काश्मीर समजून घेताना... (भाग २)
पडघम - देशकारण
राजा शिरगुप्पे
  • लेखक राजा शिरगुप्पे आणि काश्मीरचा नकाशा
  • Thu , 11 May 2017
  • पडघम देशकारण काश्मीर Kashmir काश्मिरी जनता Kashmiris राजा शिरगुप्पे Raja Shirguppe

लेखक राजा शिरगुप्पे यांनी तीन वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये फिरून, तेथील सर्वसामान्य माणसांशी बोलून लिहिलेल्या दीर्घ रिपोर्ताजचा हा दुसरा भाग. याचा उद्या तिसरा आणि शेवटचा भाग प्रकाशित होईल. या रिपोर्ताजमधून आपण ऐकून असलेल्या काश्मीरविषयीची बरीचशी नवी माहिती मिळेल...खऱ्याखुऱ्या काश्मीरला जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ताज मदत करू शकतो...

……………………………………………………………………………………………

अमरनाथ यात्रेला आलो होतो, त्यावेळी कटऱ्याहून श्रीनगरला गेलो होतो. कटरा हे वैष्णवदेवीच्या पायथ्याचे गाव. दर्शनाला या किंवा भटकायला या, देवी ज्या डोंगराच्या शिखरावर राहते, तिथपर्यंत पारी किंवा घोड्यावरून जावं लागतं. आता मधल्या वाटेपासून शिखरापर्यंत अ‍ॅटोरिक्षा पण सुरू झाल्या आहेत. या वाटेवर मात्र सोपोर, बारामुल्ला परिसरातील घोडेवाले आणि पिठ्ठू जास्त संख्येनं भेटतात. विशेष म्हणजे यामध्ये हिंदूंची संख्या जास्त आहे. मनोजसिंग नावाचा एक घोडेवाला भेटला होता. तो तळतळून सांगत होता, “खरं तर राजेसाहेबांच्या कारकिर्दीत आम्ही हिंदू-मुसलमान खरोखरच भाई-भाई होतो. ये बाद मे आये पोलिटीशन्सने सब बिघाड दिया है. हम पहले कश्मीरी है और अखिर में भी कश्मीरी है. ये भारतवासी कहलाने की जबरदस्ती करनेवाले हमारे पेट की भी चिंता करते है क्या?” मी विचारलं, “कश्मीर स्वतंत्र हवंय का?” थोडासा गंभीर होत तो एवढंच म्हणाला, “मालूम नही. स्वतंत्रता क्या होती है? लेकिन हम अपनी कश्मीरीरत चाहते है इतना जरूर!”

काश्मीर समजून घेणं म्हणजे ही काश्मीरीयत काय आहे हेच समजून घेणं, हे त्याच वेळी माझ्या लक्षात आलं होतं. आणि आताची भटकंती तर हाच उद्देश समोर ठेवून होती. रात्री एक-दोनच्या दरम्यान जवाहर बोगद्याजवळ पोहोचलो. जवाहर बोगदा म्हणजे काश्मीर व्हॅली आणि जम्मूला जोडणारा एकमेव रस्ता. आता रेल्वेमार्गही झाला आहे. पण तो अगदी अलीकडे आणि त्याचीही अधूनमधून पडझड होत असताना वाचायला मिळते. बोगद्याजवळ आलो पण कुणी अडवलं नाही. आणि थांबवलंही नाही. मागच्या वेळी या बोगद्याजवळ रात्री नऊलाच लष्कराने आम्हाला थांबवलं होतं. आणि थेट पहाटेपर्यंत थांबवून घेतलं होतं. कारण काश्मीर व्हॅलीत रात्रीचा प्रवास करणं म्हणजे अतिरेक्यांच्या बंदुकीला टारगेट पुरवणं समजलं जात होतं. परिस्थिती खूपच तंग होती म्हणे त्या वेळी. पण यावेळी मात्र सर्व काही आलबेल असल्यासारखं पहाटे पहाटे श्रीनगरच्या जवळ जाताना आजूबाजूची केशराची आणि भाताची शेती पाहताना मला गोव्याची आठवण होत होती. खरं तर मागच्या वेळीही या रस्त्यावरचं गोवा मला जाणवलं होतं. बस कंडक्टरला थांबवून खाली केशराच्या शेतात फिरूनपण आलो होतो. सगळ्या स्थानिक प्रवाशांना आमचं हे फिरणंही खूप कौतुकास्पद वाटलं असावं. कारण त्यानंतर प्रत्येक जण आम्हाला केशराबद्दल किती सांगू आणि काय काय सांगू या भावनेनं माहिती देत होता. या वेळी श्रीनगरमध्ये शिरताना रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या झोपडपट्टीसारख्या दिसणाऱ्या वसतीकडे बोट करत ड्रायव्हर संजीव शर्मा म्हणाला, “तिथं अतिरेक्यांची वसती आहे.” एवढ्या उघडपणे एकत्र वसती करून राहणाऱ्या संजीवभाईंनी दाखवलेल्या त्या अतिरेकी वसतीबद्दल राष्ट्रवादी राग येण्यापेक्षा कौतुकच जास्त वाटले. दारिद्रयाचा आणि अतिरेकीवादाचा किती घनिष्ट संबंध आहे याचं भान आमच्या ड्रायव्हर गुरूनी त्याच्याही नकळत आम्हाला दिलं.

