मराठी ग़ज़लमध्ये कचरा फार झाला, कोण साफ करणार?
पडघम - साहित्यिक
विश्वास वसेकर
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Mon , 16 January 2017
  • मराठी ग़ज़ल Marathi Ghazal सुरेश भट Suresh Bhat इलाही जमादार Ilahi Jamadar रमण रणदिवे Raman Randive अजीज नदाफ Aziz Nadaf प्रदीप निफाडकर Pradip Niphadkar

नुकतंच पुणे विद्यापीठात मराठी ग़ज़ल या काव्यप्रकाराविषयी आंतरराष्ट्रीय चर्चासत्र झालं. त्यात सादर करण्यात आलेला हा चिंतनशील निबंध...मराठी ग़ज़ल परंपरेची रोखठोक चिकित्सा करणारा...

मराठी ग़ज़लला अजूनही धड समीक्षक लाभलेला नसल्यामुळे ग़ज़लशी संबंधित संकल्पना स्पष्ट करून देण्या-घेण्याबाबत सगळा सावळा गोंधळ आहे. त्यामुळे सुरुवातीला मी माझ्यापुरता या संकल्पना स्पष्ट करून आपल्यापुढे ठेवत आहे. ‘मराठी ग़ज़ल’ म्हणजे ‘अशीच याद तुझी जाळितसे रे दिलबर’ यासारखी गंगा-जमनी रचना नव्हे. मराठी ग़ज़ल कटाक्षानं मराठी शब्द प्रतिमा, प्रतीकं वापरूनच लिहिली गेली पाहिजे. उदा. ‘मठोमठी मंबाजींना कीर्तने करू द्या, विठू काय बेमानांना पावणार आहे?’ ही मराठी ग़ज़ल. ‘ग़ज़ल’ हा शब्द आपण उर्दूतून उचलला. तिथं तो स्त्रीलिंगी होता. त्यामुळे मराठीत आपण ‘तो ग़ज़ल’ म्हणायचं नाही, तर ‘ती ग़ज़ल’च म्हणायचं. जिच्यामध्ये काफिया सांभाळला गेलेला नाही ती रचना ग़ज़ल नव्हे. या निकषावर मी अमृतराय, मोरोपंत, माधव ज्यूलियन (संग्रह - गज्जलांजलि), विंदा करंदीकर (संग्रह - जातक), आरती प्रभू (संग्रह – नक्षत्रांचे देणे), मंगेश पाडगावकर (संग्रह - गझल) यांची ग़ज़ल बाद ठरवतो. ज्या कवींना गैरमुसलसील ग़ज़ल कळाली नाही, त्यांना ग़ज़ल कळाली नाही. माधव ज्यूलियन, विंदा करंदीकर, आरती प्रभू, मंगेश पाडगावकर प्रभृतींनी मुसलसील किंवा विशुद्ध भावकविताच लिहिल्या. ‘वाटेवर काटे वेचीत चाललो’ ही अनिलांची द्विपदीयुक्त रचना ग़ज़ल नव्हे. आणखी एक, ग़ज़लसदृश्य कविता असा काही प्रकार नसतो. एखादी कविता ग़ज़ल असते किंवा नसते. बस!

पु.ल.देशपांडे यांना ग़ज़लची व्याख्या करता आली होती, पण मराठी ग़ज़लला समीक्षक न लाभल्यामुळे ही सुंदर व्याख्या कुणी समजून देऊ शकलं नाही. आज मी प्रयत्न करतोय. ‘ग़ज़ल हे वृत्त नसून वृत्ती आहे आणि तिच्यात एक सुंदर निवृत्ती आहे’ ही ती व्याख्या.

मराठी ग़ज़लकारांना ग़ज़लेच्या वर किंवा खाली अक्षरगण वृत्ताचं किंवा मात्रावृत्ताचं नाव आणि लगक्रम देण्याचा शिष्टपणा करता आला की, आपली ग़ज़ल सिद्ध झाली असं वाटतं. काल इथं फिरणाऱ्या एका पोलिसाच्या ग़ज़लसंग्रहात शीर्षकंच वृत्तनामांची दिलेली मी पाहिली. हा काय प्रकार आहे? ग़ज़ल ही केवळ वृत्त नाही हे लक्षात ठेवा.

