समाजाचा खणखणीत आवाज व्हावंसं वाटलं…
पडघम - साहित्य संमेलन विशेष
अनिता यलमटे
  • कथाकार अनिता येलमटे
  • Fri , 03 February 2017
  • अनिता यलमटे Anita Yalmate नवलेखन - मराठी कथा Navlekhan - Marathi Katha राजन गवस Rajan Gawas

साहित्य संमेलन ही मराठी साहित्यविश्वातली एक सर्वाधिक मोठी घडामोड आहे. अनेक लेखक-कवी-कथा\कादंबरीकारांना तिथं व्यासपीठ मिळतं. उद्या त्या व्यासपीठाचे हक्कदार असलेले आणि नुकतेच लिहून लागलेले मराठीमध्ये नवे दमदार कथाकार उदयाला येत आहेत. यातील काहींचं एखाद-दुसरं पुस्तक प्रकाशित झालं आहे, तर काहींच्या अवघा पाच-सातच कथा प्रकाशित झाल्या आहेत. पण त्यातून त्यांच्याविषयीच्या अपेक्षा वाढीला लागल्या आहेत. या वर्षीच्या संमेलनात कदाचित या कथाकारांचा नामोल्लेखही होणार नाही, पण यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार ज्या आसाराम लोमटे यांना कथालेखनासाठी मिळाला आहे, त्यांच्या प्रदेशातील म्हणजेच मराठवाड्यातील हे कथाकार आहेत. त्यांची दखल भविष्यात मराठी साहित्यविश्वाला भविष्यात घ्यावी लागेल. त्यातील एका कथाकाराचं हे मनोगत…

-----------------------------------------------------------------------------

नॅशनल बुक ट्रस्टतर्फे प्रसिद्ध कथा-कादंबरीकार राजन गवस यांनी संपादित केलेल्या ‘नवलेखन -मराठी कथा’ या पुस्तकात माझी ‘काकणचोळी’ ही कथा प्रकाशित झाली. त्याची दखल घेत मराठवाडा साहित्य परिषदेने सत्कार व संवाद सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात कथालेखनावर बोलताना विशेष आनंद झाला. आपण का लिहितो? हा प्रश्न माझ्याही मनात अनेकदा येतो. तेव्हा गुदमरलेल्या मनाला मोकळं करत व्यक्त होण्यासाठी लेखणीचा आधार आपण घेतो आहोत, हेही जाणवतं. ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असलेल्या बालपणी अनेक अक्राळविक्राळ अनुभव गाठीशी बांधलेले आहेत. आयुष्याच्या पाऊलवाटेचा महामार्ग होण्यासाठी अनेक उन्हाळे, पावसाळे झेलावे लागतात, तेव्हा कुठे अनुभवांचं मृग नक्षत्र चांगलं बरसतं. मी लिहायला लागले तेव्हा माझी कोणतीही भूमिका तयार झालेली नव्हती किंवा मी कोणत्या चळवळीलाही वाहून घेतलं नव्हतं. मनात शब्दांची गर्दी होत होती. काहीतरी व्यक्त करावंसं वाटत होतं आणि ते कागदावर उतरवावंसं वाटतं. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचं काही देणं लागतो. म्हणून त्या समाजाचा खणखणीत आवाज व्हावंसं वाटलं. अशा प्रकारे लेखनाची भूमिका तयार झाली व मी लिहिती झाले.

सुरुवातीला मीही अनेकाप्रमाणे कविता हा प्रकार हाताळत होते. तेव्हा पहिलीच कविता ‘दै. लोकमत’च्या ‘मैत्र’ या पुरवणीत प्रकाशित झाली व आत्मविश्वास वाढला. पण आपल्या भावना, काही प्रश्न व धारदार प्रसंग व्यक्त करण्यासाठी कविता हा लेखनप्रकार थिटा पडतो आहे, हे मला जाणवलं. म्हणून मी कथेकडे वळले. साठोत्तरी कथालेखिकांचं लेखन वाचताना वाटलं, आपणही कथा या लेखनप्रकारात चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ शकतो, असं जाणवलं.

