दि इन्व्हेस्टिगेशन : कवितेवर प्रेम करणाऱ्या दोन अवलियांची वेधक कहाणी
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
नितिन जरंडीकर
  • ‘दि इन्व्हेस्टिगेशन’चं मुखपृष्ठ आणि लेखक जे. एम्. ली
  • Sun , 21 May 2017
  • ग्रंथनामा Booksnama जे. एम्. ली J.M. Lee दि इन्व्हेस्टिगेशन The Investigation नितिन जरंडीकर Nitin Jarandikar

मानवी समाजाची ‘स्टेरिओ टाइप्स’ घडवण्याची आणि सगळ्याच गोष्टींची सरसकट ‘ब्लॅक अँड व्हाईट’मध्ये विभागणी करण्याची एक सहजसुलभ प्रवृत्ती असते. वानगीदाखल सांगायचं झाल्यास आपल्याकडे दक्षिण भारत म्हणजे कन्नडीगांचा एक सलग भूप्रदेश असल्याचं मिथक बनवलं गेलं आहे. दक्षिण भारतातील भाषा, रूढी-परंपरा आदी गोष्टी एकसमान असल्याची धारणा बनवली गेली आहे. तशाच पद्धतीने आशिया खंडातील जपान, कोरिया आणि चीन हे देश म्हणजे एकसंघ संस्कृतीचे प्रदेश आहेत अशी काहीशी भावना आहे. वस्तुतः भाषेपासून धर्म, रूढी-परंपरा, अर्थकारण, समाजकारण आणि अर्थातच राजकारण या सर्व बाबतीत जपान, कोरिया आणि चीन हे मूलत: पूर्णपणे भिन्न प्रदेश आहेत. पैकी जपान आणि कोरिया यांचे राजकीय संबंध कधीच फारसे सौहार्दाचे नव्हते. किंबहुना २०व्या शतकाच्या सुरुवातीला जपानने कोरियावर आक्रमण करून कोरियाला आपलं अंकित केलं होतं. पुढे दुसऱ्या महायुद्धानंतर १९४५मध्ये जपानच्या शरणागतीनंतर कोरिया स्वतंत्र झाला. या साऱ्या तपशिलाची आठवण होण्याचं कारण म्हणजे जे. एम्. ली या कोरियन लेखकाची कादंबरी - ‘दि इन्व्हेस्टिगेशन’.

दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान युरोपमध्ये विविध घडामोडी घडत होत्या. जपानने पर्ल हार्बरवर हल्ला करून युद्धाचं पारडे जर्मनी-इटलीच्या बाजूनं झुकवलं होतं. त्याच वेळी जपानमधील फुकुओका तुरुंगात एक वेगळंच नाट्य घडत होतं. दुष्काळाला कंटाळून उद्योगधंद्याच्या आणि शिक्षणाच्या निमित्ताने अनेक कोरियन नागरिक १९व्या शतकाच्या अखेरीपासून जपानमध्ये विस्थापित होत होते. जपानने १९१०मध्ये आक्रमण करून कोरिया ताब्यात घेतलं. परिणामत: जपानस्थित कोरियन लोकांच्या मनात विद्रोहाची भावना जागृत झाली. जपानमध्ये संघटित होऊ लागलेल्या असंतोषी कोरियन जनतेविरुद्ध मग जपानने दडपशाहीचं अस्त्र उगारलं. संशयास्पद हालचाली, विद्रोही लिखाण आणि देशद्रोही विचार या आरोपाखाली कोरियन जनतेची धरपकड सुरू झाली. नागरी कायद्याचं उल्लंघन या आरोपाखाली त्यांची तुरुंगात रवानगी झाली. पैकी फुकुओका तुरुंगातील कोरियन जनतेवर होत असलेल्या अत्याचाराची पार्श्वभूमी प्रस्तुत कादंबरीला आहे.

जपानने शरणागती पत्करली आहे आणि अमेरिकेने जपानी सैनिकांना ताब्यात घेतलं आहे. कादंबरीचा निवेदक असाच एक अमेरिकेनं ताब्यात घेतलेला युद्धकैदी आहे. त्याला फुकुओका तुरुंगात डांबलं आहे आणि युद्धाच्या कालखंडात या तुरुंगात काय घडत होतं, याचा तपशील तो लिहून काढतो आहे. इथून कादंबरीला सुरुवात होते.

