जांबुवंतराव नावाचं एकाकी वादळ!
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
प्रवीण बर्दापूरकर
  • जांबुवंतराव धोटे (१९३९-१८ फेब्रुवारी २०१७)
  • Sat , 25 February 2017
  • पडघम राज्यकारण जांबुवंतराव धोटे Jambuwantrao Dhote कट्टर विदर्भवादी The Lion of Vidharbha बनवारीलाल पुरोहित Banwarilal Purohit

आमच्या लहानपणी शाळेला सुट्या लागल्या की, मामाच्या गावाला जाण्याची प्रथा होती. मला चार मामा होते, पण मला उमरखेडच्या अशोकमामाकडे जायला आवडायचं, कारण आजी- तिला आम्ही अक्का म्हणत असू- फार लाड करत असे. अशोक खोडवे हा मामा आणि मामी दोघीही शासकीय नोकरीत होते. उमरखेडच्या आठवडी बाजाराला लागून असलेल्या एका भल्यामोठ्या वाड्यात ते राहत असत. मी सातवीत होतो. प्रसंग आहे १९६७च्या उन्हाळ्यातला. एक दिवस अशोकमामा म्हणाला, ‘चल, तुला भाऊंच्या सभेला घेऊन जातो.’ पर्यायच नव्हता. गेलो. उमरखेडच्या मुख्य चौकात एक व्यासपीठ उभारलेले होतं. लाउडस्पीकरवर जोरजोरात देशभक्तीपर गाणी वाजत होती. मध्यभागी मोकळी जागा आणि चोहोबाजूनं दुकान अशी ती रचना होती. चौक माणसांनी तुडुंब भरलेला होता. मामाच्या ओळखीच्या एका दुकानदाराच्या दुकानात आम्ही विसावलो. ते दोघं बोलत असताना मी चौकातलं वातावरण उत्सुकतेनं बघत होतो. थोड्याच वेळानं भला मोठा गलका झाला. ‘वारे शेर, आया शेर’, ‘विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे यांचा विजय असो’ अशा गगनभेदी घोषणांनी तो परिसर दुमदुमून गेला. हा असा नजारा पहिल्यांदाच पाहत होतो. थोड्या वेळानं व्यासपीठावर मोठी लगबग उडाली. एकाच वेळी अनेक आवाज वातावरणात घुमू लागले. युद्धाच्या समयी रणदुंदुभी कशा वाजत असतील याचा अंदाज त्यामुळे आला. थोड्या वेळानं सर्व आवाज थांबले आणि आणि धिप्पाड शरीरयष्टी असलेला, दाढीधारी माणूस बोलायला उभा राहिला. त्याचं बोलणं ऐकण्यासाठी जमाव उत्सुक झाला. पिनड्रॉप शांतता पसरली. एखादा प्रपात कोसळावा तसं ते वक्तृत्व सुरू झालं. श्वास रोखून-नजर खिळवून जमाव ऐकत होता.

वेगळा विदर्भ, अन्याय असं काही त्या भाषणात होतं आणि ते माझ्या आवाक्याच्या बाहेरचं होतं. पण, एवढा मोठा जमाव त्या दाढीधारी माणसाच्या बोलण्यानं गुंगावलाय हे बघणं मोठं रम्य होतं. त्यात तंद्री लागली आणि अचानक वीज प्रवाह खंडीत झाला. काही दुकानात सुरू असलेल्या पेट्रोमॅक्सचा उजेड त्या चौकासाठी पुरेसा नव्हता. अचानक तोच आवाज करडेपणानं वातावरणात कडाडला, ‘कोणीही जागून उठायचं नाही आणि आया-बहिणीला जर कोणी हात लावला तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे’. नंतर सभेत मेणबत्त्या वाटल्या गेल्या, त्या पेटवून, हातात घेऊन लोक उभे राहिले. त्या प्रकाशात भाषण सुरू झालं... रात्री झोपेतही मेणबत्त्यांचा प्रकाश आणि तो वक्तृत्वाचा प्रपात दिसत राहिला. तो प्रसंग आजही मनात जसाच्या तशा आहे. जांबुवंतराव धोटे यांच्या निधनाची बातमी आल्यावर तोच प्रसंग पुन्हा आठवला.

