‘स्लमडॉग’च्या पल्याड मिलियन्स… अभिजनांच्या डोळ्यांत खुपणारे!
पडघम - राज्यकारण
अलका गाडगीळ
  • आशियातली सर्वांत मोठी झोपडपट्टी...मुंबईतील धारावी
  • Fri , 03 March 2017
  • पडघम राज्यकारण धारावी Dharavi स्लमडॉग मिलियनेर Slumdog Millionaire वणक्कम मुंबई Vanakkam Mumbai धारावी रीडेव्हलपमेंट प्लॅन dharavi redevelopment plan आदिद्रवीड Adi Dravida नाडर Nadar

१९६६ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकऱ्यांनी ‘लुंगी हटाव, मद्रासी हटाव’ मोहिमेची हाक दिली होती. शिवसैनिक कार्यालयांत घुसून ऑफिसरला घेराव घालत आणि इंग्लिशवर प्रभुत्व असणाऱ्या मद्राश्यांना कुटून काढत. तामिळी असो की मल्याळी, शिवसैनिकांसाठी ते सारे मद्रासीच! त्याआधी ‘मार्मिक’मधून मुंबईतील सरकारी, निमसरकारी कार्यालयं, एअर इंडिया आणि सरकारच्या इतर आस्थापनांतील दाक्षिणात्य अधिकाऱ्यांची यादी प्रकाशित होऊ लागली होती. आपल्या लेखाच्या अखेरीस शिवसेनाप्रमुख अंतिम प्रहार करत, कधी ‘वाचा आणि स्वस्थ बसा’ तर कधी ‘वाचा आणि उठा’. परिणाम व्हायचा तो झालाच. पांढरपेशा तामिळींवर आणि भरभराटीला आलेल्या साऊथ इंडियन-तामिळी हॉटेलांवर हल्ले करण्यात आले.

साठच्या दशकांत शिवसेना तामिळी/मल्याळी पांढरपेशांच्या मुंबईत होणाऱ्या स्थलांतराच्या विरोधात रस्त्यावर उतरली होती. मुंबईतील गरीबवस्त्यांत वाढणाऱ्या लोकसंख्येच्या टक्क्याबद्दल मात्र ही संघटना त्यावेळेस उदासीन होती. धारावीत वास्तव्य करणाऱ्या लाखो तामिळींकडे शिवसेनेची वक्रदृष्टी वळलेली नव्हती. तिथं एकेकाळी दलित तामिळी बहुसंख्याक होते. ते प्रामुख्याने बेकायदेशीर दारू गाळण्याच्या आणि चामडे कमावण्याच्या धंद्यात होते. शिसेनेच्या राजकीय मांडणीपलीकडील हा समाज होता. एकप्रकारे अदृष्य, खिजगणतीत नसलेला…

साठच्या दशकांत धारावीला आजच्यासारखा वलयांकित दर्जा प्राप्त झालेला नव्हता, ‘स्लमडॉग मिलियनेर’ घडलेलं नव्हतं. सध्या फॅशनेबल असलेला ‘स्लमस्टडी’ अभ्यासक्रम विद्यापीठांतून सुरू झालेला नव्हता, तसंच धारावी डेव्हलपमेंट प्लॅन तयार झालेला नव्हता. थोडक्यात, धारावी तेव्हाच्या सामाजिक-राजकीय मांडणीत नव्हती आणि प्रमुख वर्तमानपत्रांच्या परिप्रेक्ष्यातही नव्हती.

“पण धारावीतील सत्तरी गाठलेले तामीळ मात्र हे दंगे विसरलेले नाहीत. दाक्षिणात्य उपाहारगृहांच्या सामानाची तोडफोड करण्यात आली, गल्ल्यावर बसलेल्या अण्णांवरही हल्ले झाले. मात्र उपाहारगृहांच्या पुनर्उभारणीस धारावीकर तामिळींनी मदतीचा हात पुढे केला होता,” धारावीतूनच प्रकाशित होणाऱ्या ‘वणक्कम मुंबई’ या साप्ताहिकाचे संपादक बी.एम्.जया आसिर सांगतात.

