अज्ञेयवादी कुणाला म्हणावे? आणि निरीश्वरवादी कुणाला म्हणावे?
ग्रंथनामा - झलक
शरद बेडेकर
  • ‘मानव-विजय’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Sun , 09 April 2017
  • ग्रंथनामा Granthnama झलक मानव-विजय Manav Vijay शरद बेडेकर Sharad Bedekar डायमंड पब्लिकेशन्स Diamond Publications

धर्म, ईश्वर यांच्या चिकित्सेकडून निरीश्वरवादाकडे कसे जावे याची मांडणी करणाऱ्या ‘मानव-विजय’ या शरद बेडेकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन आज मुंबईमध्ये नास्तिक परिषदेमध्ये होत आहे. डायमंड पब्लिकेशन्स आणि लोकसत्ता ग्रंथमाला यांच्या संयुक्त प्रकाशनातून साकारलेल्या या पुस्तकातील एका लेखाचा हा संपादित अंश.

----------------------------------------------------------------------------------

दैनंदिन कामाच्या रामरगाड्यात गुंतलेला सर्वसाधारण माणूस ‘ईश्वर आहे की नाही?’ या वादात बहुधा पडत नाही. अशा वादाचा काही उपयोग नाही असे ठरवून आपल्या समाजातील किंवा परिसरातील अनेकांप्रमाणे त्यानेही ‘ईश्वराचे अस्तित्व, कर्तृत्व गृहीत धरून चालणे’ हेच हिताचे आहे, असे मानून तो मार्गक्रमण करत राहतो. स्वतंत्र विचार करायला न घाबरणारी काही माणसे मात्र ‘ईश्वर खरेच आहे का?’ या शोधात जिज्ञासेने उडी घेतात. त्यातील काही आपल्या विचाराने ‘अज्ञेयवादी’ बनतात, तर काही जण ‘निरीश्वरवादी’.

अज्ञेयवादी माणसाची भूमिका अशी असते की, ‘आजच्या मानवी ज्ञानाच्या व बुद्धीच्या साहाय्याने ईश्वर आहे की नाही, हे निश्चित करता येणार नाही; निदान मी तरी ते निश्चित करू शकत नाही’. दुसरे काही जण असे मानतात की, ‘ईश्वराचे अस्तित्व किंवा नास्तित्व सिद्ध करता येणे कधीच शक्य नाही. एवढेच नव्हे तर, तसे करण्याची काही आवश्यकताही नाही’. काही जणांच्या मते अज्ञेयवाद ही एक उत्तम मध्यममार्गी भूमिका असून, ईश्वर आहे किंवा नाही ही टोकाची गृहिते सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे फुकाची डोकेफोड आहे. काही जण काही मर्यादेपर्यंत शोध घेऊन, ‘ईश्वराच्या अस्तित्वाला काहीही पुरावा नाही’ इथपर्यंत येतात; परंतु ‘अस्तित्वाला पुरावा नसणे, हाच नास्तित्वाचा पुरावा ठरतो’ हे त्यांना कळत किंवा पटत नसल्यामुळे ते म्हणतात की, धर्मग्रंथात वर्णिलेला ईश्वर आम्हाला पटत नसला तरी अशी काही तरी प्रचंड शक्ती अस्तित्वात असून, ती कशी आहे ते आम्हाला न कळणे शक्य आहे. त्यामुळे ते स्वत:ला अज्ञेयवादी म्हणवतात.

काही जणांच्या बाबतीत अज्ञेयवाद ही पळवाट असू शकते. ईश्वर आहे की नाही यावर बोलायला नको, त्यामुळे अज्ञेयवादी असणे सोयीचे आहे. काहींच्या बाबतीत अज्ञेयवादी असणे ही निरीश्वरवादाकडे जाण्याची पायरी असू शकते. निरीश्वरवादी मनुष्यसुद्धा ‘ईश्वराचे नास्तित्व’ गणितासारखे सिद्ध करू शकत नाही हे खरे, पण तो असे मानतो की, ईश्वराच्या अस्तित्वाला काहीही पुरावा नसणे हाच ईश्वराच्या नास्तित्वाचा पुरेसा पुरावा आहे. पूर्णत: निरीश्वरवादी बनलेला माझ्यासारखा माणूस ईश्वराचे नास्तित्व जरी स्वतंत्रपणे व निर्विवादपणे सिद्ध करू शकत नसला तरी तो स्वत:ला केवळ संशयवादी किंवा अज्ञेयवादी न म्हणवता निरीश्वरवादी किंवा नास्तिक म्हणवतो आणि आजूबाजूच्यांची नाराजी ओढवून घेतो.

