द फॅट इयर्स : चीनच्या आभासी उन्मादामागचे गडद वास्तव
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
नितिन जरंडीकर
  • ‘द फॅट इयर्स’चं मुखपृष्ठ आणि कादंबरीकार चॅन कूनचुंग
  • Fri , 24 March 2017
  • ग्रंथनामा Booksnama द फॅट इयर्स The Fat Years चॅन कूनचुंग Chan Koonchung मास्टर चेन Lao Chen मायकल एस्. ड्युक Michael Duke

अलीकडच्या कालखंडातील कोणत्याही मॉडर्न–नेशन स्टेटचा इतिहास पाहिल्यास एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे ‘सरकार’ नावाची एक अजस्त्र यंत्रणा तेथे कार्यरत असते. आणि साम्यवादी देशांच्या अंतरंगात डोकावल्यास असे दिसून येते की, ही सरकारी यंत्रणा नुसतीच अजस्त्र नसते, तर ती राक्षसीसुद्धा असते. २१व्या शतकातील ‘नवीन महासत्ता’ म्हणून बिरूद मिरवणारा भारताचा शेजारी– चीन. येथील सरकार नामक यंत्रणा अजस्त्र आहे, राक्षसी आहे आणि गुंतागुंतीचीही आहे. इथल्या सरकारच्या सर्व नाड्या कम्युनिस्ट पार्टी आणि कम्युनिस्ट पार्टीचे पॉलिट ब्युरो यांच्या हातात आहेत. २०व्या शतकातील चीनचा भूतकाळ कमालीचा रक्तरंजित आहे. जमीनदारांचे  झालेले शिरकाण, ग्रेट लिप फॉरवर्ड काळातील कत्तल, कृत्रिम दुष्काळ, तिआनमन चौकातील अमानुष नृसंहार आदि घटनांनी चीनचा इतिहास झाकोळून गेला आहे. आजमितीलादेखील चीनमध्ये सोशल मीडिया आणि इंटरनेट यावरती कमालीचे निर्बंध आहेत. अर्थात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मानवी मूल्ये यासाठी चीनची कधीच ख्याती नव्हती.

परंतु २१व्या शतकात आर्थिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने चीनने शिस्तबद्ध आखणी केली, कठोर परिश्रम घेतले हे निर्विवाद. बिजिंग ऑलिम्पिकच्या निमित्ताने चीनने आपल्या वैभवसंपन्नतेचे जाहीर प्रदर्शनही केले. बघता-बघता चीनी वस्तूंनी सर्व बाजारपेठा काबीज करायला सुरुवात केली. अल्पावधीतच जागतिक सत्ता संघर्षामध्ये चीनने आपला दबदबा निर्माण केला.

पण अभ्यासकांच्या मते चीनची ही समृद्धी म्हणजे तिथल्या अर्थव्यवस्थेला आलेली सूज आहे. सुदृढ आणि स्वस्थ समाजाचे ते नक्कीच निदर्शक नाही. चीनच्या पोलादी पडद्याआड काय शिजते आहे, हे समोर यायला दीर्घ काळ जावा लागेल. त्यामुळेच चीनमधला समाज-संघर्ष आणि त्यातूनही महासत्ता बनण्यासाठी चीनला कराव्या लागलेल्या तडजोडी यावर आधारित चॅन कूनचुंग  यांची ‘द फॅट इयर्स’ ही कादंबरी लक्षवेधक ठरते. चॅन कूनचुंग (१९५२) हे शांघायमध्ये जन्मलेले पण हॉंगकाँगमध्ये वाढलेले आणि प्रामुख्याने सायन्स फिक्शनसाठी परिचित असलेले लेखक आहेत. ‘द फॅट इयर्स’ ही त्यांची दुसरी कादंबरी. जाणकारांनी या कादंबरीचे वर्णन ‘A dystopian novel about the near future of China’ असे केले आहे.

