या कहाण्या लैंगिक समानता जपणाऱ्या आणि सर्व लैंगिक गटांना समान न्यायाने वागवणारा समाज घडवण्यासाठी प्रेरणा देतील!
ग्रंथनामा - आगामी
डॉ. मनीषा गुप्ते
  • ‘जुळो साखळी संवादाची, तुटो बेडी पुरुषपणाची’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 22 October 2018
  • ग्रंथनामा आगामी जुळो साखळी संवादाची तुटो बेडी पुरुषपणाची मावा MAVA

‘मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अॅब्युज’ (मावा) ही संस्था गेली २५ वर्षं महिलांवरील हिंसा आणि लिंगभाव (जेंडर) याविषयी युवक व पुरुषांसोबत जनजागृतीचं काम करत आहे. गेल्या २५ वर्षांत या संस्थेतून अनेक कार्यकर्ते व सक्षम, संवेदनशील विद्यार्थी घडले आहेत. त्यातील २५ जणांच्या मुलाखतींवर आधारलेलं ‘जुळो साखळी संवादाची, तुटो बेडी पुरुषपणाची’ हे पुस्तक उद्या मुंबईतील रुइया महाविद्यालयात समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. या पुस्तकाला सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मनीषा गुप्ते यांनी लिहिलेली प्रस्तावना...

......................................................................................................................................................

लिंगभेदाने पिढ्यांपिढ्यांपासून तयार करून ठेवलेल्या चाकोऱ्या आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेची बंधने यांना आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आणि सामाजिक स्तरावरही आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्या २५ तरुणांच्या प्रेरणादायी कहाण्या संग्रहित केल्याबद्दल ‘मावा’चे अभिनंदन. ‘मावा’च्या कामाने तरुणांच्या आयुष्यावर नेमका कोणता प्रभाव टाकला याबद्दलचे अनुभव शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न आज इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत पुस्तकरूपात प्रसिद्ध होत आहे याचा मला आनंद आहे. लिंगभान आणि लैंगिकता याबद्दल साधे बोलणेही जेव्हा निषिद्ध मानले जात होते, त्या काळात या विषयाबद्दल तरुण मुलग्यांमध्ये जाणीवजागृती घडवून आणण्यासाठी ‘मावा’ने केलेल्या पायाभूत कामाचा अनुभव, बदलांचे दूत घडवण्यासाठी कारणीभूत ठरलेली व मुलांना स्वत:कडे टीकात्मक दृष्टिकोनातून पाहण्यास प्रेरित करणारी त्यांची समंजस, कौशल्यपूर्ण आणि अभिनव कार्यपद्धती या पुस्तकात समाविष्ट कथनांमध्ये जागोजागी सापडते. हे पुस्तक म्हणजे केवळ वैयक्तिक अनुभवांचा संग्रह नाही. क्षमता उभारणीसाठी केलेले सखोल प्रयत्न आणि एखादा विषय समवयीन संवादकांकरवी मुलांपर्यंत पोहोचवण्याची - पीअर एज्युकेशनची प्रक्रिया यांचे महत्त्व या कहाण्यांमधून आपोआपच अधोरेखित झाले आहे.

या कहाण्यांमध्ये समाजाच्या विविध स्तरांतील तरुण मुलांच्या जीवनातील वास्तवाचे प्रतिबिंब पडले आहे. त्यात ग्रामीण भागात शेतांत काम करणारी मुले आहेत, छोटीमोठी कामे किंवा मजुरी करून आपल्या शिक्षणाचा खर्च भागवणारी मुले आहेत, शहरातल्या गरीब घरांतील मुले आहेत आणि चांगला व्यवसाय करणारी, आयटी किंवा जाहिरात आणि फिल्म-मेकिंगच्या क्षेत्रात उतरलेली मुलेही आहेत. ही सगळी मुले कधी ना कधी ‘मावा’च्या ‘लिंगभान’ या विषयाशी संबंधित तसेच मेंटरिंग उपक्रमांचा भाग होती. हा कार्यक्रम जून २००७ ‘युवा मैत्री’ या नावाने पुण्यात सुरू झाला आणि त्यानंतर युवा संवाद, मानुष आणि युवा तरंग अशा वेगवेगळ्या नावांनी महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमध्ये त्याचा विस्तार झाला. बहुतांश मुले पदवी अभ्यासक्रम शिकत असताना ‘मावा’च्या या उपक्रमात सहभागी झाली. काहीजण सामाजिक कार्याचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करताना ‘मावा’च्या संपर्कात आले.