एक सोल्जर गार्ड म्हणून कादंबरीचा निवेदक फुकुओका तुरुंगा‌‌‍त १९४३मध्ये रुजू होतो. सुगियामा नावाच्या एका गार्डच्या हाताखाली तो कामाला सुरुवात करतो. तुरुंगामध्ये सुगियामा हा त्याचं क्रौर्य आणि अमानुषपणा याबद्दल कुविख्यात आहे. त्याच्या अघोरीपणाच्या अनेक दंतकथा आहेत. कोरियन कैद्यांच्या मनात त्याच्याबद्दल कमालीचा राग आणि तिरस्कार आहे. एके दिवशी सुगियामाच्या ऑफिसमध्ये त्याची निर्घृण हत्या करून उलटा टांगलेला मृतदेह मिळतो. सुगियामाच्या हत्येनंतर खुन्याने त्याचे ओठ शिवलेले आहेत हे पाहून निवेदक शहारून जातो. या खुनाचा तपास करण्याची जबाबदारी निवेदकावर सोपवली जाते आणि या तपासातून मती गुंग करून टाकणाऱ्या अनेक गोष्टी पुढे येऊ लागतात.

सुगियामाच्या मृतदेहाची तपासणी करताना निवेदकाला त्याच्या कोटामध्ये एक जपानी भाषेत लिहिलेली कविता सापडते. कवितेच्या भाषेचा डौल आणि प्रतिमांची योजनापाहून निवेदक अचंबित होतो. ऑफिसमधील कागदपत्रावरून निवेदक कवितेतील अक्षर आणि सुगियामाचं हस्ताक्षर पडताळून पाहतो. कवितेतील अक्षर सुगियामाचंच असल्याची निवेदकाची खात्री पटते. पण सुगियामासारखा गृहस्थ अशा पद्धतीची कविता लिहू शकतो यावर निवेदकाचा विश्वासच बसत नाही. अधिक चौकशी करता त्याला माहिती मिळते की, सुगियामा हा तुरुंगात सेन्सॉर ऑफिसर म्हणूनही काम करायचा. कोरियन कैद्यांचा जो पत्रव्यवहार व्हायचा (अर्थातच जपानी भाषेतून) तो सेन्सॉर करण्याचं काम सुगियामा करत असे. कोरियन भाषेतून पत्रव्यवहार करण्याला कोरियन कैद्यांना मज्जाव होता. किंबहुना कोरियन भाषेतील जे जे सापडेल ते चक्क जाळून टाकण्याचा सुगियामाला आदेश होता.

सुगियामाच्या खुनाच्या संशयाची सुई आपसूकपणे कोरियन कैद्यांकडे निर्देश करत असल्याने, मागोवा घेत निवेदक दोन कैद्यांपर्यंत जाऊन पोहोचतो : १) हिरानुमा (जो एक कवी असल्याचं कळतं) आणि २) चोई ची-सू. सुगियामाने ठेवलेल्या नोंदीनुसार या दोहोंना त्याने कित्येक वेळा अमानुष मारहाण केली आहे, कित्येक वेळा त्यांची अंधारकोठडीत रवानगी केली आहे. अंधारकोठडीची शिक्षा म्हणजे कैद्यांच्या दृष्टीने क्रौर्याची परिसीमा होती. पण निवेदकाला या अंधारकोठडीचीच शंका येते. अंधारकोठडीची कसून तपासणी केल्यावर निवेदकाच्या लक्षात येतं की, शौचकुपाखालून एक भुयार खोदलेलं आहे. सुगियामाचा खून होण्याच्या आदल्या दिवशी त्याने चोईला जबर मारहाण केल्याची नोंद सुगियामाने आपल्या दप्तरात केलेली आहे. स्वाभाविकपणे चोईला इंटरॉगेशन रूममध्ये पाचारण केलं जातं. पुन्हा एकदा त्याला अमानुषपणे मारहाण केली जाते आणि अखेर चोई आपल्या गुन्ह्याची कबुली देतो. या भुयाराचा सुगावा सुगियामाला लागलेला असतो. या भुयारातून आपण तुरुंगाबाहेर पडू शकू अशी चोईला आशा वाटत असते. पण सुगियामा हे भुयार चोईला बुजवायला सांगतो. अन्यथा बेदम मारहाण आणि भयावह मृत्यूला सामोरं जावं लागेल अशी धमकी देतो. परिणामी सुगियामाचा काटा काढण्यासाठी आपण त्याचा खून केल्याचे चोई मान्य करतो. निवेदकाच्या या तपासाबद्दल त्याचं अभिनंदन केलं जातं, त्याला बढती दिली जाते. पण सुगियामाच्या कोटातील कवितेचं गूढ काही अजून उकलत नाही.

