मार्क्सचा ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ झाला १७० वर्षांचा!
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
शशिकांत सावंत
  • ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’चं एक मुखपृष्ठ आणि कार्ल मार्क्स
  • Sun , 26 February 2017
  • ग्रंथनामा Granthnama वाचणारा लिहितो कार्ल मार्क्स Karl Marx द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो The Communist Manifesto फेडरिक एंजल्स Friedrich Engels

२४ फेब्रुवारी १८४८ रोजी लंडनमध्ये २३ पानांची एक छोटी पत्रिका प्रसिद्ध झाली. त्यात असे म्हटले होतं की, आधुनिक उद्योगानं जगात क्रांती केली आहे. याने  केलेल्या गोष्टीने आजवरच्या सगळ्या महान संस्कृतीने केलेल्या - मग त्यात इजिप्तशियन पिऱ्यामिड आले, रोमन बांधकामं आली- गोष्टींनर मात केली आहे. औद्योगिक क्रांतीमध्ये आलेल्या गोष्टी रेल्वे, टेलिग्राफ, वाफेवर चालणाऱ्या बोटी यांनी एक प्रचंड मोठी उत्पादक ऊर्जा मोकळी केली आहे. मुक्त व्यापाराच्या नावाखाली तीनही राष्ट्रांच्या सीमा नाहीशा केल्या आहेत. वस्तूंच्या किमती कमी केल्या आहेत आणि या ग्रहाला कॉस्मोपॉलिटिन बनवलं आहे. तसंच इंटर इंडिपेंडंटही. आता वस्तू आणि कल्पना मुक्तपणे कुठेही जाऊ शकतात. याच व्यवस्थेनं जुनी पायऱ्या पायऱ्यांची रचना तयार केली आहे. आज लोकांना आपले पूर्वज किंवा धर्म यावरून त्यांचं महानपण ठरतं असं वाटत नाही. सर्व माणसं एक दुसऱ्यासारखी आहेत. इतिहासात प्रथमच स्त्री-पुरुष हे बघू शकतात की, आपलं इतरांशी नातं कसं आहे.

उत्पादनाच्या नव्या पद्धती, दळणवळण आणि वितरण यामुळे उदंड संपत्ती निर्माण झाली आहे. पण एक समस्या आहे ही संपत्ती कधीच समान पद्धतीनं वितरीत झाली नाही. जगातील दहा टक्के लोकांनी कायमच संपत्ती हडप केली आहे आणि ९० टक्क्यांकडे जवळपास काहीच नाही. शहरांचं औद्योगिकीकरण होत आहे, तसतशी संपत्ती मूठभरांच्या हातात अधिकाधिक एकवटली जातेय. श्रीमंत श्रीमंत होत आहेत आणि मध्यमवर्गीयांची समस्या मजूर वर्गाप्रमाणे होत आहे. लवकरच जगात दोन पद्धतीची माणसं असतील. एक म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःची मालमत्ता आहे आणि दुसरी म्हणजे अशी माणसं जी स्वतःचे श्रम विकत आहेत. पूर्वी असमानता ही नैसर्गिक आणि दैवदत्त वाटायची. जगभरचे मजूर ही व्यवस्था नीट पाहू शकतील आणि एक दिवस उठाव करतील आणि फेकून देतील.

ही सारं लिहिणाऱ्या लेखकाचं नाव होतं- कार्ल मार्क्स आणि त्या पुस्तिकेचं नाव होतं- ‘द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’. आजही त्यातली अनेक भाकितं चुकलेली नाहीत.

नुकतीच कार्ल मार्क्सची दोन चरित्रं प्रसिद्ध झाली आहेत. पहिल्या चरित्राचं नाव आहे- ‘कार्ल मार्क्स इन ९० सेन्चुरी लाईफ’. जोनाथन स्पेरबर हे त्याच्या लेखकाचं नाव. तर दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे, ‘कार्ल मार्क्स ग्रेटनेस अँड इलुजन’. लेखक आहेत, गॅरेस स्टेडमन जोन्स. भूतकाळाचं वर्तमानात रूपांतर करण्याचं काम नेहमीच अभ्यासक करत असतात. जोनाथन बर्बर विद्यापीठात शिकवतात, तर जोन्स क्वीन मेरी विद्यापीठामध्ये.