“मग सरकार आणि लष्कर, अतिरेकी एवढ्या यांच्या समोर असूनही त्यांच्यावर कारवाई का करत नाही?” माझ्या या खवचट प्रश्नावर संजीवभाईंनी मौन राखणंच पसंत केलं.

एव्हाना गाडीतल्या त्या नवपरिणीत जोडप्याशी खूपच चांगला परिचय झाला होता. आणि माझ्या पिकलेल्या दाढीवर भरोसा ठेवून आपले काश्मीरबद्दलचं ज्ञान अद्ययावत करून घेण्याचा त्यांचा प्रयत्नही चालला होता. केवळ रवीच्या भरोशावर त्यांनी काश्मीरला येण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला आहे, असं आधीच माझ्याकडे जाहीर करून टाकलं. मीही त्यांना रवीसारखा ‘एस्कॉर्ट’ असल्यावर लष्कर-ए-तोयबाही तुमचा बाल वाकडा करू शकत नाही, असं रवीकडं नंतर चहाचे पैसे भागवण्याच्या मूक अटीवर दृष्टीक्षेप टाकत त्या जोडप्याला खात्री दिली. काश्मीरमध्ये रत्यावरून चालणारा प्रत्येक जण हा आपल्या पहरनच्या आत एके फोर्टी सेव्हनच लपवून चाललेला असावा अशा संशयानं हे जोडपं प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्याकडे पाहत असायचे. शेवटी मी त्यांना सांगितलं की, “अतिरेक्यांनी आपल्या जाहीरनाम्यात पर्यटकांना अभय आणि मुक्त संचाराचं स्वातंत्र्य जाहीर केलं आहे. स्थानिक केबलवरून त्याची जाहीरातदेखील आहे. ‘पर्यटकांनी मुक्तपणे संचार करावा आमच्यापासून त्यांना कसलंही भय नाही.’ ” अर्थात हे केवळ मी काही त्यांना विनोद वा त्यांच्या समाधानासाठी सांगत नव्हतो. परिस्थितीही अशीच आहे. मी खुद्द अशी जाहिरातपट्टी तिथल्या स्थानिक केबलवर मागच्या त्या तंग काळातही पाहिली होती आणि अनुभवलीही होती. अगदी क्वचित प्रसंग सोडता श्रीनगरमधला पर्यटकांसाठीचा खास भाग जो आहे, म्हणजे दाललेक, निशात आणि शालिमार बाग, राजबाग या पर्यटकांसाठी असलेल्या भागामध्ये दंगल उसळली असली, तरी या परिसराला त्याचा फारसा स्पर्श होऊ दिला गेलेला नाही.

पहाटे श्रीनगरमध्ये पोहचल्यामुळे सगळेच पेंगुळलो होतो. मग दाललेकच्या एका भागातल्या रवीच्या ओळखीच्या ‘शिकारे’वाल्याकडे गेलो. उमर काशीद त्याचं नाव. त्याच्या शाही शिकाऱ्यात दोन दोन ब्लॅकेटस् घेऊन गाढ झोपून टाकलं. दुपारी जाग आली तेव्हाही छान थंडीच जाणवत होती. उमरकडे गरम काव्याची मागणी करून डॉ. अभिजीत वैद्यांनी दिलेल्या त्याच्या श्रीनगरमधल्या सहकाऱ्याला डॉ. गुरूचरण सिंगना फोन केला. तर ते एकदम प्रेमाने उखडलेच. “अहो, इथल्या आमच्या गुरूद्वारामध्ये आम्ही तुमची सोय करून ठेवली आहे आणि कधीपासून वाट पाहात आहोत.” “भल्या पहाटे आल्यामुळे तुम्हाला त्यास द्यावासा वाटला नाही. पण आता येतोय.” असं थोडंसं खजिल स्वरात सांगून त्यांच्याकडून गुरूद्वाराचा पत्ता घेतला. मग उमरभैय्याचा निरोप घेऊन सिटी बस पकडून गुरूद्वाराकडे निघालो. उमरभय्याच्या चेहऱ्यावर थोडीशी उदास नाराजी दिसत होती. आजकाल फारसे पर्यटक येत नाहीत, याचीच ती खंत असावी. कारण काल रात्रीच आनंदाने फुललेल्या चेहऱ्याने तो म्हणाला होता, “हमारे लोग आजादी मांग रहे हे. लेकिन इस तरह की भूखी आजादी कब तक सह पायेंगे?” उमरच्या शब्दांत एकूनच सामान्य काश्मीरी कष्टकऱ्याचा करूण स्वर मला ऐकू येत होता.

श्रीनगरच्या बाघा परिसरातल्या त्या भव्य गुरूद्वारात पाऊल टाकलं आणि खरोखरच त्याच्या भव्यतेनं भारावून गेलो. एका वेळी जवळपास दहा हजार माणसं त्या परिसरात प्रार्थनेसाठी उभे राहू शकतील एवढे विस्तीर्ण आवार. श्रीनगरमध्ये जी चार-पाच गुरूद्वारं आहेत, त्यातले हे सर्वांत मोठे. जवळपास पाचशे अभ्यागतांची एका वेळी राहण्याची सोय. जेवणाचीही. फक्त वेळा पाळल्या पाहिजेत. गुरूद्वाराचे व्यवस्थापक संजितसिंग आमचं स्वागत करत आमच्यासाठी खास ठेवलेल्या व्ही.आर.पी. खोल्यांकडे घेऊन गेले. एक खोली त्या तरुण नवविवाहित जोडप्याला तर दुसरी खोली आम्हा काश्मीर अभ्यासकांना. बहुतेक ते तरुण जोडपं आपला मूळ हेतू विसरून गेलं असावं. त्यामुळे रवीने केलेली श्रीमंती हॉटेलमधली व्यवस्था नाकारून ते आमच्याबरोबर या काश्मीर समजून घेण्याचा उद्योगात सहभागी होऊ इच्छित असावं.