दाक्षिणात्यांवरील हल्ल्याचं वृत्तांकन इंग्रजी आणि मराठी प्रसारमाध्यमांनी हिरिरीनं केलं, पण मोलमजुरी करणाऱ्या तामिळींच्या बचाव कार्याची बातमी मात्र कुठंही छापून आली नाही.

साठच्या दशकांत पांढरपेशा स्थलांतरितांबद्दल रान उठवणाऱ्या सेनेनं नव्वदच्या दशकात गरीबवस्त्यातील बंगाली बोलणाऱ्या बांग्लादेशी ‘घुसखोरां’विरोधात राडे सुरू केले. नंतर राज ठाकऱ्यांनीही उत्तर प्रदेश, बिहारी टॅक्सीचालक आणि श्रमिकांविरोधात ‘खळ्ळ खट्याक’ केलं. सेनेतील हा वर्गविग्रह कशामुळे झाला, याचा अभ्यास व्हायला पाहिजे. 

१९२०च्या आसपास आदिद्रवीड धारावीत आले. गावात सतत होणाऱ्या उच्चवर्णीयांच्या छळाला कंटाळून त्यांनी स्थलांतर केलं आणि ते धारावीतल्या दाटीवाटीत मिसळून गेले. शहरातल्या गर्दीत त्यांना सुरक्षितता वाटली असावी. नाइन्टी फीट रोडवरील महात्मा गांधी मेमोरियल सेकंडरी स्कूलचे मुख्याध्यापक जॉन एस. चेल्लादुराई धारावीतल्या तामीळ समाजाच्या उपक्रमांत अग्रेसर असतात. ‘नाडर १९४०च्या दशकांत स्थलांतरीत झाले. इकडे येऊन त्यांनी छोटे-मोठे उद्योग सुरू केले. छोटी हॉटेलं, किराणा आणि खाऊची दुकानं, सुक्या खाद्य पदार्थांचे उद्योग. नाडर ओबीसी पण बिझनेस माइंडेड. मीही नाडर आहे’, ख्रिश्चन असलेले चेल्लादुराई सांगतात. त्यानंतर ‘तेवर’ जातीचे लोकही धारावीत मोठ्या संख्येनं आले. तेवरही दलित पण स्वत:ला आदिद्रविडांच्या वरचे समजणारे. कन्याकुमारी, नागरकोईल, मदुराई आणि तिरुनेलवलीया जिल्ह्यांतून या तीनही जातींच्या समूहांनी उपजीविकेसाठी थेट धारावी गाठली.

मुंबई आणि परिसरात जवळजवळ दहा लाख तामिळ भाषिकांचं वास्तव्य आहे. ‘दिनाकरण’ आणि ‘थंथी’ या दोन तामिळ वर्तमानपत्रांच्या मुंबई आवृत्त्या निघतात. एकट्या धारावीत चार लाख तामिळी आहेत, असं चेल्लादुराई सांगतात. या वर्तमानपत्रांत धारावीसंबंधातील बातम्या वा लेख अभावानेच आढळतात. ‘बाईला जाळलं, गटारं तुंबून रोगराई पसरली किंवा जातीय/धार्मिक हिंसा झाली तरच इथली बातमी छापून येते’, धारावीत लक्ष्मी चाळीजवळ राहणारी आणि शिवणकाम करणारी शांथी सांगते. तिचा नवरा पाच वर्षांपूर्वीच तिला आणि मुलांना सोडून गावाला निघून गेला. शिलाईकामात तिला जेमतेम दोन हजार मिळतात. धाकटा मुलगा बांद्र्याच्या फादर अ‍ॅग्नेल शाळेत शिकतोय. बी. कॉम. झालेल्या मुलीच्या पगारावरच तिची सारी भिस्त आहे. नवऱ्याचा फोन तर सतत बंद असतो आणि त्यानेही फोन करून कधी चौकशी केलेली नाही.

