काही वेळा समस्या सहृदय भावनेनं, तदनुभूतीनं ऐकणं हाच त्या न सुटणाऱ्या समस्येवरचा उपाय असतो!
ग्रंथनामा - आगामी
नंदू मुलमुले
  • ‘संभ्रमाचे सांगाती’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 06 July 2019
  • ग्रंथनामा Granthnama आगामी संभ्रमाचे सांगाती Sambhramache Sangati नंदू मुलमुले Nandu Mulmule

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नंदू मुलमुले यांच्या ‘संभ्रमाचे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्या संध्याकाळी सामाजिक कार्यकर्ते, लेखक डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते पुण्यात समारंभपूर्वक होत आहे. मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला लेखकाने लिहिलेले हे मनोगत...

.............................................................................................................................................

२०१७ सालच्या दै. ‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग’ पुरवणीतील वर्षभराच्या लेखांचे हे संकलन. वर्षाचा काळ तसा मोठा असतो. पृथ्वी आपला अजस्त्र देह सांभाळीत स्वत:भोवती गिरक्या घेत, थंडी-ऊन-पाऊस अंगावर घेत एक प्रदक्षिणा घालते, सूर्याला! मनाच्या विश्वाचा विस्तारही या विश्वाच्या विस्ताराएवढाच अफाट. या विश्वासारखंच विचारांचं अव्याहत चक्र मनातही फिरत असतं. राग-लोभ, द्वेष, मत्सर, प्रेम यांचे ऋतू येतात, जातात. आशा-निराशेच्या ऊन-सावल्यांचा खेळ चालू असतो. आनंद, दु:ख यांचे दिवस-रात्र उगवतात, मावळतात. कवी अनिलांच्या शब्दांत, ‘फिरून वर्ष चक्र हे पुढे पुढे जातसे, विशी तिशी नि चाळीशीही लोटली जरी दिसे,’ असे वयाचे टप्पेही पार पडत असतात. या मनोविश्वाच्या विस्ताराचा छोटा आढावा या लेखमालेत घेण्याचा प्रयत्न केला आहे.

मानसिक समस्यांची व्याप्ती प्रचंड आहे. रूढार्थाने मनोरुग्ण नसलेले अनेक समस्याग्रस्त लोक आहेत, ज्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम महत्त्वाचं आहे. त्यासोबत आपसूक घडून येणारी गोष्ट म्हणजे, या समस्या अनेकांना असतात. त्यात ‘मी एकटा नाही’ हे सांगण्याचं आश्वासक काम अशा लेखनातून होतं. व्यक्तीची विवंचना समष्टीनं भागली गेली की, तिची तीव्रता आपोआप कमी होते. माणूस समूहाच्या बळानं सागर ओलांडतो. एकटा पडला की, त्याला पाऊल उचलणं कठीण होऊन बसतं! माझ्या दु:खाचा सांगाती कोणीतरी आहे, हे सुखही अशावेळी पुरेसं असतं.

ही लेखमाला सुरू झाल्यापासूनच तिच्या संवेदना-प्रवाहात तिनं अनेकांना सामावून घेतलं, हे वाचकांच्या प्रतिक्रियेवरनं समजलं. मात्र त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या वैयक्तिक वेदना या वैश्विक आहेत हेही कळलं. ‘ज्या गोष्टींना आम्ही अगदी व्यक्तिगत समजतो, त्या सगळ्यात जास्त वैश्विक असतात’ हे कार्ल रॉजर्स या मानसतज्ज्ञाचं वाक्य अशा वेळी प्रत्ययाला येतं. ‘ठिणगीचा संबंध वणव्याशी आणि थेंबाचा संबंध समुद्राशी असतो’ हे कुसुमाग्रजांना कवितेनं शिकवलं असेल, मानवी व्यथांच्या कहाणीनं मलाही तेच शिकवलं.

या लेखमालेनं मला हे नवीन ज्ञान प्राप्त झालं की, तुमची भाषा, कथनशैली, अनुभव मांडण्याची पद्धत लोकांनी आपलीशी केली की, त्यांना परत त्यात ‘आपलेपणा’ वाटू लागतो. त्यात अनेकांना आपल्या समस्येची छाया दिसते. आपल्या समस्या कुणा तज्ज्ञ व्यक्तीला नेमक्या समजल्या आहेत असं वाटू लागतं. समस्या मांडणारा लेखक हा असा सहप्रवासी, सहोदर, संवेदनशील सखा, ‘संभ्रमाचा सांगाती’ होऊन जातो.