पुढे पत्रकारितेत आल्यावर जांबुवंतराव धोटे नावाच्या नेत्याची आभा आणि महती कळली. चिपळूणला ‘सागर’ या दैनिकात पत्रकारिता करत असताना त्यांचं विधानसभेत पेपरवेट भिरकावणं  आणि आकाशाला साक्षी ठेवून समुद्रकिनारी केलेला विवाह गाजला. (त्यावेळी माझा सहकारी भालचंद्र दिवाडकर यानं फारच मस्त अग्रलेख लिहिल्याचं स्मरणात आहे). जांबुवंतरावांचा काँग्रेसप्रवेश आणि राजकारणातल्या कोलांटउड्या बघायला मिळाल्या. १९८१च्या जानेवारी महिन्यात पत्रकारिता करण्यासाठी मी नागपूरला पडाव टाकला. आमचे बॉस आणि ‘नागपूर पत्रिका’चे मुख्य वार्ताहर दिनकर देशपांडे यांची जांबुवंतराव यांच्याशी चांगली जान-पहेचान होती. त्यांच्यासोबत जांबुवंतराव धोटे यांची ‘याचि देही याचि डोळा’ भेट झाली.  

धुम्रपान आणि तंबाखू खाणारांचा जांबुवंतरावांना टोकाचा तिटकारा. पत्रकार भवनात ते आले आणि कोणी पत्रकार जरी धुम्रपान करत असला तर सरळ ते त्याला बाहेर जायला सांगत. हा फटका एकदा मलाही बसलेला आहे! जांबुवंतराव धोटे यांची लोकप्रियता अफाट होती आणि त्याला धाडसाची जोड होती. महिलांची झालेली छेडछाड किंवा महिलांवर होणारी शेरेबाजीची त्यांना नफरत होती. असं काही त्यांच्या आसपास घडल्याचं लक्षात आलं तर ते करणाराची गय नसे. जांबुवंतरावांचा दणकट पंजा त्याच्या गालावर मस्त आवाज करताना अनेकांनी ऐकला आहे. महिलांचा आदर करण्याच्या याच भूमिकेतून बहुदा त्यांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या नागपूरच्या महिलांकडून राखी पौर्णिमेला राखी बांधून घेण्याचा उपक्रम सुरू केला आणि तो अनेक वर्षं पाळला. त्यांच्या या उपक्रमात तेव्हा शेकडो लोक सहभागी होत असत. उपेक्षेच्या खाईत जगणाऱ्या या वर्गातील स्त्रियांना त्यामुळे मिळालेला आत्मविश्वास आणि झालेला आनंद शब्दात सांगणं कठीण आहे.

ज्या नेत्यासाठी हजारो लोक जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरत, पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खात, बंदुकीच्या गोळ्या झेलत ते जांबुवंतराव धोटे वागायला-बोलायला एकदम ‘डाऊन टू अर्थ’ होते. दर्शन आणि वर्तन उग्र-काहीसं रासवट पण, मनानं मात्र खूपच हळवं, हे त्यांचं वैशिष्ट्य लवकरच लक्षात आलं. कवितेत रस असणारं, गाणं आणि संगीताची मर्मज्ञ जान असणारं, अभिनयात रुची असणारं, वाचक असं त्यांचं लोभस व्यक्तिमत्त्व आहे, हे हळूहळू उलगडत गेलं. पांढरे स्वच्छ कपडे, हातात जाडजूड कडं, छातीपर्यंत वाढलेली दाढी, डोईवरच्या केसांचा बुचडा बांधलेला. झपझप पायी चालणं, एसटी बसनं प्रवास करणं आणि समोर दिसेल त्याला नमस्कार करणारा हा एकमेव नेता मी विदर्भात बघितला. हळूहळू संपर्क वाढला आणि भीड चेपून मग मीही त्यांना ‘भाऊ’ म्हणायला सुरुवात केली. तोवर राजकीय पटलावरचं जांबुवंतराव यांचं प्रस्थ कमी झालेलं होतं, मात्र सुंभ कायम होता. अंगार थंडावला असला तरी धग कायम होती; नुसतीच कायम नाही तर त्यातली ऐट मुळीच कमी झालेली नव्हती. ते रस्त्यानं चालले तरी, कौतुकाच्या अगणित नजरा त्यांचा पाठलाग करायच्या आणि ते कळून जांबुवंतराव खूष होत असल्याचं अनुभवायला मिळायचं. मग माझ्या बालमनाच्या कुपीत ठेवलेलं उमरखेडच्या सभेचं स्मरण जांबुवंतराव यांना एकदा करून दिलं. ती सभा त्यांना काही आठवली नाही, पण माझं ऐकल्यावर खूप हसले आणि त्यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीच्या आठवणीत रमले. 

