भीतीच्या गडद छायेनं हसऱ्या भिंतीआड आडोसा शोधला
ग्रंथनामा - आगामी
सुरेश पाटील
  • ‘नक्षलबारी’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Fri , 08 March 2019
  • ग्रंथनामा आगामी नक्षलबारी Naxalbari सुरेश पाटील Suresh Patil दाह Dah नक्षलवादी Naxalite

कादंबरीकार सुरेश पाटील यांच्या ‘दाह’ या कादंबरीनंतरची ‘नक्षलबारी’ ही त्यांची कादंबरी या आठवड्यात पुण्याच्या संस्कृती प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. या कादंबरीतलं हे एक छोटेखानी प्रकरण...

.............................................................................................................................................

पोलिसांना शत्रू मानणाऱ्या नक्षलींसाठी संदीप गजरेचं फौजदार होणं ही खूप मोठी गंभीर बाब होती. तो कधी आपल्या मुळावर उठेल याची त्यांना खात्री देता येत नव्हती. शिवाय त्याच्या फौजदार होण्यानं इतर मुलांसाठी एक आयकॉन तयार झाला होता! संदीप गजरेच्या नियुक्तीनं कांडवन, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यातील नक्षलींमध्ये खळबळ माजली होती. बातमी विनाविलंब त्यांच्या छत्तीसगड, आंध्र प्रदेशातील भाईबंधांकडेही पोहोचली होती. मात्र, तीर हातातून सुटल्यानं सगळ्यांचीच कोंडी झाली होती. कसंही करून अशा गोष्टींना पायबंद घालण्याचे प्रयत्न करणं इतकंच त्यांच्या हातात उरलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून संदीपचा सत्कार समारंभ रद्द करण्याचा निरोप संस्थेकडे गेला. नक्षली असो वा गावातले प्रतिष्ठित; त्यांनी आतापर्यंत कधी संस्थेच्या, शाळेच्या कारभारात ढवळाढवळ केली नव्हती. गावकऱ्यांना, आई-वडिलांना मुलं दोन बुकं शिकल्याचं समाधान होतं. तर नक्षलींना थोडी-पार शिकलेली पोरं म्हणजे आपल्या चळवळीचा प्रचार करण्यासाठी, त्यांना आपल्यात सामावून घेण्यासाठी आयतं कुरण मिळत होतं. बरं, शाळेचा ताप असा कोणालाच नव्हता.

भानुदास रोंगे हे वर्धा जिल्ह्यातले. ते नोकरीनिमित्त दीड वर्षापूर्वी या शाळेत आले. त्यांनी आपल्या सोबत आपलं कुटुंब मात्र आणलं नाही. या भागात असलेल्या गैरसोयींना तोंड द्यायची त्यांच्या कुटुंबाची तयारी नव्हती. कुटुंबीयांनी घेतलेल्या या निर्णयाला रोंगेंचाही पाठिंबा होता. शिवाय वर्ध्यामध्ये मुलांच्या करिअरला उजाळा होता. तो या जंगली, मागास भागात कुठून आणायचा? रोंगेंच्या मनामध्ये गांधी तत्त्वज्ञान खोलवर रुजलेलं. त्यांच्या मनाला दांडगेशाहीची भाषा मानवणारी नव्हती. अशा समाजविघातक घटकांशी लोकशाही मार्गानं, घटनात्मक पद्धतीनंच लढा दिला पाहिजे, त्यांच्या विचारात बदल घडवून आणला पाहिजे, प्रसंगी पोलिसांची मदतही घेतली पाहिजे हे त्यांचं आवडतं तत्त्वज्ञान. मग ते नक्षलींसारखे कडवे डावे असोत वा डाव्यांना विरोध करणारे कडवे उजवे; त्यांचा सामना गांधीविचारानंच केला पाहिजे. त्यांच्या मनात रुजलेल्या या वैचारिक कोंबाला संदीप गजरेच्यानिमित्तानं अधिकच बाळसं आलं. त्यांनी संस्थेत संदीप गजरेचा सत्कार करणार असल्याचं ठामपणे सांगितलं. मात्र, त्यांचा हा विचार शाळेतल्या हेडमास्तरांपासून शिक्षक-कर्मचाऱ्यांपर्यंत कुणालाच रुचला नाही. त्यांचं संघटन मजबूत होतं. त्यांच्यासाठी गावा-गावात एआरडी, जीआरडी सदस्य काम करीत होते. त्याशिवाय शस्त्रं बाळगणारे त्यांच्यातलेच पीपल्स आर्मीचे लोकही होतेच. संदीप गजरेच्या सत्काराची कुणकुण एव्हाना त्यांना लागली नसेलच असं सांगता येत नव्हतं. त्यामुळे हेडमास्तरांपासून सामान्य कर्मचाऱ्यांपर्यंत सगळ्यांच्या उरात भीती भरून राहिली होती.

