाला कारण त्यानं व उद्योगानं त्याच्याबद्दल पसरवलेली एक गोष्ट. ती म्हणजे इतर पुरुष अभिनेत्यांपेक्षा त्याच्या लिंगाचा ताठरता आल्यानंतर बदलणारा आकार. तो एरवीपेक्षा ‘मोठा’ असायचा म्हणे! होम्स त्याच्या या निसर्गानं दिलेल्या वरदानाबद्दल मिर्चमसाला लावून सांगायचा. अगदी सह-अभिनेत्रीदेखील त्याबद्दल बोलायच्या. पण त्याच्या बोलण्याला कुठल्याही मोजमापाची साथ नव्हती. त्याला अभिमान असण्याचं एक कारण असू शकतं की, जॉन होम्स हा कॉकेशिअन गोरा पुरुष होता. कॉकेशिअन पुरुषांचं लिंग हे इतर वंशांच्या खासकरून आफ्रिकन वंशांच्या पुरुषांनंतर सर्वाधिक मोठं असतं. त्यात जॉन ते सोळा इंचाचं आहे असं मुलाखतीतून सांगायचा. त्याचा मित्र बिल अॅमरसन म्हणायचा ते साडे तेरा इंचाचं होतं. तसंच त्याची स्वतःला ‘माचो मॅन’ असण्याची समज तो वेळोवेळी दर्शवायचा. त्यामुळे एकूणच त्याच्या ‘या’ गोष्टीची चर्चा सर्वत्र व्हायची.

‘सेका’ ही पोर्नस्टार सह-अभिनेत्री म्हणायची त्याचं लिंग हे उद्योगामधलं सर्वांत मोठं होतं, तर अजून एक सह-अभिनेत्री ‘बार्बरा ब्रॉडकास्ट’ची हिरोईन ‘अनेट हेवन’ हिनं त्याच्यावरील माहितीपटात माहिती दिलीय की, चित्रीकरणाच्या वेळेस त्याचं लिंग कधीच ताठर नसायचं, तर एखाद्या लाफासारखं (Luffa-काकडी परिवारातलं एक फळ.) मऊ, मिळमिळीत असायचं. तिच्या म्हणण्याला आधार होता, कारण जॉन होम्स व्यसनी होता. सिनेमात काम करतानाच दारू, सिगारेट व कोकेनच्या आहारी गेलेला होता. त्याचे परिणाम चित्रीकरणावेळी दिसून यायचे. लिंगाला ताठरता यायची नाही. त्यामुळे चित्रीकरणात खोळंबा व्हायचा. त्याला दिवसातून सिगारेटची पाच पाकिटं लागायची. तसंच पोर्न उद्योगात आल्यापासून त्यानं दारू प्यायला सुरुवात केली होती. याच दरम्यान कधीतरी कोकेनचं व्यसन लागलं, जे शेवटपर्यंत कायम राहिलं. कलाकारांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असावा असं वाटणारी व्यसनाधीनता त्याच्याही आयुष्याचा भाग होती.

कारकिर्दीत त्यानं चौदा हजार स्त्रियांसोबत शय्यासोबत केलीय असं तो नेहमी सांगायचा. याला कसलाही आधार नव्हता. बिल अॅमरसनच्या म्हणण्यानुसार हा आकडा फार तर चार हजार स्त्रियांच्या पुढे जाणारा नसावा. आपली प्रतिमा ढासळत चाललीय याची त्याला जाणीव व्हायला लागली, तेव्हा त्यानंच अशा खोट्या गोष्टी पसरवायला सुरुवात केली असं दिसून येतं.

तो युसीएलएमधून (युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजल्स) आपण मेडिसीन, फिजिकल थेरपी व राज्यशास्त्रात पदवीधर आहोत, अशी माहिती बिनदिक्कतपणे मुलखातींमधून द्यायचा. पण प्रत्यक्षात तो हाय-स्कूल ड्रॉप आऊट होता. शालेय शिक्षणसुद्धा धड नीट पूर्ण केलं नव्हतं. वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षीच त्यानं शाळा सोडली होती. प्रतिमा संवर्धनाचा सोस त्यानं कधीच कमी झाला नाही. आपण पदवीधर आहोत हे सांगणं त्याचाच एक भाग. पुढे लष्करात जाण्यासाठी त्यानं पंधराव्या वर्षी घर सोडलं. त्याला जर्मनीत पाठवण्यात आलं. लष्करातून निवृत्त झाल्यावर तो लॉस एंजल्सला आला. तिथं किरकोळ नोकरी करत असताना त्याची भेट शॅरन जीबीनेनी या त्याच्या भावी बायकोशी झाली. ती तेव्हा नर्स म्हणून काम करायची. तेव्हा तो एका अँब्युलन्सवर ड्रायव्हर म्हणून काम करायचा. लग्न झालं तेव्हा त्याचं वय एकवीस वर्षं होतं. पुढे त्यानं अजून एकदा लग्न केलं, जेव्हा तो मरणासन्न अवस्थेला आला होता. तसंच एका षोडशवयीन मुलीसोबत त्याचे संबंध होते.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_list_by_category