वृत्ती म्हणजे कवीची संवेदनशीलता किंवा संवेदनस्वभाव. या संवेदनस्वभावाला सुफीझमचा स्पर्श पाहिजे. सूफीझमचा स्पर्श असणं म्हणजे पुलं म्हणतात तशी ग़ज़लकाराजवळ आवश्यक तशी वृत्ती-निवृत्ती असणं. कट्टर धार्मिक माणूस, कट्टर हिंदुत्ववादी माणूस ग़ज़ल लिहून शकत नाही आणि लिहिलीच तर त्याची ग़ज़ल विश्वात्मक होऊ शकत नाही. ग़ज़लचं तत्त्वज्ञान पुढील ओळीत आलं आहे –

इश्क आजाद है, हिंदू ना मुसलमान है इश्क

आपही धर्म और आपही इमान है इश्क

जिससे आगाह नही, शेख-ओ-बिरहमन दोनों

उस हकीकत का गरजता हुआ ऐलान है इश्क

हा तो सूफीझम आहे. ग़ज़लचा जाहीरनामा. मला जातीयवाद, धर्मवाद मांडायचा नाही, पण हिंदू असूनही जो फ़िराक ग़ोरखपुरी, सुरेश भट असतो तो महान ग़ज़लकार असतो. ख्रिश्चन असूनही जो मराठीचा श्रेष्ठ कवी असतो तो रमण रणदिवे महान ग़ज़लकार असतो, जैन असूनही जो मराठीचा श्रेष्ठ कवी असतो तो प्रदीप निफाडकर महान ग़ज़लकार असतो. डॉ. अजीज नदाफ, इलाही जमादार, डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांचा तर प्रश्नच नाही. त्यांना मराठीत ग़ज़ल लिहावीशी वाटते, हे मराठीचं भाग्य! सुरेश भटांनी सूफीझम पुरता आत्मसात केला होता. त्यांना बौद्ध धर्म का स्वीकारावा वाटला, येशू ख्रिस्तावर ग़ज़ल का लिहावी वाटली, याचा जरा अर्थ समजून घ्या. सुरेश भट, प्रदीप निफाडकर, रमण रणदिवे यांच्या मराठी ग़ज़लेत विश्वात्मकता येते याचं महत्त्वाचं कारण ते धर्मांध नाहीत. ज्यांच्या संवेदनस्वभावाला सूफीझमचा स्पर्श झालेला आहे, त्यांचीच ग़ज़ल फक्त विश्वात्मक होण्याची शक्यता असते.

फ़िराक ग़ोरखपुरी, सुरेश भट आणि इलाही जमादार

ग़ज़ल विश्वात्मक होण्यासाठी ती मूलत: आणि श्रेष्ठ दर्जाची कविता असणं आवश्यक आहे. अशी कविता सुचायला कवी प्रतिभावंत असावा लागतो. कविता म्हणजे काय हे त्याला नीटपणे माहीत असावं लागतं. कवितेचं इतर वाङ्मयप्रकारापेक्षा वेगळेपण आणि मर्म कशात असतं, हे त्याला कळावं लागतं. मी सांगू? सांगतो. इतर गद्य वाङ्मयप्रकारामध्ये अनुभवाचं विश्लेषण असतं, तर कवितेमध्ये अनुभवाचं संश्लेषण असतं. कवितेत प्रतिमांचं सेंद्रिय संघटन होत असतं. त्यामुळे कविता ओतीव, घट्ट विणीची आणि व्यामिश्र होत असते. वाचल्याबरोबर जी चटकन कळते अशी, झटितीप्रत्यय देणारी रचना कविता असू शकत नाहीत. तिच्यात जिवंत अर्थनृत्य चालू असतं. कवितेला अनेक स्तर, पदर असतात.

संश्लेषण प्रक्रियेमुळे कवितेत दोन गुणधर्म अवतीर्ण होतात. अनेकार्थ समावेशनक्षमता आणि अनेकार्थ सूचनक्षमता. या दोन गुणांनी युक्त कविताच विश्वात्मक होऊ शकते. माझं विवेचन जड होतंय का? उदाहरणांनी ते समजून घेऊ.