संजितसिंगनी आमची खोल्यांची व्यवस्था ठाकठिक झाली आहे की नाही याची खात्री करून घेत नंतर गुरूद्वाराच्या मुख्य ग्रंथीसाहेबांशी भेट घडवली. ग्रंथीसाहेबांना या गुरूद्वाराचा इतिहास सांगितला. फाळणीनंतर पाकिस्तानी लुटारू टोळ्या जेव्हा या प्रदेशावर लुटालुटीसाठी पाकिस्तानी लष्कराच्या मूकपाठिंब्याने आक्रमण करू लागल्या, तेव्हा फक्त इथे असलेल्या ५०० शिखांच्या पलटणीने आपल्या जिवाची बाजी लावत श्रीनगरचा बचाव केला. जवळपास सारेच शीख जवान त्या लढाईत कामी आले. त्या सर्वांचे स्मृतीस्थळ म्हणून या गुरूद्वाराची उभारणी झाली. ग्रंथी साहेबांनी दिलेल्या या माहितीने काही क्षण आम्हा सर्वांचेच उर या हुतात्म्यांच्या स्मृतीने गदगदून आले. नंतर ग्रंथीसाहेब बराच काळ इथल्या हिंदू, शीख, मुस्लीम झगड्याबद्दल बोलत होते. पण त्याच्या एकूण बोलण्यामधून त्याचा मुसलमानांच्या इतकाच पंडितांच्यावरही रोष आहे हे स्पष्ट जाणवत होते. नंतर काश्मीर फिरताना साऱ्याच शीख मंडळींच्या बोलण्यातून हा अंतरस्वर मला ऐकू येत होता. हा रोष नेमका काय आहे म्हणजे इथल्या सामान्य जनतेमध्ये पंडितांचे नेमके काय स्थान आहे हे जर उमजू शकले तर कदाचित हे काश्मीर समजण्याचे प्रकरणही नीट होईल याबद्दल मला ठाम विश्वास वाटू लागला.

दिल्लीत माझा एनबीटीतला तरुण मित्र राहुल कोसंबीनं ‘राहुल पंडिता’ या तरुण पत्रकारानं लिहिलेलं काश्मीर प्रश्नावरचं पुस्तक ‘अवर मून हॅज ब्लड क्लॉटस्’ मला वाचायला दिलं होतं. हा तरुण पत्रकारही काश्मिरी पंडितच. त्यामध्ये त्यानं पंडितांच्यावर होत असलेल्या दहशतीच्या वातावरणाचे अगदी लालित्यपूर्ण वर्णन केलं आहे. पण एक गोष्ट मला वाचताना जाणवत होती, की पारावर बसून भुताच्या गप्पा सांगणाऱ्या माणसासारखं त्याचं निवेदन होतं. म्हणजे जर त्या भूत कथा सांगणाऱ्या माणसाला विचारलं की, तुला भूताचा प्रत्यक्ष अनुभव आहे काय? तर तो जसं सांगतो की, ‘नाही, पण मी ऐकलंय.’ तसंच काहीसं या पुस्तकात राहुल पंडिताचं झालेलं आहे. त्यामुळे खरोखरीच पंडितांची काश्मीरमध्ये वस्तुस्थिती काय आहे हे नीट समजण्यासाठी राबियाला म्हणजे पूर्वाश्रमीच्या निरूपमाला भेटायलाच हवं. कारण ती स्वतःच एक पंडित होती आणि आता एका काश्मिरी मुस्लिमाची अर्धांगिनी. शिवाय आपण सच्चे मुसलमान आहोत असा तिचा दावा असतो. मी राबियाला फोन केला.