‘घरच्या बिकट परिस्थितीवर मात करून डोंगररानात राहणारा एक मुलगा फौजदार झाला आहे. अन्य मुलांसाठी तो आयकॉन आहे. त्याचं पाहून अनेक जण शाळेत येतील. आपलं शिक्षण पूर्ण करतील. संस्थेचं नावही होईल.’ भानुदास रोंगेंनी आपली बाजू मांडली.

‘रोंगेसाहेब, हा परमुलूख. एनजीओ पद्धतीनं आपलं कामकाज चालतं. बाहेरून येणाऱ्या देणगींवर आपली शाळा चालते. त्यातूनच मुलं चार बुकं शिकतात. इथल्या स्थानिक राजकारणात पडण्यापेक्षा या माध्यमातून होत असलेली समाजसेवाच आपल्यासाठी योग्य आहे. पुरेसं आहे आपल्याला हे!’ हेडमास्तरांनी आपला मुद्दा मांडला.

‘विद्यार्थ्यांच्या पाठीवर पडणारी शाबासकीची थाप फक्त त्याच्या एकट्यासाठी नसते. ती इतरांसाठीही पायवाट असते.’

‘आपलं म्हणणं खरं आहे. परंतु संदीपला आपण फौजदारकीपर्यंत घेऊन गेलो, हेही काही कमी नाही. आपण त्यातच आनंद मानू. सत्कार समारंभाच्या झंझटमध्ये न पडणंच चांगलं.’ हेडमास्तरनी विनवणी केली. काही वर्षांपूर्वी त्याच भागातल्या एका आश्रमशाळेतील शिक्षकाला पोलिसांचा खबऱ्या ठरवून प्रथम त्याचे हात तोडण्यात आले होते. त्यानंतर त्याचं डोकं उडवण्यात आलं होतं. ती गोष्ट आठवली, की आजही हेडमास्तरांच्या अंगात कापरं भरतं.

रोंगे मात्र ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. सर्वांनी त्यांची परोपरीनं समजूत काढण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. मात्र, रोंगेंनी कुणालाच जुमानलं नाही. नक्षली या बाबीचा बदला घेण्याची शक्यता आहे, हेही सांगून पाहण्यात आलं. सत्कार करण्यापूर्वी निदान या विचारांच्या लोकांना कल्पना तरी देऊ, आदी विनंत्याही करून झाल्या. पण, रोंगेनी कुणालाच धूप घातली नाही. गावकरी असोत वा नक्षली; त्यांनी कधी शाळेच्या कारभारात हस्तक्षेप केला नव्हता. तसा तो आताही होण्याचं कारण नव्हतं, या आपल्या मतावर रोंगे ठाम होते. शिवाय तशी वेळ आलीच तर जिल्हा पोलीस अधिक्षकांपर्यंत जायची त्यांची तयारी होती.

‘सत्कार समारंभ करायचाच असेल तर स्व:बळावर करा. त्यात आमचं नाव वापरू नका. संस्थेचे कर्मचारी म्हणून आम्ही फक्त तुमच्या सहायकाच्या भूमिकेत असू.’ अशी भूमिका हेडमास्तरांनी घेतली. त्याला काही शिक्षकांनी पाठिंबा दिला. तर दोन शिक्षकांनी आपण समारंभास कोणत्याही प्रकारचा हातभार लावणार नसल्याचं निक्षून सांगितलं. तरी रोंगे बधले नाहीत.