इतुकेच मला जाताना सरणावर कळले होते

मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

केवढी व्यामिश्रता, चिंतन आणि विश्वात्मकता आहे या कवितेत! ही कविता सुरेश भटांनी आधी लिहिली आणि कितीतरी वर्षांनी अरुणा शानभाग या परिचारिकेचा मृत्यू झाला. पाशवी बलात्कारानंतर अनेक वर्षं कोमात गेलेल्या अरुणाच्या मृत्यूची बातमी देताना पत्रकारांना सुरेश भटांच्या याच ओळी आठवल्या. खरंच अरुणाला जगण्यानेच छळलं होतं आणि या छळातून मरणानं शेवटी तिची सुटका केली. याला म्हणायचं अनेक संदर्भसूकत्व. तिचं दु:ख पाहिल्यानंतर कोणालाही वाटेल,

पाहिले दु:ख मी तुझे जेव्हा

दु:ख माझे लहानसे झाले

या ओळी ओठांवर येणं ही सुरेश भटांच्या ग़ज़लेतील विश्वात्मकता. आता त्यांच्या कवितेतील अनेकार्थ समावेशनक्षमता पाहा-

राग नाही तुझ्या नकाराचा

चीड आली तुझ्या बहाण्याची

नरेंद्र मोदी, आमच्या खात्यातले आमचेच पैसे उचलण्यास तुम्ही नकार दिलात, त्याचा देशाला राग नाही, पण त्यासाठी तुम्ही काळा पैसा बाहेर काढण्याचा जो बहाणा सांगितलात त्याची पन्नास दिवसांनी चीड आली. याला म्हणायचं सुरेश भटांच्या ग़ज़लेतील अनेकार्थ समावेशनक्षमता.

निफाडकरांची प्रेमकविता असलेली ग़ज़ल - ‘तू तिथे मी इथे’. एका देवलशा बाईने त्यांना हटकलं तेव्हा ते म्हणाले, ‘अहो, ही देवावरची ग़ज़ल आहे’. ‘करूनही काय मी करू? तू तिथे मी इथे.’ ही ओळ पुन्हा म्हणताना ‘तू’च्या वेळी त्यांनी आकाशाकडे हात केले आणि ‘मी’च्या वेळी जमिनीकडे. बाईंना पटलं, आवडलंही. त्यांनी अर्थ काढला की, आपण माणसं काय करू शकतो? आपण पडलो इथं पृथ्वीवर आणि कर्ताकरविता देव म्हणजे तू राहिलास आकाशात! ही अनेकार्थ समावेशक्षमता.

रमण रणदिवे, प्रदीप निफाडकर आणि डॉ. शेख इक्बाल मिन्ने

संगीता जोशींची ‘आयुष्य तेच आहे’ ही ग़ज़ल गाताना घरही सुनेच आहे या ओळीच्या वेळेस भीमराव ‘च’वर अनुस्वार देऊन तीच ओळ पुन्हा वेगळी गातात आणि त्याला सासू-सुनेच्या नात्याचा अर्थ प्राप्त होतो. म्हातारपणी आपलं घरही आपलं राहत नाही. कारण त्याचा ताबा आपल्या सुनेनं घेतलेला असतो! आहे की नाही गंमत.

ग़ज़लेत विश्वात्मकता येण्याच्या वेळी श्रेष्ठ कवीमध्ये आणखी एक गुण कार्यान्वित होतो. तो म्हणजे प्रॉफेटिक क्वालिटी. पुढच्या शंभर-पन्नास वर्षानंतर काय होणार आहे, हे ज्या गुणामुळे कवीला कळत-दिसतं तो हा गुण आहे. केशवसुतांनी ‘उठा उठा बांधा कमरा, मारा किंवा लढत मरा’, असा नारा अठराव्या शतकात दिला आणि एकोणिसाव्या शतकात म. गांधी कडाडले, ‘करो या मरो’. याला म्हणायचं प्रॉफेटिक क्वालिटी. मराठी ग़ज़लकारांमध्ये सुरेश भटांमध्ये हा गुण होता.

जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा

विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही

सुरेश भटांची ग़ज़ल कधीही भूतकाळात जमा होत नाही. ती सदैव जिवंत आणि समकालीनच असते, म्हणून तिच्यात विश्वात्मकता येते.