राबिया बाजी ही काश्मीरमध्ये एनजीओ चालवते. कार्यक्षेत्र आहे संपूर्ण काश्मीर. काश्मीरच्या ग्रामीण भागात विकासाचे अनेक प्रकल्प चालवताना तिचे मुख्य लक्ष्य आहे शिक्षण क्षेत्र. बालवाडीपासून बारावीपर्यंत मुलांना शिक्षणासाठी मदत करणं. बारावीनंतर शिक्षणाच्या पुढील संधी संपूर्ण भारतात या मुलांना उपलब्ध करून देणं. वेगवेगळ्या महाविद्यालयात आणि विद्यापीठात काश्मिरी मुलांसाठी असलेल्या खास राखीव जागांचा उपयोग या कामी करून घेणं. उर्वरित भारतात या मुलांना काही अडचणी येऊ नये म्हणून त्याच्या पाठिशी पालकासारखे उभं राहणं; हे ती प्रामुख्याने करत असते. फक्त भारतातच नव्हे तर पाकिस्तानमध्येही ती अशा प्रकारे या मुलांची सोय करत असते. कारण काश्मिरी मुलांना पाकिस्तानमध्येही अशा प्रकारच्या सोयी-सवलती लागू आहेत. त्यामुळे भारताच्या आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी तिचा थेट संपर्क आहे. भारतातल्या विविध राज्यांतल्या मुख्यमंत्र्यांशीही तिचे तितकेच सलोख्याचे संबंध आहेत. तिचा मुस्लीम नवरा हा गालिच्यांचा मोठा व्यापारी आहे. माझा फोन घेत म्हणाली, “काश्मीरमध्ये तुझे स्वागत असो. काहीही गैरसमज करून घेण्याची आधी तू मला भेटलास तर नीट काश्मीर पाहता येईल तुला.” तिच्या बोलण्यातला तिरकसपणा ओळखून हसलो फक्त. म्हणालो, “उद्या येतो तुझ्या ऑफिसवर.” संध्याकाळी गुरूचरणसिंग आपल्या मित्राबरोबर भेटायला आले. सोबत काश्मिरी मिठाईचा डबा आधी हातात देत म्हणाले, “काश्मीरमधलं तुमचं आगमन आणि निवास या मिठाईसारखाच मिठा राहो.” मग काश्मिरी मुलांच्या विशेषतः त्याच्या समाजातील मुलांचा काश्मिरी म्हणून बाहेरच्या प्रांतात येणारा शिक्षणामधला अडथळा सांगत राहिले.

मागच्या भेटीतला एक प्रसंग आठवला. एका तरुण टॅक्सी ड्रायव्हरबरोबर हजरत बाल बघायला निघालो होतो. हा तरुण एम.ए. इंग्रजी झालेला होता. तरीही नोकरी नव्हती. काश्मीरमधल्या बहुसंख्य तरुणांची हीच परिस्थिती होती. भरपूर शिकूनही टॅक्सी ड्रायव्हर किंवा टुरिस्ट गाईड वगैरेसारखे सामान्य व्यवसाय आपली बेकारी निभावण्यासाठी त्यांना करावी लागत असे. वाटेत तो खंतावून सांगत होता, “मला भारतात कुठेही नोकरी करायला आवडेल. पण काश्मिरी म्हटलं की सगळ्या भारतातल्या पोलिसांचा डोळा आमच्यावरच. त्यात आणि मी मुस्लीम. इथं माझ्या घरी एक हैदराबादचा तरुण मित्र राहत होता. तो इथं कुठल्यातरी कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करायचा. आता तो परत हैदराबादला गेला आहे. तो मला सारखं आपल्या घरी येण्याचं निमंत्रण देतोय. मलाही जावंसं वाटतं, पण हिंमत होत नाही. आम्ही काश्मिरी खरंच भारतीय आहोत का? बघा ना. दर सहा महिन्याला आम्हाला आमचं ओळखपत्र पोलिसस्टेशनला दाखवून त्याचं नूतनीकरण करून घ्यावं लागतं. टॅक्सीवाल्यांचे तर खूपच हाल. काही कारण नसताना आमची ओळखपत्र पोलीस किंवा लष्कराचे लोक जप्त करतात. ते परत मिळवण्यापेक्षा आणखी पाचशे रुपये खर्च करून नवीन ओळखपत्र काढणं अधिक सोपं आहे.”

स्वतःच्याच देशात नागरिक म्हणून दर सहा महिन्यांनी ओळख पटवून द्यावी लागणं हे खरंच कुठल्याही संवेदनशील माणसाला अपमान वाटण्यासारखंच आहे. त्या टॅक्सी ड्रायव्हर मित्राला त्या वेळी तरी मी काही समजुतीचा शब्द बोलू शकलो नाही. आता हे माझे शीख मित्रही काश्मिरी म्हणून आपली तिच व्यथा सांगत होते. त्याच्याही शब्दांशब्दांतून शिखांनी काश्मीरसाठी केलेल्या हौतात्म्याचा अभिमान ओथंबत होता. तेवढाच इतिहास काळापासून चालत आलेला मुसलमानांबद्दलचा तिटकारा आणि परंपरेतून आलेले पंडितांबद्दलची चीडही जाणवत होती.

रात्री पुन्हा राबियाचा फोन आला. दुसऱ्या दिवशी सकाळीच ती तिच्या कार्यक्षेत्रातल्या कुठल्याशा खेड्यात जाणार होती. मला जर खरोखर काश्मीर समजून घ्यायचे असेल तर मीही तिच्याबरोबर यावं असा तिचा आग्रह होता. मलाही ते हवंच होतं. लगेच मी तिला होकार देऊन टाकला.