मार्क्स हा जगातील एक मोठा लढवय्या होऊन गेला. त्याचं बरंचसं लेखन हे त्या त्या विषयानुरूप असायचं. थोडंसं पत्रकारितेनुसारही. मार्क्स निरंतर लेखन करे. त्या लेखनात त्याने भल्या भल्यावर प्रहार केले. अगदी हेगेलसारख्या लेखकावरही. तो कायम तात्त्विक घडामोडीचा विश्लेषण करायचा. आज जो मार्क्स माहीत आहे, त्यापेक्षा मार्क्स वेगळा नव्हता. पण जो जरा अधिक व्हिक्टोरीयन होता, असा वरील चरित्रांचा दावा आहे.

मिशेल फुकोनं म्हटल्याप्रमाणे मार्क्स हा कुठल्याही वाद-चर्चेचा, डिसकोर्सचा प्रणेता होता. आजवर त्याच्या नावानं प्रचंड पुस्तकं आणि लेख लिहिले गेले आहेत. मार्क्सच्या धगधगत्या बुद्धिमत्तेनं विचारवंतांना आणि वाचकांना बौद्धिक खाद्य दिलं आहे. आज दीडशे वर्षानंतरही ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’सारखं पुस्तक ताजंतवानं वाटतं. खरं तर औद्योगिकीकरणावर आणि भांडवलशाहीवर टीका करणारा मार्क्स काही एकटाच नव्हता, पण तो एकमेव क्रांतिकारक होता. कम्युनिस्ट क्रांतीचं भाकीत त्यानं केलं होतं आणि त्या क्रांतीची सूत्रंही अधोरेखित केली होती, कारण त्या क्रांतीबद्दल त्याला खात्री होती. त्याच्या मृत्यूनंतर कम्युनिस्ट क्रांती घडली, पण त्याला अपेक्षित तिथं, त्यानं भाकीत केलेल्या ठिकाणी नव्हे. विसाव्या शतकाच्या मध्यावधी एक तृतीयांश जगावर मार्क्सवादाचं राज्य होतं किंवा इथल्या सत्ता स्वत:ला मार्क्सवाद म्हणवणाऱ्या होत्या.

मार्क्सचे म्हणणं होतं की, ज्या ज्या सैद्धांतिक गोष्टी असतील त्या प्रत्यक्षात यायला हव्यात. म्हणूनच फायरबॉक्ससारख्या विचारवंतांवरच्या लेखात तो म्हणतो- “तत्वज्ञान हे केवळ ‘करून’ उपयोग नाही तर मुद्दा जग बदलण्याचा आहे.” मार्क्सचं म्हणणं असं होतं की, नुसतीच तात्त्विक चर्चा पोकळ आहे. तात्त्विक प्रश्न हे खऱ्याखुऱ्या जगातून वर येतात आणि ज्या परिस्थितीतून ते वर येतात, ती परिस्थिती बदलली की ते प्रश्न सुटतात. तसं झालं म्हणजे जग बदलेल. आणि खरोखरच मार्क्सच्या कल्पनांनी जग बदललं किंवा जगाचा मोठा भाग बदलला, हे नक्की. पण जगाच्या या बदलाला मार्क्सला खरंच कारणीभूत ठरवता येईल का, हाही प्रश्नच आहे.

मार्क्सनं बराच वेळ भांडणात, मारामाऱ्यांत घालवला. अनेकांशी भांडणतंटे केले. लेखनाचे अनेक प्रकल्प पूर्ण केले नाहीत. अगदी ‘कॅपिटल’सारखा ग्रंथ त्याच्या हातून पूर्ण झाला नाही. त्याचा काही भागच त्याने पूर्ण केला आणि हयातीत प्रसिद्ध केला. पण आधुनिक मुक्त भांडवली अर्थव्यवस्था अशीच चालू दिली तर त्यातून प्रचंड विषमता निर्माण होईल, हे त्याचं भाकीत होतं. त्याची विश्लेषणाची पद्धत ही सॉक्रेटिसपासून सुरू झालेल्या पद्धतीची होती. त्यात संकल्पनाची चर्चा करायची आहे, त्या पद्धतीने आपल्याला माहीत आहेत त्या पद्धतीने त्या घ्यायच्या. आणि मग एखादा फळाची साल उलटी करावी त्याप्रमाणे आतून-बाहेरून आर्थिक-सामाजिक व्यवस्था समजून घ्यायची.

फेडरिक एंजल्स हा मार्क्सचा मित्रच  नव्हता, तर त्याचा सहलेखकही होता. इतका की, ‘कॅपिटल’चा उरलेला भाग त्यानेच पूर्ण केला. १८८३ मध्ये मार्क्स मरण पावला, तेव्हा त्याच्या प्रेतयात्रेला केवळ अकरा जण होते. मार्क्स तेव्हा ६४ वर्षांचा होता. त्या उपस्थितांमध्ये फेडरिक एंजल्सही होता आणि त्याचं भाकीत होतं की, एक दिवस मार्क्सची थोरवी जगाला पटेल.

