गोरे रंग पे ना इतना गुमान कर...
अर्धेजग - कळीचे प्रश्न
अलका गाडगीळ
  • या लेखातील सर्व छायाचित्रं आंतरजालावरून घेतली आहेत.
  • Fri , 19 May 2017
  • अर्धे जग कळीचे प्रश्न वर्णभेद Racism तरुण विजय Tarun Vijay गोरा रंग बिपाशा बासू Bipasha Basu स्मिता पाटील Smita Patil नंदिता दास Nandita Das डार्क इज ब्युटिफुल Dark Is Beautiful

दिल्लीजवळील नोयडामध्ये स्थानिकांनी एका नायजेरियन कॉलेज विद्यार्थिनीला मारहाण केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली. सरकारी प्रवक्त्यांनी सारवासारवी सुरू केली, गुन्हेगारांना ‘कडी से कडी सजा होगी’, ‘आफ्रिकन विद्यार्थिनीला त्वरित न्याय मिळेल’, अशा घोषणा झाल्या. विदेश मंत्रालय आणि सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते बोलू लागले. ‘कृष्णवर्णीय दाक्षिणात्यांबरोबर राहत असल्यामुळे आम्ही वर्णभेदी कसे असू शकतो?’, भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार तरुण विजय उद्गारले!

वर्णभेदाचा धिक्कार करताना वर्णभेद करणारं उदाहरण देण्याची हाराकिरी भारतीयांनाच जमू शकते! कारण आपल्या रोमारोमांत वर्ण, वंश आणि जातीभेद भिनला आहे. त्याशिवाय उत्तर-दक्षिण वाद, प्रांतवाद, भाषावाद अशी वादावादीही सुरू असते. गेली अनेक वर्षं आफ्रिकी आणि ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत.

मूळ प्रश्न हा आहे की, भारतीयांना आपल्या कातडीच्या रंगाची कधीपासून लाज वाटायला लागली? जगात इतरत्रही गोरा युरोपिय वंशच श्रेष्ठ असं कधी आणि कसं ठसवलं गेलं? वसाहतवाद आणि त्यापाठोपाठ आलेली बाजारपेठीय अर्थव्यवस्था यांचा इतिहास आपल्याला वर्ण आणि वंशाच्या राजकारणाबद्दल बरंच काही सांगून जातो.

ज्ञात इतिहासातील वांशिकतेचं पहिलं प्रकरण युरोपात घडलं. तेराव्या-चौदाव्या शतकांत ज्यू धर्मीय जादूटोणा आणि पिशाच्चाचे पाईक असल्याच्या संशयावरून त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. शिवाय ज्यू गोऱ्या युरोपियनांपेक्षा कमी गोरे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असत. त्यांना गावातील मुख्य वस्त्यांमध्ये राहण्याची परवानगी नव्हती. या छळांमुळे हजारो ज्यूंनी धर्मांतर करून आपली सुटका करून घेतली. जीझसचे मारेकरी म्हणून त्यांना पहिल्या शतकापासूनच शत्रू मानलं गेलं होतं. ज्या ज्यूंनी धर्मांतरास नकार दिला, त्यांचा छळ दुसऱ्या महायुद्धापर्यंत सुरू राहिला.

रेनेसन्स काळात आशिया आणि आफ्रिकेतील सावळ्या आणि कृष्णवर्णीय लोकांशी युरोपियनांचा संपर्क झाला. सतराव्या शतकात (१६६७) स्पॅनिश मुसाफिरांनी काही आफ्रिकी लोकांना गुलाम बनवलं, पण कातडीच्या रंगामुळे नव्हे तर ‘बायबल’मधील“बुक ऑफ जेनेसिस’च्या आधारे. जेनेसिसनुसार हॅमने आपल्या वडिलांची - नोहाची काही कागाळी केली होती. नोहाने चिडून हॅम आणि त्याच्या काळ्या वर्णाच्या वंशजांना शाप दिला- ‘तुम्ही गुलाम होण्याच्या लायकीचे, तुम्ही गुलामच व्हाल’. हॅम बहुदा वर्णाने काळासावळा असावा. स्पॅनिशांनी या दाखल्याचा आधार घेतला होता. पण लवकरच ‘बायबल’मधील दाखल्याचा वेगळा अर्थ लावला गेला. ‘ब्लॅक डिसेन्डन्स ऑफ हॅम’ - नोहाने काळ्या वंशजांना शाप दिला होता. धार्मिक कारण पुढे करता करता वंश आणि वर्णभेद सापडला. अठराव्या शतकाच्या पहिल्या दशकात गौर-कृष्णवर्णीयांच्या मिश्रवंशीय विवाहावर उत्तर अमेरिकेतील इंग्लिश वसाहतीत कायद्याने बंदी घालण्यात आली. कायद्यात तसं स्पष्ट न म्हणताही काळे लोक उपरे आणि कनिष्ठ दर्जाचे ठरवले गेले.