इथं पहाट सकाळी चार वाजताच होते. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन, महेशला श्रीनगर दर्शनसाठी रवीच्या ताब्यात देऊन मी जवाहरनगरमधल्या राबियाच्या ऑफिसचा पत्ता शोधत होतो. तिही आपल्या गाडीनं माझा शोध घेत होती. एकमेकांवर बरंच वैतागल्यावर आणि मोबाईलचं बरंच बिल झाल्यावर आम्ही दोघंही कुठल्या तरी चौकात अचानक एकमेकांना सापडलो. मग तिच्या त्या बऱ्याच पुरानकालीन स्वयंचलित रथात आसनस्थ झालो. एक चतुर्थांश मी, तीन चतुर्थांश ती अशा प्रकारे गाडीची मागची सीट व्यापून टाकली. ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर खूपच ड्रायफ्रूटस् आणि खाण्याचे पदार्थ ठेवलेले होते. त्यातली काही ड्रायफ्रूटस् उचलून माझ्या हातात ठेवत ती म्हणाली, “थोडे दिवस काश्मीरमध्ये माझ्या सोबत राहिलास तर परत गेल्यावर तुझी बायको तुला ओळखणार देखील नाही. असा पैलवान होऊन मी तुला पाठवेन.” मी म्हणालो, “त्यापेक्षा काश्मीरसाठी तू जरा जादा काम केलसं तर कदाचित काश्मीरचा प्रश्न राहणार नाही.” या माझ्या उत्तरावर ती खळखळून हसली. आणि मग एकदम गंभीर होत तिनं पूर्ण रस्ताभर मला काश्मीरचा पूर्ण इतिहासच ऐकवला.

कश्रप मुनींच्या काश्मीरपासून ते बाराव्या शतकातल्या कल्हणाने लिहिलेल्या काश्मीरच्या शैव पंथी हिंदू राजघराण्यांच्या ‘राजतरंगीणी’ या इतिहास ग्रंथापर्यंत. मग तिथून पुढे मुघल आणि अफगापदांच्या ताब्यात गेलेला काश्मीर, त्यानंतर अवघ्या वीस वर्षांच्या कालावधीसाठी म्हणजे १८२० ते १८४६ या सालापर्यंत शीखांकडे आणि तिथून पुन्हा ब्रिटिशांमार्फत डोगरा राजे गुलाबसिंगपर्यंच्या राजवटीचा सगळा इतिहास. काश्मीर खोऱ्यात राहणारे सुन्नी. तर लेह विभागात राहणारे शिया आणि लडाखमधले बौद्ध. जम्मू परिसरातले बहुसंख्य हिंदू, काश्मीर खोऱ्यात राहणारे काश्मिरी ब्राह्मण म्हणजे पंडित. बाई म्हणजे काश्मीरच्या इतिहासाचा एक चालताबोलता इतिहासच होती. मी तिला ती पंडित असतानाही मुस्लीम धर्म स्वीकारण्याचं कारण विचारलं. विचारतानाच माझाही अंदाज सांगून टाकला. तिला म्हटलं, “तू एका मुस्लीमाशी प्रेमविवाह केलास. आणि आपल्या पुरुषप्रधान व्यवस्थेत नवऱ्याचा धर्म आपोआपच बायकोलाही स्वीकारावा लागतो, म्हणूनच ना?”

 “एकदम चूक.” बाई खिदळली. तेव्हा तिचा देह पर्वत जसा भूकंप झाल्यावर हलेल तसा काहीसा भासला. “मी प्रेमात पडण्याआधीच मुस्लीम धर्म स्वीकारलाय. मी तेव्हा दिल्लीला शिकत होते. त्यावेळी सर्व धर्मांचा अभ्यास करत होते. हिंदू स्त्रीची घुसमट काय असते हे मी पंडित असल्यामुळे आधीच अनुभवत होते. जेव्हा मी बायबल, कुराण वाचलं, तेव्हा मला वाटलं की मला स्त्री म्हणून सन्मान देणारा मुस्लीम धर्मच आहे.”

पण मी तर पाहतोय की मुस्लीम धर्मातच स्त्रिरांची किती कुचंबणा होतेय. स्त्रियांच्या आचारापासून संचारापर्यंत साऱ्यांवरच एक कठोर बंदी, अर्थात हिंदू स्त्री देखील स्वतंत्र नाही हे तुझं मत मला मान्य आहे.” माझा बचाव करण्याचा की खोलात जाण्याचा प्रयत्न, माझं मलाच कळलं नाही.

 “हा सारा आणि साऱ्याच धर्मातल्या पुरुषप्रधान पुरोहितशाहीनं निर्माण केलेलं षडयंत्र आहे. पण धर्मग्रंथ हे जर अधिकृत मानले तर हिंदू धर्मातल्या सर्वच मान्यताप्राप्त ग्रंथांनी पुरुषप्रधानतेचं आणि स्त्रियांच्या गुलामीचं समर्थनच केलं आहे. बायबलमध्येही थोड्याफार प्रमाणात असंच आहे. पण कुराणमध्ये मात्र पैगंबरांचा सगळा दृष्टीकोन हा मला लोकशाहीवादी आणि स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाराच दिसला.”

 “माझा काही या विषयांवर अभ्यास नाही. त्यामुळे मी काही ठामपणे याबद्दल बोलू शकत नाही. पण मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा नीट कुराण वाचेन. पण तू बौद्ध धर्माचा अभ्यास केला आहेस का?” माझा तरीही किल्ला लढवण्याचा प्रयत्न.

 “मी तिबेटन आणि नेपाळी बौद्ध धर्माचा अभ्यास केला आहे. तो माझ्या अभ्यासासाच भाग होता म्हणून. परंतु त्यामध्ये भिक्षुणी होण्याचे स्वातंत्र्यापलीकडे स्त्रियांबद्दल बुद्ध काही बोललेले नाहीत.” तिच्या या युक्तीवादावर मला काही खात्रीपूर्वक बोलता आलं नाही.

 “काश्मिरी जनतेला भारताबद्दल एवढा द्वेष का वाटतो?” माझा थेटच प्रश्न.