या पुस्तकातून भेटणारे युवक शिक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील आहेत, पण त्यांच्यामध्ये आढळणारी एक समान गोष्ट म्हणजे ते अमाप स्वयंप्रेरणेने भारलेले आहेत. नवे ज्ञान मिळवण्याची आणि त्या ज्ञानाचा वापरही करण्याची अनिवार ऊर्मी त्यांच्यामध्ये आहे. लिंग आणि लैंगिकतेशी जोडलेल्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने बघण्याची वृत्ती आहे, नेतृत्वाची बीजेही या मुलांमध्ये दडलेली आहेत आणि आपल्या समवयीन मुलांशी चिकाटीने संवाद साधण्याची क्षमता आहे. यातली काही मुले दीर्घ काळासाठी ‘मावा’शी जोडलेली आहेत, तर काहींचा या उपक्रमांशी अगदी काही काळापुरता संबंध आला आहे. पण या थोडक्या काळातही आपल्या जगण्याचा प्रवाह बदलून टाकण्यासाठी करण्यासाठी पुरेसे बळ त्यांना मिळाले आहे. अगदी शिक्षणाच्या किंवा करिअरच्याही बाबतीतही वेगळ्या वाटा चोखाळण्याचे धैर्य अनेकांना मिळाले आहे. हरीश सदानी यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन यामुळे आपल्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले, याचा उल्लेख जवळजवळ प्रत्येक मुलाने केला आहे.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा -

https://www.booksnama.com/client/book_list_by_category

.............................................................................................................................................

या कहाण्यांमधील एक विलक्षण गोष्ट म्हणजे ‘मावा’च्या उपक्रमामुळे या तरुणांच्या मनामध्ये माहिती व ज्ञान मिळवण्याची प्रचंड आस जागी झाल्याचे दिसते. एक मुलगा अत्यंत समर्पक भाषेमध्ये या अनुभवांचे सार मांडताना म्हणतो, “ज्ञानाच्या या निर्मळ झऱ्याचा  शोध मला त्यातल्या पाण्याची तहान लागण्याआधीच लागला आणि आता त्या पाण्यामुळे तहान भागणं तर दूरच, उलट त्या झऱ्याच्या तिथं असण्यामुळे आणखी आणखी ज्ञान मिळवण्याची माझी तहान निरंतर वाढत चालली होती.”

निवासी शिबिरांसाठी सर्वांत संवेदनशील आणि शिकण्यासाठी उत्सुक अशी मुले निवडण्यासाठी काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक योजलेली निवड प्रक्रिया आणि खुद्द ‘मेंटर्स आणि मेंटीज’ घडवण्यासाठीची सत्रे यांतून या पदवीधरांच्या ज्ञानात सतत नवी भर पडत राहिली आहे व लैंगिक समानता जपण्याबद्दलची त्यांची बांधिलकी अधिकाधिक दृढ होत गेली आहे. यातील काही तरुण आजही ‘मावा’च्या संपर्कात आहेत किंवा ‘मावा’च्या चालू प्रकल्पांमध्ये सहभागी आहेत, तर काही जण मिळालेली शिकवण आपापल्या कामांच्या ठिकाणी उपयोगात आणत आहेत. कुणी प्रशिक्षक बनत आहेत, कुणी अगदी सहज आपल्या जवळच्या व्यक्तींचे समुपदेशनाचे काम करत आहेत, कुणी समवयीन मुलांचे प्रशिक्षक बनले आहेत, तर कुणी अगदी प्रौढ पुरुषांसाठीही लैंगिकता या विषयावरील माहितीचे स्त्रोत बनले आहेत. दोन युवकांनी हरीश यांच्या प्रोत्साहनामुळे व पाठिंब्यामुळे स्वत:ची संघटना स्थापन केली आहे. ‘मावा’ने दशकभर चालवलेला हा उपक्रम अशा अनेकानेक तऱ्हांनी भविष्यातही टिकून राहू शकेल, ही शक्यता निश्चितच सुखावणारी आहे.