कार्ल मार्क्सची पुस्तकं काही बेस्टसेलर नव्हती. ‘कम्युनिस्ट मॅनिफॅस्टो’ प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक वर्षं कोणालाही माहीत नव्हतं. २४ वर्षं ते आउट ऑफ प्रिंट होतं. १८६७ मध्ये ‘कॅपिटल’चा पहिला खंड आला. चार वर्षांत त्याच्या केवळ १००० प्रती खपल्या. १८८६ साली त्याचा अनुवाद इंग्रजीत झाला. त्याचा दुसरा आणि तिसरा खंड मार्क्सच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाला. एंजल्सने हा मजकूर सिद्ध केला. मार्क्सचं अक्षर खूप घाणेरडं होतं. एंजल्स आणि कुटुंब सोडून ते कोणालाही लागत नसे. त्याने १८४५मध्ये जे लिखाण केलं ते १८८८ पर्यंत कोणालाही माहीत नव्हतं. एंजल्सने ते सारं प्रसिद्ध केलं.

‘ग्रुंडरीस’ हे त्याचं पुस्तक सोव्हियात संपादकांनी संपादित केलं. १९२० पर्यंत तेही कोणाला माहीत नव्हतं. ‘पॅरिस मॅनुस्क्रिप्ट’ या नावाने ओळखलं जाणारं लेखन १९६० मध्ये प्रसिद्ध झाले. मार्क्सला यातलं कुठलंही लेखन प्रसिद्ध व्हावं असं वाटत नव्हतं.

मार्क्स ज्या कारणामुळे प्रसिद्ध झाला ती पुस्तिका ती १८४८ मध्ये प्रसिद्ध झाली. ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ या नावानं ती ओळखली जाते. कॅम्युन म्हणजे समाजातील एका नव्या रचनेचा पाया. म्हणजे एकत्र येऊन अनेकांनी एकमेकांच्या हितासाठी राहणं. युरोपभर कम्युन वादळ घोंघावतं आहे अशी त्याची सुरवात होती. ‘जगातील कामगारांनो एक व्हा’ ही जगप्रसिद्ध घोषणाही त्यातीलच. या लिखाणाला आता १७० वर्षं पूर्ण होतील.

अमेरिका-युरोपमध्ये १८५०नंतर मजुरांच्या स्थितीबद्दल विचार व चिंतन उभं राहिलं आणि त्यांच्या चळवळी सुरू झाल्या. या चळवळीचा गाभा सुधारणा हा होता. पण जसजशी या चळवळीची वाढ झाली, तसतशा त्या समाजवादी विचार स्वीकारू लागल्या आणि त्यामुळे मार्क्सला त्यात रस निर्माण झाला.

मार्क्स आजवर केवळ १९ व्या शतकातील अनेक सामाजिक अर्थशास्त्र, राज्यशास्त्र सैद्धांतिकांपैकी एक असा राहिला असता. रशियन क्रांतीमुळे मार्क्सचं लेखन गंभीरपणे घेतलं गेलं. १९१७ नंतर हा बदल घडला. त्याचे विचार ही केवळ फँटसी राहिली नाही.

मार्क्सचे आयुष्य विलक्षण होतं. मार्क्सचे वडील वकील होते आणि पश्चिम जर्मनीसारख्या छोट्या शहरात ते राहत होते. त्यांना मुलाने वकील बनावं असं वाटत होतं. मार्क्सने वकिलीचं शिक्षण घेतलं, पण तत्वज्ञानाचा अभ्यास करणं स्वीकारलं होतं. त्याने फेड्रिक विल्यम विद्यापीठात प्रवेश घेतला. जिथं हेगेल एकेकाळी शिकवत असे. ‘यंग हेगेलीयन्स’ नावाच्या गटामध्ये तो सामील झाला. हेगेल धर्मावर टीका करताना सावध होता आणि रशियन सरकारवर तो फारशी टीका करत नसे. ‘यंग हेगेलीयन्स’ अगदी याच्या विरुद्ध होतं. १८४१ मध्ये कार्ल मार्क्सला पदवी मिळाली. त्याच सुमारास बंडखोरीवरच्या कारवाईला सुरुवात झाली.१८४३ मध्ये राजसत्ता रुष्ट झाल्याने मार्क्सचा गुरु ब्रुनो बॉयर आणि इतर तरुण हेगेलीयन्स यांना परागंदा व्हावं लागलं. मार्क्सच्या पत्रकारितेमुळे त्याला कायम परागंदा व्हावं लागलं. कारण तो प्रचंड टीका करायचा आणि सरकारं त्याच्यावर नाराज व्हायची. प्रामुख्याने अधिकाऱ्यांना त्याचं लेखन नेहमीच आव्हान द्यायचं. १८४४ मध्ये ‘डोईश जॉरबाकर’ या नियतकालिकाचे त्याने संपादन केलं. पहिल्याच अंकानंतर ते बंद झालं. मात्र या अंकात त्याने मिळवलेल्या आणि प्रसिद्ध केलेल्या एंजल्स आणि हेस आर्थिक-राजकीय सत्तेच्या विश्लेषणामुळे त्याला स्वत:ला याविषयी काम करण्याची प्रेरणा मिळाली.