धारावीतली लक्ष्मी चाळीत आदिद्रविड दलितांची वस्ती आहे. धारावीमध्ये खूप एकट्या महिला आहेत. लक्ष्मी चाळीत राहणारी जया सांगत होती, ‘माझा नवरा जेव्हा जिवंत होता, तेव्हा तो गायबच असायचा. पैसे मागायला अधूनमधून उगवायचा, तेव्हाही टाईटच असायचा. नाही म्हटलं की मारायचा.’ जया सकाळ-संध्याकाळ भाजी विकते. धारावीतल्या एकल महिलांच्या कहाण्या अजून प्रकाशात यायच्या आहेत.

“एक उपक्रम म्हणूनच आम्ही ‘वणक्कम मुंबई’ पाक्षिक सुरू केलं, बिझनेस म्हणून नाही. आम्ही संपूर्ण धारावी परिसरातील बातम्या छापतो. माहीमपासून सायनपर्यंत आणि वडाळ्यापासून माटुंगा लेबर कॅम्पपर्यंत आमचे वार्ताहर ठिकठिकाणी आहेत. धारावीत गेल्या काही वर्षांपासून डेव्हलपमेंट प्लॅनबद्दल खूप चर्चा आणि आंदोलनं होतात. आम्ही त्याचा प्रामुख्याने पाठपुरावा करतो. कारण अनेक तामिळींचं धारावीतलं अस्तित्व या विकास आराखड्यावर अवलंबून आहे. आमचं पाक्षिक आम्ही बॉन्डपेपरवर चार रंगात छापतो. खप साधारण तीन हजार आहे. धारावीतल्या पेपरस्टॉलवरही आमचं पाक्षिक मिळतं,” ‘वणक्कम मुंबई’चे प्रकाशक एस पांडियन भरभरून सांगतात.

धारावी डेव्हलपमेंट प्लॅन साधारणत: १९८७ सालापासून अस्तित्वात आहे. अनेक सरकारं आली आणि गेली, पण प्रत्येक सरकारने नवनवीन आराखडे आणले. पण पुनर्वसनाचे जवळ जवळ सगळे उपक्रम अपयशी ठरले आहेत. कारण धोरणकर्त्यांना झोपडपट्टी विकासाचं प्रमुख तत्त्वच समजलेलं नाही. गरीबवस्त्यांमध्ये व्यावसायिक आणि निवासी, सार्वजनिक आणि खाजगी अवकाशांची सरमिसळ झालेली असते. डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये व्यापारी संकुलं हे केंद्र ठरवून त्यापासून दूर चहूबाजूंनी निवासांची आखणी केलेली असते. बिझनेस डिस्ट्रक्ट वेगळा ठेवण्याची नगर नियोजनाची ही संकल्पना पाश्चात्य आहे. छोट्या अपार्टमेंट संकुलांत झोपडवासियांचं पुनर्वसन करण्याचे प्रयत्न वेळोवेळी फसले आहते. कारण तिथं घर हेच व्यवसाय संकुलही असतं. धारावीतल्या घराघरांतून असंख्य व्यवसाय चालतात.

जया ही लक्ष्मी चाळीतील पोटभाडेकरू आहे. पोटभाडेकरूंना कोणतेही हक्क नाहीत, त्यांचं पुनर्वसन होणार नाही. तिला फोटोपास मिळू शकलेला नाही, पण गावी परत जाणं हा पर्यायही तिच्यासमोर नाही. ती सांगते, ‘माझ्या जन्माआधी माझे आई-वडीलच इथं आले.’

