डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि एकविसाव्या शतकातील मी
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
हेमंत शेट्ये
  • ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि २१वे शतक’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sun , 02 April 2017
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि २१वे शतक Dr. Babasaheb Amberdkar aani Yakvisave shatak गिरीश जाखोटिया Girish Jakhotiya

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर विपुल लेखन झाले आहे. त्यांच्या लेखनावर संशोधनही झाले आहे आणि होत राहिल. त्यातील काही लेखन त्यांच्या व्यक्तित्वावर आहे, तर काही त्यांच्या लिखाणावर आहे. बाबासाहेबांवर आणि त्यांच्या लिखाणावर काही लिहायचे झाल्यास त्यांचे लिखाण आणि चिंतनाचे विषय समजून घेणे आवश्यक आहे. त्यांची कळकळ, तळमळ आणि प्रयत्न समजून घेणे आवश्यक आहे. डॉ. गिरीश जाखोटिया यांनी ‘बाबासाहेब आणि एकविसावे शतक’ या नावाने एक पुस्तक लिहिले आहे. त्यात बाबासाहेबांचे विचार एकविसाव्या शतकाशी कसे संबंधित आहेत किंवा लागू पडतील, असे प्रथमदर्शनी वाटते. एकंदरीत ते पुस्तक वैचारिकतेशी संबंधित असावे असे वाटते. 

बाबासाहेबांच्या लेखनाचे आणि त्यांच्यावरील अन्य लेखनाचे तीस वर्षे केलेले वाचन तसेच व्याख्याने यांच्या परिपाकातून हे पुस्तक आले असल्याचा लेखकाचा दावा आहे. या पुस्तकाचे एकूण पाच भाग आहेत. त्यात पहिल्या भागात धम्म, धर्म आणि वैश्विक धर्म; दुसऱ्या भागात डॉ. आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि २१वे शतक; तिसऱ्या भागात इस्लाम, धम्म आणि डॉ. आंबेडकर, चौथ्या भागात डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व आणि व्यक्तित्व, तर पाचव्या भागात उद्योजकता, धम्म आणि डॉ. आंबेडकर असे विषय हाताळले आहेत, पण अनेक ठिकाणी संकल्पना आणि त्यांची मांडणी यांत विरोधाभास दिसून येतो. उदा. पहिल्या प्रकरणातील शीर्षकात असलेला वैश्विक धर्म कोणता, हे अखेरपर्यंत स्पष्ट शब्दांमध्ये कोठेही सांगितलेले नाही. प्रकरणांची मांडणी गोंधळात टाकणारी वाटते. त्यात तर्कसंगती शोधावी लागते.

पुस्तकाच्या शीर्षकात एक अदृश्य मी आहे. तो पुस्तक वाचताना वारंवार जाणवतो. तो इतका आहे की, पुस्तकाचे नाव 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि एकविसाव्या शतकातील मी' असे वाटावे. वैचारिक लेखन हे तटस्थपणे केलेले असावे, ही किमान अपेक्षा या पुस्तकात कुठेही पाळलेली दिसत नाही. ‘इकॉलॉजी’ या शब्दाचे भाषांतर अर्थकारण असे केलेले पाहून वाचकांना केवळ गृहीतच धरले नाही तर पुस्तक कोणी वाचत नाही असा लेखकाचा समज असावा असे वाटते. अशा विषयावरील पुस्तक पुरेशा गांभीर्याने लिहिलेले असावे, अशी अपेक्षा असते; गांभीर्याच्या अविर्भावाने नव्हे. 