या संग्रहातील बऱ्याच कहाण्यांमधून ‘आई’ ही व्यक्ती फार समर्थ, खंबीर व्यक्तिमत्त्व म्हणून सामोरी येते. खडतर परिस्थितीशी आपली आई ज्या चिवटपणे झगडली, त्याबद्दल या मुलांना आदर वाटू लागला आहे. ‘मावा’च्या प्रशिक्षणामुळे या युवकांच्या मनातील आईबद्दलच्या या भावनेला वाट मिळाली आहे आणि आता तिच्यावरचा भार हलका करण्याची इच्छा त्यांच्या ठायी जागी झाल्याचे दिसत आहे. केवळ आईच नव्हे तर कुटुंबातील इतर नात्यांची परिमाणेही त्यांच्यासाठी बदलली आहे.

वडिलांशी असलेल्या नात्यामध्ये परिवर्तन घडून आले आहे. एकेकाळी वडिलांच्या हुकमतीत राहणारी ही मुले आपल्या धाकट्या बहिणीच्या शिक्षणाच्या हक्कासाठी, लहान वयात तिचे लग्न लावून देण्याच्या कुटुंबाच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी खंबीरपणे उभी राहू लागली आहेत.

यातील अनेक युवक एकेकाळी आपल्या बहिणींची आयुष्ये आपल्या नियंत्रणाखाली ठेवू पाहत होती. कुटुंबातल्या मुलींचे रक्षण करणे हे घरातल्या पुरुषाचे आणि मुलग्यांचे काम असते हेच वर्षानुवर्षं मनावर बिंबवले गेल्याने बहिणींच्या वावरावर, त्यांच्या स्वातंत्र्यावर किंवा इतर मुलग्यांशी मैत्री करण्यावर त्यांची देखरेख असायची. पण नियंत्रणाची ही भावना नाहिशी झाली तसे त्यांचे आपल्या बहिणींशी मैत्रीचे नाते तयार झाले. अगदी मासिक पाळी, लैंगिकतेसारख्या निषिद्ध विषयांवरही त्यांच्याशी खुलेपणाने बोलू लागले. त्यांची स्वप्ने, आकांक्षा, त्यांच्या आयुष्यातले ताणतणाव समजून घेऊ लागले.

नव्या गोष्टी शिकत राहण्याच्या, त्यासाठी विचारांची आधीची चौकट मोडून काढण्याच्या आणि सत्ता, नियंत्रण आणि लिंगाधारित हिंसेला वाट देणाऱ्या पुरुषी वर्चस्वाला प्रश्न विचारण्याच्या दिशेने सतत केलेल्या या प्रवासामुळे यापैकी विवाहित तरुणांना आपल्या जोडीदाराशी समानतेचे नाते गवसत गेले.

सामाजिक तसेच वैयक्तिक आयुष्यामध्ये लैंगिकतेशी जोडलेल्या मुद्द्यांना हाताळण्यासाठी आवश्यक ते ज्ञान व कौशल्य देऊन या मुलांना कशा प्रकारे सक्षम बनवले गेले, हे या कहाण्यांमधून दिसून येते.

गुंतवणूक सल्लागार म्हणून नोकरी करणारा एक तरुण आपल्या कामाचा भाग म्हणून महिलांनी घराच्या अर्थकारणात तसेच गुंतवणुकींमध्ये समान भागीदार बनण्याचा सल्ला आवर्जून देताना दिसतो. आपण आता घरकामात सहभागी होतो असा उल्लेख जवळजवळ प्रत्येकाच्या बोलण्यात आला आहे.

‘मावा’च्या उपक्रमामध्ये वापरली जाणारी कार्यपद्धती त्यांना झाल्या चुकांबद्दल दोषी ठरवून शिक्षा देत नाही, तर त्यांच्यात बदल घडवून आणते. परिणामी या उपक्रमांनी सर्व वयोगटातील पुरुषांचा विश्वास प्राप्त केलेला दिसतो. आयुष्याच्या कुठच्याही टप्प्यावर अधिक चांगलं माणूस होण्याच्या दिशेने पाऊल उचलणे आपल्यातील प्रत्येकाला शक्य आहे, असा आत्मविश्वास या उपक्रमातून तरुणांच्या मनावर बिंबवला गेला आहे.

पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेच्या काही खोलवर रुजलेल्या समजूतींना भिडण्यातील आव्हानाबद्दल काही जण बोलले आहेत. उदाहरणार्थ मालमत्तेमध्ये स्त्रियांना समान हक्क असणे, जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य असणे (विशेषत: आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांच्या संदर्भात) आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये जात, वर्ग, धर्म आणि लैंगिकता अशा विविध आंतरसंबंधांशी झगडणे या मुलांना आव्हानात्मक वाटते. पुरुषप्रधान संस्कृती आणि जातीव्यवस्था या भारतीय समाजव्यवस्थेच्या अंगांगी मुरलेल्या दोन घटकांमधील परस्परसंबंधांना अधोरेखित करणारे म. फुले व डॉ. आंबेडकरांचे विचार आत्मसात करणे इथे गरजेचे ठरणार आहे.

‘मावा’ हा भारतातील पुरुषांबरोबर काम करणारा पहिला गट आहे व महिला चळवळीबरोबरही या संस्थेचे गेल्या तीन दशकांपासूनचे नैसर्गिक नाते आहे. म्हणूनच ‘मावा’च्या सखोल प्रशिक्ष्रणातून तयार झालेले हे युवा नेते एका वास्तवाचा आदर करतील असे मानणे अवाजवी ठरणार नाही. हे वास्तव म्हणजे एखाद्या समाजगटाकडून आपल्या हक्क व सन्मानासाठी लढल्या जाणाऱ्या लढ्याचे नेतृत्व केवळ त्या समाजगटाकडेच असायला हवे. पुरुषसत्तेला आव्हान देताना या लढाईचे नेतृत्व स्त्रियांच्या हाती असणे गरजेचे आहे, विभिन्न लैंगिक प्राधान्यांना मान्यता मिळवण्यासाठीच्या लढाईमध्ये एलजीबीटीक्यूआयएच (LGBTQIH) गटाचे नेतृत्व असायला हवे आणि जात, धर्म, प्रांत आणि शारिरीक व भावनिक क्षमतांच्या आधारे समाजाकडून वंचित ठेवल्या गेलेल्यांकडेच या प्रश्नांविरोधीतल चळवळींचे नेतृत्व जायला हवे.

‘मावा’ने घडवलेल्या युवा नेत्यांच्या या फळीमधील या मुलांची वैयक्तिक आणि व्यावसायिक नीतिमत्ता काळानुसार अधिकाधिक परिपक्व होत जाईल, पुरुषसत्ता व्यवस्थेमध्ये पुरुषांना मिळणारे फायदे नाकारण्याचे आणखी सर्जनशील मार्ग ते शोधून काढतील व माणूसपणाच्या दिशेने सुरू झालेल्या त्यांचा प्रवास आणखी वेगाने पार पडेल अशी मला खात्री वाटते.

‘मावा’च्या या उपक्रमाच्या अगदी सुरुवातीच्या काही सत्रांमध्ये (पुणे जिल्ह्यातील युवामैत्री प्रकल्पादरम्यान) सहभागी झालेल्या युवकांमध्ये घडून आलेला बदल आणि त्यांची वाढ मी स्वत: पाहिली आहे. एका बाजूला त्यांचा सामाजिक प्रश्नांमध्ये वाढता रस आणि दुसऱ्या बाजूला आपल्याहून लहान प्रशिक्षणार्थींशी तयार झालेले कोवळे नाते या दोन्ही गोष्टी मी पाहिल्या आहेत. या २५ व्यक्तींच्या कहाण्या ज्यांच्या ज्यांच्या वाचनात येतील, त्या प्रत्येकाला त्या निश्चितच प्रेरणादायी वाटतील यात शंका नाही. लैंगिक समानता जपणाऱ्या आणि सर्व लैंगिक गटांना समान न्यायाने वागवणारा समाज घडवण्याच्या आमच्या धडपडीमध्ये आमचे सहयात्री बनण्याची ऊर्मी पुरुष व मुलग्यांच्या मनी जागी करण्याचे काम हा संग्रह जरूर करेल.

.............................................................................................................................................

‘जुळो साखळी संवादाची, तुटो बेडी पुरुषपणाची’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

लेखिका डॉ. मनीषा गुप्ते या महिला सर्वांगिण उत्कर्ष मंडळ (मासूम),पुणे या स्वयंसेवी संस्थेच्या सह-संस्थापक आणि सह-संयोजक आहेत.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......