वैज्ञानिकांना त्यांच्या त्यांच्या विषयातील संशोधन करताना ईश्वराचे अस्तित्व मानावे लागत नाही, हे तर निश्चित खरे आहे; परंतु काहींचे म्हणणे असते की, ‘तर मग सगळे वैज्ञानिक नास्तिक का नाहीत?’ अनेक मोठमोठे वैज्ञानिक वैयक्तिक जीवनात ईश्वराचे अस्तित्व मानत असतील किंवा नसतील हे शक्य आहे. अनेक वैज्ञानिक फक्त संशयवादी किंवा ईश्वरवादी किंवा भक्तसुद्धा असण्यात आश्चर्य असे काहीच नाही. कारण ते जे संशोधन करतात ते त्या त्या विज्ञानशाखेतील संशोधन असते; ते काही ईश्वराबाबतचे संशोधन नसते.

निरीश्वरवाद्यांना तात्त्विक पातळीवर जसा ईश्वरवाद अमान्य आहे, तसा अज्ञेयवादही अमान्यच आहे. त्यांचे म्हणणे असे असते की, व्यावहारिक पातळीवर समाजाने ईश्वरवाद मान्य करून ईश्वरकृपेसाठी पूजा, प्रार्थना, उत्सव, उन्माद इत्यादींमध्ये वेळ व श्रम खर्च करून त्यात आयुष्य वेचण्याऐवजी अज्ञेयवाद स्वीकारलेला बरा. त्यामुळे जो अध्यात्माचा अतिरेक माणूस जातीला नि:संशय हानिकारक आहे, निदान तो तरी टाळला जाईल आणि काही विशिष्ट धार्मिक गटांना अध्यात्माची झिंग येऊन ते दहशतवादी, आतंकवादी कृत्ये करून जगाला हैराण करतात, ते तरी टळेल किंवा कमी होईल. त्या दृष्टीने ईश्वरवाद मानण्यापेक्षा अज्ञेयवाद मानणे चांगले आहे.

याउलट निरीश्वरवादाची भूमिका अशी असते की, या विश्वात जे जे काही आहे ते ते सर्व भौतिक आहे. म्हणजे असे की, विश्वातील सर्व शक्ती, सर्व वस्तू (ज्या सर्व शक्तींचीच वेगवेगळी रूपे आहेत.), त्यांचे सर्व नियम आणि काळ व अवकाश (पोकळी) हे सर्व भौतिक-रासायनिक असून या विश्वात अतिभौतिक (म्हणजे भौतिकापलीकडील किंवा भौतिकाव्यतिरिक्त) असे काही तरी इथे किंवा आसपास आहे, असे म्हणायला काहीही आधार नाही.

विश्व या भौतिक अस्तित्वात त्याच्या भौतिकतेचे आज स्पष्टपणे तीन स्तर निर्माण झालेले आहेत, ते लक्षात घेणे जरूर आहे. पहिला मूळ स्तर निम्न असून तो निर्जीव आहे. त्यातून निर्माण झालेला दुसरा ‘सजीव स्तर’ असून तो ‘अन्नग्रहण करणारा’ व ‘टिकून राहण्याचे उद्दिष्ट असलेला’ असा आहे. या दुसऱ्या सजीव स्तरातून निर्माण झालेला भौतिकाचा तिसरा स्तर हा ‘मानव स्तर’ असून हा उत्क्रांत सजीव प्राणी स्तर मन, बुद्धी व भावनाधारक आहे.

संपूर्ण विश्व हे अस्तित्व, अतिप्रचंड, टिकाऊ, चैतन्यमय, गतिमान व भौतिक नियम पाळणारे होते व आहे. म्हणजे ते केवळ निर्जीव, भौतिक प्रकारचे होते व आहे. त्याला मूलत: साधी सजीवताही नव्हती. म्हणजे अर्थात त्याला मन, बुद्धी, भावनाही नव्हत्या. तसेच त्याला इच्छा, उद्दिष्टे, योजना, प्रेरणा वगैरे काहीही नव्हते व नाही.

त्या मूळ निर्जीव, भौतिक चैतन्यातून अतिदीर्घ काळाने म्हणजे शे-सव्वाशे कोटी वर्षांनी पृथ्वी या ग्रहावर काही ठिकाणी आधी साधे, सूक्ष्म आकाराचे व क्षणभंगुर आयुष्य असलेले आणि ज्यांना टिकून राहण्याचे उद्दिष्ट व प्रेरणा आहे आणि ज्यांना पुनरुत्पादन क्षमता प्राप्त झालेली आहे, असे सूक्ष्म सजीव निर्माण झाले.