सगळ्या समस्यांना झटपट उत्तरं नसतात. काही समस्यांना उत्तरंच नसतात. काही समस्या या वेगळ्या नजरेनं पाहिलं, तर समस्या नव्हत्याच असं लक्षात येतं. प्रश्न आयुष्याकडे आम्ही लावलेल्या दृष्टिकोनाचा असतो. ताण परिस्थितीमुळे नाही, आमच्या मन:स्थितीमुळे निर्माण होतो, हे अशा वेळी प्रत्ययाला येतं. मला असंही लक्षात आलं की, काही वेळा समस्या सहृदय भावनेनं, तदनुभूतीनं ऐकणं हाच न सुटणाऱ्या समस्येवरचा उपाय असतो. समस्याग्रस्त माणसाला आपलं मन मोकळं करायचं असतं. कदाचित आपल्या समस्येवर झटपट उपाय नाही, हे त्याच्याही लक्षात आलेलं असतं.

या जगातल्या घटितांना अर्थ नसतो. आम्ही भावनांचा लेप चढवला की, त्या निरर्थक घटितांच्या घटना होतात. अपघात, आर्थिक नुकसान, अपयश, प्रेमभंग, घटस्फोट या घटना आमच्या मनात जो क्षोभ उत्पन्न करतात, तो भावनिक क्षोभ त्या घटितांना त्रासदायक करतो. या भावनिक क्षोभाला आवर घातला तर जगातल्या अर्ध्याअधिक समस्या कमी होतील. म्हणून भावनिक साक्षरता महत्त्वाची.

परस्पर नातेसंबंध ही मानसिक आरोग्याशी निगडित महत्त्वाची बाब. आयुष्यात आनंद हवा असेल, तर अन्न-वस्त्र-निवारा-आर्थिक स्थैर्य यासोबतच तुमच्या भोवतालचे आप्त-स्वकीय-मित्र यांच्याशी पूरक, संवादी नातं हवं, हे जागतिक स्तरावर मान्य केलं गेलेलं तत्त्व. त्यासाठी संवाद हवा. संवादात वाद अध्याहृत आहे. वाद चालेल, थोडा विसंवादही चालेल, पण असंवाद घातक. संवादाअभावी पालक मुलांपासून, पती-पत्नी एकमेकांपासून, राज्यकर्ते जनतेपासून आणि माणूस माणसांपासून तुटून जातात. या लेखनाच्या निमित्तानं अनेक वाचकांशी संवेदनेचे संवाद स्थापित झाले, हे मला महत्त्वाचं वाटतं. अनेक मान्यवरांनी माझ्या लिखाणातल्या विज्ञानामागील लालित्याचे कौतुक केलं, असंख्यांनी साद-प्रतिसाद दिला! त्यात प्रत्येक लेख साक्षेपानं वाचून त्यावर संतुलित पण स्वतंत्र मत व्यक्त करणारे नयन बाराहाते, आशुतोष जोशी आदींचे चिंतन-विश्लेषणही मला मार्गदर्शक ठरलं.

मनोव्यथाग्रस्तांची मानवीय बाजू हा नेहमीच मला आकर्षित करणारा विषय, तोच या लेखमालेचा विषय. विकारांची शास्त्रीय मांडणी करणारे अनेक तज्ज्ञ आहेत, आणि तेही लेखन गरजेचं आहे यात शंका नाही. पण माझ्या लेखक मनाला विकाराभोवतालच्या माणसांकडे पाहण्यात जास्त रुची! शेवटी विकार लक्षण-उपचाराच्या शास्त्रीय नियमावलीत बंदिस्त असेल, तरी ते ज्या माणासाला होतात, त्यांच्या स्वभावविभावात भिजूनच डॉक्टरच्या पुढ्यात येत असतात. छिन्नमानस हा एकच विकार जितक्या असंख्य माणसांना होतो, तितक्या भिन्न स्वरूपात प्रकट होतो. वारी एकच, संभ्रमाचा प्रत्येक प्रवासी स्वतंत्र चालीचा! या विकाराभोवतालच्या भावविश्वाचं आरेखन करण्याचा प्रयत्न मी यथाशक्ती केला, जो अनेकांना भावला, याची प्रचिती वाचकांच्या प्रतिसादातून मिळाली. अर्थात बहुसंख्या वाचक अशा लेखनात आपल्या आयुष्यातील समस्यांची उत्तरं शोधत असतात. लेखकानं मांडलेला मुद्दा आपल्याच आयुष्याचा आहे, हा लेख डॉक्टरनं आपल्यावरच लिहिला आहे, आमच्या घरातलं तुम्हाला कसं कळलं, असं म्हणण्याइतपत हे लेखन वाचकांना आपलंसं वाटलं, कारण त्या सगळ्या समस्या आपल्या रोजच्या जीवनातल्याच आहेत. त्यामुळे मग त्यातून मार्ग काय, यावर मार्गदर्शन-सल्ला-उपचार मागणारे अनेक.