मराठी ग़ज़लच्या विश्वात्मकतेची चर्चा करताना मला जास्त अवतरणं सुरेश भटांची द्यावी लागली, हे माझं नाही, मराठी ग़ज़लचं दुर्दैव आहे. मराठीत अजूनही सुरेश भटांना ओलांडून, मागे सारून, त्यांच्याही पुढे जाणारा ग़ज़लकार झाला नाही. समीक्षकांनी मराठी ग़ज़लकडे पाठ फिरवली. असं का व्हावं याचा तुम्ही विचार करणार का नाही? क्षमा करा, पण मराठी ग़ज़लची जरा जास्तच ‘चळवळ’ झाली आहे, हे त्याचं कारण आहे. निकृष्ट ग़ज़लांचं उदंड पीक आल्यामुळेच समीक्षकांनी मराठी ग़ज़लकडे पाठ फिरवली.

बहुप्रसवता ही नेहमी गुणवत्तेला मारक ठरते. फेसबुकवरचे ग़ज़लकार माझ्या घृणेचा विषय आहेत. एक कवी वर्षाला अडीच हजार ग़ज़ल पाडल्याचं अभिमानानं सांगतो आणि त्याला दहा हजार लाईक्स मिळतात. काय चेष्टा आहे ही? लक्षात ठेवा, सगळ्यात श्रेष्ठ प्राणी माणूस. त्याला वर्षात एकच लेकरू होतं. त्यानंतर सिंह. त्याला बारा वर्षांनी एखाद-दोन छावे होतात. आणि बहुप्रसवा डुक्कर? किती विपुल आणि किळसवाणी असते ती निपज? मराठी ग़ज़लमध्येही वाघ, सिंह आहेत, नाही असं नाही. प्रदीप निफाडकर किती कमी लिहितात, पण जे लिहितात ते कसलं भारी असतं! रमण रणदिवे याच निकषावर मला श्रेष्ठ वाटतात! वाघ, सिंह आहेत ते! आणि बहुप्रसवा डुक्करं, त्यांची नावं मी घेत नाही, माझ्यापेक्षा तुम्हाला ती जास्त माहीत आहेत.

मराठी ग़ज़ल विश्वात्मक होण्यातल्या अडचणीतला शेवटचा मुद्दा सांगून मी थांबतो. निरनिराळ्या वृत्तांमध्ये ग़ज़ल लिहून पाहण्याची हौस आणि स्पर्धा. प्रत्येक वृत्तात मला ग़ज़ल लिहिता आलीच पाहिजे, येत नाही म्हणजे काय, म्या कवी हाय कौने? मला एका फ.मुं.शिंदे म्हणाले होते, ‘बेवड्यांना काही महत्त्वाकांक्षाच नसते असं समजू नका. एखादं मोठं गटार पाहिलं की, त्याला वाटतं, अरे गड्या, या गटारात आपलं पिऊन पडायचं राहिलंच.’ निरनिराळ्या आणि प्रत्येक वृत्तात लिहून पाहण्याचा अट्टाहास त्या बेवड्याच्या महत्त्वाकांक्षेसारखाच आहे. असो. फार बोललो. कारण कचरा फार झाला. कोण साफ करणार? माझी मराठी ग़ज़लकारांना एक कळकळीची नम्र विनंती आहे, ती डॉ. संतोष कुळकर्णींच्या शब्दांत सुचवतो आणि थांबतो –

बळे ती कशाला लिहावी ग़ज़ल?

…मनातून यावी सुचावी ग़ज़ल

 

लेखक मराठवाड्यातील पण आता पुण्यात स्थायिक झालेले प्रसिद्ध कवी आहेत.

editor@aksharnama.com

Post Comment

S Tankhiwale

Tue , 11 July 2017

kon ha Wasekar? hyachi layaki kay ghazalevar lihayachi...asalya murkha, uthala aani arthatach davya makadana ka khandyavar chadhavun ghetaya?


satish waghmare

Sat , 21 January 2017

प्रा . वसेकारांचा अभ्यासपूर्ण उत्तम लेख . दोन दोन ओळींच्या गजल टाकणाऱ्या तमाम फेस्बुकी (काही मोजकेच सन्माननीय अपवाद वगळून ) गजल्या शायरांना सनसनीत चपराक .