.............................................................................................................................................

मात्र त्याचं आयुष्य शोकांतिकेच्या वाटेनं का गेलं याचं उत्तर त्याच्यावर झालेले खुनाचे आरोप यात बघायला मिळतं. ‘वंडरलँड मर्डर्स’ (१९८१) नावानं ओळखल्या जाणार्‍या या केसमध्ये त्याचा हात होता असं म्हटलं जातं. त्यावेळी तो ‘एडी नॅश’ नावाच्या अमली पदार्थाचं विक्री करणार्‍या व काही नाइटक्लब्जचा मालक असणार्‍याच्या नादी लागला होता. एका गॅंगला नियमितपणे अमली पदार्थांचा पुरवठा तो करायचा. त्याच गॅंगशी हातमिळवणी करून त्यानं एडी नॅशला लुटायची योजना आखली. याचा सुगावा नॅशला लागल्यावर त्यानं जॉनला व त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडून माहिती काढून घेतली. त्याला व काही जणांना त्या गॅंगला मारण्यासाठी पाठवलं. गॅंगमधील चौघांना मारण्यात आलं. न्यायालयानं जॉनला दोषी मानलं. तो त्याच्या ठेवलेल्या मुलीसोबत पळून गेला. तरी पोलिसांनी पकडून न्यायालयात उभं केलं. त्याच्या विरोधात सबळ पुरावा नसल्यामुळे त्या आरोपातून मुक्त करण्यात आलं, पण न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी तीन महिन्यांची शिक्षा झाली. ब्याऐंशी साली त्याची रवानगी तुरुंगात झाली.

याच दरम्यान कोकेनच्या सवयीमुळे व त्याचे परिणाम दिसून यायला लागल्यावर तो छोट्या-मोठ्या चोर्‍या करायला लागला, जिगोलो म्हणून काम करायला लागला. डॉन शिलर (Dawn Schiller) नावाच्या ठेवलेल्या षोडशवयीन मुलीला वेश्या व्यवसायात लोटलं, जेणेकरून त्याच्या अमली पदार्थांच्या सेवनाला पैसे मिळावेत. तिला मारझोड करायचा. क्रेडिट कार्डच्या अफरातफरीत सापडला. तसंच सुरुवातीच्या काळात अशा सिनेमांच्या चित्रीकरणावर बंदी होती, तेव्हा तो पोलिसांचा खबर्‍या म्हणून काम बघायचा. त्याचा फायदा पोलिसांची वक्रदृष्टी चित्रीकरणावर पडणार नाही. एकाच वेळी व्यसनाधीनता व गुन्हेगारी अशा दोन्ही डगरींवर त्याचं आयुष्य बेतलं होतं.

तुरुंगातून सुटून आल्यावर पोर्न सिनेमात काम करणं त्यानं सुरू ठेवलं. कामं मिळत होती, पण तोपर्यंत पोर्न उद्योग मोठ्या प्रमाणात वाढला होता. नवी पिढी उद्योगात उतरली होती. व्हिडिओटेप्स/व्हीसीआरच्या प्रसारामुळे पोर्न बनवणं सहजसुलभ झालं होतं. जॉनला मिळणारं काम हे अशा फिल्म्समध्ये एखाद दुसर्‍या सीनपुरतं किंवा फ्रेंडली अपिअरन्स स्वरूपाचं असायचं. त्याच वेळी मोठ्या प्रमाणात पसरत चाललेल्या एचआयव्ही-एड्सच्या चाचणीत तो पॉझिटिव्ह निघाला. तेव्हापासून पोर्न उद्योगात अभिनेत्यांना एचआयव्ही-एड्सची चाचणी नियमित करण्यात आली. तसंच त्याला कोलोन कॅन्सरचं निदान झालेलं. याचा परिणाम सिनेमांवर व्हायला लागला. प्रसिद्धी रसातळाला गेली. सत्तरच्या दशकात तीन हजार डॉलर्स प्रती दिवस या हिशोबानं त्याला पैसे मिळायचे. कधी काळी यशोशिखरावर असणार्‍या या माणसाला अशा दुर्धर रोगांनी ग्रासावं यासारखं दुःख नाही. पुढे त्याच आजारपणात १३ मार्च १९८८ ला वयाच्या अवघ्या त्रेचाळीसाव्या वर्षी त्याचं निधन झालं. एका काळ अस्ताला गेला.

