पुढाऱ्याचे हेडमास्तरांस पत्र
पडघम - सांस्कृतिक
 प्रा. जी. व्ही. बोरकर
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Tue , 10 July 2018
  • पडघम सांस्कृतिक जी. व्ही. बोरकर पुढाऱ्याचे हेडमास्तरांस पत्र Political Leader's Letter to Headmaster

या कवितेला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनपासून भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत अनेक संदर्भ आहेत. त्यात २०१९च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. पण खरं तर कुठल्याही काळातल्या भारतातल्या आणि जगातल्याही राजकीय नेत्यांना लागू पडेल अशी ही कविता आहे. अब्राहम लिंकन यांनी लिहिलेल्या ‘हेडमास्तरांस पत्र’ या कवितेचं इतकं सुंदर विडंबन आजवर कुणाला करता आलं नसावं. असो. कविता वाचावी. तिचा अनुभव आपल्याला ऐकायला\ वाचायला\ पाहायला\ अनुभवायला येेतो की नाही हे ताडून पाहावं. तसा तो आला तर उत्तमच. (नाही आला तरीही उत्तमच) पण या कवितेला विद्यमान राजकीय संदर्भ चिकटवताना मात्र थोडासा विचार नक्की करा. ही कविता काही काल-परवा लिहिली गेलेली नाही. ती २०००-२००१ साली लिहिली गेलेली आहे.

.............................................................................................................................................

प्रिय मास्तर,

सगळीच माणसं पुढारी होत नसतात

नसतात सगळीच मंत्री,

हे शिकेलच माझं पोरगं कधी ना कधी.

मात्र त्याला हेदेखील शिकवा,

जगात प्रत्येक चांगला माणसागणीक

असतो एक पैशासाठी काहीही करणारा.

स्वार्थी राजकारणी असतात जगात;

त्यांचा नीट अभ्यास कर म्हणावं,

पण असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही;

त्यांच्या वाटेला जाऊ नको म्हणावं.

असतात पाडायला टपलेले वैरी,

तसेच पाठिंबा देणारे मित्रही.

मैत्री करून लोक जमवायला शिकवा त्याला.

पण प्रसंगी खुर्चीसाठी

कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसायला,

घाबरू नकोस म्हणावं

वेळ आल्यावर स्वत:चं पिलू पायाखाली घेऊन

जिवंत राहणाऱ्या माकडिणीची गोष्ट सांगा त्याला.

सगळ्याच गोष्टी झटपट नाही शिकवता येत.

तरीही जमलं तर शिकवा त्याला,

घाम गाळून माझ्यासारखे बंगले नाही बांधता येत.

त्यापेक्षा आयतं मिळालेलं घबाड फार मौल्यवान.

हार कशी स्वीकारावी, हे त्याला शिकवू नका;

कारण राजकारणात हरणाऱ्याला किंमत नाही.

साम, दाम, दंड, भेद वापरून फक्त

विजय मिळवायला शिकवा त्याला

कोठेही भ्रष्टाचार करायला मागेपुढं पाहू नको म्हणावं.

आणि शिकवा तरीही उजळ माथ्यानं वावरायला.

लोकांच्या समोर भाषण करायला शिकवा त्याला;

पण त्यांच्यासमोर खोटं बोलायला कचरू नकोस म्हणावं.

कारण लोकांना फसवणं फार सोपं असतं.

आणि आश्वासनं देताना विचार करू नको म्हणावं.

कारण आश्वासनं ही पुरी करण्यासाठी नसतात,

हे त्याला कळू दे!

निवडणुकीत अपयश मिळण्यापेक्षा

फसवून आलेलं यश महत्त्वाचं आहे.

लोकांच्यावर पैसा खर्च करायला शिकवा त्याला;

पण त्याच्या पाचपट पैसा वसूल करण्याची कला

त्याच्या अंगी बाणवा.

त्याला हेही सांगा,

लहान स्वप्न बाळगू नकोस म्हणावं;

पण मोठ्यांना तोंडावर विरोध करू नकोस

काट्यानं काटा काढून प्रतिस्पर्ध्याला

संपविण्याची कला शिकवा त्याला.

तसंच मनासारखं झालं तरी

जगाला दाखवू नकोस म्हणावं.

शाळेच्या अभ्यासात जास्त वेळ घालवू नकोस म्हणावं.

त्याला पास करायला तुम्ही आहातच.

कुठेही वेळेवर जात जाऊ नकोस म्हणावं,

अगदी शाळेतसुद्धा,

त्यामुळे आपली किंमत कमी होते, हे सांगा त्याला.

कुठेही चांगलं घडो अथवा वाईट;

त्याचा फायदा उठवायला शिकवा त्याला

जनतेत फूट पाडायला मागंपुढं पाहू नकोस म्हणावं

कारण फूट पडली तरच तुला मतं मिळतील,

कुणालाही तोंडावर नाही म्हणू नकोस म्हणावं;

पण फक्त उपयोगाच्या माणसांची कामे करत जा,

आणि त्यांचा उपयोग संपला, की

त्यांना लाथ मारून हाकलून द्यायचं धैर्य

त्याच्या अंगी बाणवा.

आणखीही सांगत रहा त्याला

कोणावरही पूर्ण विश्वास ठेवू नकोस;

अगदी सख्ख्या बापावरही,

कारण राजकारणात विश्वास ठेवणं हाच गुन्हा आहे.

प्रत्येकाकडे संशयानं बघायला हवं त्यानं.

आणि धीर धरायला शिकवा त्याला;

कारण चांगली माणसं जास्त दिवस राजकारणात

टिकत नाही म्हणावं.

इतरांच्या दोषावर कावळ्यासारखी नजर ठेवावी

कारण त्यामुळे आपले गुण वाढतात म्हणावं,

चोर, गुंडांना नावे ठेवू नकोस म्हणावं;

कारण निवडणुकीत हीच माणसं खरी मदत करतात

पोलिस, पत्रकार, इन्कमटॅक्सवाले

यांच्याशी वैर करू नको म्हणावं.

त्यांचा चांगला पाहुणचार करायला शिकवा त्याला

कारण पाण्यात राहून माशाशी वैर करू नये.

मास्तर, खूप काही बोलतोय,

खूप काही मागतोय

पण एवढं कराच तुम्ही (नाहीतर तुमची बदली करीन.)

मग फार मोठा पुढारी होईन बघा तो!

कारण माझं पोरगं,

माझ्यासारखंच नाठाळ कार्ट आहे हो ते!

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4419

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

vishal pawar

Wed , 11 July 2018

मार्मिक....