गांधींविषयी इतके गैरसमज का आहेत?
सदर - गांधी @ १५०
विनोद शिरसाठ
  • महात्मा गांधी यांच्या विविध भावमुद्रा
  • Mon , 03 July 2017
  • गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma gandhi कस्तुरबा गांधी Kasturba Gandhi सेवाग्राम आश्रम Sevagram Aashram

२ ऑक्टोबर २०१९ रोजी म. गांधी यांची १५०वं जयंती वर्षं साजरं केलं जाईल. त्याचं निमित्त साधून वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमानं २१-२२ फेब्रुवारीपासून ‘गांधी १५० जयंती अभियान’ सुरू केलं आहे. (२२ फेब्रुवारी हा गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांचा स्मृतिदिन असतो.) या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून ‘अक्षरनामा’वर दर महिन्याच्या दोन तारखेला गांधींविषयी एक लेख प्रकाशित केला जातो… हा लेख काल प्रकाशित होऊ शकला नाही म्हणून आज करत आहोत. या मालिकेतला हा सहावा लेख आहे.

.............................................................................................................................

प्रॅक्टिकल मित्रांनो,

काही महिन्यांपूर्वी ‘प्रॅक्टिकल क्लब’मध्ये नसलेला एक प्रॅक्टिकल मित्र म्हणाला, “... ‘थर्ड अँगल’मधून गांधीबाबा कसा दिसतो?” मी विचार न करता पट्कन बोलून गेलो, “लुई फिशरला दिसला तसा!” त्या प्रश्नावर मी नंतर बराच विचार केला, पण त्या उत्तरात बदल करावासा वाटला नाही... तुम्ही विचाराल, ‘कोण हा फिशर?’ हा लुई फिशर (Louis Fischer) भारतीय नव्हता, हे तर उघड आहे; पण तो ब्रिटिशही नव्हता. चौदा वर्षे रशियात घालवलेला तो होता अमेरिकन पत्रकार... साम्यवादी रशिया आणि भांडवलशाही अमेरिका या दोनही देशांचं समाजजीवन बारकाईनं न्याहाळणारा, दोन वर्षं सैन्यात घालवून आलेला फिशर ‘द नेशन’ या वृत्तपत्रासाठी काम करत होता. अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी त्याचे जवळचे संबंध होते. शक्य तितक्या पूर्वग्रहरहित मनानं निरीक्षण, अभ्यास, विश्लेषण करून भाष्य करणं हे त्याचं मुख्य वैशिष्ट्य होतं. जगातील मोठमोठे नेते अतिशय जवळून पाहिल्यानं ‘भारावून जाणं’ आणि ‘तुच्छता बाळगणं’ या दोनही अवगुणांपासून अलिप्त राहण्यात त्याला बऱ्यापैकी यश आलं होतं. त्यामुळेच तर रिचर्ड अ‍ॅटनबरोनं ‘गांधी’ चित्रपटासाठी मुख्य आधार म्हणून फिशरनं लिहिलेलं गांधीचरित्र निवडलं होतं. ‘Men and Politics'’ या पुस्तकामुळे जगभर प्रसिद्ध झालेला फिशर नंतरच्या काळात मात्र ‘Life of Mahatma Gandhi’ या ग्रंथाचा लेखक म्हणून ओळखला जाऊ लागला. ‘Gandhi and Stalin’, ‘Stalin and Hitler’ ही त्याची नंतरची पुस्तकं. या फिशरचं अतिशय दुर्लक्षित, पण फार महत्त्वाचं पुस्तक आहे - ‘A Week With Gandhi’. एखाद्या महनीय व्यक्तीच्या सहवासात राहण्याची संधी मिळाली तर तिच्याकडे कसं पाहावं, याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे पुस्तक!