अशा साध्या सूक्ष्म सजीवांतून पुढील अतिदीर्घ काळात पायरीपायरीने उत्क्रांती होऊन शेवटी मन, बुद्धी, भावनाधारक व ज्ञानलालसा प्राप्त झालेला मानवी स्तर बनला. त्याने प्रयत्नपूर्वक आपली मन-बुद्धी व आपले ज्ञान विकसित केले. आपल्या आजच्या विश्वात या ‘मानवी मन-बुद्धी’सह सर्व काही भौतिक आहे आणि ते नियमांनी बद्ध आहे. त्या नियमांचे उल्लंघन करू शकणारे असे काहीही नाही. या मानवी स्तराने आपल्या विकसित मन-बुद्धीतून ईश्वर, धर्म, अध्यात्म, स्वर्ग, नरक, परलोक, पुनर्जन्म वगैरे अस्तित्वात नसलेल्या अनेक गोष्टी केवळ कल्पनेने रचलेल्या आहेत. थोडक्यात, ईश्वर किंवा सैतान या (भुताखेतांप्रमाणेच) केवळ मानवी कल्पना असून त्यात काही सत्य नाही, असे निरीश्वरवादाचे म्हणणे आहे.

साक्षात्कार, चमत्कार, ईश्‍वर, देव, देवदूत, देवधर्म, स्वर्ग, नरक, परलोक इत्यादींना तर्कबुद्धीची कसोटी लावून त्यांना विचारांनी स्पष्टपणे नाकारणे म्हणजेच ‘निरीश्वरवादी’ असणे होय.

अशा प्रकारच्या विचारांनी निरीश्वरवादी बनलेला प्रत्येक मनुष्य बुद्धिप्रामाण्यवादी, इहवादी, विज्ञानवादी, वास्तववादी आणि विवेकवादी असतोच असतो; परंतु प्रत्येक बुद्धिवादी मनुष्य निरीश्वरवादी असेलच, असे मात्र म्हणता येत नाही. कारण असे बुद्धिवादी लोक असणे शक्य आहे की, जे व्यवहारात तर्कबुद्धी वापरतात; परंतु ती ईश्वर-चिकित्सेसाठी मात्र वापरत नाहीत. ‘मी ईश्वराला मानत नाही, त्याला काही किंमत देत नाही किंवा माझा ईश्वरावर राग आहे,’ असे म्हणणारा माणूसही निरीश्वरवादी ठरत नाही. इतर मानतात तशा ईश्वराचे अस्तित्वच निरीश्वरवादी माणसाला मान्य नसल्यामुळे त्याने ईश्वरावर राग धरण्याचा किंवा त्याला मान न देण्याचा काही प्रश्नच येत नाही. ईश्वर जर अस्तित्वातच नसेल तर त्याच्यावर राग तरी कसा असेल?

विश्वाची काही एक परमसत्ता असून ती मनबुद्धीइच्छायुक्त आहे, असे ज्यांना वाटते त्यांनी ती अस्तित्वात आहे याचे पुरावे दिले पाहिजेत. नाही तर ती दगडधोंडे, रसायने किंवा वीज, गुरुत्वाकर्षणासारखी फक्त भौतिक शक्ती आहे, असे म्हणावे लागेल. आध्यात्मिक ईश्वर शक्तीचे अस्तित्व तर्कबुद्धीने कधीही कुणालाही सिद्ध करता आलेले नाही.

काही लोक असे मानतात की, विविध धर्मांच्या व पंथांच्या वेगवेगळ्या उपासनापद्धती हे एकाच ईश्वराकडे पोहोचण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. परंतु काही असे मानतात की, फक्त त्यांच्या स्वत:च्या धर्मातील ईश्वर व त्यांची उपासनापद्धतीच खरी असून, इतर धर्मातील, पंथांतील ईश्वर व उपासनापद्धती खोट्या आहेत. एवढेच नव्हे, तर इतर धर्माच्या लोकांना ते नास्तिक मानतात. निरीश्वरवादासाठी ही कसोटी वापरणे हास्यास्पद आहे. ‘आपण ज्या धर्मात जन्मलो त्या धर्मात सांगितलेला ईश्वर जो नाकारतो, तो नास्तिक’ अशी नास्तिकतेची व्या‘या होऊ शकत नाही. नास्तिक किंवा निरीश्वरवादी सर्व ईश्वरकल्पना नाकारतो. अरबस्तान व युरोपमध्ये अद्वैत मत सांगणाऱ्या काही संतांना नास्तिक ठरवून इतिहासकाळी त्यांचा मोठाच छळ झालेला आहे. त्यांच्या तेथील धर्मामध्ये ईश्वर आणि मनुष्य हे निर्माता व निर्मिती असे पूर्ण द्वैत सांगितले असल्यामुळे माणसाचा आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे, हे अद्वैत मत त्यांनी नास्तिक मत ठरवले. ते अर्थातच चूक आहे. अद्वैत मतसुद्धा पूर्णत: ईश्वरवादी मतच आहे.