आता पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांना बघितलं की, मला जांबुवंतराव यांची आठवण होते. पत्रकार परिषद सुरू असताना धुम्रपान नाही, तंबाखू नाही हे त्यांचं कडक फर्मान पाळावंच लागे. शिवाय पत्रकार परिषद ते बोलवत, पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं त्यांच्यावर बंधनकारक नसे. राज ठाकरे जसा ‘पुढे’ असा (दमवजा?) सल्ला देतात तसंच नाही; जरा वेगळं वागणं जांबुवंतराव यांचं असे. काहीच न बोलता तो प्रश्न उडवून लावल्याची कृती ते एका हातानं करत आणि दुसरा हात कुणाकडे तरी करत पुढचा प्रश्न विचारावा असं सुचवत. तुम्ही ‘किंचित आहात माझ्यासमोर’ हा त्यातून प्रकट होणारा भाव फारच बेडरपणाचा आणि अपमानास्पदही असे, पण कोणी पत्रकार त्याविरुद्ध प्रतिकाराचा शब्दही उच्चारण्याचं धाडस करत नसे. कधी तर ते सरळ पत्रकार परिषदच गुंडाळून ताडताड पाऊले टाकत पत्रकार भवनाच्या बाहेर पडत! एकदा ‘वेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते असूनही तुम्ही शिवसेनेत कसे गेलात?’ हा प्रश्न लावून धरल्यावर मलाही त्यांनी असंच उडवून लावलं. मग आम्हाला बोलावताच कशाला, वगैरे वाद मी घातला. अर्थात त्याचा जांबुवंतराव यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. 

जांबुवंतराव यांचा मी भक्त नव्हतो, समर्थक तर मुळीच नव्हतो; परस्परांत घनिष्ट सलगीही नव्हती. स्वतंत्र विदर्भाच्या विषयावर आमच्यात मतभेद होते आणि ते अनेकदा ठिकठिकाणी व्यक्तही झालेले आहेत. नियमित नसलं तरी आम्ही अधूनमधून भेटत असू. दोन-तीन वेळा मी त्यांना यवतमाळच्या घरी भेटलो आहे. हे घर बड्या नेत्याचं असं कधीच वाटलं नाही. भेट झाल्यावर वडिलधाऱ्या आत्मीयतेनं ते विचारपूस करत. ‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृत्तीचा मी आधी निवासी संपादक आणि मग संपादक झाल्यावर आमच्या भेटीचं स्थान, नागपूरलगत असलेल्या दाभा या गावी असलेल्या डॉ. झिटे यांचा निसर्गोपचारासाठी परिचित असलेल्या आंतरभारती आश्रमातली एक साधीशी, भरपूर नैसर्गिक हवा खेळत असणारी झोपडी असे. त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेल्या सर्वच बातम्यांत ‘कट्टर विदर्भवादी’ असा उल्लेख आलेला आहे. एकदा त्यांनी बोलताना सांगितलं होतं की, सुरुवातीच्या काळात ते संयुक्त महाराष्ट्रवादी होते, पण वसंतराव नाईक मुख्यमंत्री असूनही विदर्भाच्या अगदी साध्यासाध्या वाजवी मागण्या संमत होण्यासाठी सभागृहात संघर्ष करावा लागे. विदर्भात कृषी विद्यापीठ स्थापन व्हावं ही मागणी वसंतराव नाईक यांनी फेटाळल्याचा जांबुवंतराव यांना इतका संताप आला की, ते तसेच विधानसभेतून बाहेर पडले आणि त्यांनी एक मोठं जनआंदोलन उभं केलं. हे आंदोलन बराच काळ चाललं. राज्याच्या पश्चिम महाराष्ट्रीय नेतृत्वाकडून विदर्भाला डावललं जाण्याच्या सलग स्वानुभवातून ते विदर्भाच्या मागणीचे कट्टर पुरस्कर्ते होत गेले. नंतरच्या काळात बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेकडे ते का आकर्षित झाले असावेत याचं उत्तर, मला वाटतं इथं असावं.

याच गप्पांतून अनेक राजकीय किस्से ते सांगत. कुमार केतकर, अरुण साधू, विद्याधर दाते या आमच्यासाठी आयडॉल असणारांचा तसंच अनेक बड्या राजकीय नेत्यांचा उल्लेख ते अविश्वसनीय वाटावं अशा ‘अरेतुरे’नं करत. इंदिरा गांधी यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता आणि त्यांच्याही आठवणी ते सांगत. एकदा मी या संदर्भात कुमार केतकरांना विचारलं तेव्हा ते म्हणाले, ‘जांबुवंतराव एकही शब्द अतिशयोक्तीचं बोलत नसणार, याची खात्री बाळग!’  