“कुणी सांगितलं तुला? आम्ही तुमचा द्वेष करतो म्हणून! पण आम्ही आमच्या स्वातंत्र्याबद्दल आग्रही राहणं चूक आहे का? असा आग्रहीपणा दाखवणं म्हणजे कुणाचा द्वेष करणं आहे का? शिवाय भारताने आमच्याशी जो आतापर्यंत व्यवहार केला आहे, त्यातून आमच्या मनात आपली फसवणूक झाली आहे अशी भावना झाली. तर काय चुकलं?” राबियातील काश्मिरीरत आता जागी होऊ लागली होती.

राबिया आम काश्मिरी जनतेच्या वतीनं जणू मला सांगत होती, ब्रिटिशांच्या मध्यस्थीने झालेल्या भारत-पाकच्या फाळणीनंतर संस्थानांच्या विलीनिकरणाचा प्रश्न तयार झाला. काश्मीर आणि हैदराबाद ही दोनच संस्थानं अशी होती की, एका संस्थानाची रयत ही बहुसंख्येनं मुस्लीम तर राजा हिंदू होता, तर दुसऱ्या संस्थानात नेमकी याच्या उलट परिस्थिती होती. जनतेच्या रेट्यामुळे हैदराबाद भारतात विलीन होण्यास फारसा प्रत्यवाय आला नाही. पण काश्मीरचा राजा हिंदू. आणि त्याला स्वतःचे राज्य स्वतंत्र राष्ट्र म्हणून अबाधित ठेवायचं होतं. पण पाकिस्तानी लष्कराच्या भरोशावर ईशान्य पाकिस्तानमधल्या भटक्या, लुटारू टोळ्या जेव्हा श्रीनगरपर्यंत येऊन लुटालूट आणि आक्रमण करू लागल्या. त्याचा प्रतिकार करण्यास राजा हरिसिंग कमी पडू लागला, तेव्हा भारताकडे मदत मागण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उरला नाही. त्याच वेळी शेख अब्दुलांसारखा जननेता जनतेचा प्रतिनिधी म्हणून भारताशीच जोडून घेण्यासाठी आग्रही होता. त्यामुळे शेख अब्दुलांचे नेतृत्व आणि मैत्री नेहरूंना सोयीची होती. शेवटी ब्रिटिशांच्या मध्यस्थीने भारताचा काश्मीरशी जो करार झाला, त्यानुसार काश्मीर हे भारतातीलच पण एक स्वतंत्र स्वायत्तता असलेलं राज्य म्हणून राहील. त्याची विधानसभा ही असेब्ली न राहता पार्लमेंट म्हणून ओळखली जाईल. स्वतंत्र निशाण राहिल. या राज्याच्या प्रमुखाला पंतप्रधानाचाच दर्जा राहिल. फक्त संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि चलन तेवढं भारतीय शासनानुसार राहिल. काश्मीरमधील परिस्थिती निवळताच युनोच्या मदतीने सार्वत्रिक मतदान घेऊन काश्मीरनं कुठं राहावं की स्वतंत्र रहावं याचा फैसला केला जाईल. पण परिस्थिती निेवळली असं वाटण्यासारखी परिस्थिती आल्यावरही दिल्लीने मूळ करारातील शर्ती पाळल्या नाहीत. उलट शेख अब्दुलांना तुरूंगात टाकून गुलाम बक्षी या त्याच्या प्याद्याला शेवटचा पंतप्रधान केले. आणि नंतर तर त्याचा पंतप्रधानपदाचा दर्जा काढून मुख्यमंत्री पदापर्यंत अवनत केलं. पाकिस्तानला रोखण्यासाठी शेख अब्दुलांनी भारताची मदत घेतली, पण कायमस्वरूपी भारतात विलीन व्हावं असं काही त्याचं म्हणणं नसावं. काश्मीरमधली राजेशाही नष्ट होऊन तिथं लोकतांत्रिक राज्य यावं हीच त्याची मनिषा असावी. त्यामुळे १९४६ च्या एका सभेत त्यानी काश्मिरी जनतेनं एक एक रुपया गोळा करून त्या वेळच्या राजाला पंच्याहत्तर लाख रुपये परत करावे आणि काश्मीरच्या आझादीची मागणी करावी असाही एक प्रस्ताव मांडला होता. पाकिस्तानच्या विरोधात शेख अब्दुलांचा पंडित नेहरूंनी उपयोग करून घेतला, पण त्याच्या पुढच्या साऱ्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. हा खरं तर एकूणच काश्मिरी जनतेचा विश्वासघात होता आणि आहे. असा एकूण तिच्या सांगण्याचा मतितार्थ होता.

