टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • सर्वोच्च न्यायालय, दै. सामना, बिपीन रावत, एटीएमसमोरील रांगा आणि राजू शेट्टी
  • Wed , 04 January 2017
  • विनोदनामा टपल्या नोटाबंदी Demonetization सर्वोच्च न्यायालय Supreme Court राजू शेट्टी Raju Shetty बिपीन रावत Bipin Rawat सामना Samna

१. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या घोषणा म्हणजे जुना ढोकळा गरम करून वाढण्याचा प्रकार आहे. असे शिळे खाणे हे आरोग्यासाठी घातकच असते : 'सामना'च्या अग्रलेखातली टीका

'अन्नछत्रात जेवणाऱ्याने मिरपूड मागायची नसते' ही म्हण शिवसेनेला ठाऊक नाही का? तुम्ही चटणी-भाकरी-झुणक्याच्या गप्पा मारता मारता थेपले, दालबाटी आणि लिट्टीचोखाही चाखू लागला आहात, तिथे शिळ्या-ताज्याची पर्वा करता की काय? आता भस्म्या झाल्यासारखे कायमस्वरूपी 'आ' वासून बसलाच आहात, तर शिळा ढोकळाही गोड मानावाच लागेल.

……………………………………

२. नोटाबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितलेली ५० दिवसांची मुदत उलटून गेल्यानंतरही देशभरातील बहुतांश एटीएममध्ये पुरेसे पैसे नसल्याने चलनकल्लोळ कायम आहे. त्यातच कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देणाऱ्या सरकारने एटीएम आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर शुल्क आकारायला सुरुवात करून लोकांच्या मनस्तापात भर टाकली आहे.

अहो, दोन हजार वर्षांनी कदाचित या निर्णयाची गोड फळं आपल्या पुढच्या पिढ्या चाखतील. त्यांच्याकडे पाहून आज हा त्रास सहन करायला काय हरकत आहे? सरकारने सगळीकडे पोलिओच्या डोसप्रमाणे देशभक्तीच्या लशीचे डोस मोफत पाजायला सुरुवात केल्याशिवाय ही कुरकूर थांबणार नाही देशद्रोह्यांची.

……………………………………

३. नोटाबंदीच्या निर्णयाची सर्वाधिक झळ ही शेतकऱ्यांना नव्हे, तर प्रसारमाध्यमांनाच बसली आहे. कारण सगळी प्रसारमाध्यमे ही काळ्या पैशावर चालतात : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी

बाटग्याची बांग मोठी म्हणतात ते उगाच नाही. हे राजापेक्षा राजनिष्ठ. शेतकऱ्यांचे नेते म्हणवणाऱ्या शेट्टींनी आता संघटनेच्या नावातला 'स्वाभिमानी' हा शब्द काढून टाकावा, नावही सुटसुटीत होईल आणि शोभूनही दिसेल. कोणाच्याही मालकीच्या नसलेल्या सोशल मीडियाचाही जरा कानोसा घ्या राजूभाऊ, अर्थात कानांचा आकारही कमलदलांसारखा झाला असेल, तर तो ऐकू येणं कठीणच आहे म्हणा!

……………………………………

४. निवडणूक ही धर्मनिरपेक्ष प्रक्रिया असते आणि त्याचे पालन केलेच पाहिजे. नेत्यांना धर्म, जात किंवा भाषेच्या आधारावर मत मागता येणार नाही. : सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या घटनापीठाचा चार विरुद्ध तीन अशा बहुमताचा निकाल

अरे देवा, आता मतं मागायची कशाच्या आधारावर? कोणताही पक्ष यापेक्षा वेगळ्या आधारावर मतं मागण्याजोगं करतो तरी काय? मतं मागणाऱ्यांचं सोडा; मतदान करणारे तरी काय पाहून मत देतात? मतदारांनी या आधारांवर मतदान करता कामा नये, अशी काही तजवीज करता येणं अशक्यच आहे. मग हा निकाल व्यर्थच आहे.

……………………………………

५. भारत एकाच वेळी पाकिस्तान आणि चीन अशा दोन्ही आघाड्यांवर युद्ध करण्यास सक्षम आहे. संबंधित राजकीय नेतृत्त्वाकडून देण्यात आलेली कामगिरी कोणत्याही परिस्थितीत पार पाडण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. : नवे लष्करप्रमुख बिपीन रावत

अरे वा, छप्पन्न इंची क्लबमध्ये नवी भर पडली वाटतं? अन्यांची सेवाज्येष्ठता डावलून यांची निवड का झाली, हे इतक्या लवकर समजून येईल असं वाटलं नव्हतं. आता पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुख या तिघांमध्ये शड्डू ठोकण्याची स्पर्धा लागेल. यांच्या तोंडाळ खुमखुमीपायी २०१५च्या तुलनेत २०१६मध्ये जवळपास दुप्पट सैनिकांना सीमेवर हौतात्म्य पत्करावं लागलं, याची देशभक्तांना काय पर्वा म्हणा! त्यांना कुठे सीमेवर जाऊन लढायचंय?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......