कादंबरीची सुरुवात होते ती २०१३ सालामध्ये. ‘९०च्या दशकामध्ये हॉंगकाँगहून चीनला वरचेवर भेट देणारा मास्टर चेन– जो एक पत्रकार आणि लेखक व प्रस्तुत कादंबरीचा निवेदक आहे –२००४मध्ये बीजिंगमध्ये कायमचा स्थित झाला आहे. २००४ नंतरची चीनमधली सर्व स्थित्यंतरं त्याने पाहिली आहेत. २०१३ मध्ये तो चीनमधले प्रचंड मॉल्स, चकचकीत रस्ते, मोठाली हॉटेल्स या साऱ्याने प्रचंड भारावून गेला आहे. तो कमालीचा ‘उल्हासित’ झाला आहे. आणि याचवेळी त्याला भेटतो त्याचा एक जुना चाहता आणि पत्रकार- फांग त्साओदी, जो निवेदकाला एक चमत्कारिक प्रश्न विचारतो, “मास्टर चेन, तुला ठाऊक आहे की चीनच्या इतिहासातला तब्बल एक महिना गायब आहे?” चेन विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहतो आणि दुर्लक्ष करून टाकतो. पण फांग त्साओदी मात्र गायब झालेल्या महिन्याचा शोध घेण्याच्या ध्येयाने पछाडून गेलेला दिसतो. फांग त्साओदीच्या निवेदनातून अजून काही गोष्टी उलगडत जातात. फांग त्साओदीच्या मते चीनमध्ये कोणीही दुःखी नाही. सारे कमालीचे आनंदी आहेत. जणू काही त्यांना हर्षवायू झाला आहे. पण फांग त्साओदी मात्र कमालीचा उदास आहे. त्याला बिलकुल हर्षवायू झालेला नाही. त्याला राहून राहून आश्चर्य वाटते की, नेमका ‘तो’ महिना कसा काय बर लोकांच्या विस्मृतीत गेला आहे.

फांग त्साओदीच्या मते जगभर २०११ मध्ये प्रचंड मोठी आर्थिक त्सुनामी आली होती. युरो-अमेरिकेतील अर्थव्यवस्था पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या होत्या. अमेरिकन डॉलर सपाटून आपटला होता. या त्सुनामीपासून चीनही वाचला नव्हता. २०११चा फेब्रुवारी महिना उजाडला आणि पहिल्या आठवड्यात रातोरात लाखो कामगार बेरोजगार झाले. किराणा मालाच्या दुकानातून लुटमार सुरू झाली. हळूहळू अस्वस्थता आणि असहायतेची जागा रक्तपात आणि हिंसाचाराने घेतली. दुसऱ्या आठवड्यात आर्मीला पाचारण केले गेले. आर्मीचे जल्लोषी स्वागत झाले. मार्शल लॉ पुकारला गेला. मग सुरू झाली पोलीस आणि आर्मीची दडपशाही... अराजक. लोकांनी स्वत:ला घरांमध्ये कोंडून घेतले. रस्ते निर्मनुष्य झाले. हे दहशतीचे सत्र तब्बल तीन आठवडे सुरू राहिले. महिना संपता-संपता चीनने त्यांच्या भरभराटीच्या सुवर्णयुगाची सुरुवात झाल्याची अधिकृत घोषणा केली. फांग त्साओदीच्या मते जगभर आलेले अर्थिक आरिष्ट, त्यानंतरचे चीनमधले अराजक आणि त्याच वेळी चीनने केलेली अधिकृत घोषणा या गोष्टी केवळ योगायोगाच्या नाहीत.

त्यामुळे फांग त्साओदीला सतावणारे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. जगभरच्या अर्थव्यवस्था कोसळत असताना चीन कसा काय सावरू शकला? चीनमध्ये सारेच जण हर्षवायू झाल्यासारखे का वागत आहेत? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे फेब्रुवारी २०११ चा महिना साऱ्यांच्या स्मृतीतून कसा काय नाहीसा झाला आहे? हरवलेल्या महिन्याचा शोध घेण्यासाठी फांग त्साओदी फेब्रुवारी २०११ ची वर्तमानपत्रे आणि इतर कागदपत्रे शोधण्याचा प्रयत्न करतो. पण आश्चर्यकारकरित्या त्याला त्या महिन्याची वर्तमानपत्रेच सापडत नाहीत. तो इंटरनेटवरचे पेपर शोधतो; ते त्याला मिळतातही. पण त्या महिन्यातील अमानुष जीवनाचे रिपोर्टिंग त्याला कुठेही वाचायला मिळत नाही.