तिचा एवढा इतिहास सांगून होईपर्यंत आम्ही पोहोचलो. कुठल्याही मराठवाड्यातील खेड्यासारखं अरूंद बोळांचं आणि विस्कटून घर पडली असावीत अशा रचनेचं गाव. भलं मोठं कपाऊंड असलेल्या एका विस्तीर्ण मैदानाच्या सरकारी शाळेत आमची गाडी घुसली. मैदानाच्या एका कडेला बांधकाम बरीच वर्षं चालू आहे हे स्पष्ट जाणवणारी दुमजली इमारत. इथं बारावीपर्यंत शाळा होती. आणि बारावीनंतर भारतात उच्च शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राबिया इथं आली होती. एक जिना चढून एका वर्गात शिरलो. बारावी पास झालेली जवळपास ५०-६० मुलं-मुली वर्गात जमलेली. शिक्षक त्यांना मार्गदर्शन करण्यात गुंतलेले. राबियाला बघून कुणीतरी मसिहा आल्यासारखा त्याच्या चेहऱ्यावरती आनंद उमटलेला मला स्पष्ट जाणवत होता. राबिया थेटच वर्गातल्या फळ्यासमोर शिक्षकांसाठी ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन बसली. मलाही अदबीनं एका शिक्षकानं एका खुर्चीवर बसवलं. राबियानं काश्मिरीत भाषणवजा मार्गदर्शन सुरू केलं. ५-१० मिनिटांनी तर एकदमच तिच्या लक्षात आलं असावं की, आपल्यासोबतच्या पाहुण्याला काश्मिरी येत नाही. आणि तिनं थेट हिंदीत पुन्हा आपलं भाषण सुरू केलं. भारतात विविध विद्यापीठांमधल्या वैद्यकीय, इंजिनिअरिंगसाठी या मुला-मुलींना अ‍ॅडमिशन घ्यायचं होतं. त्याबद्दल ते अतिशय कुतूहलानं व उत्सुकतेनं राबियाकडे चौकशी करत होते. पण हे करत असतानाही त्यांच्या मनावर कसलं तरी अनामिक दडपण आणि चेहऱ्यावरती धास्तीही जाणवत होती. बहुधा स्वतःच्या सुरक्षिततेविषयीच असावी. कारण त्या पद्धतीचे आडूनआडून प्रश्न ते राबियाला विचारत होते. पण राबियाही संपूर्ण भारताची वकिल असल्यासारखी अतिशय आस्थेनं त्याना आश्वस्त करायचा प्रयत्न करत होती.

मग मी उठून खाली मैदानावर आलो. आणि गार वाऱ्याने जाणवणाऱ्या थंडीमुळे उन्हात शाळेच्या इतर शिक्षकांबरोबर गप्पा मारत बसलो. गप्पांतून काश्मीरमधली शिक्षण पद्धती समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो. इथं महाराष्ट्रासारखे जून ते एप्रिल असं अ‍ॅकॅडमिक वर्ष नाही. तर जानेवारी ते डिसेंबर असं रेग्रुलर कॅलेंडर वर्ष आहे. बाकी अभ्यासक्रमाचा आणि शिक्षणाचा १०+२+३ हाच आकृतीबंध. एक विद्यार्थी माझ्याकडे निरखून पाहत होता. मी त्याला हाक मारून जवळ बोलावलं. नाव विचारलं, थोडंसं लाजतलाजतच त्याने आपल्या काश्मिरी उच्चारात ‘मीर’ असं काहीतरी सांगितल्याचं मला कळलं. मी त्याला तुला भारतात की पाकिस्तानात शिकायला आवडेल? असा प्रश्न केला. तो चटकन् उत्तरला, ‘भारतात.’ का असे विचारल्यावर म्हणाला, “भारतातला शिक्षणाचा दर्जा चांगला आहे. आणि भारत माझाच देश आहे ना !” त्याचं हे उत्तर ऐकून मी उडालोच. कारण माझ्यावर असं बिंबवण्यात आलं होतं की, काश्मिरी जनता ही भारत विरोधी आहे. माझ्यावर संस्कारलेले राष्ट्रप्रेमाचं मूल्य नाही म्हटलं तरी थोडं फुशारलंच.

एक सांगायचं विसरूनच गेलो की, इथल्या मुली अगदी डोकं, गळा आणि पायापर्यंत पूर्ण कपड्यांनी लपेटलेल्या असतात. पण चेहऱ्यावर बुरखा नसतो. किंवा मला तरी अशी बुरखेवाली काश्मीर हिंडताना कुठेच आढळली नाही. शिवार अनेक ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीनेच स्त्रियाही तेवढ्याच आत्मविश्वासाने काम करताना दिसल्या, भेटल्या. राबिया हे त्याचं एक अत्यंत सुरेख उदाहरण. तिचा बोलण्यातला आत्मविश्वास आणि संपर्क मला खूपच मोहवून गेला. कारण तिचा हाच आत्मविश्वास मला नंतरही भेटलेल्या प्रत्येक काश्मिरी महिलेमध्ये अनुभवायला मिळाला. येताना राबियाला मीरचं बोलणं सांगितलं. राबिया माझ्याकडे मिश्कील हसत पाहत म्हणाली, “तुला काश्मीर समजून घ्यायचा असेल तर येताना जो काही कचरा डोक्यात भरून  आला असशील तो आधी डंप करून टाक. आणि अतिशय निरागस मनाने हमे समझ लो.”

“राबिया एक बात खुले दिल से मुझे बताओ. की काश्मीरी आखिर क्या चाहते है? पाकिस्तान के साथ जाना, भारत के साथ रहना की आझाद रहना?” मी माझ्यासारख्या प्रत्येक भारतीयाच्या मनात असलेला काश्मीरबद्दलचा हा एकमेव प्रश्न विचारला.

