सआदत हसन ‘मंटो’ फिरसे हाजीर हो…
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अभिजित देशपांडे
  • ‘मंटो’ या चित्रपटाचं पोस्टर
  • Sat , 22 September 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie मंटो Manto नंदिता दास Nandita Das Nawazuddin Siddiqui नवाजुद्दीन सिद्दिकी

प्रख्यात चित्रकार जतीन दास यांची कन्या असलेल्या नंदिता दास ह्यांनी मुळात दिल्ली विद्यापीठातून समाजसेवेचा अभ्यासक्रम पूर्ण करून आणि पुढे चित्रपटाच्या क्षेत्रांत राहूनही सामाजिक चळवळींशी आपलं नातं आजही सक्रियपणे कायम राखलं आहे. त्यांनी आजवर सुमारे ४० चित्रपटांतून काम केलं आहे. ‘फिराक’सारखा गुजरात दंगलीविषयीचा चित्रपट करून दिग्दर्शनातदेखील पदार्पण केलं. नुकताच नंदिता यांनी दिग्दर्शित केलेला ‘मंटो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सआदत हसन मंटो या बंडखोर उर्दू लेखकाच्या जीवनावर आधारित आणि नवाजुद्दीन सिद्दिकी अभिनित हा चित्रपट आजच्या काळात प्रदर्शित होणं, अनेक अर्थांनी महत्त्वाचं आहे.

कादंबरी, आकाशवाणीसाठी श्रुतिका, व्यक्तिचित्रं, निबंध आणि त्यापेक्षाही कैकपटींनी विपुल लघुकथा लिहिणारे सआदत हसन मंटो हे विसाव्या शतकातील एक सर्वश्रेष्ठ बंडखोर उर्दू लेखक. समाजातील कटू वास्तवावर तितक्याच प्रखरपणे भाष्य करणाऱ्या कथांनी त्यांनी समाजाचा चांगलाच रोष ओढवून घेतला. त्यासाठी स्वातंत्र्यपूर्व भारतात तीन वेळा तर फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये तीन वेळा त्यांच्या लेखनावर अश्लीलतेसाठी खटलेही भरले गेले. एकाही खटल्यात ते दोषी ठरले नाहीत. पण या सर्व मनस्तापातून मात्र ते पार खंगले. आणि लाहोरमध्ये १९५५ साली वयाच्या अवघ्या बेचाळिसाव्या वर्षी या उमद्या लेखकाचं निधन झालं.

अशा या लेखकाची जन्मशताब्दी २०१२ मध्ये झाली. तेव्हा नंदिता दास यांनी मंटो काळजीपूर्वक वाचला आणि मग मंटोनं जणू त्यांना झपाटूनच टाकलं. त्यासाठी त्यांनी प्रचंड वाचन करून आवश्यक त्या नोंदी तर केल्याच, पण त्यांच्या कुटुंबियांना भेटून आणखीही दुर्मीळ माहिती जमवली. त्यातूनच ‘मंटो’ची पटकथा आकाराला आली. ‘मंटो’ हा चरित्रपट असला तरी यात मंटो यांचं समग्र जीवन नाही. स्वातंत्र्य व फाळणीच्या आगेमागे चार-सहा वर्षं एवढाच काय तो मर्यादित कालपट या चित्रपटात आहे. हाच मंटोच्या आयुष्यातील विलक्षण वादळी कालखंड. भारत-पाकिस्तान फाळणी, हिंदू-मुस्लिम दंगली या गोष्टींनी मंटो व्यथित झाला होता. माणुसकी पणाला लागणाऱ्या कितीतरी घटना आसपास घडत होत्या. मुंबईपासून ते लाहोरपर्यंत.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

