माणूस : खुर्चीअल्याडचा आणि पल्याडचा
पडघम - सांस्कृतिक
अवधूत परळकर
  • बेस्ट बसचं प्रातिनिधिक छायाचित्र
  • Tue , 07 February 2017
  • सांस्कृतिक Sanskrutik ‌‌बेस्ट बस Best Bus सायन डेपो Sion Depot

दीप्ती राणे. वय वर्षे एकोणीस. रुइया कॉलेजातली विद्यार्थिनी. काही महिन्यापूर्वी ‘टाइम्स ऑफ इंडिया’त तिचं एक लहानसं पत्र प्रसिद्ध झालं होतं. बेस्टच्या डेपोत तिला आलेला एक अनुभव तिनं पत्रात सांगितला होता. काय होतं या दीप्तीच्या लहानशा पत्रात? दीप्ती पत्रात त्यात लिहिलं होतं -

‘कॉलेजातला पहिला दिवस होता. मी त्या दिवशी चुकीच्या बसमध्ये चढले. दुपारी साडेतीनला माझी बस शीव डेपोत पोचली. मला क्रमांक २२ ची बस हवी होती. शीव डेपोत मी पहिल्यांदा येत होते, त्यामुळे मी गोंधळून गेले. मला २२ क्रमांकाच्या बसचा स्टॉप सापडेना. मी डेपोतल्या चौकशी खिडकीपाशी गेले. २२ चा स्टॉप कुठे आहे म्हणून तिथं बसलेल्या माणसाला मी विचारलं. उत्तराऐवजी बराच वेळ तो टक लावून माझ्याकडे पाहत राहिला. नंतर म्हणाला, ‘स्टॉप कुठं आहे ते तू स्वत: शोधून काढ.’ त्या चौकशी खिडकीच्या बाजूला एक फलक होता. त्यावर लिहिलं होतं – ‘मी आपली काय सेवा करू?’ तरी वरील प्रकरणी बेस्टच्या महासंचालकांनी लक्ष घालून त्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी.’

मला कल्पना आहे दीप्तीचं पत्र समोर ठेवल्यावर काही वाचक म्हणतील- हे काय लावलंय? आम्हाला कशाला ऐकवताय हे? आम्हाला यात काही नवीन नाही. यात काही नवीन नाही हे खरं आहे. पण यात काही नवीन नाही म्हणूनच याकडे लक्ष वेधून घेणं मला आवश्यक वाटतं. ही घटना पहिल्यांदा घडत असती तर येतो केव्हातरी असा चमत्कारिक अनुभव म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता आलं असतं. काऊंटरपाशी बसलेली व्यक्ती शेवटी माणूसच असते; कामाच्या ओझ्यामुळे किंवा  घरच्या काही समस्यांमुळे वैतागून माणूस कधी कधी असा वागतो अशी स्वत:ची समजूत घालता आली असती. पण चौकशीच्या खिडकीत बसलेल्या व्यक्तीचं हे उर्मट वागणं; नेमून दिलेलं काम न करणं हे आता रूटीन बनलंय. आपल्यापैकी अनेक हा उद्वेगजनक अनुभव रोजच्या रोज घेत आहेत. चालायचंच म्हणून आपण हे सारं स्वीकारलंय हे तर त्याहून उद्वेगजनक आहे. व्यवस्थेतल्या गलथानपणाबद्दल आपण सारे वर्षानुवर्षे कुरकुरत आलो आहोत. पण फक्त आपसात कुरकूर. कृती नाही.

काऊंटरवर बसलेली माणसं अशी का वागतात? समोरच्या व्यक्तीला योग्य ती माहिती पुरवणं हा आपल्या कामाचा भाग आहे; त्यासाठी आपल्याला दरमहा वेतन मिळतं याची त्यांना अजिबात जाणीव नसते की काय?