प्रत्येकाला आपल्या समस्येतून सुटका हवी असते. जो आपल्या समस्या समजू शकतो, तो त्याचा उलगडाही करू शकतो, ही अपेक्षा चुकीची नाही. पण त्यात मेख अशी की, समस्या कधीच एकट्याची नसते! तिची सूत्रं कमी-अधिक प्रमाणात भोवतालच्या नातेसंबंधांत गुंतलेली असतात. कधी कधी समस्येचं सूत्रच दुसऱ्या कुणाच्या हाती असतं. जो समस्या घेऊन येतो, त्याचा उपचार ही तडजोड आहे. मात्र ती करावी लागते. या लेखनादरम्यान मला थेट अमेरिका, ऑस्ट्रेलियाहून समुपदेशनासाठी विनंतीचे फोन आले. त्यात आता तांत्रिक प्रगतीमुळे अंतराची आडकाठी उरली नाही. आता एका संवादानं कुणाचं आयुष्य बदलत नाही हे खरं, पण त्याबद्दलची दिशा मिळू शकते हेही खरं!

आम्ही बदलू शकतो का, हा कळीचा मुद्दा! माणसाचा बुद्ध्यांक जन्मत:च निश्चित असतो. मात्र त्याचा भावनांक बदलू शकतो. १० वर्षांच्या मुलाचं यकृत ५० वर्षांच्या माणसाच्या यकृताइतकंच कार्यक्षम असतं, मात्र तेच आपल्या मेंदूबाबत म्हणता येणार नाही! कारण मेंदू-मन हे आयुष्यभर विकसित होण्याची अदभुत क्षमता असलेले अवयव आहेत. मनाची ही भावनिक उत्क्रांती माणसानं आयुष्यभर चालू ठेवली पाहिजे. पत्ते खेळणारा जसा प्रत्येक खेळीनंतर पुन:पुन्हा आपले पत्ते पिसतो, क्रमानं लावतो; तसे आपले विचार, भावना पिसून नव्यानं लावता आल्या पाहिजेत!

आमच्या आयुष्यात एकेकाळी पत्रलेखनाचा एक कालखंड होऊन गेला. त्या काळात कार्डाचा पुरेपूर वापर करत आपल्या सहृदांजवळ सगळ्या तक्रारी मांडल्या जायच्या, पण पत्राचा शेवट मात्र एकाच वाक्यानं व्हायचा, ‘बाकी सर्व क्षेम!’ समस्या कधीच संपत नाहीत, पण सर्व कथा-व्यंथातून शेवटी समाधानाचं हे एकच वाक्य उरावं - ‘बाकी सर्व क्षेम!’ कारण या ‘बाकी’त सारं आयुष्य सामावलेलं असतं. जीवनाच्या बेरीज-वजाबाकीत शेवटी हातचा उरला क्षण समाधानाचा नसला, तर सगळंच व्यर्थ. तुकोबाही शेवटी ‘चित्ती असू द्यावे समाधान’च म्हणाले! समाधानाचा अंत:स्तर केवळ निवृत्तीत नव्हे तर तुमच्या वृत्तीतच असेल, तर अवघं आयुष्य एक आनंदयात्रा होईल! या पुस्तकातून त्या दिशेनं एखादं पाऊल पडण्यास मदत झाली तरी या लेखनाचं सार्थक झालं, असं मी समजेन.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4972/Sambhramache-Sangati

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......