कादंबरीमध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर असंख्य पातत्रे भेटत राहतात. जसजशी कादंबरी उलगडत जाते, तसतसे एखाद्या जिगसॉ पझलप्रमाणे या पात्रांचे सांधे मुख्य कथानकाला जुळत जातात. २०१३ मध्ये मास्टर चेनला त्याच्या पूर्वआयुष्यातील मैत्रिण लिट्ल झी भेटते. लिट्ल झीने कायद्याचे शिक्षण घेतले आहे. काही काळासाठी तिने न्यायाधीश म्हणूनही काम पहिले आहे. पण न्यायदानाची तिथली अजबगजब तऱ्हा पाहून तिचा तिथल्या न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडाला आहे. सरकारने न्यायव्यवस्थेला मृत्युदंडाच्या शिक्षेचे टार्गेट ठरवून दिले आहे. त्यामुळे किरकोळ गुन्ह्यासाठीदेखील मृत्युदंड आणि तोही तात्काळ! या व्यवस्थेविरुद्ध लिट्ल झी उभी राहण्याचा प्रयत्न करते. परिणामी तिला जीवे मारण्याचा प्रयत्न होतो, तिला व्यवस्थेपासून वेगळे पाडले जाते. सरतेशेवटी तिची वेड्यांच्या इस्पितळात रवानगी होते. इस्पितळातून बाहेर पडल्यानंतर ती इंटरनेट अॅक्टिव्हिस्ट म्हणून काम करू लागते. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी म्हणून नाव/जागा बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागते. लिट्ल झीला फांग त्साओदी म्हणतो त्याप्रमाणे गायब झालेल्या महिन्याबद्दल अस्पष्टपणे आठवतंय. ती इतर चीनी नागरिकांप्रमाणे हर्षोन्मादाच्या अवस्थेतही नाही. उलट कमालीच्या नैराश्याने तिला ग्रासले आहे. मास्टर चेन लिट्ल झीच्या प्रेमात पडला आहे. पण नाव/गाव सतत बदलत असल्याने मास्टर चेनला लिट्ल झीचा शोध घेणे अवघड बनले आहे. तिचा बदललेला इमेल आणि ब्लॉग यांचा मागोवा घेत मास्टर चेन शेवटी तिच्या पर्यंत पोहोचतो, आपले प्रेम व्यक्त करतो. लिट्ल झी या प्रेमाचा स्वीकार करते आणि दोघेही बिजिंगला यायला निघतात.

मास्टर चेनच्या या साऱ्या प्रवासात त्याला मदत करणारा फांग त्साओदी याला चीनमध्ये आपल्यासारखेच अजून कोणीतरी निराश आहे याचा लिट्ल झीच्या निमित्ताने साक्षात्कार होतो. अशाच एका प्रवासात फांग त्साओदीला दम्याच्या आजाराने ग्रस्त एक तरुण मजूर आणि त्याची मैत्रीण भेटतात. स्वतः फांग त्साओदी हा देखील दम्याच्या आजाराने त्रस्त आहे. फांग त्साओदीला भेटलेला तरुण हा निराश आहे आणि त्याच्या मैत्रिणीचे मानसिक संतुलन ढळले आहे. फांग त्साओदीच्या हेही लक्षात येते की, या दोघांनादेखील त्या गायब झालेल्या महिन्याबद्दल अस्पष्टपणे काहीतरी आठवतंय. त्यामुळे फांग त्साओदी अशा एका निष्कर्षाप्रत पोहोचतो की, चीनमध्ये जे दम्याचे रुग्ण आहेत किंवा जे डिप्रेशनसाठीचे औषधोपचार घेत आहेत त्यांच्या मनामध्ये हरवलेल्या ‘त्या’ महिन्याच्या स्मृती अजूनही जागृत अवस्थेत आहेत. उरलेल्या सर्व जनतेच्या स्मृतीतून मात्र ‘तो’ महिना कायमचा पुसला गेला आहे.

त्यामुळे या गूढ प्रकरणाचा छडा लावायचाच या इराद्याने फांग त्साओदी आणि आता त्याच्या बरोबरीने लिट्ल झी व तरुण मजूर एक धाडसी योजना आखतात. हु डॉन्गशेन्ग नावाचा एक पॉलिट ब्युरोच्या सदस्याला हे तिघेजण किडनॅप करतात. फांग त्साओदी या प्लॅनमध्ये जेव्हा मास्टर चेनला ओढतो, तेव्हा मास्टर चेन त्यांना त्यांनी केलेल्या गुन्ह्याची तीव्रता जाणवून देतो. आता यातून कोणाचीही सुटका नाही याचे गांभीर्य हु डॉन्गशेन्गसकट सर्वांनाच येते. मास्टर चेन सर्व सूत्रे स्वतःकडे घेतो आणि हु डॉन्गशेन्गसमोर असा प्रस्ताव ठेवतो की, जेणेकरून सगळ्या प्रश्नांची उत्तरेही मिळतील आणि सगळे जण सुरक्षितही राहतील. हु डॉन्गशेन्गकडे दुसरा कोणताच पर्याय न उरल्याने तो मास्टर चेनच्या प्रस्तावाला मंजुरी देतो आणि मग सुरू होतो हु डॉन्गशेन्गचा कबुलीजबाब. रात्रभर हु डॉन्गशेन्गबोलत राहतो आणि बाकी सर्वजण स्तब्ध होऊन ऐकत राहतात.