भोवतालाबद्दलची तीव्र उद्विग्नता त्याच्या शब्दांशब्दांतून, कथांतून धारदारपणे बाहेर येत होती.   दंगलींचं समर्थन करणाऱ्यांना मंटोचे  तीव्र शब्द मात्र झोंबत होते. अश्लील वाटत होते. हिंसेइतकं अश्लील काहीही नसतं, मंटोच्या अनेक कथांनी हे पुन:पुन्हा सिद्ध केलंय. मुंबईच्या फोरास रोडवरचे  देहविक्रय पाहून आपल्या कथांतून तो तितकाच विव्हळत होता, जितका फाळणीनंतर बलात्कार झालेले पाहून. बलात्कार करणारे मुस्लिम होते, हिंदूही होते. अशा हिंस्त्र वातावरणात त्याच्याइतका स्त्रीआस्थेतून आलेला कडवा सूर क्वचितच पुरुष लेखकांमध्ये पहायला मिळतो.

मंटोच्या ‘धुआं’, ‘बू’, ‘काली सलवार’, ‘ठंडा गोश्त’, ‘खोल दो’, ‘उपर निचे  दरमियां’ आदी कथांनी समाजाच्या बीभत्स नागवेपणाला आरसा दाखवला. याच कथांवर अश्लीलतेचे खटले भरले गेले. मुंबईत सोबतीला समविचारी इस्मत चुगताईदेखील होत्या. प्रगतीशील  लेखक, कवी, संपादक, कलावंत आसपास होते. पण इथली सिनेसृष्टी, साहित्य वर्तुळ यांतील कोतेपण त्याला पदोपदी डाचत  होतं. त्यातून संघर्षाचे कितीतरी प्रसंग उद्भवले. अशाच काही अनुभवांतून मंटोमध्ये कडवेपण भिनत गेलं. माणुसकी पणाला लागणाऱ्या या वातावरणात त्याला मित्रांबाबतदेखील असुरक्षित वाटू लागलं. स्वाभिमानी वृत्ती फणा काढून होतीच.

फाळणी मान्य नसतानाही, मुंबईवर जीवापाड प्रेम करणारा मंटो अखेरीस मुंबई सोडून नाईलाजानं लाहोरला गेला. तिथंही तो रमला नाहीच. तिथंही मुंबईविषयी-फाळणीविषयी त्वेषानं लिहीत राहिला. लाहोरमध्येही त्याच्यावर अश्लीलतेचे तीन वेळा खटले चालले. अशाच एका खटल्यात कवी फैज त्याच्या बाजूनं उभे राहिले खरं - खटल्यात आपण जिंकू किंवा हरू यापेक्षा - ‘...पण मंटोच्या साहित्यात साहित्यपण कमीच असते...’ हे फैज यांचं मत मात्र त्याच्या चांगलंच जिव्हारी लागलं.

संपादक योग्य ते मानधन देईनात. त्यात हा खटला. अश्लीलतेच्या आरोपातून सुटका झाली तरी पाकिस्तानच्या न्यायालयानं त्याला तीनशे रुपयांचा दंड ठोठावला. लेखनाची कमाई संपली होती. खटल्यानंतर कोण संपादक उभा करणार? घर आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेलं. मुंबईतला त्यावेळचा प्रसिद्ध सुपरस्टार श्याम चढ्ढानं स्वत:हून त्याला मोठी आर्थिक मदत देऊ केली. पण समाजाकडून दुखावलेल्या आणि गरिबीतही विलक्षण स्वाभिमान जपणाऱ्या मंटोनं तीही नाकारली. मुंबईतील कितीतरी मंटोप्रेमींनी - त्यांत सुपरस्टार अशोककुमारही होते, इस्मत चुगताई होत्या - मंटोच्या काळजीनं त्याला लाहोरच्या पत्त्यावर पत्रं पाठवली. आलेली शेकडो पत्रे मंटोनं उघडूनही पाहिली नाहीत. त्याला सहानुभूती, मदत यांची शिसारीच आली होती.

या सगळ्यात मंटो दारू सिगरेटच्या पार आहारी गेला. गांधीजींची हत्या झाल्याचं कळल्यावर तो तितकाच कोलमडला, जितका सुपरस्टार मित्र श्याम चढ्ढा अपघातात ठार झाल्याचं कळल्यावर... त्यांतूनच बायकोशी भांडण…मुलीचं आजारपण… पण बायकोच आपल्याला समजून घेऊ शकते, याचीही जाणीव… स्वत:चीच कीव यावी, असे प्रसंग आले… स्वत:शीच चाललेला त्याचा हा झगडा इतका विकोपाला गेला की, त्यातच अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी त्याचं निधन झालं.

