'लायन' : लहानग्या सरूची आभाळभर पसरलेली गोष्ट!
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
संदेश मुकुंद कुडतरकर
  • ‘लायन’चं पोस्टर आणि ऑस्करच्या रेड कार्पेटवर चालताना सनी पवार
  • Tue , 28 February 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti इंग्रजी सिनेमा लायन Lion गार्थ डेव्हिस Garth Davis सनी पवार Sunny Pawar देव पटेल Dev Patel डेव्हिड वेनहॅम David Wenham निकोल किडमन Nicole Kidman

बऱ्याच वर्षांपूर्वी दै. 'लोकसत्ता'च्या 'चतुरंग' पुरवणीत 'पाचशे रुपयांत पुनर्जीवन' असा एक छोटेखानी लेख प्रसिद्ध झाला होता. लेखकाचं नाव आता आठवत नाही, पण तो लेख मात्र लक्षात राहिलाय. रस्त्यावर भीक मागणाऱ्या एका मुलाला संबंधित लेखकाने खायला-प्यायला देऊन सुखरूप त्याच्या घरी आई-वडिलांकडे कसं सुपूर्द केलं आणि तेही केवळ पाचशे रुपयांत, याची ती कहाणी होती. त्या लेखाची प्रकर्षानं आठवण होण्याचं कारण म्हणजे नुकताच पाहिलेला 'लायन' हा चित्रपट.

गार्थ डेव्हिस दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला, तेव्हापासून या चित्रपटाबद्दल अपार उत्सुकता होती. ट्रेलरनं निर्माण केलेल्या अपेक्षा तर चित्रपटाने पूर्ण केल्याच, पण त्याच्याही कित्येक योजनं पुढे जात या चित्रपटानं एक अविस्मरणीय अनुभव दिला. मोजकेच संवाद असलेला हा चित्रपट खऱ्या अर्थानं कॅमेऱ्याची ताकद प्रेक्षकांना जाणवून देण्यात पूर्णपणे यशस्वी ठरला आहे. चित्रं संवाद साधतात, चित्रं मनात तरंग निर्माण करतात, हे यापूर्वी अनुभवलं होतं, पण चित्रं आघात करतात, थरारून टाकतात, अंतर्बाह्य बदलवून टाकणारा एक अनुभव देऊ शकतात, हे या चित्रपटामुळे जाणवलं.

खांडव्यातील गणेश तलाई भागात आपली आई आणि दोन भावंडांसह राहणाऱ्या पाच वर्षांच्या लहानग्या सरूची ही गोष्ट. मजुरी करून पोट भरणारं हे कुटुंब. एका रात्री सरू एका ट्रेनमध्ये चढून हरवतो आणि घरापासून सोळाशे किलोमीटर दूर कलकत्त्याला जाऊन पोहोचतो. त्याला घरी परत जायचं आहे, पण आपण गणेश तलाईला राहतो, याशिवाय त्याला काहीच माहीत नाही. मुलं पळवणाऱ्या टोळीच्या कचाट्यातून सुटलेला सरू एका अनाथाश्रमात पोहोचतो. तिथं एक ऑस्ट्रेलियन जोडपं त्याला दत्तक घेतं आणि आपल्यासोबत नेतं. ऑस्ट्रेलियातच आणखी एका समवयस्क दत्तक मुलाबरोबर सरू लहानाचा मोठा होतो, पण भूतकाळ त्याची पाठ सोडत नाही. आपलं घर भारतात आहे आणि आपली अम्मी आपली वाट पाहत आहे, या जाणिवेनं अस्वस्थ झालेला सरू शेवटी गुगल अर्थच्या साहाय्यानं आपलं घर शोधायचं ठरवतो. पंचवीस वर्षांनंतर माय-लेकरांची भेट होते, पण सरूला आठवत असलेल्या आपल्या कुटुंबातील सदस्यांचं - अम्मी, गुड्डू आणि शकीला - सुखचित्र मात्र पूर्ण होऊ शकत नाही.

एका सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही अनावश्यक नाट्यमय प्रसंगांची विनाकारण पेरणी न करता अतिशय संयत पद्धतीने साकारलेली कथा. पहिल्या फ्रेमपासून चित्रपट मनाचा ताबा घेतो, ते अगदी शेवटी श्रेयनामावली दिसेपर्यंत. डोळ्याची पापणी लवू देण्याइतकीही उसंत हा चित्रपट आपल्याला घेऊ देत नाही. म्हटलं तर खूप रंगवून सांगितली जाऊ शकणारी आणि मग टिपिकल व्यावसायिक धंदेवाईक चित्रपटांच्या रांगेत बसू शकली असती, अशी ही कथा साध्या, सरळ पद्धतीने सादर केली गेली आहे. तरीही ती कुठेही संथ, रटाळवाणी होत नाही. उलट, चित्रपटात अगदी अकल्पितपणे येणारं 'उर्वशी, उर्वशी' हे रेहमानचं गाणं त्या प्रसंगाला एक वेगळाच मॅड, सुंदर परिणाम देऊन जातं.