“ये बात तुम खुदही लौटने के दिन मुझे बताओ.” राबिया सफरचंदाचा लचका तोडत आपल्या नेहमीच्या हसऱ्या मूडमध्ये म्हणाली. त्या खेड्यामध्ये एक छोटंसं साप्ताहिक चालवणारा स्थानिक पत्रकार भेटला होता. त्याला एकूण काश्मीरच्या भासवल्या जाणाऱ्या तंग परिस्थितीबद्दल मी विचारलं होतं, “ये कश्मीर का किस्सा किस तरह खत्म हो सकता है?” त्यानं सहज उत्तर दिल्यासारखं मला म्हटलं, “जब सब अपना अपना स्वार्थ छोड देंगे.” मी पुन्हा त्याला विचारलं, “ये सब कौन?”

 “पंडत, मौलवी, पॉलिटिशन्स, पुलिस, आर्मी और दिल्ली.”

 “इसी क्रमसे?”

 “नही. एक साथ.”

राबियाला हा संवाद मी सांगितला. किंचित काळ ती गंभीर झाली. मग हातातलं अर्धवट खाल्लेलं सफरचंद तिनं अचानक खिडकीतून बाहेर फेकून दिलं. मग बराच वेळ ती काही न बोलता बाहेरच बघत राहिली. तिची अस्वस्थता मी न्याहाळत होतो. श्रीनगर जसजसं जवळ आलं, तसतशी ती भानावर येत गेली. ‘अल्लाही बचाये मेरे इस प्रिय कश्मीर को इस सैतानोंसे’ असं काहीतरी अस्फुट पुटपुटलेली मी ऐकलं. खरं तर मला तिला अजूनही काही प्रश्न विचारारचे होते, पण नाही विचारलं. तिच्या ऑफिसच्या दारात गाडी थांबल्यावर उतरता उतरता तिला म्हटलं, “कल किससे मिलवाओगी?”

“मिलाऊंगी नही. तुम्हें मिलने जाना है.” मी तिच्याकडं प्रश्नार्थक बघितलं. आपल्या ऑफिसमधल्या खुर्चीवर स्थानापन्न होत तिनं आपल्या मोबाईलवरून दोन-तीन वेळा बटनं दाबून कुणाशी तरी संपर्क केला. अमुक वाजता राजा नावाचा एक महाराष्ट्रीयन पत्रकार भेटायला येणार आहेत असं ती कुणाला तरी सांगत होती. फोन संपल्यावर माझ्याकडे पाहत म्हणाली, “उद्या दुपारी तुला बिलाल सिद्धीकीला भेटायचंय.”

“कोण हा?”

“जे. के. एल.एफ.चा माजी आणि पहिला सुप्रिमो.”

मी उडालोच. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट. काश्मीरच्या स्वतंत्रतावादी गटातील एक महत्त्वाची संघटना. आज यासीन मल्लिक त्याचा प्रमुख आहे. पण संघटनेच्या स्थापनेतच आणि नेतृत्वात ज्याचा सहभाग होता त्या बिलालला भेटायची संधी मिळतेय. बिलाल आता सरेंडर झालाय आणि राजकीर भाषेत नजरकैदेत आहे एवढं माहीत होतं. राबियानं थेट त्याच्याशी माझी भेट घडवायची व्यवस्था केली. मी राबियाकडं आभारयुक्त कौतुकानं पाहिलं आणि समोरचा वाफाळलेला ‘कावा’ तोंडाला लावला.

दिलेल्या वेळेच्या आधीच श्रीनगरमधला पत्ते शोधण्याचा अनुभव लक्षात घेऊन मी दोन तास आधीच बिलालच्या शोधात हातात कन्फर्म पत्ता घेऊन निघालो. जवळपास एक तास आधीच रिक्षावाल्यानं मला बिलालच्या घराजवळ सोडलं. शहराच्या खूपच एका बाजूला एकांत वाटणारं आणि झेलमच्या काठावर त्याचं दुमजली घर. सगळ्या जगाने बहिष्कार टाकल्यासारखं त्याचं घर अगदीच एकुटवाणं दिसत होतं. फाटक ढकलून आत गेलो. वेळेआधीच जातोय तर तो आपले स्वागत कसं करेल? ही धास्ती होतीच. फाटकाचा आवाज ऐकून एक म्हातारी पेहरन घातलेली बाई वरच्या मजल्यावरच्या दरवाजात आली. मला पाहून तिनं वर येण्याची खूण केली. मी माझ्या येण्याचा हेतू जिना चढत असतानाच तिला सांगितला. तेवढ्यात तिच्या मागून एक गोरापान निळ्या डोळ्यांचा हनुवटीवर थोडीशी पांढरी दाढी असलेला चेहरा डोकावला. थेट येशू ख्रिस्तच. मला पाहताच चेहऱ्यावर प्रसन्न हास्य आणत हळूवार आवाजात म्हणाला, “आओ राजा, तुम्हाराही इंतजार था.” सिनेमात पाहिलेले अतिरेक्यांच्या प्रतिमा डोक्यात गच्च होत्या. बिलालला पाहताच त्या प्रतिमांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या. दहशतवादी इतका सुंदर चेहऱ्याचा आणि प्रेमळ आवाजाचा असू शकतो, हा मला एक नवाच साक्षात्कार होता.

(‘सत्याग्रही विचारधारा’च्या २०१४च्या दिवाळी अंकातून लेखकाच्या पूर्वपरवानगीने साभार)

लेखक इंग्रजीचे निवृत्त प्राध्यापक आणि प्रवासी लेखक आहेत.

rajashirguppe712@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......