Umesh Murumkar

Thu , 19 January 2017

जिच्यामध्ये काफिया सांभाळला गेलेला नाही ती रचना ग़ज़ल नव्हे. या निकषावर मी अमृतराय, मोरोपंत, माधव ज्यूलियन (संग्रह - गज्जलांजलि), विंदा करंदीकर (संग्रह - जातक), आरती प्रभू (संग्रह – नक्षत्रांचे देणे), मंगेश पाडगावकर (संग्रह - गझल) यांची ग़ज़ल बाद ठरवतो. ज्या कवींना गैरमुसलसील ग़ज़ल कळाली नाही, त्यांना ग़ज़ल कळाली नाही. माधव ज्यूलियन, विंदा करंदीकर, आरती प्रभू, मंगेश पाडगावकर प्रभृतींनी मुसलसील किंवा विशुद्ध भावकविताच लिहिल्या. ‘वाटेवर काटे वेचीत चाललो’ ही अनिलांची द्विपदीयुक्त रचना ग़ज़ल नव्हे. आणखी एक, ग़ज़लसदृश्य कविता असा काही प्रकार नसतो.. ( तुमहाला तर साहित्यामध्ये नोबल द्यावा अशी माझी इच्छा आहे. म्हणजे दोनचार ओळीत ज्यांची साहित्यसंपदा कित्येक वर्षे बायबल सारखी वापरली जाते त्याना किंवा त्यांच्या रचनाना बाद करने म्हणजे पराक्रमच म्हणावा.) साधा सरळ प्रश्न कोण आहात तुम्ही?


Vaibhav Kulkarni

Wed , 18 January 2017

ह्या लेखावरून वसेकरांवर अनेकांनी तोंडसुख घेऊन झाले आहे प्रत्येकाचा अभिरूचीचा परिघ असतो त्या परिघाबाहेरचं पाहणं त्याला जमेलच असं नाही वसेकरांचा परिघ फारच तोकडा आहे हे या लेखावरून दिसतं बाकी काही नाही थोडक्यात लेख नाही वाचला तरी चालेल असा आहे