पत्रकारितेतून मिळणारे थोडेशे पैसे आणि पुस्तक लिहिण्याच्या आश्वासनावर घेतलेली आगाऊ रक्कम हेच मार्क्सच्या उत्पन्नाचं साधन होतं. एक कथा असे सांगते की, त्याने रेल्वे क्लार्कच्या पदासाठी अर्ज केला होता, पण अक्षर घाणेरडं असल्यामुळे त्याला ती नोकरी नाकारण्यात आली. १८४० मध्ये मार्क्सने युरोपमधून एक वर्तमानपत्र संपादित केलं. तसेच पत्रकारितेतलं लेखनही केलं. १८५२ ते १८६२ या काळात न्यूयॉर्क डेली ट्रब्युन या वर्तमानपत्रात स्तंभलेखन केलं. हे त्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय वर्तमानपत्र होतं. वृत्तपत्रीय काम संपत आलं तेव्हा मात्र मार्क्सच्या आर्थिक विवंचनेचा काळ सुरू झाला. कधी कधी त्याला एंजल्सकडून पैसे मिळत, तर कधी श्रीमंत नातेवाईकांकडून. कधी कधी खाण्यापिण्याचेही हाल होत. एक काळ असा आला की, मार्क्सला अंगावरचा कोटही विकावा लागला. त्यामुळे त्याला घराबाहेरही पडता येत नसे. असं असूनही तो आणि त्याची बायको आणि तीन मुली हे सारेच जे काही थोडेथोडके पैसे येत ते संगीत, चित्रकलेसारख्या गोष्टींवर उधळून टाकत. खरं तर उधळण्याइतके पैसे मार्क्सकडे नव्हते. तो फारच गरीब होता. त्याच्या तीन मुलांपैकी एक खूप कमी वयात दगावलं, तर चौथं जन्मण्याच्या आधीच मरून गेलं. गरिबी आणि खाण्यापिण्याचे हाल हे याला कारणीभूत असावं.

एंजल्स त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होता. पण मार्क्स आणि त्याची राजकीय मतं जुळू लागली. त्या दोघांनी एकत्र येईन ‘द कंडीशन ऑफ वर्किंग क्लास इन इंग्लंड’ हे अफलातून पुस्तक लिहिलं. ज्यात तिथल्या मजुरांचं भीषण वर्णन आहे. याच पुस्तकात पहिल्यांदा क्रांती घडून येईल असंही सुतोवाच केलं आहे.

१८४४ मध्ये मार्क्सला फ्रान्समधून हाकलण्यात आलं. तो ब्रशेल्सला गेला. तीन वर्षानंतर काहीतरी वेगळं घडलं आणि युरोप, फ्रान्स अमेरिकेत क्रांतीची चळवळ सुरू झाली. ही अशांती ब्रशेल्सपर्यंत पोहचत होतीच, तेवढ्यात मार्क्सने सशस्र क्रांतिकारकांना मदत करण्याचं. आणि बेल्जियममधूनही त्याला परागंदा व्हावं लागलं. मग तो पॅरिसला परतला. तिथं प्रचंड गोंधळ आणि मारामाऱ्या चालू होत्या. फ्रान्सच्या राजमुकुटाला आग लावण्यात आली होती.

वर्षभरानंतर या साऱ्या चळवळी आणि क्रांती दडपून टाकली गेली. युरोपियन आर्ट आणि लिटरेचरमधल्या प्रस्थापित अशा साऱ्यांना क्रांतीच्या चळवळीची झळ बसली. परिणामी राजकारणाबद्दल सर्वांच्या मनात अढी निर्माण झाली. १८४८ मधल्या क्रांतीच्या अपयशामुळेच मार्क्सने लिहिलं की, ‘क्रांती पहिल्यांदा शोकांतिका म्हणून येते आणि नंतर फार्स म्हणून.’                             

लेखक पुस्तकविक्रेते आणि संग्राहक आहेत.

shashibooks@gmail.com

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......