फिशर जगप्रसिद्ध पत्रकार असला तरी, त्याची गांधींशी पहिली भेट झाली जून १९४२ मध्ये. ४ ते १० जून १९४२ या काळात सेवाग्राम आश्रमात गांधींच्या सहवासात फिशर राहिला. त्या सात दिवसांत सकाळी आणि संध्याकाळी गांधींसोबत फिरायला जाणं, दोन वेळचं जेवण त्यांच्याबरोबर घेणं आणि दुपारी गांधींची एक तास मुलाखत घेणं - असा त्याचा ‘दिनक्रम’ होता. त्या सात दिवसांत केलेलं निरीक्षण, झालेली चर्चा आणि मनात आलेले विचार यांचं ‘स्टेनोग्राफिक रेकॉर्ड’ फिशरने ठेवलं होतं. त्यातूनच तयार झाली त्याची डायरी. तीच डायरी ‘A Week With Gandhi’ या नावानं पुस्तकरूपानं प्रसिद्ध झाली. त्या शंभर पानी पुस्तकाला ‘कार्ल हीथ’ (Carl Heath) यांनी अर्ध्या पानाची प्रस्तावना लिहिली आहे. त्यात त्यांनी म्हटलंय, “गांधीजींना 'Semi-mystical atmosphere’ मधून (गूढरम्य वलयातून) बाहेर काढण्यात हे पुस्तक यशस्वी ठरलंय.” आणि ते खरं आहे. शिवाय भाषा, शैली व विचार या तिन्हींसाठी हे पुस्तक ‘पारायण’ करण्याच्या योग्यतेचं आहे आणि ९ ऑगस्ट १९४२ च्या ‘भारत छोडो’ चळवळीच्या दोन महिने आधी गांधीजी कसा विचार करत होते, हे समजून घेण्यासाठीही महत्त्वाचं आहे. गांधीजींचं खाणं-पिणं, उठणं-बसणं, चालणं-बोलणं यांच्या नोंदी वाचताना आपल्याला गांधींच्या सहवासाचा ‘फील’ येऊ शकतो. फिशरसारखा चाणाक्ष पत्रकार जेव्हा म्हणतो की, ‘त्या आठ दिवसांत मला गांधींकडून आणि गांधींबाबत बरंच काही शिकायला मिळालं,’ तेव्हा गंमत वाटते.

पहिल्याच दिवशी झालेल्या मुलाखतीच्या शेवटी गांधी फिशरला म्हणाले, ‘I am very imperfect. Before you are gone you will have discovered a hundred of my faults, and if you don't, I will help you to see them.’ त्यानंतरचे त्यांचे संवाद म्हणजे दोन वेगवेगळ्या संस्कृतीतून आलेल्या दोन सुसंस्कृत मनांची वैचारिक लढाई आहे. परस्परांना दिलेली दाद, परस्परांचा आदर, आपले विचार बदलण्याची तयारी आणि तसं कबूल करण्याचा प्रांजळपणा- हे सारंच अफलातून आहे.

दुसऱ्या दिवशी मुलाखत संपल्यावर फिशरने लिहिलं, “आज मी गांधींच्या घेतलेल्या मुलाखतीला ऐतिहासिक महत्त्व आहे. अतिशय ज्वलंत प्रश्नावरील आपलं मत गांधींनी आज बदललं. ‘ब्रिटिशांनी चालतं व्हावं आणि आम्हाला ईश्वराच्या स्वाधीन करावं’ हे आपलं पूर्वीचं विधान बदलून ते म्हणाले, ‘ब्रिटिशांनी इथे राहून जपान-जर्मनीशी युद्ध करण्यास हरकत नाही.’...” फिशरने उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर गांधींनी आपलं आधीचं मत बदललं होतं.

तिसऱ्या दिवशी फिशरने सरळच प्रश्न विचारला, “काँग्रेस उद्योगपतींच्या प्रभावाखाली आहे आणि गांधींनाही हेच उद्योगपती पैसे पुरवतात, असं म्हटलं जातं; यात कितपत तथ्य आहे?” गांधींजी सरळ सांगतात, ‘Unfortunately, they are true.’ फिशर विचारतात, “काँग्रेसचा होणारा खर्च किती प्रमाणात उद्योगपतींकडून केला जातो?” गांधी आधीच्याच सहजतेनं सांगतात, ‘Practically all of it.’