ऊंची सहा फुट एक इंच व शिडशिडीत बांधा असल्यामुळे समोरच्यावर लगेच त्याची छाप पडायची. तसंच ‘जॉनी वॉड’ पात्रामुळे तो स्टायलिश वागायचा. त्यामुळे असेल कदाचित त्याचं वागणं, स्व-प्रतिमा जपण्यासाठी सतत खोटं बोलणं, सर्वसामान्य पुरुषासारखं एका नर्सच्या प्रेमात पडून लग्न करूनही स्थायिक होणं मान्य नसणं, निसर्गानं सढळ हस्तानं दिलेल्या वरदानाला आपल्या पौरुषाचा सन्मानच आहे असं समजून पोर्न उद्योगात येणं, व्यसनांमध्ये व गुन्हे करण्यात आपण काही तरी वाईट करतोय याचं वैषम्य न वाटणं, आपण घेतलेल्या निर्णयाचे परिणाम इतरांनाही भोगावे लागतात याचा यत्किंचितही विचार न करणं असं मनस्वी ते बेताल वागणं त्यानं समरसून केलं. त्याचे समकालीन कलाकार ‘जॉन लेस्ली’, ‘अनेट हेवन’, ‘रॉन जेरेमी’, व नंतर आलेले ‘पिटर नॉर्थ’, ‘के पार्कर’, वगैरे मंडळी आज जीवनगौरव पुरस्कारानं गौरवले जातायत. पण १९६७ ते १९८७ या वीस वर्षात पोर्न उद्योगाचा चेहरामोहरा बदलून टाकणार्‍या या अवलियाला सिनेमॅटोग्राफर ‘बॉब वॉस’ अडल्ट सिनेमाचा ‘एल्विस प्रिसले’ म्हणायचा. त्याला वाटायचं जॉन होम्स पोर्न उद्योगाचा अनभिषिक्त सम्राट आहे. अगदी ‘क्वेंटीन टॅरँटिनो’सारख्या दिग्दर्शकालादेखील त्याच्या पहिल्या सिनेमात ‘रेझवॉ डॉग्ज’मध्ये सुरुवातीच्या जेवणाच्या प्रसंगात जॉनचा उल्लेख केल्याशिवाय राहवलं नाही. इतकी त्याची महती मोठी आहे.

आज ‘मिया खलिफा’, ‘एप्रिल ओ’नील’, ‘सनी लिओनी’, ‘जेम डीन,’ किंवा ‘रोक्को सिफ्रेदी,’ सारख्या पोर्नस्टार्सची चलती आहे. तरीही विसाव्या शतकाच्या मध्यानंतर शीतयुद्धाच्या काळात ‘नव्या हॉलिवुड’ला समांतर आपली छाप उमटवणार्‍या या कलावंताला आजच्या डिजिटल युगात त्याचे चाहते त्याच्या नैसर्गिक वरदानामुळे विसरणार नाहीत हे नक्की.

संदर्भ

https://medium.com/@jtesterkamp/new-hollywood-why-the-70s-were-the-greatest-decade-in-america-cinema-c42676e2170f

https://www.youtube.com/watch?v=9Ep3Uw79TPU Wadd: The Life & Times of John C. Holmes (Documentary)

https://en.wikipedia.org/wiki/Wadd:_The_Life_%26_Times_of_John_C._Holmes

https://en.wikipedia.org/wiki/John_Holmes_(actor)

https://en.wikipedia.org/wiki/New_Hollywood#Bonnie_and_Clyde

https://www.imdb.com/title/tt0125269/

https://www.bgr.in/news/30-percent-of-women-regularly-watch-porn-in-india-study/

फिल्ममेकर्स, गणेश मतकरी, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई.

.............................................................................................................................................

लेखक विवेक कुलकर्णी सिनेअभ्यासक आहेत.

genius_v@hotmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................