Befikeer Befikeer

Wed , 18 January 2017

नमस्कार! प्रा. विश्वास वसेकर ह्यांचा एक लेख वाचनांत आला. तो लेख त्यांनी गझल ह्या विषयावर लिहिला आहे म्हणून त्यात मनापासून स्वारस्य घेतलं! गझल ह्या विषयावर विपुल लेखन होत आहे आणि विविध स्तरांतून होत आहे व प्रा. वसेकर ह्यांनीही ह्या विषयाला हात घातला ह्याबद्दल प्रथम त्यांचे अभिनंदन आणि आभार! प्रा. वसेकरांचा गझलेचा अभ्यास त्यांच्या लेखातून जाणवला. खरे तर 'अभ्यास नाही' हे जाणवले. ह्या विधानाबद्दल मी त्यांची क्षमा मागतो. प्रा. वसेकरांनी गझलेची आजची अवस्था कथन करताना समीक्षक, पु ल देशपांडे, सूफीझम, वृत्त-वृत्ती हा चावून चोथा झालेला टुकार मुद्दा, नरेंद्र मोदी, फेसबूक, सिंह, वाघ, डुक्कर, गटार अशी अनेक वळणे घेतलेली आहेत. लेखाच्या सुरुवातीला 'मी सांगतो गझल म्हणजे काय' हा घेतलेला आव लेखाच्या शेवटी तोल ढळण्यात रुपांतरीत झालेला आहे. स्व. सुरेश भटांच्या आधीच्या कवींपैकी कोणालाही गेली कैक वर्षे मी आणि कोणीच शुद्ध गझलकार मानत नाही. ते लोक गझलकार नव्हते हे अजून किती वर्षे सांगणार? तसेच, प्रा. वसेकरांनी भाऊसाहेब पाटणकरांचे नांव का नाही घेतले? तेही एक सुमार शायरी करणारे गृहस्थ होते. त्यांची शायरी ह्या मातीत गाजते ह्यावरून आपण लोकांनी ओळखून घ्यावे की आपली अभिरुची काय आहे ते! आपली अभिरुची वाढवण्यासाठी कोणाची गझल वाचायला हवी हेही माहीत आहे असे दिसत नाही प्रा. वसेकरांना! मराठीत गझल फक्त भटसाहेबांमुलेच आलेली आहे. भटसाहेबांनी त्यांच्या अद्वितीय प्रतिभेने गझलेला अश्या उंचीवर नेलेले आहे जेथे पोचण्याचे कोणी ध्येयही ठेवू शकत नाही. पण लोकहो, मराठी गझलचा आरंभ जरी भटसाहेब असले तरी पुढचा प्रवास आणि मुक्कामस्थान हे भटसाहेब राहिलेले नाहीत. मराठी गझलेने कित्येक अशी वळणे घेतलेली आहेत जी दोन तीन दशकांपूर्वी स्वतःला महान गझलकार मानून गझल लेखन थांबवणार्‍या स्वयंघोषित गालिबांना माहीतही झालेली नाहीत. त्यांच्या त्याच त्या रटाळ गझला आजकाल कोणाच्या खिजगणतीतही नाहीत हे ह्या प्राध्यापकांना कोणी सांगावे? भटसाहेबांची गझल ही अत्युच्च पण बेसिक गझल आहे. तो एक पायथा आहे ज्यावर सगळ्यांच्या गझलांचे डोलारे उभे आहेत. पण भटसाहेबांच्या गझलेपेक्षा कितीतरी वेगळी गझल आज होत आहे. आजकालच्या मुशायर्‍यांमध्ये गाजणार्‍या आणि फेसबूकवर गर्दी करणार्‍या गझला प्राध्यापकांच्या मते टीकेस पात्र आहेत, पण त्या गझलांमधील प्रतीके, आशय, विषय, समकालीनता, साधेपणा (उगाच मोठमोठे शब्द न वापरणे) ह्या गोष्टी प्राध्यापकांनी पाहिलेल्या आहेत का? भटसाहेबांनी स्वतःची कारकीर्द जाळून पेटवलेली ज्योत आज काही विझलेली नाही. ती वेगवेगळ्या रस्त्यांवरून वेगवेगळ्या हातांमधून जातच आहे धावत! भटसाहेबांबद्दल मनात जे आदराचे स्थान आहे ते राहूद्यात, भटांची भीती घालू नका, आम्ही त्यांच्या गझलेवर भक्ती करतो, गुलामी नव्हे. भटांच्या शिष्योत्तमांची नांवे प्राध्यापकांनी ओळीगणिक पेरलेली आहेत. हे प्राध्यापक गेल्या दहा वर्षांत एखाद्या मुधायर्‍याला गेले आहेत की नाही हा प्रश्न पडतो. अण्णासाहेब वैराळकरांचे वर्षातून दोन डझन मुशायरे असतात. त्यातला एखादा पाहिला तरी प्राध्यापक लेख मागे घेतील. मी गेली दहा वर्षे जी उदाहरणे शिश्योत्तमांकडून ऐकलेली आहेत तीच लेखात पेरून प्राध्यापक वसेकरांनी गझलक्षेत्राला काय योगदान दिले हे काही समजत नाही. त्यांनी नांवे घेतली म्हणून मी निराळी नांवे घेणार नाही. कवीवर्य निफाडकर, रणदिवेजी, इलाही साहेब हे सगळे आदरणीयच आहेत. फक्त, ते गझलेतील 'अंतिम शब्द' नाहीत. कोणी असा आवही आणु नये. तसेच, मिळालेल्या स्थानाचा वापर करून नव्या कवींची दिशाभूल तर अजिबातच करू नये. एकसे एक सकस गझला येत आहेत. कधीही न ऐकलेले खयाल येत आहेत. बशर नवाझसाहेबांसारख्या दिग्गजाने मराठीतील नवी गझल गौरवलेली आहे. तुम्हाला विचारतो कोण की मराठीतील महान गझलकार कोण आहे म्हणून? प्राध्यापक साहेबांनी गझलेची व्याख्या केलेली दिसते. जे गालिब, मीर, भटसाहेब ह्यांनी केले नाही ते प्राध्यापकांनी करून टाकले. वृत्त नव्हे वृत्ती ही सपाट व्याख्या त्यागून त्यांनी वृत्ती व निवृत्ती असा एक अँगल दिला आहे. त्याच्या समर्थनार्थ सूफीझम हा एक शब्द पेरलेला आहे. गालिबच्या काव्यात अध्यात्मिकता किती टक्के होती ह्याचा प्राध्यापकांनी काही आढावा घेतला आहे का? तंत्राची व्याख्या सगळ्यांनी केली, मंत्राची कोणा दिग्गजाने केली? जिच्या आधयविषयक वृत्तीची व्याख्या करताच येत नाही ती गझल हे आम्ही सगळ्यांनी खूप आधी मान्य केले आहे. ह्यापलीकडे गझलेची व्याख्या असू शकत नाही. गझलेच्या व्याख्येच्या समर्थनार्थ किंवा इतर कारणांनी दिलेली उदाहरणे आज सामान्य मानली जात आहेत हे ह्यांना कोण सांगणार? गझलचे दुर्दैव की तिच्याबद्दल आजकाल कोणीही बोलते. गझल म्हणजे चारित्र्यहीन स्त्री नव्हे की येणार्‍या-जाणार्‍याने ताशेरे झोडावेत. एवढे सगळे लिहून झाल्यानंतर एक नम्र प्रश्न! प्राध्यापकांनी त्यांच्या शेरांची उदाहरणे का दिली नाहीत? 'आज मी सांगतो तुम्हाला गझलची व्याख्या' हा पवित्रा घेण्यामागे त्यांच्या काही गझला कारणीभूत असतीलच ना? त्या कोणत्या आणि कुठे वाचता येतील? -'बेफिकीर'!