सुभाषबाबूंचा विषय काढल्यावर गांधी त्यांना Patriot of Patriot आणि Misguided ही विशेषणं एकाच वेळी लावतात. ‘सुभाषबाबूंना मी विरोध केला. दोन वेळा काँग्रेस अध्यक्षपदापासून दूर ठेवलं’ हेही स्पष्ट सांगतात. परदेशांची मदत घेऊन भारत स्वतंत्र करण्याच्या सुभाषबाबूंच्या कल्पनेला फिशर सहानुभूती दाखवतात, तेव्हाही गांधी अधिकारवाणीने सांगतात, ‘I do not want help from anybody to make India Free. I want India to save herself.’ हे विधान संदर्भासह वाचलं तर गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ म्हणण्यास विरोध करणाऱ्यांचा विरोध थोडा तरी कमी होईल.

या पुस्तकातील संवाद हे विनोदबुद्धी आणि जुगलबंदीचे उत्तम नमुने आहेत. शेवटच्या दिवशी ‘You are a fine listener’ हे गांधींनी फिशरला दिलेलं ‘प्रशस्तिपत्र’ आणि ‘I had slept better than I had, for many years.’ असं प्रांजळपणे सांगून फिशरने गांधींना केलेला ‘सलाम’ यामुळे हे डायरीवजा पुस्तक पुन: पुन्हा वाचण्याचा मोह होतो. पुस्तकाच्या शेवटी ‘Comments’ शीर्षकाखाली लिहिलेला सात पानांचा मजकूर गांधींजींचे अंतरंग उघड करणारा आणि त्यांच्या

व्यक्तिमत्त्वाचा गाभा दाखवणारा आहे. खरं तर त्या ‘Comments’ मुळापासून वाचण्याला पर्याय नाही, पण त्यातलाही मध्यवर्ती भाग फिशरच्याच शब्दांत देतो.

“गांधींशी संवाद साधण्यात वेगळाच बौद्धिक आनंद मिळतो. ते आपलं मन उघड करतात (He opens his mind) आणि संवाद साधणाऱ्याला आत डोकावू देतात. आपले मनोव्यापार कसे चालतात, हे पाहू देतात. बहुतांश लोक आपल्या मनातील कल्पना आणि विचार पक्क्या स्वरूपात पुढे आणतात. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्याची संधी मिळत नाही. गांधींबाबत तसं घडत नाही. ते आपल्या विचारप्रक्रियेतील प्रत्येक पायरी दाखवतात. एखादा लेखक आपल्या कथेचा कच्चा

“मसुदा (ड्राफ्ट) तयार करतो, दुसरा आणि तिसरा मसुदा केल्यानंतर शेवटचा मसुदा तयार होतो. प्रत्येक वेळी त्यात बदल होत जातो. कधी कधी त्यातला बदल दुसऱ्या टोकाचाही असू शकतो. ज्यांनी शेवटचाच ड्राफ्ट पाहिलाय त्यांना माहीत नसतं, ही कथा किती टप्प्यांतून तयार झालीय. पण ज्यांनी ती प्रक्रिया पाहिली आहे, त्यांना त्यात काहीच वावगं दिसत नाही. किंबहुना, ती कथा अधिक चांगली समजते. पण ज्यांना ती प्रक्रियाच समजत नाही, ते मात्र ‘यात बदल झाले’ म्हणून तक्रार करतात.

“गांधींबाबतही तसंच घडतं. एखाद्या विषयावरचं मत निश्चित होईपर्यंतची विचारप्रक्रिया समोरच्या व्यक्तीला ते दाखवतात (Actually, he thinks aloud). त्यामुळे गांधींजी बदलले, असं त्या प्रक्रियेचं आकलन न झालेल्या व्यक्तीला वाटतं आणि गांधी म्हणतात, ‘होय, मी बदललो.’ यामुळे काही लोकांचा गोंधळ उडतो आणि मग असे लोक ‘गांधी ढोंगी आहेत, दांभिक आहेत’ असं म्हणून मोकळे होतात किंवा ‘गांधीजी विसंगत विधानं करतात’ असा प्रचार करतात. गांधी अशा लोकांची दखल घेत नाहीत. लोक काय अर्थ काढतील, याचीही काळजी करत नाहीत.