खूप लहानवयापासून मी काऊंटर पलीकडच्या माणसांना पाहत आलोय. अनेक जण तर पेपरातून डोकं वर काढून पाहतही नाहीत. घसा खाकरून आपल्याला त्यांचं लक्ष वेधून घ्यावं लागतं. घराजवळच्या एका बँकेत परवा गेलो होतो. दुपारची वेळ. बँकेत गर्दी नव्हती. काऊंटरपाशी मीच एकटा उभा होतो. पण पलीकडचा माणूस मी उभा असल्याची दखल घ्यायलाही तयार नव्हता. पाच-दहा मिनिटं गेली, तो मान उचलून वर पाहीचना. मग मी गंमत केली. मी त्या काऊंटरवर डोकं ठेवून चक्क झोपलो. मी झोपल्यावर सगळी बँक जागी झाली. कुणीतरी ओरडला, ‘कामत, त्यांचं काय ते पाहा.’ कामतनं वर पाहिलं आणि माझ्या हातातलं पासबुक मागून घेतलं.

का वागतात अशी ही माणसं? ही माणसं आहेत तरी कोण? परग्रहावरून आलेले पाहुणे?

आपल्यातल्याच कोणीतरी तिथं जाऊन बसावं आणि खुर्चीला रेलून बसल्यावर पार बदलून जावं? काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत कुठेही जा; प्रत्येक कार्यालयात, खुर्चीतली माणसं आणि खुर्चीसमोर ताकळत उभी असलेली माणसं असे माणसांचे दोन तट पडलेले दिसतील. खुर्चीच्या पलीकडली माणसं गुर्मीत तर अलीकडली माणसं गरजू आणि म्हणून केविलवाणी, असं जिथं तिथं द्दश्य. 

खुर्चीपलीकडल्या बथ्थड चेहऱ्याच्या माणसांची एक टोळी या देशात आहे. आणि मंत्री-संत्री नाही तर ही टोळीच या देशातल्या लोकांवर राज्य करते आहे. या वृत्तीची माणसं जोवर प्रशासन सेवेत आहेत, तोवर या देशात कोणत्याही प्रकारचं परिवर्तन अशक्य आहे. लेखाच्या सुरुवातीला उल्लेखलेलं दीप्ती राणेचं पत्र लहान असलं तरी देशाच्या एका मोठ्या गंभीर प्रश्नाच्या मुळाशी घेऊन जाणारं आहे.

असं वाटतं, पंतप्रधानांना ओरडून सांगावं, तुमचे अणु उर्जा प्रकल्प, इन्फोटेक इनस्टिट्यूट, आय. आय. टी. वगैरे सारं खड्डयात जाऊ द्या. समोरच्या माणसांशी कसं बोलायचं, कसं वागायचं हे या खुर्चीतल्या लोकांना शिकवणाऱ्या शाळा काढा आधी. कम्प्युटर, फॅक्स, इंटरनेट यांचं जाळं उभारून सार्वजनिक प्रशासनाला गती येईल हा भ्रम आहे आपला. खुर्चीपलिकडली ही जमात सत्तेतून आलेला आपला माज, आपली निष्क्रियता जोवर सोडत नाही, तोवर देशात कोणत्याही स्वरूपाचं परिवर्तन संभवत नाही.

रिक्षा-टॅक्सीवाल्यांना शिस्त लावण्यासाठी जनतेची आंदोलनं होतात; रस्त्यावर खड्डे बुजवले नाहीत म्हणून लोक रस्त्यात ठिय्या मांडून ओरडा करतात. प्रशासकीय कामकाजातले हे खड्डे बुजवण्यासाठी सत्याग्रह का केले जात नाहीत? खुर्चीतल्या बेजबाबदार अधिकाऱ्यांना त्यांच्या टोलवाटोलवीबद्दल जाब विचारण्यासाठी मोर्चे का काढले जात नाहीत? मोघम आणि अस्पष्ट उत्तरं देऊन किरकोळ कामासाठी या देशातील नागरिकांना एका टेबलापासून दुसऱ्या टेबलाकडे नाचवलं का जात आहे?

मी पोटतिडिकेनं हे प्रश्न विचारतोय.... आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं ज्याच्यापाशी आहेत तो माणूस ओठ आवळून पलीकडच्या खुर्चीवर आरामात रेलून बसला आहे.

लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.

awdhooot@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......