Devendra Gadekar

Wed , 18 January 2017

गझल बद्दल बोललात ते योग्य केले राव तुम्ही , किमान आतातरी तुम्हाला लोक ओळखतील ,नायतर आम्हा लोकांना फक्त गुणवत्ता असलेले साहित्यिकच लक्षात आहेत /माहित आहेत ...आपण साहित्यिक आहात हे वाचून फार हसलो ,या आधी एकदा राखी सावंत यांचा इंटरव्यू पाहताना हसलो होतो ,त्या बद्दल आपले आभार ... गझल चि व्याख्या आपण जी सांगितलीत ति अशी काय वेगळी सांगितलीत देव जाणे ,तुम्हाला गझल चि व्याख्या सांगतो आता ,तुमच्या घृणेचा विषय असलेल्या फेस्बुक्वरच्याच एका आदरणीय व्यक्तीने केलेली व्याख्या ,बेफिकीर जी ( हि व्याख्या त्यांनी त्यांच्या पुरती केलेली आहे हे ही ते सांगायला विसरत नाहीत ,तुमच्यासारखे गझलेचा बाप असल्याचा दावा न करता ) तर ति व्याख्या अशी आहे , " आईने बाळाला सांभाळणे म्हणजे कविता आणि बापाने बाळाला आईसारखे सांभाळणे म्हणजे गझल " कळले का नायतर बसलात जोड्या लावत तुम्ही वृत्ती निवृत्ती ,फेसबुक्वरचे गझलकार अश्या नाजूक आणि हृदयाला भिडणार्या व्याखेतून गझल लिहायला समजायला लागले आहेत .... बर ते डुक्कर बिक्कर उदाहरण तुम्हाला ही लागू होते की बसलात दिवसाला साहित्यातल्या प्रकारांच्या व्याख्या पाडत .... बर आजकाल गझले बद्दल तुमच्यासारखी पिकलेली माणसे का बोलत आहेत याचा जेंव्हा मी विचार करतो तेंव्हा माझ्या लक्षात आले १. तुम्हाले गझल हा प्रकार कधी हाताळताच आला नाही ,म्हणून कायतरी सकाळी TOILET मध्ये बसल्या बसल्या प्लान करायचा अन असे बोलायचे २. २० २१ वर्षाशी पोर/पोरी आज त्यांच्या गुणवत्ते च्या जोरावर ,संख्यात्मक लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण करत आहेत ,हे पाहून आपल्याले साला कोणच ओळखत नाही अशी बुडाखाली जळजळ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही .. ३. गझल बद्दल बोललो तर प्रसिद्धी मिळू शकते / गुणवत्तेवर प्रसिद्धी आजवर मिळाली नाही म्हणून असे काही करून तरी प्रसिद्धी मिळते का हे बघावे म्हणून ही असू शकते ... असो , Aआतवर पप्पू ,केजरीवाल ,राखी सावंत ,यांचे भाषण किंवा इंटरव्यू ऐकायचो बोर होत असले कि ,कारण लय हसायला येते यांना ऐकले की ,आता डॉ.अक्षय कुमार काळे अन तुम्ही जॉईन झालात यांना , त्या बद्दल आपला आभारी आहे .. तसे नि:शब्द(देव) या नावाने मला फेसबुक वर शिव्या मारल्या जातात , इतकेच सांगायचे होते बस बाकी काही नही