कादंबरीतील हु डॉन्गशेन्गचे कन्फेशन हा खरे तर एक पोलिटिकल डिस्कोर्स आहे. यातून हे स्पष्ट होत जाते की, संभाव्य संकटाची चीनला कल्पना होती आणि येणाऱ्या इष्टापत्तीचे संधीमध्ये येनकेन प्रकारे कसे रूपांतर करायचे याची एक शिस्तबद्ध आखणी करण्यात आली होती. हु डॉन्गशेन्गच्या या कन्फेशनमधून एकूणच चीनचे परराष्ट्र धोरण, आर्थिक धोरण, भावी युद्धनीती इत्यादींबद्दलचा विस्ताराने उहापोह केला आहे. चीनमधील अल्पसंख्यांचे वांशिक संघर्ष, चीनची ‘वन-पार्टी-डिक्टेटरशिप’, चीनचे ‘ईस्ट एशियन मुन्रो डॉक्ट्रीन’ इत्यादी गोष्टीही तपशीलासकट येतात. पण वाचक म्हणून आपली उत्सुकता ताणली जाते ती म्हणजे गायब झालेला महिना आणि चीनी जनतेचा हर्षोन्माद याबद्दल हु डॉन्गशेन्ग काय गौप्यस्फोट करतो ते.

हु डॉन्गशेन्ग हे मान्य करतो की, फेब्रुवारी २०११च्या महिन्यात चीनच्या रस्त्यांवर खरोखरीच अराजक माजले होते. त्यासाठी आर्मीला पाचारण करण्यात आले होते आणि मार्शल लॉ पुकारण्यात आला होता. अमानुषता व दडपशाहीचा कहर माजला होता. याच दरम्यान हु डॉन्गशेन्गला एका ड्रगबद्दल माहिती मिळालेली आहे. सॅफ्रॉल ऑईलपासून बनवण्यात येणाऱ्या या ड्रगमुळे माणसाला एक प्रकारची उन्माद अवस्था प्राप्त होते आणि याचे कोणतेही साइडइफेक्ट्स नाहीत. सॅफ्रॉल ऑईल चीनमध्ये सर्वाधिक मिळते. परिणामी चीनी नागरिकांनी आपले दु:ख विसरावे, नेहमी आनंदी राहावे यासाठी हु डॉन्गशेन्ग पार्टीसमोर एक प्रस्ताव ठेवतो, ज्यायोगे चीनमध्ये जेवढे म्हणून पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आहेत, त्या ठिकाणी हे ड्रग मिसळण्यात येते. याचाच परिणाम म्हणून समस्त चीनी नागरिक हर्षोल्हासाच्या लाटांवर तरंगत आहेत.

पण फांग त्साओदीला सतावणारा प्रश्न- ज्याने कादंबरीची सुरुवात होते- की २०११ च्या फेब्रुवारी महिन्यातील २८ दिवसांचे काय झाले? हा प्रश्न अद्यापि अनुत्तरीतच राहतो. फांग त्साओदीला शंका आहे की, २०११ साली चीनमध्ये आलेल्या बर्ड फ्लूच्या साथीत सरकारने सगळ्यांना जी एक प्रतिबंधक लस टोचली आहे, तिच्यातून सर्वांना स्मृतिभ्रंशाचाही डोस दिलेला आहे. हु डॉन्गशेन्ग हे मान्य करतो की, सरकारी यंत्रणेने सरकारी दप्तरातून हा महिना गायब करून टाकला आहे. पण लोकांच्या स्मृतीतून ‘तो’ महिना कसा काय पुसला गेला याचे हु डॉन्गशेन्गलाही कोडे पडले आहे. प्रतिबंधक लसीतून असा काही प्रकार झाल्याचा तो साफ इन्कार करतो, कारण लस फक्त वीस लाख लोकांनाच टोचली होती. तसे असेल तर समस्त चीनलाच स्मृतिभ्रंश व्हायचे काय कारण? हु डॉन्गशेन्गच्या मते चीनी नागरिकांनी आपणहून हा विस्मृतीचा रोग जडवून घेतला आहे. जणू काही त्यांना त्या कटू आठवणींपासून सुटका हवी आहे.