“भारतात आल्यावर अनेक ब्रिटिश आणि भारतीय नेत्यांच्या मुलाखती मी घेतल्या. बहुतांश लोक ‘विशिष्ट भाग प्रसिद्ध करू नका’, अशी सूचना करत असत. पण गांधींनी मात्र मी त्यांच्याविषयी काय लिहीन, त्यांच्या विधानांचा कसा अर्थ लावीन याची चिंता केली नाही. मुलाखतीच्या वेळी गांधी मला सांगत नसत, ते माझ्याशी बोलत असत. (He did not talk at me, he talked to me) मोहंमद अली जीनांच्या सहवासातही मी अनेक तास घालवले. ते कुशल संसदपटू आहेत, चांगले वक्ते आहेत, राजकीय मुत्सद्दी आहेत; पण त्यांची मुलाखत घ्यायला गेल्यावर ते मला सांगत असत (He talked at me). ते मला त्यांचं मत पटवून देण्याचा प्रयत्न करत. जीनांना एखादा प्रश्न विचारल्यावर, त्यांचं उत्तर ऐकताना ‘रेकॉर्ड’ केलेला भाग ऐकतोय, असं वाटत असे. जे मी पूर्वीच ऐकलेलं आहे किंवा वाचून समजू शकलो असतो, तेच त्यांनी मला ऐकवलं. पण गांधींना एखादा प्रश्न विचारल्यावर त्या प्रश्नावर मत बनवण्याची त्यांची प्रक्रिया घडत आहे, असं मला जाणवत असे. त्यांचे मनोव्यापार मी पाहू शकत होतो, ऐकू शकत होतो. जीना बोलत तेव्हा मात्र रेकॉर्डरची खरखर ऐकतोय, असं मला वाटत असे. जीनांनी मला निष्कर्षापलीकडे काहीच दिलं नाही. गांधी निष्कर्षाप्रत कसे येतात, याचा मी पाठलाग करू शकत होतो. गांधींशी नेमकेपणाने भिडलात, तर विचारांची नवी दालनं उघडली जातात. त्यामुळे त्यांची मुलाखत घेताना आपण शोधमोहिमेवर आहोत, असं वाटत असे. गांधी स्वत:ही कधी कधी आपण व्यक्त केलेल्या विचारांबाबत आश्चर्य व्यक्त करत असत.

“गांधींनी केवळ वस्तुस्थिती आणि त्यावरची मतं सांगितली नाहीत; तर स्वत:च्या विरोधात दारूगोळाही पुरवला. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांना गांधी हे गोंधळून टाकणारे, मुद्दाम डिवचणारे असे वाटले असावेत. कृती पाहिजे असते, तेव्हा गांधी हुकूमशहाप्रमाणे भासतात. आपलं तर्कशास्त्र आणि जनतेचा भरघोस पाठिंबा यांच्या बळावर ते विरोधकांना नामोहरम करतात. पण त्यांच्या विचारांत मात्र हुकूमशहासारखं काही नसतं. ‘आपण चुकलो’ असं हुकूमशहा कधीच मान्य करत नाहीत. गांधी मात्र सतत आपल्या चुका कबूल करीत आले आहेत.”

मित्रहो, फिशरने गांधींच्या व्यक्तिमत्त्वावर अशा अनेक अंगांनी प्रकाश टाकलाय. ते वाचताना पुन: पुन्हा एकच वाटत राहतं- गांधींविषयी इतके गैरसमज का आहेत, या प्रश्नाचं उत्तर यात दडलेलं आहे! असो.

मला सांगायचंय काय तर १३६ व्या जयंतीच्या निमित्ताने गांधीजींना समजून घेणं किंवा त्यांच्याविषयी असलेले गैरसमज दूर करणं, ही कामं फिशरची पुस्तकं अधिक परिणामकारकपणे करू शकतील, हे तुमच्या मनावर ठसवण्यासाठी जरा विस्ताराने सांगितलं. ते सांगताना इंग्रजी वाक्यांचा वापर जरा जास्तच करावा लागला; पण यात अपरिहार्यता होती आणि माझी मर्यादाही!

(१ जुलै २०१५ रोजी साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘थर्ड अँगल : थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे’ या पुस्तकातून साभार.)

............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Bhagyashree Bhagwat

Mon , 03 July 2017

अतिशय सुंदर! संपूच नये, असं वाटायला लावणारा लेख!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......