Vishal Kulkarni

Wed , 18 January 2017

'फेसबुकवरचे गज़लकार' असा सरसकट उल्लेख करताना तुम्ही किती मोठ्ठा गुन्हा करताय याचा विचार केला आहे का? आहे, इथे स्वतःला गज़लकार समजणाऱ्यांची संख्या नक्कीच मोठी आहे. पण त्याहीपेक्षा मोठी संख्या अश्या लोकांची आहे, ज्यांच्या रक्तात गज़ल भिनलीय. जुन्या जाणत्या दिग्गजांवर इतके छान लिहीलेत, पण शेवटी जी गरळ ओकलीत त्यामुळे मुळात तुम्हालाच ग़ज़ल कळते का? कितपत कळते? याबद्दल शंका निर्माण झालीय. पुरेसे गृहपाठ न करता इकडचे तिकडचे बघून पेपर लिहिणाऱ्या एखाद्या कॉपीबाज विद्यार्थ्याची कळा आलीय या लेखाला. लिहिण्यापूर्वी एकदा इथल्या काही मोजक्या गजलकारांच्या उदा. सतीश दराडे, सुधीर मुळीक, सदानंद बेंद्रे , भूषण कटककर(यादी खुप मोठी आहे, पण एवढे पुरेसे ठरावेत) ग़ज़ला वाचल्या असत्या तरी हा लेख जास्त वास्तववादी झाला असता. सध्या इतकेच की Get well soon !


kailas gandhi

Wed , 18 January 2017

महाराष्ट्रात किती चांगले गझलकार आहेत याची माहितीच नसलेल्या माणसाने चार दोन गझलकार निवडून केलेले हे फालतू, दर्जाहीन अन उथळ लेखन आहे. या माणसाचा गझलचा व्यासंग किती मर्यादित आहे हे त्याच्या लेखनातून कळतेच. पण जो आव आणला आहे व्यासंगाचा तो खरेतर अक्षरनामा वाल्यांनी तपासून घ्यायला हवा. अश्या लेखनाने अक्षरनामाची विश्वासार्हता शंकास्पद ठरेल. नुकतंच पुणे विद्यापीठात मराठी ग़ज़ल या काव्यप्रकाराविषयी आंतरराष्ट्रीय चर्चासत्र झालं. त्यात सादर करण्यात आलेला हा चिंतनशील निबंध...मराठी ग़ज़ल परंपरेची रोखठोक चिकित्सा करणारा... हा संदर्भ दिला म्हणजे विश्वासार्हता होत नाही. असे अनेक निबंध अशा चर्चा सत्रात सादर होतात. त्यातील काही सुमार दर्जाचेही असतात. हा कोणत्या प्रकारातला हे सुज्ञास सांगणे न लागे. सुरेश भटांचा मुलगा चित्तरंजन भट, चंद्रशेखर सानेकर, वैभव देशमुख... अशी अनेक सकस गझल लिहिणारया मंडळींची यादी देता येयील पण या महान लेखकाचा व्यासंगच खुजा आहे.


Ashok Kulkarni

Wed , 18 January 2017

सदर इसमाचा आधुनिक मराठी गझलेचा सबंध आला नसावा, किंवा वैर असावे असे वाटते


Ranjeet Paradkar

Wed , 18 January 2017

अतिशय उथळ लेखन. 'गझल'बाबत गरळ ओकण्याची फॅशन आलेली आहे काय सध्या ? कुणीही उठतं आणि ओकून जातंय. आवरा !


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......