मंटोच्या आयुष्याचा हा उत्तरार्ध कुठेही मंटोचं उदात्तीकरण न करता… त्याचा हा अंत:संघर्ष उभा करत - सर्वस्व पणाला लावून त्याचं सत्यासाठी उभं राहणं त्याच्या काही निवडक कथा व  कथांवरील खटल्यांतून नंदिता दास यांनी या चरित्रपटाच्या निमित्तानं उभा केला आहे.

ऋषी कपूर, परेश रावल, इला अरुण, दिव्या दत्ता, (गायक) गुरूदास मान, नीरज काबी, जावेद अख्तर… यांसारख्या दिग्गज कलावंतांनी अवघ्या दोन-तीन मिनिटांची भूमिका वाट्याला येऊनही ती मंटोच्या प्रेमाखातर यात साकारली आहे. नवाजुद्दीननं मंटोची सामाजिक कळकळ, त्याची आंतरिक  घालमेल, त्याचा इगो, त्याचं कोलमडणं… समर्थपणे पेललं आहे.

“अगर मेरे अफसानों को आप बर्दाश्त नहीं कर सकते, तो इसका मतलब है की जमाना  ही नाकाबिले बर्दाश्त है…” असं अहंभावानं मंटो म्हणत असला तरी त्याच्या या वक्तव्यात किंचितही अतिशयोक्ती नाही. आणि त्याचं हे विधान आज इतक्या वर्षांनंतरही तितकंच प्रस्तुत ठरावं, ही खरं तर ही शोकांतिकाच आहे.

आजच्या समाजानं, आजच्या राजकीय व्यवस्थेनं तरी मंटोला स्वीकारलं असतं का? कदाचित नाहीच.

पहिल्यांदा मंटो वाचला, तेव्हा अस्वस्थ मन:स्थितीत मी कविता लिहिली होती. ती पुढीलप्रमाणे -

मंटो,

बहुत थकान सी 
महसूस हो रही हैं 
तुझें पढनें के बाद

किताबों में ही सही 
तू मर क्यूँ नहीं जाता मंटो?

क्यूँ कुरेद रहा हैं जख्म?

क्यूँ शक्ल को 
आईना दिखाकर 
बेनकाब कर रहा हैं 
बार बार?

क्यूँ दफनायें 
हर असलियत से 
फिर से जिंदा हो रहा हैं तू?

क्यूँ नहीं बक्श देता हमें 
एक इत्मिनान की मौत?

किताबों में ही सही 
तू भी मर जा मंटो

इतना तो हक अदा कर 
तू भी तो थका होगा...

आता या चित्रपटाच्या निमित्तानं वाटतं, मंटो प्रत्येक काळात अस्वस्थ तडफडून मरेलच. पण तरीही सत्यासाठी जोखीम पत्करून प्रखरपणे उभं राहणाऱ्या प्रत्येक लेखकात ‘मंटोयत’ जिवंत असतेच.

‘मंटोयत’ का मतलब अगर लेखक का सच्चाई के साथ डटकर खडा रहना है, तो मंटो आज भी उतनाही जरुरी है. आज की  तारीख में वो सभी आसार मौजुद है की जहाँ मंटो की, हत्या यकिनन हो सकती है… और इस ‘मंटोयत’ को जिंदा रखना, हर फनकार  की जिम्मेदारी है...

नंदिता दास यांनी या चित्रपटाच्या रूपानं ‘मंटो’ला पुनश्च जागवलं आहे. 

.............................................................................................................................................

लेखक अभिजित देशपांडे प्रभात चित्र मंडळाच्या ‘वास्तव रूपवाणी’ या त्रैमासिकाचे संपादक आहेत.

abhimedh@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......