संपूर्ण पुस्तकात बाबासाहेब आणि आजचे सामाजिक प्रश्न, आजच्या संकल्पना, आजच्या विचारांचा आढावा आजच्या व्यवस्थापन शाखाआधारे मांडण्याचा प्रयत्न जाणवतो. मात्र त्यासाठी प्रसंगी संदर्भ म्हणून जी उदाहरणे दिली आहेत, ती वैयक्तिक आयुष्यातील अनुभवांची!  त्यामुळे पुस्तकात बाबासाहेब कमी आणि लेखक जास्त दिसू लागतो. हे म्हणजे हत्तीला माणसाचे कपडे घालण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे, सिद्धान्ताला वैयक्तिक मतांनी भिडण्यासारखे आहे. वैचारिक लेखांनाही संशोधनपर लेखनासारखी तर्काधारित मांडणी आणि शिस्त अपेक्षित असते. तसेच विषयातील तात्त्विक मीमांसा समान वैश्विक बदलांवर आणि मूल्यांवर तपासून घ्यावी लागते. त्यामुळे वाचकाला विषयासोबत संवाद साधता येतो. संदर्भ तपासून घेता येतात. नव्या शक्यता अजमावता येतात. वाचनक्षमतेच्या कक्षा रुंदावता येतात. 

पुस्तकात विधानांच्या पुष्ट्यर्थ लेखकाने स्वतःच्याच कविता दिल्या आहेत. ‘डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व आणि व्यक्तित्व’ या प्रकरणात तर तीन कविता दिल्या आहेत. त्यातील एकाही कवितेचा संबंध प्रकरणाशी वा विभागाशी दुरान्वयेही येत नाही. त्यात काव्य कमी आणि शब्दकमानी जास्त आहेत. त्या अप्रस्तुत आहेत. एका कविता तर विंदा करंदीकरांच्या 'माझ्या मना बन दगड' या सुप्रसिद्ध कवितेतील शब्द बदलून रचली आहे...

भावुक मना बन दगड,

हाण रगड, बन दगड,

टण टणाटण गुद्दे लाव

ढोंग्यांवरती घाल घाव

वापर शिवाचा गनिमी कावा

भावुक बना दगड

हे सारे हास्यास्पद वाटते!

बाबासाहेब म्हणजे युगायुगातील अन्यायाच्या अंधाराला प्रज्ञेने भिडणारा महानायक. एकविसाव्या शतकाच्या काळाच्या परिमाणात त्यांना जोखताना आजच्या माहिती युगात होणारे शोषण आणि मानवी मूल्यांचे अध:पतन, अध्यापन आणि अध्ययन क्षेत्रातील खालवत चाललेला दर्जा, संशोधन क्षेत्रातील पीछेहाट, माणसांची बनत चाललेली यंत्रे, आरक्षणाच्या भूमिकेचा विपर्यास, हरवत चाललेले राजकीय तत्त्वज्ञान आणि सामाजिक भान, तंत्रज्ञानाच्या वेगामागून आर्थिक असमानतेच्या अंतर्गत होणारी नवी पिळवणूक, बीपीओ (BPO),मॉल्स आणि सेवा उद्योगातून उगम पावणारी नवी वर्णव्यवस्था आणि नव्या जातींचा संघर्ष अशा संदर्भात काही वाचावयास मिळेल अशी अपेक्षा होती.

या अनुषंगाने डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या विचारसरणीतून काही उपयुक्त अशी काही चिंतनशील तत्त्वे हाती लागतील ही अपेक्षा होती. आंबेडकरांनी वापरलेली साधने ही तर्क आणि अभ्यासाधारित होती. तोच धागा धरून या शतकातील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समानतेतील अन्यायाला कशा रीतीने सामोरे जाता येईल याची चिकित्सा त्यांच्या विचारांशी सांगड घालून केली असती, तर या पुस्तकाचे उद्दिष्ट साध्य झाले असते, पण या बाबतीत वाचकाची पूर्ण निराशा होते. 'पुस्तक वाचून हाती काय लागले?' या विचारात वाचक सापडतो.

--------------------------------------------------------------------------------------------------------------

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि २१वे शतक - डॉ. गिरीश जाखोटिया

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे,

पाने- २०७, मूल्य - २५० रुपये.

---------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखक मुंबईमध्ये ग्रंथपाल आहेत.

hemant24th@gmail.com