हु डॉन्गशेन्गचा कबुलीजबाब जबाब पूर्ण होतो, पहाट होते आणि मास्टर चेनने दिलेल्या वचनाप्रमाणे हु डॉन्गशेन्गची सुटका केली जाते. आता इथून पुढे हु डॉन्गशेन्गसहित मास्टर चेन आणि त्याचे साथीदार नेहमीच आपला गुन्हा उघडकीस येईल या भीतीच्या सावटाखाली वावरत राहणार आहेत.

अशा तऱ्हेने फांग त्साओदीला सतावणाऱ्या प्रश्नाचे ठोस उत्तर कादंबरीत काही सापडत नाही. लादलेल्या स्मृतीभ्रंशाच्या या आजाराबाबत संशायाच्या सुईचे एक टोक हु डॉन्गशेन्गच्या मॅजिकल ड्रगकडे जाते, तर दुसरे टोक बर्ड फ्लूच्या लसीकडे. या दोन्ही शक्यता गृहीत धरल्या तरी सरकार आणि सरकारची अमानुष ताकद भयचकित करणारी आहे याचा प्रत्यय येतो. हु डॉन्गशेन्ग म्हणतो त्याप्रमाणे प्रत्यक्ष नागरिकांनीच हा आजार ओढवून घेतला असेल तर? ही शक्यता अस्वस्थ करणारी असली तरी भवतालचे वर्तमान पाहता तीच खरी असण्याची दाट शक्यता वाटू लागते. केवळ चीनमध्येच नव्हे तर सर्वच समाजांमध्ये स्मृतिभ्रंशाचा आजार बळावत आहे. सत्य-असत्य, वास्तव आणि कल्पित यातल्या सीमारेषा झपाट्याने पुसत चालल्या आहेत. जागतिकीकरणातून अपरिहार्यपणे उद्भवलेली बाजारकेंद्री समाजव्यवस्था आणि संस्कृती व्यवहाराचे होऊ घातलेले अवमूल्यन यातून हर्षोन्मादाच्या वर्तमानात तरंगत राहून स्मृतिभ्रंशाच्या जालीम उपायाने आत्ममग्न होऊ पाहणारी एक समाजव्यवस्था उभी राहताना दिसते आहे. त्या अनुषंगाने कादंबरीमध्ये एक मूलभूत विधान येते. एके ठिकाणी लिट्ल झी मास्टर चेनला विचारते, “Between a good hell and fake paradise – which one would you choose?” मास्टर चेन अर्थातच ‘गुड हेल’च्या बाजूचा आहे कारण त्याच्या मते ‘गुड हेल’मध्ये राहताना लोकांना जाणीव असते की ते नरकात राहताहेत. त्यामळे बदलाच्या सर्व शक्यता तिथे खुल्या राहतात. याउलट ‘फेक पॅराडाईज’मध्ये राहताना लोकांना तोच खराखुरा स्वर्ग वाटू लागतो. जागतिकीकरणाने नेमका हाच पेच सर्वांच्यापुढे उभा केला आहे- ‘गुड हेल’ की ‘फेक पॅराडाईज’?

२००९ मध्ये लिहिलेल्या या कादंबरीने २०११ मध्ये जगभर आणि चीनमध्ये काय घडेल याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. २००८च्या ग्लोबल फिनानशियल क्रायसिस नंतर जगभर काय घडले आणि चीनचा महासत्ता म्हणून कसा उदय झाला याचा इतिहास साक्षीदार आहे.

आजमितीस २००० चा साहित्याचा नोबेल मिळवणारे चीनी साहित्यिक गाओ शिंगच्यान यांनी फ्रान्समध्ये आसरा घेतला आहे, २०१० चे शांततेसाठीचे नोबेल मिळालेले लिउ शिआओबो नजरकैदेत आहेत. बाकी चीनमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे चित्र आहे!

...............................................................................................................................

द फॅट इयर्स - चॅन कूनचुंग, इंग्रजी अनुवाद - मायकल एस्. ड्युक,

ब्लॅक स्वॅन पब्लिकेशन, लंडन, २०११.

पाने : ३१८, मूल्य : २७१ रुपये.

...............................................................................................................................

लेखक इंग्रजी विषयाचे अध्यापन करतात.

nitin.jarandikar@gmail.com 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......