रोंगेनी सर्वांचा विरोध असतानाही धारागड पोलीस ठाणे गाठले. ठाणेप्रमुख पोलीस निरीक्षक शंकर नाडेंना घडलेली सर्व हकिकत सांगितली. त्यांना आपल्या मागणीची नोंद करवून घेण्याची विनंती करतानाच अशा प्रवृत्तींना वेसण घालण्याचा मुद्दाही उचलून धरला. संरक्षण ही भानुदास रोंगेंची मागणी कायद्याला धरून होती. याबाबत ठाणे प्रमुखाच्या मनात किंतु असण्याचं कारण नव्हतं. मात्र, अशी मागणी नोंदली तर रोंगे काय किंवा आपण तरी जिवंत राहू का? हा विचार त्यांना अस्वस्थ करू लागला. तोपर्यंत ठाण्यातले सर्व हवालदार, शिपाई, दोन पीएसआय रोगेंच्या भोवती गोळा झाले होते. ते त्यांच्याकडे कुतूहलानं पाहत होते.

‘मागणी नोंदवण्यापेक्षा मी त्यांना समज दिली तर चालणार नाही का?’ काहीतरी पळवाट काढावी म्हणून नाडेंनी विचारलं.

‘छे, छेऽऽ! गांधीबाबांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. उघड्या-बोडक्या अंगानं त्यांनी संपूर्ण ब्रिटिश सरकार अंगावर घेतलं. अन् आपण...? गांधीबाबांना निर्भय समाज हवा होता. आपणच असं घाबरून राहू लागलो, तर लोकांनी कुणाच्या तोंडाकडे पाहायचं? आपण समाजविघातक घटकांना वेळीच रोखलं पाहिजे.’ रोंगेंनी त्यांचं प्रबोधन सुरू केलं.

‘अहो रोंगे, समाजाचं नंतर बघू. प्रथम तुम्ही आपल्या जिवाचा विचार करा.’ न राहून एका हवालदारानं मध्ये तोंड घातलं.

रोंगेंना त्या हवालदाराची दया आली. अशी पुचाट माणसं पोलीस खात्यात भरतीच कशाला करतात, हे कोडं त्यांना पडलं. त्यांनी सांगितलं, ‘तुम्ही माझी विनंती तरी दाखल करून घ्या.’

पोलीस निरीक्षक नाडेंना रोंगे भलतेच तिरसट वाटले. मात्र, चालायचंच. समाज म्हटलं की सगळेच रंग आले.

‘साहेब, स्पष्ट बोलू का?’ रोंगेंनी विचारलं.

रोंगे अजून काय सांगणार आहेत, याचं कोडं नाडेंना पडलं. ते सहेतुक रोंगेंकडे पाहू लागले.

‘संदीप गजरे... पोरगा नुकताच पीएसआय झाला आहे. तुमच्याच बिरादरीत आला आहे. तरीही तुम्हाला त्याचं कोडकौतुक का नाही? उलट तुम्ही मला मदत केली पाहिजे होती!’

‘रोंगेऽऽ!’ आता मात्र नाडे ताठ झाले. ‘तुम्ही पोलीस ठाण्यात आलात, तेव्हा तुम्ही काय पाहिलंतऽ? पोलीस ठाण्याच्या गड-किल्ल्यासारख्या बंदिस्त कंपाऊंडबाहेर हॅलोजनसारख्या लाईटची ढणढण फेटणारी रांग तुम्हाला दिसली असेल... त्यानंतर आत असणारं अणुकुचीदार तारेचं उंचच्या उंच कंपाऊंड... त्यापासून काही फूट अंतरावर असणारी, पोलीस ठाण्याचं संरक्षण करणारी ही भली दांडगी भिंत... भिंतीवरही तारेचं भेंडोळं... पोलीस ठाण्याच्या आवारात असलेला एसआरपीएफचा हा दणकट पहारा...! पोलीस ठाण्याच्या संरक्षणासाठी चारही दिशेला उघडलेले मोर्चे... चोवीस तास मशीनगनचा असलेला पहारा! याचा अर्थ काय आहे, हे तुम्हाला कळतं का होऽ?’

रोंगे नाडेंकडे एकटक पाहत राहिले.