सुगियामाचा खून होण्याआधी फुकुओका तुरुंगात अजून एक महत्त्वाची घटना घडली होती. जपानमधील एक ख्यातनाम डॉक्टर कैद्यांची देखभाल करण्यासाठी म्हणून तुरुंगातील दवाखान्यात रुजू झाले होते. त्यांच्या या औदार्याचं जपानी प्रसारमाध्यमांनी भरभरून कौतुकही केलं होतं. या दवाखान्यात काम करणारी एक नर्स आहे, जी एक उत्तम पियानोवादकही आहे. पियानोच्या सुरावटींच्या ओढीने निवेदक या नर्सपर्यंत येऊन पोहोचतो. नर्सकडून निवेदकाला सुगियामा हा पियानो दुरुस्त करायचा अशी एक माहिती मिळते. तिच्या मते सुगियामा हा फार संवेदनशील स्वभावाचा गृहस्थ होता. तो संगीत आणि साहित्याचा आस्वादक होता आणि आयुष्यावर तो भरभरून प्रेम करायचा. सुगियामाबद्दल मिळणाऱ्या या परस्परविरोधी माहितीने निवेदक चक्रावून जातो. त्यामुळे सुगियामाबद्दलचं आणि खासकरून त्याच्याकडच्या कवितेचं गूढ उकलण्यास केवळ हिरानुमाच मदत करू शकतो हे उमगून निवेदक हिरानुमाला इंटरॉगेशन रूममध्ये पाचारण करतो.

तुरुंगातील नोंदीनुसार हिरानुमा हा इंग्रजी साहित्यातील उच्च शिक्षण घेण्यासाठी १९४२मध्ये कोरियातून जपानला आला होता. १९४४मध्ये नागरी कायदा भंग केल्याच्या आरोपावरून त्याला दोन वर्षांचा कारावास झाला होता. निवेदक हिरानुमाकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांचा तपशील तपासतो, ज्यात त्याला दस्तोव्हस्कीच्या कादंबऱ्या आणि आंद्रे गाईद, बोद्लेअर, व्हेलरी, फ्रान्सिस जेम्स आणि रिल्के यांच्या कवितांच्या बरोबरीने स्वतः हिरानुमाने जपानी भाषेत लिहिलेल्या काही कविता सापडतात. निवेदकाने पूर्वायुष्यात पुस्तकांच्या दुकानात काम करत असताना हे सारे साहित्यिक वाचून काढलेले आहेत. त्यामुळे त्याला हिरानुमाच्या कवितेची खोली उमगून येते. हिरानुमाच्या कविता वाचून तो अवाक होतो. इंटरॉगेशन रूममध्ये निवेदक हिरानुमाला बोलतं करतो आणि हिरानुमाच्या निवेदनातून उलगडत जातो एक क्रूरकर्मा गार्ड आणि एक संवेदनशील कैदी, एक निर्दयीपणे पुस्तकांची कत्तल करणारा अधिकारी आणि कविता हेच आयुष्य मानणारा कवी यांच्यातील एक हृद्य प्रवास.

हिरानुमाचं मूळचे कोरियन नाव युन डॉन्ग-जू. पण जपानमध्ये कोरियन नाव चालत नसल्याने कागदोपत्री त्याने हिरानुमा हे जपानी नाव स्वीकारलेलं असतं. विद्यापीठात शिकत असताना आपल्या कवितांचं एक पुस्तक छापून यावं अशी त्याची इच्छा असते. परंतु आसपासचं वातावरण पाहता त्याच्या प्राध्यापकांनी त्याला पुस्तक न छापण्याचा सल्ला दिलेला असतो. जपानी सैनिक कोरियन नागरिकांची सरसकट धरपकड सुरू करतात. परिणामी हिरानुमादेखील तुरुंगात डांबला जातो. तुरुंगात हिरानुमाची कोरियन भाषेतील पुस्तकं आणि कविता जाळून टाकल्या जातात. हिरानुमाने त्याच्या काही कविता जपानी भाषेत अनुवादित केलेल्या असतात. त्या सेन्सॉर करण्यासाठी म्हणून सुगियामाकडे आलेल्या असतात. हिरानुमाच्या कविता वाचून हे काहीतरी वेगळं आहे याचा साक्षात्कार सुगियामाला होतो. हिरानुमा कैद्यांना त्यांच्या घरी पत्र लिहून पाठवत असतो. हिरानुमाची काव्यमय पत्रं वाचून सुगियामा चकित होतो. पत्रातले शेक्सपिअर, दस्तोव्हस्की, बोद्लेअर, रिल्के यांचे संदर्भ सेन्सॉर करण्याच्या निमित्ताने सुगियामा मूळचे सगळं साहित्य वाचून काढतो. सुगियामात अंतर्बाह्य बदल घडून येतो आणि हिरानुमा हा श्रेष्ठ दर्जाचा कवी असल्याची त्याची खात्री पटते. परिणामी देशद्रोहाचा धोका पत्करूनही सुगियामा हिरानुमाच्या कविता वाचवण्याचा परोपरीने प्रयत्न करत राहतो.