राजकारण स्वच्छ असावं, जनताभिमुख असावं ही जांबुवंतराव यांची निष्ठा अतितीव्र होती आणि त्याबाबतीत प्रत्येक राजकीय पक्षाकडून त्यांच्या पदरी अपेक्षाभंग आला. त्यामुळेच सतत पक्ष बदलून ते योग्य पर्याय शोधत राहिले असावेत तरीही किनारा न मिळाल्यानं राजकीय पटलावर जांबुवंतराव नावाचं वादळ कायम एकटंच घोंगावत राहिलं. अगदी काँग्रेससकट सर्वच प्रत्येक पक्षांनी त्यांचा केवळ वापर करून घेतला. स्थानिक राजकारणात वसंतराव नाईक आणि जवाहरलाल दर्डा (जांबुवंतराव यांनी पहिली निवडणूक नगर परिषदेची लढवली आणि त्यात जवाहरलाल दर्डा यांचा पराभव केला होता!) यांच्याशी संघर्ष करण्यात त्यांचा उमेदीचा फार मोठा काळ गेला. ‘इलेक्टिव्ह मेरीट’ घेऊन सांसदीय राजकारणात उतरलेल्या जांबुवंतराव यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून जरा लवकर बाहेर पडावं लागलं; कारण तडजोडी हा त्यांचा स्वभावच नव्हता. इतका प्रचंड अनुयायी वर्ग असूनही त्यांच्यासोबत कायम मोजकेच लोक राहिले तरी, ते निष्ठांबाबत अविचल राहिले... एकटेच घोंगावत राहिले.

विदर्भाच्या प्रश्नावर ते आणि बनवारीलाल पुरोहित या दोघांच्याच निष्ठा अविचल, अव्यभिचारी, पारदर्शी, निस्वार्थ होत्या आणि अनामत रक्कम जप्त झाली तरी याच एका मुद्द्यावर हे दोघे निवडणुका लढवत राहिले... लवचिकता नसल्यानं राजकारणात कोंडी झाली असं नाही का वाटत, असं एकदा मी त्यांना विचारलं तेव्हा ते ज्या पद्धतीनं हसले आणि हातानं ‘झालं गेलं गंगेला मिळालं’ ही कृती केली आणि गप्प झाले. त्यावरून हे त्यांनी उत्तरायुष्यात ओळखलेलं होतं, पण त्यांना त्यावर काहीच बोलायचं नाही हे जाणवलं. त्यांच्या या मौनातून जाणवला तो त्यांचा अपेक्षाभंगाचं दु:ख व्यक्त न करण्याचा उमदेपणा!

हट्टीपणासदृश्य वाटणाऱ्या टोकाच्या तीव्र निष्ठा, तळहातावर कायम तेवत्या ठेवणारांची होणारी कोंडी सत्ताधुंद राजकारणात नवीन नाही. त्याचे अनेक दाखले देता येतील. सत्ताधुंदता, निष्ठाप्रतारणा हेच गुणवैशिष्ट्य झालेल्या वर्तमान राजकारणात जांबुवंतराव धोटे एखाद्या वाघासारखे वावरले आणि वादळासारखे घोंगावत राहिले. हा वाघ कोणत्याच राजकीय पक्षाच्या संधीसाधू मतलबाच्या पिंजऱ्यात अडकला नाही-अडकणं शक्यही नव्हतं. माणसांच्या ओंजळीत न मावणारा, झंझावाती वादळासारखा माणूस दहा हजार वर्षांत एकदाच जन्माला येतो. जांबुवंतराव धोटे त्यापैकी एक.