‘रोंगे, याचा अर्थ आहे, इथं पोलीस ठाणंच भीतीच्या छायेखाली आहे. त्याला बाहेरच्या जनतेची काळजी आहे, तशी या भिंतींच्या आत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही! अन् तुम्ही एक गोष्ट विसरू नका, सत्कारापेक्षा जिवाचं मोल नेहमीच मोठे असते. इथं जनतेचा विश्‍वास पोलिसांवर नव्हे, तर त्यांच्यावर आहे. त्यापाठीमागे त्यांच्या बंदुकीची दहशत असेल किंवा त्यांना ते आपल्या विवंचना दूर करतील असं वाटत असावं. जे काही असेल ते असो. पण, त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी पोलीस बंदोबस्त द्या, अशी मागणी करीत आजपर्यंत या पोलीस ठाण्याची पायरी कोणी चढलेलं नाही. वा जिल्ह्यातील अन्य एखाद्या पोलीस ठाण्यात असा प्रकार घडला असावा, असं माझ्या ऐकिवात नाही. त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्याची पायरी चढणं म्हणजे काय, याचा अर्थ कळतो का तुम्हाला रोंगे?’ मशीनगन चालल्यासारखे नाडेंचे शब्द पोलीस ठाण्यात घुमले.

रोंगे अजूनही नाडेंच्या चेहऱ्याकडे पाहत होते. नाडेंना त्यांची दया आली. नाडेंच्या टेबलवरच गुन्हे नोंद डायरी होती. रोंगेंकडे पाहत पाहत त्यांनी ती कस्पटासारखी बाजूला सारली व फर्मान सोडलं, ‘सकपाळ, यांची तक्रार किंवा मागणी जे काय असेल ते लिहून घ्या बघू.’

फौजदार सकपाळ मनातल्या मनात हसत होते. मात्र, त्यांनी वरकरणी तसं दाखवलं नाही. त्यांनी पाले हवालदारला रोंगेंची तक्रारवजा मागणी नोंदवून घेण्यास सांगितलं.

पाले हवालदारानं रोंगेंना एका बाजूला घेतलं. त्यानं एका फाईलमधून ए फोर साईजचा पांढराखड पेपर काढला व तो रोंगेंची मागणी लिहून घेऊ लागला. पोलीस ठाण्यातले सर्व जण त्यांच्याकडे कुतूहलानं पाहत होते. एक-दुसऱ्यांना खाणा-खुणा करीत होते. गालात हसत होते.

‘असं धाडस हवं!’ सकपाळ फौजदारानं आणलेल्या रोंगेंच्या मागणी अर्जावर नाडेंनी नजर फिरवली.

मागणी अर्जाखाली रोंगेंनी अगदी ठळक अक्षरात आपली स्वाक्षरी केली होती. नाडेंनी तो पेपर तक्रार नोंदवहीच्या खाली ठेवला व ते म्हणाले, ‘उद्यापर्यंत कारवाई होईल. त्यांना तिकडे न फिरकण्याची समज देण्यात येईल. आपण निर्धास्त जा.’

राज्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रारदाराची तक्रार नोंदवहीत लिहून न घेता अशीच एखाद्या कोऱ्या कागदावर घेतली जाते. त्यामुळे ठाण्यातील गुन्ह्यांची संख्या आपसूकच कमी होते व तक्रारदारांचं पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्याचं समाधानही होतं. अशा तक्रारींचं पुढे काय करायचं हे सर्वथा ठाणे प्रमुखावर अवलंबून असतं. ‘बांसही त्यांचा व बांसूरी’ही त्यांचीच. त्याला नाडेही अपवाद नव्हते.

भानुदास रोंगेंनी नाडेंना हात जोडून नमस्कार केला व परत आर्जव केलं, ‘येतो मी... पण कारवाई लवकर करा. आपल्या संरक्षणाची आम्हाला गरज आहे.’

नाडेंनी होकारार्थी मान हलवली. रोंगे पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत नाडे म्हणाले, ‘कशाला हा बाबा इतका जिवावर उदार झाला आहे, कुणास ठाऊक!’

पोलीस ठाण्यातले सर्व जण हसू लागले. भीतीच्या गडद छायेनं हसऱ्या भिंतीआड आडोसा शोधला.

.............................................................................................................................................

‘नक्षलबारी’ या कादंबरीच्या खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4791/Naxalbari

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 08 March 2019

गांधीवादाची लक्तरं लोंबणार तर आता! कुणाशी कशाने लढायचं याची नीटशी समज रोंगेंना नाही. -गामा पैलवान