असं असलं तरी निवेदकाला एक गोष्ट खटकत राहते की, सुगियामाच्या नोंदीनुसार सुगियामा चोईइतकीच हिरानुमालादेखील मारहाण करायचा. सुगियामाच्या या दुटप्पी स्वभावाचा शोध घेता घेता निवेदकाला एक गोष्ट लक्षात येते की, कडाक्याच्या थंडीमुळे अनेक कैदी आजारी पडले आहेत. सुदैवाने प्रथितयश डॉक्टर तुरुंगात उपलब्ध आहेत. पण निवेदकाला आश्चर्याचा धक्का बसतो जेव्हा त्याला कळून चुकते की, उपचारासाठी केवळ धडधाकट कोरियन कैद्यांचीच निवड केली जात आहे. आणि यातून निवेदकाला तुरुंगात सुरू असलेल्या एका मोठ्या षडयंत्राचा सुगावा लागतो. प्रथितयश म्हणवले जाणारे डॉक्टर तुरुंगात खरे तर कैद्यांवरती प्रयोग करण्यासाठी आले आहेत. महायुद्धामुळे मोठ्या प्रमाणात जपानची हानी होत आहे. सैनिकांचे जीव वाचवण्यासाठी रक्तसाठा अपुरा पडत आहे. त्यामुळे कृत्रिम रक्त तयार करण्याचे प्रयोग तुरुंगात सुरू आहेत. या प्रयोगासाठी हेतुपुरस्सर कोरियन कैद्यांची निवड केली जात आहे. सुगियामाला या षडयंत्राची कल्पना आहे. त्यामुळे हिरानुमाची निवड होऊ नये यासाठी सुगियामा त्याला मारहाण करून आजारी पाडत आहे. पण अखेरीस सुगियामाच्या खुनानंतर हिरानुमाची निवड होते. निवेदकाला हा सारा प्रकार उमगून येईपर्यंत फार उशीर झालेला असतो.

बनवण्यात येणारे कृत्रिम रक्त कोरियन कैद्यांच्या शरीरात चढवलं जाई आणि त्यांच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला जात असे. निवेदकाला हिरानुमा हळूहळू विकल होत चालला आहे, एक-एक गोष्ट तो विसरत चालला आहे याची जाणीव होते. शेवटी मरणासन्न अवस्थेत हिरानुमाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं. त्याची अंतिम घटिका जवळ येऊनही डॉक्टर त्याच्यावरती कोणतेही उपचार न करता त्याच्या मानसिक आणि शारीरिक हालचालीच्या नोंदी घेत राहतात. आपल्याच कवितेच्या ओळी आणि रिल्के, बोद्लेअर अशी नावं पुटपुटत हिरानुमा अखेर जगाचा निरोप घेतो.

या साऱ्या घडामोडीत निवेदकाच्या एक गोष्ट लक्षात येते की, तोदेखील सुगियामाप्रमाणे हिरानुमाच्या कवितेच्या प्रेमात पडला आहे. तोदेखील देशद्रोहाचा धोका पत्करून हिरानुमाला सहानुभूती दाखवतो आहे. किंबहुना सुगियामाने ज्या-ज्या गोष्टी केल्या आहेत, तो स्वतःदेखील त्याच गोष्टी करतो आहे. त्यामुळे आपली गतदेखील सुगियामाप्रमाणे होणार हे त्याला कळून चुकतं. निवेदकाला अखेरचा धक्का तेव्हा बसतो, जेव्हा त्याला कळून चुकतं की चोई हा काही सुगीयामाचा खुनी नसून खरा खुनी कोणीतरी निराळाच आहे, हा सगळा एक शिस्तबद्ध सापळा आहे, ज्यात आपण पुरते अडकलो आहोत, आपल्याला बळीचा बकरा बनवण्यात आलं आहे.