भौतिक शक्तींहून अधिक अशी काही ईश्वरी शक्ती अस्तित्वात आहे का, या प्रश्नाचे उत्तर निरीश्वरवाद्याने ‘नाही’ असेच दिले पाहिजे. प्रत्यक्षात कुणी ईश्वर नसून लोकांनी ईश्वराच्या फक्त अस्तित्वावर श्रद्धा ठेवली तर मोठे काही बिघडत नाही. आम्हा बुद्धिप्रामाण्यवाद्यांचा जास्त आक्षेप आहे, तो ईश्वराच्या कर्तृत्वावरील श्रद्धेला. आता असे पाहा की, आंधळा, बहिरा, मुका, नासमज, ध्येयशून्य व कर्तृत्वशून्य असा ईश्वर काही कुणी आस्तिक मानत असणे शक्य नाही; परंतु जर कुणाला काही तरी अज्ञात शक्ती अस्तित्वात आहे, असे म्हणायचे असेल आणि तरीही आपण विज्ञानवादी, वास्तववादी वा विवेकवादी आहोत, असे म्हणायचे असेल तर त्याला एवढे तरी मानावेच लागेल की, १) त्या शक्तीला इच्छा, मन, बुद्धी व भावना नाहीत. २) ती शक्ती माणसाचे किंवा मानवसमूहाचे भाग्य ठरवत नाही. ३) ती शक्ती मानवी जीवनात हस्तक्षेप करू इच्छित/शकत नाही. ४) ती मानवाकडून पूजा, प्रार्थना, उपासना यांची अपेक्षा करत नाही. ५) ती कुणालाही साक्षात्कार देत नाही. चमत्कार करत नाही. ६) तिचे स्वर्ग, नरक किंवा असे काहीही परलोक नाहीत आणि ती कुणा सजीवाला पुनर्जन्मही देत नाही.

जर कुणी माणूस स्वत:ला निरीश्वरवादी समजत असेल आणि तरीही काही अज्ञात शक्ती अस्तित्वात असू शकेल, असे तो म्हणत असेल तर त्याला वर नोंदवलेले कर्तृत्व ईश्वराजवळ नाही, एवढे तरी मानावेच लागेल. अर्थात ईश्वरवाद्यांनासुद्धा असा कर्तृत्वशून्य ईश्वर नको असतो. त्यांना जो मानसिक आधार देईल, संकटसमयी धावून येईल, असाच ईश्वर त्यांना हवा असतो. निरीश्वरवादी माणूस वैश्विक-भौतिक शक्तीचे अस्तित्व नाकारत नाही, परंतु ईश्वरवादी लोक वैश्विक शक्तींचे वरच्यासारखे जे इतर कर्तृत्व मानतात, ते मात्र तो अवश्य नाकारतो.

सर्वसाधारणपणे ईश्वर हा सर्वज्ञ, सर्वसमर्थ व सर्वकल्याणकारी (म्हणजे प्रेमळ व दयाळू) आहे, असे मानले जाते; परंतु हे तीनही गुण एकत्र असलेला ईश्वर संभवतच नाही, असे आम्हाला वाटते. कसे ते पाहू. ईश्वर सर्वज्ञ असेल तर त्याला सर्वांची दु:खे, त्यांच्यावर झालेले अन्याय, अत्याचार वगैरे माहीत असणार. तो सर्वसमर्थसुद्धा असल्यामुळे त्याला काहीही उलटसुलट करता येत असणार. शेवटी त्याचे प्रेम व त्याची दया सर्वांसाठी असल्यामुळे जगात सर्व जण सुखी व आनंदी असले पाहिजेत; परंतु प्रत्यक्ष जगात बहुतेक माणसे दु:खी आढळतात. यावरून असे दिसते की, तो सर्वज्ञ तरी नसेल किंवा सर्वसमर्थ तरी नसेल किंवा त्याचे प्रेम व दया तो सर्वांना नि:पक्षपातीपणे देत नसेल. खरे तर ईश्वराचे सर्वांवर प्रेम आहे, असे काही जगात दिसूनही येत नाही. मग साधारणपणे मानला जातो, तसा ईश्वर कुठे आहे?

