‘तुझे याद कर लिया है...’ : समलिंगी नात्याचा उत्कट कलाविष्कार
कला-संस्कृती - चलत्-चित्र
श्रीकांत उमरीकर
  • पुण्यातील समलिंगी चित्रपट महोत्सवातील दृश्य
  • Tue , 18 April 2017
  • कला-संस्कृती चलत्-चित्र International Queer Film Festival आंतरराष्ट्रीय समलिंही चित्रपट महोत्सव पुलकित खन्ना Pulkit Khanna LGBT एलजीबीटी तुझे याद कर लिया है Tujhe yaad kar liya hai

‘तुझे याद कर लिया है, आयात की तरहा’ हे अरिजित सिंगने गायलेलं ‘बाजीराव-मस्तानी’मधील गाणं तसं लोकप्रिय आहे. तरुणाईच्या ओठांवरचं आहे. स्वाभाविकच त्यावरचं नृत्य म्हणजे समोर येतं ते चित्र असं : एक कमनीय बांध्याची तरुणी आणि एक सुडौल, बांधेसूद तरुण. तो तरुण तिला उद्देशून हे गाणं म्हणत आहे. त्यांच्या हालचालींमधून त्यांची एकमेकांमध्ये सामावून जाण्याची उत्कटता लक्षात येते. पण समजा हेच गाणं दोन विशी-पंचविशीतील तरुणच आपल्यासमोर सादर करणार असतील तर? आपली प्रतिक्रिया काय असेल? 

पहिल्यांदा तर धक्काच बसतो. बहुतांश समाजाने समलिंगी संबंधांना मनोमन मान्यता दिलेली नाही. शिवाय विधिवत आयुष्यभर जोडीदार म्हणून राहण्यात कायद्याने निर्माण केलेला अडथळा तर आहेच, पण हे सगळं झुगारून काही तरुण एकत्र येतात. आपल्या संबंधांची जाहीर वाच्यता करतात. आणि याला एक कलात्मक रूप देत समाजासमोर आणतात, हे खरंच विचार करण्यासाखं आहे. याची गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे.

हा प्रसंग घडला पुण्यात. ७, ८ आणि ९ एप्रिल दरम्यान पुण्यात पहिल्या समलिंगी चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. (या पूर्वी सात वर्षांपासून ‘कशिश’ नावानं असा महोत्सव मुंबईत अतिशय मोठ्या प्रमाणात होतो आहे.) एल्सवेअर कॅफेच्या अतिशय छोट्या जागेत मोजक्या लोकांच्या साक्षीनं या महोत्सवाचं उद्घाटन झालं. सुरुवातीचा औपचारिक कार्यक्रम, लघुपटांचं प्रदर्शन झाल्यावर खुर्च्या हटवून छोटीशी जागा पडद्यासमोर तयार करण्यात आली आणि सादरीकरणासाठी दोन तरुण पुढे आले. त्यातील पुलकित खन्ना हा तरुण स्वत: चांगला नर्तक आहे, शिवाय तो नृत्यशिक्षक, नृत्य दिग्दर्शक (कोरिओग्राफर) म्हणूनही काम करतो. त्याने स्वत:च ‘तुझे याद कर लिया है’ या गाण्यावरचं नृत्य बसवलं आहे.

तुझे याद कर लिया है

त्यांच्या सादरीकरणात एक उत्कटता होती. नर्तकाचं शरीर लवचीक असावं लागतं, तसं त्यांचं होतंच. शिवाय हालचाली चपळ असाव्या लागतात. विशेष म्हणजे या गाण्यात एक पुरुष आहे आणि एक स्त्री आहे असं बिलकूल जाणवू दिलेलं नाही. दोघेही पुरुषच आहेत. स्त्री इतकीच समर्पणाची भावना पुरुषापाशीसुद्धा असू शकते. पुलकितला साथ देणारा त्याचा मित्र तेवढा तरबेज दिसत नव्हता. त्यानं फक्त पोषक हालचाली करत साथ दिली. 