प्रबोधनाच्या काळात वंश आणि वर्णासंबंधी ‘शास्त्रीय’ सिद्धान्त मांडण्यात आले. जगभरातील वंशांचा ‘अभ्यास’ करण्यात आला आणि काही वंश प्रगत आणि काही मागास- प्रगतीमध्ये मागे पडलेले- असा निष्कर्ष काढण्यात आला. प्रगती म्हणजे यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान विकास असं ठरवलं गेलं. उत्क्रांतीवादाच्या आपल्या थिअरीत चार्लस् डार्विनने ‘योग्य जीव टिकाव धरून राहतात’ असं म्हटलं होतं. त्या काळच्या युरोपिय वर्चस्ववादाला खतपाणी घालणाराच हा युक्तीवाद होता. विसाव्या शतकात डार्विनचा सिद्धान्त ध्वस्त करणारे अनेक संशोधनाधारित निष्कर्ष पुढे आले. पण तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं.

एकोणिसाव्या शतकांतील ‘शास्त्रीय’ सिद्धान्त आणि अभ्यासांमुळे युरोपियनांना आशिया आणि आफ्रिकेतील लोकांवर राज्य करण्याचा अधिकार प्राप्त होतो अशी मांडणी करण्यात आली. आशिया आणि आफ्रिकेतील प्राचीन संस्कृतींचा अभ्यासही युरोपिय वर्चस्व ठसवण्याचा उपक्रम असे. भारतातील प्राचीन विद्या, महाकाव्ये, ज्ञान, विज्ञान, साहित्य, लोककला आणि इतर अनेक शाखा थोर होत्या. पण तो थोरपणा भूतकालातील. नंतर त्यांचा ऱ्हास झाला. ‘सद्यस्थितीतील भारताची स्थिती वाईट असल्यामुळे तिच्या उत्थापनासाठीच ब्रिटिश शासक काम करत आहेत’- अशी वसाहतीसाठी नैतिक पाठबळ निर्माण करणारी मांडणी करण्यात आली. साम्राज्याच्या समर्थनासाठी हा युक्तीवाद वापरण्यात आला. व्हिक्टोरियन काळातील अनेक भारतीय बु़द्धीवाद्यांचा या भ्रमावर विश्वास बसला.  

ब्रिटिश शासकांनी असे अनेक भ्रम पेरले ते आपण आपल्या नकळत स्वीकारत गेलो. त्यांचा वर्णविद्वेषही भारतीय मानसिकतेत प्रवेशला तो कायमचाच. भारतीय महाकाव्यांतील प्रमुख देव देवता आणि त्यातल्या राजघराण्यातील व्यक्ती काळ्यासावळ्या वर्णाच्या होत्या, हेही विसरलो आणि आपण सगळेच ‘तरुण विजय’ होत गेलो!

महाभारतातील कृष्ण, रामायणातील राम, हनुमान आणि विठ्ठल काळेसावळे. महाभारताची नायिका द्रौपदीही सावळी, तसंच त्यातील इतर अनेक पात्रं काळीसावळीच आहेत.

युरोप आणि उत्तर अमेरिकेतील हॉलिवुड चित्रपट व्यवसायाला ‘ओ! सो व्हाईट’ असं उपरोधानं म्हटलं जातं. त्यांच्या ‘बायबल’आधारित चित्रपटांत जीझससहित इतर पात्रं युरोपिय गोरी दाखवली जातात. जीझस पश्चिम आशियातील असल्यामुळे तो आणि जेरुसलेममधील समाज युरोपिय गोरा असण्याची शक्यताच नाही. पश्चिम आशियाई अरब अभिनेत्यांची निवड न करता हॉलिवुडच्या गोऱ्या नटांनाच भूमिका दिल्या जातात. जीझसला युरोपिय गोरा दाखवण्याचा किती अट्टाहास! एकप्रकारे पश्चिम आशियायी संस्कृतीचा हा अपहारच म्हटला पाहिजे. बायबल, जीझस आणि तेथील समाजाची ‘रंगसफेदी’ पश्चिमी चित्रपटांतून सतत होत राहते.

बॉलिवुडमधील वर्णसंवेदना तर अति तीव्र आहेत. सावळ्या वर्णाच्या अभिनेत्रींना अपमानीत व्हावं लागतं. नंदिता दाससारख्या बुद्धिमान अभिनेत्रींना काम मिळत नाही, पण अभिनयाच्या नावानं शून्य आणि मेणाच्या पुतळीसमान गोऱ्या कॅटरीना कैफला एका मागोमाग चित्रपट मिळत राहतात.