तामिळी समाज सण धडाक्यात साजरे करतात. ‘पूर्वी पोंगलचे दोन वेगळे उत्सव व्हायचे. एक आमचा- आदिद्रविडांचा आणि एक नाडरांचा. आता ते आम्हाला बोलावतात. मी क्वचित कधी गावी जाते. शांत आणि हिरवंगार आहे ते, पण काय करणार तिथं राहून?’ जया विचारते.

शहर सर्वांना समान पातळीवर आणतं का? गावातील विस्तीर्ण भूप्रदेश आणि क्षितिजरेखा भौतिक अवकाश देतात, परंतु तिथं वैयक्तिक अवकाश मात्र आक्रसलं जातं. गावातील अलिखित नीतीनियम आणि समाजाची न दिसणारी नजर चहूकडे भिरभिरत असते. शहरांत तुम्ही लाखांच्या गर्दीतील एक असता. तिथं भौतिक अवकाश आक्रसतं, पण मानसिक अवकाश विस्तारलं जातं. शहरातील अनामिकता तुम्हाला एक प्रकारची सुरक्षितता देते. ‘खेडी सोडा, शहरांत जा’ असं आंबेडकरांनी दलितांना उगाचच नव्हतं सांगितलं.

अलिकडे रजनीकांत तारांकित ‘कबाली’ या चित्रपटाचं तरुण दिग्दर्शक पीए रंजिथ यांनी धारावीत फेरफटका मारला. त्यांचा पुढील चित्रपट धारावीत चित्रित केला जाणार आहे. ‘कबाली’ मलेशियात राहणाऱ्या एका प्रौढ दलित डॉनची कहाणी आहे. चित्रपटाची सुरुवात होते कोठडीत असलेल्या सुटाबुटातील डॉन दलित साहित्य वाचतो आहे या दृष्यानं. उन्हाळ्यातही मी सूटच घालतो असे, हा डॉन ठणकावून सांगतो. गोलमेज परिषदेत गांधी नेहमीप्रमाणे अर्धं धोतर परिधान करूनच गेले होते. डॉ. आंबेडकर मात्र थ्री पीस सुट आणि हातात ग्रंथ घेऊनच उपस्थित राहिले. यातील दृश्य प्रतिमा दलितांसाठी आनंददायी होती. ग्रंथामुळे दलितांनी शिक्षण घेणं किती आवश्यक आहे याचं सूचन होतं आणि थ्री पीस सुटातील डॉक्टरांच्या प्रतिमेमुळे शोषित जातींना अत्यंत गरजेचं असलेलं बळ मिळालं आणि मिळत राहीलही.

धारावी हा एक चैतन्यशील आणि क्रियाशील लोकसमूह आहे. इथं अक्षुण्ण आशावाद सतत नांदत असतो. इथं प्रत्येक घरात निर्मितीची, दुरुस्तीची, पुर्ननिर्माणाची कामं अव्याहतपणे चालत असतात. याचं विलक्षण वैशिष्ट्य म्हणजे उद्योग आणि निवासांचा जवळचा नातेसंबध. प्रत्येक चौरस इंच भूमी काही तरी निर्माण करण्यासाठी वापरली जाते. अभिजनांच्या डोळ्यात मात्र ती खुपते. धारावीतील कार्यरत लोकसमूहांचे परस्पर व्यवहार सरकार आणि बिल्डर खंडित करतील, अशी चिन्हं आहेत. धारावीतील २.१६५ किमी भूमीवर बिल्डरांचा डोळा आहे.

अधिवास, उपजीविका, स्वसंघटन आणि पददलितांच्या राजकारणाचं झोपडवस्त्या हे स्वाभाविक आश्रयस्थान असतं. ‘वणक्कम मुंबई’ धारावीतील ही कथनं छाप्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. मेगा सिटीच्या आभासी कथनाला हे एक मूलगामी आव्हान ठरतं.

 

लेखिका मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.

alkagadgil@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......