ईश्वरवादी व निरीश्वरवादी दोघांनाही पुढील विधाने मान्य होतील - १) विश्वात एक अतिप्रचंड चैतन्य आहे. २) ते विश्वाच्या प्रत्येक कणात भरलेले आहे. ३) ते सतत कार्यरत आहे. ४) ते प्रवाही (गतिमान) आहे. ५) ते नियमबद्ध आहे. ६) ते नवनिर्मितीक्षम आहे. ७) मनुष्य व त्याचा प्राण (सजीवता) हा मूलत: त्याच चैतन्यातून निर्माण झालेला असावा. ८) ती त्या चैतन्याच्या तुलनेत अतिक्षुद्र आहे. आता या वैश्विक चैतन्यालाच जर कुणी ईश्वर म्हणत असेल तर तेवढा ईश्वर सर्वांनाच मान्य होईल. मात्र या चैतन्याला ईश्वरवादी लोक इतर अनेक मानवी गुण जोडतात. आता असे बघा की, हे चैतन्य वैश्विक, अतिप्रचंड व सर्वव्यापी आहे हे खरे, पण ते सजीव नव्हे. त्याला मन, बुद्धी, इच्छा व भावना नाहीत. ते नवनिर्मितीक्षमसुद्धा आहे, पण ते नियमांनी बांधलेले आहे, तसेच त्याला जाणीव, दया-माया, प्रेम वगैरे काही नाही. मग ते ईश्वर कसे? ते तर केवळ भौतिक-वैश्विक चैतन्य आहे.

अशा या भौतिक-वैश्विक चैतन्याविषयी आपल्याला प्रेम व आदर वाटणे शक्य आहे आणि साहजिकही, कारण प्रेम करणे हा मानवी मनाचा गुणधर्म आहे. आपली सजीवता आणि मनबुद्धी हे कोट्यवधी वर्षांच्या उत्क्रांतीने घडून आलेले चमत्कार आहेत. त्यामुळेच आपण अगदी डोंगर, नदी, समुद्र एवढेच काय, पण आपल्याशी संबंधित लहानसहान वस्तूंवरही प्रेम करतो. मग विश्वचैतन्य ही तर अशी माती आहे की, जिच्यातून आपला जन्म झालेला आहे. म्हणून तिच्याविषयी आपल्याला प्रेमादर वाटणे साहजिक आहे. आपण त्या चैतन्याची लेखन, काव्य, संगीत इत्यादी साधनांद्वारे स्तुती, सन्मान, सत्कार करणे हेही स्वाभाविक आहे. सद्भाव व्यक्त करणे हा मानवी सद्गुण असून तो आनंददायक आहे. त्याचा आपल्या मनावर व शरीरावर सुपरिणामही होतो; परंतु त्याचा अर्थ आपण जर असा लावला की, त्या चैतन्याने आपण केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन आपल्याला ते सुपरिणाम दिलेले आहेत, तर ते चुकीचे म्हणावे लागेल. कारण ते चैतन्य काही देऊ शकत नाही (आशीर्वादही नाही) आणि कुणाशीही काही देण्या-घेण्याचा व्यवहारही करू शकत नाही.

अशा प्रकारच्या वैश्विक-भौतिक चैतन्याला कुणा माणसाने ईश्वर-ब्रह्म किंवा असेच काही नाव दिले आणि प्रेमादरापोटी त्याची स्तुती करून त्याला नमस्कार केला तरी इतर लोक त्या चैतन्याला ईश्वर मानतील का? बहुधा नाहीच! कारण तो ईश्वर आध्यात्मिक नाही, प्रार्थनेने तो प्रसन्न होत नाही, नवसाला पावत नाही. म्हणजे सर्व धार्मिक मानतात तसा तो ईश्वर नाही, पण त्याच कारणांनी अशा केवळ भौतिक शक्तीवर प्रेम करणारा असूनही जर तो तिच्याकडे काहीच मागत नसेल, तर मात्र तो माणूस निरीश्वरवादी म्हणता येईल, असे मला वाटते.

---------------------------------------------------------------------------------------

मानव-विजय – शरद बेडेकर,

डायमंड पब्लिकेशन्स, पुणे, लोकसत्ता ग्रंथमाला, मुंबई,

पाने – १६२

मूल्य – १९५ रुपये.

---------------------------------------------------------------------------------------

ऑनलाइन खरेदीसाठी लिंक -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/2379

---------------------------------------------------------------------------------------

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......