मॉडेल म्हणून प्रस्थापित झाल्यानंतर बॉलिवुडमध्ये प्रवेश करताना बिपाशा बासूला संघर्ष करावा लागला. सावळ्या वर्णामुळे तिला भूमिका मिळणं कठीण जात होतं. काही काळानंतर बी ग्रेडच्या सिनेमात कामं मिळू लागली. मोठ्या बॅनरमधून विचारणा होऊ लागली, पण ती सहनायिकेच्या भूमिकांसाठी. काही कारणांवरून बिपाशा आणि करिना कपूरमध्ये वादावादी झाली. करिनाला काही युक्तीवाद करता येईनासा झाल्यावर तिने त्वचेच्या रंगाचं अस्त्र बाहेर काढलं आणि बिपाशाला ‘काली बिल्ली’ असं संबोधलं.

आपली स्मिता पाटील हिंदी चित्रपटसृष्टीत अत्यंत आत्मविश्वासाने वावरली. अत्यंत प्रतिभावान आणि बुद्धिमान अभिनेत्री होती ती. तिला सामाजिक चळवळीची पार्श्वभूमीही होती. बॉलिवुड चित्रपटांत ती प्रस्थापित झाली. पण व्यावसायिक चित्रपट असो वा शाम बेनेगलसारख्या दिग्दर्शकांचे समांतर सिनेमे असोत, स्मिताची ‘रंगसफेदी’ केली जात असे. प्रेक्षक पडद्यावरील सावळ्या वर्णाच्या नायिकेला स्वीकारणार नाहीत, अशी धास्ती दिग्दर्शक आणि निर्मात्यांना वाटत असावी.  

गोरेपणाच्या अवास्तव स्तोमाला कंटाळून अभिनेत्री नंदिता दासने ‘डार्क इज ब्युटिफुल’ मोहीम सुरू केली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मोहिमेच्या संकेतस्थळावर अनेक स्त्रिया आपलं मनोगत व्यक्त करताना दिसतात. त्यातील एक तरुणी म्हणते- “दिल्लीला कॉलेजमध्ये प्रवेश करण्याआधी मी माझ्या वर्णाबद्दल कधीच विचार केला नव्हता. तिथे मला माझ्या रंगाची, माझ्या दाक्षिणात्य असण्याची ‘जाणीव’ करून दिली गेली. सुरुवातीला खूप वाईट वाटलं. पण नंतर कंकणा सेन शर्मा आणि नंदिता दासनी या विरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली. ‘डार्क इज ब्युटिफुल’मुळे बळ मिळालं, तरी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. माझी पार्लरवाली मला सन स्क्रिन वापरायला सांगते वा फेअरनेस फेशल करून घे असं सुचवते. मी मात्र नवतरुणींना हेच सांगते की, तुमचा त्वचेचा रंग महत्त्वाचा नाही. स्वत:वर प्रेम करायला आणि आत्मविश्वास जोपासायला शिका.”     

सावळ्या मुलींना बऱ्याच भेदभावांना तोंड द्यावं लागतं हे काही दडून राहिलेलं सत्य नाही. अगदी ‘पुरोगामी’ कुटुंबंही वेगळी नाहीत. परीचयातील एकीचा अनुभव थक्क करणारा. या सुबुद्ध तरुणीला तिच्या मित्रानेच स्थळ सुचवलं. या तरुणाचं घराणं पुरोगामी चळवळीतलं. लग्न करायचं असं ठरल्यावर होणाऱ्या नवऱ्याने घरी बोलावलं. मुलाची आई प्रसिद्ध शिक्षिका शिवाय पुरोगामी चळवळींशी जोडलेली. वडील लेखक. भेट झाल्यानंतर मुलानं सांगितलं- ‘आईला गोरी सून हवी होती. सरळ आहे ना मी गोरा आहे, त्यामुळे तिला वाटणं साहाजिकच आहे’. या तरुणीचा संताप अनावर झाला, तिने निकराने लग्न करायचंच नाही असं सांगितलं आणि ती निघून गेली. पण नंतर तरुणाने माफी मागितली सतत पाठपुरावा केला आणि लग्न झाले. आता तिचा नवरा असं काही घडलंच नाही, मला काही आठवत नाही असं म्हणत राहतो. पण आजही ‘त्या’ आठवणीने तिचं रक्त खवळतं.