खरं तर सस्पेन्स थ्रिलर असणाऱ्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवत नेणाऱ्या या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे ती सुगियामा आणि हिरानुमा यांच्यातील हृदयस्पर्शी नातेबंधाची कहाणी. हिरानुमाच्या रूपाने आपल्यासमोर उभा राहतो तो एक अस्सल ‘कमिटेड’ कलाकार. तुरुंगात अवतीभवती नैराश्य आणि हतबलता यांचा खेळ सुरू असतानाही हिरानुमाची कवितेवरची आणि सर्जनावरची निष्ठा बिलकूल ढळत नाही. कैद्यांसाठी लिहिलेल्या पोस्टकार्डाचे बारीक बारीक तुकडे एकत्र चिकटवून बनवलेल्या कागदावर तो आपल्या कविता उतरवून काढतो. चोईच्या बरोबरीने हिरानुमानेही एक भुयार खोदलं आहे. मात्र हे भुयार उघडतं ते एका अनोख्या जगात– सुगियामाच्या ग्रंथालयात. या ग्रंथालायातली सरकारी माहितीवजा पुस्तकं चोरून, त्यांची पानं काळी करून त्यावर जप्त केलेली जपानी भाषेतली पुस्तकं तो कोरियन भाषेत अनुवादित करत राहतो. हा सारा प्रकार अर्थातच सुगियामाला ठाऊक आहे. सुगियामाने एवढं धाडसी पाउल उचलण्याचं कारण म्हणजे या बदल्यात हिरानुमाने त्याला आपल्या कविता देण्याचं कबूल केलं आहे. त्यामुळे हिरानुमा जपानी भाषेत आपली कविता सांगत असे आणि सुगियामा ती आपल्या अक्षरात उतरवून काढत असे. शिळ वाजवत गाणी गुणगुणणं, पतंग उडवणं आणि कविता करणं या आधारे हिरानुमा आपले तुरुंगातील दिवस काढतो आहे. तुरुंगातून आपण सुखरूप बाहेर पडणार याची त्याला खात्री आहे. सुगियामाने तुरुंग अधिकाऱ्यांची विशेष परवानगी घेऊन हिरानुमाला आठवड्यातून एकदा पतंग उडवण्याची सवलत दिली आहे. यातही सुगियामाची चलाखी अशी आहे की, पतंग तो स्वतः बनवून आणायचा आणि पतंगावर हिरानुमाची एक कविता लिहून काढायचा. एवढ्याच आशेवर की पतंग तुरुंगाबाहेर कुठेही पडला तरी कोणीतरी तो उचलेल आणि हिरानुमाची कविता जतन करून ठेवेल. अशी ही कवितेवर प्रेम करणाऱ्या मुलखावेगळया दोन भिन्न व्यक्तिमत्त्वाची कादंबरी मुळातूनच वाचण्यासारखी आहे.

कादंबरीतील हिरानुमा म्हणजेच युन डॉन्ग-जो ही खरीखुरी व्यक्तिरेखा आहे. बाकी सारं कथानक काल्पनिक आहे. डॉन्ग-जोला खराच जपानमध्ये कारावास झाला होता आणि तिथेच त्याचं निधनही झालं. लेखकाने कादंबरीच्या शेवटी दिलेल्या टिपणानुसार आणि इंटरनेटवरच्या उपलब्ध माहितीनुसार युन डॉन्ग-जो आजही कोरियामध्ये एक महत्त्वाचा कवी मानला जातो. त्याची कविता त्याच्या मृत्यूनंतर छापली गेली. निसर्गकविता, भावकविता आणि बंडखोरीचा तीव्र स्वर हा तिचा मूळचा स्थायीभाव आहे. कोरियातल्या सर्वच शाळांत आजही डॉन्ग-जोची कविता शिकवली जाते.

१९६५ मध्ये जन्मलेले जे. एम्. ली हे दक्षिण कोरियातील एक ख्यातनाम लेखक आहेत. कोरियामध्ये त्यांच्या कादंबऱ्यांची विक्रमी संख्येनं विक्री होत असते. २०१२ मध्ये कोरियन भाषेत लिहिलेली प्रस्तुत कादंबरी २०१४ मध्ये चि युंग-किम यांनी इंग्रजीत अनुवादित केलेली आहे.                                

...............................................................................................................................

दि इन्व्हेस्टिगेशन - जे. एम्. ली.

इंग्रजी अनुवाद - चि युंग-किम

मँटल/पॅन मॅकमिलन, लंडन

पाने - ३२७, मूल्य -३५० रुपये. (किंडल ई-बुक आवृत्ती)

...............................................................................................................................

लेखक इंग्रजी विषयाचे अध्यापन करतात.

nitin.jarandikar@gmail.com 

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.                                                             

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......