लेखक दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

Post Comment

Praveen Bardapurkar

Sun , 26 February 2017

हर्षवर्धन निमखेडकर.... मला आठवतात ते दिवस . माझ्या आणि मंगलातील 'इंटीमसी'चा तू एक साक्षीदार आहेस . छान होते ते दिवस आणि तेव्हा भेटलेले लोक . तेव्हा भेटलेले बहुसंख्य लोक लोभी नव्हते म्हणून ते लक्षात आहेत . युधिष्ठीर जोशी गेल्याचं कळल्यावर वाईट वाटलं . नागपूर पत्रिकेत आम्ही बरीच वर्षे सोबत काम केलंय . त्यांना आम्ही बाबासाहेब म्हणून संबोधायचो . बाबासाहेब कल्पक होते आणि नाविन्याची त्यांना आवड होती . अशात मात्र संपर्क नव्हता . --प्रब


George Threepwood

Sat , 25 February 2017

ताजा कलम -- या वेळी आणखी एक आठवण आली, ती ही सांगतो. मित्रवर्य प्रवीण बर्दापूरकर यांचे नागपुरात पत्रकार म्हणून प्रथम पदार्पण झाले ते नागपूर पत्रिका या दैनिकाच्या माध्यमातून. त्याला नागपुरात बोलावण्याचे श्रेय श्रीयुत युधिष्ठीर जोशी यांचे होते. जोशी मुंबईहून आले होते आणि ते नुकत्याच सुरू झालेल्या नागपूर पत्रिकेचे कार्यकारी संपादक होते. त्यांनी प्रवीणचे गुण जाणून त्याला पत्रिकेत काम करण्यासाठी आमंत्रण दिले, आणि त्यानुसार तो आला. त्याच सुमारास माझी आणि जोशींची आकाशवाणीच्या न्यूज सेक्शनमध्ये भेट झाली, आणि त्यांनी मलाही नागपूर पत्रिकेत काम करतोस का असे विचारले. मग मी देखील तेथे दाखल झालो. तिथेच माझी आणि प्रवीणची ओळख झाली. काय मजेचे दिवस होते ते. पुढे मी पत्रकारिता सोडून वकिली व्यवसायात गेलो आणि प्रवीण पत्रकारितेतच राहून प्रगती करीत गेला. आत्ता गेल्याच आठवड्यात या आमच्या युधिष्ठीर जोशी यांचे मुंबईत वयाच्या ८१व्या वर्षी निधन झाल्याची बातमी वाचली. प्रवीणच्या आजच्या या लेखामुळे या सगळ्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. युधिष्ठीर जोशी यांचेही या निमित्ताने आज स्मरण करतो.