या सगळ्या चर्चेत ‘फेअर अँड लव्हली’ कसं विसरता येईल? या उत्पादनाने गोरं होण्याचं स्वप्न विकलं. त्यांच्या जाहिरातीही भेदभाव करणाऱ्या. पंधरा वर्षांपूर्वीच्या जाहिराती सावळ्या मुलीचं लग्न होणं किती कठीण हेच दाखवायच्या. फेअर अँड लव्हली लावायला सुरुवात केली, ती गोरी झाली आणि तिचं लग्न झालं! मुलीचा वर्णच महत्त्वाचा...तिचे गुण तिचं, शिक्षण वर्णापुढे फिकं...मुलीनं काळंसावळं असताच कामा नये... तशी ती असली तर नवरा मिळणं मुष्कील... मुलीसाठी अंतिम ध्येय लग्न आणि लग्नासाठी गोरं असणं/ होणं आवश्यक...नकार देण्याचा अधिकार मुलाचाच. असे अनेक भ्रम या जाहिराती पसरवतात, तरी या उत्पादनांचा खप काही अब्जांमध्येच असतो. अगदी दूरगामी आदिवासी पाडे असोत वा खेडी, तेथील कचऱ्यामध्ये फेअर अँड लव्हलीचे अगणित खोके सापडतील.

तीसेक वर्षांपूर्वी रेडिओवर ‘गोरी गोरीपान फुलासारखी छान’ हे ग.दि.माडगूळकरांचं गाणं नेहेमी लागायचं. तेव्हा त्यात काही भ्रामक कल्पना आहेत असं वाटायचं नाही. पुढे ‘गोऱ्या, फुलासारख्या छान’ प्रतिमांचा उगम कोठे आहे हे उलगडत गेलं.   

काही काळापूर्वी गोरेपणाच्या उत्पादनांवर नव्हे तर जाहिरातींवर बंदी घालण्यात आली. आता ही उत्पादने उन्हापासून संरक्षण करणारी क्रिम म्हणून विकली जातात, गोरेपणा आणणारी म्हणून नव्हे. स्त्री चळवळींच्या अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं आहे.

काळ बदलतोय, काळाबरोबर काही कल्पनाही बदलताहेत. एनडीटीव्ही 24/7 या इंग्रजी वृत्तवाहिनीने फेअरनेस क्रिमच्या जाहिराती घेणं बंद केलं आहे. चित्रपटसृष्टीत नागराज मंजुळे, चैतन्य ताम्हाणेसारखे वेगळा विचार करणारे लेखक-दिग्दर्शक आहेत. ‘सैराट’ची हिरॉईन सर्वार्थाने नायिकेच्या प्रचलित प्रतिमेला धक्का देणारी आहे. साइना नेहेवाल, पी. व्ही. सिंधू, नंदिता दास, शबाना आझमी, मेधा पाटकर, किरण बेदी यांसारख्या कर्तबगार महिला आदर्श म्हणून पुढे येतायत.

पण अजूनही तरुण विजयसारखी मानसिकता डोकं वर काढते. आफ्रिकन विद्यार्थ्यांवरचे हल्ले थांबत नाहीत की, फेअर अँड लव्हलीचा खप कमी होत नाही. गौरवर्ण मापदंड म्हणून प्रचलित होण्यात जातश्रेष्ठत्वाचा आणि प्रादेशिकतेचाही स्तर आहे. अजून बराच पल्ला गाठायचाय. शिवाय काही मूलभूत संकल्पनांना धक्का द्यायचं बाकी आहे. गोरा रंगच सर्वश्रेष्ठ हे कोणी, कोणत्या निकषावर ठरवलं? असे निकष वैश्विक, सार्वत्रिक आणि सार्वकालिक कसे असू शकतात?

……………………………………………………………………………………………

लेखिका मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.

alkagadgil@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Alka Gadgil

Fri , 19 May 2017

@Sajay, thanks - jatichi ani rangacha ozarta ullekh kela ahhe, tyavar swatantra Lekh lihinar ahhe


Sanjay Pawar

Fri , 19 May 2017

उत्तम लेख.पण यात भारतीय जातीव्यवस्थेने वाटलेले रंग याबद्दलही माहिती दिली असती तर बरे झाले असते.ती वर्ण द्वेषापेक्षा भयंकर आहे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘लव जिहाद’ असो की ‘समान नागरी कायदा’, यांचा मूळ हेतू स्त्रियांना दुय्यम ठेवण्याचा आहे. त्यामुळेच त्यांना राजकारणात महत्त्व प्राप्त होते. स्त्रियांनी हे सत्य जाणून भानावर यायला हवे

हे दोन्ही कायदे स्त्री-स्वातंत्र्य मर्यादित करणारे आणि स्त्रियांवर पुरुषसत्ताक गुलामी कायम ठेवणारे आहेत. ‘लवजिहाद’चा कायदा स्त्रियांना आपला जीवनसाथी निवडण्याचा मूलभूत अधिकार नाकारतो; ‘समान नागरी कायदा’ लग्न, घटस्फोट, पोटगी, दत्तक आणि वारसा याबाबतीत भरवसा देऊन स्त्रीला ‘पत्नी’ म्हणून मर्यादित करतो. आपली गुलामी आणि दुय्यम स्थान संपवणारे राजकारण स्त्रियांना ओळखता आले पाहिजे.......