अलीकडच्या वीस वर्षांतल्या कथालेखिकांनी तर कमालीचा लेखनपल्ला गाठला आहे. कथेच्या लवचिकतेला ओळखत  लेखिका ठरावीक दंडकांना ओलांडून समाजातील रूढ परंपरेची बेगडी रूपंही नाकारताना दिसतात. अतिशय धीटपणे बदलत्या सामाजिक परिस्थितीतील जाणिवांची निर्मितीक्षम मांडणी कथेत होते आहे. माझ्या अनुभवात ग्रामीण भागातील स्त्रियांच्या अस्तित्वाची झालेली हेळसांड हा प्रमुख धागा आहे.

ग्रामीण स्त्रियांचं अस्तित्व शून्यवत करणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे परित्यक्त्या व मातृत्व. यातील मातृत्व हे प्राकृतिक आणि सांस्कृतिक अशा दोन्ही अंगांनी स्त्रीत्वाची उंची गाठणारं मूल्य आहे. पण हेच मातृत्व तिला वैधव्यात ओझं बनतं. त्यातही ‘वंशाचा दिवा’ म्हणजेच मुलगा पोटी असेल तर सासरी थारा मिळतो. पण मुलगी पोटी असेल तर तिच्यासकट माहेरी रवानगी होते. डोईवर अक्षता पडल्यावर माहेरही परकंच बनतं. असा अधांतरी जगण्याचा शाप घेणाऱ्या, कुंठत, संपवून घेत किंवा परावलंबी जगणाऱ्या स्त्रिया मी जवळून पाहते आहे.

माझ्या आजूबाजूला घडणारे अनुभव, माणसं, त्यांच्यातली नाती, त्यांची सुख-दु:खं, अगतिकता, बेगड्या रूढी-परंपरा या सर्वांमध्ये होरपळणाऱ्या स्त्रियांच्या कहाण्या जशाच्या तशा सांगणं मला प्रचंड अस्वस्थतेतून बाहेर येण्यासाठी गरजेचं बनलं. यासाठी मी कथा हा लेखनप्रकार हाताळते. पण कथा म्हणजे गोष्ट नाही, तसाच अनुभवाचा वृतान्तही नाही, तर ती त्या त्या लेखकाची दृष्टी असते.

स्त्रियांच्या लेखनात शोकात्मकताच का येते, असं विचारलं जातं. हे सत्यही आहे. स्त्रिया एका परिघाबाहेर लिहू शकत नाहीत. कारण त्यांचं अनुभविश्व मुळात तोकडं आहे. त्यासाठी जग फिरावं लागतं, बाहेरचे अनुभव घ्यावे लागतात, त्या त्या भूमिकांमध्ये शिरावं लागतं, पण अशी आव्हानं पेलणं मध्यमवर्गीय लेखिकांना शक्य नाही. त्यांच्या परिसरातील कितीतरी प्रश्न अजूनही लेखणीचे विषय बनण्याची वाट पाहत आहेत. अनुभवापलीकडच्या विषयाला हाताळत लिहिणं होत असेल तर ते उसनं अवसान आणल्यासारखं होणार नाही का?

माझ्या कथांचे विषय ही माझ्या भोवतीच्या सत्यकथा-व्यथा यांमधूनच आलेले आहेत. काल्पनिक आहेत ती पात्र, स्थल व काळाची गुंफण. ग्रामीण स्त्रियांच्या वाट्याला अनेक वेळा उपेक्षित, वंचित व दमन करणारं जीवनच आलं आहे. या अन्याय-अत्याचारातून येथील स्त्री जीवनाची एक सोशिक मानसिकता बनली आहे. या मानसिकतेला बदलवत जगण्याचं बळ देण्यासाठीच माझा लेखनप्रपंच आहे.

एका पाश्चिमात्य लेखकानं म्हटल्याप्रमाणे, ‘लेखकाला लेखनाचा शाप मिळालेला असतो आणि शापमुक्त होण्यासाठी त्याला लिहिण्याखेरीज दुसरा उपचारच नसतो.’ म्हणूनच कथा माझी सहचरिणी आहे, तिच्या जन्माचे डोहाळे अस्वस्थ करणारे आहेत. तिच्यासाठीची व्याकूळता प्रसुतीवेदनेपेक्षा कमी नसते. या वेदनेतून जन्माला येणारी कथा ही अलौकिक पातळीवरचं समाधान देणारी असते, हे मात्र निश्चित. या निर्माणाच्या युगात आपलाही छोटासा खारीचा वाटा समाजउभारणीत व्हावा, हीच भूमिका लेखनामागे आहे.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......