George Threepwood

Sat , 25 February 2017

काय गंमत आहे बघा, माझे मित्र प्रवीण बर्दापूरकर यांच्याचसारखा माझाही दिवंगत जांबुवंतराव यांच्याशी पहिला संबंध आला तो मामाच्याच मार्फत. माझे मोठे मामा (भाऊमामा) १९५० च्या दशकात यवतमाळला पोलिस खात्यात नोकरी करायचे. त्यामुळे आणि तसेही मूळ यवतमाळचेच असल्यामुळे त्यांची गावात बरीच जान पह्छान होती म्हणून त्यांचा आणि जांबुवंतराव यांचा वैयक्तिक परिचय होता. मामा त्यांच्यापेक्षा वयाने पंधरा वर्षांनी मोठे होते. माझी आई लग्नानंतर १९५२ मध्ये यवतमाळातून नागपुरात आली. नंतर माझा जन्म झाला. जांबुवंतरावांचे नाव तोवर राजकीय बातम्यांत चमकायला लागले होते. एखादी अशी बातमी वाचली की माझी वडील आईला म्हणायचे, बघ - तुझ्या भावाच्या मित्राची बातमी आली आहे. आईकडूनही मी त्यांच्याबद्दल ऐकत आलो होतो. त्यामुळे त्या लहान वयातही ही कोणीतरी बडी आसामी आहे, हे मला माहीत होते. १९६६ मध्ये पाचवीत गेल्यानंतर आईने मला रोजचे मराठी वर्तमानपत्र वाचायची सक्ती केली होती. मग मला स्वतःलाही अधूनमधून येणार्‍या बातम्यांतून जांबुवंतराव हे नाव आणि त्यांचे फोटो ओळखीचे झाले. त्याच वर्षी किंवा १९६७ मध्ये असेल, एकदा मी संध्याकाळी आर. टी. ओ. जवळच्या मैदानातून क्रिकेट खेळून घरी परत जात होतो. आर. टी. ओ. अमरावती हायवेवर आहे. त्याच्या अगदी समोरचा रस्ता धरमपेठेत जातो. त्या टी-पॉईन्टला मी आलो असतानाच एक सायकल रिक्शा माझ्यासमोर येऊन थांबली. (त्या वेळी नागपुरात फक्त सायकल रिक्षाच होत्या. एखाद दुसरी सिटी बस अधून मधून धावायची, बस!) रिक्शेतून एक धोतर घातलेला, दाढीधारी माणूस खाली उतरला. रिक्शेवाल्याला पैसे देऊन त्यांनी इकडे तिकडे पाहिले. त्यांना मी दिसलो. मला हाक मारून त्यांनी मला एक पत्ता विचारला. मला ते घर माहीत असल्याने मी त्यांना पत्ता सांगितला. मग अतीव कुतुहलाने (आगाऊपणाने म्हणा) आणि थोडेसे चाचरत मी त्यांना विचारले, तुम्ही जांबुवंतरावमामा आहात ना? आपल्याला मामा म्हणणारा हा कोण प्राणी आहे, अशा बुचकाळ्यात पडून ते म्हणाले, हो, मीच जांबुवंतराव धोटे आहे. पण तू कोण आहेस, बाळ? मग मी त्यांना भाऊमामा आणि आईबद्दल सांगितले. एक क्षण जरा ते विचारात पडले, मग हसून म्हणाले, अच्छा, तू दिनकररावांचा भाचा आहेस का? योगायोगाने त्याच दिवशी भाऊमामा सकाळीच यवतमाळहून आमच्याकडे आले होते. मी जांबुवंतरावांना म्हंटले, मामा - घरी चला ना, मी इथून अगदी जवळच, याच गिरीपेठेत राहतो. भाऊमामा पण घरी आले आहेत. तुमची भेट होईल. पण जांबुवंतरावांना घाई होती, म्हणून पुन्हा केंव्हा तरी येईन, असे सांगून ते माझ्या डोक्यावर एक अलगद टप्पल मारून निघून गेले. लगेच धावत धावत घरी येऊन मी आईला आणि मामांना माझा हा पराक्रम सांगितला. मामा हसत म्हणाले, अबे हर्षा लेका, तो आमदार, एवढा मोठा माणूस आहे, तू त्याला चक्क मामा करून टाकलेस? नंतर किती तरी वर्षे जांबुवंतरावांचे नाव रेडिओवर ऐकले किंवा पेपरमध्ये वाचले की मला हा प्रसंग आठवायचा. सन १९८० मध्ये मी आकाशवाणीच्या नागपूर केंद्राच्या प्रादेशिक बातम्या विभागात नैमित्तिक उद्घोषकाचे काम करीत असताना लोकसभेच्या निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी रात्री एक की दोन वाजता जांबुवंतरावांनी नागपूरची जागा जिंकल्याची बातमी आली. तोवर विदर्भातले बाकीचे सगळे निकाल आलेले होते, आणि याच शेवटच्या निकालाची आम्ही सारे वाट बघत होतो. रात्री दोन वाजता रेडिओवर बातमीचा तो फ्लॅश मी लाईव वाचून दाखवला आणि मगच ते विशेष प्रसारण संपले. अडीच वाजता घरी येऊन मी आईला म्हंटले, जिंकला बा तुझा भाऊ. आता मी शांत झोपतो. १९६६/६७ मधल्या त्या क्षणिक भेटीनंतर ना कधी मी जांबुवंतरावांना पुन्हा कधी प्रत्यक्ष भेटलो ना त्यांच्या संपर्कात आलो. माझे भाऊमामा १९५८ मध्येच नोकरी सोडून आमच्या खेड्यावर शेती करायला निघून गेले होते, त्यामुळे त्यांचीही यवतमाळला कार्यप्रसंगीच एखादी चक्कर व्हायची. म्हणून त्यांचा जांबुवंतरावांशी जो काय थोडा संपर्क आधी आला असेल, तोही तेव्हांच संपला होता. पण आठवणी कायम राहिल्या आणि राहतील. जांबुवंतरावांबद्दलच्या सगळ्या बातम्या वाचत होतोच. त्यानंतर नागपूर पत्रिका या दैनिकात प्रवीण बर्दापूरकर आणि मी सहकारी झालो - पण तो रिपोर्टर होता आणि मी उप संपादक म्हणून डेस्क ड्यूटीवर. याही काळात माझा त्यांच्याशी प्रत्यक्ष काही संबंध आला नाही. पण एक उमदे, दिलखुलास, धाडसी, वादळी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची जी छबी लहानपणापासून मनावर कोरली गेली होती, ती शेवटपर्यंत कायम राहिली. खरोखरच ते नागपूर-विदर्भाचे शेर होते. १९९३ मध्ये भाऊमामा गेले, गेल्या वर्षी आई गेली, आणि आता तर जांबुवंतराव मामा देखील गेले. त्यांना माझी आदरांजली. --- हर्षवर्धन निमखेडकर


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......