गाण्याच्या सुरुवातीला आलापी आहे. खरं तर आलापी ही तशी अमूर्त असते. त्यावर काय हालचाली बसवणार? पण पुलकितने ते अवघड कामही करून दाखवलं. गाण्याचे बोल सुरू झाल्यावर साथीदाराचा हात हाताशी धरून तो काळजावरून खाली नेतो. त्यातून हृदयात उतरत गेलेल्या नात्याची खोली अधोरेखित होते. तसंच गाण्यातल्या ‘मरने तलक रहेगी तू आदत की तरहा’ या ओळीच्या वेळी तो मित्राच्या हातावर स्वत:ला झोकून देतो. या सगळ्या कलात्मक हालचालींतून उत्कटता तर जाणवतेच, पण कुठेही अश्‍लीलता जाणवू दिलेली नाही हे विशेष. गाण्याच्या शेवटी एक दीर्घ चुंबन येतं आणि या नात्यातील अद्वैताचा रंग ठळक होतो.

आजूबाजूला गोळा झालेल्या बहुतांश समलिंगी मंडळींनी टाळ्यांचा कडकडाट करून या नृत्याला दाद दिली. सुप्रसिद्ध पाश्चात्य नृत्यांगना इझाबेला डंकन यांनी आपल्या आयुष्यातील एक अप्रतिम, अविस्मरणीय असा नृत्याचा अनुभव शब्दबद्ध केला. एक दारूच्या अड्ड्यावर ती रात्री उशीरा पोचते आणि तिथं स्फुर्ती येऊन नाचू लागते. आजूबाजूचे सगळे दारूडेही मग भान विसरून टाळ्यांचा ताल धरतात, टेबलावर ठेका धरतात आणि एक मैफल सजते. इथंही काहीसं तसंच वातावरण बनलं होतं. अगदी छोट्या काळासाठी आजूबाजूचे लोक सगळं विसरून पुलकितच्या या आविष्कारात दंग झाले होते. त्याच्या आविष्काराला सर्वांनी मनापासून दाद दिली. शेवटच्या चुंबनानंतर तो खरंच लाजला आणि बाजूला सरकला. 

समलिंगी चित्रपट महोत्सवातील हा एक छोटासा प्रसंग. पण तथाकथित स्ट्रेट समाजाला विचारात पाडणारा... पुढे दोन दिवस हा चित्रपट महोत्सव आर्ट कॅचर कला शाळेच्या परिसरात रंगत गेला. विविध चित्रपट, ज्यात आंतरराष्ट्रीय होते तसंच भारतभरच्या विविध भाषेतीलही होते. अगदी मराठीही होते. ज्यांनी मराठी चित्रपट बनवले ते दिर्ग्दशक, नट स्वत: हजर होते. इथं तृतीयपंथी आपल्याकडे तुच्छतेनं बघितलं जाणार नाही या विश्वासानं वावरत होते. मुलींचे कपडे घातलेले ट्रान्सजेंडर एरव्ही टीकेचा विषय होतात, ते इथं मुक्तपणे फिरत होते. सगळे जण एकमेकांशी मोकळेपणानं वागत\बोलत होते. 

समलिंगी व्यक्ती आणि समाज यांच्यात दरी आहे. त्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करून ही दरी मिटवली पाहिजे. समलिंगी चित्रपट महोत्सवाच्या निमित्तानं कलाविष्काराच्या माध्यमातून या लोकांनी आपली वेदना समाजासमोर आणली हे महत्त्वाचं आहे. हे समजून घेतलं पाहिजे. आपण सगळ्यांनी मिळून समाजातील समलिंगींना मानसिक आधार दिला पाहिजे. नुकताच या विषयावर ‘अलिगढ’सारखा महत्त्वाचा चित्रपट येऊन गेला. आपण तो निदान पाहण्याचं तरी काम केलं पाहिजे. ‘लोक नीती मंच’ने हा विषय हाती घेतला आहे. औरंगाबादमध्ये जुलैच्या शेवटच्या आठवड्यात समलिंगी चित्रपटांचं प्रदर्शन, समलिंगी कलाकारांचे कार्यक्रम, तृतीयपंथीयांचे कार्यक्रम होतील, यासाठी प्रयत्न केला जात आहे. यासाठी सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे.

..............................................................

पुण्यातल्या चित्रपट महोत्सवाविषयीच्या अधिक माहितीसाठी पहा -  

http://outandloud.lgbtq.co.in/

..............................................................

लेखक जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद या प्रकाशनसंस्थेचे प्रकाशक आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत.

shri.umrikar@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright Aksharnama, 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......