दोन तासांच्या एखाद्या चित्रपटाचा आलेख काढला, तर प्रत्येक चित्रपटात डोळ्यांच्या कडा पाणावणाऱ्या काही मोजक्याच जागा असतात. या चित्रपटाचं वेगळेपण म्हणजे शांतपणे चित्रपट पाहू देणाऱ्या जागा या चित्रपटात मोजक्याच आहेत. याउलट संपूर्ण चित्रपटभर दिग्दर्शकाने अस्वस्थ करणाऱ्या चित्रचौकटींची उधळणच केल्याचं जाणवतं. एक अनामिक हुरहूर, कसला तरी एक प्रचंड तणाव, पर्वताएवढं दुःख संपूर्ण चित्रपटाला व्यापून राहिलं आहे. अगदी साध्या साध्या प्रसंगांतही दिग्दर्शकानं प्रेक्षकाला रडवायचंच ठरवलं आहे की, काय असं वाटावं इतक्या उत्कटतेनं कॅमेरा, अभिनय आणि पार्श्वसंगीताचा सुंदर मिलाफ साधला आहे.

मोठा सरू जेव्हा जिलेबी खातो, तेव्हा त्याला आपल्या बालपणातील आठवलेला प्रसंग, लहानपणी त्याला झालेला अपघात, रस्त्यावरून मुलं पळवून नेणारी टोळी आल्यावर सरूने जिवाच्या आकांतानं काढलेला पळ, अनाथाश्रमातील मुलांचं लैंगिक शोषण, त्या मुलांच्या डोळ्यातील मेलेल्या भावना, मोठ्या सरूच्या मनातील द्वंद्व, सरूच्या ऑस्ट्रेलियन आई-वडिलांचं निरपेक्ष प्रेम, हे या चित्रपटातले काही ठळक उल्लेखनीय प्रसंग तर हादरवून सोडतात. एका प्रसंगात लहानगा सरू काचेतून दिसणाऱ्या एका सूप पिणाऱ्या मुलाची नक्कल करताना दाखवला आहे. केवळ काचेअल्याडच्या आणि काचेपल्याडच्या या दृश्यातून दिग्दर्शकानं 'आहे रे' आणि 'नाही रे' वर्गातली दरी नेमकी अधोरेखित केली आहे. क्लायमॅक्सच्या प्रसंगात सरूची आणि त्याच्या आईची भेट होताना तर दिग्दर्शकाने एका क्षणात उंच उसळणाऱ्या कारंजासारखा भावनांच्या कल्लोळाचा शब्दांत वर्णन न करता येणारा अनुभव दिला आहे.

सनी पवार या लहानग्याने छोट्या सुरूच्या तर देव पटेल या गुणी अभिनेत्यानं मोठ्या सरूच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. निकोल किडमन आणि डेव्हिड वेनहॅम यांचाही अभिनय सुंदर. दीप्ती नवल, तनिष्ठा चॅटर्जी आणि नवाजुद्दीन सिद्दीकीने आपापल्या छोटेखानी भूमिकांमध्ये जान ओतली आहे. मात्र ठळकपणे लक्षात राहतात ते सनी पवार आणि प्रियांका बोस. सनी पवारने लहानग्या सरूची भूमिका इतकी उत्कृष्ट वठवली आहे की, चित्रपट संपल्यानंतरही तो पाठ सोडत नाही. सरूच्या आईच्या भूमिकेत प्रियांका बोसने काळजाला हात घालणारा अभिनय केला आहे. तिच्या वाट्याला संवाद कमी आहेत, पण चेहऱ्यावरच्या हावभावांतून तिने करुण रस अक्षरशः जिवंत केला आहे. थोडक्यात, प्रेमाच्या, वात्सल्याच्या वैश्विकतेवर पुन्हा नव्याने शिक्कामोर्तब करणारा, एक अभूतपूर्व अनुभव 'लायन' देतो!

लेखक मुंबईस्थित 'अक्सेंचर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीत टीम लीड म्हणून कार्यरत आहेत.

msgsandesa@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......